Sunday, June 30, 2019

एक वारी अशी ही

एक वारी अशी ही
तसा तो कोणाच्याही लक्षात येण्यासारखा नव्हताच . कधी आला...??  काय करतोय...?? याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. उत्सव जवळ आलेला आणि जो तो त्या उत्सवाच्या गडबडीत होता.अश्यावेळी त्याच्याकडे कोण लक्ष देईल....???
त्यात तो होताच तसा. काळाकुट्ट रंग .. बुटका...डोक्यावर पांढरी टोपी...सदरा आणि कळकट लेंगा . कोणीतरी कपाळावर पांढरा टिळा लावला आणि बरेच दिवस राहिल्यामुळे तोही काळपट पडू लागला . देवळातली प्रत्येक काम करायला पुढे.... त्यामुळे एक आयता माणूसच फुकटचा कामाला मिळाला होता.तोही सकाळी उठल्यापासून पळत असे कधी कधी उभ्याउभ्यानेच जेवत असे.हल्ली भक्त ही त्याला ओळखू लागले होते.
उत्सवाला खूप गर्दी होणार म्हणून सर्व व्यवस्था उत्तम  होती.राज्यातील कानोकोपर्यातून पालखी घेऊन लाखो भक्त येणार होते . त्यामुळे सुरक्षा व्यवस्थाही चोख होती .पण प्रत्येकावर नजर ठेवणे कसे शक्य होणार ??
त्या दोन व्यक्ती मात्र अस्वस्थ दिसत होत्या.एक वृद्ध होता तर दुसरा तरुण.बहुतेक बापलेक असावेत.डोक्यावरचे गाठोडे सांभाळत ते मंदिराकडे येत होते . अचानक तो त्यांच्या समोर आला . हातातील नाश्ताची पत्रावळ त्यांच्यासमोर धरली . दोघांनीही दचकून एकमेकांकडे पाहिले आणि पत्रावळ हातात घेतल्या.त्याचा भोळा भाबडा चेहरा पाहून त्यांनी एकमेकांच्याकडे  बघितले. "पोरा हे गोठोडे हातात धरतोस का थोडा वेळ ...."?? त्यानं हसून ते हाती घेतले .
त्या हवालदाराची काही दिवसांपासून त्याच्यावर बारीक नजर होती.त्याचे वेडसर निरागस वागणे त्याला खटकत होतेच . तसे त्यानेही आपल्या वर्दीचा रुबाब दाखवत त्याच्याकडून काही कामे करून घेतली होतीच.आज त्याला त्या दोन व्यक्तींशी बोलताना पाहून चांगलाच चमकला . त्यांनी त्याच्या हातात गाठोडे दिले ते पाहून त्याचा संशय अधिक बळकावला .इतक्यात तो उठला आणि नदीच्या दिशेने चालू लागताच हवालदार ही त्याच्या मागून चालू लागला .नदीकाठच्या एका झाडाखाली त्याने ते गाठोडे ठेवले त्यावर आपला गळ्यातील ताईत ठेवला आणि गर्दीत तो मिसळून गेला . हवालदाराने त्याला शोधण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि त्या गाठोड्याकडे वळला . त्या गाठोड्याच्या आतून घड्याळाची टिकटिक ऐकू येतात तो हादरला ताबडतोब कंट्रोलला फोन करून माहिती दिली . काही क्षणात परिसर रिकामा करण्यात आला . गाठोड्यातील बॉम्ब निकामी होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला .
देवाचे आभार मानण्यासाठी हवालदार मंदिरात शिरला त्याने मूर्ती समोर उभे राहून हात जोडले . आज कोण जाणे मूर्ती त्याच्याकडे पाहून हसत असल्यासारखी दिसली . न राहवून त्याने मूर्तीकडे निरखून पाहिले तेव्हा गोठोड्याजवळ मिळालेला ताईत मूर्तीच्या गळ्यात दिसला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, June 25, 2019

दत्तक

दत्तक
तो चिमुरडा अथर्व रश्मीसमोर कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि शांतपणे विचारले "मम्मी.... मी तुझ्या टमीमधून आलोय का ....."??
"अरे देवा ....ही शाळेची नवीन पद्धत अजून काय काय ऐकवणार आहे देव जाणे ....."रश्मी मनातून हादरली. शेजारी पेपर वाचत बसलेल्या राहुलकडे तिने नजर टाकली पण त्याने लक्षच नाही असे भासविले.
" तू टमीमधून नाही आलास तर माझ्या हार्टमधून आला आहेस.." तिने त्याला जवळ घेत सांगितले.
" खोटे .... हार्टमधून ब्लड पंपिंग होते आणि टमीमधून बेबी बाहेर येते .हार्टमध्ये जागा कुठेय मला राहायला . त्याने जोरात विचारले . तसे तिने डोळे फिस्कारले.
"हे बघ बच्चा.....जी टमीतून येतात.ती बायो चाईल्ड आणि जी हार्ट मधून येतात ती अँडोपटेड चाईल्ड "तसे राहुलने चमकून तिच्याकडे पाहिले . त्याची त्रासिक नजर पाहूनच तिने शांत हो.... अशी खुण केली ."ज्या मम्मीचे आपल्या मुलावर खूप खूप प्रेम असते ते त्यांच्या हार्टमधून आलेली असतात " त्याने समजल्याचा मोठेपणाचा आव आणला आणि  मान हलवीत तिथून निघाला.
" हे काय लावले आहेस तू ......?? राहुल कपाळावर आठ्या आणत म्हणाला ."त्याला दत्तक घेतले आहे हे आतापासूनच त्याच्या मनावर बिंबवितेस का ......"??
" कधी ना कधी त्याला सांगावे लागणार आहे. मग आतापासूनच त्याच्या मनाची तयारी करू." ती शांतपणे म्हणाली ."नाहीतरी  शेजारीपाजारी  बोलतच होते आता नातेवाईक पण बोलू लागले".
"काय बोलतात नातेवाईक .....?? कोण आहेत ते .."?? राहुलचा आवाज चढला.
"हे बघ राहुल.....हा विषय काढायचा नव्हता पण हल्ली आडून आडून विचारले जाते काय असेल ग त्याची जात ....?? त्याच्यात काही आनुवंशिक असेल ना ?? त्याचे ब्लड मॅच होणार नाही तुमच्याशी . नंतर त्याला कळले तर काय वाटेल .. ?? त्याच्या जडणघडणवर आनुवंशिकतेचि छाया नाही पडणार ना ?? त्याचा जन्म नॉर्मल झाला असेल ना ?? असे बरेच प्रश्न माहिती घेण्याच्या आणि चर्चेच्या माध्यमातून विचारले जातात . मग मी अस्वस्थ होते .अरे कितीही आधुनिक असले तरी स्त्री आहे मी . माझ्याही मनात वेगवेगळ्या शंका उभ्या राहतात ".
"अच्छा.... म्हणून हल्ली मॅडमची अथर्ववर बारीक नजर आहे तर .."राहुल हसत म्हणाला.
" काय करू ....?? हल्ली बऱ्याच गोष्टीचे मी निरीक्षण करतेय . आपण कुठे फॅमिली समारंभाला  गेलो की त्याच्या वागणुकीवर लक्ष दिले जातेय . त्याची उंची..,त्याचा रंग ...यावर बारीक आवाजात चर्चा होतेय. त्याच्या चेहरा कोणाशी जुळतो... तो किती हुशार आहे .. त्याने मस्ती केली एखादी वस्तू मोडली तर हे आनुवंशिक नाही ना याची चर्चा होतेय ..अरे कंटाळली आहे मी या सर्वाला.." ती मुसमुसत म्हणाली.
"म्हणजे तुम्ही सेलिब्रेटी आईमुल आहात तर ... त्या कोणत्या तरी फिल्मस्टारच्या मुलासारखे .."राहुल हसत म्हणाला .
तशी ती चिडली" हो ....तसेच आता वाटू लागलंय . त्याला बाहेर घेऊन गेली की हा बघ तो ...असा एकतरी शेरा ऐकू येतो "
राहुल तिच्या जवळ आला आणि मिठीत घेऊन म्हणाला" हे बघ... त्याला आपण आपला मुलगा मानून दत्तक घेतले आहे मग आता दुसर्याकडे लक्ष का द्यायचे . तो आपल्या शरीराचा भाग नसला तरी त्याला योग्यरितीने घडविण्यात आपण कमी पडणार नाही हे दोघांनाही माहीत आहे . त्याला उत्तम नागरिक बनवून आपण लोकांची तोंडे बंद करू . आणि आपल्या संस्कारामुळे तो ही आपण दत्तक आहोत हे विसरून जाईल उलट रक्ताच्या  मुलापेक्षा  जास्त प्रेम देईल "
इतक्यात अथर्व पुन्हा आत शिरला आणि जोरात म्हणाला "हे काय पप्पा मला जवळ घ्यायचे सोडून तुम्ही मम्मीला का जवळ घेतलेत ....?? आणि हो मम्मी ....मी त्या कार्तिकला स्पष्ट सांगितले की मी नेहमी मम्मीच्या हार्ट मधून आलोय  कारण तिचे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे "रश्मी ने हात पसरून त्याला मिठीत घेतले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, June 24, 2019

पर्यटनस्थळ

पर्यटनस्थळ
शेवटी मास्तर गेला ..हे एक दिवस घडणारच होते . दारूने कोणाचे भले केलेय ....
आता हा मास्तर कोण ....??तर हा आमच्या कोकणातील छोट्या गावातील उनाड फाटका माणूस. पारावर बसून लोकांना सल्ले द्यायचे . मग दोन पेग मारायचे... जेवायचे ...झोपायचे ..परत संध्याकाळी पारावर बसायचे . गावात पर्यटनाला किती संधी आहे  याचे व्याख्यान झोडायचे परत दोन पेग मारून घरी जायचे आणि आडवे व्हायचे हाच त्यांचा उद्योग. काही वर्षे मुंबईला काढली आणि आमचे खिसे साफ करून झाल्यावर परत गावात येऊन राहिलेला पक्का कोकणी .एकटा जीव आणि मनाने साफ म्हणून गावकऱ्यांचा जीव.
मला तो गेल्याचा फोन आला तेव्हा मी मित्रांसोबतच होतो. एक पेग माझाही झालेला.. म्हटले तो गेलाच आहे तर त्याच्या नावाने अजून एक पेग मारू .. नाहीतरी बऱ्याच महिन्यांनी अशी संधी मिळाली होती . बरे पार्टी अर्धवट सोडून कुठे जाणार ,...?? हा गावी .. फोन करणार्याने आधीच सांगितले होते येऊ नका आम्ही थांबणार नाही ...इथे वेळ नाही कोणाला त्याच्या शेजारी बसायला ...च्यायला हल्ली माणूस मेला तर त्याच्या अंत्ययात्रेला जाण्यासही वेळ नसतो हे मुंबईकरांचे माहीत होते पण गावातही लोकांना वेळ नाही हे पहिल्यांदाच कळले . काही न बोलता मी फोन ठेवला आणि भारतातील विविध समस्येवरील आमची अर्धवट राहिलेली चर्चा साग्रसंगीत पुढे चालू केली .तरीही मास्तरांचा विचार काही मनातून जाईना . त्याचे गावावर असणारे प्रेम .. आमच्याबद्दल वाटणारी आपुलकी . एकटा असल्यामुळे आमचे प्रोग्रॅम त्याच्याच घरी ...तेव्हडीच त्याचीही सोय  आणि बकरा ही तोच . पण आम्हाला उत्साहाने आपल्या नवनवीन कल्पना सांगायचा . आम्ही आपले हसून माना डोलवायचो आणि काम झाले की घरी निघून यायचो .
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा फोन आला . मास्तरचे अंत्यसंस्कार व्यवस्थित झाले आहेत आता दहावा आणि बारावा ही ठरले आहे . तुम्ही तेव्हाच या . पैसे घेऊन या ही न दिसणारी सूचना ही होतीच.
मी आणि विक्रमने जायचे ठरविले . जायचा दिवस ठरला आणि सकाळी स्टेशनवर विक्रमबरोबर पंधराजणांचा ग्रुप उभा असलेला पाहून मी चक्रावलो.
"ही काय भानगड आहे विकी ..."?? कोपऱ्यात घेऊन मी त्याच्या कानात कुजबुजलो.
"अरे काही नाही .. या लोकांना कोकणात फिरायचे आहे म्हटले चला आमच्याबरोबर . आमचाही चार दिवस मुक्काम आहेच . तुम्हाला ही फिरवतो . कोकणातले निसर्ग सौंदर्य पहा संस्कृती पहा . हे सर्व महाराष्ट्राबाहेरचे आहेत.माझ्या हातात चरफडण्याशिवाय काहीही नव्हते .
गावी पोचताच विक्रमने सगळ्याची राहण्याची उत्तमप्रकारे सोय केली . संध्याकाळी त्यांना एकत्र जमवून म्हणाला "उद्यापासून आपले कोकण दर्शन आणि कोकण संस्कृती अनुभवणार आहोत .सकाळी आपण गावाच्या स्मशानात जाऊन तेथील कार्य पाहणार आहोत नंतर तिथेच चहापान होईल" मी ते ऐकून हादरलो.
"अरे भाई हे काय ....?? काहीजण माझ्यासारखेच आश्चर्यचकित झाले .. कोकणात माणसाच्या मृत्यूनंतर कसे कार्यक्रम होतात त्याची माहिती आपण त्यांना देणार आहोत . त्यातून आपण कोकणातील संस्कृती आणि परंपराच दाखविणार आहोत ना .....?? कोकणातील आणि इतर राज्यातील लग्ने चालतात मग वेगवेगळे अंतिम विधी का पाहू नये "विक्रम भुवया उंचावून म्हणाला.
"मित्रा तू महान ...."असे मनात बोलतच मी हात जोडले आणि पुढे काय काय पाहावे लागेल याची कल्पना करीत बसलो.
काही वेळाने आम्ही सर्व स्मशानात गेलो. मास्तरच्या पिंडाची पूजा चालू झाली. सर्व कावळ्याच्या प्रतीक्षेत बसून राहिले . बराच वेळ झाला कावळा काही येईना . विक्रम पर्यटकांना कावळ्याचे महत्व सांगू लागला .काही वेळाने त्याने हळूच एका गावकऱ्याला खूण केली तसा  तो  उठला आणि खिशातून छोट्या पेगची बाटली काढून पिंडाजवल ठेवली .ताबडतोब एक कावळा येऊन पिंडाला शिवला. त्या मागची कारणे ही विक्रमने स्पष्ट केली . त्यानंतर सगळेच मास्तरच्या घरी गेले . त्याच्या समोरच्या अंगणात बसून चहा आणि फरसाण संपविला आणि घरी आले .
"आता आपल्याला मयताचे बारावा दिवस कसे करतात हे पहायचे आहे ..."विक्रमने घोषणा केली.
" हा xxxx.... सर्व गावाचे जेवण करून घेणार आहे का यांच्याकडून ..."मी मनात म्हटले . पण विक्रम शांत होता . मास्तरच्या बाराव्या दिवशी त्याने सकाळीच सर्वाना घरी आणले . जेवण बनवायला काही स्त्रिया जमल्या होत्या तर काही पुरुषही त्यांना मदत करीत होते . आजही कोकणात सुख दुःखात आख्खे गाव एकत्र येते .
"बघा आज गावातील प्रत्येक घरातून कोणीतरी इथे मदतीला आले आहे आणि सर्व एकत्र जेवण बनवून जेवतील. गावातील एकीचे उत्तम उदाहरण आहे हे.त्याने मृतात्म्याला शांती मिळेल" सर्व पर्यटक कुतूहलाने पाहू लागले . थोड्या वेळाने जेवण सुरू झाले . पोटभर जेवून मास्तरांच्या नातेवाईकाला पाकीट देण्याचे काम चालू झाले .
"ही एक पद्धत असते . मेलेल्या माणसाच्या परिवारावर फार आर्थिक बोजा पडू नये म्हणून सर्वजण त्याला मदत करतात .तसे प्रत्येक पर्यटकाने खिश्यातून काही रक्कम गोळा करून विक्रमच्या हातात दिली .विक्रमने ती रक्कम खिश्यात ठेवली आणि आम्ही निघालो.
रात्री फिरून आल्यावर मी विक्रमला विचारले"अरे....... त्या पैश्याचे काय करायचे ...?? विक्रम हसला "कार्य तर गावाच्या नेहमीच्या पद्धतीनुसार झाले . पण मास्तरची आपले गाव पर्यटनस्थळ व्हावे अशी खूप इच्छा होती . आज तो मेल्यावर पर्यटनाच्या दृष्टीने का होईना चार माणसे त्याच्या कार्याला गोळा केली . पण त्यांच्या पैशावर आपला अधिकार नाही . मी ते पैसे ग्रामपंचायतीत देणार आहे . पुढेमागे गावाचे पर्यटन स्थळात रूपांतर झाले तर ती रक्कम योग्य गोष्टीसाठी वापरा असे सांगणार आहे . मास्तरची ही इच्छा तरी पूर्ण होऊ दे" . असे बोलून पाठ फिरवून झोपी गेला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, June 20, 2019

कॉलिंग सेहमत..... हरींदर सिक्का

कॉलिंग सेहमत..... हरींदर सिक्का
अनुवाद.....मीना शेटे- संभू
सेहमत ही तरुण काश्मिरी मुलगी.तिचे वडील काश्मिरी तर आई पंजाबी. तिचे वडील देशभक्त . मोठ्या कष्टाने आणि सूत्रबद्ध  नियोजन करून आपले कॉन्टॅक्ट पाकिस्तानात  पसरविले आहेत. आता ते रॉ साठी पाकिस्तानातील प्रमुख हेर आहेत . त्यांनी पाकिस्तानातून बरीच माहिती भारतासाठी गोळा करून दिलीय.अचानक त्यांना कॅन्सर असल्याचे निदान होते म्हणून ते आपल्या जागी सेहमतची निवड करतात .वडिलांच्या इच्छेसाठी आणि देशासाठी ती तयार होते आणि योजनेचा पहिला भाग म्हणून पाकिस्तान लष्करातील बिग्रेडियरच्या मुलाशी लग्न करते. आता ती पाकिस्तानातील लष्करी घराण्यात राहून भारतासाठी हेरगिरी करू लागते . 1971 च्या युद्धात ती भारताला गुप्त बातम्या पुरविते त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवायला फार उपयोगी पडते .पण त्यासाठी तिला काय काय करावे लागते ते खरोखर वाचण्यासारखे आहे . एका अनामिक स्त्री गुप्तहेराची कहाणी जी कधीच प्रसिद्धीच्या झोकात आली नाही . ह्या पुस्तकावर आधारित राझी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Tuesday, June 18, 2019

२३ जून ....प्रदीप दळवी

२३ जून ....प्रदीप दळवी
मनोरमा प्रकाशन
मुख्यमंत्र्यांच्या निवासात शस्त्रास्त्र पुरविणारा दलाल रॉबर्ट..देशाचे संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांची मीटिंग ठरलेली आहे .मुख्यमंत्र्यांचा आवडता नोकर कचरू फर्नांडिस त्या मीटिंगमधील सर्व बोलणी ऐकतो . तो एक माजी स्वातंत्र्यसैनिक आहे . गोवा मुक्ती संग्रामात त्याने शरीरावर गोळ्याही झेलल्या आहेत . देशाशी गद्दारी करणाऱ्या आपल्या आवडत्या साहेबांचे हे रूप पाहून तो दुखवतो आणि आत्महत्या करतो . पण मरण्यापूर्वी तो ही सर्व माहिती एका पत्रात लिहून ते पत्र एका पेपरच्या संपादकाला पाठवितो.
मधुरा एक डॉक्टर .. सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी ओपीडी मध्ये ड्युटीवर असते.तिच्याकडे ही केस येते आणि तिच्यासमोरच कचरू मृत्यू पावतो . पोस्टमार्टेम करावे अशी सूचना देऊनही नैसर्गिक मृत्यू अशी सर्टिफिकेट दिली जाते तेव्हा तिला हे प्रकरण गूढ वाटू लागते. रात्री घरी जेवताना आपल्या नवऱ्याला आणि मित्रांना ही गोष्ट सांगते .
श्रवण.. एक पत्रकार .. मधुराचा नवरा . प्रेस कॉन्फरन्ससाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जातो आणि तिथे तो त्या  रॉबर्टला पाहतो . संशय येऊन तो त्याचे फोटो ही काढतो.तो या बातमीच्या मागे लागतो आणि रातोरात पेपरमध्ये बातमी छापतो.
रसना... मधुराची मैत्रीण... एक हुशार वकील .. मधुराची सगळी कहाणी ऐकते आणि ताबडतोब तिचे वकीलपत्र घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवते . आणि कचरूचा देह पोस्टमार्टेमसाठी परत बाहेर काढायला कोर्टाची परवानगी घेते .
विरेश ..डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस .. रसनाचा नवरा.... मधुरा श्रवणचा मित्र .... आपल्या अधिकारावर तो मधुराची तक्रार दाखल करून घेतो . त्यासाठी त्याला खोट्या केसमध्ये अडकवले जाते . तरीही आपल्या कर्तव्यापासून तो ढळत नाही.
२३ आणि २४ जून या दोन दिवसात राज्याचे राजकारण ढवळून निघते . .... कसे ते प्रत्यक्ष वाचूनच कळेल .
प्रदीप दळवी यांनी अतिशय वेगवान मांडणीचे पुस्तक आपल्या समोर ठेवले आहे . एकदा वाचायला घेतले तर संपल्याशिवाय खाली ठेवणार नाही याची खात्री आहे .

फादर्स डे

फादर्स डे
"मी मेल्यावर तुझा मुलगा रडेल का ग माझ्यासाठी.." ?? त्यांनी कोपराने तिला ढोसत विचारले.
"तुमच्या जिभेला काही हाड ....?? कधीही काहीही वेळकाळ न बघता बोलायचे हे तुम्हा बापलेकानाच  सुचू शकते.."ती हाताचा फटका त्याच्या कोपरावर मारत म्हणाली.तसा तो मोठ्याने हसला.
"बघ म्हटले ना माझाच मुलगा आहे तो.. तुलाच शंका हॉस्पिटलमध्ये बदली झाला असेल म्हणून. पण त्याने वेळोवेळी सिद्ध केलय मी तुमचाच दिवटा आहे म्हणून"ते जोरात हसत म्हणाले.
" आहो ...आता त्याचे लग्न होऊन.पोरही मोठी झालीत .आता तरी हे बोलणे सोडा.कितीवेळा  बोलून दाखवणार हे ...??आता तोही सुनबाईला हेच म्हणतो ..." ती लटक्या रागाने म्हणाली.
म्हातारा म्हातारी दोघेही समुद्रावर बसून भेळपुरी खात होते." पण सांग ना तुला काय वाटते ..."?? त्याने परत प्रश्न विचारला.
"नाही रडणार ....निदान सर्वांसमोर तरी नाही रडणार ... पण आतल्या आत रडत राहील .. एकांत शोधेल. हेच तर शिकवलेत तुम्ही त्याला....?? जबाबदारी घे .दुसऱ्यांसमोर धीर सोडू नकोस .मी आहे. मी करेन सर्व .माझ्यावर विश्वास ठेवा असेच दाखवीत फिरेल तो .."ती समोरच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत म्हणाली.
"खरे आहे तुझे .. आपले कुटुंब नेहमी आपल्या विश्वासावरच जगत असते. घरातील कर्ता पुरुष असतो .तोच निर्णय घेतो . कुटुंबाला अडीअडचणीतून बाहेर काढतो . पण आयत्यावेळी त्यानेच धीर सोडला तर ...."??  बोलता बोलता तो शहारला.
"खरे आहे हो .कुटुंबात अचानक दुःखाचा आघात झाला की सगळे कोलमडून पडतात अश्यावेळी एका व्यक्तीने परिस्थितीचे भान राखून खंबीरपणे काही निर्णय घ्यायचे असतात आणि हेच गुण तुम्ही त्याच्यात उतरविले . आज तो घरात फारसा लक्ष देत नसला तरी कठीण परिस्थितीत योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात आहे . आणि हे सर्व तुमच्यामुळे आहे याचीही जाणीव आहे त्याला.."ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"काय बोलतेस ...?? कधी बोलली नाहीस मला ...?? तो आश्चर्याने म्हणाला.
"माझ्याकडे तरी कुठे बोलतोय .. पण तुमच्या नातवाशी सतत असे काही बोलत असतो तो आणि तो माझ्याकडे बोलतो ...ती म्हणाली .
"छान....म्हणजे आपले गुप्तहेरखाते खूपच प्रभावी आहे " तो तिला चिमटा काढीत म्हणाला.
"चला काहीतरीच काय ...?? निघुया आता .. सर्व आले असतील घरी .. असे बोलून दोघांनीही घराची वाट धरली.
घरी येताच सर्व त्यांचीच वाट पाहत असल्याप्रमाणे बसले होते. नेहमीसारखा तो कोपऱ्यात बसून होता . डोळे मोबाईलमध्ये होते पण कान त्यांच्याकडे होते . नातवाने एक मोठा केक आणून आजोबांसमोर ठेवला . "हॅपी फादर डे आजोबा ...."तो ओरडला.
"अरे आज फादर डे आहे आजोबा डे नाही ...."आजोबा गमतीने त्याला म्हणाले .तसा तो कोपऱ्यातून उठला आणि वडीलांसमोर जाऊन उभा राहिला . केकचा तुकडा कापून त्यांच्या तोंडात भरवून  म्हणाला" हॅपी फादर्स डे बाबा". भरल्या डोळ्यांनी त्यांनी त्याला मिठी मारली." तू ही एका मुलाचा बाप आहेस रे ... आणि हळूच नातवाला खूण केली . नातवाने केकचा एक तुकडा आपल्या वडिलांच्या तोंडात भरविला आणि मोठ्याने हॅप्पी फादर्स डे विश् केले .
त्याने आपल्या मुलाला जवळ घेतले मिठी मारून त्याच्या कानात पुटपुटले "मी मेल्यानंतर रडशील का रे ...??
"म्हणजे तुम्ही मरणार आहात का.... ?? मी कधी विचारच केला नाही याचा ....?? तुम्हाला आवडणार नाही मी रडलेले .आणि माझ्या मुलालाही नाही आवडणार ते ....त्यामुळे दुसरे काहीही मागा मी तयार आहे द्यायला ..... "काही न बोलता ते मुलाच्या डोळ्यात डोळा घालून उभे राहिले आणि हळुवारपणे म्हणाले हॅपी फादर्स डे मुला ..
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, June 16, 2019

पहिला पाऊस ....६

पहिला पाऊस ....६
नेहमीप्रमाणे पायात चपला अडकवून तो घराबाहेर पडत होता.त्याला निघताना बघून ती काळजीने म्हणाली" रोज त्या ओसाड शेतात जाऊन काय करता हो .....??  नुसते बघतच बसता ना …."??
"मग काय करू ..?? तो चिडून म्हणाला" इथे राहिलो तर बँकवाले मागे लागतील.शेतावर आले तर गप्प तरी बसतील .."असे बोलून तो शेतावर निघाला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पाऊस उशिरा येणार किंवा कदाचित येणार नाही अशीच लक्षणे दिसत होती . शेती नुसती कोरडीच होती .गावात पियाला पाणी नव्हते तर शेतीला कुठे येणार..?? कर्जाने पूर्ण वाकून गेला होता तो. एक कर्ज फेडायला दुसरे कर्ज असेच चक्र चालू होते .बायडीच्या अंगावर फक्त काळ्या मण्याची पोत राहिली होती.छोट्याला अजून काहीही कळत नव्हते .विचार करता करता शेतात कधी आलो तेच त्याला कळले नाही. हताश होऊन त्याने आपल्या उजाड शेताकडे नजर टाकली .कसली पेरणी केली होती हे ही त्याच्या लक्षात नव्हते .तसाच उकिडवा तो शेतात फतकल मारून बसला .डोक्यावच्या तळपत्या सूर्याकडे पाहून त्याने टाहो फोडला . डोळ्यातील दोन अश्रू जमिनीवर पडले ."माफ कर आई.. मी डोळ्यातील पाणीही तुला देऊ शकत नाही . असे मनात म्हणत तो रडू लागला.शेवटी तो मनाशी काही निश्चय करून उठला .
दुपार झाली तरी नवरा घरी आला नाही म्हणून ती काळजीत पडली . बरीच वाट पाहून ती शेवटी घराबाहेर पडली.आजूबाजूला चौकशी करीत शेवटी शेतात आली आणि जमा झालेली गर्दी पाहून थोडी घाबरली . तिला पाहून सर्व बाजूला झाले आणि समोरचे दृश्य पाहून तो कोसळलीच . तिचा नवरा शेतातील झाडावर लटकत होता . शेवटी पावसाने बळी त्याचा बळी घेतला होता .
गावातील लोक त्याचे शव घेऊन घरी आले . लहान पोरगा कोपऱ्यात बसून एकटक पाहत होता . अंत्ययात्रेची तयारी झाली आणि वातावरणात बदल झाला . आभाळात ढग दाटून आले . गार वारे वाहू लागले आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली . अचानक पाऊस येताच सर्व गडबडले . तिरडीसकट त्याला  उचलून घरात आणले . आलेल्या पावसाचे स्वागत करावे की पावसामुळे माणूस गेला याचे दुःख करावे हेच कोणास कळेनासे झाले. पाऊस पडताना पाहून छोटा उठला . कोपऱ्यात पांढऱ्या कपाळाने बसलेल्या आपल्या आईकडे जाऊन म्हणाला "आये पाऊस आला .. मी जाऊ भिजायला ...?? तिने काही न बोलता त्याच्या डोक्यावरून हात फिरवला "जा पोरा ह्याच पावसासाठी तुझ्या बापाने स्वतःचा बळी दिलाय...." तो पावसात जाताच ती उठली बाहेर पावसात येऊन उभी राहिली आणि सर्वांना ओरडून म्हणाली" बघता काय ...?? दरवर्षी जिवंतपणी पहिला पाऊस अंगावर घेणारामाझा नवरा आज मेल्यावरही पहिला पाऊस अंगावर घेत स्मशानात जाईल. जितेपणी पाऊस नाही पहिला निदान मेल्यावर तरी अंगावर पाऊस घेऊन जाऊ दे ...."सर्व भर पावसात येऊन उभे राहिले . चार जणांनी त्याला खांदा दिला आणि अंत्ययात्रेला सुरवात झाली . मृत्यूनंतरही  पहिल्या पावसात तो भिजला होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर