Sunday, August 29, 2021

कालचक्राचे रक्षक....अश्विन सांघी

कालचक्राचे रक्षक....अश्विन सांघी
अनुवाद....आरती देशपांडे
एका प्रकाशन 
गेल्या वर्षभरात जगातील प्रमुख नेत्यांच्या हत्या होत होत्या. त्यात ब्रिटिश परराष्ट्र सचिव ,जर्मन चॅन्सलर, अमेरिकेचे अटर्नि जनरल,जपानचे पंतप्रधान यांचा समावेश होता .त्या चारही घटनांमध्ये मारेकऱ्यांनी कोणतीही सुरक्षा यंत्रणा भेदली नव्हती. त्यांच्या अंगावर कोणतीही जखमेची खूण नव्हती. त्यांच्या पोटात ही काही सापडले नव्हते . पण त्यांचा मृत्यू एकाच पद्धतीने झाला होता.अंगाला खाज सुटणे,चेहरा सुजणे . घाम येणे.शेवटी सापाच्या विषाने मृत्यू.त्यांच्यात दुसरा एक समान दुवा होता ..ते उदारमतवादी होते. मुस्लिम समुदायाविषयी त्यांच्या मनात सॉफ्टकॉर्नर होता.
माईलेशियन लॅबने विजय सुंदरमला नोकरीची ऑफर दिली. विजयने दिल्ली आयआयटी मधून पीएचडी केली होती. माईलेशियन लॅब ही  प्युयर सायन्स क्षेत्रात गुप्त संशोधन करणारी कंपनी होती. तिचा प्रमुख प्रकल्प उत्तराखंड मध्ये आहे.हजार एकरच्या प्रकल्पात पन्नास एकरवर  इमारत आणि प्रयोगशाळा होती तर बाकीचे घनदाट जंगल होते.विजयने क्वांटम थियरीवर पीएचडी केली होती. त्याच्या संशोधनाचा फायदा लॅबला होणार होता.माईलेशियन लॅब अतिशय गुप्तता पाळणारी कंपनी आहे. तिथे केवळ दहा संशोधक आणि पंचवीस कर्मचारी काम करतात..तिथे काम करणारी व्यक्ती बाहेरच्या जगाशी संपर्क साधू शकत नाही .तिथे अतिशय अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असून प्रत्येकावर पाळत ठेवली जाते.
आयजी 4 ही चीन रशिया भारत अमेरिका या देशातील गुप्तचर प्रमुखांनी एकत्र येऊन निर्माण केलेली संस्था आहे .यात फक्त चारच देशाचे प्रमुख गुप्तहेर अधिकारी आहेत. जगातील प्रमुख नेत्यांच्या हत्येमागे माईलेशियन लॅबचा हात आहे असा त्यांना संशय आहे.त्यानी विजयला माईलेशियन लॅबमध्ये नोकरी स्वीकारण्यास भाग पाडले .
अबू अहमद अल-मफराकी हा कट्टर मुस्लिमवादाचा पुरस्कर्ता. त्यानेच जगातील प्रमुख देशात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत . अमेरिकेने त्याच्यावर पाच कोटी डॉलरचे बक्षीस लावले आहे .
आता विजयला त्या अभेद्य सुरक्षा यंत्रणेचा भेद करून खरा प्रकार समजून घ्यायचा आहे . असे कोणते संशोधन करतात ज्याचा संबंध प्रमुख राजकीय नेत्यांच्या हत्येशी आहे...??  कोणते देश आणि कोण व्यक्ती यात सामील आहेत...?? जगातील काही देशात अचानक भूकंप का होतात...?? हवामानात कोणतेही बदल नसताना रस्ते का खचतात.…?? बुद्धांनी कलचक्राचे कोणते रहस्य सांगितले आहे ..?? आणि आता ते रहस्य कोण वापरते आहे ...?? स्वामी ब्रम्हांनंद कोण आहेत...?? त्यांचे खरे वय किती आहे ..?? अध्यात्म आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध ते कसे जोडतात ....?? या प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास हे पुस्तक वाचायलाच हवे.
अश्विन सांघी पौराणिक घटना ,इतिहास आणि वर्तमान काळ यांचा सुंदर मिलाफ आपल्याला रंजकपणे समजावतात. हिंदू ,मुस्लिम,बौद्ध धर्माचा त्यांनी प्रचंड अभ्यास केलाय हे  लिखाणात दिसून येतो. त्याचसोबत त्यांनी या सर्वांना विज्ञानाची जोड दिली आहे .

Wednesday, August 25, 2021

सिंडिकेट... निरंजन ओक

सिंडिकेट... निरंजन ओक
पनवेल लॉकअपमध्ये कमला या तरुणीलाअटक करून आणले होते.वेश्या व्यवसाय करण्याचा तिच्यावर गुन्हा होता. पण ती ओरडून सांगत होती की ते आरोप खोटे आहेत. शेजारच्या कोठडीत येडा भास्कर या कुप्रसिद्ध गँगस्टरला ठेवले होते.ठाण्याचे इंनचार्ज राणे एक भ्रष्टाचारी ऑफिसर होते.त्यांनी कोठडीत येडा भास्कर चा एन्काऊंटर केला.आणि नंतर त्याने कमलावर अत्याचार केले. ती मृत आहे असे समजून तिचा देह फेकून दिला पण ती बचावली पण त्यानंतर तिला आपला नवरा गमवावा लागला . पुढे ती ठाण्यात एका अनाथाश्रमात राहू लागली. पण दोन वर्षांनी पुन्हा ती राणेंच्या नजरेत आली..आता पुढे काय ....??
मुंबई गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या क्राईम सिंडिकेटमध्ये अडकली होती.गुन्हेगारीचे प्रमाण अचानक वाढले होते.यामागे कोण आहे याचा तपास लागत नव्हता म्हणून मुख्यमंत्र्यांनी इन्स्पेक्टर सावंत याना मुंबईत बोलावून घेतले होते.मुंबईतून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करायची जबाबदारी सावंतवर होती.
अब्दुल कसाई मुंबईच्या गुन्हेगारीतील राजा होता. पण त्याच्याविरुद्ध एकही पुरावा पोलिसांकडे नव्हता. तोच सिंडिकेट चालवतो असा संशय होता.येडा भास्कर हाच अब्दुल कसाईचा माणूस होता.
कमला येडा भास्करच्या एन्काऊंटरची आय विटनेस होती. इन्स्पेक्टर राणे तिला शोधतील का ??? आता कमला त्यांना कशी सामोरी जाईल.इन्स्पेक्टर सावंत मुंबईला अब्दुल कसाईच्या जाळ्यातून मुक्त करतील का ...??
एक सरळ क्राईम स्टोरी

Sunday, August 15, 2021

बहिर्जी ..स्वराज्याचा तिसरा डोळा

बहिर्जी ..स्वराज्याचा तिसरा डोळा
लेखक.ईश्वर त्रिंबकराव आगम
शिवरायांच्या अनेक शिलेदारांविषयी आपण वाचले आहे. त्यांचा पराक्रम अनेक मालिकेतून.. चित्रपटातून पाहीला आहे. बहिर्जी नाईक हे नाव आपण नेहमी ऐकतो. महाराजांचा अतिशय विश्वासू साथीदार .लहानपणापासूनच सोबती. गुप्तहेरखात्याचा प्रमुख.
महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत त्याने प्रमुख भूमिका बजावली होती. पण या शिलेदारांविषयी फारच कमी बोलले जाते. त्याचा विस्तृत पराक्रम कोणालाच माहीत नाही. इतिहासात त्याच्याविषयी फारच कमी लिहिले गेले आहे . कदाचित हेच त्याचे जातिवंत गुप्तहेर असण्याचे लक्षण असावे.
अश्या बहिर्जी नाईकची माहिती लेखकाने या पुस्तकात आपली कल्पनाशक्ती वापरून लिहिली आहे. हे पुस्तक दोन भागात लिहिणार असल्याचे लेखक स्पष्ट करतो . त्यातील हा पहिला भाग.
यात आपल्याला बहिर्जी नाईकचे बालपण कळते. त्याचा स्वभाव ,त्याचे मित्र. याची माहिती मिळते.
बहिर्जी  जाधव रामोशी जातीतला. अतिशय हुशार चपळ आणि काटक . त्याची निरीक्षणशक्ती अफाट होती. तो उत्कृष्ट नकलाकार होता .
शिवाजी महाराजांनी शेताची नासाडी करणाऱ्या रानडुक्कर...लांडगे... मारणार्यांना सोन्याचे कडे इनाम म्हणून देण्याचे जाहीर केले.तेव्हा बहिर्जी आणि त्याच्या मित्राने अतिशय कौशल्याने चार पाच रानडुकरे आणि दोन लांडगे मारून जिजाबाईंकडून इनाम घेतले आणि नंतर आपल्या निरीक्षणशक्तीची कमाल शिवाजी महाराजांना दाखवली . त्यांनी खूष होऊन बहिर्जीला आपल्या मित्रमंडळीत सामील करून घेतले .तेव्हापासून त्याने स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेत मोलाचे योगदान दिले.
पुस्तक छान आहे पण बहिर्जी नाईकांच्या कामगिरीची विस्तृत माहिती मिळत नाही .

Friday, August 13, 2021

दि रोझाबल लाइन... अश्विन सांघी

दि रोझाबल लाइन... अश्विन सांघी
अनुवाद…..संकेत दि. लाड
वेस्टलँड पब्लिकेशन लिमिटेड 
श्रीनगर ,काश्मीर 2012
जुन्या श्रीनगर मधील कान्यार जिल्ह्यात असलेल्या रोझाबल कबरीमध्ये युझ असफ नावाच्या इसमाचे शव असल्याची माहिती त्या माहिती फलकावर होती. स्थानिक कागदपत्रात ही कबर इसवी सन ११२ पासून असल्याचे दाखले होते. रोझाबलचा अर्थ प्रेषितांची कबर असा होतो. ज्यू प्रथेनुसार युझ असफची शवपेटी पूर्व पश्चिम अक्षांवर ठेवलेली होती.शवपेटीजवळच असफच्या पावलांचे ठसे होते.त्यावर काही खुणा होत्या.क्रुसावर चढविताना ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांच्या त्या खुणा असाव्यात.असे वाटते की असफला क्रुसावर चढवून ठार मारले होते.संपूर्ण आशियात अशी पद्धत कधीच वापरली गेली नव्हती.कदाचित असफला दूरच्या देशातून इथे आणले असावे.
मक्का सौदी अरेबिया 2012
गालिबने दुसऱ्यांदा मक्केला आला होता. दोन्ही वेळा त्याने सर्व विधी पूर्ण केले होते. लष्कर- ए-तोयबा अर्थात पवित्रांचे सैन्य नावाची संघटना काश्मीरमध्ये जिहाद लढत होती.जगभरातील गुप्तचर संघटना यावर लक्ष ठेवून होत्या .पण त्यांना माहीत नसलेली एक गोष्ट लष्करकडे होती.त्यांनी एक अंतर्गत अतिविशिष्ट गट निर्माण केला होता .लष्कर-ए-तलतशार नावाचा हा गट म्हणजे फक्त तेरा जणांचे सैन्य होते. गालिब या गटाचा नेता होता.
येशू ख्रिस्ताचेही बारा अनुयायी होते आणि येशू त्यांचा नेता होता.
लंडन 2012
लंडन विद्यापीठाच्या ग्रंथालयात बार्बरा पॉलसन भगवतगीता  ग्रंथ शोधत होती.प्राध्यापक टेरी ऍक्टन याना तो हवा होता.नेहमीच्या जागेवर त्या पुस्तकाच्या जागी एक खोके ठेवले होते. आश्चर्यचकित होऊन तिने ते खोके उघडले तेव्हा त्यात प्राध्यापक टेरी ऍक्टनचे शीर होते .
वझिरीस्थान अफगाणिस्थान 2012
त्या डोंगराळ प्रदेशातील एका गुहेत सुंदर गालिच्यावर तो बसला होता. सफेद पगडी,पांढरी लांब दाढी,लष्करी जॅकेट आणि चालताना आधारासाठी वेताची  छडी असा त्याचा अवतार . त्याचे बोलणे सौम्य होते. वर्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी त्याच्या संघटनेने स्वीकारली होती. आता त्याही पेक्षा भयानक योजना त्याच्या डोक्यात आकार घेत होती. ती योजना अविश्वसनीय आणि भयंकर होती. त्या व्यक्तीचे नाव होते ओसामा बीन लादेन .
व्हॅटिकन सिटीतील अल्बर्टो कार्डिनल व्हॅलेरिओ यांच्या सुचनेनुसार ओडिपस ट्रस्ट मधून  इझाबेल मडोना ट्रस्टमध्ये एक कोटी डॉलर ट्रान्सफर केले गेले. इझाबेल ट्रस्टचा प्रमुख लाभधारक होता ओसामा बीन लादेन
2012 तील प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला जगातील वेगवेगळ्या शहरात भयानक दहशदवादी हल्ले झाले . हे हल्ले जैविक ,रासायनिक, स्वरूपाचे होते . याहून ही मोठा हल्ला 21 डिसेंबर ला होणार होता . त्यासाठी लागणारा अणुबॉम्ब गालिबच्या नेतृवाखाली प्रवास विविध देशांच्या सीमा ओलांडून प्रवास करत होता .
लेखकाने या पुस्तकात अनेक पात्रे निर्माण केली आहे. हे पुस्तक आपल्याला विविध देशात आणि विविध काळात घेऊन जाते . येशूच्या क्रुसावर चढविण्याच्या प्रसंगाचे वर्णन करते. इसवीसन 12 ते 2012 या कालखंडात ही कादंबरी फिरते.येशू पुनर्जन्मानंतर भारतात आला आणि त्याची वंशावळी आजही अस्तित्वात आहे याचा शोध काहीजण घेत आहेत.
सुरवातीपासूनच कादंबरी वेगवेगळ्या प्रसंगात विखुरली जाते मग ती हळू हळू एका तुकड्यात एकत्र होत जाते. शेवट च्या काही पानांमध्ये कादंबरीची कथा स्पष्ट होते सर्व शंकांचे निरसन होते . पण तो पर्यंत आपण श्वास रोखून ,उत्कंठा मनात ठेवून वाचत जातो.

Friday, August 6, 2021

अघटित.... संदीप दांडेकर

अघटित.... संदीप दांडेकर 
राफ्टर पब्लिकेशन 
हा एक गूढकथा ,रहस्यकथा संग्रह आहे .काही कथा अस्वस्थ करणाऱ्या आहेत.
विहीर या कथेत  सतेंद्र हा जिल्हाधिकारी विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. माझा मुलगा जिवंत आहे का ...?? असे रोज विचारणारा बाप एके दिवशी माझा मुलगा मेला का असे विचारतो आणि त्यामागची कारणे ऐकून सतेंद्र सुन्न होतो.
रक्षण या कथेत दोन वाघांची झुंज आहे .त्यांचा संबंध निलेशशी आहे. हे वाघ ज्या गावात आहेत त्या गावातच निलेशचा जन्म झाला होता.पण निलेशला गावविषयी आत्मीयता नाही .योगायोगाने तो पुन्हा गावात आला आणि एक वाघ त्याच्या स्वप्नात आला. नंतर त्या वाघाने निलेश वर हल्ला केला पण अचानक दुसऱ्या वाघाने त्याचे प्राण वाचविले .
लिव्ह इन ही एक वेगळी कथा आहे . गैरसमजातून शत्रू बनलेले दोन मित्र आयुष्यातील उत्तरार्धात एकत्र येतात अशी थोडी वेगळी कथा .
समय नावाची विज्ञानकथा भविष्यकाळातील अंतराळ वसाहतीतील एक मानव भूतकाळात जातो आणि त्याचे परिणाम काय होतात यावर आहे . कथा थोडी किचकट आहे .
खोली ही गूढकथा . अनेक वर्षे बंद असलेल्या वाड्याच्या एका खोलीत प्रवेश केल्यावर काय घडते...?? त्यातून कोणती रहस्य बाहेर येतात ..??
मिती नावाच्या विज्ञानकथेत अजिंक्य गुप्ते हा अंतराळवीर अभिनेत्री दीपिकाला पत्र लिहून आपले अंतराळातील अनुभव सांगतो .
अश्या अजून कथा आहेत. प्रत्येक कथा नाविन्यपूर्ण आहेत .

Wednesday, August 4, 2021

रहस्य सांकेतिक चिन्हांचे ....सुनील वाईकर

रहस्य सांकेतिक चिन्हांचे ....सुनील वाईकर 
Amazon. in
विक्रमगढ हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटे गाव. पूर्वी ते संस्थान होते. पण स्वातंत्र्यानंतर देशात विलीन झाले .व्यंकटराव देसाई हे त्या संस्थानचे वंशज .तीनशे वर्षांपूर्वीचा आपला जुना वाडा सोडून आता ते दुसरीकडे राहतात . जुन्या वाड्याविषयी काही दंतकथा गावात पसरलेल्या आहेत.व्यंकटरावांची आजी अचानक त्या वाड्यातून नाहीशी झाली. म्हणूनच तो वाडा सोडून सर्व दुसरीकडे राहायला आले.
त्या वाड्यात एक आरसा होता. त्यावर अनेक चिन्ह कोरली होती. त्या चिन्हांचे रहस्य आणि अर्थ कोणालाच माहीत नव्हता आणि त्या वाड्यात गेलेला पुन्हा परत येत नव्हता म्हणून कोणीही त्या वाड्यात फिरकत नव्हते.
व्यंकटरावाना दोन मुले दोन मुली नातवंडे असा भला मोठा परिवार होता . दर दिवाळी आणि उन्हाळ्यात सर्व परिवार एकत्र येत होता. 
यावेळी मुलांनी कुतूहल म्हणून वाड्यात प्रवेश केला .आरश्यातील चिन्हांचे त्यांना आकर्षण वाटले आणि त्यांनी त्या चिन्हांचा अभ्यास करण्याचे ठरविले. पण तो प्रवास धोकादायक होता. यात काहीजणांच्या जीवावर  बेतणार हे नक्की होते.
पण काय आहे त्या आरश्यावरील चिन्हांचे अर्थ आणि त्यातून काय उलगडणार आहे ...?? 
एक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी कादंबरी.
कादंबरी छोटी आणि आटोपशीर आहे. धक्कादायक वळणे नाहीत. त्यामुळे फार धक्के बसत नाहीत .