Saturday, July 31, 2021

मिशन वारी….अमोल पोतनीस

मिशन वारी….अमोल पोतनीस 
आषाढातील महत्वाचा सण म्हणजे एकादशी.लाखो भक्त माऊलीचे नाव घेत वारीत चालतात .अतिशय सुनियोजित योजनाबद्ध अशी वारीची आखणी असते. यात प्रवासाचे वेगवेगळे टप्पे असतात .सर्व वारकऱ्यांच्या मुखी फक्त माऊलीचा जप असतो. सर्वाना त्या वारीत सुरक्षितता वाटत असते . पण यावेळच्या वारीत काहीतरी भयंकार घडणार असा सुगावा स्पेशल इन्व्हेस्टीगेशन ब्युरोला लागला आणि त्याचा छडा लावण्याची जबाबदारी त्यांनी कॅप्टन आकाश सुमंतवर टाकली.
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मोठा टप्पा म्हणजे पुणे ते सासवड हा साधारण बत्तीस किलोमीटरचा प्रवास.त्यात चार किलोमीटरचा घाट . हा घाटमाथा लाखो वारकर्यांनी फुलून गेलेला असतो. या टप्प्यातच काहीतरी घडणार अशी खबर आकाशला मिळाली.
काय घडणार होते त्या वारीत....?? लाखो लोकांच्या जीवावर बेतणारा कट कॅप्टन आकाश आणि त्याचे सहकारी उधळून लावतील का ....?? कशा शोध घेणार ते ....?? 
हे सर्व कळण्यासाठी मिशन वारी वाचायला हवे.
लेखकाला साहसकथेची आवड कै. सुहास शिरवरकरांमुळे लागली आणि म्हणून हे पुस्तक त्यांना अर्पण केले आहे.

Wednesday, July 28, 2021

बुब्स... नजर... आणि इतर काही

बुब्स... नजर... आणि इतर काही 
डेपोत उभ्या असलेल्या एसी बसमध्ये ती शिरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
मोजक्याच सीट्स असलेली ती बस आता भरलेली होती. म्हणजे सगळ्या सीट्सवर प्रवासी बसलेले होते.ती एका खांबाचा आधार घेऊन उभी राहिली.
स्त्रियांसाठी राखीव म्हणून दोनतीन सीट होत्या.पण सध्याच्या काळात ते नियम कोण पाळत नव्हतेच.प्रवास करायला मिळतोय हेच पुरेसे....मोठ्या कष्टाने बसमध्ये जागा मिळते. ती उभ्या स्त्रीला कोण देईल ...?? बरे ती नुसती स्त्री नव्हती तर तरुण स्त्री होती. अंगावरचा तिचा कुर्ता नेमक्या जागी फिट बसला होता आणि त्यामुळे छाती एकदम उठावदार दिसत होती .गळ्यात एक बारीक चेन.कानात ब्लूटूथ इयर फोन आणि त्याची रिंग गळ्यात अडकवलेली होती .ब्लॅक टाईट लॅगिंगमुळे कंबरेखालील शरीरही भरीव दिसत होते. छातीच्या मानाने बाकी शरीर सूट होत नव्हते.पण  पाहणाऱ्याचे पाहिले लक्ष छातीकडेच जात होते.
ती खांबाला टेकून उभी राहिली आणि पर्समधून मोबाईल काढला . तिला पाहताच जवळच्या सीटवर बसलेल्या एका स्त्रीने उगाचच आपली ओढणी नीट केली. दुसरीने शेजारी बसलेल्या आपल्या नवऱ्याच्या कुशीत कोपर्याने ढोसले.बसमधील सगळे प्रवासी नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होते.
ती दिसायला काही देखणी नव्हती पण मानेखालचे शरीर नजरेत भरण्यासारखे होते. तसेही हल्ली तोंडावरच्या मास्कमुळे अर्धा चेहरा झाकूनच जातो म्हणा.त्यामुळे नजर उरलेल्या अंगावरूनच फिरते.
"पिच चांगले आहे.बॉलिंग करायला मजा येईल...."माझा शेजारी स्वतःशी पुटपुटला.
"बॅटिंग कधी करणार ..."?? मीही तिरकसपणे विचारले. 
"अश्या पिचवर बॅटिंग नाही मिळाली तरी चालेल. फक्त बॉलिंग करू ...."तो हसत म्हणाला.मी काही न बोलता मोबाईलमध्ये डोके घातले .
पुढच्या स्टॉपवर अजून एक स्त्री बसमध्ये चढली.अगदी लूज असलेला सलवार तिने अंगावर चढवला होता.छाती अतिशय सरळ दिसत होती . तिचीही नजर पहिलीच्या छातीकडे गेली. एक क्षणभर असूयेची चमक तिच्या नजरेत आली. आपल्याकडे कोणाचेही लक्ष नाही पाहून थोडे हायसे वाटले . पण अधूनमधून प्रवासात तीही तिच्या छातीवर नजर मारून घेत होती.
मध्येच एक प्रवासी उठला आणि त्याच्या जागेकडे ती सरकली.तिला क्रॉस करताना त्याचा हात नक्कीच तिच्या छातीकडे सरकलेला सर्वाना दिसला. ती रिकाम्या सीटवर बसताच उभे असलेले प्रवासी तिच्या शेजारी उभे राहिले . काहीजण शर्थीचे आपली नजर तिच्या कुर्त्यातून खोलवर भेदण्याचा प्रयत्न करू लागले .
संध्याकाळी 
ती ऑफिसमधून घरी आली. कालच ऑनलाइनवरून मागावलेला कुर्ता आज घालून गेली होती.छातीवर जरा जास्तच फिट बसला होता . संपूर्ण प्रवासात आणि ऑफिसमध्ये सगळे तिच्या छातीकडेच चोरून पाहत होते. तिलाही ते जाणवत होते पण काहीही घाला हल्ली मास्कमुळे लोक चेहऱ्याकडे न बघता खालीच बघतात .स्त्रीकडे बघण्याची वृत्ती बदलणार नाहीच .तिने कपडे काढले . छातीवरची  डबल पॅडची ब्रेसीयर काढून बाजूला ठेवली . आपल्या छोट्याश्या उभारावरून हात फिरवीत स्वतःशी हसली आणि गाऊन चढवून बाथरूममध्ये शिरली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

बियॉण्ड सेक्स ... सोनल गोडबोले

बियॉण्ड सेक्स ... सोनल गोडबोले 
चेतक बुक्स 
चाळीशीनंतर पुनर्जन्म होतो का ...?? एक नवीन आयुष्य खुणावते का ...? काहीतरी नवीन हवेसे वाटते ..? जोडीदाराच्या स्पर्शाचा कंटाळा येऊ लागतो का ..?? संसारातील बहुतांशी जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर रितेपणा जाणवतो का ...?? अश्यावेळी कोण अनोळखी आयुष्यात आला तर काय होईल ..?? समाज काय म्हणेल..?? घरचे काय म्हणतील...?? 
नेमक्या याच गोष्टी लेखिकेने सरळ साध्या लिखाणात मांडल्या आहेत . सोशल मीडियाचा आयुष्यावर होणारा परिणाम कधी चांगला असू शकतो तर कधी वाईट.
मीरा ही कथेची नायिका . तिचा प्रेमविवाह. आता ती चाळीस वर्षाची आहे.स्वतःला जीम योगा करून फिट ठेवलंय. अत्याधुनिक राहणीची आवड. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह. ती कविता करते. मैत्रिणीमध्ये फेमस.  रोज नवीन फोटो अपलोड करत असते.तिचा नवरा समीर ..इंजिनिअर आणि मोठ्या कंपनीत मॅनेजर. दोन मुले .एकूण काय... तर आर्थिक किंवा इतर जबाबदारी नाही .तरी तिला आता शारीरिक संबंधामध्ये स्पर्शामध्ये तोचतोचपणा जाणवू लागलाय .तिची कामेच्छा जास्त आहे हे तीच मान्य करतेय. मोबाईलमधून भरपूर साहित्य मिळतेय. तिच्या स्वप्नात परपुरुष आहेच. पण तरीही नवऱ्यावर आत्यंतिक प्रेम आहे .
शेवटी फेसबुकवरून तिची एका पुरुषाशी मैत्री होतेच .जस बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत होते तसेच तिच्या बाबतीत ही होते. प्रथम हाय..गुड मॉर्निंग...जेवण झाले का.. ?? मग सौंदर्याची तारीफ,कवितेची स्तुती नंतर व्हाट्स अप चॅटिंग.असे होत तो तिला भेटतो . मग भेटीगाठी वाढू लागतात . एक चांगला मित्र म्हणून तो तिच्या मनात आपली प्रतिमा तयार करतो . पण पुढे काय ..…?? ही निखळ मैत्रीचं राहील का ...?? दोघांचे साथीदार त्यांची मैत्री स्वीकारतील का ...?? त्यांची मैत्री कुठल्या थरापर्यंत जाईल ...?? यासाठी हे पुस्तक वाचायला हवेच.
हे पुस्तक वाचताना सोशल मीडियावर कशी मैत्री होते याचा सत्य अनुभव येतो. नायिकेशी मैत्री जुळण्याची पद्धत ही बऱ्याचजणांच्या ओळखीची आहे .

Sunday, July 25, 2021

महाभारताचे रहस्य

महाभारताचे  रहस्य... क्रिस्टोफर सी. डॉयल 
अनुवाद...मीना शेटे संभू
ख्रि. पू. २४४ ... 
त्या गर्द वनात लपलेल्या गुहेत सम्राट अशोक आपला सेनापती शूरसेनसोबत उभा होता. तिथे काय दिसणार आहे याची शूरसेनने आधीच कल्पना दिली होती. तरीही त्याला त्या गोष्टी पाहून भयानक धक्का बसला होता . समोर दिसणाऱ्या गोष्टी महाभारताशी संबंधित होत्या. गुहेतील रहस्य बाहेर पडले तर जगाचा विनाश निश्चित होता.आता हे रहस्य जगासमोर कधीच येऊ नये याची जबाबदारी सम्राट अशोकवर होती .
महाभारताच्या एका प्रकरणात या रहस्याची पाळेमुळे होती आधी ते प्रकरण महाभारतातून काढायला हवे पण त्याच बरोबर भविष्यात या रहस्याचे रक्षणही करायला हवे याची कल्पना सम्राट अशोकला होती. त्यासाठी त्याने आपल्या नऊ सरदारांची नेमणूक केली . आता भविष्यात त्या सरदार आणि त्यांच्या वारसांकडून रहस्याचे रक्षण होणार होते .
सन ५०० 
 राजवीरगडमध्ये कोणाला तरी ते पुस्तक सापडले होते आणि आता ते पालाच्या मागे लागले होते. अश्यावेळी काय करायचे ते पालाला पक्के माहीत होते.शेवटी तो त्या रहस्याचा राखणदार होता.वायव्येच्या बामियान राज्यात तो जाणार होता आणि दुसऱ्या राखणदाराच्या हाती आपल्याकडील रहस्य सोपविणार होता.
मार्च २००१ 
तालिबान्यांनी बामियानमधील प्राचीन बुद्धाच्या मूर्ती नष्ट केल्या पण त्यामागील गुहेत एक मानवी सांगाडा सापडला जो दीड हजार वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज होता.
आता
जोनगडच्या किल्ल्यात  प्रसिद्ध अणूशास्त्रज्ञ विक्रमसिंह राहायला आलेत.त्यांच्याकडे अशी काही गोष्ट आहे जी काही दहशतवादी संघटनांना हवी आहे . त्या गोष्टीसाठी अनेकांचे खून झालेत.आताही विक्रमसिंहाचा जीव धोक्यात आहे. त्यांच्या किल्ल्यातील अत्याधुनिक  सुरक्षा यंत्रणा तोडून काही प्रशिक्षित मारेकऱ्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. पण मरणापूर्वी त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या  विजयसिह या आपल्या पुतण्याला काही इ मेल करून रहस्याचे रक्षण करण्यासाठी काही संकेत दिलेत.
विजयसिह आपल्या मित्रासह भारतात येतो पण विमानतळापासूनच त्याच्यामागे काही माणसे लागतात . ही माणसे लष्कर ए तोयबाचे दहशतवादी आहेत. त्यांना विजयसिहकडून त्या रहस्याचा शोध घ्यायचा आहे आणि त्यातूनच  जगभरात भयानक हल्ले करायचे आहे .
विजय आणि त्याचा मित्र या रहस्याचा शोध घेतील का ..?? कुठपर्यंत त्यांना हे रहस्य घेऊन जाणार आहे ..?? ते नऊजण अजूनही त्या रहस्याचे रक्षण करतायत का ...?? सम्राट अशोकाने भारतभर त्या रहस्याचे संकेत दडवून ठेवले आहेत .
एक थरारक.... क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी कादंबरी .

Monday, July 19, 2021

कॅप्टन ब्लड... राफेल सबातिनी

कॅप्टन ब्लड... राफेल सबातिनी
अनुवाद .....अमित पंडित 
चेतक बुक्स 
ही सतराव्या शतकात समुद्री चाचेगिरीची काल्पनिक कथा .इंग्लड आणि वेस्ट इंडिज बेटांच्या सागरी वसाहतीत ही कथा घडते. कॅप्टन ब्लड हा खरा एक कुशल डॉक्टर . सॉमरसेट परगण्यातील ब्रिजवॉटर शहरात तो डॉक्टरकीचा व्यवसाय करतो. 
त्याच्या शहरात इंग्लंडचा  राजा दुसरा जेम्स याच्याविरुद्ध बंड चालू होते.त्या बंडाचा नेता जखमी होतो . त्याच्यावर उपचार करण्यासाठी ब्लड त्याच्या घरी जातो आणि राजाच्या सैन्याचा बंदी बनतो. पुढे त्याला तीन महिन्यांच्या बंदीवास होतो आणि नंतर वेस्ट इंडिज बेटांवर गुलाम म्हणून विकले जाते . 
वेस्ट इंडिज बेटांवर स्पेन सैनिक हल्ला करतात त्यात ब्लड निसटतो आणि एक जहाज ताब्यात घेऊन कॅप्टन ब्लड बनतो. आणि चाचेगिरी सुरू करतो . खरे तर त्याला हा मार्ग पसंद नसतो पण आपल्या साथीदारांच्या पोटासाठी त्याला हे करावे लागते . 
पुढे काय होते...?? कॅप्टन ब्लड पुन्हा आपल्या डॉक्टरी पेशाकडे वळून चांगल्या आयुष्याची सुरवात करेल का...??

Friday, July 16, 2021

कलि ..एक शोध .…भाग 2...विनय राजेंद्र डोळसे

कलि ..एक शोध .…भाग 2...विनय राजेंद्र डोळसे
कलि या पुस्तकाचा दुसरा भाग. कलिची युधिष्ठिराने सुटका केल्यानंतर काय घडते ते यात आहे.
 ब्रम्हदेवाच्या योजनेनुसार कलिचा जन्म झाला आणि त्याचा पिता कोण हे ही कळले. जसजसे वय वाढत गेले तसतश्या कलीच्या शक्ती वाढत गेल्या.आपल्या पित्याचा शोध घेण्यासाठी त्याने देवलोकांवर हल्ला करायचे ठरविले.
कलिच्या शक्तीला सर्व देव घाबरून असत.यात देवांची निंदा केली आहे. ब्रम्हा ,विष्णू अतिशय स्वार्थी स्वतःचे हित पाहणारे.. तर महादेव अतिशय भोळा . कलिविरुद्ध लढण्यासाठी  देवानी प्रथम दानवाना  पाठविले गेले. कलिने त्यांचा सहज पराभव केला.
सर्व देवांचा पराभव करून कलिने त्यांच्यावर पंचवीस अटी लादल्या. त्यानंतर कलिच्या पित्याला एक मोठे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर जायचे होते त्यासाठी त्याने कलिची परवानगी मागितली.
सुमेधा कलिचा पिता. त्याला पृथ्वीवर नवा धर्म स्थापन करायचा होता . पुढे काय झाले ...?? कलिचा पराभव होईल का ...?? ब्रम्हा विष्णू आपल्या स्वार्थासाठी कलिचा वापर कसा करून घेतील....?? सुमेधाचे अवतार कार्य पूर्ण होईल का ...? त्याला कोणता धर्म स्थापन करायचा आहे ...?? कलिची  आणि त्याची भेट होईल का ....?? 
लेखकाने आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे एक छान कादंबरी लिहिली आहे .

Wednesday, July 14, 2021

सीरिया ..एक रक्तरंजित पट... अतुल कहाते

सीरिया ..एक रक्तरंजित पट... अतुल कहाते
सकाळ प्रकाशन 
आयसिस या इस्लामिक गटामुळे सीरिया देश चर्चेत आला . या अज्ञात असलेल्या देशाविषयी सोप्या शब्दात लेखकाने माहिती दिलीय.
सीरियाची लोकसंख्या साधारण दोन कोटी . यात बहुतांशी अरब.दमास्कस ही राजधानी.पूर्वी या मध्यपूर्व आशियाई भागावर ऑटोमन टोळ्यांचे राज्य होते. नंतर सीरिया फ्रेंचांच्या ताब्यात आला. युरोपियन देशांचे वर्चस्व अरब देशांना सहन झाले नाही आणि स्वातंत्र चळवळ सुरू झाली.
सीरियामध्ये फैझलच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र चळवळ सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर सीरिया स्वतंत्र झाला पण हुकूमशाही कायम राहिली. सीरियातील जनता नेहमीच युद्धाच्या छायेत राहिली. शेजारचा इस्त्रायल हा सीरिया आणि इतर अरब राष्ट्रांचा कट्टर शत्रू . त्याच्याविरुद्ध सततच्या युद्धात सिरियाचा विकास झालाच नाही .
अशी पुस्तके वाचल्यावर आपण किती सुखी आहोत याची जाणीव होते.

Tuesday, July 13, 2021

कलि.. एक शोध ...१…विनय राजेंद्र डोळसे

कलि.. एक शोध ...१…विनय राजेंद्र डोळसे
अठ्ठावीस युग झाल्यानंतर विश्वाचा नाश होईल असे म्हटले जाते आणि म्हणूनच देवानी कलियुग निर्माण केले.आणि त्यासाठीच कलिचा जन्म झाला .
उत्तर भारतातील चुन्ड देशाच्या प्रधानाची मुलगी कात्यायनीच्या पोटी कलिचा जन्म झाला. पण त्याचा बाप कोण हे माहीत नसल्याने त्यांना वाळीत टाकले गेले .पुढे कलिला आपल्यातील सामर्थ्याची कल्पना आली आणि चुन्डच्या राजाश्रयामुळे तो राजा बनला .आपल्या मायावी शक्तीच्या सामर्थ्याने तो अजिंक्य झाला.
आपला पिता कोण .…?? हा प्रश्न त्याला नेहमीच पडायचा. विष्णू त्याचा पाठीराखा होता. पण विष्णुही सांगू शकत नव्हता .शेवटी त्याने संतापून देवलोकावर स्वारी केली.
पुंण ऋषी आणि आलवक ऋषी कलिला रोखण्याचा प्रयत्न करत होते .विष्णूच्या सल्ल्याने त्यांनी एका महान देवाच्या केसांचा साखळदंड बनवून कलिला बांधून टाकले .
पुढे विष्णूने कृष्णाचा अवतार घेतला आणि युधिष्ठराच्या मदतीने कलिची चातुर्याने सुटका केली .
कलियुग निर्माण व्हावे हीच ब्रम्हा विष्णू महेश यांची इच्छा होती आणि त्यासाठीच त्यांनी कलिला निर्माण केले .
कलिने त्या साखळदंडातून सुटका करून घेतली .पुढे काय .....???
हा भाग पहिला आहे .

Thursday, July 8, 2021

अ हेवी प्राईझ ( अ मि. वाघ स्टोरी )

अ हेवी प्राईझ ( अ मि. वाघ स्टोरी )
सूरज काशिनाथ गाताडे 
मि. वाघ हा लेखकाचा नायक आहे. त्याच्याविषयी अनेक दंतकथा आहेत. खुद्द लेखक त्याला घाबरतो. तो आई नसताना घरात शिरतो . स्वतः चहा करून घेतो.आपल्या हाती असलेल्या केसबद्दल बोलतो .
शहरात एका वृद्ध स्वातंत्रसैनिकाचा खून होतो त्या खुनाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून व्हावी असा खुद्द पंतप्रधान कार्यालयातून आदेश येतो.कमिशनर या केससाठी मि. वाघ याना मदतीला बोलावतात . त्यानंतर पुढे अनेक खून होतात .ते सगळेच स्वातंत्रसैनिकाच्या खुनाशी संबधित आहेत का ....?? या मागे कोणते षडयंत्र आहे का ....?? मि. वाघ शिताफीने याचा छडा लावतात .
एक रहस्यकथा असली तरी त्यामागचे रहस्य काही विचित्र न पटणारे आहे . लेखकाने रहस्याची उकल करताना थोडा गोंधळ घातला आहे त्यामुळे आपलाही गोंधळ उडतो .
लेखकाचे हे तिसरे इ बुक आहे. एकदा वाचण्यास हरकत नाही .

Tuesday, July 6, 2021

फॉल्स इम्प्रेशन.…..जेफ्री आर्चर

फॉल्स इम्प्रेशन.…..जेफ्री आर्चर
अनुवाद...सुधाकर लवाटे
मेहता पब्लिशिंग हाऊस
व्हॅनगॉगच्या "सेल्फ पोट्रेट विथ बँडेज इयर" असे शीर्षक असलेले ते चित्र मुळातच साठ दशलक्ष डॉलरचे होते. पण व्हिक्टोरिया व्हेंटवर्थ सध्या पूर्णपणे कर्जात बुडाली होती आणि आता ते कर्ज चुकविण्यासाठी ते चित्र फेन्स्टनला द्यावे लागणार होते.
फेन्स्टन हा मोठा खाजगी बँकर. मूल्यवान चित्रांच्या बदल्यात कर्ज देणे हा त्याचा धंदा .तो क्रूर आणि स्वार्थी होता. कर्जदाराचा चित्रसंग्रहालय ताब्यात घेऊन नंतर त्याची हत्या करायची हा त्याचा डाव .व्हिक्टोरियाने त्याच्याकडे चित्र पाठवून दिले आणि त्याच रात्री तिचा गळा चिरून खून झाला .
डॉ. अँना पेट्रेस्कु एक इम्प्रेशनिस्ट . लिलावात जाणारे प्रत्येक चित्र तिच्या नजरेखालून जायचे.फेन्स्टनची मुख्य अधिकारी .समोर आलेल्या प्रत्येक चित्रांची ती अचूक किंमत सांगायची .व्हिक्टोरियाने व्हॅनगॉगचे चित्र फेन्स्टनला न देता बाहेर कोणाला तरी विकून कर्ज फेडावे असा सल्ला दिला आणि परिणाम तिची नोकरी जाण्यात झाला .
व्हिक्टोरियाचा खून झाल्याचे कळताच फेन्स्टनला व्हॅनगॉगचे चित्र मिळू द्यायचे नाही तर योग्य व्यक्ती गाठून त्याला ते चित्र विकून व्हिक्टोरियाला न्याय मिळवून द्यायचा असे अँना ठरविते आणि ते चित्र मोठ्या चातुर्याने आपल्या ताब्यात घेते. मग पुढे चालू होतो एक जीवघेणा पाठलाग .
ते चित्र आपल्या हातून निसटलेय हे कळताच फेन्स्टन पिसाळतो. तो आपल्या भाडोत्री मारेकऱ्याला तिच्या मागावर सोडतो .पण अँना अतिशय कुशलतेने त्या चित्राची काळजी घेत त्याला योग्य ठिकाणी कसे पोचविते त्यासाठी तिला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे वाचणे फारच रोमांचक आहे . 
लेखकाने 9/11 च्या घटनेचा अतिशय कुशलतेने वापर केला आहे . तसेच लंडन ,रुमानिया, टोकियो देशांच्या माध्यमातून पाठलागाचे क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे वर्णन केले आहे .
हे पुस्तक अतिशय थरारक असून एकदा वाचायला सुरुवात केल्यावर खाली ठेवता येणार नाही .

Saturday, July 3, 2021

भुलभुलैय्या ...व.पु. काळे

भुलभुलैय्या ..... व.पु. काळे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
चष्मा माणसाचा स्वभाव सांगतो असे म्हणतात.म्हणूनच महादेवने ऑफिसमधील तणाव कमी करण्यासाठी चष्म्याची अदलाबदल केली. म्हणजे ऑफिसच्या साहेबांचा चष्मा युनियन लीडरने घातला आणि युनियन लीडरचा साहेबांनी .सदानंद हा मनमौजी हसतमुख तरुण तर दामले नेहमी गंभीर.. सतत कामात आणि त्याचाच विचार करणारे . संधी मिळताच महादेवने त्यांच्याही चष्म्याची अदलाबदल केली.पण त्यानंतर काय घडले ते वाचायलाच हवे.
राईलकर  हेडक्लार्क .ऑफिसमधील फाईली उलटसुलट करून घोटाळे करण्यात हुशार.प्रत्यक्ष ब्रम्हदेवाचा बाप आला तरी आपले काही वाकडे करू शकणार नाही असेच सगळ्यांना सांगायचा. पण तो बिचारा ब्रम्हदेव तरी किती सहन करेल. एक दिवस संध्याकाळी खाली येऊन राईलकरासमोरच बसला .मग काय झाले ते वाचाच.
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीकडून सर्व वस्तू काढून घेणारी व्यक्ती असेल का ...??? आमचा बेकार सुशिक्षित नायक जेव्हा कड्यावरून उडी मारायला गेला तेव्हा त्याच्याकडील सर्व वस्तू त्याने मागून घेतल्या . पण नायकाचे पुढे काय झाले ???
लग्नाच्या गाठी म्हणे स्वर्गातच बांधल्या जातात .पण मधुवंती मासिकाच्या केतनने छापण्यासाठी आलेल्या वधुवरांचे फोटो कापून आपल्या मनासारख्या जोड्या लावल्या .पण त्याचे परिणाम इतके भयंकर होतील याची त्याला कल्पना नव्हती.
अश्या अनेक फँटसी भुलभुलैय्यामध्ये व पु ने लिहिल्या आहेत.सामान्य माणसाच्या आयुष्यात अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. त्याची स्वप्नेही फार मोठी नसतात .बरे वाईट ,आंबट गोड प्रसंग येतच असतात. चांगले आयुष्य जगण्यासाठी तो नेहमी कल्पनेच्या जगात वावरत असतो.त्या कल्पना व पु ने आपल्या नेहमीच्या शैलीत मांडल्या आहेत. कोणाला वाचनाची सुरवात करायची असेल तर त्यांनी भुलभुलैय्यापासून करावी.