Monday, July 31, 2017

पु.ल.

आज पुन्हा पु.ल.चे चितळेमास्तर वाचून डोळे भरून आले .मी काही पु.ल.चा मोठा चाहता नाही .पण जेव्हा जेव्हा भडक ,वादग्रस्तआणि थरारक वाचून कंटाळतो तेव्हा पु.ल.ची आठवण होते.वाचताना तर सगळे काही आपल्याभोवतीच घडतेय असे वाटते .खरेच आपल्या आयुष्यात किती व्यक्ती येतात आणि जातात पण शेवटपर्यंत आठवणीत राहणाऱ्या कमीच .आताच्या पिढीला पु.ल.,व.पु.,श.ना.कोण ते माहीत नसेल किंवा नाव ऐकून असतील .पण मराठी साहित्यात त्यांचे योगदान किती हे वाचूनच लक्षात येते .कधी मिस्कील,तर कधी खदखदून हसण्याला कारुण्याची झालर कधी लागते ते डोळ्यातून पाणी आल्यावरच कळते .ट्रेनमध्ये समोरच्या सीटवर बसलेली व्यक्ती माझ्याकडे विचित्रपणे बघत असते .पण पुस्तक पाहिले की तो समजून जातो .मी खरेच आमच्या आधीच्या पिढीचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली आणि जगभरातील उत्कृष्ट साहित्य वाचायची संधी आम्हाला दिली .कदाचित त्यामुळेच पु.ल.आमच्या हृदयात कायमचे ठाण मांडून बसलेत .
@ किरण बोरकर

Sunday, July 30, 2017

कर्नल नावाचा माणूस ...प्रफुल्ल जोशी

कर्नल नावाचा माणूस ...प्रफुल्ल जोशी
एकाच व्यक्तीने एअर फोर्स आणि पुढे आर्मीच्या सेवेत वेगवेगळ्या पदावर कार्यरत राहून त्याला येणारे वेगवेगळे अनुभव यात मांडले आहेत .लष्करात प्रवेश आणि त्यानंतरचे प्रशिक्षण ,त्याला सामोरे जाताना जवानांची तारांबळ याचेही सुरेख वर्णन लेखकाने केले आहे .

बालवाडी

रडणाऱ्या अथर्वला चुकचुकारत शाळेत घेऊन जाणाऱ्या आशुतोषला पाहून मला हसू आले . नेमके त्यानेही माझ्याकडे पाहिले आणि काय करणार या अर्थाने हात हलविले.
"अजून रडतोच का शाळेत जाताना "?? मी जवळ जाऊन विचारले.
"हो किती समजावतो तरी रोज रडतो.पण शाळेत गेला की गप्प बसतो".आशुतोष हसत म्हणाला.
अथर्व बालवर्गात होता .रोज शाळेत जाताना रडायचा आणि आशुतोष त्याला समजावत घेऊन जायचा.
"भाऊ चला येता का शाळेत ?? थोडा वेळ थांबू आणि येऊ परत".आशूने सहज विचारले.
तशी माझी नाईट ड्युटी होती त्यामुळे मी फ्री होतोच.चल असे म्हणून अथर्वला उचलून घेतले आणि सहज त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.त्याबरोबर तो शांत झाला .आम्ही त्याला शाळेत सोडले .शाळेत शिरताच अथर्व  मित्रांना पाहून खुलला.
आम्ही परत फिरलो पण थोडे अंतर जाताच मी आशूला म्हटले ",चल जाऊन बघू मुले काय करतायत"??
आशूला आश्चर्य वाटले आम्ही अथर्वच्या वर्गाच्या खिडकीतून आत पाहिले.आतमध्ये सर्व मुले छान रमली होती .कोणी एकमेकांना खाऊ देत होते तर कोणी खेळत होते .सर्वांच्या चेहऱ्यावर निरागस भाव ,कसलीही चिंता नाही .बरेच पालक मुलांना खिडकीतून पाहत होते .आशूने डोळे भरून आले.मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले",अण्णाही असेच पहायचे तुला खिडकीतून आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आज तुझ्या चेहऱ्यावर बघतोय मी".डोळे पुसत आशु माझ्याबरोबर बाजूच्या हॉटेलमध्ये शिरला.
"किती गोड मुले आहेत .किती सुंदर आहे त्यांचे विश्व .मी खूप मोठा बनवणार अथर्वला . त्यासाठी वाटेल ते करेन.आता जे काही करणार ते मुलासाठीच." भावनाविवश होऊन आशु म्हणाला.
"खरे आहे तुझे.पण ही आजची निरागस मुले मोठी होतील तेव्हा त्यांना याच आईवडिलांची अडचण होईल .त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल.मग ते तुम्हाला वृद्धाश्रमात टाकतील किंवा दुसरे घर देऊन तुमच्यासाठी चोवीस तास नोकर ठेवतील".माझे हे बोलणे ऐकून आशु हादरला.
"असे का बोलता भाऊ ?? ही मुले अशी कशी वागू शकतात??.आज त्यांच्याकडे बघून कल्पना ही करवत नाही ते असे वागतील".दुखावलेल्या स्वरात आशु म्हणाला.
"जर तुम्ही तुमच्या आईवडीलांशी त्यांच्या समोर नीट वागला नाहीत तर तेही तुमच्याशी तसेच वागणार .लक्षात ठेव आशु .मुले आपल्या आई वडिलांना आदर्श मानत असतात .त्यांच्यासाठी ते सुपरहिरो असतात .त्यामुळे ते जे करतायत ते योग्यच असा त्यांचा विश्वास असतो .आपण जर आपल्या आईवडीलशी योग्य रीतीने वागलो नाही तर उद्या आपली मुले ही आपल्याशी तशीच वागणार. कारण त्यांना तेच योग्य वाटत असते .म्हणून हीच वेळ आहे मुलांना घडविण्याची त्यांच्यात चांगुलपणा निर्माण करायची .बघितलेस ना कसा एकमेकांना खाऊ देतायत ती.नक्कीच त्यांना कोणीतरी हे शिकवले असणारच .तेव्हा तुही अथर्वला पहिला माणूस बनव मग व्यक्तिमत्व घडव".
"खरे आहे भाऊ त्याला डॉक्टर ,इंजिनियर बनवायचा विचार करण्यापेक्षा एक माणूस बनविणे आवडेल मला"आशुतोष मनापासून म्हणाला .हॉटेलचे बिल भरून मी समाधानाने बाहेर पडलो.
@ श्री.किरण बोरकर

Friday, July 28, 2017

व्यक्ती आणि वल्ली ......पु.ल.देशपांडे

व्यक्ती आणि वल्ली ......पु.ल.देशपांडे
पु.ल.च्या नावातच सर्व आले .आणि आमची काय बिशाद त्यांच्या लेखनावर बोलायची .बरेच काही अतिरंजित वाचून झाल्यावर मन रिफ्रेश करण्यासाठी पु.ल. वाचावे. त्यांच्या या व्यक्तिरेखा आज मराठी साहित्यात अजरामर झाल्या आहेत . नारायण अजूनही लग्नात हवाहवासा वाटतो .तर अंतू बर्वे ,चितळे मास्तर ,सखाराम गटणे आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात .जास्त काही लिहीत नाही कारण तेव्हडी पात्रता नाहीच माझी .

Thursday, July 27, 2017

पाठमोरा ......नारायण धारप

पाठमोरा ......नारायण धारप
वेगळे काहीतरी पाहिजे म्हणून नारायण धारपची पुस्तके वाचायला काही हरकत नसते .त्यांच्या भयकथा चांगल्या असतात . त्यातीलच हा एक भयकथा ,गूढकथा संग्रह . यातील काही कथा खूप छान आहेत .अंगावर काटा आणणाऱ्या तर काही कथा आधीच पुढे काय घडणार त्याची कल्पना देतात .एकदा वाचून पाहायला हरकत नाही .

पाऊस आणि रक्षाबंधन

आज काही पाऊस थांबण्याचे नावही घेत नव्हता .रात्रीपासून धो धो कोसळत होता . तिची नेहमीप्रमाणे ऑफीसची तयारी चालू होती .स्वतःची तयारी करता करता सोनूलीचीही शाळेची तयारी चालू होती.
"आई.. किती जोरात पाऊस आहे .संध्याकाळी लवकर ये" .तिने ऑर्डर सोडली.
"नाही बाळा आज रक्षाबंधन आहे ना!!मामाकडे जायला हवे.त्याला राखी नको का बांधायला"तिने समजावले.
"पण मामा तर कधीच आपल्याकडे येत नाही आणि तू तर फक्त रक्षाबंधनला जातेस.मी तर कधीच पाहिले नाही त्याला".सोनूली थोड्या रागानेच म्हणाली.
ती गंभीर झाली. काय उत्तर द्यावे कळले नाही .तरीही थोड्या वेळाने बोलली", येईल ग तो.त्याला जमेल तेव्हा नक्की येईल".
पण तो येणार नाही हे तिला पक्के माहीत होते .पण ही मात्र न चुकता रक्षाबंधनला  त्याच्याकडे जात होती.दरवर्षी जुलै महिन्यात जोरात पाऊस पडला की तिला त्याची आठवण यायची आणि तिचा थरकाप उडायचा.
त्यावेळी दुपारी जोरात पाऊस सुरू झाला .ही सात महिन्याची गरोदर .दोन दिवसांनी सुट्टीवर जाणार होती .ऑफिसने सर्वाना घरी जाण्याची परवानगी दिली .सर्वांसोबत ही पण बाहेर पडली.ट्रेन,बसेस बंद म्हणून पायीच निघाली .मिस्टरही फॅक्टरीत अडकून पडलेले .जिथे पाणी नाही असे रस्ते गल्ल्या शोधता शोधता कधी इतरांपासून वेगळी पडली ते तिलाच कळले नाही .वाढलेल्या पोटामुळे तिच्या हालचाली हळू होत होत्या.अजून एक शॉर्टकट मिळेल म्हणून ती एका गुढगाभार पाणी असलेल्या गल्लीत शिरली .पण आत शिरताच तिच्या लक्षात आले पाण्याची पातळी वाढते आहे .पाणी गुढग्याच्या वर शिरताच तिला भीतीने कापरे भरले .आजूबाजूला मदतीसाठी कोणीच नव्हते . तिच्या तोंडातून भीतीने किंकाळी कधी बाहेर पडली ते तिला कळलेच नाही.इतक्यात कुठूनतरी तो धावून आला.स्वतःची पर्वा न करता पाण्यात उतरला आणि तिचा हात पकडला.
"घाबरू नका ताई ,काही होणार नाही .मी आह".असे बोलून आश्वासक हसला. त्याच्या स्पर्शात एक आधार आणि आपलेपणा होता .हळू हळू तो तिला बाहेर घेऊन आला .ती भीतीने थरथर कापत होती . भानावर येऊन तिने त्याच्याकडे पाहिले .तो 25/26 वर्षाचा उमदा तरुण होता . हसतमुख आणि प्रसन्न चेहरा "बरे वाटते ना ताई ?? त्याने हळुवारपणे विचारले."पूर्ण भिजला आहात तुम्ही .माझ्या घरी बसा थोडावेळ मग निघा". तिची अवघडलेली स्थिती पाहून त्याने सांगितले.
काही न बोलता ती त्याच्या मागून निघाली .कोण??कुठला??कुठे राहतो?? याची चौकशी न करता ती त्याच्या मागून निघाली .एक विश्वास त्याच्या हलचालीतून जाणवत होता.त्याच्या घरात शिरताच ती अवघडून गेली.एक छोटीशी खोली त्यात कोपऱ्यात बसलेली ती वृद्ध बाई .बहुतेक त्याची आई असणार .टीव्ही समोर बसलेली तरुणी त्याची बहीण असणार .ती आत शिरताच दोघींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले .तेव्हा त्याने दोघींना सर्व कल्पना दिली .ते ऐकून त्यांचा चेहरा खुलला.आईने स्वतःकडची  साडी नेसायला दिली तर बहिणीने गरम चहा आणि बिस्किट्स समोर ठेवली .आणि मग तिघीही छान गप्पा मारीत बसल्या.
थोड्यावेळाने तो आत आला आणि म्हणाला "ताई तुम्हाला घरी सोडायची सोय केली आहे निघुया"? 
सर्वांचा निरोप घेऊन ती डोळे पुशीत बाहेर पडली .तो अर्ध्या रस्त्यात तिच्या बरोबर आला आणि एक ग्रुपमध्ये तिला सोडले .त्या ग्रुपने मग सर्वाना सुखरूप घरापर्यंत सोडले .घरात शिरताच अति थकाव्याने सरळ झोपून गेली .दुसऱ्यादिवशी माहेरी निघून गेली.तेव्हापासून दर रक्षाबंधनला ती त्याच्या घरी जात होती.सोनूलीच्या हाकेने ती भानावर आली आणि तिचा पापा घेऊन ऑफिसला गेली .
संध्याकाळी राखी घेऊनच ती त्याच्या घरी गेली .दार घडून आईने हसतमुखाने तिचे स्वागत केले.
"दरवर्षी न चुकता येतेस.नाहीतर याची सख्खी बहीण बघ.परदेशात गेली आणि  तिथलीच झाली .आता फक्त पोस्टाने राखी पाठवते."
ती हसून आत गेली आरतीचे तबक सवयीने तयार केले आणि पर्समधून राखी आणि ताज्या फुलांचा हार काढुन त्याच्या फोटोसमोर उभी राहिली .फोटोमधील हसरा चेहरा पाहून तिला डोळ्यातून अश्रू टपकले.तिला त्या ग्रुपमध्ये सोडून गेल्यावर तो इतरांना मदत करायला गेला आणि एका बेसावध क्षणी स्वतः वाहून गेला .त्यादिवशी ती घरी पोचली पण तो काही जिवंत पोचला नाही. न जाणे किती जणांचे प्राण वाचवले असतील त्याने.पण स्वतःला वाचवू शकला नाही .तिने त्याच्या फोटोला नवीन हार घातला ,राखी जवळ ठेवली ओवाळणी करून निघाली ती परत पुढच्यावर्षी येण्यासाठी .

@किरण बोरकर

Tuesday, July 25, 2017

तरुण आजोबा

त्या पंच्याहत्तर वर्षाच्या तरुण आजोबांनी मला समोर पाहताच जोरदार मिठी मारली .त्या स्पर्शातच जुनी आपुलकीची भावना जाणवली .बऱ्याच दिवसांनी गार्डनमध्ये गेलो होतो तेव्हा नेहमीच्या जागी त्यांची गाठ पडली .अजूनही त्यांचा स्वभाव बदलला नव्हता .
"कसा आहेस ?? आज बऱ्याच वर्षांनी भेटतोस".त्यांनी आपुलकीने सर्वांची चौकशी केली .मीही हसून उत्तरे देत होतो.
आम्ही गार्डनमध्ये अभ्यास करीत असताना आमच्यात येऊन बसायचे . काही हवे नको ते पहायचे जणू आमच्या सेवेसाठी सिद्धिविनायकाने त्यांना नेमले होते असे सर्व विनोदाने म्हणायचे .अजूनही त्यांचे तेच कार्य चालू होते फक्त मुले बदलत होती .
"म्हातारी कशी आहे ? मी नेहमीच्या पद्धतीने विचारले.
"अरे गेली ती .तीन वर्षे झाली.बरे झाले .खूप भांडणे व्हायची आमच्यात .खूप बडबडायची मला .खूप त्रास व्हायचा .मग मी इथे येऊन बसायचो .ती गेली तेव्हा फारसे दुःख नाही झाले .आता कळते की एकमेकांपासुनचा दुरावा सहन करण्यासाठीच ती भांडत होती .उत्तरार्धात जोडीदाराने  साथ सोडून जाणे यासारखे दुःख नाही आणि ते दुःख सहन करण्याची ताकद यावी म्हणून ती भांडत असेल असा मी ग्रह करून घेतो ".ते हसत म्हणाले पण डोळ्यातील वेदना लपवू शकले नाहीत .
"मग आता काय चालू आहे ?? मी विषय बदलला.
" अरे नेहमीचेच ...इथे येऊन या मुलांच्यात बसायचे .त्यांना हवे नको ते पहायचे .मध्येच त्यांच्या चर्चेत भाग घेऊन नवीन काहीतरी कळते ते ऐकून घ्यायचे." ते हसत म्हणाले.
"म्हणजे थोडक्यात आम्ही जे तुमच्यासोबत करत होतो तेच चालू आहे ". मी हसून म्हटले .
"हो !! तसेच समज. पण ही पोर तुमच्यापेक्षाही हुशार आहेत .मी त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी  शिकतो आणि त्यांना माझ्या काळातले शिकवतो .आता बघ ना ते मला अर्जितसिंगची गाणी ऐकवतात तर मी त्यांना हेमांतकुमार ,शमशाद बेगम ऐकवतो .ते माझ्याशी आताच्या राजकारणावर चर्चा करतात मी त्यांना दुसरे महायुद्ध ,1965,1971 चे युद्ध सांगतो .मी त्यांना काही शिकवायला जात नाही तर त्यांच्यातला होऊन त्यांना चूक काय आणि बरोबर काय याची चर्चा करतो .पण एक सांगतो ,घरी माझे ऐकायला माझ्याशी बोलायला कोणाला वेळ नाही पण इथली मुले अभ्यासाचा कंटाळा आला की माझ्याशी गप्पा मारायला येतात .माझ्यासाठी खाण्याचा एक हिस्सा काढून ठेवतात .तर कधी कधी मला टार्गेट बनवून खूप खेचतात .खरेच माझ्या आयुष्याचा पूर्वार्ध खूपच त्रासाचा गेला पण उत्तरार्ध मात्र मजेत चाललाय".असे बोलुन त्यांनी माझा हात हाती घेतला .मीही हसून त्यांना साथ दिली.
@किरण बोरकर

Sunday, July 23, 2017

आणि मग एक दिवस ....नसीरुद्दीन शाह

आणि मग एक दिवस ....नसीरुद्दीन शाह   अनुवाद ..सई परांजपे
एक अतिशय प्रामाणिक आत्मकथन. मी कसा आहे, कसा घडलो,याचे परखड तर कधी मिस्कील भाषेत नसीरुद्दीन शाहच्या पुस्तकात वाचायला मिळते .मुख्य म्हणजे त्यांनी या गोष्टींचे समर्थन करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही .वाचताना असे वाटते की ते आपल्याशी गप्पा मारतायत.अनुवादक म्हणून सई परांजपे यांची योग्य निवड त्यांनी केली .खरेच.....माणूस कसा घडत जातो हे कळते अशी पुस्तके वाचूनच

डिप्रेशन

"डिप्रेशन म्हणजे काय"??? तोंडात शेंगदाणे टाकत अजयने विचारले तसा विक्रम वैतागला.
"गप्प पी ना?कशाला नको ते विषय काढतो.गटारीची वाट लावू नको".असे म्हणत मोठा घोट घेतला.
अजयने माझ्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिले तर मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो.अजयने काही न बोलता परत शेंगदाणे तोंडात टाकले .आज गटारी साजरी करायला आम्ही एकत्र आलो होतो .अजय ही आमच्यात येऊन बसला होता.
"माझी एक मैत्रीण सांगत होती तिला डिप्रेशन आलय",.तसा विक्रम सावरून बसला .मीही ताबडतोब नजर वळवून अजयकडे पाहिले.
"कोण रे कोण ?? काय झाले तिला ?? मदत हवीय का"?? ताबडतोब विक्रमचा मारा सुरू झाला. ते पाहून नेहमीप्रमाणे मी माघार घेतली.
"अरे आहे एक, हल्ली खूप एकटे एकटे वाटते तिला.नकारात्मक विचार येतात मनात .आयुष्यात काय घडणार आपल्या याची चिंता.त्या दिवशी मला फोन करून म्हणते खूप अस्वस्थ आहे मी .डिप्रेशन आलंय .च्यायला मला काही कळले नाही म्हणून तुम्हाला विचारतोय"
"अरे असे होय !!..असे बोलून विक्रमने परत ऑर्डर रिपीट केली .
"झाले ......!!आता हा सुरू होणार" मी मनातच बोललो आणि अजयला मनोमन शिव्या दिल्या.
"अरे तिला सांग ना मला भेटायला.मी बोलेन तिच्याशी",.विक्रमचा आवाजही बदलला.
"तुला माहितीय का डिप्रेशन म्हणजे काय ?? तुला आयुष्यात कधीच येणार नाही ते . उगाच त्या बाईला अजून डिप्रेशन मध्ये घालवू नकोस".अजय हसून म्हणाला.मीही जोरात हसून त्याला साथ दिली.
"ओके मग तुम्ही सांगा"?? विक्रमही चिडला.
"अरे मला काय माहित.तेव्हडा विचार करायला वेळ तरी आहे का ??सकाळी साडेपाचला दिवस चालू होतो माझा .पहिली माझी तयारी ,मग निहारची तयारी .मग दोघेही बाहेर पडतो.निहार कॉलेजला जातो तरीही अर्ध्यावाटेपर्यंत मी बरोबर हवा असतो त्याला .त्याच्याबरोबर गप्पा मारता मारता रस्ता कसा पार होतो ते कळत नाही .त्या नंतर ऑफिसची कामे . साला वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही . येताना ट्रेनच्या गर्दीत स्वतःला ऍडजस्ट करता करता स्टेशन येते .घरी आल्यावर चहा पाणी करण्यात वेळ जातो .मग बायकोशी गप्पा ,टीव्ही पाहणे ,निहारचे प्रॉब्लेम सोडविणे यातच दिवस निघून जातो .तसे  आर्थिक अडचण असतेच म्हणा तोच काय प्रॉब्लेम .पण त्यावरही विचार करता करता वेळ निघून जातो".अजय ने आपली बाजू क्लिअर केलीआणि माझ्याकडे पाहिले.
मी हसलो ",आपला प्रत्येक दिवस लढण्यातच जातो तर मनात दुसरा विचार येईल कसा .सकाळी उठतो तेव्हाच रात्रीपर्यंतच्या कामाचे प्लॅनिंग डोक्यात तयार असते.त्यामुळे डोके रिकामे नसतेच .जातानाही ट्रेनमध्ये छान पुस्तक वाचत जायचे तेव्हा कुठे फ्रेश मूडमध्ये फॅक्टरीत शिरतो . एकदा कामाला सुरवात केली की दुसरा विचारच नसतो कारण आजूबाजूची मंडळी ही त्याच विचारात असतात .परत घरी येताना विंडो सीट जवळ बसून पुस्तक वाचायची हौस पूर्ण करायची .घरी आल्यावर सौ आहेचसोबतीला .काहींना काही कामे काढतेच ती .आणि भविष्याचा विचार करायचा किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तिच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतो त्यामुळे मानसिक आधार आणि पाठिंबा असतोच .माझेही मन कुठे रिकामे असते ",असे बोलून मी ग्लास रिकामा केला .
"च्यायला मी तर कधीच कोणताच विचार केला नाही. ना आजचा ना उद्याचा .पहिल्यापासून माझे छानच चालू आहे . मनासारखे शिक्षण ,मनासारखी नोकरी आणि मनासारखा संसार त्यामुळे कसलेच टेन्शन नाहीय मला . जे प्रॉब्लेम पैश्यानी सुटत नाही ते तुमच्याशी चर्चा करून सुटतात याचा अनुभव आहे मला.मुलंही हुशार निघाली त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर लक्ष देण्याची वेळ आली नाही .बाप सर्व काही देईल पण चुकीला फटकावेल हे माहीत आहे त्यांना .मला काम असले की ते संपेपर्यंत कुठेच लक्ष देत नाही.घरी असलो की नातेवाईकांकडे जा. नाटक सिनेमाला जा .पाहिजे ते खा. हे कुटुंबाबरोबर चालूच असते .मला गप्प बसणेआवडत नाही .बायकोशी भांडण जरी  झाले तरी मी मित्रांना सांगतो .च्यायला मनात काही राहतच नाही आपल्या .काय भाऊ ?? खरे ना ??विक्रम माझ्याकडे पाहत म्हणाला. मी हसून मान डोलावली.
" थोडक्यात डिप्रेशन म्हणजे काय?? हे आपल्याला माहीत नाही आणि त्यावर विचार करायलाही आपल्याला वेळ नाही ",असे बोलून मोठ्याने हसत अजयने आम्हाला टाळी दिली .मीही वेटरला बिल बनवण्याची खूण केली.
@ किरण बोरकर

Friday, July 21, 2017

मॅटर्स ऑफ द हार्ट ...डॅनियल स्टील

मॅटर्स ऑफ द हार्ट ...डॅनियल स्टील अनुवाद ..माधव कर्वे
होप डन एक जागतिक किर्तीची फोटोग्राफर एकाकी आयुष्य जगत असलेली तर ओनील फील हा नामांकित लेखक त्याच्या सगळ्या कादंबऱ्या हिट झाल्यात . फोटोशूटच्या निमित्ताने दोघे एकत्र येतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात .होपच्या माजी नवऱ्याने तिच्यासाठी अगणित पैसा मागे ठेवलाय . फिन बरोबर राहत असताना होपला अनेक विचित्र आणि खटकणार्या गोष्टी आढळतात . शेवटी नाइलाजाने ती त्या गोष्टींचा पाठपुरवठा करण्याचे ठरविते . आणि तिच्या समोर येतात अनपेक्षित गोष्टी. त्याला ती कशी सामोरी जाईल ते वाचणे खरोखरच थरारक आहे .

तनु

हातातील सिगारेटचा शेवटचा झुरका मारून तनु सोसायटीच्या गेटमधून आत शिरली तेव्हा साडे अकरा झाले होते .सिक्युरिटीच्या नजरेतल्या चमकेकडे लक्ष न देता ती लिफ्टमध्ये शिरली . तिला पाहूनच आतील दोघे गप झाले . आता पाठीमागून आपल्याला ते न्याहाळत असणार याची तिला जाणीव होतीच .शक्य असते तर नजरेनेच बलात्कार केला असता त्यांनी . ती होतीच तशी .मुळात उत्तरेकडून आल्यामुळे शरीर प्रमाणबद्ध . योग्य त्या ठिकाणी उठावदार . उच्चशिक्षित असल्यामुळे भाषेवर प्रभुत्व .आणि इथे मोठ्या पदावर नोकरी त्यामुळे पगारही उत्तम . या साऱ्यांचे परिणाम तिच्या वागण्यावर आणि देहबोलीतून व्यक्त होत होतेच. तिचे आईवडीलही उच्चपदावर काम करीत होते त्यामुळेच तिच्यावर संस्कारही उच्च होते . समोरच्याला तुच्छ कसे मानावे हे तिच्याकडून शिकावे.
लिफ्टमधून बाहेर पडली तरी तिच्या अस्तित्वाची जाणीव परफ्यूम करून देत राहिला.दरवाजा उघडून ती आत आली आणि सरळ बेडवर ताणून दिली . दिवसभर कॉम्पुटर ,प्रोजेक्ट ,मिटींग्स यांनी कंटाळून गेली होती . सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 11 हाच प्रोग्रॅम होता तिचा. थोडयावेळाने उठून संपूर्ण कपडे काढून सरळ बाथरूम मध्ये घुसली . शांतपणे शॉवर घेऊन तशीच बाहेर आली .परत पाकिटातून सिगारेट काढून खिडकीतून बाहेर पाहत बसली.
इतक्यात तिचा मोबाईल वाजला पाहिले तर जेनीचा फोन होता . "चल ग बाहेर जाऊया ?? तिने अधिकार वाणीने सांगितले ." नवीन पब पाहिलंय तिथे जाऊ." तिने ओके म्हटले . काहीवेळाने ती तयार झाली . शरीराला चिकटून बसणार तंग वनपीस .अर्ध्याच मांड्या झाकलेल्या . शरीराचे उठावदार भाग योग्यप्रमाणात दाखविणारा . कॅब ड्राइव्हरची वासनेने भरलेली नजर पाहून ती थोडी सुखावली . पबमध्ये शिरताच तिला उत्साह आला .सगळं थकवा निघून गेला . टकीलाचे दोन शॉट मारून ती डान्स फ्लोअर वर गेली आणि धुंद होऊन नाचू लागली . कोणाचे हात आपल्या शरीरावरुन कुठे कुठे फिरतायत याची जाणीवही तिला नव्हती.मनसोक्त पिऊन ,खाऊन ,नाचून बाहेर पडली तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते . अडखळत्या पावलांनी त्यांनी कॅब बुक केली आणि बेहोष अवस्थेत घरी पोचली .
@किरण बोरकर

Thursday, July 20, 2017

देऊळ

खरे तर रोजचे टपाल बघण्याचा अमितकुमारला कंटाळाच होता.पूर्वी ठीक होते,तो नवोदित कलाकार होता त्यावेळी प्रत्येक पत्र महत्वाचे वाटत होते.पण आज तो मोठा सुपरस्टार होता वर्षातून किमान दोन तरी चित्रपट सुपरहिट होत होते.
पण आजच्या टपालात होती एक निमंत्रण पत्रिका.त्याच्या बालपणीच्या मित्राने गावातून पाठवली होती .गावातील देवळातील उत्सवाचे . पर्यटन मंत्री ही येणार होते .
ते पाहून अमितकुमार जुन्या आठवणीत गेला .साधारण बारा वर्षांपूर्वी अमित एक नवोदित अभिनेता होता . एके दिवशी रात्री शूटिंगवरून परत येताना घाटात गाडी बंद पडली.आजच त्याला सर्वोत्तम अभिनेत्याचे पारितोषिक मिळाल्याची बातमी फोन करून निर्मात्याने सांगितली होती.दोन दिवसात अधिकृतरित्या जाहीर होईल असे म्हणाला आणि त्याच आनंदात तो घरी निघाला होता.पण गाडीने दगा दिला . इतक्यातसमोरून एक माणूस सायकलवरून येताना दिसला . जवळ आल्यावर त्याचा चेहरा पाहून अमित आनंदाने ओरडला "अरे सदा तू" ?? समोरच्यानेही ताबडतोब मिठी मारली .गाडीचे कळताच सदानंद उर्फ सदा त्याला आपल्या घरी घेऊन गेला . घाटाच्या रस्त्यापासून दोन किलोमीटर वर त्याचे गाव . मोजून शंभर वस्तीचे . सदाला पूर्वीपासून अध्यात्माची आवड त्यामुळे तो इथेच स्थायिक होता. रात्रभर मुक्काम केल्यावर अमित सकाळी निघाला. जाता जाता सदाने त्याला गावाच्या मंदिरात येण्याची विनंती केली .सदाच्याविनंतीला मान देऊन अमित देवळात आला .आठवण म्हणून सदाने त्याच्याबरोबर फोटो काढले .नंतर ही गोष्ट तो विसरूनही गेला.
काही महिन्यांनी त्याची मैत्रीण आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री माया मोठ्या आजारातून बरी झाली आणि तिला काही दिवस शांत ठिकाणी विश्रांतीसाठी जायचे होते . अमितने तिला सदाच्या गावी जाण्यास सुचविले . तिथे तिला त्रास देणारे कोणी नव्हते आणि ओळखणारे ही . तिलाही ते गाव आवडले . रोज सकाळी देवळात जाणे ,नदीकिनारी बसणे तिला आवडायचे .आठ दिवस गावात राहून ती घरी परतली .त्यानंतर अमित मोठा सुपरस्टार झाला त्याचे नाव ही अमितकुमार झाले .
काही वर्षांपूर्वी त्याच्या ओळखीने एक चित्रपटाचे शूटिंगही तेथे झाले .आज ते देवूळ इतके फेमस कसे झाले याची अमितकुमारला उत्सुकता होती .ठरल्या वेळी अमितकुमार तिथे गेला त्याला पाहताच सदाने कडकडून मिठी मारली .मंदिरात खूप गर्दी होती काही ठिकाणी त्याचे आणि मायाचे मंदिरातील फोटो बॅनर वर झळकत होते
"सदा खूप मोठे आणि प्रसिद्ध झाले मंदिर .कसे काय घडले हे "??? अमितकुमारने विचारले .
"अरे या मागे तूच आहेस."सदा हसत म्हणाला आणि अमितकुमार ला धक्का बसला."अरे काही वर्षांपूर्वी तू या मंदिराला भेट दिलीस आणि नंतर तुला अवॉर्ड मिळाले.मी त्याची इथे जाहिरात केली .तुझे फोटो लावले सगळीकडे .त्यानंतर माया मॅडम आली तिचा आजार बरा झाला हे सांगत मी तिचेही फोटो सगळ्या गावात प्रसिद्ध केले .त्यानंतर या गावात ,देवळात चित्रपटाचे शुटिंग झाले.मी त्याचीही प्रसिद्धी केली . हळू हळू सगळीकडे या देवळाची कीर्ती पसरली .त्याचवेळी या गावातील एक कार्यकर्ते आमदार म्हणून निवडून आले .मी त्याचाही फायदा घेतला . आज ते पर्यटन मंत्री झालेत त्याचा फायदा घेऊन मी हा उत्सव आयोजित केला .आज तुमच्यामुळे हे देऊळ फार प्रसिद्ध झाले आहे . नवसाला पावणारा देव म्हणून याची ख्याती सर्व दूर पसरली आहे ".ते ऐकून मी सदाला कोपर्यापासून हात जोडून नमस्कार केला.
@किरण बोरकर