Wednesday, January 31, 2024

Neru

Neru
नेरू 
सारा मोहम्मद एक अंध तरुणी.आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत राहतेय.त्या दिवशी तिचे आईवडील लग्नाला गेले होते.तिची केयरटेकर मावशी तिला सांगून बँकेत गेली .जाताना तिने नेहमीसारखे दाराला कुलूप लावले.काही वेळाने घरी आली तेव्हा तिला कळले कोणीतरी घरात घुसून सारावर बलात्कार केलाय .तिने पोलिसांना बोलावले नंतर तिचे आईवडीलही आले.
एक अंध तरुणी काय सांगणार ? असे वाटत असताना तिने बलात्कार करणाऱ्या तरुणाचे शिल्प काढून दाखविले.पोलिसांनी आपल्या पद्धतीने अधिक माहिती काढली आणि त्या तरुणाला एअरपोर्टवरून अटक केली.
तो तरुण घटनेच्या आदल्या दिवशी साराच्या घरी मित्राचा पत्ता विचारण्यासाठी आला होता आणि तो शेजारीच राहत होता असे साराच्या आईवडिलांनी सांगितले.
तो तरुण मायकल एका श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा आणि गृहमंत्र्यांचा होणारा जावई आहे.मायकलच्या वडिलांनी देशातील सर्वोत्कृष्ट वकील राजशेखरला नियुक्त केले .राजशेखरची मुलगी पूमीमा ही पण सुप्रीम कोर्टात वकील आहे.
मायकलच्या जामीनासाठी राजशेखर कोर्टात उभा राहतो.त्याचा दबदबा पाहून सरकारी वकील गोंधळतो आणि मायकलला सहज जामीन मिळतो.
कोर्टात केस उभी राहणार असते. पण कोणीही मोठा वकील साराची केस घ्यायला तयार नाही.इन्स्पेक्टर पॉल अतिशय प्रामाणिक अधिकारी पण त्यालाही केसवरून हटविले जाते.तरीही तो साराच्या बाजूने उभा आहे.
एक विजयमोहन नावाचा वकील आहे.पॉल एका सूत्रांकडून त्यांच्यापर्यंत पोचतो .विजयमोहन एके काळी राजशेखरकडे कामाला होता आणि पूमीमाचा प्रियकर राहिला होता.त्यामुळेच त्याची नोकरीही गेली आणि तीन वर्षाची बंदीही.आता तो कोर्टात उभा राहत नाही पण वकिलांना वेगवेगळ्या निकालाचे दाखले ,आणि कोर्ट केसेसचे संदर्भ देण्याचे काम करतो.
विजयमोहन पॉल आणि त्याची मदतनीस आहाना यांच्या आग्रहावरून साराच्या घरी जातो.साराशी बोलून तो केस स्वीकारतो.फार वर्षांनी तो आता कोर्टात उभा राहणार आहे आणि ते ही राजशेखर सारख्या कसलेल्या वकीलासमोर.
केसच्या सुरवातीला चाचपणारा गोंधळलेला विजयमोहन हळूहळू स्वतःला सावरतो आणि आत्मविश्वासाने राजशेखरच्यासमोर कसा उभा ठाकतो त्याचे मुद्दे वेगवेगळे संदर्भ देऊन कसे खोडून काढतो ते पाहण्यासारखे आहे.
हा एक अतिशय संथ पण थ्रिलर कोर्टरूम ड्रामा आहे.यात काहीही भडक दाखविले नाही .कोण कोणावर चिडत नाही ,मोठमोठे दमदार संवाद नाहीत.संपूर्ण केस कोर्टाच्या तांत्रिक बाबीवर आधारलेला आहे. राजशेखर मायकलला वाचविण्याचे पूर्ण प्रयत्न करतोय तर विजय मोहन तो दोषी आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करायचा प्रयत्न करतोय.
विजयमोहनच्या भूमिकेत मोहनलालने नेहमीसारखा दमदार अभिनय केलाय.त्याच्या शांत स्वभावाला ही भूमिका शोभून दिसते.अनस्वार राजनने अंध साराच्या भूमिकेत प्राण ओतले आहेत.बलात्कारित अंध असूनही ती धाडसी आहे हे प्रत्येक प्रसंगात दाखविले आहे. पूमिमा राजशेखरच्या भूमिकेत प्रियमणी आहे.उत्तरार्धात विजयमोहनच्या समोर पूर्ण ताकदीने उभी राहिली आहे.
हल्लीच्या काळात कोणतेही पुरावे कसेही तयार करता येतात हेच या चित्रपटातून दिसते.
चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे .

Tuesday, January 23, 2024

किलर सूप

Killer Soup
किलर सूप
स्वाती शेट्टी ,प्रभाकर उर्फ प्रभूची पत्नी.एक छान रेस्टोरंट  बनवायचे तिचे स्वप्न आहे. आपण पाया आणि चिकन सूप बनविण्यात एक्सपर्ट आहोत असे तिला वाटते.तिने एका बाईकडे स्पेशल क्लास लावला आहे आणि मनीषा कोईराला नावाने बुरखा घालून क्लासला जाते.
प्रभाकर शेट्टी, स्वाती शेट्टीचा नवरा.अरविंद शेट्टीचा भाऊ. एका पायाने अधू.स्वातीने बनविलेले सूप बेसिन मध्ये फेकून देतो.आपल्या भावाच्या कंपनीत त्याने करोडोचा घोटाळा केलाय. एक फाईव्ह स्टार रिसॉर्ट काढायचे त्याचे स्वप्न आहे.
अरविंद शेट्टी .एक उद्योजक ,ड्रग व्यापारी. प्रभूच्या चुका वेळोवेळी माफ करणारा. पण अतिशय खतरनाक आणि शिवराळ माणूस.
अपेक्षा उर्फ अपू शेट्टी .अरविंद शेट्टीची मुलगी.तिला इटली फ्रांसला पेंटिंग शिकायला जायचे आहे .पण अरविंद शेट्टीला ते मान्य नाही.अपू कंपनीतील करोडो रुपयांचा घोटाळा शोधून काढते.
उमेश पिल्लई, प्रभू आणि अरविंदचा मसाजर आहे.तो प्रभुसारखा दिसतो .फक्त त्याच्या डाव्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे.त्याला प्रभूचे  रहस्य माहीत आहे.तो प्रभूला ब्लॅकमेल करतोय.त्याचे आणि स्वातीचे अनैतिक संबंध आहेत.
किरण नादार एक खाजगी गुप्तहेर .त्याला प्रभूने ब्लॅकमेलर शोधण्यासाठी नेमले आहे.त्याच्याकडे स्वाती आणि उमेशचे संबंध असल्याचे पुरावे आहेत.
त्या दिवशी कुकिंग क्लासला जाताना आपला कोणीतरी पाठलाग करतोय असा स्वातीला संशय येतो . ती नादारच्या पाठी लागते ,त्यांची झटापट होते.तो गाडीतून पळतो पण कॅमेरा स्वतीच्या हाती लागतो.एक ट्रक नादारच्या गाडीला ठोकतो त्यात त्याचा मृत्यू होतो.
इन्स्पेक्टर हसनकडे या अपघाताची चौकशी करण्याचे काम येते.तो काही महिन्यातच निवृत्त होणार आहे.त्यामुळे या केसकडे फारश्या गांभीर्याने पाहत नाही.पण त्याचा साथीदार तरुण सब इन्स्पेक्टर थुपली हुशार आहे .तो काही गोष्टी शोधून काढतो पण त्यात त्याचाही मृत्यू होतो.
थुपलीच्या मृत्यूमुळे हसनला खड्ड्यात पुरलेली बॉडी सापडते .ती बॉडी कोणाची आहे ??
यावरून एकूण कथेचा अंदाज आपल्याला आलाच असेल .प्रत्येक भागात गुंतागुंत वाढत जातेय.
नेहमीसारखी एक खून कथा आहे ज्यात खुनी कोण हे आपल्याला माहीत आहे पण ती कशाप्रकारे सादर केलीय हे महत्वाचे आहे .
विशेष म्हणजे यातील स्टार कास्ट मोठी आहे .उमेश महातो आणि प्रभू शेट्टीचा डबल रोल मनोज वाजपेयीने साकारला आहेत.प्रभू शेट्टी पायाने अधू आहे तर उमेश डोळ्याने तिरळा .
स्वाती शेट्टीची प्रमुख भूमिका कोकणा सेन शर्माने केलीय.
तर सयाजी शिंदेने आपल्या नेहमीच्या पद्धतीने अरविंद शेट्टी केलाय.
तामिळ अभिनेता निसार इन्स्पेक्टर हसनच्या भूमिकेत आहे.थकलेला ,पोट सुटलेला ,निराश चेहऱ्याचा हसन त्याने छान उभा केलाय .
अनपेक्षित शेवट आणि दुसऱ्या सिझनची कल्पना देणारी ही सिरीज हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

Friday, January 19, 2024

लिफ्ट

LIFT
लिफ्ट
सायरस आणि त्याची टीम पुरातन कलात्मक वस्तूंच्या चोऱ्या करते. नुकतेच त्यानी अतिशय कुशलतेने एका लिलावातून मूल्यवान पेंटिंग चोरली होती.
त्या पेंटिंगच्या शोधात इंटरपोल अधिकारी एबी त्यांच्यापर्यंत पोचते.पण त्याचवेळी  सायरसला पाचशे कोटी किमतीच्या सोन्याची चोरी करण्याची ऑफर इंटरपोलकडून मिळते. ह्या सोन्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होणार आहे अशी इंटरपोलला खात्री असते.सोने कायदेशरीत्या जाणार आहे त्यामुळे इंटरपोल काहीच करू शकणार नाही.
हे सोने चोरून इंटरपोलला दिले तर सायरस आणि त्याच्या साथीदारांची सर्व आरोपातून मुक्तता होणार आहे .पण एबीसोबत असल्याशिवाय सोने चोरणार नाही अशी अट सायरस घालतो.एबी त्यासाठी तयार होते.
सोने विमानातून दुसरीकडे जाणार आहे.त्याचे वजन दहा टन असते.जमिनीवरून सोने पळविणे शक्य नाही तेव्हा विमानातून ते चोरायचे असे ठरते.पण ते खूप कठीण आहे. सोन्याच्या तिजोरीपर्यंत जाऊन ती उघडणे यासाठी फारच कमी वेळ आहे आणि सुरक्षा कडेकोट आहे.
प्रत्यक्षात कृती सुरू होते तेव्हा त्यात अनपेक्षित अडचणी येतात. सायरस आणि त्याची टीम खरोखर ते सोने चोरण्यात यशस्वी होतील का ? 
एक वेगवान ,थरारक श्वास रोखून धरणारा चित्रपट नेटफ्लिक्स वर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, January 17, 2024

बर्लिन

बर्लिन 
BERLIN
नेटफ्लिक्स वर सर्वात गाजलेली सिरीज म्हणून मनी हाईस्टचे नाव घेतले जाते.त्यामध्ये प्रोफेसर आणि बर्लिन यांचे नाते खूप जवळचे होते.त्यातील बर्लिन हे पात्र घेऊन ही सिरीज बनवली आहे.ही स्पॅनिश सिरीज मनी हाईस्टप्रमाणे प्रसिद्ध आणि यशस्वी होणार हे नक्की.
मनी हाईस्ट आणि बर्लिन या एकमेकांशी संबंधित असतील.कदाचित पुढच्या सीजनमध्ये जास्त लक्षात येईल. ही चोरी मनी हाईस्टच्या खूप वर्ष आधीची आहे.
देशाच्या अनेक शहरात विखुरलेले किमती दागिने लिलावासाठी एकत्र जमा केले जाणार आहेत. त्याची एकूण किंमत 44 लाख युरो आहे. दागिन्यांची संपूर्ण जबाबदारी पॉलिग्नसकडे आहे.दागिने कधी तिजोरीत येणार याची माहिती फक्त त्यालाच आहे.
बर्लिन आणि त्याची टीम अश्या चोऱ्या करण्यात पटाईत आहे. त्याच्याकडे एकूण सहाजण आहेत.त्यात तिजोरी फोडणारे एक्सपर्ट आणि कॉम्प्युटर हॅकर ,आहेत.स्वतः बर्लिन योजना बनविण्यात कुशल आहे.अतिशय कडेकोट बंदोबस्तात असलेली तिजोरी फोडण्यात बर्लिन आणि त्याचे साथीदार यशस्वी होतील का ??
चोरी करणे फारसे कठीण नाही तर त्यानंतर ती पचविणे खूप कठीण आहे.आणि ती कशी पचवायची याची योजना बर्लिनने तयार केलीय.
पण चोरी करताना अडथळे येणारच.कुठेतरी योजनेत अनपेक्षित चुका होतात. 
आता 44 लाख युरोचे दागिने कसे चोरी होतात आणि त्यानंतर सर्व टीम कशी देशाबाहेर पळून जाते हे पहायचे असेल तर श्वास रोखून धरणारी ही सिरीज  पाहायलाच हवी.
नेटफलिक्सवर ही सिरीज हिंदी भाषेत आहे.

Tuesday, January 16, 2024

फूल मी वन्स

FOOL ME ONCE
फूल मी वन्स
बरकेट फॅमिली लंडनमधील प्रसिद्ध फॅमिली आणि उद्योजक .त्यांचे जगभरात औषध उत्पादनाचे कारखाने आहेत.अनेक खेळांना ते स्पॉन्सर करतात. ज्यूडीथ बरकेट फॅमिली प्रमुख स्त्री आहे.जी स्वतः मानसोपचारतज्ञ आहे. ज्यूडिथच्या एका मुलाने ज्योने मायाशी लग्न केलंय. माया आर्मीत पायलट होती.एका घटनेने तिची नोकरी गेली आता ती खाजगी हेलिकॉप्टर प्रशिक्षक आहे.
मायाची बहीण क्लेयर ज्योच्या कंपनीत काम करते. एके दिवशी अज्ञात चोर तिच्या घरात शिरतो आणि गोळी झाडून तिला ठार मारतो .माया त्यावेळी बाहेरगावी असते .त्यानंतर चार महिन्यांनी ज्योची मायाच्या समोर दोन चोर हत्या करतात आणि पळून जातात.
इंस्पेक्टर सामीकडे हे प्रकरण तपासासाठी येते.सामी प्रामाणिक अधिकारी आहे.पण तो विचित्र आजाराने त्रस्त आहे. मध्येच त्याच्या डोळ्यासमोर अंधार येतो .कधी त्याला छोटा अटॅक येतो.
 क्लेयर आणि ज्योची हत्या एकाच बंदुकीतून झालीय हे सामी शोधून काढतो .त्याचा मायावर संशय असतो .मायाला चार वर्षांची लिली नावाची मुलगी आहे.
 एके दिवशी छुप्या कॅमेऱ्यात मायाला ज्यो लिलीशी खेळताना दिसतो आणि ती हादरते. ती या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे ठरविते .त्यासाठी ती आपल्या सैन्यातील पोलीस मित्राची मदत घेते. हळूहळू तिला सत्य काय आहे ते कळते.
आठ भागाची ही सिरीज अतिशय रोमांचकारी आणि उत्कंठा वाढविणारी आहे.यात हिंसाचार ,चित्तथरारक पाठलाग ,गोळीबार ,हाणामारी वगैरे अजिबात नाही .ही एक वेगवान तपासकथा आहे ज्यात आपण नकळत ओढले जातो आणि शेवट पाहून धक्का बसतो.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

रोल प्ले

Role Play
रोल प्ले
इमा खरे तर एक कॉन्ट्रॅक्ट किलर .तिचे एक छान कुटुंब आहे. नवरा डेव्ह आणि दोन मुले असा तिचा संसार आहे.कामानिमित्त बाहेर जाते तेव्हा ती हत्या करते.
यावेळी ती नुकतीच एक हत्या करून घरी आली पण आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे हेच विसरून गेलीय.याची शिक्षा म्हणून डेव्ह आणि ती रोल प्ले करायचे ठरवितात.
एका हॉटेलात खोट्या नावाने डेव्ह रूम बुक करतो .तर इमा वेषांतर करून खोटे नाव घेऊन तिथे त्याला अनोळखी स्त्री म्हणून भेटणार असे ठरते.
पण डार्क वेब मध्ये तिच्या नावाचेच ओपन कॉन्ट्रॅक्ट निघते आणि एक कॉन्ट्रॅक्ट किलर बॉब तिच्या मागावर निघतो. बॉब तिला हॉटेलमध्ये गाठतो पण ती त्याला ठार करते.
दुसऱ्या दिवशी बॉबच्या हत्येची बातमी टीव्हीवर येते आणि डेव्ह हादरतो. इकडे इमा पुन्हा बिझनेस ट्रिपचे कारण सांगून घराबाहेर पडते.
आता तिला आपल्या कुटुंबाला  वाचवायचे आहे.तिच्यासोबत कुटुंबही धोक्यात आहे.जिथे जाईल तिथे पाठलागावर व्यावसायिक मारेकरी मागे आहेत.
ती यातून वाचेल का ?
एक हलका फुलका वाटणारा चित्रपट अचानक थरारपट बनतो.पुढे काय होणार याची उत्सुकता वाढत जाते. 
वेगवान असा हा रोल प्ले प्राईम वर हिंदी भाषेत आहे .

Thursday, January 4, 2024

मॅन इटर्स अँड मेमरीज

मॅन इटर्स अँड मेमरीज
( शिकारीचे दिवस ) 
मूळ लेखक ..जे ई. कॅरिंगटन
अनुवाद..लालू दुर्वे
नावीन्य प्रकाशन
लेखक इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमधून निवृत्त झाले.त्यांनी डेहराडून ,नैनिताल, महाबळेश्वर येथील जंगलात काम केले होते. त्यांनी अनेक शिकारी केल्या .वन्यजीव निरीक्षण त्यांचा छंद होता.
लेखकाने अतिशय थोडक्या नेमक्या शब्दात सर्व वर्णन केले आहे .त्यात कुठेही अतिशोयक्ती वाटत नाही.
अस्वलाच्या गोष्टी या कथेत त्यांनी अस्वल आणि छोटे पिल्लू यांनी केलेल्या धान्याची चोरीचे वर्णन वाचून हसू येते. तर काळा नरभक्षक या कथेत काळ्या बिबळ्याच्या शिकारीचे अंगावर काटा येणारे वर्णन आहे.
वनराज आणि वनवराह कथेत वन्यप्राणी निरीक्षण कसे करावे .दोन प्राण्यांची झुंज कशी श्वास रोखून पहावी हे शिकवतात.
हत्तीच्या गोष्टी कथेत हत्ती कसे पकडतात .त्यांचा शिकारीसाठी कसा वापर होतो हे सांगितले आहे.
ज्यांना शिकारकथा आवडतात त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल .