Tuesday, April 21, 2020

राख

#CinemaGully
#raakh
#राख
हू इज अमीर खान...?? आस्क  द गर्ल्स टू नेक्स्ट डोअर... आणि डोळ्यावर काळा गॉगल ,ब्लॅक जॅकेट घातलेल्या कोवळ्या हिरोचे सहा फुटी पोस्टर प्रत्येक नाक्यानाक्यावर  लागले.
१ मार्च १९८८ रोजी कयामत से कयामत तक  रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे सुपरहिट झाला आणि अमीरखान तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला.
 आता या चॉकलेटी हिरोचे असेच चित्रपट पाहायला मिळणार अश्याच अपेक्षेने सर्वजण त्याच्या पुढील चित्रपटाची वाट पाहू लागले . पण त्याचा पुढील चित्रपट मात्र तरुणाईला धक्का देणारा होता . 
२१ एप्रिल १९८९ साली त्याचा राख पडद्यावर आला आणि हे पाणी वेगळेच आहे याची जाणीव सर्वांना झाली.
आदित्य भट्टाचार्यने दिग्दर्शित केलेल्या या थ्रील्लर सूडपटात अमीर खान सोबत सुप्रिया पाठक ..पंकज कपूर अशी तगडी टीम होती . संपूर्ण चित्रपट एका संथ  उदास डार्क रंगात चित्रित केला गेला होता .
वयाने आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या मैत्रिणीबरोबर नायक अमीरखान पार्टी वरून परतत असतो त्याच वेळी शहरातील गुंड आणि त्याची माणसे त्याच्या मैत्रिणीवर सुप्रिया पाठकवर बलात्कार करतात ..त्यांना मारहाण करतात . नेहमीप्रमाणे पोलीस नायक आणि 
नायिकेच्या बाजूने उभे राहत नाहीत तेव्हा नायक स्वतः बदला घेण्याचे ठरवितो .
त्याच वेळी एक निलंबित झालेला प्रामाणिक पोलीस अधिकारी त्याच्या मदतीला येतो आणि दोघे मिळून सूड पूर्ण करतात.
खरे तर ही नेहमीची सूडकथा पण पडद्यावर ती उत्तमरीत्या मांडली गेली आहे . २१ वर्षाच्या कोवळ्या तरुणाचे एका गंभीर माणसात होणारे रूपांतर अमीरखानने उत्कृष्टपणे वठविले आहे . त्याला पंकज कपूर ने सुंदर साथ दिली आहे .मधुकर तोरडमल आणि होमी वाडिया यांनी आपल्या  छोट्याश्या भूमिकेत छाप पाडली आहे .
या चित्रपटासाठी 1989 साली पंकज कपूर आणि आमिरखानला नॅशनल अवॉर्ड मिळाले होते 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, April 15, 2020

डिसेप्शन पॉईंट... डॅन ब्राऊन

डिसेप्शन पॉईंट... डॅन ब्राऊन 
अनुवाद.... अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे .अध्यक्षांच्या विरुद्ध उभा असलेला उमेदवार सिनेटर सेक्टन प्रचाराच्या आणि लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा चार पावले पुढे आहे . पण त्याची मुलगी रॅकेल अध्यक्षांच्या गुप्तखात्यात माहिती संकलनाच्या वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. 
सिनेटरने आता नासा या अंतराळ संशोधन केंद्रावर लक्ष केंद्रित केले . नासा दरवर्षी करोडो रुपये आपल्या संशोधनावर खर्च करून करदात्यांच्या पैश्याची उधळपट्टी करते असा त्याचा आरोप आहे आणि अमेरिकन जनता यासाठी त्याच्या मागे उभी राहिली.
त्याचवेळी अध्यक्षांनी रॅकेलशी भेट घेऊन तिला नासाच्या नवीन शोधकार्याविषयी माहिती घेण्याचे सुचविले आणि आर्टिक खंडात पाठविले.
नासा आर्टिक खंडावर एक नवीन संशोधन करतेय आणि ते संशोधन यशस्वी झाले तर विजयाचे पारडे पुन्हा अध्यक्षांच्या बाजूने झुकेल .  
रॅकेल हजारो मैलाचा प्रवास करून आर्टिक खंडावर पोचते आणि सुरू होतो एक रहस्यमय थरार .
तिला नासाने लावलेल्या शोधाची माहिती मिळते .एक डेल्टा फोर्सची टीम त्या संपूर्ण टीमवर दुरून लक्ष ठेवून आहे . नासाला मदत करण्यासाठी चार  खाजगी शास्त्रज्ञही हजर आहेत . तो शोध पूर्ण होतो आणि त्याचे चित्रीकरण अध्यक्षांकडे पोचते . पण नंतर काहीतरी घडते आणि डेल्टाफोर्स त्या शास्त्रज्ञाच्या जीवावर उठते . त्यात रॅकेलही ओढली जाते .
असे कोणते रहस्य आहे ज्याने डेल्टा फोर्सचे कमांडो आपल्या अत्याधुनिक हत्यारांसह त्यांच्या मागे लागले आहेत. त्या सर्वांना काहीही करून संपला असे आदेश डेल्टा फोर्सला दिले आहेत.
कोण आहे ह्या सर्वांच्या मागे ....?? रॅकेल या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खऱ्या सुत्रधाराला जगासमोर आणेल का ...?? पण त्यासाठी तिला स्वतःचा जीव वाचवावा लागेल .
या कादंबरीत वापरलेले तंत्रज्ञान आणि संस्था खऱ्याखुऱ्या आहेत .ही कादंबरी आपल्याला हिमनदी ,समुद्र आणि अवकाश याचा प्रवास घडवून आणते .
डॅन ब्राऊनची चोवीस तासात घडणारी एक थरारक ,उत्कंठावर्धक कथा .

Thursday, April 9, 2020

ऐवज.... संपादन .. अरुण शेवते

ऐवज.... संपादन .. अरुण शेवते
ऋतूरंग प्रकाशन 
ऋतुरंगच्या १९९३ ते २००९ या दिवाळी अंकातील काही मोजक्याच लेखांचे एकत्रीकरण करून हा ऐवज अरुण शेवते यांनी आपल्यासमोर ठेवला आहे . मान्यवरांचे लेख संपादकानी यासाठी निवडले. 
त्यात त्यांनी अनेक विभाग केले आणि त्यानुसार लेख निवडले आहेत.
 मैत्र जीवाचे या विभागात त्यांनी साहिर अमृता यांची मैत्री ..तर बाबासाहेब आंबेडकर आणि लंडनमधील त्यांची मैत्रीण एफ  यांचा संवाद ..इंदिरा गांधीनी तिची न्यूयॉर्कमधील मैत्रीण डोरोथी हिला लिहिलेली पत्रे असे लेख आहेत.
 अनुभव या विभागात बाबामहाराज सातारकर ,विश्वास पाटील.. जावेद अख्तर  यांचे लेख आहेत.
मनातल्या पावसात सुशीलकुमार शिंदे, बाबासाहेब पुरंदरे ,ना. धो. महानोर यासारख्या मान्यवरांनी आठवणी जागविल्या आहेत .
खूप प्रसिद्ध अश्या व्यक्तींचे लेख अनुभव आपल्याला या मोठ्या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतात .
यात किशोरी आमोणकर,दीप्ती नवल आहेत.  राजीव सोनिया गांधींची प्रेमकहाणी आणि शोभा गुर्टू यांचा संसार ही वाचायला मिळतो. उस्ताद झाकीर हुसेन ,हेमामालिनी आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस सांगतात तर  डॉ. रघुनाथ मालशेकर, अण्णा हजारे ,शबाना आझमी ,पंडित जसराज  माझं जगणं माझी भूमिका यामध्ये दिलखुलासपणे व्यक्त होतात .
६७५ पानांचे मोठ्या बांधणीचे हे पुस्तक म्हणजे नावाप्रमाणेच ऐवज आहे . असे पुस्तक संग्रही असायला हवे . पुस्तकाची किंमत हजार रुपये आहे . पण किमतीच्या मनानं हा ऐवज नक्कीच मोठा आहे .

Wednesday, April 1, 2020

जंगल आणि माणूस

जंगल आणि माणूस 
हातात मोबाईल आणि तोंडात चिरुट ठेवून शेरखान अंकल हत्तीच्या पुढ्यात उभा राहिला. त्याचा आवेश पाहूनच अंकल समजून गेला आज शेरखानचा संध्याकाळचा प्रोग्रॅम लवकरच झालेला दिसतोय. त्याने काही न बोलता आपला तंबाखू भरलेला खास बांबू बाहेर काढून शिलगावला आणि जोरदार दम मारला.
"काय झाले शेरु ..."?? त्याने  हवेत धूर सोडत विचारले.
एरव्ही शेरू म्हटल्यावर कधीही न चिडणारा शेरखान आज मात्र भडकला.
"शेरू बोलू नकोस .. शेरखान आहे मी.या जंगलाचा 
राजा आहे ... "तो चिडून म्हणाला 
"असशील.. पण मी तुझ्या बापालाही अशीच हाक मारायचो . आणि तुला राजाही मीच बनवले आहे  ..अंकल सहज स्वरात म्हणाला.. तू कामाचे बोल"
"हे बघ... त्या रशियात म्हणे आपले बांधव आणि जेष्ठ बंधूना रस्त्यावर मोकाट सोडले आहे . माणसे घराबाहेर पडू नये म्हणून ... पाचशे सिह म्हणे सोडले आहेत .." असे म्हणून मोबाईलमधील चित्र त्यास दाखविले .तो मोबाईल त्याने जंगलात फिरणाऱ्या माणसाकडून चोरला होता.
ते पाहून अंकल खो खो हसू लागला.."बघ..उगाच का मी तुला शेरू म्हणतो ...अरे या जगात पाचशे सिंह राहिले नाहीत तर  रशियाकडे किती  असतील..."??
"तरीही मानवाला घाबरविण्यासाठी आपल्या बांधवांचा वापर करणे चुकीचे नाही वाटत तुला ... .."शेरखान चिरुटचा मोठा झुरका मारीत म्हणाला.
"पण गरज काय ..माणसांना घाबरवायची ...."?? अंकलने सोंडेने डोके खाजवीत विचारले.
"तो कोणतातरी नवीन रोग निर्माण झाला आहे जगभरात .. त्यावर इलाज नाही म्हणतात. म्हणून लोकांनी घराबाहेर पडायचे नाही असे सांगितले गेलेय.." शेरखान मोबाईलमध्ये पाहत म्हणाला .
"आणि ही माहिती तुझ्याकडे कशी... .."??अंकलने आश्चर्याने विचारले 
"तो चतुरसिंह कोल्हा आहे ना .. त्याला सर्व माहितीय . त्याला हा मोबाईलही चालवता येतो.माझ्यातली थोडी  शिकार देतो मो त्याला . आणि शिकून घेतो ... "शेरखान हसत डरकाळी देत म्हणाला .
"अरे वा... खरा राजा शोभतोस.तरीच विचार करतोय . जंगलात माणसे दिसत नाहीत.त्या दिवशी आपला  राम माकड ही सांगत होता.. गावातली माणसे घराबाहेर पडत नाहीत. पोलीस सगळीकडे आहेत.त्याने तर एकाच्या केळीच्या बागेत धुडगूस घातला तरी कोण बाहेर आले नाहीत . इतके मानव घाबरले का..एका रोगाला...."??  अंकल मोठा झुरका घेऊन म्हणाला 
"अंकल..हे तर काहीच नाही.या मानवाचे एक आहे.. जरा काही असे झाले की ताबडतोब मांसाहार सोडणार . कोंबड्या खाणे सोडणार आणि सर्व व्यवस्थित ..छान चालू असेल तर शिकारीला येणार.. मिळेल त्या प्राण्यांची शिकार करणार .ह्या मानवाची अक्कल वाढत गेली तसतसा तो बेसिक गोष्टी विसरू लागला . उठता बसता एकमेकांना मिठ्या काय मारतात .. गालाला गाल काय लावतील .. एकमेकांना घास काय भरवतील... बरे जेवण अन्न तरी व्यवस्थित शिजवून खातील तर शपथ ... हल्ली जेवणात ही वेगवेगळे प्रयोग चालू झालेत त्याचे ... जगातील प्रत्येक प्राणी कीटक किडे हे खाण्यासाठीच आहेत असे त्याला वाटते ... स्वच्छता पाळत नाही .. गेली कित्येक शतके आपण जंगलाच्या कायद्याप्रमाणेच वागतो . भूक लागेल तेव्हाच शिकार करा . अन्न जपून वापरा. कुटुंबाची काळजी घ्या . आपली हद्द सोडू नका .. पण हे मानव सर्व विसरून गेले आहेत . नवीन नवीन प्रकारचे अन्न.. मसाले..तयार करू लागलेत . त्यात नवीन रोग उत्पन्न होऊ लागले..."शेरखान चिडून म्हणाला.
"खरे आहे .. आणि त्याचे खापरही आपल्यावर फोडले जाते ... काय तर म्हणे कोंबड्यांपासून रोग होतो .. माकडांपासून रोग झाला .. आता तर म्हणे वटवाघळापासून रोग झालाय .ती तर बिचारी हल्ली रात्रीही गुहेतून बाहेर पडत नाहीत . त्यांना अन्न पुरवायची जबाबदारी त्या अण्णा गिधाडांने घेतलीय .."अंकल तोंड बारीक करून म्हणाला .
"अरे रे ...म्हणजे हे मानव चूक करतात आणि त्याचे खापर आपल्यावरच का ....??  आपल्या जंगलातील आदिवासी बरे ... सकाळी बाहेर पडणार जंगलात फिरून सुकी लाकडे सरपणासाठी गोळा करतात . जरुरी आहे तेव्हडीच शिकार करतात . ओढ्याचे स्वछ वाहते पाणी पितात . योग्य झाडांचा रस मध गोळा करतात .संध्याकाळी गाणी गात सामूहिक नृत्य करत ईश्वराचे आभार मानतात . कसले वादविवाद नाहीत ..मोबाईल नाही ..आजारपणही नाही .मान्य आहे शहरातील संस्कृती वेगळी आहे पण आजचा विचार करून जगा ना ....?? माझ्या मुलांसाठी माझ्या नातवासाठी मला दिवसरात्र काम करायलाच हवे .. हे कशासाठी ....?? मग त्यात शरीराकडे लक्ष नाही ,काहीही अरबट चरबट खाणे आणि वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण देणे आलेच ...  का नाही मानव आपला वेळ आपल्या कुटुंबासाठी देऊ शकत ....?? आपण आपली संध्याकाळ कुटुंबासोबत घालवतोच ना .....?? शेरखान आता रागावून डरकाळ्या फोडू लागला ..
खरे आहे तुझे शेरू ...आता तरी या बंदिवासात मानवाला स्वतःच्या शरीराचे कुटुंबाच्या स्वास्थ्याचे ,प्रेमाचे महत्व कळेल ... अंकल त्याच्या पाठीवर आपली सोंड प्रेमाने फिरवू लागला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

गंधर्वगाथा.... भा. द. खेर

गंधर्वगाथा.... भा. द. खेर 
विहंग प्रकाशन 
वयाच्या नव्वदाव्या वर्षी लेखकाने ही गंधर्वगाथा लिहिली . बरीच वर्षे त्यांच्या मनात हे पुस्तक लिहायचे होते .लेखक स्वतः बालगंधर्वांच्या परिचितांमध्ये होते. बालगंधर्व स्वतः निवेदन करतायत अशी या कादंबरीची मांडणी आहे . यात त्यांनी छोट्या छोट्या भागातून बालगंधर्वांचे चरित्र स्पष्ट केले आहे ..लोकमान्यांनी गाणे ऐकून छोट्या नारायणाला बालगंधर्व दिलेली पदवी . तर शाहू महाराजांच्या शिफारशीने त्यांना किर्लोस्कर नाटक मंडळीत दिलेला प्रवेश त्यांच्याच तोंडून ऐकायला छान वाटते . माणूस केवळ अंगातील कलागुणांने मोठा होत नाही तर त्याला शिस्त आणि संस्कार ही असावे लागतात . हेच ही कादंबरी वाचून स्पष्ट होते .यात त्यांच्या कलाजीवनातील शंभराहून अधिक प्रसंग गुंफले आहेत .