Monday, December 31, 2018

मध्यस्थ ....... लीना सोहनी

द निगोशिएटर..... फेडरीक फॉरसिथ
मध्यस्थ ....... लीना सोहनी
मेहता पब्लिकेशन
रशियातील केजीबी चिंतेत आहे कारण आता त्यांच्याकडे जो तेलसाठा आहे तो फक्त सात ते आठ वर्षे पुरणार आहे .त्यानंतर रशियाचे दिवाळे वाजणार आहे . भरपूर तेलसाठा असणाऱ्या राष्ट्रावर आक्रमण करायची त्यांची योजना आहे . पण सध्याचा अमेरिकेचा अध्यक्ष जॉन कॉरमॅक असताना ते शक्य नाही .
अमेरिकेतील तेल व्यवसायिक सायरस मिलर चिंतेत आहे कारण जगभरातील तेलसाठे या वीस वर्षांत संपुष्टात येणार आहे आणि अरबी राष्ट्रांवर त्यांना अवलंबून राहावे लागेल .त्याला आता असे राष्ट्र पाहिजे की ते त्याच्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचेल पण त्यासाठी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बदलायला हवा.
पीटर कॅब अमेरिकेतील मोठा शस्त्रास्त्र निर्माता.त्याने नवीन शस्त्राचा शोध लावलाय त्यासाठी लाखो डॉलर्स मोजलेत. पन्नास हजार माणसे कामाला लावली आहेत.पण अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार झाला तर तो रस्त्यावर येणार आहे .कसेही करून हा करार होऊ नये यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी राष्ट्राध्यक्ष बदलायचीही त्याची तयारी आहे .
अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार शेवटच्या टप्प्यात आहे . दोन्ही देशाचे अध्यक्ष सोडल्यास कोणालाही हा करार व्हावा असे वाटत नाही . देशातील संरक्षण खर्चात कपात करणे दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनाना आणि लष्करप्रमुखांना मान्य नाही.
त्याचवेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या  मुलाचे ऑक्सफर्डमधून  अपहरण होते . त्याच्या सुटकेसाठी जगातील सर्वोत्तम मध्यस्थ निवडला जातो . क्वीन ही एकमेव व्यक्ती आहे जी सुटकेसाठी योग्य वाटाघाटी करू शकेल . क्वीन त्याच्या सुटकेत यशस्वी होतो पण सर्वांच्या समोर त्याची हत्याही होते . वाटाघाटी यशस्वी झाल्या तरीही हत्या का ???? कोण आहेत या हत्येच्या मागे . क्वीन हे रहस्य शोधून काढायचे ठरवितो . एक श्वास रोखून ठेवणारा पाठलाग,भयानक कटाचा हळू हळू होणारा उलगडा पाहून वाचक कमालीचे उत्तेजित होतो तर कधी आश्चर्यचकित .लेखकाने विलक्षण बुद्धिमत्तेनी लिहिलेली ही कहाणी वाचून तुम्ही स्तंभित होणार आहात .

Saturday, December 29, 2018

१४ , गारिबाल्डी स्ट्रीट .... माधव भंडारी

१४ , गारिबाल्डी स्ट्रीट .... माधव भंडारी
विराट प्रकाशन पुणे
अँडॉल्फ आईशमन हा हिटलरच्या ज्यू समस्येवरील अंतिम उपाय (final solution of Jewish problem )या यंत्रणेचा प्रमुख. मी साठ लाख ज्यूना मारले आहे असे हिटलरला अभिमानाने सांगणारा क्रूरकर्मा . युद्ध संपताच त्याने जर्मनीबाहेर यशस्वी पलायन केले आणि सुमारे बारा वर्षे अज्ञातवासात राहिला . तो अर्जेंटिनात आहे याची कुणकुण मोसादला लागली . मोसादच्या शत्रूयादीत त्याचे नाव वर होते . मग चालू झाला त्याचा शोध.आपल्याला हवा असलेला माणूस हाच आहे याची खात्री करण्यात तब्बल तीन वर्षे गेली.अर्जेंटिनाची ज्यूना सहानुभूती नव्हती उलट त्यांनी नाझी गुन्हेगारांना मदत केली होती. ते सहजपणे त्याला इस्त्रायलच्या ताब्यात देतील हे शक्य नव्हते . इस्त्रायल ते अर्जेंटिना यात तब्बल साडे नऊ हजार मैलाचे अंतर होते आणि त्यामध्ये इस्रायलच्या शत्रू देशांच्या सीमाच अधिक होत्या .पण मोसाद प्रमुख इसर हारेल यांनी त्याला इस्त्रायलला आणायचे ठरवलेच .आणि त्यात ते यशस्वी ही झाले.
1960 साली त्याच्यावर इस्त्रयालमध्ये जाहीर खटला चालविला गेला . त्यावेळी या खटल्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केले गेले .पण आईशमनला कसे शोधले . त्याला कसे इस्त्रायलला गुप्तपणे आणले गेले . यात कितीजण गुंतले होते .याबाबत फारच कमीजणांना माहिती होती.
1974 साली THE HOUSE ON GARIBALDI STREET  या पुस्तकात सर्वप्रथम इसर हसेल यांनी या कारवाईचा वृत्तांत दिला . आणि त्या पुस्तकाचेच स्वैर भाषांतर माधव भंडारी  यांनी केले आहे . इतिहासातील सर्वात थरारक आणि अकल्पनिय घटना म्हणून या अपहरणाची  नोंद केली गेली आहे.

Friday, December 21, 2018

द तालिबान क्रिकेट क्लब... तिमिरी एन. मुरारी

द तालिबान क्रिकेट क्लब... तिमिरी एन. मुरारी
अनुवाद...... अमृता सुर्वे
मेहता पब्लिकेशन
रुखसना एक तरुण पत्रकार मुलगी. नजीबुल्ला सरकारच्या काळात ती काबुल न्यूजमध्ये पत्रकारिता करत होती.पण अचानक तालिबान सरकार आले आणि सगळी परिस्थिती पालटली. अध्यक्ष नजीबुल्ला आणि त्याच्या साथीदारांना भर रस्त्यात फाशी दिले गेले .मनात येईल तेव्हा तालिबानी  धर्मविरोधी चुका शोधून डोक्यात गोळ्या घालू लागले .मग रुखसना टोपणनावाने हिंदुस्थान टाईम्ससाठी लिहू लागली .  तिच्या घरी आजारी आई आणि लहान भाऊ आहे . तरीही ती धोका पत्करून काबुलमधील तालिबान विरोधी बातम्या जगभरात पोचवू लागली . सरकारचा तिच्यावर संशय आहे . पण अजूनही तिच्यावरचा संशय सिद्ध झाला नाही . अचानक तिला एक दिवस मंत्रालयात बोलावणे येते .तालिबान अफगाणिस्तान आणि स्वतःची प्रतिमा जगभरात उंच करण्यासाठी क्रिकेटचे सामने भरविण्याचे ठरविते. जी टीम जिंकेल तिला पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल असे घोषित करते. क्रिकेट हा खेळ अफगाणिस्थानात कोणालाच माहीत नसतो. तर रुखसना दिल्लीत शिकत असताना विद्यापीठाकडून काही सामने खेळलेली असते .तालिबान खऱ्या नियमानुसार आणि खिळाडूंवृत्तीने हा खेळ खेळणार नाही याची खात्री सर्वानाच आहे . टीम तयार करायची मुभा सर्वानाच आहे आणि त्यामार्गे पाकिस्तानात जाण्याची संधी ही .पण रुखसना स्त्री आहे आणि तिथे स्त्रियांना एकट्याने फिरायची ही बंदी आहे . तरीही कुठेतरी आशेचा एक किरण आहे . ती संधी रुखसनाला गमवायची नाही . आता काय करेल ती ......????? लेखकाने तालिबान राजवटीचे अंगावर शहारे आणणारे वर्णन केले आहे . किड्या मुंग्यांना मारावे तसे माणसांना मारणारे तालिबानी. स्त्रियांची घुसमट ,गरिबी,अध्यक्षांना भर चौकात दिलेली फाशी यांचे वर्णन भयानक आहे .

Tuesday, December 18, 2018

ती

ती
रविवारची सकाळ म्हणून ती नेहमीप्रमाणे उशीराच उठली .उठल्याउठल्या तिला जाणवले आज नेहमीसारखे वातावरण नाही.घरात एक प्रकारची तणावपूर्ण शांतता जाणवत होती. तिने लक्ष न देता नेहमीची तयारी करायला सुरुवात केली.
"आज दुपारी कुठे जाऊ नकोस थोडे बोलायचे आहे तुझ्याशी ..."आईने रुक्षपणे सांगितले."हु ....करत ती बाथरूममध्ये शिरली.तरीही काय घडले असेल याचा विचार मनातून जाईना. त्याच तंद्रीत तिने आवरले आणि समोर आलेला नाश्ता करून पुस्तक घेऊन गॅलरीत बसली.
थोड्यावेळाने आईची हाक ऐकू आली . हॉलमध्ये येताच समोर लहान बहीण आणि तिचे मिस्टर बसलेले दिसले .त्याची नजर शरीरावरुन फिरलेली तिला जाणवली.काही न बोलता समोर येऊन बसली .जणू  ती आरोपी आणि समोर चार न्यायाधीश बसले होते. आई ...कधीहि काही न बोलणारे बाबा ..लायकी नसताना लुडबुड करणारी बहीण आणि वासनेनी भरलेली नजर असणारा तिचा नवरा.
"हे काय आहे ...."?? हातातील कंडोमचे पाकीट उंचावत आईने खड्या आवाजात विचारले.
"च्यायला ....ही भानगड होय ....!!मनातल्या मनात ती चरफडली.नेहमी तर आपण उरलेले कंडोम फेकून देतो यावेळी कसे विसरलो...???तिला कालची संध्याकाळ आठवली . दरवेळेप्रमाणे  कालही तो भेटला होता .तिच्या मैत्रिणीच्या रूमवर ते महिन्यातून दोनदा भेटत होते .काल त्यांच्याबरोबरचा कार्यक्रम आटपून ती रात्री घरी आली आणि तशीच झोपून गेली . पर्समधून ती वस्तू काढायचे तिच्या ध्यानात आले नाही .आता तिच्या सर्व लक्षात आले . कधीना कधी हा प्रसंग येणार याची तिला कल्पना होती आणि त्यासाठी तिने मनाची तयारी ही केली होती . तरीही अचानक हल्ल्याने ती गोंधळली.
"कोण आहे तो ....?? किती दिवस चालू आहेत तुझे हे धंदे..."?? आईचा आवाज चढला.बहीण ही कुत्सित नजरेने पाहू लागली .तर तिच्या नवऱ्याच्या नजरेत लबाडी आली. बाप नेहमीप्रमाने शांत निष्क्रिय.
"मित्र आहे .....गेली 4 वर्षे माझ्याबरोबर आहे.." ती शांतपणे म्हणाली.
"लग्न करणार आहेस का.... ??? आईचा प्रश्न.
"नाही ....."तिचे उत्तर . पण त्याचबरोबर आईचा सुटकेचा निःश्वास ऐकू आला.बहिणीची चमकलेली नजर दिसली तर तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर लबाडीचे हसू.
"त्याचे लग्न झालेय ..दोन मुले आहेत त्याला .. "तिने पुढे सांगितले .
"काय ...."?? आई ओरडली.
" शी ...!!ताई.. तुला काहीच कसे वाटत नाही ...."बहिणीचा रागाने प्रश्न.
"शोभते का तुला या वयात असे वागणे ...??लोक काय म्हणतील...??आपल्या घराण्याच्या इज्जतीचे काही वाटत कसे नाही तुला..??नशीब बहिणीचे लग्न झालेय."आईचा पारा चढला.
"काय चुकीचे वागते मी..??? माझे वय किती हे सांगू शकाल का तुम्ही ....?? माझे लग्न करायला हवे याची आठवण तरी आहे का तुम्हाला ..."?? तिचा आवाज चढला.
"नाही जमत तुझे लग्न आणि तुला आपली परिस्थिती माहीतच आहे .हे असून नसल्यासारखे ...एक काम धड केले नाही . तरीही मी कसे तरी तुम्हा दोघीना शिकवले .तू हुशार म्हणून चांगली शिकलीस मग नोकरी ही चांगली ताबडतोब लागली बहिणीचे शिक्षण झाले की तुझे लग्न करू असा विचार केला पण ही त्यांच्या प्रेमात पडली शिक्षण अर्धवट सोडून तिचे लग्न करावे  लागले. त्यात अजून उशीर झाला . मग वय वाढत गेले तसे लग्न जमेना.हीच परिस्थिती होती त्यात आमची काय चूक ....?? म्हणून तू हे धंदे करावे का ....?? आईचा तोल सुटला.
"धंदे ....?? स्पष्ट बोलते आई ..शरीराची भूक मिटवणे म्हणजे धंदे का ...?? मला शरीर आहे ,मन आहे भावना आहेत .. किती दिवस मी मन मारीत जगू . आजही तू बाबांच्या जवळ जाते हे दिसत नाही का मला . माझी बहिण काळवेळ न पाहता दरवाजाची कडी लावून आपल्या नवऱ्याबरोबर काय करत असते ते कळत नाही का मला .आणि तरीही तिचा नवरा माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत अंगचटीला येण्याची संधी शोधतो हेही कळत नाही का मला ..."उभी राहून बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपल्या बहिणीला हातानेच रोखत ती म्हणाली "कसली परिस्थिती .....??बाप कमवत नाही तर त्याला पाठीशी घालून तू माझ्या पगारावर घर चालवतेस . बहिणीचे शिक्षण अर्धवट का राहिले .... ?? तर तिला चवथा महिना चालू झाला म्हणून ना ..?? काय करतो तिचा नवरा ....??पंधरा दिवस तर इथेच पडलेले असतात .अग आता चाळीशी पूर्ण झाली माझी.मलाही वाटते लग्न व्हावे ,मूल व्हावी ,नवर्याने प्रेमाने पाहावे . हळदी कुंकुला जावे.पण लग्न झाले तर हे पैश्याचे मीटर बंद होईल याची भीती आहे तुम्हाला .तुमची काळजी आहे म्हणून लग्न करीत नाही मी .म्हणून शरीरही तसेच जळत ठेवू का ..????  चार वर्षांपूर्वी तो माझ्या आयुष्यात आला . महिन्यातून दोन वेळा भेटतो आम्ही . त्याव्यतिरिक्त कोणताही संबंध नाही माझा त्याच्याशी .एकमेकांत गुंतयाचे नाही हे ठरलेले आहे आमचे .हे चालूच राहणार आहे .."तिच्या या आवेशाने सगळे थंड पडले.
"आणि हे आम्हाला मान्य नसेल तर... ??? आईने निर्वाणीचा प्रश्न केला.
"तर आता... याक्षणी मी हे घर सोडून जायला तयार आहे . तुमची ही दुसरी मुलगी आणि लाडका जावई काळजी घेतलीच तुमची ....."तिने छद्मीपणे सांगितले .ते ऐकून सर्वच शांत झाले .
"ठीक आहे.. जे आहे तसेच चालू दे ..तुझ्याबाबतीत थोडा अन्यायच झालाय हे कळते आम्हाला.."आईने शरणागती पत्करली.
"हो.. पण आज तुम्ही हे प्रश्न विचारून आपले संबंध क्लिअर केले आहेत . तेव्हा यापुढे तू माझ्या पर्समध्ये हात घालून पैसे काढायचे बंद कर.आणि छोटीचे उठसूट घरी येणे बंद कर .आज आलेत तसे जेवून जातील ते ..."असे बोलून उठली आणि गॅलरीत जाऊन पुस्तक वाचत बसली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, December 17, 2018

ऑपरेशन ब्लॅक थंडर.... सरब जित सिंग

ऑपरेशन ब्लॅक थंडर.... सरब जित सिंग
साग पब्लिकेशन
सुवर्णमंदिरातील 1984 ला झालेल्या ऑपरेशन ब्लूस्टार नंतर पंजाबातील अतिरेकी कारवाई आणि दहशतवाद रोखण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक थंडर चालू झाले . त्यावेळी लेखक सरब जित सिंग अमृतसरचे  उपायुक्त होते . त्यांच्या लेखणीतून या कारवाईचा थरारक लेखाजोखा पुस्तकात उतरला आहे . लेखकाने आपली मते स्पष्टपणे मांडली आहेत . त्यावेळच्या कांग्रेस सरकारची भूमिका, अकाली दलाची मुस्कटदाबी,भिद्रनवाले गटाला दिलेले छुपे उत्तेजन याची सडेतोड चिरफाड लेखक करतात . ऑपरेशन ब्लूस्टार मुळे पंजाब उग्र बनला आणि त्याचा परिणाम पंतप्रधानांच्या हत्येत झाला . त्यानंतर आलेल्या राजीव गांधींनी शांततेसाठी खूप प्रयत्न केले .ऑपरेशन ब्लॅक थंडरमुळे या दहशदवादाला खूपच पायबंद बसला. 1990 च्या दशकात निवडणुका होऊन परिस्थिती नियंत्रणात आली . या काळातील अनेक गूढ आणि पडद्याआड असणाऱ्या व्यक्तींना ,घटनांना लेखक समोर आणतात .लेखक 1987 ते 1992 याकाळात अमृतसरचे उपायुक्त होते.दहशतवाद विरोधी लढा आणि त्यासाठी लागणारी समर्पण वृत्ती व धैर्याबद्दल सरकारने 1989 मध्ये त्यांचा पद्मश्री देऊन सन्मान केला .

Sunday, December 16, 2018

एक आठवण

साल....१९९०
ठिकाण .... सिद्धिविनायक मंदिराशेजारी साने गुरुजी उद्यान
वेळ.....साधारण रात्री १०
घरी अभ्यास करायला जागा नाही म्हणून बरीच मुले साने गुरुजी उद्यानात अभ्यासाला यायचे. आठ वाजता गार्डन बंद झाले तरी होर्डिंगच्या हेडलाईट्सच्या उजेडात अभ्यास चालू असायचा. काहीजण दिवसभर काम करून रात्रभर अभ्यास करायचे.बाजूला सिद्धिविनायकसारखे प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे गर्दीही फार असायची . भिकाऱ्यांच्या लांबलचक रांगा गार्डनला लागून बसायच्या . मग काही श्रीमंत कुटुंब आपापल्या गाड्यामधून त्या भिकाऱ्यांसाठी जेवणाचे डबे घेऊन उतरायचे . आपल्या हाताने सर्व भिकाऱ्यांना वाढायचे . त्यांच्या चेहऱ्यावरचे तृप्तीचे भाव पाहून खुश व्हायचे.
काय नाही त्या भिकाऱ्यांना मिळायचे ....?? सकाळी उठल्यापासून त्यांच्या हातात कोणतरी चहाचा कप द्यायचा तर दुसरा लगेच बिस्किट्स वाटप चालू करायचा . ते संपत नाही तोवर कोणतरी इडली किंवा बटाटेवड्याचे पाकीट सोपवायचा . कधी कधी तर दोनतीन जण एकदम वाटायला यायचे . त्यांचा नाश्ता होत नाही तोपर्यंत लाडू चॉकलेट्स असे वाटप व्हायचे . आता जेवणाची वेळ झाली....?? काही काळजी नको येतीलच आता जेवण घेऊन .. ..हो आलेच आणि स्वतःच्या हाताने वाढायला सुरवात झाली .जेवणही छान असते . पुलाव ..भाजी ...पुऱ्या आणि त्यानंतर ही चहा असतो बरे .... सर्वजण भिकाऱ्यांना दानधर्म करून पुण्य कमवायला बघतात पण जाळीच्या मागे अभ्यास करणाऱ्या मुलांकडे कोणी लक्ष देत नाही .त्यांना अभ्यासात उत्साह येण्यासाठी ..डोळ्यावर आलेली झोप उडविण्यासाठी ...गरम गरम चहाची आवश्यकता असते पण त्यांना कोणी विचारत नाही .
पण त्या दिवशी त्यातील एका मुलाने हिंमत केलीच आणि चहा वाटप करणाऱ्या त्या गृहस्थाला सरळ विचारले " आम्हाला चहा दिला तर तुमच्या पदरीचे पुण्य कमी होणार आहे का ..."??
तसा तो गृहस्थ चमकला ...." तुम्ही पिणार का असा चहा ......"?? त्यांच्या स्वरात आश्चर्य होते .."थांबा मी आणतो .."
आजूबाजूची मुले ते पाहून आश्चर्यचकित झाली त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला "काय हरकत आहे चहा प्यायला...??,रात्रभर अभ्यास करणार आहोत खिश्यात दमडी नाही चहा प्यायला ..ते घरून आणून देत असतील तर पिवूया. तेव्हडे त्यांना ही पुण्य. थोडयावेळाने तो गृहस्थ चहा आणि कागदी पेले घेऊन आला . जवळजवळ वीस पंचवीस मुलांना त्याने चहा वाटला . त्यादिवशी खरेच त्याच्या पदरी पुण्य पडले .
आंतरराष्ट्रीय चहादिनानिमित्त एक आठवण
© श्री .किरण कृष्णा बोरकर

आंतरराष्ट्रीय चहा दिन

आंतरराष्ट्रीय चहादिन
खरेतर आज मूड आला होता बसायचा. सौ नेही मोठ्या मनाने परवानगी दिली होती. आता फक्त विक्रम यायची खोटी की निघालोच आम्ही शेट्टीकडे ......टेलिपथी जुळल्याप्रमाणे विक्रम दारात हजर .."काही म्हणा सख्खे मित्र शोभतात ..."सौच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करून आम्ही बाहेर पडलो.
नेहमीच्या गप्पागोष्टी करत आम्ही गार्डनजवळ आलो . मुलांची अभ्यासाला येण्याची सुरवात झाली होती .त्यातील काही ओळखीच्या मुलांनी आम्हाला पाहून हात हलविला.अण्णांच्या टपरीजवळ येताच विक्रम थबकला"कटिंग पिवूनच जाऊ .."त्याने मला म्हटले.अर्थात चहा कुठेही ..कधीही ..पिण्यास नाही म्हणायचे नाही हे ठरलेले असल्याप्रमाणे मी मुकाट्याने बाकड्यावर बसलो.
"अण्णा किती धंदा असतो रोजचा तुझा ...?? विक्रमच्या या प्रश्नाने मी चमकलो तसा अण्णा ही चमकला.
"होतो साहेब पोटापुरता ... "अण्णा हसत हसत म्हणाला.
"म्हणजे बघ हा...!! तू सकाळी पाचला धंदा सुरू करत असशील ते रात्री अकराला बंद करतोस .."आता मात्र अण्णा संशयाने आमच्याकडे पाहू लागला.
"म्हणजे बघ हा ...हजार कटिंग तरी रोजचे..सध्या सात रुपये कटिंग म्हणजे सात हजाराचा गल्ला..हप्ता,मटेरियल घरखर्चवगैरे जाऊन तीन हजार तरी तुझ्या हातात .म्हणजे महिन्याला नव्वद हजार तुझी कमाई ."आता मात्र अण्णा खरोखर गंभीर झाला.
" पण भाऊ मेहनतही आहे ना ..?? अण्णा माझ्याकडे पाहून म्हणाला.आम्ही दोघांनी मान डोलावली.
"हो रे ....ते नाकारीत नाही आम्ही .म्हणूनच आज आम्ही तुला चहा बनवून देणार . तसाही आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे आणि दिवसभरात कधीही चहा हजर करणाऱ्या माणसाला आम्ही विसरू शकत नाही . तेव्हा बाजूला हो आणि समोर बस मी चहा बनवतो.."विक्रम सहजपणे म्हणाला.
"काहीतरी काय साहेब ..."तो कसानुसा हसत म्हणाला. "अरे बस ....बघ विकी किती छान चहा बनवतो.मी हसत म्हणालो.
विक्रम काही न बोलता त्याच्या जागेवर गेला आणि सराईत असल्याप्रमाणे चहा बनवला . तीन कटिंग बनवून त्याने आमच्या हाती दिला . चहाचा पहिला घोट घेताच अण्णा खुश झाला.
"साहेब... आज इतक्या वर्षात कोणीतरी पहिल्यांदा मला चहा पाजला.... बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला. इतक्यात गार्डनमधील दोन मुले टपरीवर आली. "काका... दोन कटिंग... मस्त कडक बनवा.आज रात्रभर बसायचे आहे अभ्यासाला" विक्रमने काही न बोलता दोन कटिंग त्यांनाही दिल्या. पैसे पुढे करताच त्याने घ्यायला नकार दिला.
"अरे आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे आणि तुमच्यासारख्या गार्डनमध्ये बसून अभ्यास करणाऱ्या मुलांकडून मी आजतरी पैसे घेणार नाही . चहा प्या आणि अभ्यासाला पळा.."  त्या मुलांनी हसत हसत माना डोलावल्या आणि गार्डनकडे वळले.
सवयीप्रमाणे मी खिश्यातून पाकीट काढले" किती झाले अण्णा सर्व कटिंगचे ..."??
"कशाला लाजवताय भाऊ... इतकी वर्षे इथे धंदा करतोय पण असा अनुभव पहिल्यांदाच आला आणि हो आयुष्यात फक्त माझेच पाहिले मी दुसऱ्यांचा विचारच नाही केला. हा चहा दिवस असतो हेही माहीत नव्हते मला . पण आतापासून आजचा दिवस लक्षात ठेवीन आणि या दिवशी गार्डनमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांना फुकट चहा पाजेन.."अण्णांच्या पाठीवर प्रेमाने थाप मारीत आम्ही निघालो.
नटराजजवळ येताच मी विक्रमला विचारले "आंतरराष्ट्रीय अल्कोहोल डे कधी आहे ते शेट्टीला विचारायला हवे ...."आणि हसत हसत आत शिरलो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, December 11, 2018

व्हेण्डट्टा......मेरी कॉरेली

व्हेण्डट्टा......मेरी कॉरेली
अनुवाद..... सुरेश गुप्ते
मेहता पब्लिकेशन
कॉलराच्या साथीत त्याचा मृत्यू झाला असे समजून जिवंत शवपेटीत टाकून त्याच्याच शाही शवागृहात टाकण्यात आले .  शुद्धीवर येताच तो मोठ्या प्रयत्नाने तिथून बाहेर पडला .पण घरी येताच त्याला अजून एक धक्का बसला आणि तो सुडाने पेटून उठला .त्याने असे काय पाहिले...?? आणि आपला सूड कसा पूर्ण केला...??  ते वाचायला हवेच .इटलीतील नेपल्स शहरात घडणारी ही रोमांचकारी सुडकथा

Friday, December 7, 2018

( द ममी ऍट द डायनिंग रूम टेबल ) ...जेफरी ए. कोटलर/ जोन कार्लसन

डॉक्टरांनी सांगितलेल्या मनोरुग्णांच्या सत्यकथा
( द ममी ऍट द डायनिंग रूम टेबल ) ...जेफरी ए. कोटलर/ जोन कार्लसन
अनुवाद ........ वसू भारद्वाज
साकेत प्रकाशन

त्याला आपले नाक कापून घ्यायची इच्छा होती कारण त्याला नेहमी गाईच्या गोठ्याचा वास यायचा . पण खरे कारण वेगळेच होते .
त्या एक्केचाळीस वर्षाच्या गृहस्थाला भर गर्दीत लंगोट नेसून फिरण्याची इच्छा होत होती .तो कपडे काढून टाकायचा आणि लंगोट नेसून घराबाहेर पडायचा .
ती नेहमी डॉक्टरकडे उशिरा यायची कारण रस्त्यात पडलेली दगड उचलून घेऊन यायची .तिला वाटायचे तिची आई समलिंगी आहे ,
तिची मावशी हरवली आहे अशी तिची तक्रार होती . काही दिवसांनी तिने सांगितले की मावशीला ममी बनवून ठेवले आहे . ती केव्हाच वारली होती .
या आणि अश्या अनेक आश्चर्यकारक आणि रहस्यमय मनोरुग्णांच्या कथा सांगतायत जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ. या तज्ज्ञांनी आपल्या आयुष्यात पाहिलेल्या काही गाजलेल्या केसेस सांगितल्या आहेत .यातील प्रत्येक केसवर केलेला प्रयोग कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही . मानवी मन किती गुंतागुंतीचे आणि किचकट आहे हे दिसून येते .समोरच्याला समजून घेऊन त्यावर योग्य उपाय करणे यातच त्या तज्ज्ञांचे कौशल्य दिसून येते .एक वेगळेच पुस्तक जे मानवी मनाचा ठाव घेते .

Tuesday, December 4, 2018

गॉडफादर.... मारियो पुझो

गॉडफादर...... मारियो पुझो
अनुवाद.....रवींद्र गुर्जर
श्रीराम बुक एजन्सी
तो अमेरिकेतील काळ्या धंद्याचा सम्राट होता . लोक त्याला गॉडफादर म्हणायचे . मैत्री त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती.तो कोणालाही नाही म्हणायचा नाही त्या कामाच्या बदल्यात त्याला फक्त मैत्री हवी असायची . अतिशय थंड राहून तो योजना आखायचा .त्याने योजनाबद्धरित्या आपल्या फॅमिलीची बांधणी केली होती. सिसिलियन रक्तावर त्याचा विश्वास होता .आपल्या तिन्ही पुत्रांवर त्याचे जीवापाड प्रेम होते . सर्वात लहान मुलाला मायकलला तो आपला वारसदार समजत होता . पण मायकलला हे पसंद नव्हते .
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अंमली पदार्थाच्या धंद्याला डॉनने विरोध केला आणि त्याचा परिणाम डॉनवर जीवघेण्या हल्ल्यात झाला. पुढच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता धरून मायकेलने स्वतः आपल्या शत्रूला संपवायचे ठरविले.. अत्यंत थंड डोक्याने योजना आखून मायकलने त्यांना संपविले आणि भूमिगत झाला .
व्हीटो कॉर्लीऑन वडिलांच्या हत्येनंतर इटलीतून पळून अमेरिकेत आला आणि आपल्या हुषारीच्या जोरावर डॉन बनला .अतिशय कुशलतेने त्याने आपल्या कुटुंबाची बांधणी केली . लोक त्याला फॅमिली संबोधू  लागली . ते समांतर सरकार चालवू लागले . डॉनला नाही म्हणायची कोणाच्यात हिंमत नव्हती .
मारियो पुझोने गॉडफादर लिहिली आणि साहित्यविश्वात ती अजरामर कादंबरी म्हणून गणली गेली. त्यावरील चित्रपट ही खूप प्रसिद्ध झाला . मार्लन ब्रांडो, अल पचिनो ह्यांना खरेखुरे गॉडफादर समजू लागले .इतकेच नव्हे तर मारियो पुझो हे स्वतः फॅमिलीसाठी काम करतात अशी लोकांना शंका वाटू लागली . कादंबरी वाचताना आपण तिथे प्रत्यक्ष हजर राहून सर्व घटना पाहतोय असेच जाणवत राहते . कादंबरीचे कथानक सर्वाना माहीत आहे त्यामुळे ते सांगण्यात अर्थ नाही . पण संग्रहात ठेवावी अशी कादंबरी .