Thursday, March 30, 2017

तो आणि ती

तो ....
आज तिचा नकार आला आणि एक पर्व संपले . खरेच आनंद झाले कि दुःख तेच अजून कळत नाही . नव्याची नवलाई होती तसे झाले . पहिल्यांदा ती बोलायची तेव्हा खूप बोलावेसे वाटायचे मग हळू हळू त्याचा  कंटाळा येऊ लागला . तिच्याबरोबर दिवस कसे  जाऊ लागले  ते कळलेच नाही. पण नंतर बाकीची कर्तव्य आठवू लागली . रोज रोज पिझ्झा,बर्गर खाणे खिशाला परवडत नव्हते .  मल्टिप्लेक्समध्ये कोणतेही चित्रपट पाहणे हि आवडत नव्हते .मग आम्ही एकमेकांना गृहीत धरू लागलो . शारीरिक आकर्षण होतेच त्यामुळे शरीरसुखहि घडलेच . मग हळू हळू चिडचिड होऊ लागली . सांपत्तिक स्थिती ,फॅमिली ,राहणीमान यामध्ये भरपूर तफावत  आढळू लागली .तिध्यास सतत गोड गोड बोलणे कंटाळवाणे वाटू लागले . प्रेम काही प्रमाणात ओसरू लागले .  हळू हळू भेटणे कमी झाले ,मग चॅटिंग हि कमी .शेवटी काल तिचा मेसेज आला  आपण थांबूया इथेच . मोकळे झाल्याचा आनंद कि फसविल्याचे दुःख हेच काळात नव्हते . वाटले, बरे झाले. नाहीतरी समोर नवीन आलेली देसाईंची भाची हल्ली येता जाता रोज स्माइल देते तिला का नाराज करू ???
ती.....
शेवटी काल त्याला मेसेज केला  ,कि थांबूया इथेच आपण . बरे वाटले एक विषय संपवला अर्थात त्यानेही मनधरणी केली नाहीं ते बरेच झाले नाहीतर परत द्विधा मनस्थिती झाली असती . सुरवातीला खूप आवडायचा .त्याचे मागे मागे फिरणे ,हसरा चेहरा ,सर्व गोष्टीला होकार देणे छान वाटायचे . दिवस कसा जायचा तेच कळायचे नाही .  कोठेही गेलो तरी माझ्याच मर्जीने वागायचं . मला आवडायचे सिनेमाला जाणे ,पिझ्झा बर्गर खाणे . त्यानेही कधी नाही म्हटले नाही . पण किती दिवस ?? साधी नोकरी होती त्याची .त्यात घरखर्च हि तोच करायचा .मी या गोष्टीत कधी लक्ष दिले नाही . माझी परिस्थिती उत्तम ,जे मागेन ते मिळायचे ,स्वतःची बेडरूम होती त्यामुळे प्रायव्हसी हि होती . एकदा तर याच बेडरूम मध्ये आम्ही मजा केली घरी कोणी नसताना . पण नंतर त्याची कटकट चालू झाली ,हळू हळू माझ्या काही गोष्टींना विरोध होऊ लागला . मी जणू हक्काची आहे अशी वागणूक होऊ लागली . हॉटेल मध्ये जाणे ,सिनेमा बघणे कमी झाले . प्रत्येक गोष्टीचा हिशोब होऊ लागला .मला गृहीत धरले जाऊ लागले . कधी भेटलो कि भविष्याच्या चर्चा चालू  मला कंटाळा येऊ लागला .मग भेटणे कमी झाले .चाट करायला काही विषयच उरला नाही . मलाही इतर गोष्टीत लक्ष देण्यास वेळ मिळू लागला . शेवटी काल सांगून टाकलेच आता थांबूया . पुरे झाले नेहमीचेच रडगाणे . मिताचा चुलतभाऊ इथेच जॉबला आला आहे . छान गप्पा मारतो तो . या एकदोन दिवसात मॅडोनाल्ड मध्ये भेटूच .

(C) श्री. किरण बोरकर

Wednesday, March 29, 2017

पॉपी ...ग्रेगॉर सेमन

पॉपी ...ग्रेगॉर सेमन अनुवाद .. डॉ. प्रमोद जोगळेकर
पॉपी म्हणजेच अफू . अफगाणिस्तानात सर्वात अधिक अफूचे पीक घेतले जाते . सेमन यांनी अफगाणिस्तानात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन अफूबद्दल सर्व माहिती गोळा केली .जगभरात जो दहशतवाद पसरला आहे त्यामागेहि अफूचा पैसा हि महत्वाचे कारण आहे . दहशतवाद आणि तालिबानी राजवटीखाली असणाऱ्या अफगाणिस्तानातील हि एक वेगळी बाजू .

Monday, March 27, 2017

मिरासदारी ......द. मा. मिरासदार

मिरासदारी ......द. मा. मिरासदार
अस्सल गावरान विनोदी कथांसाठी मिरासदार प्रसिद्ध आहेत . माणसांचे इरसाल नमुने पहावे ते मिरासदारीमध्ये .त्यांच्या काही गाजलेल्या कथा या पुस्तकात एकत्र केल्या आहेत

Sunday, March 26, 2017

मैत्री

काल रात्री सुखरूप घरी पोचलो . सुखरूप यासाठीच की सकाळी जाग आली तेव्हा घरच्या अंथरुणात होतो . बऱ्याचदा असे होते कि बिल मागविले की पुढे काय होते हे मला  कळतच नाही . त्यामुळे कालचे बिल मागविणे आणि सकाळी जाग येणे यामध्ये काय घडले  ते आठवत नव्हते.
नेहमीप्रमाणे आवरले सौ. नेहमीप्रमाणेच शांत होती. पण आज जास्त शांत वाटते का ?? की हे माझ्या मनाचे खेळ आहेत ??की  हि वादळापूर्वीची शांतता आहे  ?? असावी कारण टेबलवरचा ग्लास दोन वेळा खाली पडला . नशीब आज कामावर जायचेच होते .घरी असतो तर पूर्ण दिवस असे आवाज ऐकण्यातच गेला असता . मला माझ्या मित्रांबद्दल सहानुभूती आहे  जे काल माझ्याबरोबर  होते आणि ज्यांना आज सुट्टी आहे .
पण काय करणार  बरीच वर्ष न भेटलेले मित्र काल  भेटले  . सुदर्शन उर्फ पेंड्या बऱ्याच वर्षांनी अमेरिकेतून आला .साला अजून आहे तसाच आहे ,शरीरात आणि स्वभावात हि फरक  पडला नाही . प्रत्येक शब्द विचार करून बोलणारा.मनीष तर लग्नानंतर भेटलाच नाही आणि कॉन्टॅक्टमध्येही नव्हता . तोहि आला .इतकी वर्ष झाली पण चेहऱ्यावरचे हास्य बदलले नाही .नाही पंच मारायची सवय.. ठाण्यात असला तर प्रमोद उर्फ पम्या नक्कीच येतो भेटायला .अर्ध आयुष्य देश विदेशात फिरतीवर असलेला हा माणूस एकदम पॉईंट टू पॉईंट बोलतो ,स्पष्ट बोलतो . रेल्वेत नोकरीत असणारा विवेक खरा मितभाषी पण आपली मते बिनधास्त मांडणारा आणि शब्द दिला तर त्याप्रमाणे वागणारा . एकदा येतो बोलला कि येणारच . तर किरण आला कि पार्टीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेणार  .  त्याची मतेही ठाम आणि विचार करायला लावणारी .आमचे सुनील कधीतरी येतात पण नवीन काहीतरी शिकवून जातात . समोरच्या वेटरवर छाप कशी पडावी हे यांच्याकडून शिकावे .संजय भेटायला नेहमी उत्सुक पण लांब प्रवासामुळे नेहमी शक्य होत नाही रात्री उशीर होतो . पण एकदा ठरले कि सगळ्यांशी  संवाद साधण्याचे काम त्याच्या  हाती . संतोष तर समाजकार्यात बिझि झालाय . पण आमच्याही स्टार्ट गिविंग फौंडेशनच्या कामात खूप ऍक्टिव्ह असतो .समाजकार्य ,स्वतःचे काम ,पक्षाचे काम यामध्ये दिवस कसा निघून जातो तेच काळात नाही त्याला .  पण तरीही एकदा येतो म्हणाला की हजर . अजितही नोकरी एकीकडे ,घर एकीकडे उशिरा सुटणार म्हणून शक्यतो नेहमी येणे टाळतो ,पण कोणाच्या घरी कार्य असेल ,कोण गंभीर आजारी असेल ,कोणाचे निधन झाले असेल तर हा येणारच .पहिल्यापासून शांत आणि संथ त्याची कितीही खेचा हा आपला शांतपणे हसून मान डोलावणार .तसे मी ,राजेंद्र ,मिलिंद रेग्युलर भेटणारे त्यामुळे आमची उपस्थिती पक्की होतीच .
सांगायचं मुद्दा हा कि आज जवळ जवळ तीस वर्ष आम्ही एकत्र एकमेकांच्या संपर्कात आहोत. आज जो तो स्वतःचे स्थान निर्माण करून आहेत ,त्यांना त्यांच्या ठिकाणी आणि समाजात योग्य मान मिळत आहे तरीही एकत्र आलो कि त्याकाळात निघून जातो  तिथे फक्त आम्ही मित्र असतो . कोण मोठा कोण छोटा हा इगो नसतो .असते ती निव्वळ मैत्री  .आणि एकमेकांवर असलेला प्रचंड विश्वास  . खरे तर त्यावेळी इतर काही टाईमपास नव्हता .कॉलेज हि दूर जंगलात, त्यामुळे एकदा आलो कि ताबडतोब परतायला s. t. नसल्यामुळे थांबावे लगायचेच . म्हणूनच आम्ही एकत्र राहिलो . सगळ्यांची सुख दुःखे कॉमन त्यामुळंच एकमेकांबद्दल आपलेपणा वाटू लागला .  खरे तर हेच यश आहे स्टार्ट गिविंग फौंडेशनचे ,इथे कोणीही कोणावर अविश्वास दाखवीत नाही . प्रत्येकजण आपले काम प्रामाणिकपणे करतोय . भले चूका काढतील ,मनातील शंका विचारतील पण अविश्वास दाखविणार नाही .  कालची संध्याकाळ आम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन जोमाने सामोरे जाण्याची ऊर्जा देऊन गेली हे निश्चित.

(C) श्री. किरण बोरकर

Friday, March 24, 2017

डॉक्टर

आज गणेश चतुर्थी .मी लवकर उठून काकांकडे निघायची तयारी करत होतो . इतक्यात विक्रम आत शिरला . त्याचा चेहरा पाहूनच समजलो गंभीर प्रसंग आहे .
"भाऊ चल रवीला घेऊन हॉस्पिटल मध्ये जाऊ ,त्या दिवशी त्याला बाईकने धडक दिली होती तो हात अजून सुजलाय ".
म्हटले ",ओके ,फ्रॅक्चर असेल तर बांधून येऊ".
.आम्ही त्याला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये शिरलो तेव्हा सकाळचे साडेदहा झाले होते . OPD  मध्ये  त्याचा नंबर लावून बसलो .थोड्यावेळाने चेकिंगला घेऊन गेले .x रे रिपोर्टमध्ये त्याच्या हाताचे फ्रॅक्चर मोठे दाखवत होते .डॉक्टर ने सांगितले  ऑपरेशन  करून पट्ट्या टाकाव्या लागतील. प्रथमोपचार केल्यामुळे रवीला बरे वाटत होते .तो शांतपणे बसून होता .आम्ही अस्वस्थपणे आमचा नंबर कधी येईल याची वाट पाहत होतो .
दोन तरुण डॉक्टर तिथे ड्युटीवर होते . ते सतत आतबाहेर करीत होते . गर्दीमुळे त्यांना प्रत्येकाला उत्तर देता येत नव्हते .आम्हाला सांगितले वेळ आली कि बोलावू आत आणि परत आत निघून गेले . इथे विक्रमाची अस्वस्थता वाढत होती . वाट बघण्यासारखे दुसरे कंटाळवाणे काम नाही . शांतपणे रवीला झोपलेले बघून तो मध्येच शिव्या घालत होता .
बाहेर  रुग्णांची सख्या वाढत चालली होती. दुपारी दोन वाजता मी सौ. ला फोन करून सांगितले  पूजेला येत नाही तुम्ही आवरून घ्या . मध्येच एक डॉक्टर बाहेर गेला आणी पाच मिनिटांनी आत आला. येताना त्याच्या हातात छोटे पार्सल होते मी हसून मानेने खुणावले तर हसून म्हणाला "वडापाव .
शेवटी रात्री 11 वाजता एका रुग्णाच्या नातेवाईकाचा संयम संपला . बाहेर आलेल्या डॉक्टरच्या अंगावर  धावून जात तो म्हणाला "सकाळी अकरा  वाजल्यापासून माझी आई ऑपरेशनसाठी इथे बसून आहे पण तुम्ही तिला अजून आत घेतले नाही .काही सांगत नाही किती वेळ आम्ही बाहेर उभे राहणार ?? .तसा तो डॉक्टर त्याला प्रेमाने म्हणाला", भाऊ थोडा वेळ थांबा .आतमध्येहि इतर ऑपरेशन चालू आहेत .ते झाले कि घेऊच "
",कसले ओपेशन चालू आहेत ??,नुसते टाईमपास करताय तुम्ही ?? तस तो डॉक्टर खवळला त्याची प्रेमाची भाषा संतापाने घेतली .शेवटी तरुण रक्त ते .
",ए !!!तोंड आवर ,जरा आत येऊन बघ काय चालू आहे . इथे पहिल्यांदा सिरीयस पेशंट ,मग लहान मूल आणि मग इतर पेशंट असे प्राधान्य दिले जाते . आता आतमध्ये एका लहान मुलाचे ऑपरेशन चालू आहे आणि त्यात काही समस्या निर्माण झाली  आहे .दोन तासाचे ऑपरेशन चार तास झाले तरी चालू आहे .आमचे सिनियर डॉक्टर स्वतः उभे आहेत तिथे .दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या आईचे  तब्बेत इतकी सिरीयस  नाही कि तिचे आजच आताच ऑपरेशन व्हायला पाहिजे ,ते भाऊ बघ ," माझ्याकडे बोट करून तो म्हणाला ",सकाळी  दहा वाजल्यापासून ते पेशंट बरोबर आहेत पण अजून एकही शब्दांनी त्यांनी विचारले नाही आम्हाला ".
त्याने माझ्याकडे  बघितले मी हसून फक्त मान डोलावली. खरे तर माझाही संयम  सुटत चालला होता .पण डॉक्टरांच्या सांगण्याने माझे समाधान झाले शिवाय सकाळपासून दोघांचीही धावपळ मी पाहत होतोच . तस  तो नातेवाईक शांत झाला .
रात्री साडेअकरा वाजता त्यांनी रवीला आत घेतले आणि विक्रम कोपऱ्यात जाऊन बाकावर आडवा झाला आणि मी चहाचे घुटके घेत बसलो. रात्री एकला त्यांनी मला काही औषध आणायला पाठविले .परत पहाटे साडेतीनला दुसरी औषध .पहाटे चारला ब्लड बँकेत जाऊन आणलेले रक्त परत करण्यास सांगितले .
सकाळी सहा वाजता त्यांनी आम्हा दोघांना  आत बोलावले आणि पेशंट ला xरे काढायला घेऊन जा असे सांगितले . मी आणि विक्रम रवीला स्ट्रेचरवर ठेवून x रे काढायला गेलो . अर्ध्या तासाने परत घेऊन आलो . डॉक्टरने ओके म्हणून रिपोर्ट दिला आणि प्लास्टर करायला पाठविले . पण प्लास्टर करणारा शिफ्ट संपल्यामुळे निघून गेला होता म्हणून डॉक्टर स्वतः पुढे आला आणि आम्हाला मदतीला घेऊन प्लास्टर पूर्ण केले . तो पर्यंत सकाळी साडेसात झाले . आम्ही दोघांनीच रवीला आठव्या मजल्यावरील वॉर्डमध्ये ऍडमिट केले आणि घरी निघालो . निघताना ते दोन्ही डॉक्टर चहा पिताना दिसले त्यांना बघून आम्ही हात हलविला तसे त्यांनीही  हसून प्रतिसाद दिला .
मग परत आंघोळ ,नाश्ता करून आम्ही दोघे हॉस्पिटल मध्ये हजर झालो तर हे दोघेही वॉर्ड मध्ये राऊंड मारायला हजर होतेच .
मी न राहवून त्यांना विचारले ",डॉक्टर तुमची नक्की ड्युटी किती आहे ??
ते हसून म्हणाले ",आम्हीच विसरून गेलो आमची ड्युटी ,इथे इतके पेशंट असतात कि त्यांची तपासणी करण्यात वेळ कसा निघून जातो ते कळत नाही ,आणि रिकामा वेळ मिळाला तर आपण इलाज केलेला पेशंट कशी प्रगती करतोय हे बघण्यात  वेळ जातो .  ह्या लोकांचे जीवन मरण आपल्यावर आहे हि जाणीव आम्हाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. त्यातही तुमच्यासारखे समजूतदार माणसे असतील तर त्रास कमी होतो पण अर्धवट माणसे भेटली कि त्यांना समजावण्यातहि वेळ निघून जातो . सगळ्यांनाच वाटते आपला माणूस पहिला बरा व्हावा .त्याना त्यांचे सण साजरे करायचे असतात ,पार्ट्या करायच्या असतात ,तर घरची जबाबदारही  स्वीकारायची असते आणि त्यात चूक झाली तर खापर इलाज करणार्यांवर फोडले जाते . आता काल त्या मुलाने आईच्या ऑपरेशन साठी किती गोंधळ घातला,एक दिवस  ऑपरेशन  पुढें गेले असते तर  काही फरक पडणार नव्हता .शिवाय तिच्या काही टेस्ट  थोड्या निगेटिव्ह निघाल्या . आता सर्व हे त्या मुलाला सांगत बसू कि आत अडकलेल्या पेशंट वर इलाज करू ?? पण लोकही खूप भावनिक झालेली असतात त्यांना आपला माणूस हॉस्पिटल मध्ये आलेलाच सहन होत नसतो आणि मग काही उलट घडले कि राग आमच्यावर काढतात .
इतक्यात स्पीकरवरून त्यांना कॉल आला आणि ते OPD निघाले. विक्रम माझ्याकडे वळून म्हणाला "आयला भाऊ खरेच मूर्ख आहे मी .माझे बघताना इतरांचे काय होत असेल याकडे लक्षच देत नाही .

Wednesday, March 22, 2017

राजकीय हत्या ...पंकज कालुवाला

राजकीय हत्या ...पंकज कालुवाला
राजकारणात वर्चस्व राखण्यासाठी, बदला  घेण्यासाठी अनेकांचे खून झाले . इतिहासात अश्या अनेक  हत्या झाल्या .दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरला संपविण्याचे खूप प्रयत्न झाले ,तसेच हिटलर ने हि खूप हत्या घडवून आणल्या . क्युबाचा अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रॉ याला तर 500 च्या वर ठार मारण्याचे प्रयत्न झाले म्हणतात .
इतिहासात आतापर्यंत गाजलेल्या  राजकीय हत्याची संपूर्ण कहाणी या पुस्तकात उत्तमरित्या मांडली आहे .  जालियनवाला बाग हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार जनरल मायकल ओडवायरची  उधमसिंग ने लंडन मध्ये जाऊन केलेली हत्या .तर फितुरीमुळे केलेली महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची इंग्रज राजवटीने केलेली हत्या .अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अमीन यांची सोव्हियत राजवटीने अतिशय योजनापूर्वक केलेला खून .तसेच ओपेशन ब्लू स्टार आणि त्यामुळे घडलेली इंदिरा गांधीं आणि जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या. याशिवाय राजीव गांधी ,बेनझीर भुट्टो ,भडारनायके,झिया उल हक ,राबिन यांच्या हत्येची संपूर्ण कहाणी ,इतकेच नव्हे त्या मागची संपूर्ण पार्श्वभूमी उत्तमरित्या मांडली आहे .  एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची हत्या करताना किती काळजीपूर्वक योजना बनवावी लागते . किती सयंम पाळावा लागतो याची माहिती कळते . ओपेशन ब्लू स्टार जणू आपल्यासमोर घडतेय असे वाटते . एखाद्या चित्रपटात घडाव्या  अश्या कहाण्या यात  आहेत

Monday, March 20, 2017

रामप्रसाद

नेहमीप्रमाणे रात्री 11.30  ला पाण्याचा टँकर गेटमधून आत शिरला . ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या रामप्रसादने हसून सिक्युरिटीला हात दाखवला "लास्ट राऊंड " तो ओरडला आणि ड्रायव्हरला नेहमीच्या जागेवर गाडी उभी करायचे मार्गदर्शन करू लागला .
रामप्रसाद एक 18 वर्षाचा कोवळा तरुण .गावावरून मुंबईत इतरांसारखा नोकरीधंदा करून पैसे कमविण्यासाठी आलेला . पाण्याच्या टँकरवर क्लीनर म्हणून काम करायचा.  रात्री  मालकाने दिलेल्या खोपट्यात इतर चारपाच जणाबरोबर राहायचा . ह्या फॅक्टरीत गेलीदोन वर्षे तो येत होता . त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे सगळे ओळखायचे  .  त्यादिवशीहि त्याने टँकर नेहमीच्या जागी उभा केला व्हॉल्व्ह चालू करून तो टाकीची लेव्हल चेक करायला निघाला . पाण्याची टाकी एका कोपऱ्यात फॅक्टरीच्या मेनशेडपासून काही लांब भिंतीजवळ होती आणि भिंतीच्यापलीकडे जुने स्मशान होते . फॅक्टरीपासून दूर असल्यामुळे तिथे रात्री फारशी वर्दळ नसायची आणि आता साडे अकरा वाजलेले  म्हणजे नुकतीच नाईट शिफ्ट चालू झाली होती . आता तर तिथे कोणीच दिसत नव्हते .संपूर्ण काळोख पसरला होता फक्त टाकीवर बल्ब चालू होता आणि लांबूनही दिसत होता . सवयीप्रमाणे रामप्रसाद टाकीवर चढला .ती अंडरग्राऊंड टाकी होती. काहीतरी गुणगुणत रामप्रसादने टाकीचे झाकण उघडले आणि लेव्हल चेक करायचा लोखंडी पाईप बाहेर ओढला . मार्किंगची खूण पाहण्यासाठी  त्याने पाईप बल्बच्या उजेडात धरला तर समोरच्या  भिंतीवर एक बाई बसलेली त्याला दिसली . पहिले तर त्याला काही कळेना, त्याने तिच्याकडे पहिले तर ती शांतपणे  त्याच्याकडे पाहत होती . जशी दोघांची नजरानजर झाली तसे तिने रामप्रकाश ला जवळ बोलाविले . रामप्रकाशने नकार दिला उलट त्यानेच तिला हात हलवून जवळ बोलावले तशी तिने भिंतीवर खाली उडी मारून त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागली . अचानक रामप्रकाशला काहीतरी विचित्र जाणवले ,त्याने हातातील पाईप फेकून दिला आणि जीव खाऊन पळत सुटला . कसातरी घाबरत ओरडत तो सिक्युरिटी केबिन जवळ पोचला . काय झाले असावे सिक्युरिटीला  समजले .त्याने त्याला बसवून पाणी पाजले आणि थोडावेळ झोपू दिले . एक झोप काढल्यावर तो शांत झाला आणि टँकर घेऊन घरी गेला . दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता परत टँकर घेऊन आला त्यावेळी तो सावरला होता . तोपर्यंत संपूर्ण फॅक्टरीला कळले होते काय झाले रात्री ते.निघता निघता अमित चौगुले त्याच्या समोर आला ,खांद्यावर हात  ठेवून तो म्हणाला " क्या रे रामप्रकाश ,सुना कल तुमने एक औरत देखि ?? कैसी थी वो दिखानेमे ?? कूछ  किया क्या नाही उसके साथ ? कितना भारी मौका मिला था ??  और तू भाग गया ". रामप्रकाश दिनवाणा चेहरा करून म्हणाला ",क्या साब आपभी ??
पण त्याच दिवशी संध्याकाळी  रामप्रकाश वेड्यासारखा बरळू लागला . टँकर मध्ये पाणी भरायला वर चढला आणि खाली बघून बडबडायला लागला "चल निघ इथून ,मी नाही येणार ,तूच जा " असे काही बडबडू लागला . त्याचा मालक धावत आला  तर त्याला सांगितले ती बाई खाली उभी आहे आणि मला बोलावते आहे .  चार पोरानी  रात्रभर त्याच्यावर पहारा केला .रात्रभर त्याचा धिंगाणा चालू होता . दुसऱ्या दिवशी मालक  त्याला जवळच्या दर्ग्यात घेऊन गेला  . दोन दिवस रामप्रकाश पोरांच्या पाहऱ्यात राहिला. नंतर मालकाने त्याला गावी पाठवून दिले .
सिक्युरिटीच्या म्हणण्या प्रमाणे एक बाई कधीतरी तिथे फिरताना दिसते . काही ठराविक ठिकाणी ती फेरी मारते आणि मागच्या गेटमधून बाहेर निघून जाते पण कोणाशीही तिची आजपर्यंत समोरासमोर गाठ पडली नव्हती पण आज रामप्रकाश पहिला माणूस होता ज्याशाची  तिची नजरानजर झाली होती . आता खरे खोटे काय हे त्या रामप्रकाशलाच माहित . त्या घटनेमुळे बिचार्याची नोकरी मात्र गेली .

Friday, March 17, 2017

हिटलर

"ह्या देशाला हिटलरच पाहिजे ,त्याशिवाय आम्ही सुधारणार नाही" . बंड्या हातातील बॅग कोचावर फेकून ओरडला तसा मी उडालोच .
"अरे काय झाले ?इतका का रागावलास "? मी शांतपणे विचारले .
"आहो काय चाललंय या राज्यात तेच कळत नाही ,कुठेही धड सुखाने चालत येत  नाही कि प्रवास करता येत नाही  आता रस्त्यावर इतका ट्रॅफिक झालाय कि एखादा माणूस सिरीयस झाला तर हॉस्पिटल मध्ये नेतानाच मरायचा . काय गरज आहे इतक्या गाड्या रस्त्यावर आणायची . बरे यातील 30 टक्के गाड्या रिकाम्याच जात असतात म्हणजे चार माणसाची जागा फुकट  जात असते ड्रायव्हर एकटाच ac लावून गाडी चालवत असतो  मग रस्त्यावर टॅक्सी साठी वाट पाहणाऱ्या वृद्धांना किंवा  लहान मुलांबरोबर असलेल्या कुटुंबाला का लिफ्ट देत नाहीत ? घ्यायचे पैसे थोडेफार . पण नाही रिकामी गाडी घेऊन जातील . सगळीकडे हेच चालले आहे . शाळेत मुलांना ऍडमिशन घ्यायचे झाले तर सर्व एकाच शाळेत धावतात पण शेजारच्या शाळेत ऍडमिशन मिळत असून घेत नाही का ? तर दर्जा खराब म्हणून ?? हे कोणी ठरविले ?? बोर्ड तर एकच ,अभ्यासक्रम एकच आता तर अजून 3 /4 बोर्ड आलेत . पैसे आहेत म्हणून मोठ्या शाळेत जायचे . गावातील चौथीच्या मुलाला पुस्तक नाहीत आणि इथे चौथीच्या मुलाच्या हातात टॅब आहे .  असे का ?? इथे शिक्षण पूर्ण झाले कि एकाला 20000 पगार तर त्याच शिक्षणावर दुसऱ्याला 8000 पगार असे का ?? कोण आणि का ठरवितो हे ?? हळू हळू बंड्याचा आवाज चढू लागला .
मी त्याला विचारले ", मग हिटलर येऊन काय करणार आहे ??
"आहो कमीतकमी एकहाती निर्णय तरी घेईल . एखादा कायदा आणला तर त्यावर वाद ,चर्चा ,खटला तर भरणार नाही. आता नवीन गाड्या घेताना काही अटी ठेवल्या तर ?? भरमसाठ गाड्या रस्त्यावर येणार नाहीत . सरकारी वाहतूक नफा तोट्याची पर्वा न करता चालवली तर ??  भीतीने का होईना लोक सरकारी गाड्यातून प्रवास करतील. शाळेचा दर्जा सगळीकडे एकच ठेवला ,एकच पद्धती वापरली ,एकच बोर्ड आणले तर ?. सगळ्या शिक्षकांना एकच पगार आणि तोही त्यांच्या जेष्ठते नुसार वाढत जाईल . जसे शिक्षण तसाच पगार मग तो कुठेही काम करो" .
"पण बंड्या त्याने असंतोष माजेल ,किती दिवस चालेल हे ."? मी हादरलो
" काही नाही असंतोष माजत, नोटबंदी केल्या तेव्हा कुठे मजला असंतोष. तोही एक हुकूमशाही निर्णय होताच ना ?? 8 वाजता नोटबंदीची घोषणा हातात फक्त चार  तास तरीही सामान्य जनता खुश ना .इथे आपण आपल्या विभागासाठी पहिला नगरसेवक ,मग आमदार मग खासदार निवडून देतो. पण आपल्या विभागाची किती प्रगती होते ? उलट त्यांचीच संपत्ती पाच पंचवीस पट वाढते . आहो भाऊ या वेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी इतका पैसे खर्च केला होता त्या पैशात आपल्या विभागात कितीतरी  सुधारणा झाली असती . म्हणून म्हणतो आज हुकूमशाही असती तर??? भलेे त्या हुकूमशहानेच पैसे खाल्ले असते दहा जणांनी तरी खाल्ले नसते . आणि आपण सर्व ते मुकाट्याने सहन केले असते . इथे संतापहि व्यक्त करता येत नाही आणि सहन हि करावे लागते म्हणून तो हिटलर बरा जर्मनीची प्रगती तरी केली तीही स्वतःच्या मतानुसार . त्याने काही केले तरी सहन करायचे विरोध करायचा नाही.पण त्यामुळे जे समोर येईल ते नाइलाजाने का होईना स्वीकार तरी करू "बंड्या पोटतिडकीने बोलत होता आणि . त्याच्या या संतापाला माझ्याकडे आता तरी उत्तर नव्हते .

(C) श्री. किरण बोरकर