Sunday, April 23, 2023

गोष्ट तुझी माझी

गोष्ट तुझी माझी
वैभव दिलीप धनावडे 
साहित्यसंपदा प्रकाशन
साहित्यसंपदा समुहाचे अध्यक्ष वैभव धनावडे यांचा हा कथासंग्रह आहे. भारतीय समाजात आणि साहित्यात स्त्रियांना फार मोठे स्थान आहे. ती समाजात वेगवेगळ्या भूमिका निभावते. येईल त्या परिस्थितीला सामोरे जाते.कधी आक्रमण करते तर कधी दोन पावले माघार घेते.ती शरण ही जाते पण त्यामागे निश्चित काही कारणे असतात. अश्याच काही स्त्रियांच्या एकवीस कथा या कथासंग्रहात आहेत.यातील काही कथा त्यांच्या संपर्कात असलेल्या काही स्त्रियांवर आहेत.
एक स्त्री जी पत्नी बनून नव्या घरात येते तेव्हा तिला काय नवीन अनुभव येतात तिचे माहेरचे नियम आणि सासरचे नियम यात फरक असतो.ती कशी ऍडजस्ट करून घेते. 
ती आई बनते तेव्हा मुलांना सांभाळून नोकरी आणि घर सांभाळायची कसरत कशी करावी लागते ?
आपल्या छंदाकडे नवरा लक्ष देत नाही तरीही ते जोपासणारी स्त्री.
एक दिवस घरातली कामे न करता झोपून राहून स्वतःची किंमत इतरांना करून देणारी गृहिणी.
तर वेगवेगळी संकटे येऊनही पुन्हा पुन्हा त्याच जोमाने उभी राहणारी स्त्री.
अश्या अनेक नायिका वैभव सरांनी आपल्यासमोर उभ्या केल्या आहेत. यात एक वेगळेपणा म्हणजे त्यांच्या सर्व कथांच्या नायिकेचे नाव अश्विनी आहे.
अश्विनीच समाजातील सर्व थरातील स्त्रियांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करते. यातील एक दोन कथा मला आवडल्या नाहीत.कदाचित मला समजल्या नाहीत.पण बाकीच्या कथा छानच आहेत.
माझ्या मते हा कथासंग्रह अपूर्ण आहे.त्यांनी भारतीय समाजातील पुरुषांवर गोष्ट तुझी माझीचा दुसरा भाग काढून वर्तुळ पूर्ण करावे.

Wednesday, April 19, 2023

झुलता पूल

झुलता पूल 
गोष्ट तुझी माझी
आई ही आईच असते.तिचा मुलांच्या बाबतीत कधीच भेदभाव नसतो.अपेक्षा असतात पण त्यातही फोर्स नसतो.स्वतःच्या काही अपूर्ण इच्छा, स्वप्ने ती मुलांच्यात पाहत असते.अश्विनी ही अशीच गृहिणी नाटकात काम करण्याचे तिचे स्वप्न छोटा मुलगा अर्णवच्या रुपात पूर्ण होते त्यामुळे जास्त लाड होतात पण त्याचा परिणाम जय वर होतो. छोट्या भावाचे लाड जास्तच होतायत असा त्याचा गैरसमज होतो.तो आईला चिडून बोलतो पण अश्यावेळी तिच्यातील गृहिणी जागी होते.ती त्याला व्यवस्थित समजावते. त्याला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये मदत करते. त्या प्रोजेक्टमध्ये मदत करतानाच तिला जाणवते की या झुलत्या पुलाच्या प्रोजेक्टमध्ये महत्वाची गोष्ट कोणती आहे .
काय आहे ती महत्वाची गोष्ट ? अश्विनीचा त्यात काय रोल आहे ? त्यासाठी झुलता पूल ही गोष्ट तुझी माझी या श्री.वैभव धनावडे यांच्या  कथासंग्रहातील कथा वाचायलाच हवी.

Thursday, April 13, 2023

लॉस्ट

लॉस्ट
Lost
कलकत्त्यात घडलेली ही सत्य घटना आहे असे म्हणतात. ईशान भारती हा दलित नाट्यवेडा तरुण.रस्त्यावर पथ नाट्य करतो .अतिशय सरळ मार्गी तरुण . अंकिता चौहान त्याची मैत्रीण.तीही छोट्याश्या गावातून करियर करण्यास आली आहे.दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.
राजन बर्मन हा तरुण नेता.त्याला अंकिता चौहानमध्ये इंटरेस्ट होतो.तो तिला आपल्याकडे नोकरी देतो आणि पुढच्या निवडणुकीत तिला तिकीट देण्याचे आश्वासन देतो.
ईशान तिला भेटायला जातो आणि त्यानंतर गायबच होतो.त्याची बहीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवते पण तिलाच पोलिसांकडून त्रास देण्यास सुरुवात होते.ईशान नक्षलवादी होता असा पोलिसांचा आरोप असतो.
विधी साहनी एक क्राईम रिपोर्टर .ती आजोबांसोबत राहते.तिचे आजोबा निवृत्त प्राध्यापक होते.विधी अतिशय तत्वनिष्ठ आहे.ती ईशान भारती प्रकरणाचा शोध घेण्याचे ठरविते. ती कोणत्याही दाबावास बळी न पडता या प्रकरणाच्या मुळाशी जाते.शेवटी तिला ईशानविषयी माहिती कळते आणि ती कोलमडून पडते.पण सत्य काही वेगळेच असते.
ही खरोखरच उत्कंठावर्धक शोध मोहीम आहे.यात कोठेही हिंसाचार नाही .आरडाओरडा नाही.हाणामारीही नाही. यातील कोणतीही पात्रे एकमेकांवर चिडूनही बोलत नाहीत.पण कुठेतरी एक भीतीचे वातावरण जाणवते.विधीचा पाठलाग ,विधीच्या आजोबांना अप्रत्यक्षपणे दिलेली धमकी.पोलिसांचे ईशानच्या नातेवाईकांशी बोलणे. राजन बर्मनचे हसऱ्या चेहऱ्याने मुलाखत देणे .हे सर्व सोपे वाटत असले तरी त्यामागे कुठेतरी हिंसा आहे ,काहीतरी गंभीर घडतेय याची जाणीव सतत होत राहते.
विधी आणि तिचे आजोबा यांचे रिलेशनही खूप सुंदर दाखविले आहे.त्यांच्या सहज घडणाऱ्या चर्चा ,एकमेकांच्या कामात दखल न देता उलट सपोर्ट करणे हे सिन बघण्याआरखे आहेत.
यामी गौतमने विधी साहनी सहजपणे उभी केलीय.तर पंकज कपूर आजोबांच्या भूमिकेत वावरतात.राहुल खन्ना बर्मनच्या  छोट्या भूमिकेत छाप पाडून जातो.
चित्रपट झी 5 वर आहे.

Monday, April 10, 2023

रोर्सचाच

रोर्सचाच
केरळातील दाट जंगलाजवळील छोट्या गावातील पोलीस स्टेशनमध्ये जखमी अवस्थेत लूक अँथोनी शिरला तेव्हा मध्यरात्र झाली होती. 
त्याने आपल्या गाडीचा अपघात झाला असून आपली गरोदर पत्नी बेपत्ता झालीय अशी तक्रार केली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने संपूर्ण जंगल चाळून काढले पण चपलाशिवाय त्यांना काहीच सापडले नाही. पोलिसांनी केस बंद केली तरी लुक त्या गावातून हलला नाही तो चिकाटीने तिचा शोध घेत होता.
बालन गावातील एक रहिवासी.तो लूकला मदत करत होता.त्याचा मुलगा अपघातात मरण पावला होता.तर विधवा सून काजूची फॅक्टरी चालवीत होती.त्याला घरी काहीच किंमत नव्हती म्हणून गावाबाहेरचे पडीक घर त्याने लुकला विकले आणि रोख रक्कम घेऊन गाव सोडून गेला.पण दुसऱ्या दिवशी त्याचे प्रेत जंगलात सापडले आणि पैसे गायब होते. 
लूकने हळू हळू बालनच्या घरी जाणे वाढविले.एके दिवशी त्याने बालनच्या विधवा सुनेला लग्नाची मागणी घातली.त्याने तिच्या मनाविरुद्ध स्वतःशी लग्न लावून घेतले .त्यानंतर बालनच्या घरी फूट पाडून काजूची फॅक्टरी बंद केली.
इकडे एका पोलीस अधिकाऱ्याने लूकची माहिती काढण्यास सुरवात केली आणि हाती आलेली माहिती पाहताच तो हादरून गेला.  त्यात त्यालाही आपले प्राण गमवावे लागले. लूकच्या पत्नीलाही त्याचे खरे रूप समजले आणि ती माहेरी निघून गेली .
कोण आहे हा लुक अंथोनी ?? तो आपल्या पत्नीसोबत या छोट्याश्या गावी का येत होता ?? त्याची पत्नी कुठे गायब झाली ?? का ती सापडत नाही ?? बालनचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा खून कोणी केला ?? 
या सर्व प्रश्नाची उत्तरे हवी असतील तर रोर्सचाच बघायला हवा. एक खिळवून ठेवणारा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा चित्रपट हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
सुपरस्टार मामुटी हा चित्रपटाचा मुख्य नायक आहे.संपूर्ण चित्रपट त्याने व्यापून टाकला आहे.

Sunday, April 9, 2023

द प्रोफेशनल

द प्रोफेशनल
1966
एक श्रीमंत जमीनदार  आपल्या अपहरण झालेल्या पत्नीला सोडविण्यासाठी चार प्रोफेशनल व्यक्तींना नियुक्त करतो.चारही व्यक्ती शूर आणि आपल्या कामात तरबेज असतात.
तिला जीजस रझा या क्रांतिकारकाच्या तावडीतून सोडविण्यासाठी ते मेक्सिकोत जातात .खरे तर रझा हा त्यांचा जुना मित्रच असतो . पण ते प्रोफेशनल असल्यामुळे ही कामगिरी स्वीकारतात.
 एक उत्तम योजना आखून ते मेक्सिकोत रझाच्या गावात शिरतात आणि त्यांना वेगळेच दृश्य दिसते.ते आपले काम पूर्ण करतात का ?? त्यासाठी त्यांना काय करावे लागते ? 
हा एक अस्सल वेस्टर्नपट आहे.उजाड वैराण प्रदेश .कडक उन्हाळा त्यात डोक्यावर भली मोठी हॅट आणि तोंडात सिगार ठेवणारे घोडेस्वार .क्षणार्धात बंदूक काढून गोळ्या झाडणारे नायक . तुफान वेगाची घोडेस्वारी ,पाठलाग  हा सर्व मसाला या चित्रपटात पाहायला मिळतो. ली मारविन यात प्रमुख अभिनेता आहे .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.