Wednesday, March 31, 2021

ड्रॅक्युला..... ब्रॅम स्टोकर

ड्रॅक्युला..... ब्रॅम स्टोकर
अनुवाद..स्नेहल जोशी 
साकेत प्रकाशन 
शतकानुशतके रक्त पिणारे पिशाच असा त्याचा उल्लेख केला जातो. ह्याची एक गढी आहे. त्याविषयी आजूबाजूच्या गावात भीतीदायक वातावरण आहे. लोक त्या गढीचा उल्लेख जरी झाला तरी देवाला हात जोडतात. हा म्हणे रात्री वटवाघळाचे रुप घेऊन बाहेर पडतो तर कधी लांडगा बनून . दिवसा तो गढी बाहेर पडत नाही पण काही खात ही नाही .ह्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीच्या मानेजवळ फक्त दोन बारीक छिद्र दिसतात.बारीक पिन टोचल्यासारख्या. पुढे ती व्यक्ती पांढरी पडत जाते आणि अशक्त होऊन मरून जाते.
जोनाथन हार्कर हा तरुण सॉलिसिटर कामानिमित्त त्या सरदार ड्रॅक्युलाच्या गढीत जातो तेव्हा गावातील लोकांच्या डोळ्यात एक अनामिक भीती दिसते .पुढे सरदार त्याला भेटतात पण त्यांचे वागणे हुकूमशहाचे असते.हळूहळू जोनाथनला कळून चुकते की आपण इथे कैदेत आहोत.न राहवून तो सरदाराच्या खोलीत जातो तेव्हा खिडकीतून सरदाराला भिंतीवरून सरपटत  उतरताना पाहतो. जोनाथन आपल्या डायरीत या सर्व घटना लिहून ठेवतो.
पुढे जोनाथनने आपली पत्नी आणि मित्रांना सोबत घेऊन या ड्रॅक्युलाशी कसा सामना केला आणि त्याला पराभूत केले याची कहाणी आहे.
मूळ पुस्तक साधारण 1897 सालातील आहे .ते अजून ही बेस्ट सेलर म्हणून गणले जाते. पण पुस्तक मनाची पकड घेत नाही . घटनांचा एक सलगपणा  येत नाही . मध्येच काही पात्रे विस्कळित झाल्यासारखी वाटतात .पुस्तक वाचताना भीतीदायक वाटत नाही .पण एक अनुभव म्हणून वाचायला हरकत नाही .

Thursday, March 25, 2021

घातसूत्र.....दीपक करंजीकर

घातसूत्र.....दीपक करंजीकर 
ई प्रकाशन ... पुस्तक कट्टा
हा एक शोधग्रंथ आहे . गेल्या शंभर वर्षात जगाच्या इतिहासात काही मोठ्या घटना घडल्या. त्यात काही अपघात होते तर काही घातपात तर काही राजकीय घडामोडी. लेखकाने या महत्वाच्या घटनेमागे कोण असावेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे .  वरवर साध्या सरळ वाटणाऱ्या घटनांमागे काही शक्ती आपला आर्थिक हित साधण्यासाठी कार्यरत आहेत हे वाचून आपल्याला धक्काच बसतो . 
यापुस्तकात एकूण 104 वर्षातील महत्वाच्या घटनांचा पाठपुरावठा आहे . १९१२ साली घडलेल्या टायटॅनिक बोटीचा अपघात ते २०१६ साली ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसला तिथपर्यंत .
त्या 104 वर्षातील घटनाक्रम ,त्यामागील सूत्रधार, आणि त्यामागे त्यांनी केलेले कारस्थान किंवा संरचना. अश्या तीन भागात हे पुस्तक आहे. लेखकाचा अभ्यास आणि घेतलेली प्रचंड मेहनत पुस्तक वाचताना आपल्याला जाणवते.
अमेरिकेवर खाजगी बँकांचा पहिल्यापासूनच ताबा होता. यादवी युद्धात अब्राहिम लिंकनला पैसे हवे होते तेव्हा या खाजगी बँकांनी त्याच्याकडून 24 ते 36 टक्के व्याज मागितले ,साहजिकच लिंकन संतापला.त्याने खाजगी बँकांचे नूतनीकरण थांबविले.खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन सरकार चालवू नये असे त्याचे धोरण होते आणि म्हणूनच अमेरिकेच्या ट्रेझरी खात्याने स्वतः नोटा छापाव्यात असा आदेश काढला.पण खाजगी बँका हे खपवून घेणार नव्हते ,त्यांनी लिंकनविरुद्ध मोहीम सुरू केली.अश्या बँकांवर अंकुश ठेवणारा कायदा अंमलात आणावा असे लिंकनने सुचविले.या कायद्याने अमेरिकेची पूर्ण बँकिंग पद्धत बदलून गेली असती .त्याचवेळी लिंकन पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला.पण केवळ एकेचाळीस दिवसात त्याची हत्या झाली आणि कायदा झालाच नाही.
 टायटॅनिक बोटीचा अपघात हा खरोखरच अपघात होता की अजून काही .....?? 
1909 साली जे पी मॉर्गनने व्हाईट स्टारलाईन ही  प्रचंड तोट्यात असलेली कंपनी ताब्यात घेतली  होती.त्यांचे  आरएमएस ऑलिम्पिक जहाज सतत नादुरुस्त असल्यामुळे डॉकयार्डमध्ये पडून होते. त्यासाठी प्रचंड पैसा खर्च होत होता.पण मॉर्गन हा यशस्वी व्यावसायिक होता. तो ही कंपनी नक्की फायद्यात आणेल याची खात्री होती. त्याने ताबडतोब एक मोठे प्रवासी जहाज आयर्लंडच्या बेलफास्ट शिपयार्डमध्ये बांधायला घेतले .
१९१० साली जॉर्जियातील जॅकील आयलंड बेटावर अमेरिकेतील सात धनाढ्य व्यक्ती एकत्र जमल्या होत्या.तब्बल सात दिवस ते सर्व एकत्र काही धोरणे आखत होते काही कारस्थाने रचत होते. सात दिवसांनी काही ठोस मसुदा घेऊन ते सर्व आपापल्या घरी परतले. एक फेडरल रिझर्व्ह बँक सर्वांनी मिळून स्थापन करावी असा त्यांचा हेतू होता आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या भेटीत फिक्स झाल्या होत्या.
बेलफास्टमध्ये नवीन प्रवासी जहाज बांधून तयार झाले. १२ एप्रिल १९१२ ला टायटॅनिक प्रवासाला सुरवात करणार होती.मॉर्गनने या प्रवासासाठी काही प्रसिद्ध प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रणे दिली होती. या प्रवासात तीन मातबर धनाढ्य व्यावसायिकही होते ज्यांचा मध्यवर्ती बँकेला प्रचंड विरोध होता. प्रवासात खुद्द जे पी मॉर्गनही आपल्या कुटुंबासोबत सामील होणार होते.पण प्रवास सुरु होण्याआधीच मॉर्गनने आपल्या आजाराचे कारण देत प्रवास रद्द केला.त्याच्या इतर नातलगांनीही आपली सहल रद्द केली.पुढे टायटॅनिकला अपघात झाला .त्यात ते तिन्ही उद्योगती मरण पावले आणि मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा मार्ग खुला झाला .
लेखकाने यात घातपात असावा अश्या शंकेची सुमारे सोळा कारणे दिली आहेत यातील बहुतेक पटण्यासारखी आहेत.पुढे मध्यवर्ती बँक स्थापन झाल्यावर अमेरिकेचा आर्थिक कारभार या काही धनाढ्य घराण्यांच्या ताब्यात गेला . त्यात प्रामुख्याने जे पी मॉर्गन, रॉकफेलर,रॉथशिल्ड अशी घराणी होती.  त्यांच्या पाठिंब्यावर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडून येऊ लागला . जे त्यांच्या आर्थिक धोरणाला विरोध करीत त्यांना बाजूला काढले जाऊ लागले. पाहिले आणि दुसरे महायुद्ध यांच्याच धोरणानुसार ठरविले गेले. त्यांना जी राष्ट्रे डोईजड वाटत त्यांच्या विरुद्ध बंडखोर तयार केले जात त्यांना विपुल प्रमाणात पैसे आणि शस्त्रपुरवठा केला जातो. यातच अमेरिकेच्या पाच राष्ट्राध्यक्षांच्या हत्या झाल्या आणि ते कुठे ना कुठे या धोरणाविरुद्ध होते. 
सद्दाम हुसेनने डॉलरमध्ये तेल विकण्यास नकार दिला. तेल हे काळे सोने मानले जाते.जो तेलाचा मालक तो जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखला जातो. जगभरात तेलाचा व्यवहार डॉलरमध्ये होतो . आपल्या देशाचे चलन आणा आणि माझ्याकडून तेल घेऊन जा असे फर्मान सद्दामने काढले आणि फेडरल बँकेच्या या सुत्रधाराना ते सहन झाले नाही . त्यांनी कुवेतवरील हल्ल्याचा फायदा घेऊन सद्दामवर आक्रमण केले आणि इराक बेचिराख केला.
गडाफीने लिबियात डॉलरमध्ये तेल विकण्यास नकार दिला तेव्हा या सुत्रधारानी लिबियातील बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरवून क्रांती घडविण्यास भाग पाडले.
9/11 .. अमेरिकेतील ट्वीन टॉवरवर आत्मघातकी हल्ला झाला आणि ओसामा बिन लादेन प्रकशझोतात आला .सगळ्यांनी अल कायदा ला टार्गेट केले . पण यामागे खरच ओसामा बिन लादेन होता का ...?? ट्वीन टॉवर मध्ये एकूण साडेचारशे ज्यू कामाला होते पण त्यापैकी कोणीही त्यादिवशी कामावर हजर नव्हते. एकच ज्यू यात मरण पावला जो पर्यटक होता. ओसामा आणि तालिबान याना मोठे करण्यात या सुत्रधारांचाच हात होता. या सुत्रधारांची ऑफिसेस ठेवी काही महिने आधीच ट्वीन टॉवरमधून हलविले गेले होते.
अश्या अनेक घटनांची चौकशी या पुस्तकात झाली आहे. आर्थिक व्यवहार ,बँकिंग कार्य यात इंटरेस्ट नसणाऱ्या वाचकांना मध्ये मध्ये कंटाळा येईल पण हे सारे एका रहस्यकथेप्रमाणे आहे. एका क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीमागे किंवा एका जातीय किंवा अतिरेकी घटनेमागे आर्थिक कारणे किंवा काही लोकांचा प्रचंड आर्थिक फायदा असू शकतो हे वाचून आपण थक्क होतो.

Saturday, March 20, 2021

नकार

नकार
गळ्यात मोठे मेडल मिरवतच त्याने घरात प्रवेश केला आणि सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा पाहूनच तो सुखावला.आज पुन्हा त्याने पाचशे मीटरची शर्यत जिंकली होती.
 यापुढील प्रवास खडतर होता .पण त्याची त्याला पर्वा नव्हती. तो नेहमीच जिंकत होता.सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करून तो वडिलांकडे वळला. "पप्पा ...!!  मला पुढच्या स्पर्धेसाठी नवीन शूज हवेत .हे वरून फाटले आहेत..."तो अगदी सहज स्वरात म्हणाला.
"बघू ... सध्या माझे पाकीट रिकामे झालेय. लॉकडाऊनमुळे पगार कमी येतोय. घरच्या खर्चाची काळजी आहे मला ..." वडील नजर चुकवत म्हणाले.
"मग कसे होईल....?? आतातर राज्यस्तरीय स्पर्धा आहेत.त्यात निवडला गेलो तर पुढे राष्ट्रीय स्पर्धा. मी आतापर्यंत कधीच अपयशी ठरलो नाही त्याचे कारण तुम्ही मला जे पाहिजे ते दिलेत . मग आताच असे का ..."?? तो थोडासा चिडूनच बोलला.
"बाळा... जे आहे ते आहे .. तरीही कुठे कर्ज मिळेल का ते पाहतो.कोणी दिले तर नक्कीच घेऊ ... "वडील केविलवाण्या स्वरात म्हणाले . त्याची आई आश्चर्याने दोघांकडे पाहत होती.
पुढचे काही दिवस बापलेक बऱ्याच ठिकाणी पैशासाठी फिरत होते . काहीजणांनी पैसे दिले पण ते रोजच्या खर्चातच संपून गेले . 
"नवीन शूज घेण्यापेक्षा आहे ते रिपेयर करून वापर की ....."वडिलांनी शेवटी हताश होऊन सल्ला दिला.
"काहीतरीच काय बाबा ... लोक काय म्हणतील ....?? आतापर्यंत आपण टॉप क्लास वस्तू वापरल्या आहेत . हे असे शिवून घातलेले शूज पाहून इतर स्पर्धक काय म्हणतील.....तो थोडा चिडून म्हणाला,आज पहिली मॅच आहे मी बघतो काही तरी" असे बोलून तो निघाला .
संध्याकाळी घरी आला तोच पडका चेहरा घेऊन .आल्या आल्याचं आपले किट एका कोपऱ्यात फेकून दिले आणि कोपऱ्यात जाऊन बसला 
"काय रे ...?? काय झाले..." ??? आईने काळजीने विचारले .
"पाचवा आलो ..." त्याचा बांध फुटला आईला मिठी मारून तो रडू लागला . 
"पुढची मॅच आहे ना ...?? त्यात येशील पहिला .. बाबा आत येत म्हणाले. 
"पण ते शूज...." ??? त्याने पुन्हा वडिलांना आठवण करून दिली . 
"बघू रे .. प्रयत्न चालू आहेत. मिळाले की आणूया . तोपर्यंत तुझे जुने शूज शिवून आणतो कोपर्यावरच्या दुकानातून..."असे म्हणून त्याचे शूज घेऊन बाहेरही पडले.
"चल फ्रेश हो... मी तुझ्यासाठी काहितरो बनवते.."आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
"अग आई.. मी पाचवा आलोय .. याचे काहीच वाटत नाही का तुम्हाला ....?? आख्खी शाळा आश्चर्यचकित झाली माझा परफॉर्मन्स पाहून ..मला तर घरी यायची इच्छाच नव्हती . तुम्ही काय म्हणाल याचीच काळजी ...." तो आईकडे अचंब्याने पाहत म्हणाला.
"पाचवा आलास ना...??? स्पर्धा म्हटली की कोणतरी पहिला..दुसरा..तिसरा येणारच.जो मनापासून प्रयत्न करतो त्याला यश मिळते.म्हणून बाकीचे काही प्रयत्न करायचे सोडत नाहीत की स्पर्धेत भाग घेण्याचेही सोडत नाही.ते दुसरी नाहीतर तिसरी संधी घेतातच.आज तू नाही पहिला आलास पण कोणतरी पहिला आलाच ना.त्याने तुझ्यापेक्षा जास्त प्रयत्न केले म्हणून पहिला आला ... तुझ्याकडे संधी आहे पुढच्यावेळी नक्कीच पुढे जाशील ... "आई अगदी सहज स्वरात म्हणाली आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला.
संध्याकाळी वडिलांनी त्याला शिवून आणलेले शूज दाखवले . त्याने नाराजीनेच ते कोपऱ्यात ठेवून दिले . काही दिवस त्याने प्रॅक्टिस बंद केली .घरातले कोणीही काही त्याविषयी बोलत नव्हते . शेवटी शाळेतून फोन आलाच .प्रॅक्टिसला का येत नाहीस...??  याबद्दल विचारणा झाली.नाईलाजाने त्याने उद्या येतो असे उत्तर दिले.
रात्री कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली . हळूच दरवाजा उघडून बाहेर पाहिले तर बाबा त्याचे शूज साफ करत होते.त्यांच्या चेहऱ्यावर।त्याला समाधान दिसत होते. मन लावून त्यांनी ते शूज साफ करून त्याच्या  बॅगेत ठेवले.
संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्याचा मूड थोडा बरा झाला होता . किट बॅग साफ करताना आईने त्याचा टी शर्ट घुवायला काढला तेव्हा खांद्यावर थोडा उसावलेला दिसला.काळजीने तिने तो बाबांच्या हाती दिला. त्यांनी शांतपणे तो हातात घेतला आणि सुई दोरा घेऊन तो शिवून टाकला .
आज त्याची मॅच होती . दुसरी संधी होती त्याच्यासाठी . घरून निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निश्चय दिसून येत होता .
आज तो चौथा आला . घरी येऊन त्याने सांगितले तेव्हा वडील शांतपणे म्हणाले" मागच्यावेळापेक्षा हे चांगले नाही का... ??? आणि कोणाचा तरी नंबर तू पटकावलास ...ठीक आहे .. अजून एक संधी आहे . आणि ती गेली तर पुढचे पूर्ण वर्ष आहे तुझ्याकडे . प्रयत्न करीत राहा ....".त्याने हसून मान डोलावली.
दिवस निघून जात होते . याची प्रॅक्टिस जोरात चालू होती . पण यावेळी त्याला नंबरात इंटरेस्ट राहिला नव्हता फक्त मनापासून प्रयत्न करायचे हेच ठेवून त्याचा सराव चालू होता .
आज फायनल ... 
संध्याकाळी तो उड्या मारतच घरात शिरला . आईला जोरात मिठी मारून त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत आपली निवड झाल्याचे सांगितले. आता पहिल्यांदाच तो आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार होता .सगळ्या कुटुंबात आनंद पसरला होता. रात्री हसतखेळत जेवण करून सगळे झोपायला गेले. 
खुश असल्यामुळे त्याला झोप येत नव्हती. अचानक कोणाच्यातरी कुजबूजीने त्याला जाग आली .
"आहो आता तरी त्याला नवीन शूज आणून द्या ..."आई हळू आवाजात बाबांशी बोलत होती. 
"नाही आता तर मुळीच नाही. प्रत्येकवेळी आपण त्याला हवे ते दिले. त्याला कधी नाही म्हटले नाही . त्यामुळेच तो यशाच्या शिखरावर गेला . पण अपयश म्हणजे काय... ?? हे त्याला माहित आहे का.. ?? अपयशी माणसाची मनःस्थिती काय असते.तो अपयश कसे पचवतो हे त्याने अनुभवले आहे का... ??? आज आपण त्याला नाही म्हटले त्यामुळे त्याची मनःस्थिती बिघडली. आपल्याला ही नकार मिळू शकतो हे त्याला जाणवले. त्यातून त्याने अपयश पाहिले पण त्यातही आपण त्याच्या पाठीशी उभे राहिलो. त्याला धीर दिला त्याचे मनोधैर्य वाढविले. राखेतून उभ्या राहणाऱ्या फिनिक्स पक्षाची त्याला आठवण करून दिली. मनात असेल तर कठीण परिस्थितीत ही मार्ग दिसतो हेच तो यातून शिकला . आज त्याच इच्छाशक्तीवर राज्याचे प्रतिनिधित्व करतोय आणि कदाचित पुढे देशाचे प्रतिनिधित्व करेल. आज नकार आणि अपयशाचा अनुभव घेतलाय. यातूनच पुढे  जाईल . चल झोपुया रात्र खूप झालीय..."
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, March 8, 2021

द किल लिस्ट .... फेडरीक फोरसाइथ

द किल लिस्ट .... फेडरीक फोरसाइथ
अनुवाद.....बाळ भागवत
मेहता पब्लिशिंग हाऊस
त्याचे नाव जगातील कोणत्याही राष्ट्राच्या दहशतवादी लिस्टमध्ये नव्हते. कोणाकडे त्याचा साधा फोटोही नव्हता .तो व्हिडिओद्वारे प्रवचन द्यायचा . जिहादचा प्रसार करायचा. कुराणाचे दाखले द्यायचा . जगभरातील अनेक मुस्लिम तरुणांना त्याने आत्मघातकी दहशतवादी बनण्यास प्रवृत्त केले होते. त्याचे म्हणणे खूप सोपे होते.आपल्या विभागातील प्रसिद्ध व्यक्ती निवडा आणि त्यांना ठार करा. व्हिडिओवर त्याचे पिंगट डोळेच दिसायचे. 
अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये अचानक काही ठिकाणी आत्मघाती हल्ले सुरू झाले.हल्लेखोर एकटेच असायचे. त्यांच्या घराची झडती घेतली तेव्हा अनेक जिहादी प्रवचनाच्या विडिओ सिडी आढळून आल्या. तो कोण आहे हे कोणालाच माहीत नव्हते. म्हणून त्याचे नाव प्रीचर ठेवण्यात आले.
वॉशिंग्टनमध्ये एका गुप्त अंधाऱ्या जागी एक लिस्ट लपवून ठेवली आहे. त्या यादीतील लोक अमेरिकेची शत्रू आहेत. कोणतेही खटले पुरावे दाखल न करता त्यांना ठार मारण्यात येते.या यादीलाच म्हणतात द किल लिस्ट. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्याखालील महत्वाच्या सहा व्यक्ती या यादीत नावे टाकतात . आता प्रीचरचे नाव यादीत टाकले गेले.
जे-एस.ओ. सी. ही जगातील सर्वात धोकादायक खाजगी सैन्यदल असलेली संस्था आहे आणि त्याचे नियंत्रण राष्ट्राध्यक्षांकडे आहे. या संस्थेकडे प्रीचरला ठार मारण्याचे काम सोपविण्यात आले . त्याला शोधणाऱ्या व्यक्तीला ट्रॅकर संबोधण्यात येते.
मुळात प्रीचर आहे कोण....?? कसा दिसतो...?? कुठे सापडेल ..?? याची ट्रॅकरला मुळीच माहिती नाही. सीआयएचे कुशल संगणकतज्ञही त्याचा माग घेऊ शकत नाही. अश्यावेळी व्हर्जिनियातील एक अठरा वर्षाचा  मुलगा जो आई वडिलांसोबत राहतो आणि त्यांना सोडून तो कुठेही बाहेर जात नाही .त्याचा घराचा पोटमाळा हेच त्यांचे विश्व पण एकदा का सायबर विश्वात घुसला तर त्याचा हात कोणीच धरू शकत नाही  तो ट्रॅकरच्या मदतीला येतो . ट्रॅकर त्याला एरियल नाव देतो.एरियल हा अगोरा फोबिया या मानसिक आजाराचा बळी आहे. आपला पोटमाळा सोडून तो कुठेही जात नाही पण तो संगणकक्षेत्रात बाप आहे.तो प्रीचरला शोधून काढतो.
आता फक्त प्रीचरला त्याच्या बिळातून बाहेर काढून मारणे हेच बाकी होते. पण ते सहज शक्य नव्हते.  ड्रोनद्वारे कोणतेही क्षेपणास्त्र सोडायचे नाही .निरपराधी मारले जाता नये या प्रमुख अटी ट्रॅकरला मदत करणाऱ्या इतर संघटनांनी घातल्या होत्या.
ट्रॅकर आपल्या भक्ष्याला अर्थात प्रीचरला उघड्यावर आणेल का ??? त्यासाठी तो कोणते अमीश दाखवेल...?? प्रीचर त्याला बळी पडेल का ....?? 
अतिशय थरारक उत्कंठावर्धक पाठलाग लेखकाने आपल्या नेहमीच्या शैलीत केला आहे .
एकदा वाचायला घेतले की संपल्याशिवाय खाली ठेवणार नाही असे पुस्तक .

Sunday, March 7, 2021

एचएमएस युलिसिस ...अँलिस्टर मॅक्लिन

एचएमएस युलिसिस ...अँलिस्टर मॅक्लिन
अनुवाद....अनिल काळे 
मेहता पब्लिशिंग हाऊस
आतापर्यंत आपण दुसऱ्या महायुद्धाच्या जमिनीवर लढल्या गेलेल्या शौर्याच्या कथा वाचल्या. त्यात जर्मनी तसेच मित्रराष्ट्रांच्या अतुलनीय शौर्याच्या कहाण्या होत्या . कमांडोच्या घातकी कारवाया होत्या तर थरारक अपहरणे होती. पण आज पहिल्यांदाच  समुद्रात लढलेले युध्द कसे असते याची माहिती या पुस्तकातून मिळते.
युलिसिस ब्रिटिश आरमारातील एक हलक्या जातीचे क्रूझर जहाज.सगळे तिला घोस्ट शिप म्हणत.कारण तिच्यासोबत नेहमी मृत्यू प्रवास करतो असे मानले जाते.तिची एकूण लांबी 510 फूट .वजन साधारण 5500 टन होते. एकूण साडेसातशे माणसे त्या बोटीवर होती. मालवाहू जहाजांच्या ताफ्याला संरक्षण देणे हे यूलिसिसचे प्रमुख काम.गेले शंभर दिवस युलिसिस सतत लढत होती. सैनिकांनी किनारा पहिलाच नव्हता . भयानक थंडी,बर्फाचा पाऊस ,वादळी वारे यामुळे सर्वच आजारी आणि अतिशय थकलेले होते.जहाजात शेकडो टन बर्फ साचत होते.जर्मनीची टेहळणी विमाने सतत डोक्यावरून घिरट्या घालीत होती. 
त्याचवेळी युलिसिसकडे 36 मालवाहू जहाजांना संरक्षण देण्याची कामगिरी आली. एफआर 77 या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्याला सुरक्षितपणे रशियाला पोचविण्याची जबाबदारी युलिसिसवर असते.
आता सुरू होतोय युलिसिसचा प्रवास. या प्रवासात त्यांचे दोन शत्रू आहेत. एक जर्मनी आणि दुसरा निसर्ग .भयानक थंडी,उपाशी नौसैनिक, प्रचंड वादळे,जीवघेणे घुके, थकवा ,आजारपण, आणि शिवाय या ताफ्याला हल्ला करणाऱ्या जर्मनीच्या यू बोटी, फायटर विमाने . या सर्व आघाड्यांवर युलिसिसचे नौसैनिक ,अधिकारी ,कॅप्टन मोठ्या धैर्याने सामना देतात.
रविवारी दुपारी सुरू झालेली ही सफर दुसऱ्या रविवारी सकाळी समाप्त होते. आठ दिवसातील युद्धातून एफआर 77 ताफ्यातील किती जहाजे रशियाला पोचली ....?? युलिसिसने आपली कामगिरी पार पाडली का ???  सागरीयुद्ध किती भयानक असू शकते हे या पुस्तकातूनच कळते.
दुसऱ्या महायुद्धावरील एक महान कादंबरी असे या पुस्तकाचे वर्णन केले जाते.

Monday, March 1, 2021

द स्पाय क्रॉनिकल्स

द स्पाय क्रॉनिकल्स 
रॉ आयएसआय आणि शांततेचा आभास ..
ए. एस. दुलत /असद दुर्रानी / आदित्य सिन्हा
अनुवाद....सुश्रुत कुलकर्णी 
मंजुल पब्लिशिंग हाऊस
अमर जितसिह दुलत.. 1999 ते 2000 या काळात रॉ चे सचिव होते 
जनरल असद दुर्रानी.. 1990 ते 1991..आय एस आय चे महासंचालक होते 
आदित्य सिन्हा... हे लेखक आणि पत्रकार 
खरे तर रॉचे सचिव आणि आयएसआयचे संचालक एकमेकांचे चांगले मित्र असू शकतात यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही . पण ते सत्य आहे आणि त्यांच्या काही अधिकृत बैठकी ही परदेशात झाल्या.त्यामध्ये त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आपली मते मनमोकळेपणानी मांडली.
या व्यक्तींना आपल्या देशातील महत्वाची गुपिते माहित आहेत इतकेच नव्हे तर आपले गुप्तहेर कुठे सक्रिय आहेत याची ही माहिती आहे. 
गेल्या दोन दशकांमध्ये काही देशाच्या माजी गुप्तहेरप्रमुखांनी एकत्र येऊन त्यांनी ट्रॅक टू बैठकांमध्ये आपापले विचार मांडले होते.
दोन्ही प्रमुखांनी इस्तंबूल नेपाळ बँकॉक  येथे बैठकी घेतल्या .यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली त्यात प्रामुख्याने 26/11... रॉ एजंट आणि पाकिस्ताना तुरुंगात असलेला कुलभूषण जाधव..., सर्जिकल स्ट्राईक...अजित डोभाल..काश्मीर प्रश्न ..ओसामा बीन लादेन ..तालिबान ...पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष... भारतातील पंतप्रधान .. खलिस्तान चळवळ...श्रीलंका नेपाळ मधील अशांतता अश्या विविध विषयांवर आपली मते मांडली आहेत.
पुस्तक वाचताना राजकीय भाषेचा कंटाळा येऊ नये म्हणून ते संवाद रुपात मांडले आहेत.
वाचकांना ह्या पुस्तकात काही थरारक आणि सनसनाटी वाचायला मिळेल अशी अपेक्षा ठेवली तर ते चुकीचे ठरेल . कधी कधी राजकारणी भाषेचा कंटाळा येतो.

गोल्डा एक अशांत वादळ .... वीणा गवाणकर

गोल्डा एक अशांत वादळ .... वीणा गवाणकर
इंडस सोर्स बुक 
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांवर अनन्वित अत्याचार झाले. युरोपातील बऱ्याच देशातून त्यांना परागंदा व्हावे लागले . पण या लोकांनी चिकाटी सोडली नाही . जी भूमी मिळेल ती आपली मानून कष्ट केले . पण काही लोकांना स्वतःचे राष्ट्र हवे होते. आपला देश जिथे फक्त आपले वर्चस्व असावे यासाठी काही लोक लढा देत होते .त्यातीलच एक कणखर स्त्री म्हणजे गोल्डा मेयर .
ज्यू हे पूर्वीपासूनच अरबांचे शत्रू . अरबांच्या आठ राष्ट्रांनी इस्त्रायलला चहूबाजूनी वेढले आहे. संधी मिळेल तेव्हा त्यांनी इस्त्रायलवर हल्ले केले .पण हे ज्यूचे छोटे राष्ट्र सर्वाना पुरून उरले.जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर संघटना मोसाद त्यांनी स्थापन केली. 
हे चरित्र आहे इस्रायलच्या उभारणीत मोठा वाटा असलेल्या परराष्ट्रमंत्री .. श्रम रोजगार मंत्री पंतप्रधान अश्या विविध भूमिका खांद्यावर घेऊन वाटचाल करणाऱ्या गोल्डा मेयर या महिलेचे .
गोल्डा मूळची युक्रेन ज्यू . इतरांसारखे तिच्या वडिलांनीही अमेरिकेत स्थलांतर केले. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय . ती पहिल्यापासूनच बंडखोर स्वभावाची .डेनव्हरमध्ये ज्यू विद्वानांच्या चर्चा चालायच्या त्याला ती उपस्थित असायची. यामध्ये स्वतंत्र यहुदी राष्ट्राची संकल्पना निर्माण होत होती. डेव्हिड बेन गुरियॉन यांचे नेतृत्व  आणि थोर जैव रासायनिक शात्रज्ञ डॉ. वाइझमन यांचा पाठिंबा  हे तिला जवळून पाहता आले आणि तिने या चळवळीत स्वतःला झोकून दिले. साधी कार्यकर्ती ते पंतप्रधान हा गोल्डाचा प्रवास विलक्षण आहे . वीणाताईनी सोप्या भाषेत तिचे चरित्र उलगडून दाखविले आहे .अधिक काही लिहिण्यापेक्षा हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असेच मी म्हणेन .

असुर...एका पराभूताची गोष्ट...आनंद नीलकांतन

असुर...एका पराभूताची गोष्ट...आनंद नीलकांतन
अनुवाद.....हेमा लेले
मंजुल पब्लिशिंग हाऊस
ही कथा आहे प्रमुख महाकाव्यातील सर्वश्रेष्ठ खलनायकाची अर्थात रावणाची.रणांगणात मृत्यूशय्येवर असताना कोल्हे... कुत्रे त्याच्या शरीराचे लचके तोडताना त्याने आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्याने आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे.खरे तर लेखकाचा हा रावण  संपूर्ण पुस्तकात खूपच दुबळा..हतबल.. निराश वाटतो. 
लेखकाची कल्पनाशक्ती कशी बहरू शकते हे या पुस्तकातून दिसते. रामायणातील आपल्याला माहीत असलेल्या घटनांशी विसंगत आणि धक्कादायक गोष्टी यात आहेत.
तुम्हाला ठाऊक असलेले सर्वमान्य रामायण मनात ठेवून हे पुस्तक वाचाल तर फारच धक्के बसतील.
रावणाला दशमुख का म्हटले जाते ...?? आपल्यात बुद्धिमत्ता,राग,गर्व,द्वेष,दुःख,लोभ,आनंद,भीती,स्वार्थ..अभिलाषा आणि महत्वाकांक्षा  हे गुण असल्यामुळे आपण परिपूर्ण आहोत असे तो मानतो. थोर राजा महाबली त्याला बुद्धिमत्ता सोडून इतर गुणांचा त्याग करण्यास सांगतो.पण तो पावित्र्याचे उसने अवसान आणत नाही .जो माणूस म्हणून जसा असायला हवा तसाच आहे .
यात भद्र नावाची अजून एक व्यक्तिरेखा लेखकाने रंगविली आहे.भद्र एक सामान्य असुर सैनिक आहे . ज्याने आपली पत्नी आणि मुलगी देवांविरुद्ध लढताना गमावली आहे.आता तो एक गलिच्छ किळसवाणा दारुड्या भिकारी आहे . पण रावणाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचा साक्षीदार आहे . किंबहुना रामायणात जी महत्वाची वळणे आहेत त्यात हा प्रमुख आहे. तो रावणाच्या शयनगृहात ही शिरतो. रावण त्याचा तिरस्कार करतो पण आपल्या आयुष्यातून टाळू शकत नाही.
लंकेचा राजा कुबेर हा रावणाचा सावत्रभाऊ.तर रावण आपल्या कुंभकर्ण ,विभीषण, आणि कुरूप बहीण शूर्पणखा  आणि आई यांच्या समवेत दारिद्र्याचे जिणे जगतोय. मामा मारीच त्यांना जमेल ती मदत करतो. एकदा कुबेराच्या गाई चोरताना रावण आणि कुंभकर्ण पकडले गेले तेव्हाही मारीचने तो आळ स्वतःवर घेतला आणि शिक्षा भोगली.रावणाची आई असुर जमातीतील होती तर वडील ऋषी होते. विभीषण हा वडिलांच्या वळणार गेला होता. त्याला वेद धार्मिक ग्रंथात रुची होती .तो अतिशय शांत आणि घाबरट होता. तर कुंभकर्ण हा कुरूप लठ्ठ, ठेंगू केसाळ कुरळ्या केसांचा असुर. तो नेहमी अंमली पदार्थांच्या नशेत झोपून असायचा .शूर्पणखा काळीकुट्ट ,सरळ केसांची,पिंगट डोळ्यांची आहे . स्वतः रावण गोरा दाट कुरळ्या केसांचा आणि  काळ्या डोळ्यांचा आहे.
रावणाने कुबेरावर हल्ला करून लंका ताब्यात घेतली.त्यात भद्राचा सिहांचा वाटा होता.खरे तर अयोध्या रावणाच्या खिजगणतीत ही नव्हती. एक अतिशय गरीब छोटे राज्य म्हणून त्याने आयोध्याकडे पाहिले. तेथील प्रजा अतिशय गरीब ,घाणेरडी होती. ती रस्त्यावरच आपले नैसर्गिक विधी करत होती. रस्ते अरुंद होते त्यातच कचराकुंड्या होत्या. त्यांचा राजवाडा ही जीर्ण मोडकळीस आलेला होता.त्याने अयोध्येचा सहज पराभव केला.अयोध्येचा राजा अनर्ण्य याचा रावणाने वध केला. त्याच लढाईत रावणाची भेट वेदवती नावाच्या ब्राह्मण विधवेशी झाली. रावण तिच्या प्रेमात पडला पण तिने नेहमीच रावणाची निर्भत्सना केली. तरीही रावण तिच्या प्रेमात होता.
मंदोदरीपासून रावणाला पहिली मुलगी झाली. पण ज्योतिषाने ही मुलगी असुरांचा नाश करेल अशी भविष्यवाणी वर्तवली आणि तेव्हापासून सर्व नातलग रावणाशी विचित्र वागू लागले . एक दिवस संधी मिळताच त्यांनी वेदवती आणि रावणाची मुलगी भद्राच्या स्वाधीन केली. यात वेदवती मारली गेली पण ती छोटी मुलगी बचावली .एका राजाने तिला दलदलीतून बाहेर काढले.
हा भद्र जगण्यासाठी अनेक जागा बदलत गेला. तो आचारी होता ,तो धोबी होता. त्याची रखेल रावणाच्या दरबारात दासी होती. रावणापासून तिला एक पुत्र झाला.तो शेवटपर्यंत मेघनादाशी प्रामाणिक होता. 
हनुमानाच्या आगमनाची खबर ही भद्रानेच दिली.रावणाच्या मृत्यूसमयी तोच त्याच्या जवळ होता. मी माझ्यापरीने याचा सूड घेईन असे आश्वासन त्याने रावणाला दिले. पुढे तो अयोध्येत राहण्यास आला . आता अयोध्येत वर्णव्यवस्था सुरू होती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी व्यवस्था होती. भद्राने आपल्या रखेलीसमवेत धोब्याचे काम करण्यास सुरुवात केली. दिवसभर काम करून संध्याकाळी आपल्या रखेलीला मारहाण करायची शिव्याशाप द्यायचे हेच त्यांचे काम. त्यातूनच पुढे एक महत्वाची घटना घडली त्याचा परिणाम रामाच्या आयुष्यावर झाला .
हे अतिशय वेगळे रामायण आहे.रावणाच्या नजरेतून घडलेले. यात रामाला काहीच स्थान नाही .तर सीतेला महत्व आहे. भद्रसारख्या शूद्राचे समाजात किती महत्वाचे स्थान असते हे दाखविले आहे .
एक वेगळे पुस्तक म्हणून नक्कीच वाचावे .