Tuesday, May 26, 2020

दुसऱ्या महायुद्धातील धुरंधर व्यक्ती आणि कथा

दुसऱ्या महायुद्धातील धुरंधर व्यक्ती आणि कथा ..डॉ. श्रीकांत मुंदरगी 
अजब डिष्ट्रीब्युटर्स
 दुसरे महायुद्ध म्हणजे इतिहासातील सर्वात मोठी घटना.अजूनही या घटनेवर अनेक पुस्तके लिहिली जातात तर अनेक चित्रपट ही निघाले आहेत.
या महायुद्धाचा जनक हिटलर हा इतिहासात सर्वात मोठा क्रूरकर्मा ठरला . पुस्तकात आठ कथा आहेत . यात पहिल्या कथेत हिटलरची माहिती आणि त्याचे अखेरचे क्षण याचे वर्णन केले आहे.
दुसऱ्या कथेत हिटलरने अमेरिकेत गुप्तहेर घुसवून महत्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याची योजना कशी फसली याची रंजक माहिती आहे .
तर मुसोलिनीची सुटका ही अतिशय रोमहर्षक घटना तिसऱ्या कथेत आहे.
याशिवाय लाखो ज्यूचे प्राण घेणारा क्रूरकर्मा आईशमन .तसेच लाखोंचे प्राण वाचविणारा डॉ.क्रेस्टन यांच्या कथा आहेत.

Monday, May 25, 2020

रॅम्बो..5 लास्ट ब्लड

रॅम्बो..5  लास्ट ब्लड 
रॅम्बो सिरीजमधील कदाचित हा अखेरचा चित्रपट. म्हणूनच लास्ट ब्लड हे नाव दिल असावे.
पहिल्या चार भागापेक्षा पूर्ण वेगळा असा हा चित्रपट . सैन्यात सर्वात घातक आणि एकटा कामगिरी करणारा जॉन रॅम्बो आता थकलाय. त्याच्या हालचाली मंद झाल्यात. पण तरीही त्याची बुद्धी अजूनही शार्प आहे . आतापर्यंत त्याने अनेक कठीण कामगिऱ्या एकट्यानेच पार पाडल्या आहेत.
फर्स्ट ब्लडमध्ये जरी तो शांत दिसत होता तरी त्याच्या डोळ्यात आग होती . पण आता तो आपल्या रॅम्बो इस्टेटमध्ये सुखी समाधानी आयुष्य जगतोय . 
त्याच्या आधीच्या चारही भागात भरपूर ऍक्शन होती . फर्स्ट ब्लड आणि रॅम्बोमध्ये तर दर तीन मिनिटानंतर ऍक्शन हाणामारी होती . पण काळानुसार ती कमी होत गेली.
स्टॅलोनने स्वतःचे वय मान्य केले असावे . त्यामुळे या भागात फार कमी ऍक्शन आहे . आधी काही मिनिटे चित्रपट खूप संथ आहे . काय कथा असेल याचा अंदाज येत नाही . पण नंतर मुख्य कथा सुरू झाल्यानंतर चित्रपट वेग घेतो . 
हा एक सूडपट आहे . मेक्सिको येथील ड्रगआणि मुली सप्लाय करणारा  माफिया जो त्याच्या आयुष्यात वादळ  आणतो  आणि रॅम्बो त्याला अतिशय क्रूरपणे संपवितो.
यावेळी त्याला आपल्या शक्तीची पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच तो  त्याच्या विभागात न जाता आपल्या इस्टेटमध्ये खेचून आणतो आणि ठार मारतो . रॅम्बो गौरीला युद्धात एक्सपर्ट आहे त्यामुळे इस्टेटमधील भुयारात जे काही सापळे तयार करतो ते बघण्यासारखे आहे .
यात  मुख्य खलनायकाची तो अतिशय क्रूरपणे हत्या करतो . ते कदाचित जॉन रॅम्बोच्या स्वभावाविरुद्ध असावे . शेवटी कुटुंबावर किंवा स्वतःच्या प्रेमाच्या व्यक्तींसाठी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो हेच दिग्दर्शकाला दाखवायचे असेल .
एकूण रॅम्बोप्रेमींना हा चित्रपट फारसा आवडणार नाही .
© श्री. किरण बोरकर

Saturday, May 16, 2020

एन्जल्स अँड डेमन्स...डॅन ब्राऊन

एन्जल्स अँड डेमन्स...डॅन ब्राऊन 
अनुवाद....बाळ भागवत 
मेहता पब्लिकेशन
स्वित्झर्लंड येथे सर्न नावाच्या संशोधनकेंद्रात नेहमीच वेगवेगळे संशोधन चालू असते . त्यात त्यांना प्रतिवस्तूचे अर्थात अँटीमॅटरचे काही कण बनविण्यात यश आले आहे .या प्रतिवस्तूच्या एका कणातून संपूर्ण शहराला वीजपुरवठा होईल इतकी ताकद आहे . त्यामध्ये कोणतेही प्रदूषण नाही ,किरणोत्सर्ग नाही . पण जर ते हवेच्या किंवा इतर कश्याच्याही संपर्कात आले तर त्याच्या प्रचंड स्फोट होऊ शकतो .
पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ लिओनार्दो वेत्रा याने प्रतिवस्तूचा शोध लावला आणि तीच प्रतिवस्तू आज सर्नच्या संशोधनकेंद्रातून चोरीला गेली. इतकेच नव्हे तर चोराने लिओनार्दो वेंत्राला क्रूरपणे ठार मारले होते .जाताजाता खुन्याने त्याच्या छातीवर इल्युमिनाटीचा प्रसिद्ध सिम्बॉल उमटवला .
सन १५०० च्या आसपास काहीजण चर्चच्या विरोधात उभे राहिले.त्यात बहुसंख्य शास्त्रज्ञ होते .त्यांनी चर्चच्या खोट्या शिकवणूकी विरुद्ध आवाज उठवला . यात काही खगोलशास्त्रज्ञ होते काही गणितज्ञ होते. चर्चच्या खोट्या विचारसरणीमुळे ज्ञानाचा लोप होईल अशी त्यांना भीती वाटू लागली . मग त्यांनी एक गट स्थापन केला .या गटाने स्वतःला इल्यूमिनाटी म्हणवून घ्यायला सुरुवात केली . गॅलिलिओ न्यूटन सारखे शास्त्रज्ञ यात होते. कॅथलिक चर्च त्यांच्यामागे लागले . त्यांनी गॅलिलिओ ला अटक केली .
सर्नच्या डायरेक्टरने तो सिम्बॉल पहातच सुप्रसिद्ध पुरातन अंकचिन्ह लिपी प्राध्यापक रॉबर्ट लँग्डनला बोलावले . आता त्याला आणि वेत्राची मुलगी व्हिक्टोरिया त्या प्रतिवस्तूचा शोध घ्यायचा आहे .
व्हॅटिकन सिटीत आज एक महत्वाची घटना घडणार आहे . पंधरा दिवसांपूर्वी पोपचा मृत्यू झालाय आणि नवीन पोपची निवड आज होणार आहे . पण पोपच्या शर्यतीत असणारे चार कार्डिनल अचानक नाहीसे झालेत . वेत्राचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांनेच त्यांना पळवून नेलेय. बीबीसीला फोन करून त्याने त्यांची सार्वजनिक ठिकाणी हत्या होणार असे घोषित केले. ही सार्वजनिक ठिकाणे शोधण्याची जबाबदारी रॉबर्ट लँग्डनने घेतली .
गॅलिलिओने  तुरुंगात असताना एक पुस्तक लिहिले होते त्यात पाथ ऑफ इल्युमिनेशन बनवला होता . त्यासाठी त्याने व्हॅटिकनच्या सुप्रसिद्ध शिल्पांचा चतुराईने वापर केला होता . त्यात पृथ्वी ,वायू ,अग्नी ,जल यागोष्टींचा समावेश होता . याशिवाय ती प्रतिवस्तूही व्हॅटिकनमध्येच लपविली होती . आपल्या अभ्यासाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर रॉबर्ट लँग्डन त्यांना शोधून काढले का ...?? प्रतिवस्तूचा स्फोट थांबवून व्हॅटिकनला वाचवू शकेल ....?? एक वेगवान , थरारक ,कादंबरी .

Friday, May 1, 2020

धागे ... गुलजार

धागे....गुलजार 
संपादन....अनंत दीक्षित 
मेहता पब्लिकेशन 
सकाळ वृत्तपत्रासाठी गुलजार यांनी वर्षभर  स्तंभ लेखन केले.अनंत दीक्षित यांनी त्याचे संपादन केले .
हे आठवणींचे धागे आहेत . एक संवेदनशील कलाकार आपल्या जीवनातील  आठवणींचे धागे कसे विणतो .हे वाचण्यासारखे आहे.
कधी सरळ ...तर गुंतागुंतीचे .....आपले मन ..विचार ,इतरांबद्दलच्या भावना गुलजार यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्यात .
 त्या मुलांची आठवण ठेवा मध्ये त्यांनी 26 जानेवारीला गुजरातमध्ये झालेल्या भूकंपाचे भीषण चित्र उभे केले आहे . नैसर्गिक आपत्ती आणि त्यांना होणाऱ्या मदतीवर  त्यांच्या पुनर्वसनावर विचार मांडले आहेत.
 कवितेची रुजवात मध्ये कविता कशी जन्माला येते याची सहज सोप्या पद्धतीत माहिती दिली आहे .
 स्वतःला कसे शोधतो ते आत्मशोधाच्या वाटेवर  सांगितले आहे .
गालिब आणि इतर शायर ,कुसुमाग्रज ,पु. ल. बद्दल त्यांनी दाखविलेला आदर पाहून आपण थक्क होतो . माणूस दुसऱ्यांचा आदर करतो तेव्हाच तो एका उंचीवर जातो हे त्यांनी आपल्या सहवासात आलेल्या व्यक्तींबद्दल लिहून सिद्ध केले आहे .
भ्रष्टाचाराविषयी ते पोटतिडकीने लिहितात . दहशतवादी शेतातून उगवत नाही तर ते आपणच निर्माण करतो .
पावसाची विविध रूपे त्यांच्याकडूनच ऐकवीत .  ते लिहितात पावसाची आगेकूच एखाद्या लष्करासारखी होते . ते इशारा देतात.. त्या काळात पक्षीही आपले घरटे सुरक्षित ठेवतात. शेतकरी शेतीची कामे सुरू करतो. ते पावसाला विविध उपमा देतात .कधी झाड  तर डोंगरावरून वेगळ्या प्रवाहात वाहणारे दोन मित्र . पावसाची रूपे ही विविध आहेत . एक पाऊस चौकशी करायला येतो . परिस्थितीची पाहणी करून जातो .तर एक पाऊस रागावलेला असतो तो कोणाचा मुलाहिजा ठेवत नाही .
खरेच हे गुंतलेले आठवणींचे धागे आपण  वाचून सोडवायला हवे .