Tuesday, October 19, 2021

द वॉचमन.... रॉबर्ट क्रेस

द वॉचमन.... रॉबर्ट क्रेस
अनुवाद...बाळ भागवत 
मेहता पब्लिशिंग हाऊस
लार्किंन कॉनर ..एका धनाढ्य उद्योगप्रमुखाची एकुलती एक मुलगी . त्या दिवशी पहाटे तीन वाजता युक्का या हॉलिवूडच्या फेमस क्लबमधून बाहेर पडली .नंतर आपल्या अत्याधुनिक कारमधून सुसाट वेगाने घराकडे निघाली . पण वाटेत ती एका मर्सिडीजला आदळली.पुढच्या सीटवर एक पुरुष आणि स्त्री बसली होती तर मागे एक पुरुष बसला होता . तिने मदतीसाठी 911 नंबर दाबून त्यांना मदत करायला बाहेर पडली .पण ती मर्सिडीज ताबडतोब सुसाट वेगाने निघून गेली पण त्या आधी मागे बसलेला माणूस गाडीबाहेर पडून बाजूच्या गल्लीत शिरल्याचे तिने पाहिले .तिने हे सर्व पोलिसांना सांगितले .हे सर्व आता संपले असे तिला वाटले पण आता तर कुठे एका भयानक नाट्याला सुरवात झाली होती.
 पुढील दोन दिवसात डिपार्टमेंट ऑफ जस्टीसचे एजंट्स तिची गाठ घेणार होते आणि सहा दिवसात तिचा जीव घेण्याचा पहिला प्रयत्न होणार होता .
पाईक एक भाडोत्री सैनिक आहे . त्याने सुरवातीस  पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केले होते .लार्किंनच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली .
तिचे रक्षण करतानाच तिच्या मागे कोण लागले आहे हे शोधण्याची जबाबदारीही त्याने स्वीकारली .कोण आहेत ही माणसे जी एका व्यावसायिक शिकाऱ्यांसारखे तिच्या मागे लागले आहेत...?? .तिने ओळखलेला तिसरा माणूस कोलंबियातील आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे . पण तीन वर्षांपूर्वीच तो मारला गेला आहे . मग हा कोण ....??
पाईक लार्किंनला वाचवू शकेल . या मागे नक्की कोण आहे ते शोधून काढेल का ....??
एक गुंतागुंतीची रहस्यमय कादंबरी .

Friday, October 15, 2021

नववी माळ..... रंग.….?? 2021

नववी माळ..... रंग.….?? 2021
"काय करतेस ग घरी बसून ...??  सकाळी सात ते रात्री आठपर्यंत नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहणारी तू .घरात कंटाळा येत नाही का  ....?? तिची एक  मैत्रीण विचारत होती.
त्या चारपाचजणी चौकातील देवीच्या मंडपापाशी जमल्या होत्या .आजच्या रंगाचा ड्रेस आणि साड्या सर्वांना खुलून दिसत होत्या.तिने ही आजच्याच रंगाची साधी साडी नेसली होती.सर्वजणी कॉलेजपासून एकत्रच होत्या .नोकरी …करियर..संसार सांभाळणाऱ्या.
"हिला कसला कंटाळा येणार ग ...?? बघावे तेव्हा ऑनलाईन दिसत असते ...फोन करावा तर माझा कार्यक्रम आहे .मी लाईव्ह आहे ..हीच कारणे देत असते ..." दुसरीने बोलायचा चान्स सोडला नाही .
"म्हणे मुलीसाठी नोकरी सोडतेय. तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे ..जशी काय आम्हाला मुलेच नाही ..." तिसरीने बऱ्याच दिवसाची खदखद काढली.
"कॉलेजमध्ये असल्यापासून बघतेय अगदी शांत असतेस तू. काही प्रकरण ही केले नाहीस तू.जॉब ही व्यवस्थित चालू होता .....मग आता काय करतेस तू....?? एकीने कुतूहलाने विचारले .
"जाऊ द्या ग ...बोलत बसलो तर दिवस पुरणार नाही . आरती सुरू होतेय चला जाऊया..."असे बोलून ती सर्वांसोबत मंडपात शिरली.
मंडपाच्या प्रवेशद्वारावर एका फळ्यावर आजचा रंग त्याची कारणे आणि एका देवीची माहिती सुंदर हस्ताक्षरात लिहिली होती. 
" किती सुंदर हस्ताक्षर आहे. बघत राहवेसे वाटते..."एक कौतुकाने म्हणाली .
आतमध्ये देवीची आरती सुरू झाली होती.फारच थोडी माणसे योग्य अंतर ठेवून आरती करत होते पण त्यात ती बारा वर्षांनी छोटी मुलगी लक्ष वेधून घेत होती. आजच्या रंगाचा स्वच्छ ड्रेस ,त्याच रंगाची रिबीन आणि स्पष्ट खणखणीत स्वरात लयबद्ध टाळ्या वाजवित आरती म्हणत होती.तिच्या आरतीमुळे इतरांची तारांबळ उडत होती. बऱ्याजणांना योग्य शब्दच माहीत नव्हते . त्याचे परिणाम दिसत होते. पण ती छोटीमात्र आत्मविश्वासाने आरती म्हणत होती.
"एकतरी आरती इतक्या स्पष्टपणे बोलता येईल का आपल्याला ... "?? टाळ्या वाजवित एक मैत्रीण दुसरीच्या कानात पुटपुटली.
आरती संपली आणि तीर्थप्रसादला गर्दी झाली.पण ती छोटी मुलगी तिच्याकडे  धावत गेली आणि पायाला हात लावून नमस्कार केला .
"मॅडम ...बरोबर म्हटली ना आरती आणि मनाचे श्लोक ..."?? छोटीने निरागस चेहऱ्याने विचारले .
"खूप सुंदर..... " तिने कौतुकाने गालावर हात फिरवत सांगितले.
इतक्यात एक दहा वर्षाचा मुलगा प्रसाद घेऊन तिच्यासमोर आला .
"अरे रवी..... छान लिहिलेस तू बोर्डवर . सगळे तारीफ करतात तुझ्या हस्ताक्षराची .पण आता ड्रॉईग सुधरव. मी तुला एका मॅडमशी ओळख करून देते. त्या तुला ड्रॉईग शिकवतील ...." तिने त्याच्या पाठीवर हात ठेवीत म्हटले . 
"चालेल मॅडम .."असे म्हणून त्यानेही तिच्या पायाला हात लावून नमस्कार केला .
तिच्या मैत्रिणींना कळेना काय चालू आहे .ती अजूनही शांतच होती.
मंडपाच्या बाहेर येताच एक मध्यमवयीन माणूस आपल्या तेरा वर्षाच्या मुलीला घेऊन तिच्या समोर आला .
"कालच सोसायटीच्या वॉचमनला आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले. हिने घरी येऊन आम्हास सांगितले तो हिच्या अंगाला कुठे कुठे स्पर्श करीत होता .मॅडम तुमच्यामुळे माझ्या मुलीला बरे वाईट स्पर्श कळू लागले त्यामुळेच पुढचा अनर्थ टळला ...."असे बोलून त्याने हात जोडले. 
"मॅडम मी तुमच्यावर कविता केली आहे . ऐकणार ..?? त्या मुलीने विचारले .
" हो ..." तिने कौतुकाने उत्तर दिले 
मग एक छान कविता त्या मुलीने सर्वांसमोर ऐकवली.
ती ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .
"हे सर्व काय चालू आहे ग ...?? तिच्या एका मैत्रिणीने आश्चर्याने विचारले.. कोण तो मुलगा ....?? कोण ही मुलगी ....?? सगळे पाया का पडतात तुझ्या ."??
" हे सर्व माझे ऑनलाईन विद्यार्थी आहे .तुम्ही विचारताना तू सतत ऑनलाईन कशी असतेस..?? मी ह्या मुलांना बालसंस्कार शिकवते .दर दिवशी संध्याकाळी दोन तास मी या मुलांना देते. त्यांना सगळ्या देवांची आरती,मनाचे श्लोक, देशातील शूर सैनिकांची, प्रसिद्ध नेत्यांची माहिती सांगते .शरीराच्या विविध भागांची ओळख,त्याची कार्य ,चांगले ,वाईट काय याची माहिती देते . सुंदर हस्ताक्षर कसे काढावे हे शिकवते . मोबाईलने मुले बिघडतात त्यांच्यावर वाईट संस्कार होतात हे नुसते बोलण्यापेक्षा त्याच मोबाईलचा वापर करून मुलांवर संस्कार कसे करता येईल याचा प्रयत्न करते मी. यातील एक जरी विद्यार्थी चांगला नागरिक बनला तरी स्वतः ला भाग्यवान समजेन मी . उगाच घरी बसून काय करते याचे उत्तर हेच आहे ...असे बोलून ती चालू लागली 
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, October 14, 2021

आठवी माळ.... रंग ....?? 2021

आठवी माळ.... रंग ....?? 2021
 ती ऑफिसमध्ये शिरली आणि तिथला गोंगाट शांत झाला. सगळे तिच्याकडे पाहू लागले.काहींच्या नजरेत सहानुभूती होती तर काहींच्या डोळ्यात असूया तर काहींच्या तिरस्कार.तशी ती कोणाच्या अध्यातमध्यात नव्हती.दिसायला साधारण. नेहमी एका टाईपचा ड्रेस तो ही साधा . कधीतरी साडी तीही साधारण.एकच हेयर स्टाईल . काहीजण ही नेहमी रस्त्यावरील कपडाबाजारात कपडे घेते असे म्हणायचे .
पण तिला याची कधीच जाणीव नसायची आणि असली तरी ती लक्ष देणारी नव्हती. सहकाऱ्यांशी नेमके बोलणे आपले काम चोख करणे आणि वेळ झाली की घरी पळणे हाच तिचा दिनक्रम.
नवरात्र उत्सव सुरू झाले होते. सगळे ऑफिस आजच्या रंगाचे ड्रेस घालून आले होते .फोटो सेशन चालू होते . उद्याच्या रंगाची चर्चा चालू होती. पण ही मात्र नेहमीसारखीच आली होती. तिला रंगाचे सोयरसुतक  दिसत नव्हते.आजच्या रंगाची एकही गोष्ट तिच्या शरीरावर दिसत नव्हती .
इतरांच्या गोंधळाकडे लक्ष न देता तिने आपले काम सुरू केले .मध्येच फोन वर  कोणाशीतरी बोलायची .संध्याकाळी ऑफिस संपले तशी ती निघाली.बाकीचे थांबले .
 घामाने भिजलेला आपला चेहरा पदराने पुसत दरवाजाचे लॅच उघडून ती आत शिरली तेव्हा समोर तो बसला  होता. त्याला पाहून ती गोड हसली .
"शॉवर घेणार ...?? त्याने विचारले तशी ती मोहरली .लाजून तिने त्याला कळेल इतपत मान डोलावली . तिने त्याची व्हीलचेयर बाथरूमच्या दिशेने वळवली .मग आपल्या खांद्याचा आधार देत त्याला आत नेऊन प्लॅस्टिक टेबलवर बसविले आणि हळूहळू त्याचे कपडे काढू लागली मग त्याच्यासमोर उभी राहून स्वतःचे कपडे काढले.तो अनिमिष नेत्राने तिला पाहत होता .
शॉवर सुरू करून त्याला हळुवारपणे साबण लावत आंघोळ घालू लागली. तो डोळे बंद करून ते अनुभवत होता.काही वेळाने दोघेही बाहेर आले. तिने त्याला स्वछ करून नवे कपडे चढविले. आजच्या रंगाचा टी शर्ट आणि शॉर्ट .कालच तिने ते काढून ठेवले होते .मग सावकाश स्वतःचे कपडे घालू लागली. आजच्या रंगाची शरीरावर फिट बसणारी साडी . त्याच रंगाची लिपस्टिक, टिकली . दोन्ही हातात त्याच रंगाच्या बांगड्या .तयारी पूर्ण झाल्यावर तिने त्याच्याकडे पाहून हसून स्वतःभोवती गिरकी घेतली .त्याने हातानेच छानची खूण करून तिला जवळ ओढले .
"जेवण काय करू ..."?? तिने विचारले 
"काहीही कर ...पण माझ्यासमोर राहून कर ..."तो डोळा मारीत म्हणाला .
"चावट ..."ती लटक्या रागाने हात उगारत म्हणाली.
 रात्री जेवण करून तिने त्याला बेडवर झोपविले आणि नंतर हळूच त्याच्या कुशीत शिरली .त्याचे डोके आपल्या छातीशी घट्ट धरून केसांमधून हात फिरवीत बसली. काही वेळाने तो शांत झोपी गेला.
तो झोपल्याची खात्री होताच ती उठली .कपडे बदलताना तिने टेबलावरील त्याच्या फोटोकडे पाहिले . फोटोत तो रुबाबदारपणे बाईकजवळ उभा होता.बाजूला एका पेपरचे कात्रण फ्रेम करून ठेवले होते . त्यात लिहिले होते एका तरुणाने जीवाची बाजी लावून एका तरुणीला चार गुंडांपासून वाचविले होते पण त्या प्रयत्नात त्याच्या कमरेखालील बाजू पूर्णपणे निकामी झाली होती .
तिने फोटोसमोर हात जोडले . त्यादिवशी तो आला नसता तर त्या गुंडांनी तिच्या शरीराचे काय हाल केले असते याची कल्पनाच ती करू शकत नव्हती .असा नवरा दिल्याबद्दल देवाचे आभार मानले तिने .
होय ती देवीच आहे
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, October 13, 2021

सातवी माळ...रंग .?? 2021

सातवी माळ...रंग .?? 2021
शनिवार असल्यामुळे तो मॉल गर्दीने फुलून गेला होता.तीन मजली असलेला तो मॉल शहरात प्रसिद्ध होता . सुईपासून ते मोटारपर्यंत प्रत्येक गोष्ट तिथे मिळत होती.साहजिकच सर्व थरातील लोक तिथे खरेदीला यायचे आणि  एखादा सण किंवा उत्सव असेल तर पाहायलाच नको ..काहीजण नुसते टाईमपाससाठी यायचे..पण कसला टाईमपास..?? काहीही खरेदी न करता दोनतीनशे रुपये कसे खर्च व्हायचे ते त्यांनाच कळायचे नाही .
आजच्या रंगाच्या कपड्यांनी आणि वस्तूंची तो मॉल जणू झळाळून उठला होता .नवरात्र उत्सव चालू होता त्यामुळे रोज नव्या रंगाच्या कपड्यांनी आणि वस्तूंनी मॉल भरून गेला होता.
आज तिची ड्युटी फूड मॉलजवळ होती. अंगावर कडक इस्त्रीचा युनिफॉर्म ..डोक्यावर स्वछ कॅप.. पायात चकचकीत शूज घालून ती कठोर चेहऱ्याने सर्वांवर नजर ठेवून होती.मॉलच्या सिक्युरिटी गार्डपैकी एक गार्ड होती ती. आजच्या रंगाचे विविध ड्रेस पाहून तिच्या मनात असूया उमटत होती.पण शेवटी आपली नोकरी स्पेशल आहे याची  तिला जाणीव होती. तरीही आजच्या रंगाचा स्कार्फ गळ्यात घालून ती ड्युटी करत होती.
एका फूड शॉपजवळ काही टारगट मुले तरुण मुलींच्या जवळपास फिरत होती हे तिने नजरेच्या कोपऱ्यातून पाहिले होते .सहज फिरत ती त्यांच्याजवळ गेली .एका मुलीच्या कंबरेखाली जाणारा त्या मुलाचा हात तिने कोणाच्या नकळत पकडला .आजूबाजूला कोणाचा गोंधळ न उडू देण्याची काळजी घेत तिने त्याच्या हाताची विशिष्ट नस दाबली आणि पुन्हा गडबड केलीस तर फेकून देईन असे कानात कुजबुजत सांगितले .हात चोळत तो तरुण दूर झाला आणि परत ती जागेवर गेली.
अचानक तिला रेड अलर्ट मिळाला.हातातील वॉकीटॉकीमधून सगळ्यांना बाहेर काढा अशी सूचना मिळाली.
तिने चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता सर्वाना एकत्र जमा करून हळूहळू फूड मॉलच्या बाहेर जाण्यास मदत करू लागली . पण त्याचवेळी पाठीवर सॅक असलेली तरुणी टॉयलेटच्या दिशेने जाताना दिसली . सर्वजण फूड मॉलच्या बाहेर गेल्याची खात्री पटताच ती टॉयलेटकडे वळली .
टॉयलेटमध्ये ती तरुणी सॅक खोलून काहीतरी करत होती .अचानक सिक्युरिटी गार्ड पाहताच ती चपापली. सॅकमधून हात बाहेर काढणार इतक्यात तिच्या मानेवर मजबूत हाताची पकड बसली आणि क्षणात तिची मान तुटली .
"फूड मॉलमध्ये एक ... तिने मोबाईलवरून कोणाशी तरी संपर्क साधला आणि अंगातील युनिफॉर्म काढून टाकला .आतमध्ये आजच्या रंगाची टी शर्ट आणि ट्रॅकपॅन्ट होती.केस मोकळे सोडून कानाला इयरफोन लावून ती बाहेर पडली आणि खालच्या गर्दीत दिसेनाशी झाली.
गुप्तचर अधिकारी म्हणून काम करताना आपली ओळख उघड करायची नसते हा ट्रेनिंगमधील पहिला धडा  ती कधीच विसरत नव्हती.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, October 12, 2021

सहावी माळ... रंग ??? 2021

सहावी माळ... रंग ??? 2021
"म्हणजे माझी सेवा करायला तुला नेमले आहे का सुनबाईने ....."?? विमलआजीने  समोरील तरुण स्त्रीला निरखून विचारले.
 नवरात्र चालू होते . त्यामुळे आजच्याच रंगाचा ड्रेस त्या तरुण स्त्रीवर खुलून दिसत होता . विमलआजी बेडवर बसल्या होत्या ..
"होय ...मी संस्थेकडून आलीय .."ती हसत म्हणाली .
"किती दिवस राहणार आहेस ..?? माझ्याकडे फार कोण टिकत नाही .. मी खूप त्रास देते म्हणतात ..." विमल ताई छद्मीपणे म्हणाल्या ."म्हातारी झालीय ना आता"
"असू द्या हो... या वयात असे होणारच ..."ती म्हणाली .
"होय ना ... वय वाढते तसे आम्ही टाकाऊ होतो. तुम्ही असे वागता जसे आम्ही जग पहिलेच नाही"
"हा तुमचा औषधांचा डबा का .."?? तिने आजीच्या  बोलण्याकडे लक्ष न देता विचारले .
"हो आणि बघ त्या फ्रीजमध्ये गुलाबजाम आहे . तो देतेस का ...."?? तिने दिनवाणा चेहरा करीत म्हटले.
"आहो तुम्हाला डायबेटीस आहे ..असे काही देऊ नये अशी ऑर्डर आहे मला ... "ती कठोर स्वरात म्हणाली .
"मग त्या ओव्हनमध्ये पिझ्झाचा तुकडा असेल बघ .. माझा नातू ठेवून गेला होता ... " आजीने पुन्हा विनवणी केली.
"आहो आजी असे काही खायचे नाही . तुमचे पथ्यपाणी नीट पाळ अशी ऑर्डर आहे मला .... " तिने पुन्हा सांगितले .
"बरे ...मला भूक लागली आहे काही करून देशील का...." ??? शेवटी नाईलाजाने आजी तिच्यावर ढकलून  मोकळी झाली .
"हो... तुमच्यासाठी सूप आहे. उकडलेल्या पालेभाज्यांचा... तो ही रेडिमेड ... " हातातील रेडी टू ईटचे पाकीट दाखवीत तिने सांगितले ..
"अरे देवा ..असा रेडीमेड आणायचा होता तर तो मंचुरीयन सूप तरी आणायचा ..." आजी चिडून म्हणाली .
"चायनीज खाणे तुम्हाला पचणार नाही असे सांगितले आहे मला .."ती कामाच्या बाबतीत खूपच प्रामाणिक दिसत होती.
"राहू दे ....तो टीव्ही लावतेस का ...?? मराठी सिरीयल पहायची आहे मला ..".आजीने मोठ्या आशेने विचारले .
" सगळे मराठी चॅनेल काढले आहेत .सासूबाई मराठी सिरीयल प्रमाणे वागतात आणि आमच्याकडून ही तश्याच अपेक्षा ठेवतात असे मॅडम म्हणाल्या .... "ती फारच स्पष्टवक्ती दिसत होती .
"ते भाज्यांचे सूप...?? तू तरी पितेस का ..."?? आजीने छद्मीपणे विचारले .
"नाही...मी माझ्यासाठी न्यूडल्स करणार आहे .मी काय खायचे ते ही मॅडम ने ठरविले आहे ... " तिने शांतपणे म्हटले.
" मला दूध तरी देशील का ....?? आता तर आजी हात जोडण्याच्या तयारीत होती .
" दूध संपले आहे . मॅडम आणि सर जीममधून आल्यावर पिऊन जातात .तुमच्यासाठी चहा पुरते ठेवतात..." ती पक्की व्यावसायिक दिसत होती .
"तुमची औषध घेण्याची वेळ झाली आजी... "तिने गोळ्या हातात ठेवत म्हटले .
"अग बाई ... !! आताच तर चार गोळ्या दिल्यास ना ...?? ह्या दोन कुठल्या ...?? मी नाही घेणार या ..आता आजी  चिडल्या ...
"आहो तुमच्या दीर्घ आयुष्यासाठीच ही औषधे आहेत.मॅडमनी सांगितले आहे आईला कसलाही त्रास झाला नाही पाहिजे ....".ती ठामपणे म्हणाली.
"हे असे आयुष्य जगण्यापेक्षा मला घेऊन का जात नाहीस माते .....आजीने हताश होऊन देव्हाऱ्यातल्या देवीपुढे हात जोडले .
"यावेळी नक्की येणार ना ..."?? तीने हसून विचारले. 
"यावेळी म्हणजे ...."?? विमलआजी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या .
"मागील दोन वर्षे तुम्ही घेऊन जा म्हणताय .दोन्ही वेळा दूत पाठविले आम्ही.पण तुम्ही वेगवेगळी कारण काढून टाळलेत. म्हटले यावेळी स्वतःच येऊन बघू कसे टाळता तुम्ही आम्हाला .... पण यावेळी खरच तुम्हाला कंटाळा आलेला दिसतोय .तयार असाल तर चला माझ्याबरोबर काही न बोलता .हे सर्व इथेच सोडून... ती शांतपणे आजीसमोर उभी राहून म्हणाली .
"यावेळी खरच येते. फक्त मला आजच्या रंगाची साडी नेसवून यांच्या फोटोसमोर घेऊन चल ...एकदा डोळे भरून पाहून घेते याना ...."
त्या स्त्रीने अलगद आजीला  बेडवरून उचलले आणि आजच्या रंगाची साडी नेसवून  तिच्या नवऱ्याच्या फोटोसमोर आणले .त्या फोटो कडे पाहत आजीने अलगद डोळे मिटले . तिने पुन्हा आत आणून  बेडवर झोपविले आणि दरवाजा उघडून निघून गेली .
होय ती देवीचं आहे 
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Monday, October 11, 2021

पाचवी माळ... रंग ...?? 2021

पाचवी माळ... रंग ...?? 2021
नवरात्र चालू झाले आणि त्या गावात एक उत्साह पसरला .तिथे मनोरंजनाची फारशी साधने उपलब्ध नव्हतीच .लाईट तर अधूनमधून जात होते त्यामुळे टीव्ही हा प्रकार जवळजवळ बादच झाला होता .सण आले की गावात उत्साह संचारात होता . नवरात्र म्हणजे गरबा हे समीकरण लोकांच्या डोक्यात फिट बसले होते.त्यामुळे आता सगळेच खूष होते .
ती यावेळी मैत्रिणीकडे आली होती . शहरात राहणारी असल्यामुळे गावातील संथ जीवन तिला आवडले होते. इथला नवरात्र खूप प्रसिद्ध आहे अशी तिची मैत्रीण सांगत होती. गावाच्या बाहेर मोकळ्या पटांगणावर नवरात्रीचे विविध कार्यक्रम नऊ दिवस चालत.यावेळी ती पूर्ण तयारीत आली होती. नऊ रंगाचे वेगवेगळे कपडे. दागिने ,गरबा स्टिक सर्वच घेऊन आली होती.
आजचा दिवशी ही तिने आजच्या रंगाचा गरबा ड्रेस घातला होता .संध्याकाळपासून कार्यक्रम चालू झाले होते . ती मैत्रिणीसोबत धमाल करीत होती.काही वेळाने गरबा सुरू होणार होता त्याकडेच तिचे लक्ष लागून राहिले होते.
अचानक तिच्या मैत्रिणीला अवस्थ वाटू लागले. " तू गरबा खेळ...मी घरी जाते ..."असे म्हणून तिची मैत्रीण निघाली .एकटी राहिल्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली पण काही वेळातच गरब्यात रंगून गेली. 
त्या गरब्यात एक तरुणी तिच्यासमोर आली. तिच्याच वयाची असेल साधारण.आजच्याच रंगाची साडी नेसून ती एका लयबद्ध तालात नाचत होती.दिसायला साधी होती पण तिचा ताल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. समोरासमोर येताच दोघीही एकमेकांकडे पाहून हसत होत्या.
किती वेळ झाला कोण जाणे…. पण रात्र वाढत होती . शेवटी एक एक करत सर्व बाहेर पडू लागले . हिलाही आपल्या एकटेपणाची जाणीव झाली."निघायला हवे..."असे स्वतःशी म्हणत ती घराच्या दिशेने चालू लागली .
गावाबाहेरचा रास्ता असल्यामुळे गर्दी नव्हतीच. पुढेपुढे ती एकटीच चालू लागली.मनात गरब्याचे विचार चालू असल्यामुळे तिला आजूबाजूचे भान नव्हते.अचानक बाजूच्या झाडीत काहीतरी हालचाल जाणवल्यामुळे तिची लय तुटली आणि एकांतवासाची जाणीव झाली.
शहरातील असल्यामुळे पहिल्यांदा भीती वाटली नाही पण हळू हळू सर्वत्र पसरलेल्या काळोखामुळे भीती वाटू लागली.त्याचवेळी " आहो ताई.." अशी हाक ऐकू आली . अचानक कानावर पडलेल्या हाकेने ती दचकली वळून पाहिले तर तीच साडी नेसून गरबा खेळणारी मुलगी तिला हाक मारत होती.
"एकट्याच ..."तिने हसून विचारले 
"हो ना ...."
"चला आता मी आहे सोबत ..गप्पा मारीत निघू .."तिने साडीचा पदर कमरेला खोचला आणि चालायला सुरुवात केली.
"मी मुंबईला असते ...तुम्ही ....." तिने विचारले 
"मी फक्त नवरात्रात येते दरवर्षी. मग जाते पुन्हा घरी ..." दुसरीने सहज उत्तर दिले .
नंतर काही न बोलता दोघीही शांतपणे चालत होत्या .
"तुला भीती नाही वाटत असे एकटे चालायला .."पहिलीने कुतूहलाने  विचारले .
कसली भीती ...?? दरवर्षी कोणी ना कोणी गरबा खेळून तुझ्यासारख्या एकट्या चालत जातात किंवा चकव्यामुळे रस्ता विसरतात . त्यांना रस्ता दाखवायची जबाबदारी मी घेते .....तिने गुढपणे उत्तर दिले.
"म्हणजे ..."
"अग...गेली सत्तर ऎशी वर्षे मी तुझ्यासारख्या मुलींची या रस्त्यावर सोबत करतेय. माझ्या भक्तांसाठी इतकेतरी करायला हवे ना ...जा ते बघ तुझे घर आले ...."
तिने चमकून पाहिले तर खरेच तिचे घर दिसत होते  आभार मानण्यासाठी ती वळली तेव्हा तिची सोबती गायब झाली होती .
गेली कित्येक वर्षे एक स्त्री रात्री एकट्या स्त्रियांना सोबत करते अशी दंतकथा गावात पसरलेली होती.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, October 10, 2021

चवथी माळ... रंग ...?? 2021

चवथी माळ... रंग ...?? 2021
संध्याकाळ होत आली होती. ती नुकतीच बाजारातील देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडली होती. आजच्या रंगाची साडी तिला शोभून दिसत होती. आहो घरी गेल्यावर आपल्या रूपाची तारीफ करणार हे पक्के माहीत होते तिला . त्या विचारानेच ती मोहरून जात होती. दहा वर्षे मुलीची ती आई आहे हे सांगूनही खरे वाटत नव्हते.
 तशी ती एकदम सरळमार्गी स्त्री. रस्त्यात कोणाचे भांडण झाले तरी रस्ता बदलून लांबून अंग चोरत जायची.आपले घर आपला छोटा संसार यात रमणारी साधी गृहिणी होती ती .
चौकात येताच तिची नजर भिरभिरु लागली .जणू काही ती कोणाला तरी शोधत होती. सकाळी इथेच तर पाहिले होते तिला. आजच्याच रंगाचा परकर पोलके घालून हातात चाबूक घेऊन स्वतःला फटके मारत येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैसे मागत फिरत होती.
तिच्या मुलींच्याच वयाची दिसत होती म्हणून जास्त लक्षात राहिली होती ती. नवरात्र सुरू झाल्यात त्यामुळे नऊ दिवस ती जरीमरी मातेची भक्त बनून इथे लोकांकडे पैसे मागणार हे नक्की.
सकाळी तिने तिला दहाची नोट दिली . तो माणूस बहुतेक तिचा बाप असावा ...त्याच्या डोक्यावर जरीमरी आईचा देव्हारा ठेवला होता . तो नुसताच तिच्या मागून फिरत होता .वा... रे... वा .. पोरगी स्वतःला चाबकाचे फटके मारत लोकांपुढे हात पसरते आणि हा शहाणा नुसता डोक्यावर देवी घेऊन फिरतो.अस्सा राग आला होता तिला....
शेवटी तिला त्या दुकानाच्या बंद शटरजवळ ती दिसलीच .त्या माणसाच्या मांडीवर बसून वडापाव खात होती. त्याचे हात तिच्या अंगावरून फिरत होते.मध्येमध्ये ती त्याचा हात झटकून टाकायचा प्रयत्न करीत होती . ती जवळ येताच दोघांनीही मान वर करून तिच्याकडे पाहिले. छोटीशी नजर स्वछ निर्मळ दिसली पण त्याची नजर पाहून अंगावर शहारे आले तिच्या अंगावर .हातातील खाऊचा पुडा देऊन ती ताबडतोब मागे फिरली .पण त्याची नजर तिच्या डोक्यातून जात नव्हती .
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती उठली.कालची घटना तिच्या मनातून साफ निघून गेली होती. आपल्या नवऱ्याचे आणि मुलीची तयारी करण्यात अर्धा दिवस पार झाला .दुपारी मुलीला आजच्या रंगाचा ड्रेस आणि स्वतः आजच्या रंगाची साडी नेसून ती बाहेर पडली . आपल्या मुलीला ती जरीमरी मुलगी काय करते ते दाखवायचे होतेच .
मुलीला घेऊन ती चौकात आली. चौक गर्दीने फुलून गेला होता. सगळीकडे आजचा रंग खुलून दिसत होता. चौकाच्या मध्यभागी ती जरीमरी मुलगी आपल्या अंगावर चाबूक ओढीत पैसे मागत होती आणि तो माणूस देवीचा देव्हारा कोपऱ्यात ठेवून तंबाखू मळत बसला होता. 
तिने दहाची नोट आपल्या मुलीच्या हातात दिली आणि देवीच्या पुढ्यात ठेवायला सांगितली. देवीच्या पुढ्यात नोट ठेवणार्या आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहत असताना तिची नजर त्या माणसाकडे वळली आणि ती ताठरली. 
होय.....तीच नजर तिने काल रात्री त्याच्या डोळ्यात पहिली होती. अचानक तिला त्या नजरेचा अर्थ कळला आणि तिचे डोळे संतापाने फुलून उठले.
काही न बोलता तिने त्या मुलीचा चाबूक आपल्या हाती घेतला आणि सपासप त्याच्या अंगावर ओढू लागली . अचानक झालेल्या हल्ल्याने तो गोंधळला आणि ओरडत रस्त्यावर लोळू लागला . पण आता ती दया दाखवणार नव्हती .काही न बोलता ती देवीचे रौद्र रूप धारण करून त्याच्या पाठीवर सपासप चाबूक ओढत राहिली.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, October 9, 2021

तिसरी माळ... रंग ....?? 2021

तिसरी माळ... रंग ....?? 2021
रात्रीची  साधारण साडेनऊची वेळ. त्या बसस्टॉपवर ती एकटीच उभी होती. नवरात्रीच्या दिवसात हल्ली रंगांना फारच महत्व आले होते. तिने ही आजच्याच रंगाची साडी नेसली होती. सारखी घड्याळात पाहत दूरवर मोकळ्या रस्त्याकडे पाहत होती.
जसजशी रात्र चढू लागली तसतशी आजूबाजूची गर्दी  वाढू लागली. नको त्या माणसांचा वावर तिथे होऊ लागला .एक दोनजणी तर तिच्याकडे पाहून नई है क्या ...?? हमारे पेट पे क्यू लाथ मारने आई है ..??असे पुटपुटताना तिने ऐकले. शेजारून एक काळपट घामाजलेला तरुण तिच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडून गेला .हळूहळू तिच्या चेहऱ्यावर काळजी दाटू लागली .
नाईलाजाने तिने एका रिक्षाला हात केला .ती रिक्षा थांबली नाही पण बराच वेळ एका कोपऱ्यात उभी असलेली रिक्षा हलली आणि तिच्यासमोर उभी राहिली.ती आत बसताच रिक्षा चालू झाली .काही अंतरावर जाताच अजून दोन माणसे रिक्षात चढली .त्यांना पाहताच ती घाबरली . त्या सर्वांनीच आजच्या रंगाचे शर्ट आणि टी शर्ट चढविले होते .
तिने रिक्षा थांबविण्याची विनंती केली पण त्यांनी ऐकले नाही . आतमध्ये झटापट सुरू असतानाच एका जुन्या फॅक्टरीजवळ ती रिक्षा थांबली .त्या तिन्ही तरुणांनी खेचतच तिला बाहेर काढले आणि उचलून आतमध्ये नेले .
आतमध्ये जमिनीवर फेकताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.ते दोन तरुण तिच्या शरीराशी खेळू लागले तर एकजण तिचा विडिओ काढू लागला .
अचानक त्या रूमचा दरवाजा धाडकन उघडला आणि एक जीन्स आणि टीशर्ट घातलेली तरुणी आत शिरली. तिच्यासोबत साध्या कपड्यातील पोलीसही होते. त्या तरुणीने ही आजच्याच रंगाचे टी शर्ट घातले होते .
पोलिसांना पाहताच त्या तिघांनीही पळायचा प्रयत्न केला पण त्या तरुणीने आपल्या हातातील रिव्हॉल्व्हरने त्यांना शांतपणे गोळ्या घातल्या .
पहिल्या तरुणीने ताबडतोब तिघांचे खिसे चपापले आणि त्यांची पाकिटे काढून त्यातील सर्व पैसे आपल्या पर्समध्ये टाकले.
"लवकर यायला काय होते .दोघांनी वाट लावली माझी सर्व अंग दुखतंय. साले मिळेल तिथे हात लावत होते...."ती दुसरीकडे पाहत रागाने म्हणाली .
"म्हणून तर तुला मदतीला घेतले.सभ्य मुलगी तयार झाली असती का ...?? बरेच दिवस यांच्यावर संशय होता.किती स्त्रियांच्या आयुष्याची नासाडी केली असेल यांनी ..आज तुझ्या मदतीने याना धडा शिकवला .त्यांच्या पाकिटात जितके पैसे मिळतील ते तुझे .शेवटी तुझीही मेहनत आहेच की.आजच्या रात्रीची कमाई समज ही ..." दुसरीने रिव्हॉल्व्हर काखेखालच्या होस्टरमध्ये ठेवत म्हटले .
होय दोघीही देवीचं आहेत 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, October 8, 2021

दुसरी माळ... रंग ..?? 2021

दुसरी माळ... रंग ..?? 2021
खरे तर तो वॉर्डच किळसवाणा होता. औषध..मलमूत्राची दुर्गंधी ..त्यातच कीटकनाशकांचा वास यांचे एकत्र मिश्रण असलेला वास सतत तिथे पसरून राहिला होता .लास्ट स्टेजला असलेले पेशंट तिथे आणून ठेवले जात होते. कोणाची जखम उघडी तर कोणाच्या अंगावर कपडे नाहीत तर कोणी स्वतःच्या घाणीत झोपलेला.तिथे आलेला पेशंट दोन रात्रच राहत असे तिसरा दिवस पाहतच नसे.पेशंट बरा होण्याचे चान्सेस नसल्यामुळे त्या वॉर्डकडे कोणीच लक्ष देत नसे .
नुकताच नवरात्र सुरू झाले होते .सगळीकडे ठराविक दिवसाचे रंग दिसत होते .आजच तिलाही कोणीतरी त्या वॉर्डमध्ये ऍडमिट केले होते. आपले दिवस फार राहिले नाहीत हे तिच्या लक्षात आले होते. आजाराने तिला पोखरून काढले होते .हाडाचा सापळाच दिसत होता .पण डोळ्यात एक चमक दिसत होती. 
आजच्या रंगाची साडी आणि हातात मध्यम आकाराची बॅग घेऊन तिने वॉर्डात प्रवेश केला तेव्हा ड्युटीवरच्या नर्सने बोटाने तिची बेड दाखवली. एक गोड हसून ती त्या बेडच्या दिशेने गेली.
बेडवरची काळी चादर पाहून तिने नाक मुरडले तशी शेजारची चिमुरडी हसली. 
"कोणी येणार नाही करायला ...असेच राहावे लागेल..ती चिमुरडी म्हणाली.तशी तीही हसली.
 "मग आपणच आपले करू ...." तिनेही  टोला परतवला आणि दोघीही हसू लागल्या .
तिने बागेतून स्वछ डार्क रंगाची चादर काढली .एका फडक्याने आपला बेड स्वछ केला .चादर बदलली बाथरूममध्ये जाऊन चादर धुवायला टाकली.
शेजारची ती चिमुरडी असूयेने तिच्याकडे पाहत होती. "माझी चादर कधीतरी बदलते ती मावशी .."ती चिमुरडी म्हणाली .
"मी बदलेन की ..."असे म्हणून तिने त्या छोटीला उचलले .तिला कमरेखाली काही जाणीवच नाही हे उचलताच लक्षात आले तिच्या.पण तिने तसे दाखवून दिले नाही .उचलताना तिचे कपडे ओलसर लागले . न जाणे किती दिवस तो फ्रॉक तिच्या अंगावर होता .कितीतरी वेळा नैसर्गिक विधी त्यातच झाले असतील. लाज वाटून त्या छोटीने मान खाली घातली .पण हिने अजिबात जाणवू न देता तिला व्हीलचेयरवर बसविले.मग तिचा बेड स्वच्छ केला .त्यावर नवीन चादर घातली. त्यानंतर व्हीलचेयर हळू हळू ढकलत बाथरूमपर्यंत आणली. एव्हड्या कामानेही तिला धाप लागली. तरीही तिला स्वछ करून पुन्हा बेडजवळ आणले .
"त्या पिशवीत माझे कपडे आहेत.त्यातील एक घाल मला..."छोटीने ऑर्डर सोडली. 
तिने हसत ती पिशवी उघडली.आत जुने जीर्ण चार पाच कपडे होते .त्यातील आजच्या रंगाचा ड्रेस काढून तिला घातला .मग अलगद बेडवर बसविले.आणि आपल्याकडील बिस्कीटचा पुडा तिला दिला .
"किती दिवस आहेस तू इथे ..."?? तिने  बिस्कीट खात विचारले .
"माहीत नाही .पण लवकरच जाईन ..."असे म्हणून तिने हात वर केला .
"मी ही जाईन लवकर असे म्हणतात सगळे.रात्री खूप त्रास होतो.....पण माझ्या आधी जाऊ नकोस ...." चिमुरडी डोळ्यात पाणी आणून म्हणाली .
"नाही जाणार ..." तिनेही डोळ्यातील अश्रू लपवित उत्तर दिले .
"उद्या ही आपण नवीन कपडे घालूया ...?? उद्या कोणता रंग आहे ..."?? तिने बाजूच्या कॅलेंडरकडे पाहत विचारले.त्यावर कोणीतरी नवरात्रीचे रंग लिहिले होते .
"हो नक्की ...."तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले .
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने उठून पाहिले तर शेजारची चिमुरडी गाढ झोपली होती पुन्हा कधीही न उठण्यासाठी .
तिने शांतपणे एक फोन केला आणि पलीकडच्या व्यक्तीला छोट्या मुलींसाठी आजच्या रंगाचा एक नवीन ड्रेस आणायला सांगितला.
होय ती देवीचं आहे 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, October 7, 2021

पहिली माळ ......रंग ....??? 2021

पहिली माळ ......रंग ....??? 2021
रात्री होणाऱ्या शोसाठी ती संध्याकाळी लवकरच हॉटेलमधून बाहेर पडली .रस्त्यात किती ट्रॅफिक असतो आणि चाहते कसे आडवे येतात याची तिला चांगलीच कल्पना होती. त्यात नवरात्र सुरू झाले होते.
तिने आजच्या रंगाची साडी नेसली होती.सेलिब्रेटींनी हे सर्व करायलाच हवे.मार्केटिंगचाच एक भाग असतो तो. 
गेले महिनाभर ती राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शो करीत होती .आताही तिचे पोस्टर हॉटेलभर लागले होते . शेवटी आंतरराष्ट्रीय किर्तीची नृत्यांगना होती ती . जगभरात नाव होते तिचे. तिला नुसते पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते.आताही ती बाहेर पडली  आणि बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांकडे पाहून हात हलविला  आणि गाडीत बसली .
"मॅडम... आजचा शो ओव्हरपॅक आहे .शो झाल्यावर पहाटेचे फ्लाईट आहे .उद्या दुपार आणि संध्याकाळ दोन शो आहेत....तिच्या सेक्रेटरीने माहिती दिली.
काही न बोलता तिने मान डोलावली .रस्त्यात एके ठिकाणी गाडी सिग्नलला थांबली तेव्हा गाडीच्या काचेवर टकटक झाली.तिने काच खाली केली तेव्हा समोर आठ वर्षांचा मुलगा हातात थाळी घेऊन उभा होती .त्याच्या अंगावर आजच्याच रंगाचा फाटका शर्ट होता.तिच्या सेक्रेटरीने मान हलवून नकार दिला तेव्हा त्या मुलाने फुटपाथवर एका ठिकाणी बोट दाखविले . कुतूहलाने तिने तिकडे पाहिले.
  साधारण बारा  वर्षाची एक मुलगी लवचिकपणे अंग हलवित नाचत होती. तिच्या अंगावर आजच्याच रंगाचा ड्रेस होता.तिचे पदन्यास पाहून ती अचंबित झाली .घाईघाईने तिने शोफरला गाडी बाजूला लावायला सांगितली .रस्त्याच्या एका कोपऱ्यात गाडी लावून ती कौतुकाने तिचा नाच पाहत बसली.
 नाच संपताच तिच्या भोवतालची गर्दी पांगली आणि पाहणारे आपापल्या रस्त्याने चालते झाले .पुन्हा तो मुलगा तिच्यासमोर येऊन थाळी वाजवत बसला.थाळीत मोजून तीस ते चाळीस रुपये होते.तिने काही न बोलता शंभर रुपयांची नोट टाकली.त्याने नवलाईने त्या नोटेकडे पाहिले आणि गोड हसून आपल्या बहिणीकडे नाचतच गेला.स्वतःशी हसत तीने गाडी सुरू करायची सूचना केली. नेहमीप्रमाणे थिएटरभोवती गर्दी जमली होती . कशीबशी वाट काढत ती आत शिरली आणि सर्व विसरून कार्यक्रमाच्या तयारीला लागली.
नेहमीप्रमाणे तिचा परफॉर्मन्स दमदार झाला. काहीजणांनी तर चक्क नोटा उधळल्या .समाधानाने ती रात्री हॉटेलकडे निघाली. त्या सिग्नलजवळ येताच तिला त्यांची आठवण झाली .मध्यरात्री रस्त्यावर शुकशुकाट होता .वातावरण ही थंडच होते. तिची नजर त्या दोघांना शोधत होती.
 सिग्नलजवळ असलेल्या  बिल्डिंगच्या भिंतीला चिटकून ते दोघे झोपले होते .त्यांना पाहून ती खाली उतरली. तिची चाहूल लागताच त्याची सावध झोप उडाली.समोर तिला पाहताच दोघेही चकित झाले.
" दीदी..... हिनेच आपल्याला शंभर रुपये दिले.... "त्या मुलाने सांगितले.
" छान नाचतेस तू ...तिने तिच्याकडे पाहत म्हटले  आणि पर्समधून हातात येतील तितके पैसे काढून त्यांच्या समोर ठेवले.
"मी ओळखते तुम्हाला. शोरूमच्या टीव्हीत तुमचा डान्स पाहत मी नाचायला शिकले. खूप छान नाचता तुम्ही....तिने  तिला सलाम करीत म्हटले  आणि पैसे तिला परत केले .
आश्चर्यचकित होत तिने ते पैसे हातात घेतले आणि वळली.गाडीजवळ येताच ती थांबली आणि गाडीतील म्युझिक सिस्टीम सुरू केली. त्या म्युझिकच्या ठेक्यावर नकळत तिच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या.साडीचा पदर कमरेत खोचून ती जवळजवळ पंधरा मिनिटे बेभान होऊन नाचत होती. एक जगप्रसिद्ध नर्तिका आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय परफॉर्मन्स देत होती.आणि समोर प्रेक्षक होते ती दोन लहान मुले .
म्युझिक संपले आणि थकलेल्या शरीराने ती त्यांच्यासमोर उभी राहिली .आ वासून ती दोन्ही मुले तिचा तो अप्रतिम परफॉर्मन्स पाहत होते .
"कसा वाटला माझा डान्स ...."?? तिने हसत विचारले .
काही न बोलता ती मुलगी उभी राहिली आणि जसाच्या तसा परफॉर्मन्स तिच्या समोर सादर केला .डोळ्यातील पाणी बाहेर पडू न देण्याचा प्रयत्न करीत  तिचा परफॉर्मन्स  ती पाहत होती .
ते नृत्य संपताच  तिने थाळीतील  नोट काढून तिच्यासमोर धरली आणि पायावर डोके टेकविले .
"ही गुरुदक्षिणा आहे आणि तुमच्या कलेचा सन्मान आहे .जसा तुम्ही संध्याकाळी माझ्या कलेचा केलात .."
 तिने  चकित होऊन हातातील नोटेकडे पाहिले.तीच दुपारची शंभराची नोट होती.
होय त्या देवीचं आहेत
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Monday, October 4, 2021

वन अरेंज्ड मर्डर .....चेतन भगत

वन अरेंज्ड मर्डर .....चेतन भगत 
अनुवाद....सुवर्णा अभ्यंकर 
आज करवा चौथचा उपवास आहे. प्रेरणाने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी लग्नाआधीच उपवास केलाय.तिला भूक लागलीय .तसेही सौरभ आणि प्रेरणाची आवड एकच आहे . ती म्हणजे खाणे. दोघांनाही खाण्याची खूप आवड त्यामुळे दोघेही खूपच हेल्दी आहेत आणि तिच्या आकारमानावरून  केशवने बोललेले सौरभला आवडले नाही . याच कारणावरून दोघात दुरावा आलाय.
केशव आणि सौरभ दोघे मित्र. दिल्लीत एकत्र राहतात . एकाच आयटी कंपनीत काम करतात . दोघे मिळून एक झेड सिक्युरिटी नावाची खाजगी गुप्तहेर एजन्सी चालवतात.
प्रेरणाचा स्वतःचा व्यवसाय आहे. तिचे वडीलांची रमेश मल्होत्राची आलिशान गाड्यांची एजन्सी आहे तसेच ऑटोपार्ट्स बनविण्याचा कारखाना आहे . दिल्लीतील  उच्चभ्रू फ्रेंड कॉलोनीत त्यांचा बंगला आहे. त्यांच्यासोबत पत्नी ,भाऊ ,बहीण ,आई ,प्रेरणा आणि लहान मुलगा राहतात .तसेच नुकतीच अमेरिकेहून आलेली भाची अंजली ही त्यांच्या सोबत राहायला आलीय.
सौरभ प्रेरणाला भेटायला निघालाय.आज प्रेरणा त्याला काही खास गोष्ट सांगणार होती.तिने त्याला बंगल्याच्या मागील दारातून आत यायला सांगितले होते. पण जेव्हा सौरभ तिथे पोचला तेव्हा गच्चीच्या कठड्याजवळ प्रेरणाची ओढणी होती आणि प्रेरणाखाली जमिनीवर पडली होती. 
पोलिसांचा पहिला संशय सौरभवर होता .कारण गच्चीवर तोच सापडला होता.या घटनेच्या वेळी रमेश आणि अंजली सोडून बाकी सर्व घरात होते. रमेश पान आणायला गेले होते तर अंजली ट्रॅकवरून घरी परतत होती. प्रेरणाच्या अंगावर कोणाचेच ठसे नव्हते ,इतर कोणतेही पुरावे नव्हते .
हा खून आहे की आत्महत्या की अपघात ....?? 
रमेश पोलिसांना हात जोडून ही केस बंद करायला सांगत होते . पोलिसांना ही इंटरेस्ट नव्हताच . पण केशव आणि सौरभने याचा छडा लावायचा ठरविले .रमेशचा भाऊ आदित्य यावर पहिला संशयित म्हणून पाहिले गेले आणि ड्रगचा ओव्हरडोस घेतल्यामुळे आदित्यचा मृत्यू झाला ..
मग यामागे कोण असेल ...?? केशव आणि सौरभला खरा खुनी सापडेल का ??
दिल्लीतील हाय प्रोफाईल फॅमिली आणि कार्पोरेट जगाचे उत्तम चित्रण लेखकाने यात केले आहे . अत्याधुनिक डिजिटल साहित्य ,सोशल मीडिया यांचा अतिशय कुशलतेने वापर करून हे रहस्य सोडविले आहे .