Friday, March 27, 2020

शो मस्ट गो ऑन

शो मस्ट गो ऑन
"अहो ....घरात फक्त दोन दिवसाचे सामान शिल्लक आहे.काही वस्तू आजच आणाव्या लागतील ..."तिने कोपऱ्यात टेबलावर बसून मोबाईल बघणाऱ्या  नवऱ्याला सांगितले.
ते ऐकून बेडवर बसलेला त्याचा म्हातारा बाप ..खाली बसून टीव्ही बघणारी त्याची दोन मुले... यांनी एकदम त्याच्याकडे पाहिले.
खरेतर तिच्याकडेही पर्याय नव्हता.त्या दहा बाय दहाच्या खोलीत जे काही बोलले जाईल ते सर्वानाच ऐकू येत होते.
ह्या कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच घरात होते.तो रंगभूमीवरील छोटा कलाकार.बापामुळेच हा वारसा त्याच्याकडे आलेला. बापाने आयुष्यभर नाटकेच केली. पैसा कधी कमावलाच नाही . प्रसिद्धी भरपूर मिळाली पण हातात काहीच नाही. ह्याला रंगभूमीपासून दूर ठेवायचा खूप प्रयत्न केला त्याने . पण म्हणतात ना...हे गुण रक्तातच असतात .कॉलेजची पायरी चढला आणि आय एन टी.... पुरुषोत्तम करंडक.. अंगात भिनले . काहींनी त्याच्या गुणांचा छान वापर केला तर काहींनी नुसता राबवला . आपलं पोरग आपल्याच मार्गाने जाणार याची खात्री बापाला पटली आणि त्याने समजावणे सोडून दिले.
पुढे त्याला कमी जास्त प्रमाणात कामे मिळत गेली . रंगभूमी म्हणजे त्याचा जीव की प्राण . एकवेळ मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडणार नाही पण त्याच्या बाजूला असलेल्या नाट्यगृहात जाऊन पडद्याला पाया पडेल . नाटकांमुळे काही सिरीयल ही नाकारल्या त्याने.
बाप सतत कानीकपाळी ओरडून सांगायचा.." अरे सिरीयल आधी ...मग नाटके कर ...तरच  चार पैसे जास्त कमावशील...
हा बापाकडे थंडपणे पाहून म्हणायचं "मग तुम्ही का नाही कमावले .....??
 पण आज गेले काही दिवस सर्व काही बंद होते .ना नाटके ना सिरीयल ....ह्याच्या खिशातील पैसा ही संपत आला होता . म्हाताऱ्याची पेन्शन ही येणार नाही या महिन्यात बहुतेक आणि तसेही ब वर्गातील कलाकाराला किती पेन्शन असणार म्हणा..... 
काही मोठ्या कलाकारांना फोन केला तर देतील पैसे. पण किती दिवस मागणार ..तसेही असे पैसे कधी मगितलेच नाही म्हणा ..च्यायला बापाचे सर्वच गुण कसे अंगात उतरले आपल्या .... त्याने स्वतःशीच विचार केला आणि चेहऱ्यावर हास्य उमटले .
"काय रे... किती दिवस शो बंद राहणार ...."??  त्याच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून बापाने विचारले .
"हो ना ... काहीतरी करायला हवे हो ...?? बायकोने चहाचे पेले सर्वांपुढे फिरवले.
"आई माझे दूध ...."?? मुलगी ओरडली. 
"गप ग ... थोडे दिवस थांब.. उद्यासाठी एक पिशवी ठेवलीय ... तुझा बाप मोठा नटसम्राट ... सांग त्याला आणायला . बाहेर पडला तर सर्व धावत येतील ...इथे आयुष्याची नाटके झालीत....आणि तुला दूध हवेय......" तिने सर्व राग पोरीवर काढला .तो आणि म्हातारा काही न बोलता चहा पिऊ लागले .
"पप्पा..... तुम्हाला व्हाट्स अप आलाय बघा. जागतिक रंगभूमीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...  आज काय आहे ." त्याचा छोटा मुलगा मोबाईल पाहून ओरडला .
"अरे ....आज 27 मार्च नाही का ....?? जागतिक रंगभूमी दिन ....म्हातारा ओरडला .."एकेकाळी या दिवशी चार चार शो करायचो आम्ही . काय दिवस होते ते .. शेक्सपिअर.. बर्नाड शॉ.. त्यात्यासाहेब शिरवाडकर ,गडकरी, देवल..खाडीलकरांचे स्मरण करायचो .सगळे शो हाऊसफुल्ल ..." म्हातारा जुन्या आठवणीत रमला.
"हो ना....अजूनही या दिवशी त्यांची आठवण काढली जाते . मागच्या वर्षीपर्यंत आजचा दिवस रंगभूमीवर साजरा करत होतो आम्ही . पण या वर्षी देशात काय पण परदेशातही साजरा होणार नाही .आजच्या दिवशी प्रयोग नाही ही किती दुर्दवाची गोष्ट आहे ..."तो डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला .
"प्रयोग नाही ....?? का प्रयोग नाही ....?? आजही प्रयोग होईल.. पण रंगमंच असेल हे आपले घर .. प्रेक्षक ही आहेत ... ही आपली मुले तुझी बायको .... फार काय तर या शोची नाईट मिळणार नाही ना ...?? पण आपण हाडाचे कलाकार आहोत.नाईटशिवाय केवळ दोन प्रेक्षकांसमोर ही प्रयोग केलेत आपण ...  चल हो तयार मी आप्पासाहेब बेलवलकर बनून नटसम्राटची स्वगत म्हणतो ,तू लक्ष्मणराव देशपांड्यांचे व्हराड निघालय कर .... आपल्या ह्या प्रेक्षकांच्या टाळ्याच आपली नाईट .. लक्षात ठेव शो मस्ट गो ऑन...." म्हातारा आवेशात बोलला. 
तसा तो ही भारावून उठला "हो...आपण कलाकार आहोत. मराठी रंगभूमीचे सुपुत्र ...आज शो होणारच .. भले स्टेज कोणतेही असो .समोर कितीही प्रेक्षक असो "
ताबडतोब बेड फोल्ड करून ठेवला गेला आणि सुरू झाला  बाप बेट्यांचा जागतिक रंगभूमीच्या निमित्ताने एक अविस्मरणीय प्रयोग . ज्यात प्रेक्षक होते त्याची बायको आणि दोन मुले . 
दुसऱ्या दिवशी त्याला मोबाईलच्या रिंगने जाग आली . समोरून त्याच्या नाटकातील एक प्रसिद्ध कलाकार बोलत होता . 
"अरे यार ...मानलं तुम्हा बाप बेट्यांना .. काल घरीच शो केलात . रंगभूमीचे नाव राखले तुम्ही ... तुझ्या मुलाने तुमचा विडिओ पाठवला मला . तुझे वडील आजही खूप सुंदर काम करतात . अरे त्यात्यासाहेबांची स्वगते यावयात बोलणे खायचे काम नाही . मी हा व्हिडिओ  यु ट्यूब वर टाकतोय आणि ह्या शो च्या तिकिटाचे पैसे ही पाठवतोय तुला .  जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्यांना पैसे देण्याचे आवाहन करणार . तुमची नाईट तुम्हाला मिळालीच पाहिजे ... मानलं तुम्हाला ..... शो मस्ट गो ऑन...
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, March 24, 2020

शिकारी

शिकारी 
कोकणात जाणाऱ्या एसटीत तो चढला तेव्हा ती जवळजवळ रिकामीच होती .शहरात काय तर देशातही कर्फ्यु लागला होता. 
पण तो शिकारी होता. जातिवंत हाडाचा शिकारी... नेहमी त्याची नजर शिकार शोधतत फिरायची.कोणी ना कोणी भेटतेच याची त्याला खात्री होती.
नुसता हात लावायचा अवकाश... शिकार अलगद त्याच्या तोंडात जाणार होती.
पण हल्ली त्याला भक्ष्य सहजासहजी मिळत नव्हते .काही वेळातर भुकेने प्राण कंठाशी येत होते . शहरातील सर्व आता हुशार झाले होते ..सावध झाले होते.ते प्रतिकार करत होते.शिकारीला जवळपास भटकू देत नव्हते . त्याच्या कमजोर बाजू त्यांना माहीत होत्या . ते त्याचा उपयोग करून त्याला दूर ठेवीत होते. शेवटी नाईलाजाने तो गावात शिरला.
एसटी डेपोत पूर्ण सन्नाटा होता . आता मात्र त्याची ताकद संपायला आली होती.त्याला फक्त शिकार हवी होती.
फिरता फिरता तो एका शेतात शिरला .शेतात सुदाम सुर्वे  एकटाच काम करीत होता .नवीन शिकार टप्प्यात येताच तो खुश झाला .तो सुदामच्या जवळ गेला . हात पुढे करून म्हणाला.." हाय... !! मी येथे नवीनच आहे .   पियाला पाणी मिळेल का ..."?? सुदाम नुसता हसला . त्याने हातातील फावडे खाली ठेवून त्याला नमस्कार केला "मी सुदाम सुर्वे .. ह्या जमिनीचो मालक ... पाव्हन तुम्ही खयसून इलाव.. त्याने प्रेमळ स्वरात विचारले.
"मी परदेशातून आलोय ..पाणी मिळेल का ..."??  त्याने हसत विचारले.
" व्हय...व्हय.. थांबा वाईच.." तो कोपऱ्यात ठेवलेल्या हंड्याकडे  धावत गेला' घ्या .." असे बोलून हंडा त्याच्या समोर धरला ." हय हाताच्या ओंजळीनेच पाणी पिवूचा .. पेलो नाय वापरत आम्ही .."
नाईलाजाने त्याने हाताची ओंजळ पुढे केली . थंडगार पाण्याने त्याला बरे वाटले पण डोक्यावरील उन्हाने तो कासावीस झाला होता.
"पावन्यानो आता घरी चला आणि जेवनच पुढे जावा..." सुदाम त्याच्याकडे पाहत हसत म्हणाला.
 खुश होऊन तो त्याला मिठी मारायला गेला."नको.. नको.... पाव्हन तुमंच कापड खराब होतील .. "असे म्हणत सुदाम लांब झाला .आता मात्र त्याची अस्वस्थता वाढू लागली.लवकर शिकार मिळाली नाही तर मात्र आपण संपणार हे तो समजून चुकला. समोर शिकार आहे पण त्याला साधा स्पर्श करू शकत नाही ही  बोच त्याला होतीच . आता ह्याच्या घरी तरी कोणीतरी मिळेलच या आशेवर तो त्याच्याबरोबर निघाला.
दारात येताच  सुदामने त्याला थांबविले . एक थंड पाण्याची बादली त्याने त्याच्या पायावर ओतली.
"बसा ...मी आंघोळ करून येतो ...."
साला सगळी मेहनत पाण्यात गेली . ह्याने आंघोळ केली आता परत जाळे विणावे लागेल .नाहीतर घरात कोणीतरी दुसरी व्यक्ती असेलच..
तो अवस्थ होऊन ओट्यावर बसला . घरात कोणी दिसत नव्हते . इतक्यात एक स्त्री बाहेर आली . लांबूनच तिने त्याला हात जोडले. मग कोपऱ्यातील चूल पेटवली . तो पर्यंत सुदामने जेवणाची भांडी बाहेर आणून ठेवली.
"पाव्हन... काय काळजी करू नका .आता गरम गरम जेवनच बाहेर पडा...' सुदाम त्याला म्हणाला.
गरम जेवण त्याची तगमग वाढू लागली.मला माझे खाद्य हवेय.तो तडफडला. सर्व जेवण गरम झाल्यावर ते दोघेही जेवायला बसले .ते गरम जेवण जेवताना त्याचा जीव कासावीस होत होता. जेवण संपताच त्याची ताटे बाहेरच ठेवली गेली . मग सुदामच्या बायकोने गरम पाण्याने ती ताटे स्वच्छ घासली . आता मात्र त्याच्या शरीरात विचित्र संवेदना जाणवू लागली . जवळजवळ बारा तास तो एकटाच फिरत होता . एकही शिकार त्याला मिळाली नाही . त्याचा मृत्यू जवळ येऊ लागला होता . सुदामने हात जोडून त्याला निरोप दिला . काही न बोलता तो बाहेर पडला आणि काही अंतर जाताच कोसळून पडला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Sunday, March 22, 2020

संचारबंदी

संचारबंदी
आज त्या वडाच्या मोठ्या झाडावर गडबड उडाली होती .नेहमीप्रमाणे नोकर कावळ्यांची घाई चालली होती. मेलेल्या पाली.. झुरळी..,कोळणीकडून चोरलेले मासे.. जिवंत अळ्या सर्व वेगवेगळ्या पानात ठेवले होते .तर आजूबाजूच्या झाडांवर चांभार चौकश्या करणारे कावळे उत्सुकतेने बसले होते.
अर्थात आज अखिल भारतीय कावळे संघटनेची सभा भरणार होती हे निश्चित होते. देशातील विविध राज्यातून कावळ्याचे प्रतिनिधी येण्यास सुरुवात झाली होती.. अखिल भारतीय कावळा संघटनेचे अध्यक्ष का.ळा. काक कोणत्याही क्षणी हजर होणार होते . 
अचानक बाहेरचा कोलाहल वाढला आणि का. ळा. काक ..कावकाव करीत हजर झाले . त्यांच्या ओरडण्यावरूनच आज कोणतातरी महत्वाचा विषय आहे हे उपस्थितांच्या लक्षात आले . पण आज कोणीही शिव्या खाणार नाही किंवा कोणाला शिक्षा मिळणार नाही हे ही कळून चुकले .
"सर्वांचे काव काव स्वागत.." त्यांनी तोंडात सिगारेट पेटवून सुरवात केली. रस्त्यावर  पडलेली सिगारेट होती ती .काक याना सिगारेटचे व्यसन होते . 
"आज एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत..."काक बोलू लागले . "तुम्हाला माहीतच आहे संपूर्ण जगभरात मानवजातीवर एक संकट आले आहे . कोरोना नावाच्या विषाणूने  जगभरात थैमान घातले आहे . लोक घराबाहेर पडत नाहीत . कामे बंद आहेत . दळणवळण बंद आहेत.लोकांनी घरात कोंडून घेतले आहे .."
"होय खरे आहे .. दशक्रियेला स्मशानात गर्दी नाहीय . एका पिंडासाठी चारच माणसे येतायत .."स्मशानातील कावळ्यांचा प्रतिनिधी म्हणाला.
"हो.. मार्केटमध्ये मासे घ्यायला ही पूर्वीसारखी गर्दी नसते..." मार्केट प्रतिनिधी म्हणाला
"दुकाने बंद झालीत..रस्त्यावर गर्दी नाही .." रस्त्यावरील कावळ्यांचा प्रतिनिधी म्हणाला.
म्हणजे पुढील महिन्यात बदलीचे अर्ज भरपूर येणार तर... काकसाहेब मनोमन खुश झाले .
" म्हणूनच आपण सर्वांनी मानवाच्या मदतीला जायचे ठरविले आहे .मानव सुरवातीपासूनच आपले मित्र आहेत . ते जरी आपल्यापासून दूर राहतात आपल्याला स्पर्श करायला टाळतात तरीही आपल्याला मान देतात. काहीजण रोज खिडकीवर आपल्यासाठी जेवण ठेवतात .ते आपल्याला त्यांचे वंशज मानतात. माणूस मेला की आपली किंमत त्यांना कळते. मग आता ते संकटात आहेत तर आपण त्यांना त्यातून बाहेर पडण्यास मदत केली पाहिजे... त्यांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर करू .. बोला तयार आहात का ...."?? असे म्हणून जोरात काव काव केले. त्यावर सर्व प्रतिनिधींनी त्यांना काव काव करून पाठिंबा दिला.
"पण आपण नक्की काय करायचे ..."?? एकाने  पानावरील जिवंत अळीकडे आशाळभूतपणे पाहत विचारले.
 "जे कावळे रोज मानवाच्या संपर्कात येतात त्यांनी ते टाळावे . त्यांच्या खिडकीत..गच्चीवर.. जाऊ नये . तुमच्या पायाला ,पंखाला लागलेले विषाणू त्यांच्या घरात जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी. तुमची चोच त्यांचे हात पोचतील अश्या ठिकाणी घासून साफ करू नका . मार्केटमध्ये जे जातात त्यांनी कोळीणींच्या टोपलीत आपली चोच घालून मासे पळवू नये . भविष्यात त्यांना अन्न धान्ये मासे आणि इतर जीवन उपयोगी वस्तूंचा तुटवडा पडू शकतो त्यात आपण भर टाकूया नको. रस्त्यावर फिरणार्यांनी मानवाची थुंकी आणि इतर गोष्टी साफ कराव्या त्यांनी इतर कावळ्यांच्या संपर्कात जाऊ नये . स्मशानातील कावळ्यांनी पिंडाला ताबडतोब चोच मारून आलेल्यानं ताबडतोब मोकळे करावे . पिंडात जे आहे ते त्यांनी खावे . उगाच रुसून बसायचे नाटक करू नये . जे कोणी माझ्या सुचनेसार वागेल तर भिविष्यात त्यांची चांगल्या ठिकाणी बदली करू ... कोणाला काही शंका असल्यास विचारा....."?? असे बोलून काकसाहेब शांत बसले . इतर प्रतिनिधींनी काव काव करून त्यांना पाठिंबा दिला आणि आपापल्या विभागात बातमी द्यायला उडाले .
तिथे अप्पा मानकरच्या खिडकीत नेहमीप्रमाणे छोट्या वाटीत जेवण ठेवून शोभा वहिनी कावळ्यांची वाट पाहत होत्या .." काय गो....?? तुझो आजा आज काय येवुचो दिसत नाय ... त्यास पण कोरोनाची भीती वाटता काय ...?? काय पण म्हणा पण अप्पाक लय काळजी हो आपली . आपल्याक त्रास होऊ नये म्हणून खिडकीत येवुचो बंद झालो बघ .. असे बोलून हात जोडल्यानं.
© श्री किरण कृष्णा बोरकर

Sunday, March 15, 2020

गाऱ्हाणे

गाऱ्हाणे
त्या गावाबाहेरच्या देवळात तिची जोरदार तयारी चालू होती .आजूबाजूचे देव तिच्याकडे कौतुकाने पाहत होते . कारण ही तसेच होते. गावात होळी उत्साहाने साजरी झाली होती आणि आता गावकरी पालखीतून वाजत गाजत नाचवत  तिला आपल्या घरी घेऊन जाणार होते .आजूबाजूच्या देवांच्या कौतुकाच्या नजरा झेलत ती दुसऱ्या दिवशीची  निघायची तयारी करत होती .
खरे तर हेच काही दिवस असतात जेव्हा ती गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन खणानारळाची ओटी भरून घेत होती . त्यांच्या आदरातिथ्याने खुश होऊन त्यांच्या सर्व  मागण्या पूर्ण करीत होती . त्यांचा उत्साह पाहून मनोमन खुश होत होती . बाकीच्या वेळेस सर्व तिच्या पायाशी येऊन आपल्या मागण्या मांडत होते .म्हणूनच या दिवसाची ती खूप वाट पहायची .
सकाळी तिला जाग आली ती ढोल ताश्याच्या आवाजानेच. मानकरी खांद्यावर पालखी घेऊन तिच्या गाभाऱ्यात शिरले . पाया पडून जयजयकार करीत तिला अलगद उचलून पालखीत ठेवले आणि नाचवीत गावात घेऊन आले . ती आनंदाने आपल्या भक्तांच्या घरी जाण्यास तयार झाली .
पाहिले घर तर दत्तू नाईकचे . नेहमीच बंद असते पण पालखीला मात्र नाईक कुटुंबीय जेथे असतील तिथून गावात येतात . दरवर्षी.. आमच्यावर लक्ष राहू दे . सर्वांना सुखासमाधानाने ठेव ...सर्वांना दीर्घायुष्य लाभू दे असेच  गाऱ्हाणे घालतात . साडी भारीतली असते. नंतरच्या लिलावात चांगली किंमत मिळते म्हणा. 
"अरे वा... !! आजगावकरांची मुलगी आणि जावईही आलेत या वर्षी... हो मागाच्यावर्षी नवस केला होता ना ..मुलीचे लग्न होऊ दे ,चांगल्या घरात जाऊ दे .. मी हो म्हटले ... गावातील शाळेत पंखे देणार आहेम्हणे ... बघू नवस फेडतात का ...?? 
हे काय ....?? बाकी सर्व नेहमीचेच .. तो जाधवांचा अश्विन अजूनही सुधारलेला दिसत नाही .काय नाचतय....किती रंग फासलेत चेहऱ्यावर ...??  जाधव काही लक्ष देत नाही पोराकडे.. माझ्याकडे बोलले तर काहीतरी करेन मी .... पण जाधव मानी माणूस .. पाया पडेल ओटी भरेल पण मागणार काही नाही . मला वाटते खूप काही करावे पण हा मागतच नाही . असे भक्त दुर्मिळ झालेत म्हणा.
आले  शेवटी आबा तोंडवळकरच्या दारात.... ह्या माणसाने काय कमी केलेय का माझ्यासाठी...??  ह्याच्या घरी आले की माहेरी आल्यासारखे वाटते . जवानीत ह्या माणसाने गाव गाजविले होते . स्वातंत्र्यलढ्यातील ह्याचे योगदान मला माहित आहे . माझ्याच गाभाऱ्यातील भुयारात किती वेळा लपला असेल . इंग्रजांचा खजिना ही तिथेच लपवून ठेवायचा . माझ्यावर भारी भक्ती हो . देश स्वतंत्र झाल्यावर सर्व खजिना गावाच्या सुधारणेसाठी वापरला. माझे मंदिर नवीन बनविले. दरवर्षी गावकरी त्याच्या दीर्घायुष्यासाठी माझ्याकडे नवस बोलतात. याच्या दारात पाहुणचारासाठी येणे म्हणजे वेगळाच आनंद असतो . आबा ... आले रे मी .. तिने साद घातली.
घरातून चार माणसांनी आबाला खुर्चीत बसवून बाहेर आणला ते पाहून ती हादरली .  एकेकाळी हट्टाकट्टा जोरबैठका काढून शरीर कामावणाऱ्या आबाची अवस्था फारच केविलवाणी झाली होती. त्याच्या डोळ्यात ओळखीची खूण दिसत नव्हती की हात नमस्कारासाठी उठत नव्हते . आतापर्यंत कोणत्याही आजारासाठी दवाखान्यात पाऊल न ठेवणाऱ्या आबाचे शरीर दुबळे होत चालले होते . बाजूच्या माणसाने आबानू पालखी इली दारात.. असे म्हणत त्यांना हलविले.
 एक अनामिक शक्ती अंगात घेऊन आबा दोघांचा आधार घेत उठला. आपल्या थरथरत्या हाताने देवीला नमस्कार केला." गो बाय....आता लवकर सोडव यातून.पुढच्या वर्षी तुका पाया पडायची पाळी येऊ दे नको.... हे ऐकून ती पालखीतून उठली अश्रू ढाळीत आबांच्या समोर गेली . त्याला मिठीत घेऊन डोक्यावरून हात फिरवत म्हणाली भोग आहेत रे आबा .. कोणालाच चुकले नाहीत. हे तुझे गाऱ्हाणे मी ही पुरे करू शकत नाही .
आज  कोणीतरी पहिल्यांदाच आयुष्य संपवावे म्हणून तिच्याकडे गाऱ्हाणे घातले होते.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

निवडक धनंजय

निवडक धनंजय..विज्ञानकथा 
राजेंद्र प्रकाशन 
१९९० ते २०१२ या कालावधीत धनंजय मासिकात प्रकाशित झालेल्या विज्ञानकथांचा हा संग्रह एकत्रित केलेला आहे..साधारण ४४ कथा यात आहेत. 
निरंजन घाटे..गिरीश कुबेर ...डॉ. बाळ फोंडके...मंदाकिनी गोगटे..माधुरी शानभाग यासारख्या मान्यवरांच्या कथा समाविष्ट आहेत.विज्ञानातील वेगवेगळ्या संकल्पनांचा आधार घेत या कथा लिहिल्या गेल्या आहेत.
 यात टाइम मशीन..क्लोनिंग...रोबोट तसेच अत्याधुनिक  फॉरेन्सिकचा आधार घेत सोडविल्या अपराध कथा ही आहेत .पुढील काही शतकात मानवाचे वेगवेगळ्या ग्रहांवरचे राहणीमान त्यांचे प्रवास वाहन वाचून आपण चक्रावून जातो . क्लोनिंग पद्धतीने केलेली जीवनिर्मिती आणि त्यातून येणाऱ्या अडचणी  त्याचे फायदे तसेच तोटे वाचून आपल्याला धक्के बसतात .तर परग्रहावरची सुष्टी कशी असेल मानवाला याचा कितपत फायदा होईल याची ही कल्पना येते . गिरीश कुबेर यांच्या कथेतून संगणक मानवावर वर्चस्व गाजवू लागल्यावर काय होईल याचे भयाण चित्र दिसते .
वातावरण मग ते पृथ्वीवरील असो की परग्रहावरचे असो ... आयुध पारंपरिक असो की अत्याधुनिक  माणसातील गुन्हेगारी प्रवृत्ती बदलत नाही फक्त तिची रूपे बदलतात हेच या कथांमधून जाणवत राहते.
 विज्ञानकथेची आवड असणाऱ्यांना हे पुस्तक म्हणजे एक खजिनाच आहे .

Sunday, March 8, 2020

महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
प्रसाद उकेचा फोन आला आणि मी उडालोच.हा संसारी नवरा मला का फोन करतोय अचानक ...??
" भाऊ  फ्री आहेस का आता....??
 तसाही रविवार असल्यामुळे मी फ्री होतोच.मी हो म्हटले.
मग बसूया का ..?? विक्रमला बोलव.. 
त्याने आज मला धक्केच द्यायचे ठरविले होते.
सौने खुणा करून कोण...?? विचारले..मी फोनवर हात ठेवून प्रसाद सांगितले .मग त्याला म्हटले ठीक आहे नटराजला भेटू आणि फोन ठेवला .
"प्रसाद भाऊजी का ...?? आज बऱ्याच महिन्यांनी तुमची आठवण काढली ...?? ते ही महिलादिनी..?? घरची कामे करून कंटाळले असतील ....?? आता कळले असेल बायकांना किती त्रास असतो संसाराचा गाडा ओढताना ...."?? तिने तोंडाचा पट्टा सुरू केला .
"आम्ही बाहेर जाणार आहोत .. जेवायला नाहीय मी ....."शांतपणे तिला सांगितले .
"बाहेर जाण्याची गरज नाहीय ...इथेच काय तो धिंगाणा घाला..प्रसाद आणि विक्रम भाऊजीना इथेच बोलवा आणि सोबत बंड्याला ही घ्या...."तीने हुकूम सोडला 
"आयला हे काय .."?? यावर्षीचा महिलादिन मला इतका फायद्याचा पडेल वाटले नव्हते .
"अग नको.. कशाला तुला त्रास...?? आम्ही बाहेर जाऊ ...."मी साळसूदपणे म्हणालो.
"बाहेर तुम्ही नाही... तर आम्ही चाललोय आज.ते ही महिलादिनाचे निमित्त काढून. मी.. वनिता..बंड्याची आई आणि अजून दोघी .कुठेतरी सेल लागला असेल त्यातून काही खरेदी करू आणि मग तुमच्याच नटराजमध्ये जेवायला जाऊ . आमचे टेबल राखून ठेवले आहे त्याने. शिवाय महिलांना पन्नास टक्के सूट ही देणार आहे तुमचा शेट्टी.. आणि प्रसाद भाऊजी इथे आले की त्यांच्याकडून भेंडीच्या दोन तीन रेसिपी शिकून घेते मी . मेली भेंडी नेहमीच बुळबुळीत राहतात.ते काहीतरी टिप्स देतील...."सौ ठसक्यात म्हणाली .
फारच प्लॅनिंग झालेले दिसतेय.मी मनात म्हणालो. ह्याच्या मागे कोणाचे डोके आहे ते शोधून काढले पाहिजे.असा निश्चय करून मी विक्रमला फोन लावला  आता तो नक्की माझ्या फोनची वाट पाहत असणार याची खात्री होती मला.
अरे हो.....तुम्हाला प्रसाद उकेबद्दल सांगायचे राहिलेच . प्रसाद आमचा वर्ग मित्र . लहानपणापासून थोडा संथ भित्रा आणि आळशी .पण आमच्याशी फार जमायचे. कदाचित विक्रमने पाठबळ म्हणून असेल . लग्न झाल्यावर तो संसारी नवरा बनला . म्हणजे त्याची बायको कामाला जाते आणि हा घरची कामे करतो. मुलाला जन्म सोडल्यास बाकी सर्व कामे तोच करतो .त्याची बायको घरातील कर्ता पुरुष आहे आणि हा संसारी नवरा ..
मी फोन करून प्रसाद आणि विक्रमला घरीच बोलावले .बायको काही छोटी मोठी खरेदी करायला खाली गेली होती आणि मी घरात आमची तयारी करत होतो. 
बेल वाजली म्हणून दार उघडले तर दारात प्रसाद दळणाची पिशवी घेऊन उभा .. पाठीमागे सौ. पदर तोंडावर ठेवून हसत उभी. 
"अरे प्रसाद ....दळण घरी ठेवून यायचे ना ...?? जाताना विसरलास तर ...."?? मी सहज म्हणालो.
"ए भाऊ...हे दळण तुमचेच आहे ..च्यायला स्वतःची पिशवी ही ओळखता येत नाही ..काय करता रे तुम्ही ...?? सगळे वाहिनीवर टाकून मोकळे .रस्त्यात भेटल्या वहिनी.चक्कीवरून येत होत्या . मी घेतली पिशवी आणि घेऊन आलो " ....पिशवी स्वयंपाकघरात ठेवत प्रसाद म्हणाला .
"बरे झालात हो तुम्ही भेटलात..तुम्हालाच कळतात आम्हा बायकांचे कष्ट. बरे ते जाऊ दे .. मला भेंडीची भाजी कशी करायची ते सांगा..." सौ. ने आपले काम सुरू केले .
"सोपी असते हो वहिनी .. अशी सुरवात करून प्रसाद आपल्या आवडत्या कामात रंगून गेला . 
पाचच मिनिटात विक्रम दरवाजात हजर झाला.प्रसाद भाई अशी हाक मारून तो घरात घुसला.
"वहिनी.... वनिता ला घेऊन आलोय ती बंड्याकडे बसलीय . लवकर निघा आणि आरामात या ..विक्रमने ऑर्डर सोडली.
तशी सौ."अग बाई....!! आली का वनिता ...?? आता निघायला पाहिजे.."असे म्हणत बाहेर पडली.
"काय रे प्रसाद ....आज तुला वेळ कसा ...?? वहिनी महिलादिन साजरा करायला गेल्या का ..?? ग्लास टेबलवर ठेवीत विक्रम म्हणाला 
"हो रे... ती महिलादिन साजरा करणार. पण तो घरीच.ती आज मुलासोबत राहणार .जेवण बनविणार...कपडे धुणार ..साफसफाई देखील करणार... .काही मैत्रिणीना घरी बोलावून जेवायला घालणार ... हे करताना माझी अडचण नको म्हणून बाहेर पाठविले मला...म्हणाली आज तू तुझी मजा कर...च्यायला मला काही सुचेनाच..अशी कधी सवय नाही ना ...?? मग तुमची आठवण झाली . म्हटले तसाही रविवार आलाय.. तुम्ही असलाच घरी . तिला सांगून आलोय तुमच्या बरोबर आहे . तशी ओके म्हणाली".
"म्हणजे महिलादिनी तुझी मजा आहे तर ...?? आमच्या बायका रोज काम करून आज सुट्टी घेतात आणि तुझी बायको रोज तू घराची कामे करतोस म्हणून तुला सुट्टी देऊन स्वतः घर आवरतेय ...." मी हसत म्हणालो.
"काही चुकत नाही रे भाऊ त्यांचे ... रोजच्या त्याच त्याच कामापासून एक दिवस विरंगुळा म्हणून काही वेगळे का करू नये त्यांनी ...?? त्यांचाही हक्क आहे ना ....?? माझी बायको सकाळी जाते ते रात्री येण्याची वेळ नसते . संशोधनात इतकी अडकलेली असते की घरची काळजी नसते.पण कधी कधी वाटते ना स्वयंपाक बनवावा .मुलांशी खेळावे म्हणून हे असले निमित्त आणि आजचा दिवस त्यांचा आहे . त्यामुळे त्या म्हणतील ती पूर्व दिशा मानून आपण ही त्यांना साथ दिली पाहिजे ..."हातातील ग्लास उंचावून प्रसाद म्हणाला .
"अगदी खरे ...म्हणूनच मी नटराजला फोन करून काही टेबले राखून ठेवायला सांगितली होती . वनिताला म्हटले तिथेच जेवून या शेट्टी आपलाच माणूस आहे ...." विक्रम चणे तोंडात टाकीत म्हणाला .
"आणि पन्नास टक्के सूट ही देणार आहे म्हणे बिलात.." मी कौतुकाने म्हणालो.
"तो कसली सूट देतो रे .... पक्का व्यावसायिक आहे तो....मीच म्हटले बिलात पन्नास टक्के कमी कर ते मी नंतर देईन. अशी सूट कोणी देत असेल तरच आपल्या बायका जातील तिथे ....नाहीतर आज जेवण आपल्याला बनवावे लागले असते ...." विक्रम हसत म्हणाला .
"आयला हे बाकी खरे .. मलाही सौ विचारत होती . सेल कुठे चालू आहेत .....??दोन तीन ठिकाणे सांगितली तिला ... "मी हसून म्हटले 
"ए भाऊ.... मलाही सांग ना कुठे आहेत सेल.. ??उद्या जाईन म्हणतो ...प्रसादने पटकन विचारले आणि विक्रमने कपाळावर हात मारला .
"तू गप पी रे ... आजतरी हे सर्व विसर .. आज एन्जॉय करू संध्याकाळी आरामात घरी जा.... "मी प्रसादला म्हटले .
"नाही हा भाऊ .... बायकोने सांगितले आहे संध्याकाळी लवकर घरी ये . माझ्या आवडीचे जेवण बनविणार आहे ती ...".प्रसाद लाजत म्हणाला .
"च्यायला... किती वर्षानी बायकोच्या हातचे जेवणार रे तू...."???. मी त्याच्या पाठीवर थाप मारून विचारले.
इतक्यात माझा फोन वाजला. समोरून सौ. होती "आहो जास्त पीत बसू नका आणि लवकर आटपा. आज संध्याकाळी काहीतरी स्पेशल करते तुमच्यासाठी ..."तिने समोरून म्हटले .
"अग कशाला ....??आपण बाहेर जाऊ आज "मी जरा जोरातच म्हटले .
"काही गरज नाही सकाळ संध्याकाळ बाहेर खायची. तुमच्या बायकोला चांगला स्वयंपाक येतो म्हटलं. उगाचंच खर्च कशाला..??तिने माझ्यापेक्षाही जोरात आवाज काढला. मी फोन बंद केला आणि दोघांकडे पाहिले. दोघेही माझ्याकडे पाहून हसत होते .
शेवटी काही म्हणा स्त्री ती स्त्रीच ... आपल्या माणसांची काळजी घेणारच....
महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, March 7, 2020

तिचा महिला दिवस

तिचा महिला दिवस 
आज त्या वस्तीत खूप लगबग सुरू होती.कारणही तसेच होते.वस्तीतील एका चाळीत...दुसऱ्या मजल्यावरील चंदा आज निवृत्त होणार होती.
खरेतर भर जवानीत निवृत्त होणारी चंदा ही पहिलीच स्त्री .एका सेवाभावी संघटनेने खूप प्रयत्न करून अश्या मुलींना या वस्तीतून बाहेर काढण्याचे ठरविले होते.फार कठीण काम होते म्हणा.... ..एखादी तरुणी या वस्तीत आली की तिचे प्रेतच बाहेर पडायचे.
पण यावेळी असे झाले नाही.चंदा ही बाहेर पडणारी पहिली स्त्री ठरणार होती . ती संस्था तिचे लग्न लावून पुढील सर्व संसाराची तजवीज ही करणार होती.हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण वस्ती जमा झाली होती.
 तसाही आज जागतिक महिलादिन होता .यादिवशी एक स्त्री एका जगातून दुसऱ्या चांगल्या जगात प्रवेश करतेय याचा आनंद प्रत्येकाला होत होता.
चंदाही खुश होती. तिचे नशीब थोर की या दलदलीतून लवकर बाहेर पडत होती. तिचा होणारा नवरा तर तिचा नेहमीचा गिऱ्हाईक . आठवड्यातून एकदा यायचा तिच्याकडे .बोलता बोलता बरीच माहिती एकमेकांना शेयर केली . शेवटी एकमेकांच्या कधी प्रेमात पडले ते कळलेच नाही.
 तिला इथून सहजासहजी बाहेर पडणे शक्य होणार नाही हे तो जाणून होताच.म्हणून त्याने या सेवाभावी संस्थेची मदत घेतली .त्या संस्थेच्या अथक प्रयत्नाने आज हा सुदिन चंदाच्या आयुष्यात उजाडला होता . आज सर्वांच्या समक्ष त्यांचे लग्न होणार होते आणि ते नव्या आयुष्याला सुरवात करणार होते.
ठरल्याप्रमाणे काही वेळातच दोघांचे लग्न लागले . चाळीतील मालकीणबाईचा आणि संस्थेच्या संचालिका मॅडमचा निरोप घेऊन ते बाहेर पडले . 
तासाभरात त्यांची टॅक्सी एका देखण्या इमारतीसमोर थांबली.आपले नवीन घर याच इमारतीत आहे पाहून चंदा मनोमन खुश झाली .सहाव्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट होता . दोन बेडरूम हॉल किचन .. हरखून जात ती संपूर्ण घर फिरली . तो भान हरपून तिच्याकडे पाहत होता .  त्याच्याकडे लक्ष जाताच ती लाजली आणि धावत येऊन त्याच्या कुशीत शिरली .भर दुपारीच त्या फ्लॅटमध्ये मधुचंद्र साजरा झाला .प्रणयाच्या नव्या धुंदीत ती कधी झोपली ते तिलाच कळले नाही.
जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती . तो खुर्चीवर बसून एकटक तिच्याकडे पाहत होता.
" चल तयारी कर लवकर..पाहुणे येणार आहेत.फार नटू नकोस हलका मेकअप पुरे ...."तो हसत म्हणाला.
 तशी ती हसली.
हो.... तयार हो... म्हणजे भडक मेकअप करून खिडकीजवळ उभे राहणे हेच तिला माहीत. दुसरे काय जमत होते तिला.ती चेहऱ्यावर हलकी पावडर आणि लिपस्टिक लावून तयार झाली . थोड्याश्या मेकअपमध्येही ती सुंदर दिसत होती.
इतक्यात बेल वाजली.नवऱ्याने दार उघडले तेव्हा एक माणूस आत आला . चेहऱ्यावरून अतिशय सभ्य आणि मोठ्या पदावर असणारा वाटत होता. नवऱ्याने ही माझी पत्नी अशी ओळख करून दिली आणि बेडरूमकडे इशारा केला.तो बेडरूममध्ये गेला आणि ही हादरली .
"हे काय ....."?? तिने चिडून विचारले 
"तुझे प्रमोशन ...महिलादिनानिमित्त ...." तो छद्मीपणे म्हणाला.
"पण आपण सुखाने संसार करणार होतो...हे सगळे सोडून देणार होतो ...." तिने हताशपणे विचारले.
"संसार सुखाचा करणारच आहोत...पण उपजीविकेसाठी हे करावेच  लागेल तुला आणि यातून येणारा पैसा आपणच वापरणार आहोत.आजपासून तुझे खिडकीत उभे राहून गिऱ्हाईक बोलविण्याचे दिवस संपले . आता मोजकीच ..उत्तम.. स्वच्छ गिऱ्हाईक तुझ्याकडे येणार . महिन्यातील काही दिवसच काम करावे लागेल तुला.दर महिना मेडिकल चेकअप होईल. जिममध्ये जावे लागेल . भरमसाठ पैसा मिळेल . बाहेर ताठ मानेने वावरू शकशील . आता तुझा उच्चभ्रू वर्गात प्रवेश झालाय..मग हे प्रमोशनच नाही का ...."?? त्याने थंडपणे विचारले.
"मी निघून जाईन ...सगळ्यांना सांगेन ... "ती ओरडली.
"जा.. पण नंतर काय करणार ....??? त्या खिडकीत पुन्हा भडक चेहरा करून  उभी राहणार ..?? गुटका खाणाऱ्या ..दारू पिणाऱ्याना अंगावर घेणार ...आणि एक दिवस रोगाने मरणार... जा.. यातच आनंद मिळत असेल तर नक्की जा.... मी दुसरी शोधेन ... आणि हो त्या संस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करू नकोस .त्यांना त्यांचा हिस्सा पोचला आहे ... असे बोलून तो दुसऱ्या बेडरूममध्ये निघून गेला.
ती हताश होऊन त्या बंद दरवाजाकडे पाहत बसली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, March 4, 2020

अमेरिकेची सीआयए... पंकज कालुवाला

अमेरिकेची सी. आय. ए....... पंकज कालुवाला 
परममित्र पब्लिकेशन
जगभरातील प्रत्येक देशात काही मोठ्या घटना घडल्या की त्यात अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेचा हात असतो असे म्हटले जाते. 
जगातील प्रत्येक देशात या संघटनेने आपले पजाळे पसरले आहेत . 
पण ही गुप्तचर संस्था कधी स्थापन झाली ...?? त्यामागे कोण आहेत ...?? अश्या संस्थेची गरज का भासली ...?? याला निधी कुठून येतो ..?? या सर्व प्रश्नांची उत्तरे लेखकाने पूर्ण अभ्यास करून दिली आहेत.यात सीआयएच्या असंख्य कारवायापैकी काही मोजक्याच पण महत्वाच्या अश्या कारवाया लेखकाने घेतल्या आहेत .यात फक्त यशस्वी नाही तर फसलेल्या कारवायाही आहेत.
 सीआयए च्या जन्मकहाणी पासून पुस्तकाची सुरवात होते .त्यांचा पारंपरिक शत्रू सोव्हिएत युनियनमधील कारवाया .व्हिएतनाम मधील फसलेले युद्ध..ऑपरेशन AJAX हे इराणमधील मिशन.पश्चिम आफ्रिकेतील घाना देशात केलेला हस्तक्षेप याची खोलवर माहिती आहेच.
 पण भारतातही काही घटनांमागे सीआयए आहे हे वाचून आश्चर्य वाटते .हिमालयातील नंदादेवी शिखरावरून चीनच्या अण्वस्त्र प्रोजेक्टवर पाळत ठेवण्याची कारवाई वाचून आपण थक्क होतो .भारतातील काही लष्करी अधिकारी सीआयए साठी काम करीत होते याची माहिती भारतातील गुप्त कारवाया या प्रकरणात मिळते.
ऑपरेशन अझोरियनमध्ये त्यांनी रशियाची बुडालेली पाणबुडी पळवून आणण्याचे धाडस केले होते .
या सर्व महितीमधून लेखकाने आंतरराष्ट्रीय राजकारण आणी इतिहासाचा किती प्रचंड अभ्यास केलाय याची जाणीव होते .अतिशय किचकट अश्या हेरगिरीच्या कारवाया लेखकाने आपल्या शैलीदार आणि खिळवून टाकणाऱ्या शब्दात मांडल्या आहेत . वाचताना अजिबात कंटाळा येत नाही उलट इतकी खोलवर आणि अचूक माहिती वाचून आपण अचंबित  होतो.

Sunday, March 1, 2020

स्वाहा.... नारायण धारप

स्वाहा..... नारायण धारप
शहराच्या बाहेर मेन रोडवर  तो तीन मजली बंगला होता.बहुतेक वेळा तो रिकामा असायचा .कधीतरी भाड्याने दिला जायचा . त्या बंगल्याचा मूळ मालक कोण याविषयी कोणालाच माहिती नव्हती.. पण त्याचे पेपर्स क्लिअर होते.
 श्रीधरची एकुलती एक विनिता लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली . पण लग्नानंतर सात आठ वर्षांनी परत भारतात आली .तिला सहा वर्षाचा मुलगा होता.आता  तिचे मिस्टर  यशवंतराव भारतात राहूनच नवीन उद्योगधंदा सुरू करणार होते . काही महिने भारतात मुक्काम करायचा ठरविल्यामुळे त्यांनी तो बंगला भाड्याने घेतला . तीन मजली असलेला बंगला त्या तिघांसाठी सोयीचा होता . विनिता आपल्या कुटुंबासोबत  त्या बंगल्यात राहायला गेली. 
बंगला आणि आजूबाजूचा परिसर  गूढच होता. दोन मजल्यावर काही रूम्स होत्या पण तिसरा मजला थोडा चमत्कारिक होता. संपूर्ण मोकळ्या असलेल्या त्या तिसऱ्या मजल्याची ओढ वनिताला लागली. एक हवीहवीशी वाटणारी आनंदाची संवेदना तिला जाणवू लागली.
 या बंगल्यात एक फेयर लेडी आहे असे सनी तिला सांगू लागला . बंगल्याची साफसफाई केली तेव्हा बंगला नको तितका कोरा करकरीत वाटू लागला . विनिताला त्या जागेत विचित्र घडतेय याची जाणीव होऊ लागली.
त्यांचे बस्तान बसले तसा श्रीधर कामासाठी बाहेरगावी गेला.पण जेव्हा तो परत आला तेव्हा तिघेही गायब झाले होते . बंगल्याचा एजंट गायब झाला होता. 
काय घडले त्याचा शोध घेण्याचे श्रीधरने ठरविले .शोध घेताना त्याला कळले की  आतापर्यंत त्या बंगल्यातून अनेक कुटुंबे नाहीशी झाली होती.
तीन वर्षांनी  पुन्हा एक नवीन कुटुंब त्या बंगल्यात राहायला आले आहे .श्रीधरने त्या कुटुंबातील तरुणीला गाठून बंगल्याचा इतिहास सांगितला आणि त्या तरुणीला तसेच काही अनुभव आले . आता श्रीधर आणि ती तरुणी... या दोघांना मिळून बंगल्यातील दुष्ट शक्तींशी लढा द्यायचा आहे . ते यात यशस्वी होतील की पुन्हा काही बळी पडतील.
भरदिवसा अंगावर काटा आणणारी भयकथा