Wednesday, March 30, 2022

चाणक्याचा मंत्र ....अश्विन संघी

चाणक्याचा मंत्र ....अश्विन संघी 
अनुवाद...उमा पत्की 
साकेत प्रकाशन 
ही कथा दोन पातळीवर घडतेय. त्यांचा काळही वेगळा आहे . तीन हजार वर्षांपूर्वी अलेक्झांडर भारतावर आक्रमण करू पाहत होता तेव्हा विष्णुगुप्त उर्फ चाणक्यने मगध राजा धनानंद यांच्याकडे भारताला वाचविण्याची विनंती केली.
पण उन्मत धनानंद राजाने भर दरबारात त्याचा अपमान केला आणि त्याला कैदेत टाकले. त्या झटापटीत चाणक्याच्या शेंडीची गाठ सुटली .धनानंदच्या जागेवर दुसरा राजा बसवून त्याला भारताचा सम्राट बनविन आणि परकीयांच्या आक्रमणापासून भारत भूमीचे रक्षण करेन तेव्हाच शेंडीची गाठ पुन्हा बांधेन अशी प्रतिज्ञा चाणक्यने भर दरबारात केली.
त्याचवेळी वर्तमानकाळात गंगासागर मिश्रा नावाचा एक इतिहास शिक्षक अशीच काही स्वप्न पाहतोय.त्यांनाही  भारतासाठी एक पंतप्रधान तयार करून सत्ता आपल्या हाती आणायची आहे . त्यासाठी त्यांनी एका मुलीला लहानपणापासूनच  स्वतःच्या मार्गदर्शनाखाली घडवायला सुरवात केलीय. भविष्यात आपल्या पक्षाच्या हातात संपूर्ण भारताची सत्ता येईल अशीच त्यांची योजना आहे .
चाणक्य आणि गंगासागर यांनी आपले राज्यकर्ते कसे घडविले .त्यासाठी त्यांनी कोणते राजकारण वापरले . कुटनीतीचा वापर कसा केला .त्याचीच ही कथा . 
चाणक्यचा एक मंत्र 
चारशे वेळा म्हणा 
चार हजार दिवस प्रार्थना करा 
तेव्हाच मिळेल चाणक्याची  शक्ती .....

Friday, March 11, 2022

सूर्यास्त...जयवंत दळवी

सूर्यास्त..... जयवंत दळवी
नवचैतन्य प्रकाशन 
दळवींच्या अनेक कथा कादंबरी वरून नाटक चित्रपट बनविले गेले .पण सूर्यास्त हे पहिले नाटक रंगभूमीवर आले आणि त्यानंतर कादंबरी प्रकाशित झाली. त्या आधी 1977 साली दीपावली दिवाळी अंकात सूर्यास्त कादंबरी प्रकाशित झाली होती.
आप्पाजी देशमुख हे थोर स्वातंत्र्यसेनानी .आज त्यांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री आहे.पण ते मुलांसोबत न राहता आपल्या पत्नीसोबत बाबुरावकडे राहतात.बाबुराव मुख्यमंत्र्यांचा मुलगा आप्पाजींचा नातू.
देवाछाया इमारतीच्या 28 व्या मजल्यावर बाबुराव आणि संताराम राहतात. संताराम मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक .आप्पाजी अजूनही भ्रष्टाचाराविरुद्ध लढतायत .पण हल्लीच्या काळात त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही.आता त्यांची पत्नी ही त्यांच्या विरुद्ध बोलते. आप्पाजी कधी कमिशनराना फोन करतात तर कधी मोठ्या वृत्तपत्रांच्या संपादकांना जाऊन भेटतात पण कोणीही त्यांना साथ देत नाही. उलट मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचवतात .
देवछाया इमारतीच्या आजूबाजूची झोपडपट्टी हटवायचे प्रयत्न अनेक वर्षे चालू आहेत. पण कोणालाही त्यात यश मिळत नाही .पण शेवटी अशी एक घटना घडते त्यात आप्पाजी आणि झोपडपट्टी कायमचे हटविले जातात .

Tuesday, March 8, 2022

मध्यस्थ... फ्रेडरिक फॉरसिर्थ

मध्यस्थ... फ्रेडरिक फॉरसिर्थ
अनुवाद....लीना सोहोनी 
ऑक्सफर्डच्या रस्त्यावरून सकाळी पळण्याचा सराव करीत असताना  सायमन कॉरमॅकचे अपहरण झाले आणि पूर्ण जग हादरले. सायमन हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन कॉरमॅकचा मुलगा होता. ब्रिटिश गुप्तहेर आणि अमेरिकन गुप्तहेर मिळून सुमारे शंभर लोक त्याच्या संरक्षणासाठी हजर होती.असे असूनही त्याचे अपहरण केले गेले.
त्या अपहरणाच्या वाटाघाटीसाठी जगातील सर्वोत्तम मध्यस्थ शोधला गेला. क्वीन हा आतापर्यंत तरी जगातील सर्वोत्तम मध्यस्थ समजला जात होता .त्याच्यावर हे काम सोपविले गेले.क्वीनने वाटाघाटी आपल्या पद्धतीनुसार केल्या.
शेवटी पुरेशी खंडणी घेऊन  सायमनला एका निर्जन रस्त्यावर सोडून देण्यात आले .ब्रिटिश आणि अमेरिकेन एजंट त्याला ताब्यात घेण्याआधीच एका बॉम्बस्फोटात सायमन मारला गेला.
योग्य खंडणी घेऊनही सायमनचा असा क्रूर मृत्यू का झाला ...??? मुळात छोट्याश्या खंडणीसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षकाच्या मुलाचे अपहरण का केले होते..??
क्वीनने या गोष्टीचा छडा लावायचे ठरविले.तो जसजसा अपहरणकर्त्यांच्या जवळ गेला त्याआधीच त्यांची हत्या झाली होती.
कोण आहे याच्या मागे....?? 
रशियातील तेलसाठे संपत आले आहेत.त्यांची तेलासाठी शेजारच्या राष्ट्रावर नजर आहे. तर अमेरिकेतील धनाढ्य व्यावसायिक सौदीच्या शेखची सत्ता उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत.या सर्वांचा सायमनच्या हत्येशी संबंध आहे का....?? क्वीन हे शोधून काढेल का....??
एक थरारक, अंगावर काटे आणणारी कादंबरी

Tuesday, March 1, 2022

तो

तो
ती नेहमी खिडकीपाशीच बसून असायची.समोर काही अंतरावर जळणाऱ्या आगीकडे पाहत बसायची.
 कळायला लागले तेव्हापासूनच ती एका जागी बसून असायची . तिच्या कमरेखालचे शरीर काहीच काम करत नव्हते .फारफार तर आता कुठे दहा वर्षांची असेल. खिडकीतून बाहेर बघत राहणे हाच तिचा टाईमपास .खिडकीतून काही अंतरावर ती स्मशानभूमी होती. नेहमी एकतरी चिता तिथे पेटत असायचीच. अंत्यसंस्कारासाठी आलेली माणसे न्याहाळणे हाच तिचा विरंगुळा .
त्या गर्दीत तो तिला दिसायचा . सहा फूट उंच.कमावलेले शरीर .कपाळावर भस्म. डोक्यावर राख .सतत गर्दीत इकडे तिकडे फिरत असायचा .माणसे श्रद्धांजली वाहून बाहेर पडली की हा चितेची व्यवस्था पाहायचा .काठीने चिता वरखाली करून पूर्ण पेटू द्यायचा.त्यावेळी त्याचे उघडे शरीर घामाने चकाकायचे .
कधीकधी साधारण मध्यरात्री हिला जाग यायची तेव्हा तिथे तो जळत्या चितेच्या प्रकाशात हातातील बाटलीतून घोट घेत धुंद होऊन नाचत असायचा . कधी कधी चक्क काही माणसांच्या घोळक्यात भाषण करताना  चिलीम ओढताना दिसायचा.
हिला त्याच्याविषयी उत्सुकता वाटू लागली .बऱ्याचवेळा हात हलवून तिने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण त्याला इतक्या लांबून ती दिसत नसावी .पण त्या दिवशी त्याने अचानक तिच्या दिशेने पाहिले . काही क्षण थांबून त्याने हात हलविला .त्यानंतर त्यांचे एकमेकांकडे पाहून हात उंचावून हाय चालू झाले .
एक दिवस रात्री तिला अचानक जाग आली . तिने सवयीने स्मशानाच्या दिशेने पाहिले . तो धुंद होऊन चितेच्या प्रकाशात नाचत होता . मध्येच हातातील चिलीम तोंडाला लावून जोरदार कश मारत होता . अचानक त्याचे लक्ष  तिच्याकडे गेले आणि तो तिच्या दिशेने चालू लागला . काही क्षणात तो तिच्या  खिडकीसमोर उभा होता .
"तुला भीती नाही वाटत रात्रीचे असे फिरायची..."?? तिने मनात बरेच दिवस साचून राहिलेला प्रश्न विचारला.
"कोणाची ...?? भुताची ...?? की जनावरांची ..?? नाही वाटत कसली भीती. सर्वांपलीकडे गेलोय मी .."?? त्याने हसून उत्तर दिले.
"मला नेशील तिकडे .."?? तिने स्मशानाकडे बोट दाखवून विचारले .
"चल की ....'असे बोलून त्याने तिला अलगद उचलून घेतले आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागला .
"तू इथे राहतोस .."?? 
"होय ...' एका बाकड्यावर तिला हळुवार बसवत त्याने उत्तर दिले.
"इथे नेहमी गर्दी असते का ..."?? आजूबाजूला फिरणारी माणसे पाहत तिने विचारले.त्यात काही स्त्रिया लहान मुले ही होती. सगळे जण त्याच्याकडे पाहून हात हलवीत सलाम करीत होते.
"सगळेजण फिरायला येतात . गप्पा मारायला येतात..." तो सहज म्हणाला. 
"ते आमच्या बिल्डिंगमधील काकाही आलेत.."ती एका वृद्ध व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली. "खूप दुःखी असतात ते पण आता किती खूष दिसतायत .."ती त्याने दिलेला दुधाचा ग्लास हातात घेत म्हणाली.
"इथे येणारा प्रत्येकजण खूष असतो .तू ही खूष झालीस ना ..."?? तो गूढ हसत म्हणाला ."चल घरी सोडतो तुला .."असे म्हणून  तो तिला उचलून घ्यायला पुढे आला .
"नको ..मला चालवेसे वाटते ..."असे म्हणून तिने त्याचा हात पकडला आणि घराकडे चालू लागली.घराजवळ येताच त्याने तिला अलगद उचलले आणि पुन्हा खिडकीतून बेडवर ठेवले.
"मी निघतो ....भेटू पुन्हा ..."असे बोलून तो वळला .
"एक मिनिटं ...."ती थोड्या कठोर स्वरात म्हणाली..."तू भूत आहेस ना ..."??
तो आश्चर्याने वळला ...
"तुला कसे कळले...भुतांविषयी किती माहिती आहे तुला ...."??त्याने विचारले .
"जगातील कोणतीही व्यक्ती जमिनीवर उभे राहून तिसऱ्या मजल्यावरील छोट्या मुलीला खिडकीतून सहजपणे उचलून घेऊ शकत नाही.आणि स्मशानातील ते काका आठ दिवसांपूर्वीच देवाघरी गेले .त्यावेळी तू ही हजर होतास ..मी पाहिले तुला ..."ती नजर रोखून म्हणाली .
तो हसला ."उद्या महाशिवरात्र आहे .मी या दिवसात असाच फिरत असतो सगळ्या स्मशानात. तेच तर माझे मूळ घर आहे. इथली राख मला थंडावा देते. तू मला बोलावलेस म्हणून तुला भेटलो ..मी भूत नाही मी रुद्र आहे..."
"पुन्हा भेटशील ..."तीने हसत विचारले .
"आतातर सारखी भेट होईल ..."तो गूढ हसला आणि वळला .
दुसऱ्या दिवशी सकाळी ती आपल्या बेडवर शांतपणे झोपलेली आढळली पुन्हा कधीही न उठण्यासाठी .
© श्री.किरण कृष्णा बोरकर