Tuesday, July 31, 2018

वीरप्पन विरुद्ध विजय कुमार

वीरप्पन विरुद्ध विजय कुमार ..... के. विजय कुमार
अनुवाद .......... डॉ. सदानंद बोरसे
राजहंस प्रकाशन
कुसे मुनिस्वामी वीरप्पन अर्थात कुविख्यात चंदनचोर आणि हस्तिदंताची तस्करी करणारा वीरप्पन. एकशे चोवीस जणांच्या हत्या करून सुमारे वीस वर्षे कर्नाटक ,तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांच्या पोलिसदलाला सतत हुलकावणी देणारा क्रूरकर्मा . तर दुसरीकडे सतत त्याच्या पाठलागावर असणारे एसटीएफचे प्रमुख विजय कुमार यांच्या लढाईची ही कहाणी .शेवटी विजय कुमार यांचा विजय झाला आणि तो क्रूरकर्मा काळाच्या पडद्याआड गेला . पण यासर्वाच्या मागे कोण होते . अनेक शूर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . कल्पनेपेक्षाही भयंकर आणि हिंदी चित्रपट ही फिका पडेल असा हा पाठलाग होता . वीरप्पनचे कुशल डावपेच आणि तितक्याच हुशारीने त्याला तोंड देणारे अधिकारी यांचे कारनामे वाचून आपण हैराण होतो . पण लक्षात ठेवा हे वास्तव आहे .

Thursday, July 26, 2018

जर्मन गुप्तचर यंत्रणा ....पंकज कालुवाला

जर्मन गुप्तचर यंत्रणा ....पंकज कालुवाला
परममित्र पब्लिकेशन
अमेरिकेच्या CIA आणि इस्त्रायलच्यामोसाद संघटनेबद्दल खूप काही ऐकतो आपण.पण दोन महायुद्ध घडवून हरलेल्या जर्मनीच्या हेरखात्याबद्दल खूपच कमी लिहिले बोलले गेलंय.कदाचित दोन्ही महायुद्धात त्यांची हार झाली आणि म्हणूनच त्यांचे हेरखाते कमकुवत असेल असे समजले गेले असेल . पंकज कालुवाला हे माझे आवडते लेखक आहेत. आंतरराष्ट्रीय इतिहासाचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे . त्यांची सर्व पुस्तके अतिशय खोलवर अभ्यास करून लिहिली गेली आहेत.त्यांच्या लेखनशैलीमुळे आपण एक थरारक घटना वाचतोय असे जाणवते. या पुस्तकात त्यांनी दुर्लक्षीत गेलेल्या जर्मनीच्या गुप्तचरखात्याविषयी खोलवर माहिती दिली आहे . अर्थात त्यात फसलेल्या मोहिमांचे प्रमाण जास्तच आहे . पण तरीही जर्मनीसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या हेरांचे कर्तृत्व दुर्लक्षित करता येणार नाही .

Tuesday, July 24, 2018

माझ्या अम्मीची गोष्ट ...हॅनन अल शेख

माझ्या अम्मीची गोष्ट ...हॅनन अल शेख
इंग्रजी अनुवाद ........रॉजर अॅलन
मराठी अनुवाद ........ वंदना कुंडेटकर
( द लोकस्ट अँड द बर्ड )
लेबेनॉन मधील एका स्त्रीची ही कहाणी आहे . तिच्या मुलीने ही कथा जगापूढे आणली . गरिबीत  दिवस काढलेल्या एक लहान मुलीचे तिच्या नकळत मोठ्या विधुर माणसाशी लग्न केले जाते . त्यापासून तिला दोन मुली होतात . नंतर तिच्यावर प्रेम करणारा प्रियकर परत तिच्या आयुष्यात येतो.मग ती पहिल्या नवऱ्याला तलाक देऊन त्याच्याशी लग्न करते . गरीब घरात वाढणाऱ्या अनेक मुलींपैकी एका मुलीची सर्वसामान्य गोष्ट आहे ही . त्यात काहीही नावीन्य नाही . कुठेही परिस्थितीशी झुंज संघर्ष नाही . त्यामुळे वाचताना मजा येत नाही .

वडापाव

वडापाव
बाहेर दंगल चालू झाल्याची बातमी बंड्याच्या ऑफिसमध्ये धडकली आणि ताबडतोब घरी निघा अशी ऑर्डर निघाली.
" Xxxx ....!.हे नेहमीच झालंय.या मुंबईत एकही दिवस सुखाने जात नाही"असे पुटपुटत बंड्याने आवरायला सुरवात केली.आपत्कालीन स्थितीत काय करायचे हे त्याच्या ऑफिसने ठरवूनच दिले होते त्याप्रमाणे आपला मोबाईल फुल चार्ज केला. कॅन्टीनमधून चार वडापाव पार्सल.. एक पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडला. स्वतःच्या गाडीचा वापर करायचा नाही असे नक्की करून तो चालतच निघाला.
अचानक दहा पंधराजणांचा  जमाव रस्त्यावर धावत आला ते पाहून तो एक बोळात घुसला आणि बंद घराच्या आडोश्याला उभा राहिला. चेहऱ्यावरचा घाम पुसता पुसता त्याची नजर त्या म्हाताऱ्यावर गेली. मध्यम उंचीचा ..काळसर वर्णाचा.. कपाळावर उभे गंध सदरा आणि खाली ढगळ पॅन्ट अश्या अवतारात तो उभा होता . नजरानजर होताच ते हसले.
" काय ....?तुम्ही ही अडकलात का बाबा ....?? नेहमीप्रमाणे बंड्यातील माणूस जागा झाला.
"नाही हो ....!! सहज फिरायला बाहेर पडलोय.इथे उभे राहून काहीतरी जाळपोळ पाहायला मिळेल म्हणून थांबलोय.त्याने तिरसटासारखे उत्तर दिले..म्हातारा चिडलाय म्हणून बंड्या गप्प बसला.
"तुम्हाला कुठे जायचे आहे ......??? परत बंड्याने विचारले.
"वैशाली नगर ...त्याने उत्तर दिले .
"चला जाऊ दोघे ....असे म्हणतात तो मुकाट्याने बंड्या बरोबर चालू लागला .
"काय झाले .....??अचानक ही दंगल जाळपोळ का...?? म्हाताऱ्याने बंड्याला विचारले.
" काय माहीत ..?? काहीतरी हवे असेल कोणाला ...नाहीतर काहीतरी लपवायचे असेल कोणापासून तरी ... हल्ली रोजचेच आहे. अगदी सहजपणे बंड्या उत्तराला .
"अरे हे सर्व 1942 पासून व्हायचे आम्ही रोज काही असेच करायचो ..पण ते सर्व स्वातंत्र्यासाठी ...आता कशाला.....? म्हातारा म्हणाला.
"माहीत नाही अजून काय हवे त्यांना ..? बंड्याने सांगितले.
" तू नाही त्यांच्यात... ?? तुला काही नको का... ?? तो म्हातारा छद्मीपणे म्हणाला.
"नको मी आहे तोच बरा आहे" बंड्याने हसत उत्तर दिले.
"तुझी जात कोणती .. ?? म्हातारा काही पिच्छा सोडत नव्हता .
"माहीत नाही ....बाबांनी कधी सांगितली नाही आणि मी कधी विचारली नाही ... तुम्हाला काय करायचे आहे ..??? बंड्या चिडून म्हणाला.
अचानक त्यांच्यासमोर जमावाने एका  बसला आग लावली आणि पळून गेले .तेव्हा इतर लोक बसमधील लोकांना वाचवायला बाहेर आले . बंड्याही धावत मदतीला गेला. थोड्यावेळाने परत तो म्हातारा बंड्याबरोबर चालू लागला.
"बाबा भूक लागली का ...?? हा घ्या वडापाव ...
" तुला रे ....?? म्हातारा काळजीने बोलला.
" माझे पोट भरले आहे तुम्ही घ्या ...
म्हाताऱ्याने वडापाव खाल्ला "छान आहे रे ..कोणी बनविला..??
"दत्तूमामाने...." बंड्याने कंटाळून उत्तर दिले.
" कोणत्या जातीचा आहे तो....?? म्हाताऱ्याचे प्रश्न चालूच .
"माहीत नाही हो..... बंड्याने वैतागून उत्तर दिले.
इतक्यात त्याच्या कानावर परिचित हाक पडली.
"अरे अव्या ....? आज येथे बंदोबस्त का ..?? सब इन्स्पेक्टर अविनाशला पाहून बंड्या ओरडला. दोघांनी आनंदाने एकमेकांना मिठ्या मारल्या.
"अरे तीन दिवस अडकलोय इथे .साला टॉयलेटला जायला वेळ नाही मी आणि चार पोलीस सांभाळतोय इथे. मोबाईल चार्जिंग करायला ही चान्स नाही कुठे". अविच्या तोंडाचा पट्टा चालू झाला."हे बाबा कोण.." ??
" माहीत नाही ...आपल्या इथेच राहतात. म्हटले दोघे एकत्र जाऊ बंड्या सहज म्हणाला .
"बघ रे बाबा ...सांभाळून ...नाहीतर मध्येच काही झाले तर तुलाच करावे लागेल सगळे.आता बॉडी ताब्यात मिळायलाही तीन दिवस लागतील .खूप गंभीर परिस्थिती आहे शहरात" अवि गंभीरपणे म्हणाला.
"हो रे ....माहितीय चल निघतो..,हा वडापाव खा ..". असे म्हणून बंड्याने त्याला वडापाव दिला.
"अरे खरेच बरे वाटले. सगळेच वांधे झालेत इथे "थोडा वेळ अवि त्या वडापावकडे पाहत राहिला "बंड्या एक काम करशील ....अनिताला सांगशील मी इथे सुखरूप आहे ते .तीन दिवस झाले तिला पाहिले नाही रे . आणि आमच्या पिल्लूची पण खूप आठवण येते . परवा वाढदिवस आहे तिचा .माहीत नाही साजरा करायला मिळेल की नाही .फोनवर बोलायलाही कसेतरी वाटते बघ .बोललो तर नाही रोखू शकणार स्वतःला"अवीच्या डोळ्यात अश्रू होते .
"अरे काळजी करू नकोस ..मी सांगेन वहिनीला" पुन्हा एकदा मिठी मारून बंड्या पुढे निघाला.
"ह्याची जात कोणती ..?? म्हाताऱ्याने खवटपणे प्रश्न विचारला .
"माहीत नाही हो बाबा ....तोच तोच प्रश्न काय विचारता..?? माझा बालपणीचा मित्र आहे तो . आम्हाला कधीच हे प्रश्न पडले नाहीत".
पुढे बस स्टँड जवळ येताच त्यांना नेहमीपेक्षा वेगळी शांतता जाणवली.
"अरे आज बसही सुटणार नाहीत का.. ??? बंड्या संतापाने उद्गारला .
स्टँड च्या एका बाकड्यावर ते  दोघे  बसून होते . मध्यमवर्गीय नवरा बायकोच असावे. बाहेरच्या राज्यातलेच होते . चेहऱयावर प्रचंड भीती. त्या दोघांना पाहून त्यांच्या जीवात जीव आला . बोलता बोलता कळले की पूर्वेकडून आले होते . मुंबई पाहायला बाहेर पडले आणि अडकले .बंड्याने आपल्याकडील वडापाव त्यांच्या हातात दिले . भावनिक होऊन त्यांनी बंड्याला हात जोडले . अविला फोन करून बंड्याने त्याला सर्व कल्पना दिली आणि त्यांना अविकडे पाठविले.
"अरे कोण होती ती ...?? कोणत्या जातीची ....??
तसा बंड्या खवळला"ओ बाबा... वयाचा मान राखतोय म्हणून काहीही बोलता का... ??? अडचणीत असलेल्या माणसांची त्यांना जात विचारून मदत करू का ...??? तसा म्हातारा हसला.
इतक्यात वैशाली नगर आले . एक देवळपाशी आल्यावर म्हातारा थांबला "आले माझे घर ..इथेच राहतो मी ....
"इथे या देवळात ...??? बंड्या आश्चर्याने म्हणाला.
"काय हरकत आहे ..??? मी इथेच राहतो कधी कधी बाहेर पडतो तेव्हा तुझ्यासारखी माणसे भेटतात निस्वार्थीपणे मदत करणारी मग वाटते या जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे .बघ ना इथे एक जण आग लावतो तर दहाजण विझवायला येतात . एक जण रस्त्यावरील दुकाने बंद करून लोकांचे खायचे वांधे करतो तर दुसरा स्वतःचे अन्न दुसर्यांना देतो . एकजण दुसऱ्यांची घरे जाळायला येतो तेव्हा दुसरा स्वतःचे घर सोडून ते वाचवायला येतो . आणि मुख्य म्हणजे कोणी कोणाची जात विचारात नाही . हे खूपच आशादायी चित्र आहे ना ...??? असे बोलून बंड्याच्या डोक्यावर हात ठेवून तो मंदिरात शिरला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, July 22, 2018

वारी

"मला वारीला जायचंय......"तिने त्यादिवशी घरात जाहीर केले.अर्थात विचारणे तिच्या स्वभावात नव्हतेच. ती निर्णय घ्यायची.
"अग पण अचानक वारीचे खूळ कसे डोक्यात शिरले तुझ्या...."?? तिच्या आईने आश्चर्याने विचारले.
"मला त्यांचा अभ्यास करायचा आहे . त्यांचे मॅनेजमेंट पहायचे आहे. शिकायचे आहे.कशी एव्हडी माणसे दूरवर चालत डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठलाला भेटायला येतात..?? काय असते त्यांच्या मनात..???कसली भक्ती आहे ही ...?? सर्व ठिकाणी ऍडजस्ट करत राहतात .कोणावर राग नाही नि कोणाचा निषेध नाही...""तिने आईला उत्तर दिले.
" हो ग....!! मलाही पंढरपूरला वारीतून जायची खूप इच्छा आहे .पण तुझ्या आजीचे कोण करेल याची काळजी.पण तू जा... संधी सोडू नकोस".आईने थोड्या दुःखी स्वरात तिला म्हटले.
दुसऱ्या दिवशी तिच्या माहेरून फोन आला भावाची तब्बेत बिघडली आहे येऊन जा .गेली दोन वर्षे ती सासूबाईंना सोडून गेली नव्हती आज अचानक असे झाले म्हटल्यावर थोडी घाबरली.
ईतक्यात ती म्हणाली"आई ...जा तू मामाकडे .मी पाहीन एक दिवस आजीकडे ..पण एक दिवस फक्त ...
हिने काळजीने म्हटले "अरे तिचे करणे जमेल का तुला....??  तिच्या सवयी ...खाणे ...औषध करशील का ग तू ....??
"तू काही काळजी करू नकोस... मी पाहेंन तिला .तिने आईला आश्वासन दिले.तशी ही तिला घेऊन सासूबाईंच्या खोलीत शिरली. खरे तर तीही थोडी घाबरलीच होती ....आजीच्या खोलीत ती सहसा जात नसे किंबहुना टाळतच असे.पण आता अंगावर आलेच तर करावे लागणारच ना ... . आजी पलंगावर झोपून होती . तिने दोघींकडे पाहिले . बऱ्याच दिवसांनी नातीला पाहून तिच्या चेहऱ्यावर निरागस हास्य फुलले .तिने सवयीप्रमाणे आजीला हाय केले तर आजीनेही नातीला थंप्सउप करून उत्तर दिले . हिने दोघीना जरुरीच्या सूचना केल्या आणि बाहेर पडली.
सकाळी नेहमीप्रमाणे तिला जाग आली. आईला हाक मारताच ओ आली नाही तेव्हा तिला कालचे आठवले.आजीची आठवण येताच ती अंथरुणातून उठली आणि धावत आजीच्या खोलीत शिरली . घाणीचा वास येताच ती समजून गेली.बिछान्यात आजी ओशाळवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होती . लाजेने तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.
हिने ते पहिले "अरे आजी.. सॉरी ...मी उठलेच नाही. पण आता आलेय ना.... चल मस्तपैकी फ्रेश होऊ . आज तुझी केयर टेकर बदलली आहे थोडे ऍडजस्ट करून घे .असे म्हणत तिला बहुलीसारखे उचलून घेतले आणि बाथरूम मध्ये घेऊन गेली .
"चल आज मस्तपैकी शॉवर घे तू ...मी तुझ्यासाठी गाणे म्हणते" असे म्हणत शॉवर चालू करून गाणे गुणगुणत तिला आंघोळ घातली.नेहमी बिछान्यावर स्पंज घेतलेल्या आजीला हे सर्व आवडले. गरम पाण्याच्या धारा तिच्या चित्तवृत्ती आनंदी करून गेल्या . छानपैकी आंघोळ झाल्यावर हिने परत तिला उचलून बाहेर आणले ."किती बारीक झालीस तू ...काहीतरी खात जा चमचमीत... अजिबात वजन नाही तुला ..डायटिंग करते  का या वयात...?? की सून काही देत नाही ..." असे काही बडबडत तिने खुर्चीत बसवले आणि तिला तयार केले .यावेळी आजीही खुश होती . बऱ्याच वर्षांनी पावडर आणि परफ्युम वापरला होता. मग बिछाना बदलून खोली स्वछ करून तिने तिला बेडवर ठेवले .
"चल आता आपण नाश्ता करू ..मी तुझ्यासाठी पास्ता करते.. असे म्हणतात आजीने खट्याळपणे डोळे मिचकावून होकार दिला .  तिनेही आपल्या पद्धतीचा पास्ता बनवून आजीला भरविला . आजीने तिला पेपर वाचून दाखवायची खूण केली.हिला बऱ्याच वर्षांनी पेपर वाचायची संधी मिळाली.अडखळत का होईना तिने महत्वाच्या बातम्या आजीला वाचून दाखविल्या मग तिला औषधें देऊन स्वतःची तयारी करायला गेली . बाहेर आली तेव्हा आजी शांतपणे झोपली होती . इतक्यात आईचा फोन आला. पास्ता दिला म्हटल्यावर ती रागावली पण नंतर हसू लागली . जेवण साधे दे असे बजावून फोन ठेवला . मग हिनेही साधे वरण भात केले पापड तळले, आणि आजीला भरवत स्वतःही तिच्या बरोबर जेवली .पहिल्यांदाच केलेल्या वरण भाताची चव तिला छानच वाटत होती .हसत आजीला विचारले कसे आहे जेवण तर तिने अंगठा आणि बोट एकत्र करून छान ची खूण केली आणि आ वासला. दोघींनी हसत खेळत जेवण संपविले . परत औषधें देऊन ती बाहेर आली .शारीरिक कष्टाची सवय नसल्याने ती थकली होती . सहज मोबाइल बघितला तेव्हा पाचशे मेसेज दिसत होते .अरे देवा ....!! इतके मेसेज..? सकाळपासून मोबाईल हातातही घेतला नाही याची तिला आठवण झाली .  मग मेसेज वाचता वाचता कधी झोपून गेली तिला कळलेच नाही .
संध्याकाळी आजीच्या बेलनी तिला जाग आली.आजीने हळूच चहाची खूण केली.तिचा तो निरागस चेहरा पाहून ती हसली "नो चाय आजी ...आज मिल्क शेक "असे म्हणत ती किचनमध्ये शिरली.मस्तपैकी दोन मिल्कशेक घेऊन आजीच्या समोर बसली .चियर्स करीत दोघींही मिल्कशेक पियाल्या. आजी आज खुश दिसत होती.
रात्री आई घाईघाईत घरात शिरली आणि सासूबाईंना हसताना पाहून तिचा जीव भांड्यात पडला.रात्रीचे जेवण काय असे विचारताच तिने सकाळचा वरण भट आईसमोर ठेवला . आज तिघीही एकत्रच जेवायला बसल्या . पहिला घास खाताच आई पटकन म्हणाली "अग बाई किती मीठ टाकलेस ..?आजीला सहन होत नाही आणि मिरच्याही आहेत वरणात.."तिने ओशाळून आजीकडे पाहिले ,आजी डोळे मिचकावत हसत होती . मस्त मस्त अशी खूण करत तिने नातीला प्रोत्साहन दिले  आणि ते पाहून सर्व हसू लागले.
" हे बघ ...आता मी आलेय तू आनंदाने वारीला जा .मी बघते सासूबाईना "तिने मुलीला ऑर्डर सोडली.
" कशाला जायचे वारीला..?? जे तिथे जाऊन शिकायचे जो आनंद मिळवायचा तो इथेच तर मिळाला मला..विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचा आनंद इथेच पहिला मी. तूही घर सांभाळायचे मॅनेजमेंट करतेस ना ते मी बाहेर वरकऱ्यांकडे का शिकू ..? आज खूप काही शिकले मी आजीच्या सोबत . तूच जाऊन ये वारीला मी संभाळीन आजीला.आजपासून तू एकटी नाहीस मीही आहे तुझ्या मदतीला"असे बोलून आजीला घट्ट मिठी मारली.
आजीने उशी खालून जुन्या चांदोबाचे पुस्तक काढून तिच्या हाती दिले. ते पुस्तक पाहताना डोळ्यातील अश्रू कधी त्यावर पडले हे तिलाच कळले नाही .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, July 15, 2018

द लास्ट माईल ....डेव्हिड बॅल्डसी

द लास्ट माईल ....डेव्हिड बॅल्डसी
अनुवाद .....सायली गोडसे
श्रीराम बुक एजन्सी
मेलविन मार्स तरुणपणातच मोठा फुटबॉलपटू बनला . एका क्लबशी भरपूर रकमेचा करार होण्याआधीच आई वडिलांच्या निर्घृण खूनाच्या आरोपाखाली त्याला अटक झाली . गुन्हा सिद्धही झाला आणि देहांताची शिक्षण अंमलात येण्याआधीच त्याची अनपेक्षितपणे सुटका झाली . कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीनेच आपण खून केल्याचे कबूल केले होते .सुमारे वीस वर्षानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली .स्पेशल एजंट अँमॉस डेकर या घटनेच्या मुळाशी जायचा निश्चय करतो .हळू हळू एक एक घटना उलगडत जाते आणि असे रहस्य उघडकीस येते ज्याची डेकर आणि मार्सने कल्पना ही केली नव्हती .

Saturday, July 14, 2018

रिपोर्ट

हातात मेडिकल रिपोर्ट घेऊन ती खिन्न चेहऱ्याने बाहेर पडली . बाहेर मुसळधार पाऊस पडत होता . कशीबशी रेल्वे स्टेशनवर आली . ट्रेन उशिरानेच धावत होत्या . दुसरा काही पर्याय नसल्याने तिने स्टेशनवरच थांबायचे ठरविले . एक कोपऱ्यात जागा पकडून तिने आधी मनसोक्त रडून घेतले . स्टेशनवर सगळेच चिंतेत असल्यामुळे कोणीही तिच्या राडण्याकडे लक्ष दिले नाही .रात्री बऱ्याच उशिराने ट्रेन चालू झाल्या . ती आपल्या नेहमीच्या स्टेशनवर उतरेपर्यंत मध्यरात्र होऊन गेली होती .घरापर्यंत जायला रिक्षा शोधत असतानाच एक तरुणी तिच्याजवळ आली ताई कुठे जाणार तुम्ही ?? तिने प्रश्न केला . हिने कुसुम नगर असे थंड आवाजात उत्तर दिले . मीही त्याच्या जवळ राहते आपण जाऊया का एकत्र .तिने काही न बोलता मान डोलावली .अचानक एक रिक्षा समोर येऊन उभी राहिली .कोणताही विचार न करता दोघी रिक्षात बसल्या आणि रिक्षा चालू झाली . तिचा चेहरा पाहून दुसरी तरुणी काही बोलली नाही . अचानक रिक्षाने नेहमीच रस्ता सोडून वेगळेच वळण घेतले . व भाऊ इथे कुठे असे बोलेपर्यंतच दोन  माणसे त्या रिक्ष्यात चढली .एक क्षणात दोघीनीही कल्पना आली काय घडणार ते .पुढे एका काळोख्या घरासमोर रिक्षा थांबली आणि अजून दोघेजण अंधारातून पुढे आले .सगळ्यांनी मिळून दोघीनीही आत उचलून आणले . हातातील पर्स कुठच्या कुठे गेल्या होत्या . भीतीने थरथर कापत दोघीही कोपऱ्यात उभ्या राहिल्या .त्या पाची जणांच्या चेहऱ्यावर वासना स्पष्ट दिसत होती .काहीतरी विचार करून ती पुढे झाली . तुम्हाला काय हवेय ?? नजर रोखत तिने विचारले . पुढे येणारे पाचही थांबले .पैसा आणि तुम्ही ..त्यातील एकाने उत्तर दिले . उद्या  हे लपून राहणार नाहीत . आज ना उद्या पोलीस तुमच्यापर्यंत पोचतीलच त्यापेक्षा एक तडजोड केली तर ...? आश्चर्याने ते तिच्याकडे पाहू लागले . ती तुम्हाला पैसे देईल मी शरीर देते ... बोला . तिला हात लावायचा नाही .आम्हाला घरी सोडा नंतर . असे म्हणत तिने ओढणी खाली टाकली . सर्वांनी एकमेकांच्याकडे पाहत होकारार्थी माना डोलवल्या आणि तिच्यावर तुटून पडले .दुसरी तरुणी हताश नजरेने सर्व पाहत राहिली.सर्व आटपल्यावर  दुसऱ्या तरुणीच्या पर्समधून हजार रुपये काढून घेतले . आणि नंतर दोघीना रिक्षातून घराजवळ सोडले .खाली उतरल्यावर ती दुसरीला म्हणाली मला तीन हजार हवेत . ती तिची मागणी ऐकून अवाक झाली . कसले पैसे...?? तुला त्यांच्यापासून वाचविण्याचे पैसे ... ती शांतपणे म्हणाली .नाही आहेत आता दुसरीने उत्तर दिले हरकत नाही ट्रान्सफर कर .. आम्ही हल्ली ऑनलाईन पेमेंट ही स्वीकारतो . तिच्याकडे उत्तर तयार होतेच . आम्ही म्हणजे ??? दुसरीने शंकेने विचारले . अग धंदा करते मी .रोजची चार हजाराची कमाई आहे माझी . म्हणून तर त्यांना अंगावर घेतले मी .आणि तुला वाचविले . नाहीतर त्यांनी इज्जत आणि पैसे दोन्हीही घेतले असते तुझ्याकडून .पाचजणांना काय फुकट चढवून घेतले का ???? काही न बोलता दुसरीने तिच्या अकाउंट वर तीन हजार ट्रान्सफर केले .पैसे जमा झाल्याचा मेसेज येताच ती निघाली .पण असेच जर दुसऱ्यांच्या बाबतीत झाले तर ...?? ते असेच मोकाट सुटणार का ?? दुसरीने आवाज चढवून विचारले . ती वळली तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाली आता ते काही करू शकणार नाहीत . हा रिपोर्ट बघ . एड्स झालाय मला . आजच डॉक्टरकडून रिपोर्ट आणला मी . हातातील रिपोर्ट तिच्या हातात ठेवून ती शांतपणे वळली आणि चालू लागली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, July 11, 2018

मंटोच्या निवडक कथा

मंटोच्या निवडक कथा
अनुवाद ..... डॉ. वसुधा सहस्त्रबुध्ये
सआदत हसन मंटो (१९२२ ते १९५५)हा उर्दू साहित्यातील जेष्ठ साहित्यकार म्हणून ओळखला जातो .त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर कथा लिहिल्या . त्यातील काही विषय अस्पर्शीत ,वादग्रस्त होते .जे वाटते ते स्पष्ट बोलणारा आणि लिहिणारा लेखक म्हणून त्याला ओळखले जाते .तो एकीकडे स्त्री पुरुष संबंधांवर तर वेश्यांच्या जीवनावर लिहितो तर तितक्याच उत्कटतेने फाळणीवर ही लिहितो.जीवनातील कटू सत्य तो आपल्यासमोर आणतो. मंटोच्या काही कथा अश्लील ठरवून त्यावर खटले ही भरले गेले .मंटोने त्यात स्वतः आपली बाजू मांडली आणि निर्दोषत्व सिद्ध केले.पण हे करताना त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांना दोन वेळा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.त्यांचे दारू पिणे ...नाटक सिनेमा पाहणे ..भटकणे....,जुगार खेळणे..काव्य- संगीत नाटकांच्या मैफिलीत बसणे हे सामान्य माणसांच्या आकलनापलीकडे होते .डॉ.नरेंद्र मोहन यांनी संपादित केलेल्या मंटो की कहानिया या पुस्तकाचा हा अनुवाद आहे .

Monday, July 9, 2018

एका शहराचं शूटिंग ..... अनंत सामंत

एका शहराचं शूटिंग ..... अनंत सामंत
मॅजेस्टिक प्रकाशन
अनंत सामंत यांचा नेहमीप्रमाणे अस्वस्थ करणारा कथासंग्रह.खरे तर यातील पहिली कथा वाचूनच आपण हादरून जातो आणि पुढे काय असेल याची कल्पना येते.मुंबई शहरात घडणाऱ्या या छोट्याछोट्या कथा आहेत.पहिली कथा मुंबईतील संवेदनशील भागात असणाऱ्या पोलीस स्टेशनची आहे . बाबरी मशीद पडल्यावर होणारी दंगल आणि तिला हाताळणारे पोलीस दल यांचा संघर्ष रंगविला आहे . त्यानंतरच्या काही कथा निरसवाण्या आहेत . एक दोन कथा विनोदी पद्धतीने मांडल्या आहेत . रस्त्यावर राहणाऱ्या चित्रकाराची कथाही चांगली पकड घेते . वाचण्यासारखा कथासंग्रह.या कथा वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या .