Saturday, June 18, 2022

एक वटपौर्णिमा

एक वटपौर्णिमा 
मनातल्या मनात शिव्या देतच ती ऑफिसमध्ये शिरली. "कंटाळा आलाय मला या आयुष्याचा ."ती मनात पुटपुटली. "हरामखोर नवरा दिलाय देवाने मला .रात्री उपभोगायचे, सकाळी उठून पर्समधून पैसे चोरायचे आणि दारू पियाला जायचे हेच काम आहे त्याचे"
 आज सकाळी चांगलेच वाजले होते दोघांचे त्यावरून .पण भांडणाचे परिणाम तिच्या मार खाण्यात झाले होते. गालावरची बोटे दिसू नयेत म्हणून तिने दुसऱ्याही गालावर थोडी लाली चढवली होती. पण ऑफिसातील इतरांच्या नजरेतून काहिच सुटले नव्हते. 
काही हळहळले, तर काहींनी छद्मीपणे पाहिले , तर काहीच्या नजरेत लबाडपणाची सहानुभूती आली. अनेकजण या ना त्यानिमित्ताने तिच्याशी बोलून गेले. तिच्या घरी काय चालू आहे ते सगळ्यांनाच माहीत होते.
ऑफिसमधील सहकारी स्त्रियांच्या वेशभूषेकडे पाहून तिला पहिल्यांदा  आश्चर्य वाटले पण नंतर आज वटपौर्णिमा आहे याची आठवण झाली आणि ती स्वतःशीच हसली.जन्मोजमी हाच पती लाभावा यासाठीच का हे व्रत करायचे ..?? तिने स्वतः ला प्रश्न विचारला . उत्तर अर्थात तिलाच माहीत होते.
संध्याकाळी ऑफिस सुटतात ती घाईघाईने वडाच्या शोधात निघाली.
यशवंत मनोहर राज  उर्फ यमराज नेहमीप्रमाणे आज बाहेर जाण्याच्या तयारीत होते . तर चिंतामणी त्रंबक गुप्त उर्फ चित्रगुप्त  गालातल्या गालात हसत त्यांची तयारी पाहत होते.त्यांच्या या छद्मी हास्याला पाहून यमराज  चिडले."तुम्हाला हसायला काय होतंय."
"सर, आज वटपौर्णिमा. गेली कित्येक युगे फक्त आजच्या दिवशी तुम्ही  खाली जाता. हातून घडलेल्या त्या चुकीचे प्रायश्चित्त घेता का "? गालातल्या गालात हसत चित्रगुप्त म्हणाले.
"मुळात ती चूक नव्हती. तिची सत्वपरीक्षा होती  आणि त्यातूनच एक पतिव्रता स्त्री कशी असावी याचा आदर्श ठरणार होती ती. त्यानंतरच वटपौर्णिमाचे महत्व स्त्रियांना कळले आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना होऊ लागली आणि तेच चेक करायला मी दरवर्षी यादिवशी खाली जातो." रागारागाने चित्रगुप्तकडे पाहत यमराज म्हणाले आणि आपल्या आवडत्या काळ्या बुलेटवर किक मारून हातातली साखळी बोटाने गरगर फिरवीत ते निघून गेले .
रस्त्यावरच्या वडाची पूजा करून ती घरी निघाली. वडाभोवती फेऱ्या मारताना ती स्वतःशीच विचार करीत होती. इतका काही आपला नवरा वाईट नाही . लग्न झाले तेव्हा खूप चांगला होता . तिला फुलासारखे जपत होता .गरोदर होती तेव्हा किती आनंदी होता . पण मुलगी होणार हे कळताच तो संतापला . तसेही बऱ्याच पुरुषांना पहिली मुलगी नकोच असते . हा काही वेगळा नव्हता . त्या दिवशी पहिल्यांदाच खूप पिऊन घरी आला आणि रागात दोन कानाखाली वाजवल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेला आणि गर्भपात करून घेतला. दुसर्यावेळी मुलगा नक्की अशी स्वतःची समजून काढत घरी आलो. पण दुसरी वेळ आलीच नाही . मग पिणे वाढले त्यानंतर मारहाण . सतत संशय घेणे . नोकरी सुटली .पण तो आहे म्हणून सौभाग्यवतीचा आदर आहे . इतर पुरुष दूर राहतात . एक आधार आहे त्याचा नाहीतर या समाजात माझे काय झाले असते .नवरा आहे म्हणून मान आहे .असे स्वतःला समजावत ती घरी आली.
"कुठे गेली होतीस xxx "? हातातील तांब्या तिच्या दिशेने फेकत तो ओरडला .दरवाजा उघडताच समोर वेगाने येणारा तांब्या ती चुकवू शकली नाही .कपाळावर आदळताच ती खाली कोसळली .पण पडता पडता हातातील लांब छत्री तिने त्याच्या दिशेने जोरात ढकलली. गळा आवळत खाली पडताना तो तिला दिसला आणि तिचे भान हरपले.
शुद्धीवर येताच तिला समोरच्या बेडवर तो दिसला .काळ्याकुट्ट वर्णाचा , भरदार देहाचा, चेहऱ्यावर एक मिस्कील हासू ,हातातील साखळी बोटाने गरगर फिरवत तिच्याकडेच पाहत होता. 
"झाली का पूजा" ? त्याने हसत विचारले .काहीच न उमजून तिने होकारार्थी मान डोलावली. 
"आपण "? तिने कापऱ्या आवाजात विचारले. "ओळखले नाहीत का "? दरवर्षी वडाची पूजा करता त्या कथेचा मीच तो खलनायक अर्थात यमराज . आज तुमच्या घरी आलोय .चला निघुया" असे बोलून तिच्या नवऱ्याकडे नजर टाकली .
तिने ओठापर्यंत आलेली किंकाळी कशीबशी आवरली. तुम्ही याना न्यायला आलात का ? बरे झाले . घेऊन जा . सुटेन एकदाची .खूप सहन केले आता सुटका हवीय ."असे बोलून  तिने हात जोडले .
"खरंय .सुटकाच करायला आलोय.चला" असे म्हणत त्याने तिचा हात धरला.
"हे काय ? आहो मला कुठे नेताय .ते मेलेत ना ? त्यांना घेऊन जा ."ती हात सोडवून घेत ओरडली.
 "अरेच्चा, आता तर तू त्याच्यासाठी वडाची पुजा करून आलीस आणि ताबडतोब त्याला घेऊन जा म्हणतेस. स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने जगावे ,समाजात ताठ मानेने वावरावे यासाठी किती योजना  आम्ही या पृथ्वीतलावर आणल्या .ज्या सावित्रीने कष्ट करून आपल्या पतीचे प्राण परत आणले तितके कष्ट करून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करावे याहेतूने विविध स्त्रियांचे आदर्श तुमच्यासमोर उभे केले. पण अजूनही तुम्ही आपल्या पतीचा  छळ सहन करतायत. तुम्ही त्याला कितीही शिव्या घाला पण तो तुम्हाला जवळ हवाय.त्याचा आधार तुम्हाला हवासा वाटतो.  रोज तू आपल्या पतीपासून सुटका हवीय अशी प्रार्थना करतेस पण वट पौर्णिमेला मात्र सात जन्म हाच पती पाहिजे यासाठी पूजा करतेस .कमाल आहे . म्हणूनच यावेळी तुलाच घेऊन जाणार आहे मी . तुझीच सुटका करतो .चल निघुया .असे म्हणून आपल्या हातातील साखळी तिच्या गळ्यात अडकवली .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Tuesday, June 14, 2022

चॅनल 4 लाईव्ह ...समीरण वाळवेकर

चॅनल 4 लाईव्ह ...समीरण वाळवेकर
ग्रंथाली प्रकाशन 
चॅनल 4 हे भारतातील प्रमुख न्यूज चॅनल. सलील चौधरी हा चॅनल 4 चा धाडसी तरुण पत्रकार . महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी प्रथम चॅनेल 4 वरच आल्या पाहिजेत हेच त्यांचे प्रमुख  काम. महाराष्ट्रातील राजकारणात काय घडामोडी घडतात यावर सलील बारीक लक्ष ठेवून आहे .
मदन पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. स्वतःची जागा शाबूत ठेवण्यासाठी ते कोणत्याही पातळीला जायला तयार होते. त्यासाठी त्यांनी आपल्याच मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराचे पुरावे विरोधी पक्षाच्या हाती पडतील अशी खेळी खेळली होती.विरोधी पक्ष नेहमीच मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत होता पण मुख्यमंत्री त्यांच्या हाती लागत नव्हते.
राज्यात इतरही घडामोडी घडत होत्या. कोकणातील अणुऊर्जा प्रकल्प. गुंडांचे नकली शूटआउट कोट्यातील जागा वाटप ,अश्या अनेक ठिकाणी भ्रष्टाचार चालू होता .
आपल्या विरोधातील लोकांना बाजूना सारून मुख्यमंत्र्यांनी खुर्ची आणि सतत अजून बळकट केली. पण....
कुठेतरी अतिआत्मविश्वास त्यांना भोवला आणि एका साध्या सोसायटीचे प्रकरण त्यांच्या अंगाशी आले.ते उघडकीस आणणारा होता एक साधा मंत्रालयातील सेक्शन ऑफिसर 
दिलेला शब्द पाळला नाही म्हणून या ऑफिसरने अशी काही खेळी केली ज्यामुळे मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला .
महाराष्ट्रातील राजकारणातील अविश्वसनीय घडामोडी आणि चॅनल 4 चा आतील कारभार दाखवणारी एक सनसनाटी कादंबरी 

Wednesday, June 1, 2022

पिशवीभर आनंद ...अनघा किल्लेदार

पिशवीभर आनंद ...अनघा किल्लेदार 
लोकव्रत प्रकाशन 
अनघा मॅडम आणि मी फेसबुक मित्र .तसे आम्ही एका ग्रुपचे एकत्र अडमीनही आहोत.फोनवर बऱ्याचवेळा बोलणे ही होते.  त्यांच्या कथांचे पुस्तक प्रकाशित होतेय हे ऐकून खूप आनंद झाला . पुस्तक प्रकाशन झाले आणि त्याची एक प्रत माझ्या घरी आली.
पिशवीभर आनंद हा त्यांचा कथासंग्रह नावाप्रमाणेच आनंद देणारा आहे . मॅडमची लिखाण शैली खूप साधी सरळ आणि सकारात्मक आहे .
एकूण पंचवीस कथांचा हा संग्रह छोट्यांपासून  जेष्ठांपर्यंत संगळ्यानी वाचवा असाच आहे.
आपल्याकडून नकळत अश्या काही गोष्टी घडतात ज्यातून सर्वाना क्षणभरासाठी का होईना एक आनंद मिळतो एक समाधान मिळते आणि डोळे पाणावतात .अश्या छोट्याछोट्या गोष्टी मॅडमनी लिहिल्या आहेत.
या कथासंग्रहातील काही कथा आधीच सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध झाल्या आहेत .
पिशवीभर आनंद या कथेत आपल्याकडील खरेदी कुपन नवीन जोडप्याला देऊन त्यांच्या छोट्या छोट्या वस्तूंनी पिशवी भरलेली पाहून वृद्ध दांपत्याचा आनंद लेखिकेने बरोबर टिपला आहे .
महाराजांच्या नावाचा वापर करून होणारी फसवणूक गमतीदार शैलीने त्यांनी महाराजांच्या घोड्याचा नाल या कथेत मांडली आहे .वाचून आपणही त्या फसवणुकीचा आनंद घेतो.
या संग्रहातील कोणत्याही कथेत नकारात्मकता नाही.लेखिका तुम्हाला कोणतेही समाज प्रबोधन करीत नाही. तुम्हाला कोणताही उपदेश देत नाही तर कुटुंबात घडणाऱ्या छोट्याछोट्या गोष्टीत किती आनंद असतो हेच सांगतात.वादग्रस्त मुद्दे,राजकारण  लेखिकेने टाळले आहेत वादग्रस्त विषयांवर लिहिलेही नाही .कोणतीही कथा कंटाळा येईल इतकी लांबलेली नाही .त्यामुळे वेळ मिळेल तश्या ह्या कथा वाचू शकतो.
नवीन पिढीही आपल्या कुटुंबविषयी किती जागरूक आणि कर्तव्यदक्ष आहे इतकेच नव्हे तर त्यांना सामाजिक जाणीव ही आहे हे त्यांनी आपल्या काही कथेतून मांडले आहे .
एक छान कथासंग्रह आम्हाला वाचायला दिल्याबद्दल अनघा मॅडमचे आभार आणि अभिनंदन .यापुढेही तुमची अनेक पुस्तके प्रकाशित होवो हीच सदिच्छा