Saturday, October 28, 2017

मैत्र ....... पु. ल. देशपांड

मैत्र ....... पु. ल. देशपांडे
मौज प्रकाशन
पु.ल.च्या नजरेतून लेखणीत उतरलेले जेष्ठ थोर व्यक्तिमत्त्वे म्हणजेच मैत्र . खरेच पु. ल.अतिशय भाग्यवान त्यांना अशी थोर माणसांची  संगत लाभली .यातली नावे वाचूनच आपली मान आदराने झुकते .महान गायिका केसरबाई ,थोर सेनानी नानासाहेब गोरे ,छत्रपती शाहू महाराज ,दादा धर्माधिकारी ,ज्योस्ना भोळे ,तर त्यांचे आवडते लेखक वूडहाऊस आणि डोळ्यातून आसवे  काढणारी बेगम अख्तर अश्या अनेकांच्या आठवणी इथे आहेत.खरेच पु. ल. महान का आहेत हे पुस्तक वाचताना कळते . 

Friday, October 27, 2017

अशोक सिध्येय

माझी आणि त्यांची ओळख नव्हतीच .आम्ही दोघेही विरुद्ध स्वभावाचे.तसे ते माझ्या मित्राचे वडील .पण वयाच्या सत्तरीनंतरही स्मार्टफोनद्वारे व्हाट्स अँप फेसबुकचा वापर प्रभावीपणे करणारे . एका पुस्तक परिक्षणामुळे आमची ओळख झाली . हळू हळू मला त्यांची तत्वे समजत गेली . ते ज्योतिषशास्त्र,पत्रिका पहायचे .माझा कधीच यावर विश्वास नव्हता .ते जुने स्वातंत्रसंग्राम पाहिलेले त्यामुळे राजकारण हा आवडीचा विषय .मला राजकारण कधीच आवडले नाही .ते कॉंग्रेसप्रिय त्यामुळे दुसऱ्या पक्षांवर सणकून टीका करायचे ,मी मध्येमध्ये  मुद्दाम बत्ती लावायचो.तरीही आमच्यात वाद कधीच झालेच नाही . त्यांच्या फेसबुकच्या कंमेंटवर मी कधीकधी उपरोधिक कंमेंट करायचो पण त्यांनी कधी लक्ष दिले नाही.
पण त्यांना माझे लेखन आवडायचे  तसेच माझ्या पत्नीच्या कविताही आवडायच्या. खूप कौतुक करायचे . यावयात आपल्या मनातली मळमळ ते फेसबुकद्वारे व्यक्त करायचे .फेसबुक त्यांच्यासाठी उत्तम व्यासपीठ होते . दिलेला शब्द पाळणे हा ही त्यांचा स्वभाव गुण . आमच्या स्टार्ट गिविंगच्या कार्याला मदत म्हणून  एका  टीव्हीचा खर्च मी देतो असे सांगितले . मी सवयीप्रमाणे द्याहो आरामात असे बोलून मोकळा झालो .पण त्यांनी पैसे माझ्या कंपनीच्या गेटवर येऊन दिले . आता आहेत ते घेऊन ठेव नंतर संपतील असे म्हणत पैसे हातात दिले . मधेच पुण्यात एका व्यक्तीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली त्यांना हे कळताच ताबडतोब काही पैसे त्याला पाठवून दिले . शिक्षणक्षेत्रात कोणतीही मदत करायला ते नेहमीच तयार असतात .असे हे आमचे सर्वांचे बाबा श्री. अशोक सिध्येय . आज या वयातही सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आपल्या परीने समाजाला काहीतरी देण्याचे प्रयत्न करतायत. समाजाचा एक हिस्सा बनून आपली मते स्पष्टपणे सोशल मीडियावर मांडतायत . भले कोणी त्यांच्याकडे  लक्ष देवो न देवो ते त्यांच्या मनाला पटते ते करीत राहणार.
बाबा तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहो हीच इच्छा.
© श्री. किरण बोरकर

Thursday, October 26, 2017

अण्णा

दिवाळीच्या दिवशी कामावर जाताना अमित चौगुलेला नेहमी घाम फुटायचा .त्यातही नाईट शिफ्ट असेल तर जास्तच घाबरायचा तो . कारणही तसेच होते .काही  वर्षापूर्वी घडलेली घटना आठवून त्याचा जीव धडधडायचा.
त्यादिवाळीच्यादिवशी नेहमीप्रमाणे पाण्याचा टँकर डिझेल टॅंकजवळ उभा होता . दरवर्षीची ठरलेली गोष्ट होती ती. आजूबाजूला वाजणाऱ्या फटाक्यांमुळे काही नुकसान होऊ नये म्हणून तो टँकर दोन दिवस तिथेच राहणार होता . टँकरचा चालक केरळचा अण्णा होता . सर्वजण त्याला अण्णाच म्हणत . आताही अण्णाच दोन दिवस टँकरमध्ये मुक्काम करणार होता . त्यादिवशी दिवसभराचे काम आटपून सर्व घरी गेले आणि रात्री फॅक्टरीत सन्नाटा पसरला .  अधून मधून वाजणाऱ्या फटाक्यांचा आवाजच ऐकू येत होता . फॅक्टरीत पुढच्या आणि मागच्या गेटजवळ मिळून तीन सिक्युरिटी .दोन इलेक्ट्रिशियन ,दोन ऑपरेटर आणि अमित चौगुले असे मोजकेच लोक होते .हळू हळू रात्र चढत गेली . गप्पा मारता मारता सर्वाना डुलक्या येऊ लागल्या . शेवटचा राऊंड मारून आता झोपून जावे या विचाराने अमित चौगुले निघाला.बॅक गेटजवळ येताच अचानक टँकरमधून अण्णाने खाली उडी मारली आणि धावत धावत सिक्युरिटीपाशी आला आणि जोरजोरात सिक्युरिटीला बडबडू लागला . "साला...! तुम लोग बिनधास्त सो जाते हो और वो दो लोग एक औरंत को लेकर अंदर आ गये. मुझे गाली देकर नीचे बुला रहे है. नीचे उतर... नहीं तो मार दालुंगा ऐसें बोल रहे है . मै घबरकार यहा आया. वो देखो अंदर जा रहे है...!!
त्याचा अवतार आणि आवाज ऐकून अमित आणि सिक्युरिटी समजला याला धक्का बसला आहे . त्यांनी शांतपणे त्याला समजावत मेन गेटपाशी आणले . गरम चहा पाजून तिथेच झोपायला जागा दिली . आता टँकरमध्ये स्वतः अमित देवाचा धावा करीत बसला . त्यात त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही.
सकाळी उठून अमित घरी गेला.जाताना पाहिले तर अण्णा शांतपणे झोपला होता . दुसऱ्या दिवशी अमित कामावर सकाळीच हजर झाला . आल्या आल्या सर्व जण त्याला अण्णाबद्दल विचारू लागले . त्याने होती ती माहिती साहेबांना दिली.पण त्याला धक्कादायक बातमी कळली.त्यादिवशी अण्णा उठून टँकर घेऊन मालकाच्या घरी गेला आणि मालकाला शिवीगाळ केली . परत टँकर घेऊन गेला तो अजून सापडला नाही . संध्याकाळी टँकर एक रस्त्यावर आढळला पण त्यात अण्णा नव्हता .तोही दिवस असाच निघून गेला.
दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक बातमी आली अण्णा सापडला पण मृत.... बापरे .....अमित हादरून गेला . एका बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीत अण्णाचा फुगलेला देह सापडला.बरे त्या बिल्डिंगचा आणि अण्णाचा काहीही संबंध नव्हता . पाण्याला विचित्र वास येऊ लागला म्हणून काही जण पाण्याची टाकी चेक करायला गेले आणि टाकीचे झाकण उघडताच अण्णाचा फुगलेला मुडदा दिसून आला . टाकीचे झाकण फोडून त्याला बाहेर काढावे लागले .अमितच्या दृष्टीने खरेच ही अतिशय धक्कादायक घटना होती . आणि ही घटना तो कधीही विसरणार नाही .
© श्री. किरण बोरकर

Sunday, October 22, 2017

भाऊबीज

सुप्रसिद्ध सुपरस्टार अमितकुमार आज खुश होता . दरवर्षी दिवाळी आली की तो खुश असायचा .जवळच्या नातेवाईकांना,मित्रमंडळींना महागडी गिफ्ट देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तो खुश व्हायचा. आपल्या महागड्या गिफ्ट्समुळे लोक खुश होताना पाहून त्याचा अहंकार सुखायचा.आज भाऊबीज म्हणून बहिणीला उंची घड्याळ घेतले होते आणि महागडा ड्रेस घेतला होता.बहिणीच्या चेहऱ्यावरील भाव बघून त्याला आनंद होणार होता . आणि झालेही तसेच.
त्या आनंदातच तो परत निघाला.पैसा असला की आनंद विकत घेऊ शकतो अशीच त्याची समजूत होती.रस्त्यात त्याला देवा भेटला.देवा ..त्याचा लहानपणापासूनचा मित्र . त्यालाही आपली श्रीमंती दाखवू आज या विचाराने त्याने गाडी थांबवली. त्याला पाहून देवा खुश झाला.
"सायबा ..!! कुठे ?? अमितकुमारने ऐटीत विचारले.
"बहिणीकडे... भाऊबीजेला.".  देवा उत्तराला.
"चल बस सोडतो तुला.आज भरपूर वेळ आहे "देवा त्याच्या बाजूला बसला . गाडीत बसताना देवाचे चकाकलेले डोळे पाहून अमितकुमार सुखावला . ते दोघेही देवाच्या बहिणीकडे आले . आता शिरताच त्याला पाहून त्या छोट्या खोलीत गडबड उडाली . काही वेळातच देवा ओवाळणीसाठी बसला . ओवाळणी करताना दोघांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून अमित कुमार चमकला . अरे हेच भाव आता आम्हा भाऊ बहिणीच्या चेहऱ्यावर होते . ओवाळणी म्हणून देवाने बहिणीला छानसे घड्याळ गिफ्ट दिले . ते पाहून बहिणीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले . अगदी असेच भाव त्याने आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावर पाहिले होते.अमितकुमार थोडा गंभीर झाला .तो आणि देवा परत निघाले.
रस्त्यात एके ठिकाणी ते मिठाई घ्यायला थांबले . मिठाईवाल्याच्या बाजूला एक छोट्या खोलीत त्याचे लक्ष गेले . एक पंधरा  वर्षाची मुलगी आपल्या आठ वर्षाच्या भावाला ओवाळत होती .छोटा भाऊ ऐटीत डोक्यावर टोपी घालून बसला होता आणि बहीण कौतुकाने त्याला ओवाळते होती .अमितकुमार पुन्हा चमकला . हेच भाव त्याने बहिणीच्या चेहऱ्यासर पाहिले होते .ओवाळणी संपताच त्या लहान भावाने आपल्याकडील मिठाईचा छोटा बॉक्स बहिणीला दिला आणि तिच्या गालावर ओठ टेकविले .  आनंदाने बहिणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले . अमितकुमार भारावून ते दृश्य पाहत होता .हा अनुभव थोड्याच वेळापूर्वी त्यानेही घेतला होता.
दोघेही पुढे निघाले तोच त्यांच्या गाडीवर एक दारुडा येऊन धडकला.चिडून अमितकुमार काही बोलणार इतक्यात तोच हात जोडून म्हणाला ",साहेब खिश्यात पैसे नाहीत.सगळे पैसे दारूत गेले .बहिणीकडे जायचे आहे सोडाल का" ?? अमितकुमारला दया आली.त्याने त्याला आत घेतले आणि त्याच्या घरी सोडायला गेला . आपला भाऊ एका किमती आलिशान गाडीतून उतरताना पाहून ती बहीण धावत बाहेर आली.आणि दारू पियालेल्या भावाला पाहून तोंडाचा पट्टा चालू केला.भाऊ मुकाट्याने तिच्या शिव्या ऐकत होता . शेवटी तिने अमितकुमार आणि देवाचे आभार मानले आणि त्यांना आत बोलावले. त्या छोट्याश्या खोपटात ती भावासोबत राहत होती . पण घर टापटीप होते . घाईघाईने तिने ओवाळणीची तयारी  केली. भाऊ स्वतःला सावरत पाटावर बसला .तिने डोळ्यातील अश्रू थोपवीत त्याला ओवाळणी केली . त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून परत अमितकुमार चमकला . अरे हेच भाव आज आपण सर्व भाऊबहिणींच्या चेहऱ्यावर पाहतोय.
ओवाळणी होताच भाऊ अडखळत्या स्वरात म्हणाला "आज ओवाळणी द्यायला काहीच नाही माझ्याकडे.पण तू सांग काय मागशील ते या वर्षभरात देईन तुला.त्याचे हे बोलणे ऐकून सर्व हसू लागले . बहिणीने सहज म्हटले ",देणार असशील तर एक वचन दे ?? आतापासून ही दारू सोड. माझ्यासाठी हीच मोठी भाऊबीज असेल."एका क्षणात तो भाऊ म्हणाला दिले वचन आतापासून ही दारू सोडतो मी . आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला . आतापर्यंत थोपविलेले अश्रू तिच्या डोळ्यातून बाहेर आले ,ते पाहून भावानेही आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली . अमितकुमार मनात म्हणाला अरे हेच भाव हाच आनंद आज सगळीकडे पाहतोय मी . बाहेर पडताच देवाला म्हणाला",खरेच यार ....!आतापर्यंत पैश्याने सगळे विकत घेता येते असे वाटत होते मला ,पण भाऊ बहिणीच्या प्रेमाची किंमत होऊच शकत नाही .
© श्री. किरण बोरकर

Friday, October 20, 2017

बाजार ......जयवंत दळवी

बाजार ......जयवंत दळवी
मनोरमा प्रकाशन
मुबईतील प्रत्येक विभागात भरणारा बाजार.या बाजारात काय चालते....?? कसे जगतायत इकडचे लोक..?? . सकाळी उठल्यापासून पोटासाठी करायची वणवण रात्र झाली तरी संपत नाही . एकमेकांच्या उरावर बसणारे तर कधी मदतीला धावून येणारे फेरीवाले.देऊ घरातून पळून मुंबईत आलाय . खिश्यात मोजकेच पैसे . अर्थात घरातून पळून गेला म्हणून घरात काहीच फरक पडला नाहीय . या बाजारात तो चहावल्याकडे काम करतो . प्रत्येक धंद्यावाल्याकडे जाऊन चहा देतो.त्यालाही या बाजारातील हिस्सा व्हायचंय . त्यासाठीही तो प्रयत्न करतोय . दळवींनी त्याच्या नजरेतून हा बाजार मांडलाय . मानवी स्वभावाचे योग्य वर्णन हे दळवींचे वैशिठय यातही दिसून येते .

Thursday, October 19, 2017

तो आणि ती

तो अस्वस्थपणे ब्रिजवर तिची वाट पाहत उभा होता. सारखी नजर घड्याळाकडे जात होती आणि भरून येणाऱ्या ट्रेनकडे. शेवटी ती त्याला दिसली. धावतपळत, लोकांचे धक्के चुकवत येणारी. दुरूनच एकमेकांची नजरानजर झाली आणि अपेक्षित हास्य दोघांच्याही चेहऱ्यावर फुलले.चेहऱ्यावर दिसणारा थकवा आणि कंटाळलेले भाव कुठच्या कुठे निघून गेले. ती जवळ आली. "किती हा उशीर"? ती गोड हसून "सॉरी" म्हणाली. तिच्या हास्याने त्याचा राग क्षणात विरघळला "नेहमीचे आहे तुझे,माझ्या आधी कधीच येणार नाहीस " तो लटक्या रागाने बोलला.
दोघेही बाहेर पडले "कुठे जाऊया "??
"माहित नाही.कुठेही चल.दोघे एकत्र आहोत हेच खूप आहे माझ्यासाठी" ती बोलली.
मग दोघेही चालत निघाले. आज त्याला कोणाशीही कसलाही वाद घालायचा नव्हता म्हणून रिक्षा, टॅक्सी काही नको म्हणून चालतच निघाले. न विसरता त्याने थांबून दहा रुपयाचे शेंगदाणे घेतले
"अरे वा...!! आज पगार झाला वाटते ??म्हणून ही चैन का ?? तिने चिडवले. त्यानेही हसून मान डोलावली.
समोरच पार्क होता. मोकळ्या बाकावर बसले. काहीवेळ निःशब्द शांतता. वादळापुर्वीची नाही बरं का !!! वादळ शमल्यानंतरची.
तसेही रोज घरी एकमेकांच्या सहवासात असायचे पण मोकळा वेळ कधीच मिळायचा नाही. जे काही बोलायचे ते चेहऱ्यावरून आणि डोळ्यातून. आज बऱ्याच दिवसांनी बाहेर भेटायची संधी मिळाली होती. त्यामुळे काही सुचत नव्हते.
हळूच त्याने बॅगेतून गजरा काढला तिच्या समोर केला. "हे कशाला आता??"ती फुरंगटून म्हणाली. पण चेहऱ्यावरचा आनंद काही लपला नाही.
"किती खर्च कराल? आईंची औषधे घेतलीत का?" असे म्हणत  पाठमोरी वळली. त्याने तो कसातरी तिच्या केसात माळला. इतरवेळ असती तर लाजून आजूबाजूला बघितले असते त्याने .पण आज कोणाचीच भीती वाटत नव्हती. जे मनात येईल ते पूर्ण करणार होता तो.
"अजूनही साधा गजरा माळता येत नाही " असे बोलून तीने तो व्यवस्थित केला. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला भरून आले.एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटला. आजही काही बोलायचे नव्हतेच तिच्या सहवासाचा आनंद लुटायचा होता फक्त. तिचीही अवस्था वेगळी नव्हती.एका गरीब घरातूनच ती याच्याघरी आली होती .वडील गिरणी कामगार .संपात संपूर्ण कुटुंब होरपळलेले .हिला शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागली .लग्नासाठी बऱ्याच ठिकाणी नकार ऐकू आले तेव्हा लग्नावरचा विश्वास उडाला .पण बघताक्षणी याच्या प्रेमात पडली . हाही इतरांसारखा नव्हता .त्याने तिला भेटायला बोलाविले . शिवजीपार्कच्या कट्ट्यावर ही त्याला भेटली . त्याने हळू हळू स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली काहीही आडपडदा न ठेवता स्वतःचा खरा स्वभाव आणि तिच्याकडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या ,त्याचे ऐकून तीही मोकळी झाली . दोघांनी मने मोकळी केली . माहेरसारखेच सासर मिळणार हे पाहून ती खुश झाली . आणि ताबडतोब होकार देऊन मोकळी झाली .
लग्न करून त्याच्या वन रूम किचनच्या घरात आली.सासू , सासरे, नणंद आजूबाजुला. सकाळी पाच वाजता दिवस चालू व्हायचा. स्वतःची तयारी मग नवरा, मग मुलगा, दुपारचे जेवण करून ऑफिसला निघायची.त्याचेही काही वेगळे नव्हते. घाई घाईत बाहेर पडायचे. बरे तिच्या ऑफिसला मोबाईल बंदी.....त्यामुळे संपर्क नाहीच.रात्री उशिरा घरी यायचे. आणि ही येता येता रात्रीच्या जेवणाची तयारी करत यायची. आल्या आल्या सगळ्यांचे चहा पाणी मग जेवणाची तयारी. तो एका कोपऱ्यात बसून तिच्या हालचाली पहायचा. त्याचे आपले बरे होते. हातात मोबाईल घेऊन टाईमपास करायचा पण तिला टाईमपासहि नव्हता. मध्येच ती त्याच्याकडे बघायची. त्याने पाहिले कि गोड हसायची तर कधी जीभ बाहेर काढून चिडवायची ,तर कधी डोळे वटारून पहायची तिच्या ह्याच मोहक अदांवर विरघळलायचा तो. घरात कधीही बोलणे व्हायचेच नाही. खूप काही असायचे त्यांच्या मनात पण संसाराच्या या पसाऱ्यात काही सुचत नव्हते. दोघांनीही खूप स्वप्ने बघितली होती आणि बघत राहणार. पण सध्या एकमेकांशी मोकळेपणानी आणि निवांत बोलणे हे देखील एक स्वप्न झाले होते. रात्री अंथरुणावर पडल्यापडल्या तोझोपी जायचा.ती सर्व आवरून बाजूला यायची तेव्हा त्याची मध्यरात्र झालेली असायची.
शेवटी त्याने ठरविले काही झाले तरी बाहेर भेटायचेच.. त्याने तिला सांगितले. पहिल्यांदा तिने अडचणींचा पाढाच वाचला पण शेवटी तयार झाली. पण त्यासाठीही आठवडा गेलाच. रोज काहीना काही काम निघत होते. तिची घालमेल त्याला दिसत होती. पण सर्व सोडून भेटणे तिला पटत नव्हते. रोज त्याचा जवळपास असणारा वावर बघून ती समाधान मानायची.
शेवटी आज तो दिवस आलाच. ते दोघेही गप्प बसून  होते .काय ...काय ...बोलू हेच कळत नव्हते. मध्येच एकमेकांकडे बघून हसायचे. शेंगदाणे तोंडात टाकायचे.
एकमेकांसाठी वेळ दिला याचा आनंदच ते उपभोगत होते.इथे शब्दांना थारा नव्हता. सहवासाचे सुख दोघेही  लुटत होते. तिने अलगद आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकले.त्याचाही हात हळुवारपणे तिच्या कमरेभोवती पडला.हा दिवस संपूच नये असेच दोघांनाही वाटत होते. एक मूकपणे अश्रू ढाळत आपल्या भावना व्यक्त करीत होती तर दुसरा आवंढा गिळत येणारे अश्रू थोपावत होता. शेवटी बऱ्याच वेळाने दोघेही उठले. काही न बोलता एकमेकांच्या हातात हातगुंफून चालू लागले.
बाजारात येताच तिच्यातील गृहिणी जागी झाली "उद्यासाठी भाजी घ्यायची आहे.मसालाही संपत आलाय" असे म्हणत दुकानात शिरली. खरेदी आटपून दोघेही घराजवळ आले. अचानक तो थांबला आणि तिचा हात पकडून म्हणाला "माफ कर मला, सध्यातरी इतकेच देऊ शकतो तुला."  त्याच्या हातावर हात ठेऊन ती पुन्हा गोड हसली."तुझे जवळ असणेच माझ्यासाठी खुप काही आहे ".त्या हास्यातच खूप काही दडले होते. एक आनंदाचा ठेवा घेऊनच दोघे घरात शिरले परत आयुष्याला सामोरे जाण्यासाठी.
© श्री.किरण बोरकर

Wednesday, October 18, 2017

नो गॉड इन साइट .....अल्ताफ टायरवाला

नो गॉड इन साइट .....अल्ताफ टायरवाला
अनुवाद .....अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
ही कादंबरी नाही .तर एक सलग कथाही नाही . हे पुस्तक आहे सर्वसामान्य माणसांचे. त्यांच्या आयुष्याचे . प्रत्येकजण एकमेकांना कनेक्टेड आहेत .प्रत्येकाचा जगण्यासाठीचा संघर्ष आहे .यात एक गर्भपात करणारा डॉक्टर आहे ,एक गरोदर कुमारिका ,तर एक बाटगा ,अशी अनेक पात्रे आहेत . प्रत्येकाचे आयुष्य दुसर्याशी जोडले गेले आहे .आणि हे सर्व मुंबईच्या सर्व कोपऱ्यात घडत असते .यातून तुम्हाला काहीही उत्तरे मिळणार नाहीत .मुंबईत हे असेच चालू राहणार हे नक्की .

Tuesday, October 17, 2017

दिवाळी

"अरे ..!! वा..!!  सावंत कुटुंबीय आज इथे.. ??? आहो बाईसाहेब ...बघा पाहुणे आले आपल्याकडे "??? आनंदाने हसत वसंतराव नीतीन सावंत कुटुंबाकडे पाहत म्हणाले.
"या ...!!!.शुभ दीपावली" काकूंही हसत बाहेर आल्या आणि सावंतांना शुभेच्छा दिल्या.
"कसे आहात बाबा ..?? आई तुम्ही कश्या " ?? नीताने विचारले.
"आम्ही मजेत.मस्त चाललंय आमचं .घे फराळ घे". काकूंनी फराळाचे ताट समोर ठेवले .
"अय्या तुम्ही केलात.. ?? कसे जमते हो तुम्हाला .?? नीता कौतुकाने विचारले.
"अग त्यात काय ?? समोरच्या चाळीतली एक गरीब बाई आहे . तिला बोलावले घरी आणि तिला मदतीला घेऊन केले .अर्धा फराळ तिला दिला .अर्धा आमच्यासाठी ठेवला." काकूंनी सहज म्हटले .
" हो ..अरे !! आम्हाला कितीसा पैसा हवाय जगायला . माझी पेन्शन येते त्यात भागते आमचे .शिवाय राहायला हे छप्पर आहे .तुला सांगतो आम्ही दोघेच राहिलो तेव्हा जाणवले आम्ही एकमेकांवर किती प्रेम करतो . अरे आमचे एकमेकांवर प्रेम करणे राहूनच गेले बघ.सकाळी आरामात उठतो मस्तपैकी फिरायला जातो . मनात येईल ते खातो .आणि ही बघ... दिवसभर पाहिजे त्या सिरीयल पाहत बसते". वसंतराव हसत म्हणाले .
"हो ...का ..!! काकू लटक्या रागात म्हणाल्या ",आणि तुम्ही समोरच्या चाळीतील मुलांना गोळा करता त्यांना शिकवता .तर कधी कधी बैठे खेळ ही चालू असतात.दिवस कसा संपतो तेच कळत नाही "आणि दोघेही हसू लागले.
नितीन आणि नीताने एकमेकांकडे पाहिले आणि म्हणाले ",चला निघतो आम्ही .येऊ पुन्हा."
"हो ..ये ..ना पुढच्या दिवाळीला डायरेक्ट "वसंतराव हसून म्हणाले.
ते त्यांना लिफ्टपर्यंत सोडायला आले .नितीनने त्यांचे हात हातात घेतले आणि भावनाविवश होऊन म्हणाला "बाबा चला ना घरी आपल्या ??? खूप सुखात राहू सर्व.झाले गेले विसरून जा ??? मी परत माफी मागतो तुमची"
तसे वसंतराव गंभीर झाले . त्यांच्या डोळ्यात कठोरपणा आला.
"सॉरी मूला... तुम्हाला मी इतर बापासारखा वाटलो असेन तर ते चुकीचे आहे.असे काही पुढे घडेल याची कल्पना करूनच मी घर माझ्याच नावावर ठेवले आणि तुम्हाला घराबाहेर काढले .माझा संसार वेगळा तुझा संसार वेगळा .दोन जनरेशनची माणसे आपण . एकमेकांशी कधीच पटणार नाही हे माहीत होते मला . सासू सुनेची मते पटणार नाहीत याचीही कल्पना होती . म्हणून आधीच सर्व तयारी केली आम्ही .एका कंपनीला आम्ही पैसे भरले ते आमच्या तब्बेतीची वेळोवेळी काळजी घेतात .जेवण करायला बाई येतेच .तिच्या मुलाला आम्ही सांभाळतो .त्याला शिकवतो .कोण म्हणतो म्हातारपणी मुलाची गरज भासते . आम्हाला तुझी गरज नाही .आहे तिथे तुम्ही सुखी राहा आणि आम्हालाही सुखी राहू दे .आज तुमच्यामुळे आम्ही प्रेमाचे दिवस पाहू शकलो.एकमेकांना समजून घेण्याइतका वेळ मिळतो आम्हाला.पाहुणा म्हणून कधीही ये .मुलगा म्हणून येऊ नकोस". वसंतरावानी हात जोडून नमस्कार केला आणि घराकडे वळले .
© श्री . किरण बोरकर

Sunday, October 15, 2017

अलाईव्ह .....पिअर्स पॉल रीड

अलाईव्ह .....पिअर्स पॉल रीड
अनुवाद .....अशोक पाथरकर
मेहता पब्लिकेशन
12 ऑक्टोबर 1972 ला हौशी खेळाडूंची रब्बीची टीम  उरुग्वे हवाईदलाच्या विमानाने सांटीयागोला जाण्यास निघाली .विमानात चाळीस प्रवासी आणि पाच कर्मचारी होते .विमान अँडीज पर्वतावर आदळले. अपघात झाला तेव्हा त्यातील बत्तीसजण शिल्लक राहिले . सोबतीला खाण्यासाठी थोडी वाईन आणि काही चॉकलेट्स  आणि राहण्यासाठी तुटलेल्या विमानाचा अर्धा भाग.
चिली ,अर्जेंटिना ,उरुग्वे या तिन्ही देशांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .पण अँडीजवरील अतिशुभ्र बर्फामुळे आणि खराब वातावरणामुळे त्यांचा शोध घेण्यास अडचण येऊ लागली.काही दिवसांनी त्यातील 27 प्रवासी उरले तर नंतर फक्त सोळा .अडीज महिन्यांनी ( सुमारे बहात्तर  दिवसांनी )एक चिलीयन शेतकऱ्याला गुरे चरायला घेवुन जाताना दोन माणसे दिसली . तो घाबरून पळून गेला .नंतर दुसऱ्या दिवशी परत त्याला ती दिसली आणि त्यांची यातून सुटका झाली .ते कसे जिवंत राहिले आणि सुटकेनंतरही त्यांनी काय अनुभवले याची रोमांचकारी सत्यकथा