Tuesday, February 28, 2017

बिट्वीन शेड्स ऑफ ग्रे....रुता सेपेटीस

बिट्वीन शेड्स ऑफ ग्रे....रुता सेपेटीस अनुवाद  रवींद्र गुर्जर  दुसऱ्या महायुद्धात हिटलरवरच  सगळ्यांनी लक्ष केंद्रित केले होते . पण रशियाच्या स्टालिनचे काय ?? तो काय हिटलारपेक्षा कमी क्रूर नव्हता . शेजारची बाल्टिक राज्ये  हळूहळू सोव्हियत संघराज्याशी जोडीत जात होता .
हि कहाणी आहे लिथुआनिया देशातील लिना आणि तिच्या कुटुंबाची ,त्यांच्यातुरुंगवासाची ,सायबेरीयातल्या प्रवासाची
एके रात्री तिला आणि तिच्या कुटुंबाला रशियन सैनिक पकडून नेतात आणि त्यांची रवानगी सायबेरिया कडे होते . गलिच्छ माणसांनी गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये कडाक्याच्या थंडीत त्यांचा प्रवास सुरु होतो . लीना धोका पत्करत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीची चित्रे काढत राहते .कदाचित ती चित्रे तिच्या वडिलांकडे पोचतील आणि त्यांचा ठावठिकाणा कळेल .6500 मैलाचा हा प्रवास भयानक आहे जणूकाही वर्षानुवर्षे चालत आहे .आजहि आपण सायबेरियाचे नाव काढले तरी घाबरतो पण तिथे काय घडले ते कोणाला माहित नाही ,तरीही लोकांना सायबेरियाची भीती आहे . मग ज्यांनी सायबेरियाचा तुरुंगवास ,छळ छावण्या अनुभवल्या आहेत त्यांचे काय ??? दुसरे जग म्हणून ओळखले जाणारे सायबेरिया आणि क्रुरकर्मा स्टॅलिन यांची ओळख या पुस्तकाने करून दिली आहे .

Monday, February 27, 2017

निषेध

वसंत व्याख्यानमालेतील शेवटचे व्याख्यान चालू होते . सभागृहातील शंभर सव्वाशे भाग्यवान श्रोत्यांत मी आणि विक्रम होतो . समोर प्रसिद्ध इतिहासकार अण्णासाहेब निंबाळकरांचे माधवराव पेशवे यांच्यावर कथाकथन चालू होते .
अण्णासाहेब म्हणजे संपूर्ण शिवकालीन इतिहास . देहभान हरपून ते बोलत होते आणि कानात प्राण ऐकून आम्ही ऐकत होतो . आता शेवटचं बाकी होता आणि अचानक सभागृहाबाहेर थोडा गोंगाट ऐकू आला . लिंक तुटल्यामुळे सर्व वैतागले .
अचानक संयोजक व्यासपीठावर आले आणि ते अण्णासाहेबांच्या कानाशी काही पुट्पुटले . अण्णांनी मान डोलावली आणि माईकपाशी येऊन कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले . आम्ही चर्चा करीतच सभागृह बाहेर आलो तर बाहेर काही तरुण मुले अण्णासाहेबांच्या नावाने शिव्या देत होती. त्यांचा धिक्कार करीत होती . मुर्दाबादचा गजर चालू होता .  मला  त्या गर्दीत एक चेहरा ओळखीचा वाटला ,जवळ जाऊन बघितले आणि उडालोच . त्या गर्दीत चक्क बंड्या घोषणा देत उभा होता . विक्रमचे तर टाळकेच सटकले . त्याच्या तोंडून भ ची बाराखडी चालू झाली . आम्हाला पाहून बंड्या चपापला आणि विक्रमला  पाहूनतर  जास्तच घाबरला .
" काय बंडोपंत ?? आज इकडे कुठे ?? विक्रम ने उपहासाने विचारले .
अजून काही वेडेवाकडे घडू नये म्हणून मी पुढे झालो आणि बंड्याला बाजूला खेचले .
"हा काय प्रकार आहे बंड्या ??तू इथे ह्यांच्यात कसा ?? मी चिडूनच म्हटले
" काही नाही सहज आलो यांच्याबरोबर टाईमपास करायला",  बंड्याने चेहरा पडत उत्तर दिले .
" टाईमपास ?? Xxxxxx"!!! विक्रम संतापला
" अरे काय बोलतोस तू बंड्या ?? तुझ्याकडून हि अपेक्षा नव्हती " मीहि रागावर नियंत्रण ठेवीत बोललो .
"तसे नाही हो भाऊ ,काही मित्र आले आणी  म्हणाले चल बंड्या येतोस का ??थोडे वेगळे साहस करू ,थोडा वाद निर्माण करू ,चार शिव्या देऊ" " नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आहे मोर्चा निषेध या गोष्टी मी कधी अनुभवल्या नव्हत्या आणि आज खूप दिवसांनी फ्री होतो ,तुम्ही हि घरी नाहीत म्हणून म्हटले यांच्याबरोबर राहू.
"वा बंडोजी वा" !! विक्रम ने हाथ जोडून म्हटले ' अरे टाईमपास करायचा होता तर जा ना नटरंगमध्ये .मी शेट्टीला फोन करून सांगतो. तिथे काय हवा तो गोंधळ घाल .
झाले !! विक्रमत्याच्या  नेहमीच्या आवडत्या मुद्द्याकडे वळला . मी थांबवले आणि विचारले ,"अरे बंड्या तू कोणाचा निषेध करतोयस ते माहित आहे ?? का करतोस ?? यामागे काय पार्श्वभूमी आहे ??
बंड्याने नकारार्थी मान डोलावली
"म्हणजे तुला माहीतच नाही हे आपण का करतोय "
" च्या,!!! बंड्याने मान डोलावली .
", अण्णासाहेब कोण आहेत ते तरी माहित आहे का ?? मी संयमाने विचारले
"आहो मलाच काय, इथे हजर असलेल्या बऱ्याचजणांना माहित नाही " बंड्या हसून उत्तरला.
देवा!!! मी हताश झालो" अरे तुम्हाला विषय माहित नाही ,व्यक्तीबद्दल माहित नाही तर इथे येऊन त्यांचा निषेध का करता ?? मी चिडून बोललो .
तसा बंड्या घाबरला "भाऊ चूक झाली आमची ,त्यांना इथे खूप गर्दी हवी होती आणि आम्ही रिकामे बसलो होतो ,इथे काहींना त्यांनी पैसे हि दिलेत आणि नंतर सगळ्यांना जेवण हि देणार ,मीही टाईमपास म्हणून यात सामील झालो ,मला वाटले हे काही वाईट घटनेचा निषेध करणार आहेत म्हणून साथ द्यायला आलो त्यांना .
" हे बघ बंड्या माहित असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीत पडू  नको . असतील अण्णासाहेबांच्या काही गोष्टी चूक, पण ते ठरविणारे आपण कोण ?? त्यांच्याइतका आपला अभ्यासतरी आहे का ?? कि उगाच प्रसिद्धीसाठी हा स्टंट करायचा ?? आपण समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्ती बद्दल भांडावे पण त्याबाबत पूर्ण माहिती तरी घ्यावी जेणेकरून समोरच्याचे तोंड बंद तरी करता येईल".
माझा चेहरा पाहून बंड्या समजून गेला आता काही खरे नाही .विक्रम परवडला पण हे नको .
सॉरी सॉरी म्हणत दूर निघून गेला . आम्हीही एकमेकांकडे बघत घराकडे वळलो.

Sunday, February 26, 2017

तात्या

त्याला पाहून हातातील चहा फेकून देऊन पळायचा प्रयत्न मी केला .पण शेवटी त्याने पकडलेच . समोरच येऊन बसला
"काल रात्री मी खूप विचार केला. या समाजात बदल घडविण्यासाठी आपण खूप काही करू शकतो " . माझ्या मांडीवर थाप मारून म्हणाला तसा  मी उडालोच . खरेच यांच्यासारखी माणसे विचार करू लागली म्हणजे नक्कीच समाजाचे नको तितके कल्याण होईल . नाइलाजाने त्याच्यासाठी चहा मागवत बोललो ",बोला साहेब ,काय म्हणणे आहे तुमचे "?
" भाऊ ,अरे पहिली गोष्ट म्हणजे सर्वांनी आपले जुने विचार बदलले पाहिजे .मुलगा मुलगी यांचा भेदभाव नष्ट केला पाहिजे . मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे घडविले पाहिजे . आपली मते त्यांच्यावर लादता कामा नयेत .
" अरे वा ,छान!! मी  म्हणालो", अजून !!??
"अजून काय ?? आपण आता सरकारच्या धोरणांना पाठिंबा द्यायला पाहिजे . शिक्षणावर भर दिला पाहिजे .सरकारी योजना अंमलात आणायला पाहिजे
". वा!! तात्या वहिनी अजून आल्या नाहीत वाटते गावावरून तरीच हे विचार सुचतयात "
"यात वहिनीचा काय संबंध आणि रात्रभर जागून इतरांबरोबर मज्जा मारण्यापेक्षा घरी बसून विचार केलेला नेहमी चांगला नाही का ?? माझ्याकडे रोखून बघत तो बोलला.
च्यायला ह्याला कळले कि काय ?रात्री मी आणि विक्रम बसलो होते ते !!तरीच हे टोमणे .
"हे बघ तात्या ,मला माहित नाही तुला काय करायचे आहे ते ,पण इतके माहित आहे पहिल्या दोन मुली झाल्या तरी तुला  मुलगा पाहिजे होता म्हणून तू तिसऱ्या साठी प्रयत्न केले ,अर्थात तुझी  3 काय तर 10 हि मुले सांभाळायची कपॅसिटी आहे .आणि आता त्या मुलाचे किती लाड चालू आहेत  हे सोसायटी बघतेय . आणि तुझी मोठी मुलगी डान्स किती छान करते तरी तिला ते करू दिले नाहीस जबरदस्तीने इंजिनीरिंग ला टाकलेस . मुलीला कधी सायकल चालवू दिली नाहीस पण मुलासाठी मोटारसायकल घेणार आहेस .
"पुरे पुरे ,माझ्या चूका काढू नकोस ? तू काय करतोस रे समाजासाठी .तात्या भडकून बोलला
"मी काहीच करीत नाही समाजासाठी तात्या. वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी सरकारी वाहनातून प्रवास करतो . पाण्याची बाटली घेतली तर पूर्ण पाणी पियाल्याशिवाय फेकून देत नाही . कुठेही जेवायला गेलो तरी अन्न ताटात टाकून देत नाही . घरीही गरज असेल तेव्हाच पंखा आणि लाईट वापरतो . जमेल तेव्हढा व्यवहार कॅशलेस करतो ,ऑनलाइन पद्धतीचा वापर करतो ,कागद वाचवितो . मी शांतपणे उत्तर दिले
"आणि ह्याचे काय ?" तात्यांने अंगठा वर करून थम्स अप ची खूण केली.
"त्याने काय होते तात्या "?? मी काही मर्यादा पुरुषोत्तम राम नाही . सद्गुणांचा पुतळा असलेला .काहीतरी खोट प्रत्येकात असते . तू आहेस का सभ्य ?? तरुणपणी काय काय उद्योग केलेस ते माहित नाही का मला ??मी छद्मीपणे हसत बोललो .
"ठीक आहे ,ठीक आहे , तुझ्याइतका विचार नाही करता येत नाही .असे बोलून तात्या रागाने उठला .
"अरे थांब ",मी थांबविले तात्याला
"हे बघ ,त्या भाजीवल्याची मुलगी बघ किती छान चित्र काढते . तिला चित्रकलेचे सामान आणायला पैसे नसतात .तू मदत करू शकतोस का ?? तात्या थबकला त्याने माझ्याकडे पहिले "हो करेन ना ..हेघे 500 रु आणि आणून दे तिला ".
"नको तू आणून दे तुझ्या हाताने " मी असे म्हणताच तात्या निघून गेला
दुसऱ्या दिवशी कामाच्या घाईत मी सर्व विसरून गेलो रात्री सहज जेवल्यावर फेरी मारायला  बाहेर पडणार इतक्यात तात्या  दरात हजर "थँक्स भाऊ , माझा हात हातात घेत म्हणाला "काल सकाळी मी त्या मुलीला चित्रकलेचे समान नेऊन दिले आणि तिच्या डोळ्यातील ते भाव पाहून मी भारावून गेलो . आयुष्यात पहिल्यांदाच मी दुसऱ्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी आदराच्या भावना पाहिल्यात . अरे त्या मुलीला इतका आनंद झाला हे पाहून मन भरून आले ". बोलता बोलता तात्यांचे डोळे पाणावले. पण अश्रू दाखवून कमीपणा वाटू नये म्हणून झटकन निघून गेला .

Thursday, February 23, 2017

नाईट शिफ्ट

रविवारची नाईट शिफ्ट म्हणजे अनिल चौगुलेसाठी एक पर्वणीच असायची . दिवसभर मज्जा करायची ,रात्री पोटाला तड बसेपर्यंत जेवायचे आणि आरामात ट्रेन पकडून फॅक्टरीत जायचे .
रविवार संपूर्ण फॅक्टरी बंद असल्यामुळे तो आणि त्याचे दोन वर्कर ,दोन सिक्युरिटी गार्ड ,इतकेच असायचे . त्यामुळे एक राऊंड मारला कि झोपायला मोकळा .
तो रविवारहि असाच होता . कार्ड पंच करीत अनिलने सिक्युरिटीकडे पाहून हात हलवला आणि डिपार्टमेंटमध्ये आला . त्याच्या टेबलवरून समोर नजर टाकताच संपूर्ण फ्लोअर दिसत होते . इतर दिवशी चोवीस तास त्या फ्लोअरवर गडबड असायची .खडखड आवाज करीत चालणाऱ्या मशीन्स ,एकमेकांना शिव्या देत बोलणारे ऑपरेटर ,मध्येच वाजणार सायरन ,नुसता गोंधळ असायचा .पण रविवारी मात्र हा फ्लोअर अतिशय शांत असायचा . फ्लोअरच काय तर संपूर्ण फॅक्टरी शांत असायची . बाजूलाच स्मशानभूमी असल्यामुळे एक प्रकारची गूढ शांतता असायची .कधी कधी रात्री झोपमोड झाली कि अनिल राऊंडला बाहेर पडायचा पण गेट पर्यंत जाताना त्या स्मशानाच्या भिंतीच्या बाजूने जावे लागायचे. मग उगाच मनात धडधड सुरु व्हायची .
त्यारात्रीही तसेच झाले .रात्री 12.30 चा राऊंड मारायला अनिल निघाला आणि स्मशानाच्या बाजूला येताच त्याच्या छातीत अचानक धडधडून आले .कोणीतरी बाजूने चालतंय असे वाटू लागले . मग सिक्युरिटी केबिन दिसताच थोडे हायसे वाटले . केबिनमध्ये बसून त्याने गार्डबरोबर चहा घेतला आणि परत निघाला .  नेहमीप्रमाणे त्याने खिशातून साहेबांच्या केबिनची चावी काढली आणि लॉक उघडून आत शिरला . एसी चालू करून त्याने टेबलवर डोके ठेवले आणि शांतपणे निद्रादेवीची आराधना करू लागला .अचानक त्याच्या हातावर कोणीतरी चापट्या मारतोय असा भास झाला . त्याने कंटाळून मान वर करून डोळे उघडले तर समोर मानकामे उभा होता . मानकामे हा डिपार्टमेंटचा हेल्पर . कॉन्ट्रॅक्टवर काम करणारा .दर सहा महिन्यांनी एक ते दोन दिवसाचा ब्रेक घेऊन परत कामावर यायचा .  काय आहे ?? मी थोड्या संतापानेच विचारले .
"साहेब ,इथे झोपू नका आत आपल्या डिपार्टमेंटमध्ये ,तुमच्या खुर्चीवर जाऊन झोपा ".
ते वयाने मोठे असल्याने मी नुसती मान डोलावली. मी उठताच तो बाहेर निघूनही गेला . तो जाताच अनिल शांतपणे उठला ,बाहेर पडून केबिनला लॉक केले आणि आपल्या खुर्चीवर जाऊन परत टेबलवर डोके ठेवून झोपला .
अचानक कसलीशी जाणीव होताच त्याने खाडकन डोके वर करून समोर पहिले . समोर दूरपर्यंत कोळोखाचेच राज्य होते . टाचणी पडताच ऐकू येईल इतकी शांतता होती . संपूर्ण प्लांट रिकामा असताना मानकामे कुठून आला ??? तोही नाईट शिफ्ट ला ??? त्याला कधी कोणी नाइट शिफ्ट ला बोलावले ?? असे असंख्य प्रश्न अनिलच्या मनात आले . कोणीतरी उठवले हे नक्की आणि तो मानकामे होता हे हि नक्की .पण तो आलाच कसा ,आणि दिसला नाही तो .. अनिल उठला घाईघाईत तो आपल्या वर्करकडे गेला . दोघेही शांतपणे झोपले होते . कसलीच फिकीर नव्हती त्यांना .अनिल शहारून गेला आणि मुकाट्याने गेटवर सिक्युरिटी केबिन मध्ये जाऊन बसला .

Wednesday, February 22, 2017

द इनोसंट प्रिझनर... जेम्स हॅडली चेस

द इनोसंट प्रिझनर... जेम्स हॅडली चेस ... अनुवाद ..मधुकर हुद्दार .
जेम्स हॅडली चेस म्हणजे रहस्यकथा हे समीकरण पक्के आहे . त्यामुळे वेगळे काही लिहायची गरज नाही . पण मला त्याच्या कथा वाचायचा कंटाळा येतो . मी त्याच्या रेग्युलर वाचक नाही . कधीकधी त्याच्या कथा इतक्या गुंतलेल्या असतात कि वाचायला कंटाळा येतो . पण म्हणतात ना कधी कधी वेगळी टेस्ट घ्यावी .तुम्ही सलग वाचूच शकत नाही . यातही एकूण तीन  कथा आहेत .

Tuesday, February 21, 2017

निवडणूक

घरात कांदेपोह्याचा नुसता घमघमाट सुटला होता .मोठ्या मिनतवारीने सौ.चे कौतुक करीत तिला कांदेपोहे बनवायला लावले होते .आता मस्तपैकी 3/4 डिश हादडायच्या ,पेलाभर चहा प्यायचा आणि वाचन करत बसायचे  असा साधा प्रोग्रॅम ठरविला होता  . कोणी अचानक टपकु नये म्हणून दरवाजाला  कडी लावून बेलही बंद करून टाकली होती .
पण अचानक दरवाजावर जोरजोरात थापा पडल्या आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला .दाराबाहेर विक्रमच असणार हे पक्के समजून गेलो  .आता दरवाजा उघडण्यावाचून पर्याय नव्हता . मुकाटपणे दार उघडले तर हा मला लोटून आत शिरला .
"काय चाललंय तुझे दिवसा ढवळ्या ?? तो खेकसला
"अरे काही नाही ,सहजच " मी हताशपणे उद्गारलो .
"मग कडी लावून आणि दरवाजा बंद करून काय चालले आहे" ?? डोळे वटरत त्याने विचारले आणि अचानक जोरजोरात श्वास घेऊ लागला . "वहिनी !!!असे किंचाळतच तो स्वयंपाकघरात शिरला आणि पोह्याची भरलेली बशी घेऊन विजयी मुद्रेने बाहेर आला . तोंडात बकाणा भरत बोलला "चल बसूया, आणि आणलेल्या पिशवीकडे बोट दाखविले . "विक्या ,तू आणलिस"?? मी अविश्वासाने ओरडलो. "ह्या !!,त्या उमेदवाराने दिली . निवडणुकीला उभा राहिला आहे ना "?? त्याच्या प्रचाराला गेलो ,थोडा वेळ फिरलो ,घोषणा दिल्या ,वेळ संपली तसे त्याने प्रत्येकाला पैसे दिले आणि हि बाटली" .
"च्यायला विक्या, म्हणजे तुही राजकारण्यांच्या मागे तर ??  म्हणजे तो कसाही असला तरी बाटली आणि पैसे दिले म्हणून वोट त्यालाच"?? "
.हाड!!... बाटली आणि पैसे देणाऱ्या उमेदवाराची लायकी कळते आपल्याला भाऊ . पण तूच म्हणतोस ना जगात काहीही कष्ट केल्याशिवाय मिळत नाही ते पटले आपल्याला . साल, हे कमवायलाही 3/4 तास  लागले ." ह्यांच्याकडे कुठून येतात रे पैसे इतके ,च्यायला !!..आपण दोघे कधीतरी बसतो आणि बिलही  भागीत देतो .अरे हा आपलाच पैसा आहे ,तोच घेतला थोडा .उद्या दुसरा उमेदवार आहे ,त्याच्याकडून काहीतरी वसूल करू ,थोडक्यात काय हि निवडणूक संपेपर्यंत आपली चंगळ आहे.
"पण हे चुकीचे नाही वाटत तुला ??"मी म्हणालो.
",वाटते ना ?? पंण काय करणार ,मी नाही गेलो तर दुसरा कोणी आहेच ,अरे त्या निमित्ताने का होईना 4 पोरांना पैसे मिळतात ,आणि शेवटी मत कोणाला द्यायांचे हे आपल्याच हातात असते ना ,आणि कोणता उमेदवार चांगला कोणता वाईट हेही आपल्यालाच कळायला हवे .ज्या दिवशी हे मतदारांना कळेल त्या दिवशी आपली  लोकशाही खऱ्या अर्थाने लोकशाही बनेल ,.."तो पर्यंत आपण असेच राहू ,"हातातली बाटली उंचावून तो म्हणाला आणि मुकाट्याने मी कपडे बदलायला बेडरूममध्ये शिरलो .

Monday, February 20, 2017

द अँक्सिडेंटल हसबंन्ड

द अँक्सिडेंटल हसबंन्ड .....जेन ग्रीन   अनुवाद ..शुभदा  विद्वास .
  त्या दोन स्त्रिया आहेत .अमेरिकेतील दोन वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या . तसा दोघींचाहि एकमेकांशी संबंध नाही . दोन्ही वेगवेगळ्या स्वभावाच्या ,आपापल्या संसारात मग्न . मॅगी टिपिकल अमेरिकन स्त्री स्वतःचा समाजात मान राखून वागणारी ,किटी पार्टी ,शॉपिंग मध्ये रमणारी  तीन मुलांची आई . तर सिल्व्ही अतिशय साधी .नवऱ्याची ,मुलीची, म्हाताऱ्या आईची काळजी करणारी . साधी सरळ सतत नवऱ्याची काळजी करणारी .पण अचानक एके दिवशी त्यांना आपल्या आयुष्यातील भयानक सत्य समजते आणि त्या कोसळून पडतात . पण त्या सत्याचा सामना करण्यासाठी दोघी एकत्र आल्या . त्यांनी या अडचणींचा कसा सामना केला ते वाचण्यासारखे आहे .

जंगलाचा कायदा

"पोटासाठी खूप कष्ट करावे लागतात हेच खरे" ,स्वतःशी पुटपुटतच  शेरखान गुहेत शिरला. पण जाता जाता बायकोची शेपटी ओढायला विसरला नाही . नेहमीप्रमाणे लटकी डरकाळी फोडत तिने विरोध दर्शविला . तोच गुहेच्या दारात चतुरसिंग कोल्हा उभा राहिला .
काय रे चतुर ?? आज अचानक ?? शेरखान ने विचारले .
"हो ,काय मिळाली का शिकार" ??
"अरे काय ?? हल्ली कुठे राहिलेत प्राणी जंगलात ??आपल्यालाच फिरायचे वांधे त्यांची तर सोयच नाही .
" महाराज ,मी काय म्हणतो .तुम्ही शिकारीचे काम बाहेर का देत नाही.
"म्हणजे माझी शिकार ,माझे खाणे मी नाही शोधायचे का ??
"तसे नाही पण तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली ला इथे बसून जेवायला मिळाले तर काय हरकत आहे ??
" हा !हा! हा!, असे कोण देईल? रोज एक शिकार आणून कोण देईल ??
" देतील कि महाराज ,आज कुत्रे ,तरस, लांडगे यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे.ते करतील ना . आहो कॉर्पोरेट चा जमाना आहे .दुसर्यांकडून कामे करून घ्यायची . त्यांना महिन्याला बक्षीस देऊ .
" अरे पण जंगलाचे काही कायदे असतात.
"  कायदे सगळीकडेच असतात ,पण कोण विचारतोय .
" असे म्हणतोस ,"!!! शेरखानने थोडा वेळ आपल्या मिशा खाजवल्या .
"ठीक आहे ,देऊया कॉन्ट्रॅक्ट."
दुसऱ्या दिवशी तरसांच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि  काम सुरु झाले . शेरखान आता गुहेतून बाहेर पडेनासा झाला . त्याचा दिवस राणीच्या संगतीत जाऊ लागला . बाहेर काय चालू आहे याची त्याला माहितीहि नव्हती . आणि एक दिवस त्याच्या जेवणात ससा आला .
"हे काय?? इवल्याश्या सश्याने आमचे काय होणार" ?? चिडुन त्याने चतुरसिंग ला बोलावले .चतुरसिंगने तरसाला .तर तरसाने कुत्र्याला बोलावले.
" हा कोण "?? शेरखान ओरडला .
"माफ करा महाराज ,तुमच्या शिकारीसाठी आम्ही याची नेमणूक केलीय "तरस उत्तराला .
"काय करू महाराज ,जंगलात प्राणीच उरले नाहीत.आहेत त्यांना खायला मिळत नाहीत. तळ्यात पाणीच नाही तर तिथे कोण येणार'?? 
"म्हणून काय ससा "?? 
" जे मिळेल ते आणतो महाराज. आजचा दिवस भागवा उद्या बघू .
चिडून शेरखानने पंजा जमिनीवर आपटला आणि सशाकडे वळला . दुसऱ्या दिवशी आणलेल्या शिकारीला सडक्या मांसाचा गंध येताच शेरखान परत चिडला .पण काल रात्री शिकार केली म्हणून असेल असे सांगण्यात आले . परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती .शेरखांनची बाहेर फिरायची सवय पार मोडून गेली होती.
एके दिवशी कहर झाला .त्याचे दोन्ही बछडे पळत पळत गुहेत शिरले .भीतीने त्यांच्या  चेहऱ्यावरचा रंग उडाला होता . संतापून त्याने विचारले "काय झाले ??
"एक जंगली कुत्रा आमच्या मागे लागला होता .त्यांनी उत्तर दिले .
" काय माझे  बछडे कुत्रांना घाबरू लागली ".चिडून त्याने राणीवर हल्ला केला .
राणीने शांतपणे विचारले "तुम्ही त्यांना शिकार कशी करायची ते शिकवले का ?? लढाईचा ,हल्ल्याचा सराव कधी करून घेतला आहे का ?? त्यांना लढणेच माहित नही तर ते काय प्रतिकार करणार ??
शेरखानने मान खाली घातली आणि निमूटपणे गुहेबाहेर पडला . जंगलातुन फिरता फिरता त्याला आश्चर्याचे धक्के बसू लागले . अर्धे अधिक जंगल उघडे बोडके झाले होते . झाडांची कत्तल चालू होती .माणसे बिनधास्तपणे नाचत गात फिरत होती . कोणीही मजेत झाडावर बसलेल्या पक्षांना दगड मारून जखमी करीत होता .तर काही जण मज्जा म्हणून माकडांच्या मागे लागले होते . ते पाहून शेरखानचीहि पुढे जाण्याची हिम्मत झाली नाही .परत फिरताना त्याला अंकल दिसला ,आपल्या अजस्त्र सोंडेत  पाणी भरत छानपैकी तलावात डुंबत होता .पण हे काय !!!त्याचा एक सुळा कुठे गेला ???
इतक्यात अंकलने त्याच्याकडे पाहून सोंड हलवली आणि पाण्याबाहेर आला "काय शेरू आहेस कुठे ?बऱ्याच वर्षांनी भेटतोय्??
"हो ,मान खाली घालत शेरखान उत्तरला .अंकलच त्याला शेरू बोलू शकत होता .
"अंकल काय झाले हे ?? काय हालत झालीय माझ्या जंगलाची ?आणि तुझा एक सुळा कुठे गेला ??
"कुठे काय ?? काय झाले ?? सगळे ठीक चालले आहे ,तुला रोजच्या रोज जेवण मिळते ना ?" अंकल उपहासाने म्हणाला .
शेरखान लाजला .त्याच्या डोळ्यात पाणी आले .
"अंकल ..!!"जोरात डरकाळी फोडून तो म्हणाला  "अजून या जंगलाचा राजा आहे मी हे विसरू नकोस ".
" आम्ही नाही विसरलो .तूच विसरलास राजा आहेस ना ? मग या जंगलाचे रक्षण कोण करेल ? तू फिरत  नाहीस हे पाहून माणसांची तुझ्याबद्दलची भीती नष्ट झालीय . तो इथे येतो बेसुमार झाडे तोडतो ,छोट्या छोट्या प्राण्यांची हत्या करतोय ,जंगलाचा राजा या नात्याने तू त्यांचे  माणसापासून रक्षण करायला पाहिजे . आम्ही सारे प्राणी तुझी प्रजा आहोत . त्या दिवशी चार माणसांनी माझ्यावर हल्ला केला .मी प्रतिकार केला म्हणून जीवावरचे सुळावर निभावले. पण आज तुझ्या बछड्याना प्रतिकारहि करता येत नाही आणि शिकारही..आम्ही  भूक लागल्यावरच खातो ,तुम्ही प्राण्याची शिकारही  भूक लागेल तेव्हाच करता. पण हि माणसे मात्र मौजेखातीर  शिकार करतात .स्वतःच्या फायद्यासाठी जंगले साफ करतात . अरे त्यामुळे तुझेही अस्तित्व नष्ट होत चालले आहे ,हे कळते का तुला ??
शेरखान खाली मान घालून चुपचाप ऐकत होता .त्याला स्वतःची लाज वाटू लागली . स्वतःच्या फायद्यासाठी  तो जंगलाचा कायदा विसरून गेला होता .