Monday, October 31, 2016

द सिन्स ऑफ द फादर ....जेफ्री आर्चर .. अनुवाद .लीना सोहनी

द सिन्स ऑफ द फादर ....जेफ्री आर्चर .. अनुवाद .लीना सोहनी
हॅरी क्लिफ्टन काही कारणांमुळे आपली खरी ओळख लपवून टॉम ब्रॅडश्या नावाने एका जहाजावर नोकरी करीत असतो . दुर्दैवाने खऱ्या टॉमच्या हातून आपल्या सख्या भावाचा खून होतो .  सेफ्टन हा टॉमचा वकील हॅरी पुढे कमी शिक्षेचा पर्याय पुढे करून आरोप स्वतःवर घ्यायला लावतो . हॅरीपुढे दुसरा पर्याय नसल्याने तो हे मान्य करून तुरुंगात जातो . दरम्यान हॅरीची पत्नी आणि त्याच्या बाळाची आई त्याला शोधायला घराबाहेर पडते . हॅरीचे समुद्रात पडून निधन झाल्याची बातमी खरी मानायची तिची तयारी  नाही . हातात कोणतेही धागेदोरे नसताना खऱ्या हॅरीला जगासमोर आणायचा आणि त्याच्याशी लग्न करायचे असा निश्चय करूनच ती घराबाहेर पडते .तिच्या या प्रवासात अनेक कौटुंबिक रहस्ये उलगडली जातात . पण खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगणारा  टॉम ब्रॅडश्या हा खरा हॅरी आहे हे सिद्ध होते .

Sunday, October 30, 2016

आयटम

तो कोपऱ्यातला आयटम बघ ,लय चालू माल आहे ",विक्रम माझ्या कानात पुटपुटला . मी नाइलाजाने मेंदूवड्याचा घास खाली ठेवला आणि त्याच्यावर इच्छेला मान द्यावा म्हणून नजर वळवली.नेमक्या त्याच वेळी त्या बाईने आमच्याकडे पहिले आणि तिची नजर रेंगाळली. परत ती समोरच्या पुरुषाशी गप्पा मारू लागली. आज नाष्टयाचे बिल विक्रम भरणार होता म्हणून मी त्याला काही प्रत्युत्तर करणार नव्हतो .
"बघीतलेस का ? कशी नजर दिली बघ ?"च्यायला दोन दिवसात पटेल ती "लावतेस पैज "? मी विक्रमच्या बाबतीत हि रिस्क घ्यायला कधीच तयार नसतो आणि पैज हरणे हे माझ्या नशीबातच लिहिले आहे .पण अजून एखादी डिश मागविण्यासाठी विषय वाढविणे आवश्यक होते ."अरे विक्रम असतील त्या बाईला भरपूर मित्र म्हणून तिला चालू बाई ठरवायचे का ??" झाले !!विक्रम पिसाळला "दर पंधरा दिवसांनी वेगवेगळ्या पुरुषांबरोबर फिरत असते .कधी इथे तर कधी विसावात,त्यादिवशी ती दोघांबरोबर ग्रेट पंजाबमध्ये वाईन पित होती ."मग चालू नाहीतर काय ??बापरे ,विक्रमकडे बरीच माहिती दिसते. मी ताबडतोब उपमा ऑर्डर केला."  काय रे विक्रम आतापर्यंत तू किती बायकांबरोबर फिरलास ?? त्याने छाती पुढे काढून अभिमानाने सांगितले "पंधरा सोळा तरी असतील? मग तुही चालू माल नाहीस का "??"मी त्याला प्रश्न केला ."असे कसे मी पुरुष आहे ,माझ्यात ताकद हिम्मत आहे .लोक मला कौतुकाने लेडीकिलर म्हणतात ."विक्रमच्या स्वरात अभिमान डोकावत होता. "अच्छा ,म्हणजे पुरुष अनेक बायकोबरोबर फिरले तर ते हिरो, लेडीकिलर आणि बायका दोन तीन पुरुषांबरोबर फिरल्या तर त्याचालू "? "हा कोणता न्याय ?जगातील 98% पुरुषांना वाटते कि प्रत्येक सुंदर स्त्रीने आपल्याशी बोलावे, मैत्री करावी आणि संधी मिळाली तर झोपावेसुद्धा,मग 2% स्त्रियांनी पुरुषासारखा विचार का करू नये. गरज सर्वाना असू शकते . मग त्या बायका चालू माल आणि पुरुष शूर, लेडीकिलर ." तसा विक्रम अधिक चिडला "अरे पण आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे .इथे पुरुषांना प्राधान्य दिले जाते आणि बायकांना मागेच ठेवले जाते . " कबुल आहे ", मी म्हणालो "पण ते त्या त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून होते .पण आता बायकाही पुरुषांच्या बरोबरीने काम करतात,त्यांनाही मित्र हवेत .त्यांनाही भावना आहेत ,त्यांनाही पुरुषांशी मैत्री करून आपल्या भावना ,फिलिंग शेअर काराव्याश्या वाटतात .द्रौपदीने हि सर्वगुण संपन्न पती मागितला पण ते गुण वेगवेगळ्या पुरुषात होते म्हणून तिला पाच पती मिळाले .तिला तुम्ही पतिव्रता मानता. मग एखाद्या बाईने 3/4 वेगवेगळ्या गुणांचे मित्र निवडले तर ती चालू कशी ?"  "पण पुरुष बाईकडे एकाच नजरेने बघतो ,ते म्हणजे सेक्स "विक्रम उत्तरला "होय कबुल आहे ,पण बाईला निसर्गाने एक गोष्ट दिलीय ती म्हणजे सहनशीलता,संयम आणि ती या गोष्टीमुळेच पुरुषांवर कंट्रोल ठेवू शकते . त्यांचे मन पालटवू शकते .तिच्या योग्य वागण्यानेही पुरुष सेक्सची भावना विसरू शकतात .स्त्रियांनी जर हा संयम सोडला तर सगळे भर रस्त्यात ,सार्वजनिक ठिकाणी जनावरसारखे वागतील .असेल त्या बाईला पुरुषांशी मैत्री करायची आवड जशी तुला आहे ,पण ताबडतोब ती चालू आहे असे मत व्यक्त करू नकोस ." मी असे बोलल्यावर विक्रमचा चेहरा विचारमग्न झाला आणि ते पाहून आता बिल कोण देईल या चिंतेत मी पडलो.

Tuesday, October 25, 2016

परदेश

छानपैकी आडवा पडून पेपर वाचत होतो तेवढ्यात अचानक बंड्याचे वडील आता शिरले. चेहरा पाहूनच लक्षात आले बंड्याने काही नवीन भानगड केली आहे.

सौ. ना चहाची ऑर्डर देऊन सरळ विचारले 'बोला काका, काय नवीन ??  ते वैतागूनंच म्हणाले," त्या बंड्याला समजवा, परदेशातली नोकरी चालून आली आहे. चांगला पगार, फुकट जेवण, राहायला जागा, आणि येण्याजाण्याला गाडी. पण हे आमचं कार्ट नाही बोलतंय. आता तुम्हीच समजवा त्याला. पोराला पोटाला चिमटा  काढून शिकवले, ते काय हेच बघण्यासाठी का ?? त्याच्या लहानपणापासून हे एकच स्वप्न उराशी बाळगलं, की ह्याचं सगळं चांगलं व्हावं. आणि आता जेव्हा समोरून चांगलं भवितव्य दारावर टकटक करतय तर हा दारच उघडायचं नाही म्हणतो. माझं तर डोकंच काम करत नाही."

माझ्या लक्षात आले काय घडले ते. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाची प्रगती बघायची असते. मी बाबांशी सहमत होतो म्हणून त्यांना सांगितले बोलेन बंड्याशी. रात्री जेवण  झाल्यावर निरोप दिला "खाली ये"  तो अर्ध्या तासात हजर झाला. "काय रे बंड्या ?? काय चालू केलेस तू ? परदेशातील नोकरी नको का म्हणतोस? अरे तुला शिकविण्यासाठी काय काय केले बाबांनी माहित आहे ना तुला ? मग आता हि सोन्याची संधी का सोडतोस??" बंड्याने दोन फालुदा ऑर्डर केले, माझ्या खांद्यावर हात ठेवून हसला आणि म्हणाला बाबांची बाजू ऐकलीत? आता माझं म्हणणं ऐका.

"भाऊ पहिली गोष्ट म्हणजे मला जे काही तिथे मिळणार आहे त्यापेक्षा डबल मेहनत ते माझ्याकडून करून घेणार. मग ज्या देशाने मला शिक्षण दिले, संस्कार दिले त्या देशासाठी मी मेहनत का करू नये? मला मान्य आहे कि तिथे मला सर्व काही माझ्या गरजेपेक्षा जास्त मिळते आहे, मग मला जेवढी गरज आहे तेव्हडे मला इथे मिळत असेल तर मी तिथे का जावे ?? दुसरी गोष्ट, तुम्हीच म्हणता ना बाबांनी खूप कष्ट करून मला शिकवले मग आज त्यांच्या कष्टाचे फळ मी त्यांना परदेशात नोकरी करून देऊ का? लहानपणापासून माझ्या प्रत्येक गरजेला ते माझ्यासाठी माझ्यासोबत होते, अजूनही आहेत मग त्यांच्या उतारवयात मी त्यांचा आधार बनू की त्यांना सोडून माझे सुख शोधायला जाऊ?? गाडी तर मी इथेही घेईन भले ती छोटी असेल पण त्यातून फॅमिलीला फिरायला तरी घेऊन जाईन. भले इथे घर जरा छोटं असेल पण मी माझ्या माणसांसोबत असेन. इथे नुसतं खुट्ट झालं तरी सर्व आपलेपणाने धावत येतात परदेशात कोण येईल. रोज रात्री लेट आलो तरी घरी जेवायला मिळते, आई झोपेतून उठून काय हवे नको ते बघते तिथे कोण विचारेल मला?" आणि मी तिथे खोर्यानी पैसा कमवून आई-बाबांच्या आजारपणात त्यांच्या गरजेला त्यांच्याजवळ नसलो तर काय करू त्या पैशाचं??? इतके बोलून बंड्या थांबला.

मीही विचारात पडलो पण मध्यमवर्गीय सुखाची कल्पना मला सोडवेना. परदेशात नोकरी हे बहुसंख्य तरुणांचे स्वप्न, त्यासाठी तर प्रयत्न करीत असतात सगळेच. तरीही "बंड्या हे स्पर्धेचे युग आहे अंतीम ध्येय गाठाण्यासाठी सगळेच जिवाच्या आकांतानी धावत असतात, अधिक पैसे कोणाला नको आहे?? आज माझेही बरेसचे मित्र परदेशात आहेत त्यांना हा प्रोब्लम नाही" मी माझेच घोडे पुढे दामटवले."
हो भाऊ कबूल आहे शेवटी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. मला माझ्या फॅमिली बरोबर राहायचे आहे त्या शर्यतीत भाग घ्यायची माझी इच्छा नाही. आरामात काम करू जो वेळ मिळेल तो कुटुंबियांबरोबर घालवू. त्यांना संपूर्ण भारत फिरवायची माझी इच्छा आहे. बिचारे आमचे सर्व करता करता गाव सोडून कुठेही गेले नाहीत.तर आता आमच्या बरोबर फिरतील. मला यापुढे काही सुचेना. ते पटतही  होतं, पण सुवर्णसंधी जात्ये याचा खेदही वाटतं होता. शेवटी म्हटले "ठीक आहे, तुला जे योग्य वाटते ते तू कर मी सांगेन तुझ्या बाबांना. शेवटी तू विचार करूनच निर्णय घेतला असशील. "असे बोलून आम्ही निघालो.

घराखाली येताच बंड्या म्हणाला "भाऊ दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे,वृद्धाश्रमातील अनाथ लोकांचे अंत्यसंस्कार करायला जाणारा मी,  उद्या माझ्याच घरातील लोकांच्या अंत्यसंस्काराला हजर राहू शकलो नाही तर कधी सुखाने झोपू शकेन का???"

मी सुन्न.........

Sunday, October 16, 2016

क्रिटिकल मास ....स्टीव्ह मार्टिनी... अनुवाद ..सुदर्शन आठवले

क्रिटिकल मास ....स्टीव्ह मार्टिनी... अनुवाद ..सुदर्शन आठवले
जेनिफर कोल हि तरुण वकील वाशिंग्टनमधील एका छोट्या गावात आपला वकिली व्यवसाय करीत शांतपणे  जगतेय . एक नवा उद्योग चालू करण्यासाठी डीन बेल्डन तिची मदत घेतो .पण काही दिवसांनी त्याला ज्यूरीसमोर चौकशीसाठी बोलाविण्यात येते पण अचानक तिथे त्याचा मृत्यू होतो . गिडियन रे हा संयुक्त राष्ट्राचा आण्विक शस्त्रांचा  तज्ञ आहे .राशियातून दोन आण्विक शस्त्रे चोरीला गेल्यामुळे तो अस्वथ आहे .त्याचा पाठपूरवठा करताना त्याला ती दोन शस्त्रे कुठे पाठवली त्याचे चलन सापडते ,त्यावर बेल्डनच्या कंपनीचे नाव असते . तपासासाठी तो त्याच्या वकीलाकडे ,जोसलीन कोलकडे येतो आणि उलगडत जाते एक भयानक सत्य.  एका छोट्या गोष्टीने सुरवात झालेली हि कथा शेवटी पोचते ती प्रचंड संहार करणाऱ्या अणुबॉम्बकडे आणि हीन दर्जाच्या राजकारणाकडे

Friday, October 14, 2016

द सेव्हन्थ स्क्रोल ...विल्बर स्मिथ ..अनुवाद ..बाळ भागवत

द सेव्हन्थ स्क्रोल ...विल्बर स्मिथ ..अनुवाद ..बाळ भागवत
चार हजार वर्षांपूर्वीची  इजिप्तशियन राणीच्या कबरीचा शोध लावताना योगायोगानेच त्या कबरीजवळ अत्यंत हुशार अशा ताईताने फेरो मेमोस आणि त्याचा अफाट खजिना कुठे दडवून ठेवला आहे त्याचा नकाशा ड्युराइड आणि त्याची पत्नी रायन यांच्या हाथी सापडतो .  तेच आहे हे सेव्हन्थ स्क्रोल .त्यानंतर ड्युराइडचा खून होतो आणि त्याच्या पत्नीच्या मागे आता खुनी लागले .रायन, निकोलस ला मदतीला घेऊन त्या कबरीच्या शोधात निघते .त्यांचा हा शोध नाईल पासून एथिओपियाच्या जंगलात फिरतो . जीवावर उदार होऊन ते दोघेही ती कबर  आणि खजिना शोधून काढतात .  पण त्या खजिन्यामागे कित्येक लोक आहेत जे वेळप्रसंगी खून हि करू शकतात . एखादा चित्तथरारक चित्रपट पाहतोय अशी हि कादंबरी आपली क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवते . एकदा हाती घेतले कि खाली ठेवू नये असे पुस्तक

Tuesday, October 11, 2016

प्रसंगरंग ....अरुण घाडीगावकर

  प्रसंगरंग ....अरुण घाडीगावकर
आज मराठी रंगभूमीला १०० वर्षांची परंपरा आहे .काहीही झाले तरी शो मस्ट गो ऑन हे नाटकवाल्यांचे  प्रमुख सूत्र . कितीही अडचणी येवो पण दिलेल्या वेळेत प्रयोग झालाच पाहिजे हि परंपरा प्रत्येक नाटकवाला  पाळतोय.आपल्यासारख्या प्रेक्षकांना  समोर सादर होणाऱ्या प्रयोगमागे कितीजणांची मेहनत आहे ,त्यांनी काय काय कष्ट केले आहेत याची जाणीवहि नसते .असेच काही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन घाडीगावकर आपल्या समोर आले आहेत . नाटकाचे विविध ठिकाणी होणारे प्रयोग तिथे येणाऱ्या अनपेक्षित अडचणी ,कलावंत आणि तंत्रज्ञांचे प्रवासात होणारे हाल . प्रयोगाची वेळ पाळताना होणारी तारांबळ , चौथ्या अंकाच्या गमती ,असे अनेक प्रसंग लेखकांनी रंगभूमीवर काम करणाऱ्या जुन्या कलावंतांच्या साहाय्याने ह्या पुस्तकात मांडल्या आहेत .सांगायला अतिशय आनंद होतो कि माझे वडील श्री. कृष्णा बोरकर यांनीही  काही आठवणी सांगून लेखकाला सहकार्य केले आहे . घडीगावकारानी अतिशय मोकळ्या मनाने पुस्तकात त्यांचे आभार मानले आहेत .

Sunday, October 9, 2016

तो

तो कंजूरमार्गाला माझ्या डब्यात शिरायचा आणि त्याची ती विशिष्ट टाळी ऐकून माझी पुस्तकात खुपसलेली मान वर जायची .जणु तो आपल्या आगमनाची वर्दी द्यायचा .मग प्रत्येकाकडे टाळी वाजवत आणि टोमणे मारत फिरायचा .जो पैसे देत नाही त्याच्यापाशी जास्तवेळ घोटाळायचा त्याला लाडीगोडी लावायचा ,स्पर्श करायचा ,जो देईल त्याला आशीर्वाद म्हणून डोक्यावर हाथ ठेवून जायचा .
माझ्याकडे येऊन टाळी वाजवली कि मी वर  पाहायचो आणि मानेनेच नाही बोलायचो ,मग तो निमूटपणे मागे फिरायचा .एकही शब्द ना बोलता .गेले वर्ष दीड वर्ष  हेच चालू होते ,पण त्याने किंवा मी तोंडातून एकही शब्द बाहेर काढला नाही.
पण त्यादिवशी कुटुंबाला घेऊन डोंबिवलीला जायचे होते .नंतर गर्दी होते म्हणून नेहमीचीच लोकल पकडली . कांजूरमार्गला त्याने डब्यात एन्ट्री केली .त्याला पाहताच बायको कानात कुजबुजली "आहो,द्या त्याला काहीतरी ,आशीर्वाद चांगले असतात त्यांचे ". मी हसून खिश्यात हाथ घातला आणि पाच रुपयाचे नाणे हातात ठेवले .नेहमीप्रमाणे तो आला पण यावेळी माझ्याकडे बघून तो काही न करता परत मागे फिरला आणि दुसरीकडे जाऊन हाथ पसरला .बायकोने माझ्याकडे डोळे वटारून पाहिले. त्यानंतर दोन दिवस सुट्टी असल्याने माझे जाणे झालेच नाही .आता उद्या बघू काय करतो तो ??????

Saturday, October 8, 2016

ब्रिडा... पाऊलो कोयलो ..अनुवाद .. प्रशांत तळणीकर

ब्रिडा... पाऊलो कोयलो ..अनुवाद .. प्रशांत तळणीकर
आपल्या सभोवतालच्या विश्वात सामावून जाणे ते अनुभवाने हि बऱ्याच जणांची इच्छा असते.त्यातीलच एक ब्रिडा. हि ते विश्व जाणून घेण्यासाठी जादूविद्येचा मार्ग स्वीकारते ,.स्वतःला चेटकीण समजू लागते. त्यात ती अनेक अनुभव घेते आणि अधिकाधिक गोंधळात पडत जाते . तिच्या लक्षात येते कि विश्व अनेक माध्यमातून आपल्याशी बोलतेय. खरे तर कादंबरी काही खास नाही .मला वाटते लेखक फक्त त्याच्या अल्केमिस्टवरच जगतोय .अल्केमिस्ट आणि इलेव्हन मिनिट्स ह्या दोनच कादंबऱ्या आवडल्या मला ,बाकीच्या सुमार वाटतात.

Friday, October 7, 2016

कर्तव्य

टेबलावरचा इंटरकॉम उचलला आणि विपुलला कॅबिनमध्ये बोलावून घेतले.विपुल वर्षभरपूर्वीच आमच्याकडे ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉईन झाला होता. आम्ही फॅक्टरीच्या मेन्टेनन्स विभागात काम करतो. तो आत येऊन समोर बसला "विपुलशेठ ,मी गमतीने बोललो " चला दसरा दिवाळी आली, आता थोडी मोठी कामे काढा मेन्टेनन्ससाठी". विपुल  तोंडातून शब्द काढेना. "काय झाले??" थोडा आवाज चढवून विचारले मी. "काही नाही सर, पण यावर्षी मी दसरा आणि दिवाळीला कामावर येणार नाही". "का ???" माझा पारा हळू हळू चढू लागला. आम्हाला हि सण नाही का?"  प्रत्येक सण फॅक्टरीत साजरा करू का?"   त्यानेही आवाज थोडा चढविला. काय मिळते येवून ?? सगळे घरी मजा मारतात, फॅमिलीबरोबर सण साजरा करतात आणि आम्ही आपले इथे पडीक. बरं एवढं करून काही एक्सट्रा फायदा मिळेल तर तेही नाही. घरी बायकोच्या शिव्या मिळतात त्या वेगळ्या"  तो पोटतिडकीने बोलत होता. "मग बाळा कशाला आलास या क्षेत्रात? साधी सरळ पदवी घेऊन कारकुनी करत बसायचे ना?? नाहीतर अजून जास्त शिकून आमच्या डोक्यावर येऊन बसायचे, आणि उठता-बसता आमची मारायची होती" मी अस्सल आमच्या मेन्टेनन्स भाषेत बोललो. आता काही क्षणातच कॅबिनचे रण क्षेत्रात रूपांतर होणार होते हे नक्की. पण तो सावरला, आणि नरमाईच्या सुरात म्हणाला ,"तसे नाही सर, पण मलाही सोशल लाईफ आहे " मीही शांत झालो. मनात म्हटले बायकोने तासलेले दिसतेय याला, आणि हसू आलं मला. कारण माझे ते तरुणपणीचे दिवस आठवले. मीही तेव्हा चिडायचो,कंटाळायचो अशा सुट्टीच्या दिवशी कामावर यायला, पण नंतर कळू लागले कि आपण जे करतोय त्यामुळे आपल्याच लोकांचा, कंपनीचा फायदा होतोय. मी हे विपुलला समजावले. "हे बघ विपुल असे प्रत्येकजण बोलू लागले तर या देशाला, समाजाला सर्विस कोण देणार ? पाणी पुरवठा करणारे सुट्टी घेऊ लागले तर या दिवशी पाणी कोण देणार, फायर ब्रिगेड वाले सण म्हणून सुट्ट्या घेऊ लागले तर आग विझवायला कोण जाणार? देशाच्या सीमेवर कोण उभे राहील जर दिवाळीला सैनिकांना सुट्टी दिली तर ?? अनंत चतुर्थीला पोलिसांना सुट्टी दिली तर बंदोबस्त कोण पाहिलं,? कायदा सुव्यवस्था कोण सांभाळेल ??" त्याला बसवले आणि शांतपणे सांगितले " हे बघ मित्रा, तू जे हे क्षेत्र तुझ्या मनाने निवडले आहेस तर प्रत्येक परिस्थीतीला हसतमुखानी सामोरं जायची तयारी ठेव. असा त्रागा करुन काही साध्य होत नसतं. जो पर्यंत तू या क्षेत्रात राहशील तो पर्यंत तुला जे आहे ते स्वीकारावे लागेल. उद्या तू आला नाहीस तर कामे थांबणार नाहीत, मी येऊन काम करेन. पण तू त्यात नापास होशील. विपुल बर्यापैकी शांत झाला होता. कॅबीनमध्ये येतना कपाळावर आठ्या घेऊन आलेला तो जाताना स्मितहास्य घेऊन गेला.

Wednesday, October 5, 2016

जिहाद ...उमेश कदम

"जिहाद" ....उमेश कदम
बाबा कदम यांचे सुपुत्र उमेश कदम यांची हि कादंबरी .अमेरिकेने मुस्लिमसमाजविरोधात पुकारलेल्या लढ्याला प्रत्युत्तर म्हणून मुस्लिमांनी उभारलेला लढा म्हणजेच जिहाद .हि कादंबरी अल कायदा आणि त्यांना समांतर असलेल्या दहशदवादी संघटना ,त्यांचे कार्य अशा विषयांवर आधारलेली आहे . या कादंबरीचा नायक हा इंग्रज आहे .पण खडतर बालपणीच्या आयुष्याला कंटाळून तो वाईट मार्गाला लागतो आणि तुरुंगातील मुस्लिम तरुणांच्या संगतीत राहून मुस्लिम धर्म स्वीकारतो . हळू हळू तो अल कायदाच्या जाळ्यात ओढला जातो . त्यांच्या अनेक दहशतवादी कारवायात भाग घेतो .जिहाद हि कादंबरी आपल्याला अफगाणिस्तान ,युरोप ,येमेन अश्या वेगवेगळ्या भागात घेऊन जाते .या कादंबरीची मांडणी अतिशय सोपी आणि सरळ आहे ,त्यामुळे वाचताना तितकी पकड घेत नाही .