Wednesday, May 30, 2018

जमाना बदल गया

गेले काही दिवस ती फार अस्वस्थ होती.अर्थात सिंगल पॅरेन्ट असणे किती कष्टदायक असते याची तिला माहिती आणि अनुभव होताच. सोसायटीतील वॉचमनपासून ते ऑफिसमधील सहकाऱ्यांपर्यंतच्या नजरा ती ओळखून होती.सोनूलीही आता मोठी होतेय. तिचीही काळजी होतीच.
फेसबुकवर रोज तिला रिक्वेस्ट यायच्या.बहुतेक करून पुरुषच असायचे. मेसेंजरही नेहमी चालूच असायचा .याना कसे कळत असेल ही एकटी आहे ...?? विरंगुळा म्हणून ती फेसबुक ,व्हाट्स अप वापरायची. कधी कधी काही पुरुषांशी गप्पाही मारायची.शेवटी तीही एक स्त्री होतीच .किती दिवस सहन करेल.
असाच एक मेसेंजरवर भेटला . पहिल्यांदा खूपच सभ्य वाटला . हळू हळू बोलणी वाढू लागली .एकमेकांची माहिती देवाणघेवाण झाली . पण नंतर त्याचा बोलण्याचा ट्रॅक बदलू लागला . थट्टा मस्करी वाढू लागली .तरीही तिने फारसे लक्ष दिले नाही . मग द्विअर्थी बोलणे चालू झाले. तिने एक दोनदा आवडत नसल्याची हींट दिली पण त्याने लक्ष दिले नाही .गेले महिनाभर तिने त्याच्याशी बोलणे टाकले . फक्त गुड मॉर्निंग/ गुड नाईट चे मेसेज . परत  त्याने माफी मागितली आणि नेहमीसारखे पुन्हा बोलणे सुरू झाले.
पण परवा त्याने विचित्रच मागणी केली . अर्थात कधी न कधी अशी मागणी येणार हे अपेक्षित होतेच. तिने सरळ नकार दिला . मग त्याची विनवणी सुरू झाली . कमीत कमी तुझे फोटो तरी पाठव असे बोलू लागला . तिने त्यालाही नकार दिला.आता दिवसेंदिवस तो चिडखोर आणि हिंस्त्र बोलू लागला .परवा तर तो सोनूलीबद्दल बोलू लागला.तेव्हा मात्र तिचा राग उफाळून आला .वाटेल तसे बोलली त्याला . पण आता तिला चिंता वाटू लागली. काय करावे सुचत नव्हते. ब्लॉक केले तरी वेगवेगळ्या फोन वरून मेसेज पाठवीत होता . मेसेंजर ही अनब्लॉक करीत होता.
एकटीच विचारात बसली असताना निधी तिच्याजवळ आली.निधी आयटी डिपार्टमेंटमध्ये होती . सहज बोलत बोलत तिने एक अपघाताची क्लिप तिला दाखवली." शी .... ! अशी शूटिंग कोण करेल का..? अपघात घडत असताना.."? तिने चिडून विचारले . अग फेक आहे ही.... अश्या क्लिप बनवून विकल्या की पैसे मिळतात म्हणून तर बनविल्या जातात.निधीने माहिती पुरवली तिला . बोलताबोलता गाडी पॉर्नवर घसरली." अश्या साईट वर कोण विडिओ पाठवितात...???  तिने कुतूहलाने विचारले . कोणीही पाठवू शकतो.. पैसे मिळतात म्हणूनच असे विडिओ पाठवितात ना ..?? तुम्ही तुमच्या जुन्या वस्तू साईट वर विकता तसेच असे फोटो आणि विडिओ ही विकता येतात म्हणून तर स्त्रियांचे बळजबरीने विडिओ फोटो काढून ते अश्या साईटवर विकतात ".
निधीचे ऐकून तिला धक्काच बसला.म्हणुन तर तो आपले फोटो मागत नाही ना....?? हा विचार मनात येताच तिला घाम फुटला.कसेतरी काम संपवून घरी आली . व्हाट्स अप आणि मेसेंजर वर त्याचे मेसेज दिसत होते . ती शांतपणे बसून विचार करू लागली . अचानक तिला काही सुचले . घाईघाईने तिने लॅपटॉप ऑन केला आणि काही शोधू लागली . बऱ्याच वेळाने तिच्या चेहऱ्यावर समाधानाची खूण दिसून आली . मोबाईल हातात घेऊन तिने व्हाट्स अप वरून त्याला हाय केले . गोड बोलून त्याच्याकडेच त्याच्या न्यूड फोटोची मागणी केली . तिच्या असा पॉसिटीव्ह रिस्पॉन्स पाहून तो खुश झाला . ताबडतोब त्याने पंधरा वीस न्यूड फोटो आणि दोनतीन विडिओ तिला पाठवून दिले. आता तुझी पाळी असा मेसेज पाठविला .तिने काही उत्तर न देता व्हाट्स अप बंद केले . त्याचे फोटो वेगवेगळ्या साईट वर अपलोड करून त्याची लिंक त्याला पाठवून दिली.
च्यायला दरवेळी स्त्रियांचेच फोटो का अश्या साईटवर अपलोड करायची धमकी देतात एकदा पुरुषांचेही करूया की ..... बघू त्यांची किती बदनामी होतेय . मनाशी हसत तिने लॅपटॉप बंद केला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

चिखल घाम आणि अश्रू ....बेअर ग्रील

चिखल घाम आणि अश्रू ....बेअर ग्रील
मड स्वेट अँड टिअर्स
अनुवाद ......अनिल/ मीना किणीकर
मनोविकास प्रकाशन
डिस्कव्हरी चॅनलवर MAN VS WILD या मालिकेद्वारे प्रसिद्ध झालेल्या बेअर ग्रील याचे हे आत्मचरित्र. खरे तर हे पुस्तक नाहीच तर एखादा ऍक्शन चित्रपट पाहतोय असे वाटते . वीट या बेटावर तो लहानाचा मोठा झाला . तिथेच तो नौकानयन शिकला .गिर्यारोहणाची आवड ही तिथेच निर्माण झाली . स्वतःचे रक्षण करण्यासाठी कराटे शिकला .त्यानंतर तो ब्रिटिश एस.ए. एस. मध्ये दाखल झाला . त्याचे तिथल्या ट्रेनिंगचे वर्णन वाचून अंगावर काटा येतो . शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची ,चिकाटी आणि सहनशक्तीची परिसीमा गाठून त्याने प्रशिक्षण पूर्ण केले .आफ्रिकेतील पॅराशूट अपघातात त्याची पाठ तीन ठिकाणी मोडली . यातून तो उठू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले तरीही केवळ अठरा महिन्यात त्यांचे आणि इतरांचे अंदाज चुकवत वयाच्या तेविसाव्या वर्षी एव्हरेस्ट सर केले .पण ही तर असामान्य धाडसाची केवळ सुरवात होती . मग सुरू झाले जिथे कोणी जाऊ शकत नाही अश्या ठिकाणी जाणे . संकटांचा मुकाबला करीत जिवंत राहणे . त्याची ही धाडसे तुम्ही MAN VS WILD मध्ये पहिली असतील.अतिशय थरारक वेगवान ,अंगावर काटा आणणारे आत्मचरित्र . प्रत्येकाच्या संग्रही असायला हवेच

Monday, May 28, 2018

स्मशानातील कामगार

नाक्यावरच्या टपरीवर वसंताला चहा पिताना बघून आश्चर्यच वाटले.वसंत सहसा बाहेर पडत नाही. सुट्टीही फिक्स नसते.त्यामुळे ठराविक दिवशी भेटण्याची खात्री नसते.मला पाहताच हात दाखविला आणि अजून एका कटिंगची ऑर्डर सोडली. चहावाल्याच्या नाराज चेहऱ्याकडे त्याने जाणून बुजून लक्ष दिले नाही.
"वसंता..आज घरी कसा..?? मी विचारले.
" काही कामे होती .आज करून टाकली".त्याने उत्तर दिले.
"बरे .....मग कसे चालले आहे कामावर.. ?? मी चहाचा घोट घेऊन विचारले .
"चालले आहे बरे ....पण पूर्वीसारखी मजा नाही   भाऊ ..."त्याने चेहरा वाकडा करत उत्तर दिले.
" म्हणजे ...??मी जोरात ओरडलो ",अरे ..अंत्यसंस्कार करण्यात कसली मजा ....??
अरे हो ....मी सांगायचे विसरलो वसंत स्मशानात कामाला होता .प्रेतांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करणे हे त्याचे काम.चिता उभारणे ,अग्नी दिल्यावर त्याचे दहन व्यवस्थित करणे हे त्याचे काम.दिवसभर स्मशानात असल्यामुळे त्याच्या अंगाला विशिष्ट दर्प येत असे त्यामुळे बरेचजण नाक मुरडत.अर्थात आम्हाला हे माहीत असल्यामुळे लक्ष देत नव्हतो.
" नाहीतर काय भाऊ ... पूर्वी स्मशानात प्रेत येत असत तेव्हा केव्हढि गर्दी व्हायची . . किती हार फुले असायची . लोकांची रडारड शेवटपर्यंत चालायची .प्रेताचे सर्व विधिनुसार अंत्यसंस्कार व्हावे  म्हणून नातेवाईकांची भांडणे सुरू व्हायची .अरे ...मी मारामाऱ्या देखील पहिल्या आहेत चितेजवळ. अग्नी लावताना.फेऱ्या मारून  मडके फोडताना त्या व्यक्तीचे बोंब मारून रडणे अंगावर काटा आणायचा .मन भरून यायचे. डोळ्यातून कधी पाणी वाहू लागायचे ते कळायचे नाही . आम्ही ही गुंतून जायचो त्यात . कवटी फुटेपर्यंत लोक थांबून असायचे . तुम्हाला कसे काम मनासारखे झाले की आनंद होतो तसेच आमचे व्हायचे.पण आता घाईघाईने प्रेत आणले जाते. मोजून चार माणसे असतात . कधी एकदा अग्नी लावतो आणि निघतो असे होते सर्वाना .जाताना माझ्या हातावर चार पैसे टेकवतात आणि बाकी तू लक्ष ठेव असे सांगतात . अरे पैश्यासाठी करतो का आम्ही हे..?पोटतिडकीने वसंत बोलत होता.
"खरे बोलतोस वसंता.... हल्ली सगळ्यांना घाई झाली आहे . दुःख सहन करण्याची ताकद नाही राहिली कोणाच्यात "मी थोड्या विषदाने म्हणालो.
"भाऊ ह्या नोकरीत खूप काही भोगले मी . माझ्या अंगाला येणारा हा स्मशानाचा दर्प संपूर्ण घरात पसरलेला असतो . लग्न झाले तेव्हा बायको जवळ येत नव्हती . हळू हळू तिला सवय झाली पण मनात बसले ते बसलेच . मुले कोणाला मित्रांना घरी आणत नाहीत . मी बाहेर फिरायला बाहेर पडलो की आजूबाजूचे विचित्र नजरेने पाहतात .तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला येतात तेव्हा तुमचे ऑफिस पाहून पाहुणे खुश होतात पण भेटायला कुठे येणार पाहुणे ..? स्मशानात .?? पण मला त्याचे काही वाटत नाही . मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे आहे.पण अजूनही लोक अत्यसंस्कारासाठी लाकडे वापरतात याचे दुःख होते बघ. माझ्यासमोर कित्येक मण लाकडांची राख झाली आहे . बाजूला विद्युत दाहिनी आहे पण त्याचा वापर फारच कमीजण करतात.
"हो.. रे... मान्य आहे पण आपल्यात अजूनही विद्युतदाहिनीचा वापर रितीच्या विरुद्ध मानले जाते . निर्णय कोण घेणार ?? भावकी पुढे काही चालत नाही.पण आपणच आपल्यापासून सुरवात केली तर फरक पडेल ".मी गंभीर होऊन बोललो .
"खरेच भाऊ ....असे झाले तर कित्येक झाडे वाचतील. पर्यावरणाची हानी होणार नाही . मुख्य म्हणजे आम्हाला यातून सुटका मिळेल . हा दर्प निघून जाईल.वाट बघतोय कधी तो दिवस येतोय "असे म्हणून तो उठला .
मी नको नको म्हणत असताना चहाचे पैसे दिले आणि निघून गेला .
"कौन है ये आदमी भाऊ... ??? कैसा बास आता है उसके शरीर से ..?? अण्णा चेहरा वाकडा करून मला म्हणाला.
त्या माणसाचे महत्व अण्णाला सांगायची गरज भासली नाही मला . मुकाट्याने मीही चालू पडलो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, May 26, 2018

फेलुदा टिंटोरेटटोचा येशू + १ कथा ....सत्यजित रे

फेलुदा टिंटोरेटटोचा येशू + १ कथा ....सत्यजित रे
अनुवाद अशोक जैन
रोहन प्रकाशन
यात दोन कथा आहेत . फेलदा हा सत्यजित रे यांचा मानसपुत्र आणि प्रसिद्ध खाजगी गुप्तहेर . नेपोलियनचे पत्र या कथेत एक लहान मुलांचा  पाळलेला पोपट पिंजऱ्यातून नाहीस होतो . तो मुलगा त्याची तक्रार बाजारात भेटलेल्या फेलुदाकडे करतो . फेलुदाला त्याच्या पिंजऱ्यावर रक्ताचे डाग सापडतात आणि तिथे खून ही होतो .
दुसऱ्या कथेत जगप्रसिद्ध चित्रकार टिंटोरेटटो एक चित्र चंद्रशेखर याना भेट मिळालेले असते . आता वारसा हक्काने ते चित्र त्यांच्या मुलाकडे आलेले असते .पण तेव्हाच घरातील एक कुत्रीचा खून होतो  . फेलुदा या गोष्टीचा  तपास करतो तेव्हा अनेक गोष्टी उजेडात येतात .

Wednesday, May 23, 2018

नॉस्ट्रदिमसची भविष्यवाणी ....डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी

नॉस्ट्रदिमसची भविष्यवाणी ....डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी
मेहता पब्लिशिंग हाऊस
जगातील प्रसिद्ध थोर ज्योतिषी ,डॉक्टर म्हणून नॉस्ट्रदिमस प्रसिद्ध आहे . त्याने अनेक भविष्य वर्तवली. ती बहुतेक चतुस्पदी मांडली आहेत. त्यावरून काही उत्पाद होऊ नये म्हणून ती गूढ आणि  सांकेतिक भाषेत लिहिली गेली आहेत.नॉस्ट्रदिमसने भारताबद्दलही सुमारे चारशे वर्षांपूर्वी काही भविष्य मांडली होती .त्यात पाकिस्तानची निर्मिती ,1857 चा उठाव ,इंदिरा गांधींचा काळ त्यांची हत्या ,राजीव गांधी यांची हत्या .भारत चीन युद्ध यांचा समावेश आहे . तसेच पाहिले महायुद्ध ,हिटलरचा उदय ,मुसोलिनीची हत्या  ,हिरोशिमा ,नागासाकीवर अमेरिकेने टाकलेले अणुबाँब या विषयी ही भविष्य वर्तविले होते.  लेखकांनी यातील काही भविष्य इथे चतुष्पदी मध्ये मांडले आहेत आणि त्याचा अर्थ ही सांगितला आहे .  जगातील प्रमुख घटनांवर त्यांनी भर दिला आहे .

Tuesday, May 22, 2018

क्षणभर आनंद

सोसायटीच्या गेटवर ती वृद्धा हातात काठी घेऊन उभी होती. गेटवरून उतार असलेल्या रस्त्यावर चालण्यात तिला अडचण येत होती .नेहमीप्रमाणे त्याला उशीरच झालेला.तो घाईघाइने गेटजवळ आला. तिने कसेनुसे हसत त्याला थांबविले . काही क्षण त्याच्या मनात एक चीड उमटली.दुसऱ्याच क्षणी तो थांबला तिचा हात धरून उतारावरून रस्त्यावर आणले . तिने थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला . मन भरून येणे म्हणजे काय ते त्याला त्याक्षणी कळले.
नेहमीसारखी विंडोसीट मिळाली त्याला.ताबडतोब खिश्यातून मोबाईल काढून कॅंडी क्रॅश खेळू लागला . बराच वेळ त्यातच गुंग होऊन गेला तो. अचानक त्याच्या लक्षात आले शेजारून कोणतरी मोबाईलमध्ये डोकावून बघताय . सहा वर्षाचा तो छोटू कुतूहलाने त्याचा गेम पाहत होता . डोळ्यात प्रचंड उत्सुकता आणि आनंद दिसत होता .क्षणात त्यांची नजरानजर झाली.त्याने सहज मोबाईल त्याच्या हाती दिला . डोळ्यात अविश्वास आणून छोटुने त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि त्याच्या गेम पुढे चालू केला . त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो हसला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला . आज पहिल्यांदाच बाहेरचा निसर्ग त्याला प्रिय वाटू लागला .
तो रात्री उशिरा घरी आला होता. सकाळीही लवकर उठून जायचे होते. सकाळी झोपेतच त्याच्या पाठीवर ओझे पडले आणि मागून बोबड्या आवाजात "चल मेरे घोडे टिक...टिक .. नाराजीनेच त्याने डोळे उधाडून पाहिले सकाळी सहा वाजले होते . आईच्या कुशीत झोपलेले त्याचे पिलू जागे होऊन त्याच्या पाठीवर चालून घोडा घोडा करीत होते . तोही तसाच उठला घोड्यासारखा खिकाळला आणि त्याला तसेच पाठिवर घेऊन खोलीभर चक्कर मारली . पिलूचा तो हसरा चेहरा पाहून आपण काय कमावलाय याची जाणीव झाली.
तो आज लवकरच घरी आला. नेहमीप्रमाणे दर महिन्यात एकदा होणाऱ्या मीटिंगला जायचे होते त्याला.पैसे कमविण्यासाठी हे सर्व करावे लागतेच . गल्लीतच काही मुले क्रिकेट खेळत होती . त्यांनी मारलेला चेंडू अचानक त्याच्या तोंडावर आला . इतक्या वर्षाच्या सरावाने त्याची आपोआप हालचाल झाली आणि चेंडू एक हातात सहज पकडून त्याने तितक्याच वेगात परत फेकलाही .त्याचा चपळपणा पाहून मुले चकित झाली . काही न बोलता एकाने त्याच्या हातात बॅट दिली . नजरेतील इशारा ओळखून त्याने बॅटिंग करायला सुरुवात केली . हा हा म्हणता दोन तास कसे निघून गेले कळले नाही . मुलांच्या आनंदात त्याचा आनंद मिसळून गेला. खेळ संपल्यावर मुलांच्या दिशेने हात हलवीत घरी निघाला . आज मीटिंग बुडाल्याचे त्याला काहीच वाटले नाही.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Monday, May 21, 2018

इन्फर्नो..... डॅन ब्राऊन

इन्फर्नो..... डॅन ब्राऊन
अनुवाद .... अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
डोक्याला गोळी चाटून गेल्याने चिन्हशास्त्रज्ञ प्रोफेसर रॉबर्ट लँडन हॉस्पिटलमध्ये आहे . काल रात्री काय झाले ते त्याला आठवत नाही . एक चंदेरी केसांची बाई त्याला शोधा म्हणजे सापडेल हे सांगतेय आणि फक्त तेच त्याला आठवतेय .आपण कुठे आहोत ...? इथे कसे..? हे काही आठवत नाही.त्याच्यावर अजून  हल्ले होणार हे नक्की .त्याला मदत करतेय एक तरुण स्त्रीडॉक्टर सिएना ब्रूक्स आणि सुरू झाला एक भयानक पाठलाग.... .
डान्टे या महाकवीच्या प्रसिद्ध इन्फर्नो  महाकाव्याचा आधार घेऊन एका  विकृत माणसाने जगाची लोकसंख्या  कमी करण्यासाठी महाभयंकर योजना आखली आहे .आता त्याच महाकाव्याचा आधार घेऊन रॉबर्टला त्याची योजना शोधायची आहे . त्यासाठी इटालीतील प्राचीन शिल्पे ,चिन्हे ,चित्रे यांचा आधार घ्यायचा आहे .आणि ते उलगडले तरच जग विनाशपासून वाचणार होते .डॅन ब्राऊनच्या इतर कादंबऱ्याप्रमाणे ही पण चोवीस तासात घडणारी थरारक वेगवान कथा आहे .अगदी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी .

Saturday, May 19, 2018

पहिला पाऊस ( सत्य परिस्थिती )

पहिला पाऊस ( सत्य परिस्थिती )
पहिला पाऊस
नेहमीप्रमाणे संध्याकाळी उशिराच बंड्या ऑफिसमधून बाहेर पडला.ट्रॅफिकमधून बाईक चालवायचा  त्याला खूप कंटाळा यायचा.अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाच तो बाईक घेऊन रस्त्यावर आला.अर्ध्या वाटेत असतानाच आभाळ भरून आले." बापरे ....!! आता पाऊस कोसळणार "असे म्हणत त्याने वेग वाढविला.काही क्षणात त्याच्या अंगावर पावसाच्या धारा कोसळू लागल्या."आईचा घो ....!त्याने खच्चून पावसाला शिवी घातली . घराजवळच्या एक वळणावर त्याने बाईक वळवली आणि पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने ओल्या झालेल्या रस्त्यावरून त्याची बाईक घसरली. त्या बाईकबरोबर घसरतच तो पाच फूट पुढे गेला .गुढग्याच्या कळा सोसत पावसाला शिव्या घालत  त्याने बाईक उभी केली.
पहिला पाऊस
अचानक सुरू झालेल्या पावसाने अमित चौगुले केबिनमधून धावतच बाहेर पडला.आपल्या नशीबातच ही धावपळ का ...??  असे मनात बोलत आणि पावसाला शिव्या देत तो प्लांटमध्ये फिरू लागला . दुसरी पाळी असल्यामुळे मनुष्यबळही फार नव्हते त्याच्याकडे .अचानक एक मोठा धमाका त्याच्या कानावर पडला नंतर काही अंतरावर ठिणग्या उडालेल्या दिसल्या . क्षणात एका भागाची लाईट बंद झाली. कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता अमित चौगुले पावसाला शिव्या देत जनरेटरकडे धावू लागला.
पहिला पाऊस
अचानक पडलेल्या पहिल्या पावसाला शिव्या देत विक्रमने आपली गाडी ताजसमोरच्या रस्त्यावर पार्क केली . पावसामुळे ताजचे पार्किंग फुल होते गाड्या रस्त्यापर्यंत आल्या होत्या.आज त्याची महत्वाची मीटिंग होती. परदेशी पाहुण्यांसमोर त्याला प्रेझेन्टेशन करायचे होते.आता पावसात भिजत जाण्याशिवाय पर्याय नव्हता .नाईलाजाने त्याने धावायला सुरवात केली . पण समोरून येणाऱ्या बाईकला चुकविता आले नाही त्याला.स्वतःला सांभाळत तो उभा राहिला आणि सर्व पाणी अंगावर उडाले . पावसाला आणि बाईक वाल्याला शिव्या देत तो ताजमध्ये शिरला . घाईघाईने तो मीटिंग हॉलमध्ये शिरला समोर बसलेल्या पाहुण्यांची माफी मागत त्याने बॅगेतून कागदपत्रे काढली आणि भिजलेल्या कागदपत्रांकडे हताशपणे पाहत बसला .
पहिला पाऊस
रेल्वे स्टेशनमधून मोठ्या कष्टाने हातातले समान सावरत शंकरने टॅक्सी बोलावली. गावावरून आणलेल्या तांदळाच्या आणि ज्वारीच्या दोन गोणी कॅरियरवर टाकल्या. बायकोवर खेकसत सर्वाना टॅक्सीत बसविले . आणि खुशीत घरी निघाला . पंधरा दिवस आपल्या कोकणातल्या घरी जाऊन आला होता. उद्यापासून पुन्हा कामावर जाणार होता तो . सिग्नलवरून टॅक्सी सुटली आणि अचानक आभाळ भरून आले काही कळायच्या आत पाऊस सुरू झाला . वर ठेवलेल्या धान्याच्या गोणीची आठवण झाली त्याला आणि संतापाने पावसाला शिव्या देऊ लागला .
पहिला पाऊस
ती संध्याकाळी ऑफिसमधून सुटली आणि धावतच स्टेशनमध्ये शिरली .पावसाची लक्षणे दिसत होतीच अडकले तर सोनूली घाबरुन जाईल या विचाराने ती बैचेन झाली होती . लोकलमध्ये शिरताच पाऊस सुरू झाला आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला . पण पाऊस पडल्यामुळे दर स्टेशनवर गर्दी वाढतच होती.तिचे स्टेशन आले . गर्दीच्या प्रचंड लोंढ्यात ती बाहेर पडली आणि अचानक त्या पाण्यात तिचा पाय घसरला . स्टेशनवरच ती आडवी झाली . काही बायका तिच्या अंगावर पाय देऊन बाहेर पडल्या. पावसाला शिव्या देत ती लंगडत स्टेशनबाहेर पडली.
पहिला पाऊस
स्वनिर्मित असलेल्या आपल्या नवीन चित्रपटासाठी सुपरस्टार खान फारच उत्साहात होता . लाखो रुपयांचा सेट त्याने उभारला होता. रेहानाने दिलेले नवीन जॅकेट घालून तो शूटिंगसाठी तयार झाला होता. इतक्यात अचानक आभाळ भरून आले . आणि पाऊस सुरू झाला . स्वतःचा सेट वाचवायला तो पुढे झाला त्या धावपळीत त्याचे प्रिय जॅकेट फाटले . पावसाळा शिव्या देत तो आपल्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये शिरला .
पहिला पाऊस
हातातील ओल्या भेळेची पुडी सावरत तो घाईघाईने घराकडे निघाला . गेले काही दिवस तिला भेळ खायची इच्छा होत होती . पण काहींना काही निमित्त होऊन तो बेत पुढे ढकलला जात होता. आपण साधी एक भेळ बायकोला देऊ शकत नाही या विचाराने तो चिडलेला होता पण आज संधी मिळाली आणि एक भेळ विकत घेतली होती . अचानक आभाळ भरून आले. पावसापासून वाचण्यासाठी त्याने भराभर पावले उचलली पण  पावसाने त्याला गाठलेच . अंगावर पाऊस घेत तो धावू लागला . शेवटी कसाबसा सोसायटीच्या आवारात शिरला . जिन्याजवळ येताच त्याने भेळेची पुडी पहिली आणि संतापून पावसाला शिव्या घातल्या . त्याच्या हातातील भेळेच्या पुडीचा पावसाच्या पाण्याने लगदा झाला होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, May 16, 2018

द सेव्हन्थ सिक्रेट .....आयर्विग वॅलेस

द सेव्हन्थ सिक्रेट .....आयर्विग वॅलेस
अनुवाद..... विजय देवधर
मेहता पब्लिकेशन
डॉ. हॅरिसन ऍशक्राफ्ट प्रसिद्ध इतिहास संशोधक . ते आणि त्यांची मुलगी एमिली हिटलरवर पुस्तक लिहिणार आहे . त्यातील शेवटचा भाग पूर्ण होण्याआधीच त्यांना हिटलरविषयी नवीन माहिती मिळते त्यात हिटलर आणि इव्हा ने आत्महत्या केली नसून ते जिवंत होते.
रेक्स फोस्टर हा आर्किटेक्चर. हिटलरने बांधलेल्या सात बंकर चा शोध घेतोय. सातव्या बंकरचे नकाशे त्याला मिळत नाहीत.
एका म्युझियमला एका गृहस्थाने पेंटिंग भेट दिले . ते हिटलरने काढलेले पेंटिंग आहे असा त्याचा दावा आहे . पण त्या पेंटिंगमधील इमारत आताच्या काळातील आहे .
बहात्तर वर्षाची एक गूढ वृद्धा दर शुक्रवारी आपल्या रहस्यमय जागेतून बाहेर पडून भाचीला भेटायला जाते. कोण आहे ती?????
खरेच त्यादिवशी हिटलरने आत्महत्या केली होती?? त्याचा सातवा बंकर कुठे आहे ??? ती वृद्धा कोण आहे ??? सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी खिळवून टाकणारी आणि अचंबित करणारी रहस्यमय कादंबरी

Tuesday, May 15, 2018

असाही मदर्स डे

सकाळीच ती व्हाट्सअप बघत बसली होती. मुलाने आज मदर डेचे विश केले होते . मग ईकडतीकडच्या गप्पा चॅटिंग सुरू झाले आणि ती त्यातच हरवून गेली .  "ओ बाईसाहेब ....आहात कुठे ..??? सासूबाईचा छद्मी आवाज कानावर पडताच ती भानावर आली. "वाटलेच मला..सकाळीच तो फोन हातात घेऊन बसली असशील..... आमच्या चहापाण्याचे बघा. काय उपाशीच मारायचा विचार दिसतोय ...??
म्हातारीच्या तोंडाचा पट्टा चालू झाला की ती थांबणार नाही हे माहीत होते तिला.नशीब अंथरूणावरच पडून आहे . हातपाय चालत असते तर मारायलाही कमी केले नसते म्हातारीने. मनात असा विचार करीतच ती उठली आणि सासूबाईंच्या समोर गेली.म्हातारी बेडवर झोपून होती . या वयातही तिचा आवाज खणखणीत होता . आजीसासू झाली तरी सुनेवर अधिकार गाजवण्याची सवय सुटली नव्हती. उठ बस सुनेला टोचून बोलण्यात टोमणे मारण्यात तिला आनंद व्हायचा.
हीचा मुलगा आणि सून परदेशात. तेव्हा घरात ही नवरा आणि सासू अशी तीनच माणसे .त्यातही दिवसभर सासूची बडबड चालू असायची .हातपाय हलवता येत नाही मग तोंडाचा पट्टा चालूच . हिलाही तिची सवय झालेली तेव्हडे घर तिच्या बडबडीने भरलेले वाटायचे .
"आहो ...आज मदर्स डे म्हणून शुभेच्छा दिल्या पोराने" ती समजावणीच्या सुरात म्हणाली .
"हो तर ...बाहेर राहून फक्त शुभेच्छा द्या .इथे कोण मेला तरी येणार नाही बघायला.काय पण शिकवण दिली लेकाला... ?? माझा लेक बघ कसा.. ?? अजून काळजी घेतो तुझी माझी . त्याने विश केले का मला...? पण काळजी घेतो ना आपली.. ?? तिने हताशपणे मान डोलावली.म्हातारी कधी सरळ बोलणार नाही . मुकाटपणे स्वयंपाक घरात शिरली .
संध्याकाळी बेल वाजली .दरवाजा उघडला तर दारात नवरा हातात केकचा बॉक्स घेऊन उभा.
"आईसाठी आणलात का...? तिने हसून विचारले .
"छे ग...! मी कसला आणतोय स्वतःहून .आईने फोन करून आठवण केली. ह्यांनी कपाळावर आठ्या आणत उत्तर दिले.
" म्हणजे म्हातारीला ही मदर्स डे साजरा करायचा तर???  ती हसून बोलली .जा …..जा ...लवकर म्हातारीला केक कापायचा आहे . मदर्स डे साजरा करा".
  तो कपाळावर आठ्या आणून आईच्या खोलीत शिरला . हिला त्यात इंटरेस्ट नव्हता पण सासूने हाक दिली तशी तीही खोलीत शिरली . टेबलवर केक ठेवला होता.तिने डोळे वटारून हिच्याकडे पाहिले "बघतेस काय अशी चल केक काप..." हिच्या लक्षात येईना काय चालू आहे. नवरा ही हैराण ."आई तुझ्यासाठी आणलाय ना...?? मग तूच काप ..?? 
"मूर्खां ....! हे माझे वय आहे काय ?? आज तिचा दिवस आहे.. ?? ती आई आहे. मुलगा नाही घरी म्हणून काय झाले... ? माझी तर मुलीसारखी काळजी घेते ना.. ?  सर्व करते माझे .माझे हट्ट पुरविते.माझी बोलणी खाते .माझे औषधपाणी करते . माझी आईच आहे ती . मग तिचा दिवस साजरा करायला नको का ?? ती आई आहे माझी .हॅपी मदर्स डे ."असे म्हणून टाळ्या वाजवू लागली .
खरेच आज मदर्स डे तिच्या घरात खऱ्या अर्थाने साजरा झाला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर