Monday, April 30, 2018

विदाऊट ए ट्रेस.... चार्ल्स बर्लिझ

विदाऊट ए ट्रेस.... चार्ल्स बर्लिझ
अनुवाद.... विजय देवधर
श्रीराम बुक एजन्सी
बर्म्युडा ट्रँगलमधील अजून काही घटना . त्यातील साक्षीदार त्यांना आलेले गूढ अनुभव याचे चित्रण या पुस्तकात आहे . आपण त्याला बर्म्युडा ट्रँगलचा उत्तरार्ध म्हणू शकतो .ज्या घटनांची नोंद घेतली गेली नव्हती अशा घटनांचा वेध घेणे त्याची विचक्षणा करणे ,बर्म्युडा ट्रँगलमध्ये हल्ली काय घडते याचा मागोवा घेणे हा हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे . कधी कधी पुस्तक वाचताना कंटाळा येतो . सलग बैठकीत हे पुस्तक वाचू शकत नाही असे मला वाटते .

Wednesday, April 25, 2018

नायिका

संतोष दिघेला दारात बघून मी चक्रावलो.हसत हसत आता शिरलेला संतोष आमच्या सौ.च्या छद्मी चेहर्याकडे पाहून थंड झाला.हळूच मला म्हणतो "काय रे ......?? वहिनीला काही सांगितले नाहीस का माझ्याबद्दल ....??
तशी सौ म्हणाली "हो बोलले ना हे.….. पण तुम्हाला नावाने ओळखतात चेहऱ्याने नाही. तसेही लेखकांना कोण विचारतो म्हणा".
संतोष चा पडलेला चेहरा पाहून आम्ही हसू लागलो . पाठीवर थाप मारून त्याला बसविले  आणि विचारले  "काय काम काढलेस ....??
पुढ्यात आलेल्या चहाचा घोट घेऊन संतोष म्हणाला  "भाऊ.... सिरीयलसाठी एक मुलगी पाहिजे.नवीन फ्रेश चेहरा नायिका म्हणून.आहे का कोणी... ??
"काहीही काय विचारतोस ....?? माझा काय संबंध याच्याशी....?? मी चिडून बोललो.
स्वयंपाक घरातून सर्व बोलणे ऐकणारी सौ. ताबडतोब बाहेर आली." भाऊजी ...माझ्या भाचीला विचारू का ..??
"कोण ती स्वाती ....? मी ओरडूनच विचारले." काहीही काय ...?? त्याला नायिका हवीय .तिला अभिनयाचे ज्ञान शून्य आहे ..
तसा संतोष उभा राहिला आणि सौच्या हातातील उपम्याची डिश काढून घेतली . मग एक चमचा उपमा तोंडात कोंबून म्हणाला" काही हरकत नाही . नाकीडोळी नीट आहे ना ....??? स्पष्ट बोलते ना ...?? पुरेसे आहे आपल्यासाठी".
"अरे काहीतरी काय बोलतोस दिघ्या..?? आता मी मुळावर आलो."अरे ....ज्यांना अभिनयाचा गंध नाही त्यांना डायरेक्ट नायिकेचा रोल.....तुझ्यासारखी सगळ्यांची लॉटरी लागते का... ??
सौच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच मी गप्प झालो.
" नायिकेला अभिनय कुठे करायचा असतो  भाऊ.. ?? माझ्या मालिकेत पहिल्या पन्नास भागात नायिका लहान मुलीसारखी हसते खेळते ,झाडावर चढते ,सायकल चालवते ,पाण्यात उड्या मारते .आता हे सर्व करायला अभिनय कशाला हवाय .बरे ती काय करते.... म्हणजे कोणत्या खेळाची आवड... ??
"फुटबॉल ..."सौ शांतपणे उत्तरली.
"अरे देवा.....!! संतोषने थोडावेळ विचार केला ,"हरकत नाही .आपण तिला फुटबॉल खेळायला लावू दोन एपिसोड"
"पुढे ....?? मी उत्सुकतेने विचारले.
"अरे ....नंतर पूर्ण सिरीयल ती रडणारच आहे .त्यामुळे एकच अभिनय करायचा आहे तिला.आता रडणे म्हणजे कपाळावर आठ्या आणि चेहरा जमेल तितका वाकडा ठेवणे डोळे मोठे करणे. कधीतरी चुकून हसायचे तेही चार ते पाच एपिसोडनंतर फक्त एक मिनिटं ".
"अरे हेच करणार का ती...? मी चिडून म्हणालो.
"असे कसे.... वेगवेगळे सण साजरे करेल ना ती . तेव्हा निरनिराळ्या साड्या नेसायला मिळतील . दागिने घालायला मिळतील . रांगोळी काढायला मिळेल .पण तेव्हाही तिचा अपमान होणार . तिथेही चेहरा रडवेला असणार बरे का..... ?? तिला साडी नेसायची सवय आहे ना.... ??संतोषने सौ. कडे पाहून विचारले.
मी सौ कडे पाहिले तिने फक्त मान डोलावली.
"हरकत नाही .... नसेल तर शिकव. आतापासूनच तिला साडी नेसून स्वयंपाक करायला शिकव.दोन तीन डान्स असतील तिचे . मैत्रिणीच्या लग्नात ,दिराच्या लग्नात .. छान मिरवायला मिळेल तिला .
"अरे पण संतोष ....ह्या क्षेत्रात कितीतरी तरुण नायिका आहेत त्यातली का पाहत नाहीस तू ??? माझा भाबडा प्रश्न .
"बरोबर आहे तुझे भाऊ.. पण नवीन मुलगी घेतली की तिला पैसे कमी दयावे लागतात शिवाय ती डेट ही भरपूर देऊ शकते आणि जुन्या चेहऱ्यांना पाहून लोक कंटाळलीत. नायिकेला टिपिकल अभिनय करायचा  असतो आणि हल्ली मध्यमवर्गीय मुली आवडतात सगळ्यांना ".
"म्हणजे स्वाती फिक्स तर....." सौ आनंदाने म्हणाली.
" हो तर... घेऊन या तिला उद्याच" असे म्हणत संतोष उठला.
"संतोष असे असेल तर चरित्र अभिनेत्यासाठी माझा विचार कर ना.... ?? मी हसत विचारले .
"केला असता भाऊ... पण ते भरपूर पडलेत इंडस्ट्रीत आणि नायिका सोडून सर्वच चरित्र अभिनेते असतात . पाच सहा एपिसोडच काम असते त्यांना . त्यामुळे तुला चान्स नाही . येतो मी "असे बोलून तो बाहेर पडला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, April 22, 2018

एन्ड गेम ......मॅथ्यू ग्लास

एन्ड गेम ......मॅथ्यू ग्लास
अनुवाद ...... उदय कुलकर्णी
मेहता पब्लिकेशन
युगांडातील एक हॉस्पिटलवर लॉर्ड रेझिस्टन्स आर्मी  हा दहशतवादी ग्रुप हल्ला करतो. त्यात अमेरिकेचे 32 नागरिक मारले जातात . यावर कारवाई करण्यासाठी अमेरिका योजना आखते पण त्यासाठी चीनच्या प्रभावक्षेत्रातील भागात लष्कराचा तळ ठोकायला चीन विरोध करतो . अमेरिकेच्या शेयरबाजारात खूप उलाढाली घडतात . अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीनची लाखो करोडोंची गुंतवणूक आहे . त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीन उलथापालथ घडवू शकतो . आता या दोन महासत्तांमध्ये संघर्ष उभा राहिला आहे . दोन्ही देशांच्या युद्धनौका समोरासमोर उभ्या राहिल्या आहेत.एकमेकांशी संबंध नसलेल्या या घटना पण दोन महासत्तांमध्ये होणारे राजकारण घडवते आहे . जग महायुद्धाच्या कड्यावर उभे आहे फक्त पहिली गोळी झाडली की महाभयंकर घटनांची मालिकाच सुरू होईल .
मॅथ्यू ग्लास हे टोपणनाव असून लेखक अज्ञात आहे . तो कोणीतरी आतल्या गोटातील माणूस असावा असे बोलले जाते .त्यामुळे तो खरे नाव जाहीर करू शकत नाही . आणि ते इंग्लंडमध्ये अज्ञात स्थळी राहतात .

Thursday, April 19, 2018

गिऱ्हाईक

सकाळी सहाचा गजर होताच मायाने सवयीनुसार डोळे उघडले आणि तिचे लक्ष त्याच्याकडे गेले . क्षणभर तिला कळलेच नाही कोण आहे हा.. ??? आपण कुठे आहोत... .?? मग हळू हळू तिला कालच्या घटना आठवल्या. शांतपणे बाजूला झोपलेल्या त्याच्याकडे पाहत ती एकदम उठली आणि कमरेत जोरात लाथ मारून त्याला उठवले .
"उठ हरामी ....चल निघ इथून. संपली तुझी ड्युटी...."तिने चिडून सांगितले.
तसा तो खडबडून जागा झाला.ओशाळवाणे हसत  आपले कपडे गोळा केले. तिने पर्समधून काही नोटा काढून त्याच्या अंगावर फेकल्या.
"चल निकल अभी.... .
त्याने नोटा मोजल्या आणि बस इतनाही असा प्रश्नार्थक चेहरा केला.
"तो......? दो घंटेका किताना दु तुझे ...?? साला छे घंटा तो सोया इधर आरामसे .त्याला फटकारले .
त्याचा चेहरा बघून तिला आतमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.
साली ... पूर्ण रात्रभर घोरत होती .तोंडाला गुटख्याचा वास मारत होता.मध्येच मारत ही होती  तरी सहन केले हिला तरी वर पैसेही कमी देते ......मनातल्या मनात चरफडत त्याने कपडे घातले आणि पैसे गोळा करून तो बाहेर पडला.
एका महिन्यानंतर
"अरे .....!! तीच ना त्यादिवशीची हिरोईन...??झकपक कपडे आणि मेकअप करून बाहेर पडणाऱ्या मायाला पाहून तो पुटपुटला. नेहमीसारखा गिऱ्हाईकाची वाट पहात असताना ती त्याला दिसली.काही न बोलता तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला.त्यालासमोर पाहून माया चपापली.
"मॅडम.... तुम्ही पण माझ्याचसारखे की काय ..?? त्याने छद्मीपणे विचारले .
काही न बोलता ती नुसती हसली . बाजूच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये त्याला घेऊन गेली .
कोल्डड्रिंकचा एक सीप घेऊन म्हणाली .."होय ..मी तुझ्यासारखीच आहे . धंदा करते. गिऱ्हाईकाच्या शिव्या खाते . मारही खाते . घामट शरीराचा ,गुटका दारूच्या तोंडाचा वास सहन करते . मनाविरुद्ध घाणेरडे प्रकार करते . काय करू शेवटी धंदा आहे ना ??? पण त्यादिवशी वाटले नेहमी आपणच का गिऱ्हाईक शोधायचे ,अंगावर घ्यायचे . त्यापेक्षा आपणच गिऱ्हाईक बनू . त्याला हवे तसे नाचवू आपल्या तालावर . त्यालाही कळू दे घामाचा वास कसा असतो . दारू आणि गुटख्याच्या तोंडात तोंड घालताना कसे  वाटते . सर्व करून झाल्यावर शिव्या ऐकताना आणि फेकलेले पैसे गोळा करताना काय वाटते ??? तू आलास नशिबात माझ्या . मग सगळी चीड तुझ्यावर निघाली.त्या दिवशी जे जे काही मनात होते ते सर्व मी तुझ्याशी केले .पैश्याची मस्ती काय असते ते अनुभवले . एक गिऱ्हाईक बनून त्याचा आनंद उपभोगला मी .खूप खुश होते त्या दिवशी . दर महिन्यातून एकदा हा आनंद उपभोगायला के हरकत आहे....".
आलेल्या वेटरला बिल देऊन त्याला डोळा मारत ती बाहेर पडली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, April 18, 2018

डेथ ऑफ अॅन आऊटसायडर....एम. सी. बीटन

डेथ ऑफ अॅन आऊटसायडर....एम. सी. बीटन
अनुवाद.......दीपक कुलकर्णी
मेहता पब्लिकेशन
स्कॉटलंड मधील छोट्याश्या खेड्यात राहणारी एक विक्षिप्त,स्वभावाची व्यक्ती . गावातील सर्वानाच तिचा त्रास . प्रत्येकीला वाटते ही व्यक्ती मरावी आणि त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होते . मोठं मोठे लॉबस्टर असलेल्या हौदात त्या व्यक्तीला मारण्यात येते आणि हेच लॉबस्टर लंडनच्या हॉटेलात जाऊन पोचतात . ह्या सर्व प्रकरणाची जबाबदारी इन्स्पेक्टर हॅमिश मॅकबेथवर येऊन पडते . मॅकबेथ आपल्या कुत्र्याला घेऊन बदलीवर त्या खेड्यात आलाय . हे खून प्रकरण दाबून टाकण्यासाठी मॅकबेथ वर दबाव येतोय . तर कोणत्याही क्षणी अजून एक खून होईल याची त्याला चिंता आहे . एक वेगवान कथा

Monday, April 16, 2018

बाप

"साहेब ...माफ करा.पुन्हा नाही अशी चूक होणार. नका मारू हो.... पाया पडतो तुमच्या". हात जोडून गयावया करीत मितेश एस. पी. साहेबांना म्हणाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गालावर पाच बोटे उमटलेली दिसत होती.
" मारामारी करताना ही नाटके कुठे गेली होती..? साल्यानो  पोरींची  छेडही काढता आणि मारामारीही करता"एस. पी. संजय देशपांडे चिडून बोलत होते.."बोलवलय तुझ्या बापाला ....त्याचीही काढतो बघ कशी . पोरांना हेच शिकवतो का "??
"नको नको साहेब ...! त्यांना नका बोलावू . खूप साधे आहेत हो ते . कधी कोणाशी भांडत नाही. आवाजही चढवून बोलत नाहीत घरी . खूप धक्का बसेल हो त्यांना . आतापर्यंत ते पोलीस स्टेशनची पायरी चढले नाहीत "मितेश आता फारच जोरात रडू लागला.
एका हवालदाराने त्यांच्या कानात येऊन काहीतरी सांगितले .तसे देशपांडे म्हणाले "आला बघ तुझा बाप . बघतो त्याला आता . इतक्यात दरवाजावर ते उभे राहिले . उंच कृश बांधा, डोळ्यावर चष्मा . आगतिक चेहरा . आल्याआल्या त्यांनी देशपांडे साहेबाना हात जोडून नमस्कार केला . त्याला पाहून देशपांडे चमकलेच.
"मी रत्नाकर निकम ..याचा बाप . साहेब साधा आहे हो माझा मुलगा . काही केले नसेल त्याने . सोडून द्या त्याला .बोलता बोलता रत्नाकरच्या डोळ्यात अश्रू आले . देशपांडे  पुन्हा चमकलेच . आता तर दोघेही बाप बेटे त्यांच्या समोर हात जोडून उभे होते .
काही क्षण विचार करून देशपांडे म्हणाले" ठीक आहे सोडून देतो पण पुन्हा कुठे असा सापडलास तर खैर नाही तुझी . जा तू घरी . बाबा राहू दे  इथे थोडावेळ बोलायचे आहे त्यांच्याशी "
मितेश हात जोडून निघून गेला . तो जाताच देशपांडेंनी खुर्चीवरून उठून जोराने रत्ना तू ..!! असे ओरडतच  त्याला मिठी मारली . त्यानेही हसत संजा..! म्हणत प्रतिसाद दिला.
" अरे काय ही तुझी परिस्थिती मित्रा ...?. आमचा डॅशिंग मित्र आज या अवस्थेत कसा... ?? अरे कॉलेजमध्ये ,खेळाच्या मैदानावर तुझ्या जीवावर किती मारामाऱ्या दादागिरी केली आम्ही ....किती वर्षांनी भेटतोय आपण... आणि तेही या परिस्थितीत...
रत्नाकर हसला "अरे परिस्थिती बदलत असते प्रत्येकाची. आता बघना ..तुही मोठा साहेब झालास .
" पण तू बद्दलशील असे वाटले नव्हते " देशपांडे म्हणाले ... तुझा स्वभाव आक्रमक होता .त्या डान्सबारमधील मुमताजला फाटलेली नोट द्यायचास . ती काहीतरी बोलेल याची भीती वाटायची आम्हाला पण तू मात्र बिनधास्त असायचास . तुझ्या जीवावर तर सर्व चालत होते . तू असलास की आधार वाटायचा खूप. प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन होते तुझ्याकडे . देशपांडे जुन्या आठवणीत रमून गेले .
" हो रे ....पण शिक्षण पूर्ण झाल्यावर घरची जबाबदारी घ्यावी लागली . शिक्षण पूर्ण होईपर्यंत बापाची जबाबदारी होती. पण नंतर कळले आता आपणही हातभार लावला पाहिजे .  दोन तीन ठीकाणी जॉब केला. शेवटी किती नोकऱ्या बदलणार म्हणून एक नोकरी पक्की केली आणि त्यातच गुरफुटून गेलो. मग लग्न आणि त्यानंतर हे चिरंजीव . संसार करताना बाकीचे सर्व विसरून गेलो . कुटुंबातच रमून गेलो . खरेतर रोजच्या खर्चाच्या काळजीतच आतापर्यंत जगतोय तर इतर ठिकाणी काय बघणार ...? रत्नाकर हसत बोलत होता पण त्याच्या डोळ्यातील वेदना लपत नव्हती ."संजा एक विनंती करू का ..?? तो हात जोडून म्हणाला ."मी कसा होतो हे माझ्या कुटुंबाला कळू देऊ नकोस .त्यांच्या मनातील माझ्या प्रतिमेला तडा जाईल. खूप साधा समजतात ते मला . तसेच राहूदे ."
देशपांडे त्याचा हात हाती घेऊन म्हणाले "रत्ना दोस्त आहे मी तुझा .नाही सांगणार मी कोणालाच . फक्त मला एक सांग एमपीएससी परीक्षेचे पुस्तक तू मला कुठून आणू दिले होतेस..??  त्यावेळी ते पुस्तक घेण्याची माझी परिस्थिती नव्हती ना तुझी "
रत्नाकर मोठ्याने हसला" जाऊदे ना मित्रा...! झालासना ऑफिसर तू .... विषय सोड ... फार नाही.. त्या नाक्यावरच्या लायब्ररीतील एक पुस्तक कमी झाले असेल . आणि  हातावर टाळी देत रत्नाकर बाहेर पडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, April 14, 2018

तिची मुलगी

आसावरीच्या बारा वर्षाच्या मुलीच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून आम्ही हादरून गेलो.
आसावरी ....आमच्या ऑफिसमधील सहकारी . तिच्या नवऱ्याचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला म्हणून त्याच्या जागेवर तिला घेतले होते.अतिशय शांत बाई . खाली मान घालून काम करणारी आणि प्रामाणिक. तिच्या नवऱ्याच्या ओळखीमुळे कोणी तिच्या वाटेलाही जात नव्हते .तिला निधी नावाची गोड मुलगी होती . आसावरी कधी कधी माझ्याशी बोलायची . बोलण्यावरून कळायचे ती आणि तिची मुलगी हेच त्यांचे जग . दोघीही एकमेकात खुश असायच्या .कुठेतरी पिकनिकला गेली आणि अपघातात मृत्यू झाला . बातमी ऐकताच सर्व ऑफिस सुन्न झाले होते .सांत्वन करायला तिच्या घरी कसे जायचे..?ती कशी रिऍक्ट होईल..? काय तिची अवस्था झाली असेल ..??याची चर्चा ऑफिसमध्ये चालू झाली .काहीजणांनी तिचे दुःख पहावणार नाही म्हणून घरी जाण्याचे टाळले.
मी ऑफिस सुटल्यावर तिच्या घरी गेलो.मनाशी काय बोलावे कसा आधार दयावा हे निश्चित करून गेलो होतो . बेल वाजवली तेव्हा दार तिनेच उघडले . तिचा शांत चेहरा पाहून मी चमकलो . मला पाहून क्षीणपणे हसून  तिने आत बोलावले . मी शांतपणे चटईवर बसलो . तिने पाणी आणून दिले आणि समोर बसली .  वातावरणात तो नेहमीच तणाव जाणवत होता .
धीर एकटवून मी म्हटले ..."झाले ते वाईट झाले". तशी ती उत्तरली नाही "जे झाले ते चांगलेच झाले".
तिच्याकडून आलेले उत्तर ऐकून मी  चमकलो "काय बोलतेस तू हे "??
"बरोबर बोलतेय भाऊ " किती दिवस मुलीचे टेन्शन सहन करीत जगायचे ??जेव्हा झाली तेव्हा मी सोडून सर्व दुःखी झाले . त्यानंतर घरातल्यांचे टोमणे खावे लागले . दुसऱ्या मुलाची तयारी करायची ठरवली तेव्हा हे आजारी आणि त्यातच ते गेले . मुलगी मोठी होऊ लागली तशी तिची काळजी वाटू लागली . माझ्याशिवाय कोण आहे तिला ?? मी कामावर गेल्यावर ती कशी रहात असेल . शाळेत तिच्याबरोबरीचे कसे वागत असतील??? याचीच सारखी काळजी वाटत असते . क्लासला गेली आणि पाच मिनिटे जरी यायला उशीर झाला तरी जीव घाबरा व्हायचा . रस्त्यावरून चालताना ती सोबत असली तरी नजर आजूबाजूला भिरभिरायची . बसमध्ये तिच्या शेजारी कोण पुरुष बसला तरी जीवाची घालमेल व्हायची . त्या दिवशी सोसायटीच्या वॉचमनने तिच्या डोक्यावर टपली मारली तेव्हा किती चिडले होते मी त्याच्यावर . पेपर आणि बातम्यांमध्ये लहान मुलींवरचे अत्याचार ऐकून जीव अजून घुसमटायचा".
"मान्य आहे मला .पण काही गोष्टीमुळे सर्व जगाला दोषी ठरवून कसे चालेल . नकारात्मक गोष्टीच आपल्या आयुष्यात घडणार हे ठरवून चालायचे का" ?? मी हळू आवाजात म्हटले .
"हो  भाऊ ....मी नकारात्मक विचार करतेय . पण हल्ली कांय चालू आहे पाहिलेत ना . हिला पुरेसा वेळ देता येत नव्हता मला . मीच आई मीच बाप तिचा . एकटी कुठे कुठे पुरी पडणार ?? त्यादिवशी सेमिनारवरून घरी येत होते . वरळी सीफेसच्या कट्ट्यावर कॉलेजचे तरुण तरुणी जे काही चाळे करीत होते तेव्हा नाईक मॅडम म्हणाल्या यांमुलींचे पालक घरी काय विचार करीत असतील . आपली मुलगी शिकायला गेलीय...आणि मुलगी घरी जाईल तेव्हा तिच्या मनात काय विचार असतील ??. तिला अपराधीपणा वाटत असेल का ?? आपण कॉलेजला न जाता मित्रांबरोबर चाळे करीत होतो . तेव्हाही मला मुलीची आठवण आली . उद्या कॉलेजला जॉबला गेल्यावर तिचे काय होईल .किती जणांच्या नजरेपासून तिला वाचवू .ती गेली तेव्हा प्रचंड आघात झाला माझ्यावर . माझे पिलू होते हो ते . पण उद्यापासून तिची काळजी करायची गरज नाही ह्या विचारानेच मला शांत झोप लागली . तुम्हाला विचित्र वाटत असेल पण खूप मोकळे वाटते आहे मला".
तिचे बोलणे ऐकून मनात कुठेतरी हललो मी . मला माहित होते ती स्वतःच्या मनाचे समाधान करतेय . पण आता या क्षणाला तिचे हे वागणेच योग्य वाटले मला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, April 13, 2018

द डार्कर साईड.... कोडी मॅकफॅदियेन

द डार्कर साईड.... कोडी मॅकफॅदियेन
अनुवाद ....... प्रकाश जोशी
मेहता पब्लिकेशन
अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षाच्या मुलाचा विमानात तीस हजार फूट उंचीवर असताना खून होतो .विशेष म्हणजे त्या मुलाने लिंगबदल केलाय. त्या खुनाचे प्रकरण एफ. बी. आय. स्पेशल एजंट स्मोकी बॅरेटकडे सोपवले गेलेय. कारण ती अश्या प्रकरणामध्ये तरबेज आहे . खुनी विकृत आणि सिरीयल किलर आहे हे तिच्या लक्षात येतेय. तिने स्वतः विकृत खुनी काय करू शकतो ते भोगले आहे आणि म्हणूनच ती या खुन्याच्या मागे लागणार आहे . तिचा अंदाज खरा ठरतो . खुनी एकामागून एक खुनाची मालिका चालू करतो .आता तो जाहीररित्या पूर्वसूचना देऊन खून करतोय. स्मोकी त्याला पकडण्यात यशस्वी होईल का ?? त्यासाठी तिला कोणती किंमत चुकवावी लागेल. एक उत्कंठावर्धक पाठलाग .
स्मोकी बॅरेट सिरीजचे हे तिसरे पुस्तक .वाचताना प्रथम शँडोमॅन दुसरे  ए फेस ऑफ डेथ आणि तिसरे  द डार्कर साईड अश्या क्रमाने वाचायला हव्या

Tuesday, April 10, 2018

डोंगरी ते दुबई ...एस. हुसेन झैदी

डोंगरी ते दुबई ...एस. हुसेन झैदी
अनुवाद..........अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
मागील साठ वर्षातील मुंबईतील गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांचा इतिहास यात मांडला गेला आहे . अगदी मुंबईचा पहिला दादा कोण यापासून सुरवात झालीय . पण यातील खरा नायक आहे तो दाऊद इब्राहिम . संपूर्ण पुस्तक त्याच्या भोवती फिरते . त्याचा उदय आणि त्याच्या आधीची परिस्थिती याची लेखकाने सुरेख माहिती दिली आहे . हाजी मस्तान,वरदाराजन आणि कारीमलाला यांचा उदय आणि अस्त. त्याचवेळी दाऊदचा उदय कसा झाला याची सुरेख माहिती आहे . माया डोळस आणि मन्या सुर्वे यांचे इंनकॉन्टर तसेच बाबू रेशीम याची हत्या, जे.जे. हॉस्पिटलमधील हत्याकांड यांचे वर्णन  अंगावर काटा आणते . हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा अधिकृत इतिहासच आहे

Saturday, April 7, 2018

मालिका लेखन

नवीन सुरू झालेल्या सिरियलमध्ये  संतोष दिघेचे नाव वाचून मी चक्रावूनच गेलो . "च्यामारी....! हा कधीपासून लेखक झाला . परीक्षेत आमचे पेपर पाहून पास होणारा आज लेखक म्हणवून घेतोय याचेच आश्चर्य वाटले ". न राहवून त्याला फोन केला .
तेव्हा "भाऊ.. तुझ्याच फोनची वाट पाहत होतो मी. तू फोन करणार याची खात्री होतीच मला. संध्याकाळी भेटू . पण त्या विक्रमला घेऊन येऊ नकोस . सरळपणे बोलणार नाही तो ".
म्हटले ठीक आहे .संध्याकाळी त्याच्या नेहमीच्या अड्ड्यावर जाऊन बसलो . अड्डा म्हणजे एक इराण्याचे हॉटेल ,जिथे तो पडलेला असायचा . मला पाहताच जोरदार मिठी मारली. ख्याली खुशाली विचारल्यावर मी त्याच्या लेखनाचा विषय काढला "भोxxxxxच्या ...तू कधीपासून लेखक झालास ???
तसा हसून म्हणाला" कसला रे लेखक ...मनात आणलेस तर तुही छान लेखक बनशील".
"ते कसे …."मी उत्सुकतेने विचारले .
"बघ भाऊ... हल्ली लिहायला काही फारसे डोके लागत नाही . हा रहस्यकथा किंवा गूढकथा लिहायला थोडा विचार करावा लागतो . पण कौटुंबिक कथा लिहायला अजिबात विचार करावा लागत नाही .एक सुंदर दिसणारी नायिका पाहिजे आणि तिला छळणारे सासू,किंवा सासरे आणि दीर ,नणंद, पाहिजे .तिला लग्नाआधी खूप बिनधास्त ,निडर दाखवायचे घोडयावर बसणारी ,नदीत पोहणारी ,गुंडांचा हात पकडणारी मग तिचे लग्न करून दयायचे .एकतर तिच्या मर्जीने होतेय असे दाखवायचे किंवा तिच्या मर्जीविरुद्ध . पण कसेही झाले तरी तिला लग्नानंतर आदर्श सून,पत्नी ,वहिनी दाखवायचे आणि नंतर तुला पाहिजे तेव्हडे दिवस तिच्यावर होणारे अत्याचार ,मानसिक छळ दाखवायचे"
"अरे पण त्याला काही लिमिट असेल ना .."?मी चिडून म्हणालो.
" नाही त्याला लिमिट नाही . छळाचे अनेक प्रकार आहेत जसे भाजीत भरपूर मसाला टाकणे . रात्री फॅन बंद ठेवणे . सासूचे खोटे खोटे डोके दुखणे आणि सुनेने रात्रभर तिची सेवा करणे .असे अनेक प्रकार दाखवू  शकतो . नवरा दुसऱ्या बाईकडे गेला की तिच्या घरी जाऊन तिच्या हातापाया पडून नवऱ्याला घरी आणणे त्यासाठी ती सांगेल ती शिक्षा सहन करणे यावरच तीन एपिसोड जातील" संतोषकडे उत्तरे तयार होती .
" पण लोक किती दिवस सहन करतील हे ...?"मी वैतागून म्हणालो.
"अरे करतात ..त्या एका सिरियालमध्ये नाही का नायिकेला मूल होण्यासाठीच पन्नास एपिसोड लागले . पूर्ण महाराष्ट्रात तिच्या गरोदरपणाची चर्चा होती आणि नायिका जितकी सोशिक तितके भाग वाढत जाणार .नायिका शिकलेली असेल तर तिचा नवरा गावंढळ दाखवायचा ,ती शिकलेली नसेल चाळीत राहणारी असेल तर तिचा नवरा खूप शिकलेला श्रीमंत दाखवायचा . ती उद्योगधंद्यात हुशार असेल तर घरात बिनडोक दाखवायची .ती जितकी साधीभोळी असेल त्याच्याविरुद्ध तिचा नवरा ,सासू हुशार दाखवायचे" संतोष डोळे मिचकावत म्हणाला.
"लोकांना कंटाळा नाही का येणार तेच तेच बघून ...??मी म्हटले.
" कोण म्हणतो लोकांना कंटाळा येईल . दर पन्नास एपिसोड नंतर नायिका बदलायची ,नाहीतर तिचा नवरा ,नंतर तिची सासू . म्हणजे नवीन कलाकारांना संधी मिळेल आणि कथेचे आणखी चार एपिसोड वाढतील"संतोषकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तयार होते .
"पण समजा लोकांना कंटाळा आला तर ???मी  ठामपणे बोललो .
" हरकत नाही ..शेवटच्या सात एपिसोडमध्ये नायिका सर्वाना वठणीवर आणते असे दाखवायचे आणि सिरीयल संपवायची . तोपर्यंत पाचशे भाग झालेले असतात.अरे.. माझी सिरीयल चालू होण्याआधीच मी पन्नास भाग लिहून ठेवले आहेत . नुसत्या नायिकेच्या लग्नावरच दहा एपिसोड लिहिले आहेत .सत्तर एपिसोड नंतर तिचा नवरा किंवा ती एकमेकांवर प्रेम करू लागतील. ते फक्त तीस एपिसोड पर्यंत राहील मग त्याचा किंवा तिचा अपघात होईल त्यात त्यांचा चेहरा बिघडेल ,स्मृती जाईल. मग नवा चेहरा ,नवीन कथा . जशी निर्माता ,डायरेक्टर सांगेल तसे. दर पन्नास् एपिसोडनंतर नवीन पात्राची एन्ट्री ,कोणतरी नायिकेच्या बाजूने तर बहुतेक तिच्या विरुद्ध . माझी सिरीयल पाहणाऱ्या बायका दरवेळी पुढचा एपिसोड उत्सुकतेने बघतील बघ तू". संतोष चा तो आत्मविश्वास पाहून मी हादरून गेलो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर