Tuesday, April 26, 2022

कौसल्या.... जयवंत दळवी

कौसल्या.... जयवंत दळवी 
नवचैतन्य प्रकाशन 
स्त्री पुरुष संबंध मांडण्यात दळवीचा हातखंडा आहे.मानवी मनाचे कंगोरे ते हळुवारपणे उलगडत जातात.कधीकधी ते किळसवाणे असतात तर कधी भावनिक.त्यांचे पात्रे नेहमीच मनाचा आतील भाग उघड करतात.
दळवींच्या कथेत वासनेला एक विशिष्ट स्थान आहे.लैंगिक जीवनाचे विविध अविष्कार पाहणे,त्याचे निरीक्षण करणे,परीक्षण करणे आणि ते साहित्यातून मांडणे याचे त्यांना वेडच आहे.
कादंबरीत मंजुनाथ हा प्रसिद्ध नट आहे. तर मनू दीक्षित हा त्याचा जिवलग मित्र .मनू नाटककार आहे. मंजुनाथच्या जीवनात अनेक स्त्रिया आल्या. त्यातीलच  एक कौशल्या .ती मंजुनाथपेक्षा बारा वर्षांनी लहान .. प्रेमात पडून ती मंजुनाथच्या घरी आली आणि मंजुनाथची पहिली पत्नी उर्मिला गायब झाली.
दळवींच्या या कथेत त्यांची पात्रे गरजेनुसार प्रवेश करतात. तोपर्यंत आपल्याला त्यांच्याविषयी काहीच माहिती नसते. मंजुनाथच्या आयुष्यात कौसल्यानंतरही दुसरी स्त्री येतेच .मंजुनाथने आपल्या भावाच्या पत्नीलाही सोडले नव्हते.मंजुनाथच्या वडिलांनाही स्त्रियांचे आकर्षण .ते कोणत्यातरी वृद्धाश्रमात राहातायत  पण तिथेही त्यांची लफडी सुरूच आहेत.
या सर्व प्रवासाचा मनू दीक्षित साक्षीदार आहे.तो सूत्रधार बनून आपल्याला सर्व सांगतो. तो मंजुनाथच्या जीवनावर कथा लिहितोय.पुढे काय होते....?? ते कळायला कौसल्या वाचायला हवी.

विक्रम वेधा

विक्रम वेधा
ही कथा आहे चांदोबातील विक्रम वेताळची.
पण इथे विक्रम राजा नसून एक प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे.जो जनतेचे गुन्हेगारांपासून रक्षण करण्यास बांधील आहे.
तर वेताळ आहे एक क्रूर गुन्हेगार ज्याच्या नावावर अनेक खून आणि इतर गुन्हे आहेत.त्याचे नाव आहे वेधा.
जेव्हाजेव्हा विक्रम वेधाला पकडतो तेव्हातेव्हा  वेधा त्याला एक गोष्ट सांगतो आणि त्यावर प्रश्न विचारतो . त्या प्रश्नाचे उत्तर मिळताच वेधा विक्रमच्या तावडीतून निसटतो..पण त्या गोष्टीतूनच एका रहस्याचा उलगडा होत जातो.विक्रम त्यातूनच काही नवीन गोष्टी शिकतो.
वेधाचा भाऊ पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेलाय .तो निरपराध होता असे वेधाचे म्हणणे.तर त्याला मारल्यामुळे वेधा संतापून बाहेर येईल आणि तो सहज शिकार होईल असा पोलिसांचा प्लॅन .
पण काही घटना उलट घडत जातात ज्या विक्रमला गोंधळून टाकतात.विक्रमचा जवळचा मित्र सायमन एका एन्काऊंटरमध्ये मारला जातो.सायमनच्या हत्येमागे वेधाच आहे अशी विक्रमची खात्री आहे तर आपल्या भावाच्या हत्येमागे नक्की कोणाचे कारस्थान आहे याचा शोध वेधाला घ्यायचा आहे .हळूहळू या गोष्टीतूनच एक असे रहस्य उलगडते त्याने विक्रम हादरून जातो.
आर माधवन विक्रमच्या भूमिकेत जीव ओतलाय. त्याची मध्येमध्ये पांढरे केस डोकावणारी  खुरटी दाढी वेशभूषा  देहबोली तो एक परिपक्व अनुभवी पोलीस अधिकारी असल्याचे दर्शविते .तर वेधाच्या भूमिकेत विजय सेतुपती अगदी सहज वावरतो.त्याचे आत्मविश्वासाने गोष्ट सांगणे ,सहजपणा आपल्याला त्याच्या बाजूने झुकवितो. या दोघांमधील रंगतदार सामना पाहण्यासाठी विक्रम वेधा पाहायलाच हवा 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, April 1, 2022

अभ्यासक्रम

अभ्यासक्रम 
आप्पा कदमच्या प्रेताला हरीसोबत दोन तरुण पाहून आम्ही चकित झालो.मी आणि विक्रमने एकमेकांकडे सहेतुक  नजरेनेच पाहिले. अर्थात दोघांचे त्यामागचे हेतू वेगळेच होते. 
अंत्यसंकार झाल्यावर हरीबरोबर अजून दोघांचा पाहुणचार  शेट्टीच्या नटरंगमध्ये करावा लागणार म्हणून विक्रम टेन्शनमध्ये होता. तर हरी या कार्यात बिचाऱ्या कोवळ्या मुलांना सोबत घेऊन नक्की काय साधणार आहे ..?? याची काळजी मला होती.
हरी जणू त्यांचा शिक्षक असल्याप्रमाणेच वागत होता.प्रत्येक गोष्ट त्यांना समजावून सांगत होता. तिरडी कशी बांधायची. दोन काठ्यांमध्ये अंतर किती असावे. डोक्याकडील बाजू कोणती ..पायाकडील बाजू कोणती असावी.तिरडीला माडाच्या झावळ चांगल्या की चटई चांगली ...?? तांदूळ कुठे कसा शिजवायचा... हे अगदी व्यवस्थित आणि प्रेमाने सांगत होता.हेच तांदूळ त्या छोट्या मडक्यात शिजवताना त्याने बंड्याला किती शिव्या घातल्या होत्या हे आम्हाला चांगलेच माहीत होते. हरीला मदत करणे म्हणजे आपल्या सात पिढ्या खाली आणणे हे सर्वांना माहीत होते. तोच हरी त्या दोघांना न चिडता समजावून सांगताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटले.
"कोण आहेत रे ही पोर..."??  मी विक्रमला विचारले. "माझी नाहीत हे नक्की ....?? विक्रमने शांतपणे उत्तर दिले. " सर्व आटपल्यावर त्यांना घेऊन नटराजला आलो तर खर्च किती होईल याचाच विचार मी करतोय. आणि ते आले तर पुढच्यावेळी दुःख आपापल्या घरीच हलके करावे लागणार हे नक्की..."
"शेवटी प्रत्येकाला काळजी वेगळीच ...." मी मनात म्हणालो आणि आप्पाना उचलून बाहेर आणायच्या तयारीला लागलो.
आप्पांची बॉडी उचलणार इतक्यात हरी आत शिरला. मला बाजूला सारून त्याने सोबतच्या दोन्ही मुलांना बॉडी कशी उचलायची याचे प्रात्यक्षिक दाखविले आणि त्यांनाच बॉडी उचलायला सांगितले.हे मात्र आता फारच होतेय असे मला वाटले.पण हरीने एक नजर माझ्याकडे टाकताच मी खाली मान घालून बाहेर पडलो.आणि मुकाटपणे विक्रमच्या बाजूला जाऊन उभा राहिलो.
"झाली का तयारी ...."?? तो चिरपरिचित आवाज कानीं पडताच मी दचकलो.
आयला हा केके काही सुधारणार नाही .मनातल्या मनात केके उर्फ  कमलाकर कदमला शिव्या हासडत मी वळलो . सवयीप्रमाणे केके अचानक माझ्या मागे उभा राहून विचारत होता.
"हरीला विचार ..." विक्रम मान न वळवता म्हणाला .
"कशाला ...??आपली दोन पोर आहेत त्यांनाच विचारतो .म्हणजे त्यांची परीक्षाही घेता येईल..
"आयचा घो ....म्हणजे ही पोर तुझ्या क्लासची आहेत.…"?? विक्रम ओरडून म्हणाला .
" मग ....अगदी सहज स्वरात केके म्हणाला.नवीन अभ्यासक्रम सुरू केलाय क्लासमध्ये. अंत्यसंस्कार आणि त्यानंतरच्या विधींचा ...
केकेच्या कमलाकर अकादमीत बरेचसे कोर्सेस सुरू असतात हे आम्हाला माहीत होते. जी मुले हुशार नाहीत.जेमतेम काठावर पास झाली आहेत ,त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी केके बरेच असे विचित्र अभ्यासक्रम चालवतो .पण अंत्यविधी अंत्यसंस्कार याचेही तो अभ्यासक्रम चालू करेल हे मात्र फारच होते.
"अरे भाऊ... मागच्या महिन्यात त्या निळकंठ अपार्टमेंटमध्ये विसाव्या मजल्यावरचे कारखानीस गेले.बिल्डिंगमध्ये कोणालाच माहीत नाही तयारी कशी करायची.त्यांच्या मुलाने मला फोन केला. मी हरीकडे  गेलो.तो बिचारा कामावर जाताजाता थांबला आणि माझ्यासोबत आला . सर्व विधी शेवटपर्यंत पार पाडूनच तो स्मशानातून बाहेर पडला. निघतानिघता कारखानीसाने नोटांचे बंडल माझ्या हातात दिले.मी हरीला देत होतो पण तुम्हाला माहितीय तो ह्या कार्याचे कधीच पैसे घेत नाही .मग ते माझ्याकडे ठेवले गरज लागेल तेव्हा देऊ त्याला ...."केके माझ्यापाठीवर  थाप मारून म्हणाला .
"मग त्यातूनच  तुझ्या सुपीक डोक्यातून ही आयडिया निघाली का...."?? खोचकपणे विक्रम ने विचारले.
" होय...खरंय...... केके शांतपणे म्हणाला ." विकी.. अरे आज अशी तयारी करणारी कितीजण आहेत.आपल्याला तरी जमते का तिरडी बांधायला .बिल्डिंगमध्ये कोण गेला की अंत्यविधीची तयारी करणारा माणूस शोधावा लागतो .मग अशी माणसे आपण का तयार करू नये तीही अगदी पद्धतशीरपणे करणारी..असा विचार करूनच हा अभ्यासक्रम तयार केला..."
" म्हणजे नक्की काय आहे या कोर्स मध्ये .."??.मी विचारले .
" या कोर्सला शिक्षणाची अट नाही .वयाची अट नाही .चार दिवस क्लासमध्ये थियरी शिकवली जाईल आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास येईपर्यंत प्रॅक्टिकल दिले जाईल.प्रत्येक जातीधर्माच्या अंत्यविधीचे शिक्षण दिले जाईल .अगदी सामान आणण्यापासून ..स्मशानात नोंद ते तेराव्याचे विधी अश्या सर्व गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश आहे.प्रत्येक जाती धर्माच्या अंत्यसंस्काराची एस ओ पी बनवली आहे मी...."अगदी सहज स्वरात केके सांगत होता.मी मनोमन हात जोडले त्याला.
"सध्या कितीजण या कोर्समध्ये सहभागी आहेत..आणि त्यांना रोज शिकायला मिळते का ...?? विक्रमच्या चांभार चौकश्या चालू.
" सध्या आठ जण आहेत .हे दोन आपल्याकडचे म्हणजे कोकणातले .बाकी सर्व वेगळ्या जाती धर्माचे...आणि सर्वाना भरपूर काम आहे. मी रोज सगळ्या धर्माच्या स्मशानात आणि हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट ठेवून आहे . कोण गेले की मला त्याचे नाव आणि पत्ता कळतो. ऍम्ब्युलन्सला आपलीच पोर आहेत. मग मी त्या ठिकाणी याना पाठवतो.ती जाऊन मदत करतात . एकदा का तयार झालीत की एक पॅकेज ठरवू त्यात सर्व काही समावेश करू.विक्रम भारतात तरी अंत्ययात्रेला कोणाची अडवणूक होत नाही....."केकेने हसत हसत स्पष्टीकरण दिले.
"फार चांगले काम करतोय तू केके. हल्ली अंत्ययात्रेच्या तयारीला माणसे सापडत नाहीत. तुम्ही पैसे घेऊन का होईना ही तयारी करून देता. पण नंतर दुःख हलके करायलाही ते आमच्या सोबत असतात की स्वतःची सोय करून घेतात.....".  अंगठा दाखवत विक्रमने मनात बराच वेळ रेंगाळलेला प्रश्न विचारला. 
"अरे विकी ... ती टीप आहे . कार्य मनासारखे झाले की स्वखुशीने काही द्यायचे. नाही  दिले तरी  हक्काचा मोबदला आहेच ना ....केके मला टाळी देत हसत म्हणाला .
© श्री .किरण कृष्णा बोरकर