Tuesday, December 31, 2019

त्यांचेही थर्टीफस्ट...३

त्यांचेही थर्टीफस्ट...३
" ए सुनबाई.... मला जाऊ दे आत. मी नंबर लावलाय..." बाथरूममध्ये घाईघाईने शिरणाऱ्या तिला पाहत सासूबाई म्हणाल्या.
"आहो सासूबाई.... आज लवकर जायचे आहे हो .. वर्षाचा शेवटचा दिवस आहे खूप कामे असतील आज" सुनबाई अजीजीने म्हणाली .
"हो का ....!! मग लवकर उठायचे  आणि मलाही साहेबांनी लवकर बोलावले आहे . त्यांच्याकडे ही थर्टीफस्ट आहे ...."सासूबाई ठसक्यात म्हणाल्या.
"हे बघा.... आजच्या दिवशी तरी तुमच्याशी भांडायची इच्छा नाही माझी .जा तुम्ही ....पण लवकर आटपा. पाहिजे तर तुमची इथली कामे मी करते ..." सून म्हणाली 
"काही गरज नाही..... .तुझ्या हातून काही करून घेण्याची वेळ नाही आली अजून .माझ्या मुलाला खाल्लास ते पुरे ....ती चिडून म्हणाली. 
"आणि तुम्ही काय तुमच्या नवऱ्याची पूजा केली का ....??? त्याने तर कंटाळून जीव दिला..."  सूनही काही कमी नव्हती.
"तर... तर... संधी मिळाली की तोंड सुटते तुझे . सासूचा जरा मान नाही ठेवत ...."सासूने थोडी माघार घेतली.
"सासूही त्या लायकीची हवी ....."अस बोलून सून पुढच्या तयारीला लागली. 
तर वाचकहो ... हे काही आजचे नाही गेली अनेक वर्षे हे भांडण रोज चालू आहे. सासू सून दोघीही विधवा . एका छोट्याश्या खोलीत त्यांचे आयुष्य असेच चालले आहे . सुनेच्या सासऱ्याने आयुष्याशी हार मानून आत्महत्या केली. तर सासूच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. हिला पळवून आणलेली.. म्हणून सासूचा राग.
 सून ही काही कमी नव्हती . दोघेही आपापली कामे करायच्या . एका छोट्या खोलीत राहून वेगळा संसार . आतापर्यंत भावाभावात वेगळी चूल मांडलेली पाहत होतो पण इथे तर सासू सुनेत वेगळी चूल होती.
असो .... सासू एका श्रीमंतांच्या घरी काम करीत होती तर सून एका छोट्या ऑफिसात साफसफाईचे काम . आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून दोघींच्या कामावर गडबड . दोघीही कामावर जाताच झाले गेले विसरून कामात बुडून गेल्या . दोन्ही ठिकाणी पार्टीची धूमधमाल चालू होती .  बघता बघता संध्याकाळ कधी झाली ते कळलेच नाही .
संध्याकाळी दोघीही उशिराच घरी आल्या . आल्या आल्याचं सासूने गॅस पेटवून भात ठेवायला घेतला . 
"काय सासूबाई आजही उपाशी ....??  हे भोग असतात पूर्वाश्रमीचे भोगावेच लागतात ...." सून कुत्सितपणे म्हणाली .
  "तू जेवलीस ना पोटभर.....पूर्वी नक्कीच पुण्य केले असशील ......" सासूने उलट प्रहार केला .
सून हळूच उठली आपल्या पर्समधून प्लास्टिकचा डबा काढून तिच्या हातात दिला . उघडून पाहिले तर त्यात चिकन बिर्याणी होती . 
"तुम्हाला आवडते ना....म्हणून आठवणीने तुमच्यासाठी आणली. खाऊन घ्या पोटभर . माझे झालेय तिथे..."
भारावलेल्या हातानी तिने तो डबा घेतला आणि काही न बोलता कोपऱ्यात बसून शांतपणे जेवू लागली . 
"अग  जाऊया ना पार्कात ...?? शेजारची तरुणी सुनबाईला विचारायला आली .
"हो .. चल तयारी करू ...असे म्हणत सुनबाई तयारीला लागली .
ते ऐकून सासूबाई हळूच उठली .आपल्या बॅगेतून एक छानसा नवीन डिझाइनचा गाऊन काढून सुनेच्या हाती दिला.
" साहेबांनी जेवण दिले नाही ग... पण मालकीणबाईने आपल्या मुलीचा गाऊन तुझ्यासाठी दिला .अग.. नवीनच आहे हा. ख्रिसमसच्या दिवशी वापरला फक्त . तू त्या दिवशी फोनवर कोणाला तरी सांगत होतीस ना एक डिझाईनर गाऊन घ्यायची इच्छा आहे .म्हणून तुझ्यासाठी मागून आणला.हा घालून जा आज .."सासू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली .
काही न बोलता सुनेने गाऊन हातात घेतला . दोघींचे डोळे भरून आले होते.
"हॅपी न्यू इयर आई ...."ती म्हणाली.
"आई नको ग .. नाहीतर आपले भांडणच संपून जाईल. त्याच एका गोष्टीवर संसाराचा हा गाडा हाकतोय आपण . आजची रात्र मजा कर . उद्या आहेच की आपण भांडायला .. हॅप्पी न्यू इयर ...
© श्री. किरण कृष्णा बोरकर

त्यांचे ही थर्टीफस्ट....२

त्यांचे ही थर्टीफस्ट ....२
" आज जायचे का बाहेर ....??  31 डिसेंबर साजरे करायला ...?. नवीन वर्षाचे स्वागत बाहेरच करू .."तिच्या हातात गोळ्या ठेवत  ते म्हणाले.
"तुमचे आपले काहीतरीच ..... ती गोळ्या तोंडात टाकीत पाण्याचा घोट घेत म्हणाली ."आता हे काय वय आहे का आपले...?? अर्धी लाकडे स्मशानात गेली आपली . त्यात मी ही अशी आजारी . त्यापेक्षा तुम्हीच घरी बाटली आणून प्या.. हवी तेव्हडी .. .." तिने हसत हसत बॉम्ब टाकला.
"गेले ग ते दिवस...आता नाही होत.." तो जुन्या आठवणीत रमत म्हणाला.
"का ....?? आता माझी अडचण होतेय ..?? तिने डोळे मिचकावत विचारले.
" काहीतरी बोलू नकोस. कसली अडचण ....?? आपण दोघेच एकमेकांसाठी .."तो डोळे वटारत म्हणाला .
"हो.. हो.. माहितीय.. तरुणपणी कधी उचलून घेतले नाही  म्हणून आता उचलून फिरवावे लागतेय..."डोळ्यातील पाणी पुसत ती  म्हणाली.
"अरे ते कधी कधीच ..तुझ्या मुलाने चांगल्या मेड ठेवल्या आहेत तुझ्यासाठी.परदेशी राहत असला तरी लक्ष आहे आपल्याकडे . चोवीस तास आपल्यासाठी माणसे ठेवली आहेत त्याने..."तो हसत हसत म्हणाला .
"हो ना...किती लक्ष आहे त्याचे आपल्याकडे .. दर पंधरा दिवसांनी डॉक्टर काय ...?? औषधे वेळच्यावेळी दारात . पूर्वी मी हिंडत फिरत होते तेव्हा दर सहा महिन्यांनी एखाद्या टूरमधून फिरायला पाठवायचा...". ती आठवणीत हरवून गेली .
"आणि बेडवर पडल्यावर चोविस तास बाईही उशाला ठेवली ....."त्याने डोळे मिचकवले .
"तुमचे आपले काहीतरीच.... गेले चार दिवस ती बाई आली नाही . तुम्हालाच करावे लागतेय माझे .." ती चिडून म्हणाली . 
"मग असे कुठे लिहिलंय का ...?? नवऱ्याने आजारी बायकोची सेवा करू नये म्हणून... तो चिडून म्हणाला 
"मान्य.... पण काल उचलताना कंबर दुखली ते जाणवले हो मला .." तिच्या नजरेत काळजी होती .
"ते सोड... चल आज पार्टी करू . बऱ्याच दिवसांनी वाईन आणलीय मी . फ्रीजमध्ये ठेवलीय . थांब आणतो..." असे बोलून तो आत गेला . थोड्या वेळाने थंडगार वाईनचे दोन ग्लास घेऊन आला .  
"नववर्ष आपल्या आयुष्यात सुख समाधान घेऊन येवो....". असे म्हणत त्याने तिच्या हातात ग्लास देऊन चियर्स केले.तिनेही हसून दाद दिली आणि भला मोठा घोट घेतला . एकमेकांकडे पाहत हसत त्यांनी ग्लास रिकामे केले .
थोड्याच वेळात ती गाढ झोपी गेली .त्याने शांतपणे उठून तिची नाडी पहिली.ती मेलीय असे वाटतच नव्हते. खिन्नपणे हसत त्याने खिशातून एक पुडी काढून त्यातील पावडर ग्लासात रिकामी केली . ग्लास वाईनने पूर्ण भरला.मग खिशातून मोबाईल काढून त्यातील मेसेज मोठ्याने वाचू लागला.
"आज सकाळीच कॅनडा येथे हायवेवर झालेल्या अपघातात तुमच्या मुलाचे दुःखद निधन झाले आहे . शव ताब्यात घेण्यासाठी लवकरच तुम्हाला बोलाविण्यात येईल"
.खिन्नपणे तिच्या शवाकडे पाहत त्याने चियर्स केले आणि एका दमात ग्लास रिकामा केला.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

त्यांचे ही थर्टीफस्ट....१

त्यांचे ही थर्टी फस्ट......१
आज वर्षाचा शेवटचा दिवस होता .त्यामुळे ती वस्ती फुलून निघाली होती.काही चाळीत तर रोषणाई होती . साऱ्या बायका आज नटून थटून खिडकीत उभ्या होत्या.आज गर्दी होणार हे नक्की.कारण बरेचजण दारू पिऊन झाली की रात्र जागवायला इथेच येणार होते . काहींकडे बाटल्या ही ठेवलेल्या होत्या. उगाच कोणाचा परत प्यायचा मूड लागला तर  मध्येच उठून जायला नको.त्यातले बरेचजण उद्यापासून सगळे बंद....असा संकल्प ही करणारे होते.
 तीही आज सजून बसली होती. खिडकीत उभी राहिली की ताबडतोब गिऱ्हाईक मिळणार याची खात्री होती तिला. पण ती तो आणेल त्याच गिऱ्हाईकाबरोबर बसणार होती . तो तिचा नेहमीचा मध्यस्थ होता . बऱ्याचवेळा ती त्याच्यामार्फतच काम करायची.
खोलीत बसून बराच वेळ झाला पण अजून तो एकालाही घेऊन आला नव्हता.आजूबाजूला सुरवात ही झाली होती.शेवटी तो आला...... रिकामा ..हात हलवत.
 दोघांनी एकमेकांकडे पाहिले .त्याने निराशेने मान नकारार्थी हलवली.एक निराशेची ठिणगी तिच्या डोळ्यात क्षणभर दिसली.पण नंतर ती हसली. काही न बोलता  तिने त्याला मिठीत घेतले . त्याच्या ओठावर ओठ टेकवून ती हॅप्पी न्यू इयर असे कुजबुजली आणि बिछान्यावर ओढले . नपुंसक असला तरी शेवटी तिचा नवरा होता तो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, December 29, 2019

मी फुलनदेवी

मी फुलनदेवी
 शब्दांकन..मारी तेरेज  क्यूनी, पॉल रोंबाली
अनुवाद ...डॉ. प्रमोद जोगळेकर 
मेहता पब्लिशिंग हाऊस
आपल्याच देशातील छोट्या गावातील एक घुणास्पद वास्तव आपण वाचतोय.
 ही कहाणी सांगतेय स्वतः फुलनदेवी.छोट्या अशिक्षित अडाणी मुलीपासून कुप्रसिद्ध गुन्हेगार बनलेल्या फुलनदेवीची कथा.
आजही समाजात गरीब श्रीमंत ,उच्च नीच जातीव्यवस्था आहेत.जमीनदार गरिबांचे शोषण करतायत.त्यांचा  कोणीही वाली नाही . पंचायत जमीनदारांच्या बाजूने आहे .पोलिसांचा हस्तक्षेप नाही . अश्यावेळी एक मुलगी या सगळ्यांशी लढा देते . वेळीवेळी भयानक मारही खाते.पण आपल्या परीने जमेल तितका विरोधही करते. तिचा बाप तिचे लग्न थोराड आणि वयाने मोठ्या असलेल्या विधुराशी लावून देतो.पण तिथेही तिला कोवळ्या वयात अत्याचार सहन करावा लागतो . पुन्हा गावी येताच जमीनदार... त्यांची मुले यांचा अत्याचार सहन करावा लागतो . तिथेही ती त्यांना विरोध करते म्हणून त्यांच्या घरावर हल्ले होतात  आई वडीलां भयानक अत्याचार केला जातो. अखेर ती जीव वाचवायला पळून जाते तेव्हा तिच्यावर डाकू असण्याचे आरोप करण्यात येतात.आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून ती पोलिसांच्या स्वाधीन होते तेव्हाही तिचा अमानुष छळ होतो .शारीरिक अत्याचार होतच असतात . यावेळी तिचे वय फक्त सोळा असते.
फुलनच्या कथेतून आपल्याला समाजरचना ..जातीव्यवस्था ..याची माहिती मिळत जाते . तिच्या गावची उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील कित्येक गावे  अजूनही अज्ञानाच्या , मध्ययुगीन अंधारात खितपत पडलेले आहेत .
अंगावर येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करीत फुलन कणखर बनत गेली. तिला डाकूनी पळवून नेले  पण त्यातूनही ती जगली आणि स्वतः डाकू बनली . हातात बंदूक घेऊन दरोडे घालते. आपल्यावर आणि कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाचा सूड घेत राहते .तीन वर्षे तिने उत्तर प्रदेशात डाकू बनून थैमान घातले . श्रीमंतांना लुटणे त्यांची संपत्ती गरीबात वाटणे.यामुळे ती लोकप्रिय झाली . अखेर ती शरण आली . मी चांगली नाही पण वाईट ही नाही . पुरुषांनी मला जे भोगायला लावले त्याचीच मी परतफेड केली असे ती म्हणते .
अंगावर काटा आणणारी डाकू फुलंनदेवीची कहाणी तिच्याच शब्दात... 

Thursday, December 26, 2019

वासुदेव

वासुदेव 
त्या अनाथाश्रमात ख्रिसमस निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून सुपरस्टार विनयकुमारला आमंत्रित करण्यात आले होते. खरे तर विनयकुमारचे नाव ऐकून बऱ्याचजणांच्या भुवया  आश्चर्याने उंचावल्या होत्या.कारण विनयकुमार आणि समाजकार्य यांचा संबंध असेल हे बर्याचजणाना मान्य नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची क्रेझ हळू हळू कमी होत चालली होती.आता तो आपल्या कुटुंबसमावेतच जास्त वेळ घालवीत होता.कदाचित त्यामुळेच त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले असेल.
त्याने आपल्या कुटुंबासह प्रवेश केला तेव्हा एका हॉलमध्ये सर्व मुले शांतपणे बसून होती.संचालकांनी कार्यक्रमास सुरुवात केली.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम चालू होते.मध्येच संचालकांनी त्याला सांताक्लोज बनायची विनंती केली. त्यानेही हसत ती स्वीकारली आणि काही क्षणात तो सांताक्लोज बनून हजर झाला. आपल्या अंगभूत अभिनयाच्या जोरावर त्याने सांताक्लोज जिवंत केला . खांद्यावरच्या पोतडीतून अनेक गिफ्ट्स काढून मुलांना वाटल्या .मुलांनीही सांताक्लोजबरोबर भरपूर गंमत केली .शेवटी समारोपाचे भाषण सुरू झाले . संचालकांनी विनयकुमारचे आभार मानले आणि मुलांना  उद्देशून म्हणाले "सांताक्लोज सारखे अनेकजण या जगात आहेत.सांताक्लोज प्रत्येक धर्मात आहे फक्त त्याची रूपे वेगवेगळी आहेत . त्या त्या धर्माच्या रितिरिवाजनुसार परंपरेनुसार आणि संस्कृतीनुसार तो वागतो .आपल्याकडे ही एक सांताक्लोज रोज येतो.."सगळी मुले शांत झाली..मग कुठेय...?? कोण..?? असा एकदम गल्ला झाला . सगळे आमंत्रिक प्रेक्षक अचंब्याने पाहू लागले.
" होय.... फक्त त्याची वेशभूषा चेहरा वेगळा असतो . आपण त्याला वासुदेव म्हणतो .आजही तो आश्रमाच्या दारात ठेवलेल्या दोन डब्यात गहू आणि तांदूळ ठेवून जातो . भले ते आपल्यासाठी फार कमी असतील पण त्याची देण्याची वृत्ती आहे तिला आपण सलाम केले पाहिजे....सर्वांनी त्या वासुदेवासाठी टाळ्या वाजवा.प्रेक्षकात टाळ्यांचा कडकडाट झाला. विनयकुमारने ही खुल्या मनाने दाद दिली . आजचा दिवस त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला होता .
भल्या पहाटे तो नेहमीप्रमाणे अलगद उठला . इतरांची झोपमोड होऊ नये याची काळजी घेत स्वतःचे आवरून बाहेर पडला . रस्त्यावरच्या एका बंद दुकानाआड त्याने कपडे बदलले .काही क्षणातच मेकअप करून वासुदेव बनून बाहेर पडला . ठरल्याप्रमाणे त्याने एक दिशा पकडली आणि गाणे गात गल्लीबोळातून फिरू लागला . उंच सोसायटीमध्ये तो कधीच जात नसे पण चाळीमध्ये आणि बैठ्या झोपडपट्टीमधून फिरत असे . शाळेत जाणारी लहान मुले कुतूहलाने त्याच्याकडे पाहत.. काही त्याला हात लावून पाहित ...तर काही प्रश्न विचारीत.बर्याचजणी त्याची पूजा करत आणि त्याच्या झोळीत एक वाटी तांदूळ किंवा गहू टाकीत. गहू आणि तांदूळ या दोनच गोष्टी तो घेत होता. पैसे आणि शिळ्या अन्नाला तो पाया पडून नकार देत असे.त्याच्या मुखातून शुद्ध आणि स्पष्ट भाषेतील ओव्या ऐकून सगळेच खुश होत.शेवटी मिळालेली भिक्षा ठरलेल्या अनाथाश्रमच्या दरवाज्याजवळ ठेवून तो घरी परतला.घरी अजूनही शांतता होती .पत्नी नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. त्याला पाहतच ती हसली.आज घाई करू नका .आताच डायरेक्टरचा फोन आला होता आजचे शेड्युल दोन तास पुढे गेले आहे त्यामुळे आरामात शूटिंगला  या ... आणि हसत हसत विनयकुमारच्या मिठीत शिरली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, December 24, 2019

मंटोच्या निवडक कथा

मंटोच्या निवडक कथा 
अनुवाद... डॉ. वसुधा सहस्त्रबुद्धे
विजय प्रकाशन 
सआदत हसन मंटो एक अवलिया आणि अतिशय संवेदनशील पत्रकार होता .त्याने सिनेपत्रकारीताही केली .अतिशय वेगळ्या विषयावर त्याने वेगवेगळ्या ढंगात कथा लिहिल्या.परंपरेविरुद्ध जाणे ..अन्याय आणि शोषणाविरुद्ध आपली मते कथेद्वारे प्रकट करणे .. बेधडकपणे बोलणे हे त्याचे वैशिष्ट्य.
फळणीची दाहकता त्याने आपल्या  सहज शैलीतून प्रखरतेने  मांडली आहे . तर अलक या कथाप्रकारातून त्याने दोन ओळीतही बरेच काही सुचविले आहे .
देवाशप्पथ या कथेतून आपल्या मुलीची अनेक वर्षे वाट पाहणाऱ्या स्त्रीची आणि तिने ओळख न दाखवल्यावर होणारी अवस्था आपल्याला अस्वस्थ करते . खोल दो या कथेत तरुण मुलीला शोधणारा बाप आपल्याला रडू आणतो . इज्जतीसाठी स्वतःसकट आपल्या बहिणीला संपविणारा चुनीलाल हादरवून टाकतो.. एखाद्याला शब्द दिला म्हणून खून करणारा फोरास रोडवरील मम्मदभाई  कोर्टाची सहानुभूती मिळावी म्हणून आपली प्रिय मिशी भादरतो तेव्हा खूपच केविलवाणा वाटतो.
एकूण वेगवेगळ्या शैलीच्या 52 कथा यात आहे . प्रत्येक कथा तुम्हाला वेगळेपणा देते .
नग्न असलेल्या समाजाचे मी काय कपडे उतरविणार..?? पण मी त्यांना कपडे घालण्याचे काम ही करणार नाही असे तो अश्लीलतेचे आरोप झाल्यावर स्पष्ट करतो .
खोल दो, गंध.,वर खाली आणि मध्ये या कथा अश्लील असल्याचा आरोप होतो पण त्या त्याने निर्दोष सिद्ध केल्या . त्याचे वेश्या वस्तीत राहणे ,सिगारेट ओढणे दारू पिणे हे आकलनापलिकडचे आहे .
फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीचा परिणाम त्याच्या टिटवाचा कुत्रा , टोबा टेकसिंग, शरीफन  गुरुमुखसिंहचे मृत्युपत्रसारख्या कथेत स्पष्ट दिसतो . 
त्याच्या बऱ्याच कथेचा सेक्स हा मुख्य गाभा आहे पण तो कुठेही एका बाजूने झुकलेला नाही .
काही कथेतील पात्रे ही त्याने जवळून अनुभवलेली आहेत .
 यात मंटोच्या सगळ्या कथा नाहीत तर डॉ नरेंद्र मोहन यांनी संपादित केलेल्या मंटो की कहानिया पुस्तकातील काही कथांचा अनुवाद आहे . 
डॉ वसुधा सहस्त्रबुद्धे  यांचा मंटोवर खूप अभ्यास आहे . त्यांच्या कथा मराठीत आणल्याबद्दल खूप खूप आभार 

Sunday, December 22, 2019

मालिका आणि सोहळे

मालिका आणि सोहळे
संतोष दिघेला दारात उभे राहिलेले पाहून माझे वाईट दिवस चालू झाले याची खात्री पटली.हे भोग असतात.....आणि ते याच जन्मात भोगावे लागतात.... असे सौ. नेहमी म्हणते.पण ती सहानुभूतीने  म्हणते की उपहासाने..... हे अजून मला कळले नाही.
त्यातच  तिने आज कांदाभज्या केल्या होत्या. महाग झालेल्या वस्तूच नेमक्या आमच्याकडे कश्या वापरल्या जातात हे मला न सुटलेले अजून एक कोडे. अर्थात अजून कोणतेही कोडे मला सुटलेले नाही .सोने महाग होते तेव्हा ही नेमकी सोन्याची खरेदी करते. त्यातही  तिने नेमक्या सहा कांदाभजी बनविल्या.तीन तिला तीन मला.समान हक्काची ती कट्टर पुरस्कर्ती आहे. 
आता याने दारात उभे राहून....."भाऊ..." म्हणून बोंब मारली तेव्हा एक भजी खाऊन झाली होती. पण त्याची हाक ऐकताच उरलेल्या दोन्ही भज्या तोंडात कोंबायचा प्रयत्न केला पण जमले नाही . शेवटी एक भजी डिशमध्ये राहिलीच .
"अरे वा भाऊ ... तू तर श्रीमंत माणूस आहे .. हसत हसत त्याने ती भजी तोंडात टाकली  आणि स्वयंपाकघरातून एक भांडे पडल्याचा आवाज आला . पण ह्याने तिकडे लक्ष न देता माझ्या शेजारीच बैठक मारली .
"कामाचे बोल दिघ्या ....." मी पटकन मुद्द्याला हात घातला.
"किती रे घाई करशील ...?? कामासाठीच आलोय.उगाच फालतू गप्पा मारायला मला वेळ नाही" तो कपाळावर आठ्या आणीत म्हणाला 
"सोड रे .....तू किती बिझी ते माहितीय मला .. चौपाटीवर त्या भिंतीला चिकटून बसणाऱ्या जोडप्यांचे निरीक्षण करण्यात खूप वेळ जातो तुझा .."मी छद्मीपणे हसत म्हणालो.
"ठीक आहे .... तो आत पाहत  डोळे मोठे करून म्हणाला ."मला सांग.... सोसायटीत कोणी सिरीयस बाई आहे का सध्या ...?? म्हातारी ..वय झालेली ...?? तो हळूच माझ्या कानाजवळ येत म्हणाला 
मी चमकलो... 
"नवीन सिरीयल आलीय का तुझ्याकडे ..??
 संतोष दिघे बऱ्याच मराठी मालिकांचे लिखाण करतो असे मी ऐकून होतो . कधी त्याचे नाव कोणत्याही सिरियलमध्ये दिसले नाही हा भाग वेगळा.... पण तो लिहीत असतो हे मान्य होते आम्हाला....
"अरे नाही रे ... जुनीच सिरीयल आहे.त्यातूनच नवीन कथानक काढून ती वाढवायची आहे .. संतोष सहज म्हणाला . 
"म्हणून सिरीयस असलेली म्हातारी बाई .....?? मी आश्चर्याने विचारले .
"हो रे ....आता एका सिरीयलमध्ये नायक नायिकेचे लग्न होणार आहे त्यात बरेच भाग झाले आता लग्नावर तीनचार भाग होतील मग हनिमूनवर दहा बारा त्यानंतर सिरीयल गुंडाळावी लागेल पण मध्येच एखादा ट्विस्ट असावा असे निर्मात्याचे म्हणणे . जेणेकरून लग्न लांबेल आणि सिरीयलचा टीआरपी ही कायम राहील ..
"किती दिवस लांबेल लग्न ...."?? मी विचारले .
"अरे वर्षभर लांबले तरी चालेल.शंभर एक भाग होतील असा ट्विस्ट हवा ..."संतोष सहज म्हणाला .
"त्यासाठी तुला सिरीयस म्हातारी का पाहिजे ..."?? मी विचारले 
"अरे त्या म्हातारीला नायिकेची आई म्हणून आणायचे . मग ती तिची सेवा करणार ..काळजी घेणार .. संतोषकडे उत्तर तयार असतात .
"पण त्या नायिकेला आई नाही आहे ना...?? फक्त भाऊच आहे ...?? सौ अचानक आतून येत म्हणाली . 
तिच्या हातात चहा आणि एक कांदा भजी पाहून मला भीती वाटू लागली .
 "आहे .....आई जिवंत आहे  हे तिला आज कळले . त्या वर चार पाच भाग आरामात जातील .नंतर ती तिची सेवा करेल . तिला भेटायला नातेवाईक येतील खलनायिका येतील ,तुम्ही दोघेसुद्धा येऊ शकता.ती दोन वेळा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईल.मग तिथे नायिकेवर भलते सलते आरोप होतील . त्यात दहा बारा भाग जातील. नायिकेला ही आपली आई  आहे हे सिद्ध करण्यासाठी धावपळ ....पुरावे गोळा करण्यासाठी फिरणे... यात पुन्हा पंधरा वीस भाग जातील. मध्येच हिरोबरोबर कॉफीशॉप मध्ये बसून भविष्याच्या चिंता ...स्वप्न पाहणे आश्वासन देणे तू किती काळजी घेतोस अश्या गप्पा . त्यात तीन चार एपिसोड जातील...."संतोष सहज डोळ्यासमोर घडल्यासारखे म्हणत होता .
"अरे मग तुला का सिरीयस म्हातारी प्रत्यक्षात बघायची  आहे ...?? तशी ही विलास चव्हाणची आई सिरीयस आहे गेले तीन दिवस ... रोज नातेवाईक बघून जातायत तिला ... चल जाऊ तिला बघायला..." मी उठत म्हणालो .
"अरे भाऊ.... बघायला जायची काहीही गरज नाही . तीन दिवस झाले ती सिरीयस आहे असे तू म्हणतोस.. म्हणजे गेले बहात्तर तास तिच्या घरचे टेन्शनमध्ये आहेत . बघ विचार कर ..किती एपिसोड झाले .अरे आपल्याला तिच्या मरणाचा सोहळा करायचा आहे .  आणि त्याचीच माहिती घ्यायला तुझ्याकडे आलोय .." संतोष हातावर टाळी देत म्हणाला .
"काय....??? मरणाचा सोहळा ... दिघ्या वेडा झालास का तू ....??  मी संतापून म्हणालो . सौनेही रागाने त्याच्या हातातून कप खेचून घेतला पण नंतर त्यात अर्धा चहा शिल्लक असलेला पाहून परत दिला.
"हे तुमचे मित्र ....."?? रागाने माझ्याकडे पाहत ती धुसफूसली 
"का ....?? का ...?? लग्नाचे सोहळे होतात .. लग्नाच्या तयारीवर हवे तितके एपिसोड बनतात मग मरणावर का नाही .... निदान पन्नास भाग तरी झाले पाहिजे...."कपातील चहा एक घोटात गिळत संतोष म्हणाला .
"भाऊ विचार कर .....तू बघतोयस रोज कोणीतरी तिला भेटायला येतात .मग एकत्र बसून म्हातारीचे गुणगान गातात . तिच्या तरुणपणीची चर्चा करतात . तिची चांगली वाईट कामे आठवतात. विचार कर भाऊ..... तिचा पूर्ण भूतकाळ आठवला जातो . उद्या ती मरताना तिच्याजवळ कोण असेल ..  तिला पाणी कोण कोण पाजेल . तिची अंत्ययात्रा कशी निघेल यावर लक्ष ठेव . तिच्या मृत्यूनंतर  वाद होतील का ..?? अग्नी कोण देईल..खांदा कोण देईल...तिच्या प्रॉपर्टीचे काय ...??  यावरून वाद होतील का...??  यावर लक्ष ठेव .. अरे प्रत्येक गोष्टीवर पाच सहा भाग बनवू आपण .. नाही त्या नायक नायिकेचे लग्न पुढच्या वर्षात केले तर नाव नाही लावणार दिघ्यांचे..'.संतोष आवेशात म्हणाला .. 
"तसेही या दिघ्यानी काय दिवे लावलेत ...."?? मी मनात म्हणालो .
"पण मरणावर पन्नास एपिसोड म्हणजे जास्त वाटत नाही का ...?? मी खालच्या आवाजात विचारले 
" पन्नास कमीच आहेत नुसत्या रडण्यावर चार एपिसोड करतो बघ . तुला ती  फेसम सिरीयल माहीत नाही का ..सासू सुनेची .. ज्या दिवशी नायिका गरोदर आहे असे कळते त्याच दिवशी आमच्या विशालच्या बायकोचाही रिपोर्ट आला .
 हा विशाल म्हणजे संतोषचा लहान भाऊ 
"बरे मग .... मी उत्सुकता दाखवली 
 विशालची बायको दुसऱ्या दिवशी गपचूप कामावर गेली पण त्या सिरीयलमध्ये तीन एपिसोड हीच गोष्ट चालू होती  आणि  विशालचा मुलगा नर्सरीत गेला त्याच दिवशी त्या नायिकेला मूल झालं....विचार कर बाळांतपणावर किती एपिसोड गेले आणि मी कोणाच्या मृत्यूवर पन्नास एपिसोड लिहू नये ...?? चेहऱ्यावर आगतिकता आणून संतोष म्हणाला.
"मग मी नक्की काय करावे ...."?? मी मुद्द्यावर आलो .
"खरे तर मी काही दिवस इथे राहून म्हातारीकडे लक्ष ठेवावे  असा विचार करत होतो..." संतोष असे म्हणताच आतून तीन चार भांडी जोरात पडली आणि माझा चेहरा पाहून तो पटकन म्हणाला .."पण मला बरीच कामे आहेत तेव्हा  रोज तूच मला फोनवरून  प्रत्येक गोष्ट सांग.... त्यावरून एपिसोड लिहायची जबाबदारी माझी.
संतोषला घरात ठेवून घेण्यापेक्षा हे काम कितीतरी सोपे होते . शेवटी कोणत्याही कारणाने का होईना एका मोठ्या सिरियलच्या कामात माझा अप्रत्यक्षपणे सहभाग झाला होता . नव्हे.... तर संतोष दिघेने त्याच्या मर्जीनुसार करून घेतला होता . 
आता फक्त म्हातारीच्या घरात काय घडतंय याकडे लक्ष ठेवायचे होते.
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

Thursday, December 19, 2019

पॉलीकिलर्स आणि इतर विज्ञानकथा .

पॉलीकिलर्स आणि इतर विज्ञानकथा ...श्रीनिवास शारंगपाणी
विश्वकर्मा पब्लिकेशन
सामान्य वाचकांना समजतील अश्या सोप्या पद्धतीने   विज्ञानकथा लेखकाने लिहिल्या आहेत .पॉलीकिलर्स या कथेतून आपण केलेल्या निर्मितीतून काय घडू शकेल हे दाखविले आहे .तर विनाशकले विपरीत बुद्धी या कथेतून प्रयोग चालू असताना पृथ्वीवर त्याचे काय परिणाम होत असतात याची रंजक माहिती समोर येते .मन झाले वैरी या कथेत  माणसाचे मन वाचण्याचे यंत्र आणि त्यातून होणारे परिणाम स्पष्ट केले आहेत .अश्या  अनेक छोट्या छोट्या कथा  अतिशय नाट्यपूर्ण  आणि रंजकपणे लिहिल्या आहेत . विज्ञानकथा आवडणाऱ्यांसाठी हे योग्य पुस्तक  आहे .

नागासाकी

नागासाकी.... क्रेग कोली
अनुवाद.... डॉ. जयश्री गोडसे 
मेहता पब्लिकेशन
मात्सुयामा-चो येथील टेनिसच्या मैदानावर 500 मीटर  अंतरावर येऊन फुटण्यास फॅट मॅनला 43 सेकंद लागले .जमिनीवरून एक प्रचंड आगीचा लोळ आकाशात तयार होताना दिसला. त्यानंतर एक प्रचंड दाबाची लाट आली .आणि पाठोपाठ स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज . ज्यांनी त्याचा अनुभव घेतला त्यांनी त्याला प्रकाशाची लाट असे नाव दिले  .या स्फोटाच्या केंद्रापासून जवळजवळ एक किलोमीटर परिसर पूर्ण उदवस्त झाला.माणसे प्राणी तत्क्षणी मेले.माणसाच्या शरीरातील पाणी त्या उष्णतेच्या लाटेने सुकून गेले .अतिउष्णत्यामुळे जळण्याजोगे सगळे जळत गेले .स्फोटानंतर निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे बरेचजण गंभीर भाजले .
 हे होते नागासाकी शहरावर अणुबॉम्ब पडल्यानंतरचे वर्णन . हिरोशिमा बॉम्बमुळे झालेला संहार खूप भयानक होता . तरीही  बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रांना बंदी होती .  जपानव्यतिरिक्त कोणीही कल्पना केली नव्हती की अमेरिका अजून एक बॉम्ब टाकणार आहे . काही दिवसातच नागासाकीवर दुसरा बॉम्ब पडला.
 बॉम्ब टाकण्याची पूर्व तयारी... त्याची हाताळणी. वैमानिकांची मानसिक तयारी ..बॉम्बची जोडणी याचे अंगावर काटा येणारे वर्णन या पुस्तकात आहे .
क्रेग कोली यांनी या भयानक विध्वंसाची कथा अनेक पातळ्यांवर लिहून आपल्यासमोर उभी केली आहे .८० हजार लोकांचा मृत्यू हे या अणुस्फोटाचे तात्पर्य होते . आपण हे पुस्तक वाचत नाही तर प्रत्यक्षात बघत आहोत असे वाटते ..संपूर्ण जगात या घटनेनंतर बदलले .  अणूशक्तीची ताकत काय आहे हे  आजही समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो .

Sunday, December 15, 2019

आंतरराष्ट्रीय चहा दिवस 2019

आंतरराष्ट्रीय चहा दिवस 2019
"पप्पा.... आज इंटरनॅशनल चहा डे आहे.लेट्स सेलिब्रेट .....!! आज आपण बाहेर चहा पिवूया..."तिने मोठ्या आवाजात ऑर्डर सोडली आणि पप्पांच्या कपाळावर आठ्या आल्या.
"हे ...कॉलेजला जायला लागल्यापासून बाहेर खाण्याची सवय फारच लागलीय तुला. बापाकडे काही पैश्याचे झाडं नाही आहे ..."त्याने नेहमीचे वाक्य फेकले. इतरांनी नेहमीप्रमाणे ऐकून न ऐकल्यासारखे  केले आणि ताबडतोब तयारी करायला पळाले. 
नाहीतरी अशी संधी फारच क्वचित मिळत असे .हीचा बाप तसे पैसे जपून वापरणारा. नशीब मुली हुशार म्हणून एकीला मेरिटवर इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळाले होते तर मोठीने हुषारीवरच मॅनेजमेंट केले होते . आईतर ते देतील त्या पैशात घर चालवीत होती.
 बापाचे मत बदलू नये म्हणून सर्व पटापट तयार झाले . पण आज तो मूडमध्ये आलेला होता.कधी नव्हे ते त्याने चौपाटीवर सगळ्यांना भेळपुरी दिली जबरदस्तीने पाणीपुरीही खाऊ घातली.मग काही वेळ बसून परत निघाले.
"पप्पा चहा राहिलाय....." तिने आठवण करून दिली.
"हो माहितीय ...पण आज स्पेशल ठिकाणी चहा देतो..."असे म्हणून तो एका गल्लीतील चहाच्या टपरीजवळ घेऊन गेला. नेहमीप्रमाणे टपरीवर गर्दी होतीच .पण थोडयावेळाने एक टेबल रिकामे झाले आणि याना बसायला जागा मिळाली.
"शी...!!. हे काय पप्पा...?? कुठल्या ठिकाणी आणलात आम्हाला. ही काय चहा पिण्याची जागा आहे का ...."?? ती संतापून म्हणाली.
" अरे पिऊन तर बघा ...नाही आवडला तर दुसरीकडे घेऊ ...छान चहा असतो इथे ...".पप्पा हसत म्हणाले. 
इतक्यात तो हातात फडके घेऊन त्यांच्यासमोर उभा राहिला . साधारण तिच्याच वयाचा होता तो. डोळ्यात न पाहता खाली मान घालून त्याने टेबल पुसले आणि मान खाली घालून विचारले " साहेब काय आणू ...??? 
"अरे चार कटिंग दे मस्त ...स्पेशल .. " त्याने हसत ऑर्डर दिली.
तीही त्याला पाहून शांत झाली.कदाचित आपल्याच वयाचा तरुण म्हणून असेल.काही वेळाने तो वाफळलेले  चार चहाचे ग्लास घेऊन आला .प्रत्येकाच्या पुढ्यात ग्लास ठेवताना त्याची नजर खालीच होती. 
"अजून काही...."?? तो पुन्हा खाली मान घालून पुटपुटला.
त्या तिघीनीही नकारार्थी मान हलवली.चहा संपताच तो ग्लास उचलायला पुढे झाला आणि घाईत बाजूचा पाण्याचा ग्लास तिच्या आईच्या अंगावर सांडला.
"अरे.. अक्कल आहे का ...?? आई संतापून ओरडली . मोठ्या बहिणीने ही तिची रि ओढली.
"अग जाऊ दे ...आज त्यांचा मान आहे.आंतराष्ट्रीय चहा दिवस आहे ना .. .."पप्पा तिच्याकडे पाहत म्हणाले.
 तिची नजर खाली गेली.
" काही नाही झाले रे .. हे घे पैसे .. जा तू ...त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि जायची परवानगी दिली.
" पप्पा उरलेले पैसे ....?? मोठीने विचारले.
" टीप दिली त्याला. तुमच्या मोठ्या हॉटेलात दरवाजा उघडणार्यालाही टीप देतात ना ..?? मग ह्याने तर मेहनत केलीय . त्याला नको टीप ...?? पप्पांनी नजर रोखून विचारले . काही न बोलता त्या उठल्या.
दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये  बाईक पार्क करताना तो तिच्या समोर आला . दोघेही एकमेकांना पाहून थांबले . तो तिच्याकडे पाहून कसानुसा हसला आणि पुन्हा मान खाली घालून चालू लागला.
ती त्याच्यासमोर आली.
" कालच्या घटनेबद्दल सॉरी... मला माहित नव्हते तू तिथे काम करतो.."
तो चपापला.
" सॉरी कशाला ....?? असे बऱ्याचवेळा घडते. मला सवय आहे त्याची. चला निघुया लेक्चर सुरू होईल.."आणि पुढे चालू पडला.
संध्याकाळी ती त्याचा विचार करीतच घरी आली . पप्पा आरामात टीव्ही पाहत बसले होते.
तिचा चेहरा पाहूनच ते म्हणाले. "भेटला का तो ...?? सॉरी म्हटलेस का त्याला ..."??? 
तिने आश्चर्यचकित होऊन पप्पांकडे पाहिले.
"तुम्ही ओळखता त्याला ...?? तुम्हाला माहीत होते तो माझ्याच कॉलेजात शिकतोय .तरीही काल तुम्ही मुद्दाम आम्हाला तिथे घेऊन गेलात...."ती चिडून म्हणाली .
"होय.. मला माहित आहे तो तुझ्याच वर्गात शिकतोय . मी बऱ्याचवेळा तिथे जाऊन चहा पितो.मला त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे .आणि हो ...हा तुझा बाप एके काळी त्याच टपरीवर लोकांच्या शिव्या खात चहा पाणी देत टेबल पुसत होता.
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

Tuesday, December 10, 2019

नाते

नाते 
ती नुकतीच अनाथाश्रमात सेविका म्हणून रुजू झाली होती. आश्रमतच्या दारात आली तेव्हा अतिशय अशक्त दिसत होती. कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या . मॅडमला तिची दया येऊन आश्रमात ठेवले.तसेही  शेवटी तो अनाथाश्रमच होता. दर चार दिवसांनी दरवाजाजवळ ठेवलेल्या पाळण्यात कोणीतरी नुकतेच जन्मलेले मूल ठेवून जातच होते. आश्रमात  मुलांची कमी नव्हती तर सेवकवर्गाची होती. आता चार दिवसांपूर्वीच नुकतीच जन्मलेली मुलगी कोणतरी ठेवून गेला होताच.आता ही आली . 
दुसऱ्या दिवसापासून तिने सर्व बाळांचा ताबा घेतला . सर्वांचे खाणे ..आंघोळ ...औषधपाणी सर्वांची मनापासून काळजी घेऊ लागली.विशेषतः तिची...जी तिच्या आधी दोन दिवसांपूर्वी त्या आश्रमाच्या पाळण्यात सापडली होती . तिच्याकडे जास्त लक्ष होते तिचे.कदाचित दोघींही तिथे ज्युनियर असल्यामुळे असेल. त्या छोटीलाही तिचा लळा लागलेला दिसून येत होता . तिच्याशिवाय राहतच नव्हती .
दोन वर्षे कशी सरली ते तिला कळलेच नाही.छोटीला ती फारच जपत होती. कोण सधन दांपत्य मूल दत्तक घ्यायला आले की ही तिला  लपवू लागली. बाकीच्या मुलांना पुढे करू लागली . कोणाच्या ते लक्षात येत नव्हते कारण मुलांची संख्या आणि दत्तक घ्यायला येणारे कुटुंब यांचा मेळ बसत होता.कोणीतरी दत्तक जातच होते.
 एके दिवशी बाजारहाट करायला गेली आणि तीच वेळ साधली गेली.घरी आली तेव्हा कळले आज दत्तक म्हणून छोटीचा नंबर लागला होता. ती हादरली.छोटी निघून जाईल याचा ती विचारच करू शकत नव्हती.दोन दिवस आपल्या खोलीत सुन्न होऊन बसली. आश्रमाच्या नियमानुसार कोणी दत्तक घेतले हे सांगायची परवानगी नव्हती .शेवटी ती मनात काहीतरी निश्चय करून उठली.एक दिवस कोणाचे लक्ष नसताना ऑफीसमध्ये शिरली आणि त्यांचा पत्ता शोधून काढला .
दुसऱ्या दिवशी यात्रेला जाण्याचे निमित्त काढून आश्रमाबाहेर पडली आणि त्या पत्त्यावर पोचली .  पत्ता दुसऱ्या शहरातील होता त्यामुळे शोधायला वेळ लागला पण शेवटी मिळाला . छान एकमजली छोटा बंगलाच होता तो . ती धडधडत्या अंतकरणाने आत शिरली. समोर एक तरुण पेपर वाचत बसला होता . तिला अचानक समोर पाहून तो हादरला आणि तिनेही तोंडावर हात ठेवून येणारी किंकाळी दाबून ठेवली . 
"तू ......!!आश्चर्याने तो ओरडला .
"तुम्ही ....!! तीही तेव्हडीच आश्चर्यचकित होऊन म्हणाली .
"परत माझ्या आयुष्यात येशील असे वाटले नव्हते. आपल्यात जे काही झाले ती फक्त मजा होती . तुझ्यापासून मूल होणे कधीच मान्य नव्हते मला . मी आता सुखी आहे . बायकोची प्रचंड इस्टेट आहे तिचा पूर्ण उपभोग घेतोय मी .एक मुलगी ही झालीय आम्हाला ..तू निघून जा इथून ",तो चिडून म्हणाला .
काही न बोलता ती वळली . दारात जातात हळूच हसली . छोटीचे परिचित रडणे इथपर्यंत ऐकू येत होते तिला.शेवटी तिच्या मुलीला तिचे घर मिळाले होते .
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

Friday, December 6, 2019

वेळ

वेळ
शेवटी अप्पा कुडाळकर गेले ... ..अर्थात ते रात्री झोपेतच गेले.त्यामुळे आता डॉक्टर जी वेळ लिहितील ते मान्य करावेच लागेल.रात्री देवाला हात जोडताना पाहिले ते शेवटचे...असे प्रकाश म्हणतो.बरोबर आहे म्हणा.... हा उठतो तो पहिला बाथरूममध्ये घुसतो मग चहा पिऊन सरळ बाहेर चालू पडतो.त्या दिवशीही तो नेमका पुण्याला निघाला होता.अलकाचा फोन आला तेव्हा लोणावळ्याला पोचलाही होता.तिथून परत फिरला तेव्हा मनात म्हणाला बाबांची वेळ वाईट निघाली.
अलका नेहमीप्रमाणे साडेसातला उठली.स्वतःचे आवरेपर्यंत आठ वाजले.बाबा अजून कसे उठले नाहीत....?? म्हणून पाहायला गेली तेव्हा अप्पा ताठ झालेले. ही घरात एकटीच ..तिने पहिला फोन प्रकाशला केला.मग डॉक्टरला फोन केला .डॉक्टर बाहेरगावी गेलेले म्हणून दुसऱ्या डॉक्टरची शोधाशोध.  फोन करता करता मनात म्हणाली  बाबांची वेळ वाईट आहे.
मला फोन आला तेव्हा मी नुकताच  ऑफिसमध्ये शिरलो होतो.आता परत फिरणे शक्य नव्हते.दोन तीन फाईल आज क्लियर करायच्याच होत्या.कस्टमरही बाहेर येऊन बसले होते . मोकळा होईपर्यंत संध्याकाळ झाली असती.घरचे संबंध आणि अप्पाच्या अंगाखांद्यावर खेळलो असल्यामुळे ताबडतोब हजर रहाणे गरजेचे होते. पण आतातरी ते शक्य नव्हते . मनात म्हटले म्हाताऱ्याने वेळ काही चांगली गाठली नाही.
बंड्याने माझा फोन येताच बाईकला किक मारली . थोडे अंतर जाताच पाऊस सुरू झाला.भेxxx हल्ली पावसाचे काही खरे नाही .कधीही येतो  सिझन संपला तरी जात नाही . आता असेच चालू राहिले तर कोण येईल प्रेतावर .च्यायला....!!अप्पांची वेळच वाईट.
हरी कधी नव्हे तो अलिबागला गेला होता. माझा फोन गेला तेव्हा स्वारी एकदम हवेत होती . अप्पांचे सांगितले तेव्हा पहिल्यांदा बंड्या करेल सर्व... असे सांगून फोन कट केला . पण काही वेळाने त्यानेच परत फोन करून सर्व माहिती विचारली. रात्रीच गेलेत म्हटल्यावर काळजीत पडला.बंड्याला सांग अप्पांच्या हातापायांना तेल लावीत राहा नाहीतर म्हातारा कडक होईल. खोलीतून बाहेर काढायचे वांधे होतील ..असे सांगून मी येतोय असा निरोप ही दिला.सल्ला दिला. फोन ठेवता ठेवता म्हणाला" च्यायला... म्हाताऱ्याची वेळच  वाईट आहे.
विक्रमला फोन गेला तेव्हा तो नुकताच उठला होता.त्यानेच ताबडतोब अप्पाच्या घरी जाऊन सगळी सूत्र ताब्यात घेतली होती .डॉक्टर सर्टिफिकेटसाठी चार ठिकाणी फिरत होता . त्यात पाऊस सुरूच होताच. शेवटी कुठेतरी ओळखी लावून एक डॉक्टर गाठला आणि सर्टिफिकेट घेऊन आला . तोपर्यंत साफ भिजून गेला होता . सर्टिफिकेट घेऊन स्मशानात गेला तेव्हा क्लार्क ने सांगितले "लाकडे भिजली आहेत.. काहीतरी जळण आणि भरपूर रॉकेल घेऊन या". "इलेक्ट्रिक वर घ्या...." विक्रम तडकून म्हणाला.
"दोन महिने झालेत ..इलेक्ट्रिक बंद आहे . सुशोभीकरण चालू आहे भट्टीचे ...तो क्लार्क थंडपणे म्हणाला. चिट्ठी घेऊन विक्रम बाहेर पडला आणि बाईकला किक मारत मनात म्हणाला च्यायला... म्हाताऱ्याची वेळच वाईट आहे . 
संध्याकाळी सगळे जमा झाले .हरीने सवयीनुसार सगळे सोपस्कार पार पाडले आणि  नेहमीसारखा प्रकाशच्या खांद्यावर हात टाकून स्मशानाबाहेर पडला. निघताना त्याने हळूच विक्रमला इशारा केला . विक्रमने नकारार्थी मान डोलावताच त्याने रागाने डोळे फिरवले . प्रकाशला टॅक्सीत बसवून तो आमच्याजवळ आला . "अरे सामान नाही कसे ...?? तो चिडून म्हणाला . "हरीभाऊ... आज ड्राय डे आहे .सर्व बंद .. चला आज असेच घरी .. सदा हसत म्हणाला . तसा हरीचा चेहरा पडला . आम्ही सर्व एकदम म्हणालो म्हाताऱ्याची वेळच वाईट निघाली. 
आदल्या रात्रीची गोष्ट 
नेहमीप्रमाणे तो दूत आपले सावज शोधत फिरतच होता . सकाळीच त्याच्या बॉसने अर्थात यमराजाने त्याच्यावर खुश होऊन त्याला आवडेल त्या व्यक्तीला घेऊन येण्याची परवानगी दिली होती . पण तेव्हापासून योग्य असा माणूस त्याला भेटलाच नव्हता .फिरत फिरत तो नेमका अप्पा कुडाळकरांच्या घरात शिरला .अप्पा शांतपणे  देवासमोर हात जोडून उभे होते . त्यांच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते.
" देवा.... खूप छान आयुष्य दिलेस मला.सर्व बाबतीत मी सुखी आहे .आता मरणही असेच चांगले दे .माझ्या घरच्यांना माझा त्रास नको. झोपेतच शांतपणे मरण दे हीच इच्छा.असे बोलून अंथरुणात शिरले . दूत हसला आणि हातातील फार शांतपणे अप्पाच्या दिशेने फेकला .खरेच अप्पाची वेळ वाईट होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Thursday, December 5, 2019

शिक्षा

शिक्षा
नवीन प्रोजेक्ट हातात आल्यापासूनच त्याचे टाईमटेबल बिघडले होते.प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागणार होता.घरी जाण्याची वेळ नक्की नव्हतीच.आजही तो रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबला होता. सर्व आवरून बाहेर पडेपर्यंत रात्रीचे अकरा झाले. नेहमीच्या हॉटेलात दोन पेग मारून पोटभर जेवून तो बाहेर पडला तेव्हा बुक केलेली खाजगी टॅक्सी समोर उभी राहिली.ओटीपी नंबर ड्रायव्हरला देऊन मागच्या सीटवर त्याने स्वतःला झोकून दिले. ठिकाण आले की तो उठवेलच याची खात्री होतीच . काही क्षणातच त्याला डुलकी लागली.
 अचानक त्याला जाग आली . डोळे उघडून पाहिले तर कॅब ड्रायव्हर बाहेर पडून एका मुलीशी बोलत होता . निरखून पाहिले तर ती एक सुंदर तरुणी होती . बाजूलाच तिची ऍक्टिवा उभी होती.
"काय झाले रे ....?? त्याने थोडे चिडूनच विचारले तसा ड्रायव्हर जवळ आला.
"सर तिची  स्कुटर बंद पडली.म्हणून मी थांबलो.."
"ठीक आहे... तिला दुसरी कॅब बघून दे ... "तो चेहऱ्यावर त्रासिक भाव आणत म्हणाला.
"सर...ती मघापासून ट्राय करतेय.पण यावेळी कॅब नाही मिळणार तिला . आपण तिला लिफ्ट देऊया का ...?? तुम्हाला सोडून मी तिला सोडेन . मलाही ताबडतोब भाडे मिळेल.."" ड्रायव्हर म्हणाला.
"अरे बाबा...कशाला नको ती जबाबदारी अंगावर घ्या . पाहिजे तर इथे थांबू दुसरी सोय होईपर्यंत.पण आपल्याबरोबर नको.."तो चिडूनच म्हणाला.
त्याचे बोलणे फारच लांबतेय हे पाहून ती तरुणी पुढे आली आणि कॅबच्या प्रकाशात त्याला स्पष्ट दिसली .अर्थात नेहमीप्रमाणेच आधुनिक वेशभूषा केलेली ती तरुणी होती . चेक्स शर्ट ..जीन्स ..हातात स्मार्ट वॉच ...कानात कॉर्डलेस...पण चेहऱ्यावर भीती नाही . सहजपणे त्याच्याकडे नजर भिडवून पाहत होती . त्यांची नजरानजर होताच ती हसली आणि पुढे आली.
"ठीक आहे.... घे तिला...पण तिला आधी सोडू मग मला ..."
तशी ती थँक्स म्हणत ड्राइव्हरच्या बाजूला बसली.
  अचानक चार तरुण गाडी समोर उभे राहिले.ड्राइव्हरने गाडी सुरू करायचा प्रयत्न केला इतक्यात मागच्या सीटवर बसलेला तो ...रागाने बाहेर आला.
" कोण आहात तुम्ही ..."?? काय पाहिजे तुम्हाला ...?? त्याने  चिडून विचारले. ते चारही तरुण त्याच्या दिशेने सरकू लागले.
" हे बघा... सगळे पैसे घ्या पण आम्हाला सोडा.."ती तरुणी हात जोडीत म्हणाली.
 तसे त्यातील एकाने ड्रायव्हरला निघून जाण्याचा इशारा केला. पडत्या फळाची आज्ञा मानून ड्राइव्हर  त्या तरुणीसह ताबडतोब पसार झाला.काही अंतर जाताच त्या तरुणीने ड्रायव्हरला पोलिसांना फोन करून  ही घटना कळविण्याची विनंती केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती थोडया उशिरानेच उठली . टीव्ही ऑन करून बातम्या पाहत असताना स्क्रिनवर तिला अपेक्षित असणारी न्यूज आली.मल्टिनॅशनल कंपनीत काम करण्याऱ्या एका तरुणाला लुबाडून नंतर हत्या .. हत्येपूर्वी त्या तरुणावर अमानुष बलात्कार झाला . बातमी वाचताच ती हसली.
इतक्यात तिचा मोबाईल वाजला . पलीकडून एक तरुणी बोलत होती . ताई बातमी वाचली का ..?? त्या नराधमाला अशीच शिक्षा पाहिजे . सभ्यपणाचा आव आणत गेले सहा महिने  माझ्यावर अत्याचार करत होता तो . तोंड दाबून ते सहन करीत होते मी . पण तुमच्यामुळे त्याला शिक्षा झाली . तुमचे खूप खूप आभार .भविष्यात असल्या कामासाठी कोणतीही मदत करायला मी तयार आहे ." तिने थँक्स बोलून फोन ठेवला . काही वेळाने पुन्हा फोन हातात घेऊन एक नंबर फिरवला आणि समोरच्याला विचारले आता पुढचा नंबर कोणाचा आहे ..."???
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, November 29, 2019

द फुल कबर्ड ऑफ लाईफ .. अलेक्झांडर स्मिथ

द फुल कबर्ड ऑफ लाईफ .. अलेक्झांडर  स्मिथ 
अनुवाद ....नीला चांदोरकर 
मेहता पब्लिकेशन हाऊस
द नंबर वन लेडीज डिटेक्टिव्ह एजन्सी च्या लेखकाची ही पुढील कादंबरी पण ही पहिल्या पुस्तकाप्रमाणे पकड घेत नाही.
यावेळी मॅडम रामोत्वे आपल्या लग्नाची स्वप्न पाहतायत . त्यांचा भावी पती मि. मातेकोनी  मोटर मेकॅनिक आहे . अतिशय साधभोळा गृहस्थ नेहमी अडचणीत सापडलेल्याना  मदत करीत असतो .कोणाला नाही म्हणणे त्याला आवडत नाही त्यामुळेच  तो नवीन अडचणीत सापडला आहे . अनाथाश्रमासाठी देणगी जमविण्यासाठी त्याने विमानातून उडी मारण्याचा संचालिकेला शब्द दिलाय . अर्थात आपण चुकीचे करतोय हे त्याला माहित आहे . पण त्या संचालिकेला तो नाही म्हणू शकत नाही.
 दुसरीकडे मॅडम  रामोत्वेला नवीन कामगिरी आलीय . एका धनाढ्य स्त्रीने लग्नासाठी चार पुरुष निवडले आहेत. यातील योग्य पुरुष कोण...??  पैश्यासाठी कोण लग्न करण्यास उत्सुक आहेत..??  हे शोधून काढायची कामगिरी दिलीय . योग्य पुरुषाची निवड करणे थोडी अवघड गोष्ट आहे पण मॅडम रामोत्वे ही कामगिरी नक्कीच यशस्वी करेल .
ही कादंबरी फारशी पकड घेत नाही . कदाचित अवघड उच्चारातील शब्द असतील किंवा अनुवाद करताना जसेच्यातसे शब्द आणि त्याचा तंतोतंत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे  म्हणून असेल . पण वाचक त्यात गुंतून जात नाही . मध्येच कंटाळा येतो आणि पुस्तक बंद करावे लागते . एक लिंक लागत नाही .

Sunday, November 24, 2019

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक.. य. दि. फडके

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक.. य. दि. फडके
श्रीविद्या प्रकाशन पुणे 
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जसा थोर नेत्यांचा हात आहे तसेच अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकरकांचाही मोठा सहभाग आहे .  त्यांनी आपल्यापरीने ठिकाठीकाणी सशस्त्र उठाव केले . उन्मत्त अधिकाऱ्यांना ठार केले . शास्त्रास्त्रासाठी खजिने लुटले .यातील बऱ्याच क्रांतीकारकांना लोकमान्य टिळकांचा छुपा पाठिंबा होता असे म्हटले जाते . त्यावेळच्या गुप्त पोलीस अहवालात याची नोंद आहे. या पुस्तकात 1897 ते 1920 या काळातील मराठी क्रांतिकारकांनी देशभरात केलेल्या उलाढालीचा इतिहास कागदपत्रांच्या आधारे लिहिला गेला आहे . १८९७ साली चाफेकर बंधूनी रँडचा खून केला . त्यामागे टिळकांचे आशीर्वाद होते असे म्हटले जाते .कोल्हापूरचा शिवाजी क्लब टिळकांना आदर्श मानत होता . तर शाहू महाराज आणि टिळकांच्या अनेकवेळा चर्चा होत होती. योगी अरविंद घोष ही प्रारंभीच्या काळात सशस्त्र क्रांतिकारक होते .  तेही  बराच काळ टिळकांच्या संपर्कात होते . नंतर ते पोंडेचरीत जाऊन योगी अरविंद बनले .लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरूनच नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर  उर्फ काकासाहेब खाडिलकर दोन वर्षे नेपाळात वास्तव्य करून होते .शिवाजी क्लबच्या सभासदांच्या सहकार्याने बंदुका तयार करण्याचा कारखाना घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता . तर बाबाराव आणि  तात्याराव सावरकर यांची अभिनव भारत संघटना ही टिळकांचा आदर करीत होती .

बहुरूपी ….. नारायण धारप

बहुरूपी ….. नारायण धारप 
साकेत प्रकाशन 
नारायण धारपांची एक मसाला कथा. जसे इतर लेखक लिहितात तशी ही तद्दन फिल्मी कथा. यात गुढकथाकार नारायण धारप कुठेही दिसून येत नाहीत. 
एक नट जो गरीब आहे .कामाच्या शोधात आहे. अचानक त्याला भेटायला एक राजघराण्याची राणी येते . तिचा मुलगा युवराज त्याच्यासारखा  दिसतो . पण तो सदैव नशेत असतो.काही महत्वाच्या कामासाठी त्याची जागा या नटाने घ्यावी अशी विनंती करते आणि तो नट ते आव्हान स्वीकारतो.राजवाड्यात शिरण्यापासून युवाराजांच्या निकट पोचण्यासाठी त्याला विविध भूमिका वठवाव्या लागतात त्यासाठी वेषांतर ही करावे लागते . शेवटी तो राजमहालातील  कट कारस्थान शोधून काढतो . युवाराजांना सरळ मार्गावर आणतो . कारस्थानातील खरा सूत्रधार उजेडात आणतो. आणि पुन्हा आपल्या मार्गाला निघून जातो.

मायक्रो ... मायकेल क्रायटन / रिचर्ड प्रेस्टन

मायक्रो ... मायकेल क्रायटन / रिचर्ड प्रेस्टन 
अनुवाद.... डॉ. प्रमोद जोगळेकर 
मेहता पब्लिकेशन
होनोलुलूमधल्या एका बंदिस्त ऑफिसमध्ये तीन माणसे मृत्युमुखी पडलेले सापडतात. तिघांच्याही अंगावर धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा होत्या.त्यातील एकजण नुकताच नॅनीजेन कंपनीच्या ऑफिसची गुप्त पाहणी करून आला होता.
नॅनीजेन ही सूक्ष्मजीवशास्त्रावर संशोधन करणारी आघाडीची कंपनी आहे.हवाई बेटावर त्यांची अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे.हवाईच्या घनदाट वर्षारण्यात त्यांचे संशोधन चालू आहे.
नॅनीजेन केंब्रिजमधील सात विद्यार्थ्यांना हवाई येथे संशोधनासाठी आमंत्रित करते.त्यात पीटर ही आहे ...ज्याचा भाऊ  नॅनीजेनचा उपाध्यक्ष होता आणि अचानक बोटीवरून नाहीसा झालाय.
 पीटर हा विषारी द्रवे आणि विषबाधा या विषयात तज्ञ आहे . रिक वनस्पतीशास्त्राचा  अभ्यास करतोय .कॅरेन ही तरुणी  कोळी विंचूसारख्या प्रजातीचा अभ्यास करतेय .एरिका  किटकशास्त्र तज्ञ आहे.अमरसिंग हा वनस्पतींमधील हार्मोन्सवर अभ्यास करणारा तरुण आहे .जेनी ही तरुणी वनस्पती आणि प्राण्यांमधील रासायनिक संदेशवहन गंधाचा अभ्यास करतेय .तर डॅनी  आकृतिबंधातील रचनात्मक बदल या विषयावर पीएचडी करतोय . असे हे सात विद्यार्थी एकत्र येतात आणि त्यांना नॅनीजनने केलेल्या अविश्वसनीय प्रयोगाची माहिती मिळते.त्याचबरोबर पीटरच्या भावाचा खून ड्रेक या नॅनीजेनच्या अध्यक्षांनी केलाय हे ही कळते . ड्रेक त्यांच्यावर आपला हुकमी प्रयोग करतो आणि त्यांना हवाईच्या घनदाट वर्षारण्यात सोडून देतो. आता ते सातजण आणि त्यांच्यासोबत प्रयोगात ओढला गेलेला नॅनीजेनचा एक कर्मचारी  अश्या वातावरणात आहेत जिथे पावलोपावली मृत्यू आहे .  त्यांची शारीरिक ताकद ही काही उपयोगाची नाही . त्यांना आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचाच  वापर करून आपल्या मूळ स्वरूपात परतायचे आहे.  
मायकेल क्रायटन हे प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक . त्यांची ज्यूरासिक पार्क कादंबरी खूप गाजली . ही कादंबरी पूर्ण होत असताना मृत्यूने त्यांना गाठले  तेव्हा रिचर्ड  प्रेस्टन यांनी ही कादंबरी पूर्ण केली .

Tuesday, November 19, 2019

हॅपी मेन्स डे

हॅपी मेन्स डे
कसल्यातरी आवाजाने त्याला अचानक जाग आली . डोळे उघडून पाहिले तर अंथरुणात बापाची चुळबुळ चालू होती . सवयीनुसार डोक्याजवळच्या मोबाईलकडे हात गेला . पहाटेचे साडेचार झाले होते. बाबांनी अंथरुणात लघवी  केलीय हे त्याच्या लक्षात आले .  झोपुया का अजून तासभर.....??  त्याने विचार केला . पॅड तर बांधले होते . काय करणार होते ते..?? गेले वर्षभर अर्धागवायूने अंथरुणात एका जागीच पडून होते. नाही पॅड बदलले तर थोडीच उठून मारणार होते...एक बाजू पूर्ण निकामी होती त्यामुळे बोलूही शकत नव्हते .झोप सहन न होवून त्याने कुस बदलली आणि परत झोपेची आराधना करू लागला.
 पण आता झोप येणे शक्य नव्हते . अंगावरचे पांघरूण बाजूला फेकून तो उठला. काही न बोलता तो त्यांच्या बेडजवळ आला.त्याला जवळ आलेले पाहताच बाबा ओशाळवाणे हसले.त्याच्या नजरेतील ते भाव पाहून तो आश्वासक हसला.अलगद त्याने त्यांना उचलले.बाजूच्या आरामखुर्चीत ठेवले.त्यांच्या बेडवरील चादर बदलली . मग पॅड काढून साफ केले दुसरा पॅड लावला . एक गोळी त्यांना देऊन पुन्हा बेडवर झोपविले.तोपर्यंत सहा वाजलेच होते.
आता आपली तयारी करू असे पुटपुटत तो गॅलरीत उभा राहिला.समोरच्या बिल्डिंगमध्ये त्या फ्लॅटची लाईट लागली होती . बाथरूममध्ये एक काया शॉवर घेताना दिसत होती . तिची पूर्ण आंघोळ होईपर्यंत तो थांबला."साला... आयुष्यात हाच एक टाईमपास आहे..." स्वतःशी हसत तो मनात म्हणाला.गपचूप तोंडात ब्रश कोंबत टॉयलेट मध्ये घुसला .
नेहमीप्रमाणे एका बाजूला नाश्ताची तयारी करत त्याने स्वतःची ही तयारी केली . मग पुन्हा बाबांना साफ केले त्यांची तयारी करून त्यांना नाश्ता भरविला ."तुम्ही असे बघत जाऊ नका हो... काही त्रास नाही मला तुमचा .. ...कशाला स्वतःला पांगळे समजतायत.मी आहे तोपर्यंत काळजी घेईन तुमची.." त्यांचा केविलवाणा चेहरा पाहून अचानक तो खेकसला."आज तुमच्याजागी मी असतो तर तुम्ही ही असेच केले असते माझ्यासाठी.." बाबा कसेबसे हसले . त्यांना नेहमीची औषधे देऊन तो निघायची तयारी करू लागला.बाबांची काळजी घेणारा नेहमीचा माणूस येताच तो त्याच्या हातात घराची चावी घेऊन देऊन निघाला . 
सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडताना समोरच्या बिल्डिंगच्या गेटमधून बाहेर पडताना ती दिसली . पाठीमागून शेप पाहतच सकाळची आंघोळ त्याला आठवली .तिच्या मागूनच तो निघाला .
ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे उशिराच पोचला आणि आल्याआल्या आत बोलावणे आले . बाजूच्याने हसत बोटाने तासण्याची ऍक्शन केली तसा तोही हसला.केबिनचा दरवाजा उघडून  आत शिरला तेव्हा ती त्याच्याकडे रोखूनच पाहत होती.पुढची पंधरा मिनिटे तो शांतपणे शिव्या खात उभा होता . खरे तर रागाने फुललेला तिचा चेहरा पाहून त्याला आतमध्ये सुखद भावना होत होत्या.खरेच काहीजणी रागावल्यावरच सुंदर दिसतात हे खरे ... अचानक तिने  त्याच्या डोळ्यात रोखून पाहिले आणि त्यातील भाव तिने ओळखले."गेट आउट ..."ती रागाने कडाडली. तो बाहेर पडला . दुपारी लंचपर्यंत घरी तीनदा फोन करून बाबांची तब्बेत विचारून घेतली.
कॅन्टीनमध्ये ती त्याच्यासमोर येऊन बसली . स्वतःचा डबा उघडून त्याच्यासमोर ठेवला. त्याने हसून थोडी भाजी स्वतःच्या ताटात घेतली."
कसे आहेत बाबा ....?? 
त्याने ठीक अशी मान हलवली .
"आपण लग्न कधी करायचे ..."?? तिने नेहमीचा प्रश्न विचारला.
"बाबा आहेत तोपर्यंत नाही.." त्यानेही नेहमीचेच उत्तर दिले.
" वय उलटून जातील आपली .मला काहीच प्रॉब्लेम नाहीय.आपण दोघेही सांभाळू त्यांना .."ती चिडून म्हणाली.
"तो प्रॉब्लेम माझा आहे. मीच सोडविन.तुम्हाला  थांबायचे  नसेल तर तू मोकळी आहेस.च्यायला ...लहानपणीच आई गेली तेव्हा त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही ..न कळत्या वयापासून मला सांभाळले. मग आज माझी जबाबदारी आहे त्यांना सांभाळायची.."
तिने हताशपणे त्याच्याकडे पाहिले."तीन वाजता मिटिंग आहे ..सर्व पेपर्स घेऊन तू माझ्यासमोर पावणे तीनला हजर पाहिजे . कसलीही कारणे चालणार नाहीत ....आणि हो ...हॅपी मेन्स डे ...."करड्या स्वरात बोलून ती निघाली . 
संध्याकाळी तो नेहमीसारखा घरी आला . नोकरकडून चावी घेऊन त्याला मोकळे केले .नंतर सर्व तयारी करून कपाटातील बाटली आणि ग्लास घेऊन बाबांजवळ बसला.
"आज तिने पुन्हा लग्नाचे विचारले आणि मी नाही म्हटले... मित्राशी बोलावे तसे तो त्यांच्याशी बोलू लागला..."कामावर तिला बॉस म्हणून सहन करतो पण इथेही  तिची बॉसगिरी चालेल याची भीती वाटते. तुम्ही आहात तोपर्यंत मजेत राहू दोघे .नंतर पुन्हा कैद आहेच. सध्यातरी मस्त चाललंय आपले ...हॅपी मेन्स डे बाबा.." आणि हातातील ग्लास उंचावून त्याने मोठा घोट घेतला . मग हळूच गॅलरीत येऊन उभा राहिला . समोरच्या बेडरूममध्ये कपडे बदलताना तिची कमनीय सावली दिसत होती .
शेवटी काय men will be men always .

© श्री .किरण कृष्णा बोरकर

Saturday, November 16, 2019

सॅक्टस.... सायमन टॉयन

सॅक्टस.... सायमन टॉयन
अनुवाद... उदय भिडे 
मेहता पब्लिकेशन
टर्कीमधील रुईन शहरातील डोंगराळ भागात  एक अतिशय पुरातन शक्तीपीठ आहे.हे शक्तीपीठ पूर्ण स्वायत्त असून कोणत्याही राष्ट्राची त्यावर सत्ता नाही .सॅम्युअल हा शक्तीपीठातील उच्च श्रेणीतला संन्यासी . त्याने  नुकतीच एक अतिशय खडतर अशी अंतिम दीक्षा घेतली आहे . पण अचानक तो शक्तीपीठाच्या डोंगरावर चढून गेला आणि टी आकाराचा क्रॉस करून स्वतःला झोकून दिले. त्याचे खाली पडणे ही एक विशिष्ट क्रिया होती . सर्व जगाने आपली ही कृती पहावी म्हणून तो चार तास त्या एकाच ठिकाणी टी आकार बनवून उभा होता .
जगाला ही एक विचित्र आत्महत्या वाटली . पण तिथे असेही काही लोक होते त्यांना ती घटना म्हणजे एक संकेत होता ज्याची ते प्रदीर्घ काळ वाट पाहत होते .
शक्तीपीठात राहून आपली ओळख लपवणाऱ्या विशिष्ट पोशाख घालणाऱ्या अतिशय गुप्तता बाळगत काम करणाऱ्या या महासत्तेचा अंत होण्याचे हे लक्षण होते .
पण पोलिसांना अजूनही सॅम्युअलची ओळख पटलेली नाही . पोस्टमार्टेम करताना त्याच्या शरीरात एक चामड्याचा पट्टा सापडतो त्यावर एक फोन नंबर लिहिलेला असतो. तो फोन नंबर त्याच्या बहिणीचा आहे . गुन्हे पत्रकार असलेली त्याची बहीण लिव्ह  भावाचे शव ताब्यात घ्यायला रुईन शहरात पोचते. पण विमानतळावरच तिच्यावर हल्ला होतो . शक्तीपीठ आपल्या पूर्ण ताकदीनिशी तिच्या आणि सॅम्युअलच्या शवामागे लागते .ते सॅम्युअलचे शव पळविण्यात यशस्वी होतात पण प्रत्येकवेळी लिव्ह वाचते . तिला वाचवणाऱ्या लोकांना शक्तीपीठाचा अंत होणार हे ठाऊक आहे .आणि त्याला कारणीभूत लिव्ह ठरणार हेही माहीत आहे .
असे कोणते रहस्य शक्तीपीठाने लपवून ठेवले आहे ..?? कोणते भयानक विधी त्या ठिकाणी चालतात..?? ज्याच्यासाठी शक्तीपीठ आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचा नाश करते . एक रहस्य वाचविण्यासाठी भयानक असे खूनचक्र रुईन शहरात चालू झाले आहे . लिव्हशी संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा यात बळी पडणार आहे .मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असो .
प्रत्येक पानावर उत्कंठा वाढविणारे एक थरारक रहस्य .

Friday, November 15, 2019

एक बालदिन

एक बालदिन 
"अग कार्टे......!!  हजारवेळा सांगितलेय ..नको त्या वस्तूशी खेळूस.ठेव तो स्प्रे कोपऱ्यात .डोळ्यात गेला तर डोळे जातील कामातून..सातवीत गेली तरी अजून अक्कल आली नाही अजून...." आई तिच्या हातातून तो हिटचा स्प्रे काढत ओरडली.
आज बालदिनची सुट्टी होती. ती नेहमीसारखी घरात एकटीच खेळत बसली होती.नेहमीसारखी आईची आरडाओरड चालूच होती.अचानक कपाटाच्या कोपऱ्यातील तो स्प्रे तिच्या हाती लागला. तिने तो बाहेर काढला आणि आईचे लक्ष तिच्याकडे गेले.
झाले ... !! ताबडतोब तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला . नाईलाजाने तिने तो स्प्रे बाजूला ठेवला आणि टीव्ही चालू केला . पंडित नेहरूंचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात सारेजण बालदिन म्हणून साजरा करत होते . ती टीव्ही बघण्यात गुंतून गेली.
इतक्यात त्याचा आवाज तिच्या कानी पडला."राणीसाहेब काय करतायत ..."?? 
आवाज  ऐकूनच ती शहारली . शेजारचे काका तिच्याकडे डोळे रोखुनच पाहत होते.ओठावरून जीभ फिरवत अंगावरून फिरणारी त्यांची नजर तिच्या अंगावर काटा आणत होती. खरे तर तिला त्या काकांचा खूप राग येत होता.संधी मिळेल तेव्हा तिच्या अंगाला स्पर्श करायची संधी ते सोडत नव्हते.तीने आपल्या मैत्रिणीला बऱ्याचवेळा ही गोष्ट सांगितली पण ती तरी काय करणार .या गोष्टीची समज दोघीनाही नव्हती. पण हिला काहीतरी वाईट घडतेय इतकेच माहीत होते.घरच्यांना सांगून काही उपयोग होईल असे वाटत नव्हते.ते काका तर संध्याकाळी बाबांबरोबरच पियाला बसायचे ..तर आई दिवसभर लोकांच्या घरी कामात..आणि तसेही कोणी ही गोष्ट तितक्या गांभीर्याने घेतलीही नसती.
"ओ भाऊ...!!  तुम्ही होय ... बरे झाले तुम्ही आलात" आई बाहेर येत म्हणाली "घेऊन जा हिला तुमच्याकडे . घरात राहिली तर काहीतरी तोडफोड करेल .आणि तशीही मी कामालाच चालली आहे . लक्ष ठेवा हिच्यावर"
 ती नाराजीने नको नको म्हणाली.पण आईच्या वटारलेल्या डोळ्यापुढे काहीच चालले नाही.त्याने ओठाच्या कोपऱ्यातून छद्मीपणे हसत तिचा हात धरला आणि आईला न कळेल असा कुरवाळला . एक भीतीची थंडगार सणक तिच्या शरीरातून गेली.
"चल राणी.. आपण मजा करू.." तो हलकेच तिच्या कानात कुजबुजला. ते तिघेही एकत्रच घराबाहेर पडले.
" हे बघ... मी दुपारीच जेवायला येईन.तोपर्यंत काकांकडे रहा.बाहेर हुंडडायला जाऊ नकोस."
ती रडवेल्या चेहऱ्याने काकांच्या घरात शिरली . काकांनी तिला पलंगावर बसविले आणि टीव्ही चालू केला .आज टीव्हीचा आवाज नेहमीपेक्षा मोठाच आहे हे तिला जाणवले.धडधडत्या मनाने ती बसून राहिली . त्याने आत जाऊन थंडगार सरबत तिला आणून दिले . एरव्ही त्या सरबतावर उडी मारणारी ती.. आजमात्र चुपचाप बसली होती.तो अलगत तिच्या बाजूला बसला. सहज बोलता बोलता तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती शहारली.पटकन हात  झटकून  ती पलंगाच्या कोपऱ्यात सरकली. एकाएकी त्याच्या डोळ्यात हिंस्र भाव उमटले.त्याने तिला अजून कोपऱ्यात ढकलले. ती जिवाच्या आकांताने सुरकेसाठी इथे तिथे पाहू लागली आणि अचानक पलंगाच्याखाली कोपऱ्यात तिला हिट स्प्रे दिसला.
तो दिसताच तिला आईचा सकाळचा ओरडा आठवला . कसातरी लांब हात करून तिने तो स्प्रे हातात घेतला. तोपर्यंत त्याचा हात तिच्या छातीपर्यंत पोचला होता . दातओठ खात तिने तो स्प्रे त्याच्या डोळ्यासमोर धरला आणि अंगातील ताकदीनीशी खटका दाबला.एक मोठा फवारा त्याच्या तोंडावर पसरला.जोरात आरोळी ठोकून तो बाजूला झाला . आणि चेहऱ्यावर हात घेत गडबडा लोळू लागला . तिच्याही डोळ्यात आता रक्त उतरले होते .पुन्हा एकदा तो स्प्रे त्याच्या चेहऱ्यासमोर धरून जोरात दाबला. त्याला तसेच लोळत ठेवून ती दरवाजा उघडून बाहेर पळाली आणि सुटकेचा श्वास घेतला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर 

Thursday, November 7, 2019

तिबेटच्या वाटेवर .....सॅब्रिए टेनबर्कन

तिबेटच्या वाटेवर .....सॅब्रिए टेनबर्कन
अनुवाद......वंदना अत्रे
मेहता पब्लिकेशन 
तिबेटमधील नैसर्गिक वातावरणामुळे जन्मतः अंधत्व येणाऱ्या मुलांचे प्रमाण जास्त आहे . शिवाय तिथे त्या मुलांसाठी सुखसोयी नाहीत . भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नाही . लहान वयातच भीक मागून कुटुंबाचा आधार बनण्याची पाळी त्यांच्यावर येते .  पण अश्यावेळी एक परदेशी अंध मुलगी त्यांच्या मदतीला धावून येते . कोणाचाही आधार न घेता  ही मुलगी अर्थात लेखिका सॅब्रिए जर्मनीतून तिबेटमध्ये येते .तिच्याकडे आहे फक्त आत्मविश्वास आणि आपल्या कार्यावर असलेली निष्ठा. ती तिबेटी भाषा ब्रेन लिपीत आणते .पण हे सर्व इतके सोपे नाही . धडधाकट व्यक्ती त्या वातावरणात राहू शकत नाही तिथे एक अंध मुलगी तिथल्या अंध मुलांसाठी पहिली शाळा उभारते. पुढे त्या छोट्या बीजाचे भव्य संस्थारूपी वटवृक्षात रूपांतर होते . 
आपले अंधत्व कधीही अपंगत्व ठरणार नाही किंबहुना आपण तसे घडू द्यायचे नाही हाच मंत्र सतत मनाशी जपणाऱ्या अंध सॅब्रिएचा हा तेजोमय संघर्ष वाचायलाच हवा .

Tuesday, November 5, 2019

असूरवेद.... संजय सोनवणी

असूरवेद.... संजय सोनवणी 
प्राजक्त प्रकाशन
एकूण वेद किती आहेत ....?? एकूण चार वेद आहेत ही पूर्वांपार चालत आलेली कल्पना . आपल्याला तर तेच माहित आहे . पण प्रोफेसर जोशींना एक जुने अतिप्राचीन हस्तलिखित सापडले. प्रो. जोशी हे आंतराष्ट्रीय कीर्तीचे पुरातनतज्ञ आहेत . आतापर्यंत त्यांनी अनेक निबंध सादर केले आहेत . त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो . पण हे अतिप्राचीन हस्तलिखित वाचून  तेही हादरतात. हिंदू संस्कृतीचा अर्थ बदलणारा पुरावा त्यांच्या हाती सापडला आहे याची जाणीव त्यांना होते . काही ठराविक लोकांना ते याविषयी सांगतात आणि नंतर त्यांची गोळ्या घालून हत्या केली जाते . आता ती माणसे त्या रहस्यमय हस्तलिखिताच्या मागे लागली आहेत . त्यासाठी अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलावरही हल्ला केला जातो . त्यांची मुलगी सायली ही  वैष्णलिझमवर phd करतेय .तिच्याही मागावर हल्लेखोर आहेत.गौतम कांबळे नावाचा तरुण इतिहास संशोधक तिच्या मदतीला धावून येतो . प्रो. जोशींनी मरणापूर्वी काही दुवे सोडले आहे . पोलिसही  जोशींना मूर्तीतस्कर ठरवून मोकळे झालेत कारण टेबलावर असलेली असुर वरुणची मूर्ती गायब झालीय असे त्यांचे म्हणणे आहे.पण असुर वरुणच्या अनेक मुर्त्या अस्तित्वात आहेत आणि त्या तितक्या दुर्मिळ नाहीत याची गौतमला खात्री आहे. यामागे नक्की काहीतरी दुवा आहे याची खात्री गौतम सायलीला पटवून देतो आणि ते अज्ञात रहस्याच्या मागावर निघतात . पण जे रहस्य त्यांना कळते ते फारच भयानक आहे. हिंदू संस्कृती बदलून जाईल असे काहीतरी त्यात आहे . हजारो वर्षापासून ते रहस्य उजेडात येऊ नये म्हणून काही संघटना आजही कार्यरत आहेत . एक श्वास रोखून वाचायला लावणारे पुस्तक.

Friday, October 25, 2019

पाषाण ..... शर्मिला गाडगीळ

पाषाण....शर्मिला गाडगीळ

अगाथा ख्रिस्ती याच्या टेन लिटिल निगर्सचा स्वैर अनुवाद 

मुंबईपासून काही अंतर दूर असलेल्या पाषाण या बेटाविषयी खूप काही उलटसुलट बातम्या पसरल्या होत्या . कोणी म्हणे ते बेट एका उद्योगपतीने विकत घेतले होते. तर कोणी म्हणे एका प्रख्यात सिनेतारकाने आपले उर्वरित आयुष्य जगण्यासाठी हे बेट खरेदी केले होते तर काहीच्या मते शास्त्रज्ञांनी गुप्त संशोधन करण्यासाठी हे  बेट होते.
जस्टीज पालेकर...सारंग पावसकर या वर्गमित्राने पालेकराना पाषाण बेटावर काही दिवस आराम करण्यासाठी आमंत्रण  दिले होते . अर्थात हा पावसकर काही त्यांना आठवत नव्हता पण काही दिवस सुट्टी  एन्जॉय करायला काय हरकत आहे म्हणून ते तयार झाले.
चारू राजश्री ..एक शिक्षिका.. हिला अनिता तर्खडकरने  पाषाण बेटावर चिटणीसपदाची नोकरी दिली . महिनाभर ट्रायल घेऊन मग पुढचा विचार करू असे ठरवून चारू निघाली.
श्रीकांत वेलणकर .. पाषाण बेटावर एका विशिष्ट कामासाठी त्याची निवड केली आहे . त्यासाठी त्याला आगाऊ रक्कमही मिळाली आहे . काम कोणते ते पाषाण बेटावर गेल्यावरच कळेल.
विजया भागवत.. वय वर्षे पासष्ट.. तिच्या एका मैत्रिणीने पाषाण बेटावर एक गेस्ट हाऊस सुरू केले होते आणि पाहुणी म्हणून हिला बोलाविले होते . पत्राखालील सही पाहून कोण मैत्रीण ते ओळखता आले नाही पण चार दिवस राहायला काय हरकत आहे ..?? असा विचार करून ती पाषाण बेटाकडे निघाली.
अमर कोठारी ... एक देखणा तरुण .. तर्खडकर नावाच्या मित्राने त्याला पाषाण बेटावर येण्याचे आमंत्रण दिले होते . आपल्या अनेक मित्रांपैकी तर्खडकर एक.. असे समजून तो निघाला .
डॉ. वेरणेकर .. एक हुशार सर्जन ... तर्खडकरांच्या पत्नीची तब्बेत बिघडली होती . त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉ. पाषाण बेटावर निघाले होते.
निवृत्त मेजर दळवी ... कोण्या तर्खडकरांनी त्यांना पाषाण बेटावर गेट टू गेदर करण्यासाठी बोलावले होते .त्याने मेजर वाच्छानीचा रेफरन्स दिला होता म्हणून मेजर दळवी पाषाण बेटावर जायला तयार झाले .
विजय साळुंखे .. हा लहानपणी पाषाण बेटावर राहिला होता . आताही तो तिथेच चालला होता . सर्व प्रवाशांची माहिती त्याच्या खिशातील छोट्या डायरीत होती.
सावित्री आणि व्यंकटेश बापट .... पाषाण बेटावरील बंगल्यातील केयर टेकर. आलेल्या पाहुण्यांची सर्व व्यवस्था आणि बडदास्त ठेवायची जबाबदारी त्यांच्यावर आहे . पण त्यांनीही अजून आपल्या मालकांचे तोंड पाहिले नाही . 
एकूण दहाजण पाषाण बेटावरील बंगल्यात जमले आहेत .
हळू हळू सर्वांचे खून होणार आहेत .
का ..?? कशासाठी ...?? कोण आहे याच्यामागे ...?? का होणार त्यांची हत्या ...?? 
अगाथा ख्रिस्ती यांच्या टेन लिटिल निगर्स या पुस्तकाची ही भारतीय आवृत्ती .
( पुस्तक जुने असल्यामुळे लेखकाचे आणि प्रकाशकाचे नाव नाही आहे )
.

Monday, October 14, 2019

जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट

जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट ....ल्यूसी आणि स्टीफन हॉकिंग
अनुवाद ..... डॉ. प्रमोद जोगळेकर
मेहता पब्लिकेशन
जॉर्ज आणि अँनी खास मित्र दोघेही नऊ वर्षाचे. अँनीचे वडील अंतराळ शास्त्रज्ञ. त्यांना अमेरिकेत अंतराळ संशोधनाची संधी मिळते. तिथे त्यांनी बनविलेला यंत्रमानव मंगळावर जातो आणि  त्याच्यात बिघाड होतो. अँनीला वाटते तिला अवकाशातून कोणीतरी संदेश पाठवितो आहे . आणि ते पृथ्वी नष्ट करण्याची धमकी  देतायत . म्हणून ती जॉर्जला इ मेल पाठवून अमेरिकेत बोलावून घेते .दोघेही त्यांचा नवीन मित्र एमिटच्या मदतीने  अंतराळात जातात आणि वेगवेगळ्या ग्रहांवर त्या संदेशाचा माग काढीत फिरतात.खरेच पृथ्वीला धोका आहे का ....??  कोण असतील हे लोक ??? कोणत्या ग्रहावरून येणार आहेत ....?? चला तर मग जॉर्ज आणि अँनीच्या अंतराळ सफारीचा माग काढीत या प्रश्नांची उत्तरे मिळवू .
एक सुंदर बाल विज्ञानकथा असे या पुस्तकाबद्दल सांगता येईल . जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि त्यांची मुलगी ल्यूसी यांनी मिळून हे लहान मुलांसाठी पुस्तक लिहिले आहे . मुलांना विज्ञान रंजकतेने  कळण्यासाठी आणि त्यांना गोडी लागण्यासाठी या पुस्तकांची निर्मिती आहे.अतिशय सोप्या भाषेत विज्ञानाची ओळख हे पुस्तकाचे वैशिष्ट्य. जोगळेकरांनी अनुवादही सोपा आणि सर्वाना समजेल असा केला आहे.जॉर्ज सिरीजमधील हे दुसरे पुस्तक आहे .
स्टीफन हॉकिंग यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही .आईन्स्टाईन यांच्यानंतर भौतिकशास्त्रात सैद्धांतिक काम करण्याबद्दल ते जगप्रसिद्ध आहेत .
या पुस्तकातील वैज्ञानिक माहिती अव्वल दर्जाच्या वैज्ञानिकांनी लिहिली असून ती अद्यावत आहे . ही माहिती अतिशय सोप्या पद्धतीत आणि सोप्या भाषेत मांडली  आहे .

ओलीसुकी .... श. ना. नवरे

ओलीसुकी .... श. ना. नवरे
नवचैतन्य प्रकाशन
श. ना . माझ्या आवडीचे लेखक. अतिशय साध्या घटनांवरून कथा बनवितात.यात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर छोट्या छोट्या कथा आहेत . त्या पटकन मनाला भिडतात .  यातील प्रत्येक कथेत ते स्वतः आहेत . एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून यात भाग घेतात . डायरी, घर कौलारू, यासारख्या बऱ्याच  कथेत आपल्या जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणवतात .या सर्व लघुकथा आहेत . जास्तीतजास्त चार ते पाच पानात मावणार्या .चटपटीत ,मनात हसता हसता अंतर्मुख करणाऱ्या .

Sunday, October 6, 2019

एक देवी अशीही ....३

एक देवी अशीही ....३
योगायोगाने तिला देवीच्याच मंदिरात बंदोबस्ताचे काम आले.आता ती दिवसभर आपला राग देवी भक्तांवर काढेल या विचारानेच तिच्या सहकारी खुश.
तशी ही काही फार नास्तिक नव्हतीच.पण आपला फायदा पाहूनच देव देव करावे या विचारांची होती . पोलीस असल्यामुळे ड्युटीचे नक्की तास नाहीत . कधी कधी दिवसभर बाहेरच राहावे लागते अश्यावेळो उपास.. व्रत..करून फायदा नाहीच उलट शरीराचे हाल. सकाळी नेहमीप्रमाणे ड्युटीवर जॉईन झाली . ते शहरातील प्रसिद्ध देवीचे मंदिर होते.नवरात्र चालू असल्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती ..बापरे किती ह्या बायका ....?? कसे आवरायचं याना ...?? प्रचंड गर्दी पाहून ती हबकलीच .पाच सेकंदाच्या दर्शनासाठी किती हे हाल ...?? स्वतःला ही त्रास आणि आम्हालाही त्रास .. घरी देवी असेलच ना ...?? नाहीतर पावलोपावली नवरात्र मंडळ आहेतच . तिथे जाऊन ओटी भरायची ना ..?? आता या बायकांना कंट्रोल करायचे म्हणजे शिव्या खायची तयारी ठेवावी लागेलच असा विचार करीतच ती गर्दीत घुसली आणि मोठमोठ्याने ओरडून गर्दीवर कंट्रोल करू लागली . हिरव्या रंगांच्या पार्श्वभूमीवर तिचा खाकी वेगळा दिसून येत होता.
त्या भक्तांच्या गर्दीत तीही उभी होती . हिरवा सैलसर गाऊन तिच्या गोऱ्या अंगाला खुलून दिसत होता.पोट पुढे आले होते तरी गर्भारपणाचे लक्षण दिसत नव्हते . उलट चेहरा त्रासलेला गंभीर दिसत होता.आजूबाजूला स्त्रियांचा नुसता गोंधळ चालू होता पण ही एकटीच शांतपणे  इतरांचे धक्के खात उभी होती . मध्येच कोणी सहेतुक अंगाला नकोतिथे स्पर्शही करीत होते .नुकतीच आलेली  ती लेडी इन्स्पेक्टर त्या गर्दीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत होती . तिच्याच प्रयत्नांमुळे सगळ्या स्त्रिया आता रांगेत  व्यवस्थित उभ्या राहिल्या होत्या . त्या गडबडीत हीचा नंबर मागेच गेला. त्यात त्या लेडी इन्स्पेक्टरची नजर तिच्यावर गेली आणि तिने अंग चोरून घेतले.
"काय ह्या गरोदर बायकाही अश्या गर्दीत देवीच्या दर्शनाला येतात..... हातातली केन मांडीवर आपटत ती शेजारच्या स्त्री कॉन्स्टेबल आशुला म्हणाली."काय काय... सांभाळायचे आम्ही ...?? यांची जन्माला येणारी पोरही .....?? हिच्या घरी देवी नाही का ..?? की तीही इथेच येऊन बसलीय ..?? कोणाचा धक्का लागून पडली तर नवऱ्याची मेहनत वाया जाईल ना ..?? तशी आशु  हसू लागली." जा तिला घरी पाठव .नाही ऐकली तर गाडीत घाल आणि पोचव.नवऱ्याला दम दे एकटीला पाठवलं म्हणून ..."तिने हुकूम सोडला तशी ती धावत तिच्याकडे गेली . लांबूनच त्यांची जुगलबंदी ही पाहत राहिली . बरेच हातवारे करून झाल्यावर आशु परत आली." मॅडम ...जाणार नाही म्हणते  . मोठ्या प्रयत्नाने दर्शनाला आलीय . नवरा येईल म्हणाली अर्ध्या तासात तेव्हा त्याला पाहिजे तर शिव्या द्या म्हणते....." .आशु हसत म्हणाली.
"आयचा घो तिच्या .... जा घेऊन ये तिला इकडे .. ती हसत म्हणाली. मग सावकाश पावले टाकीत ती लेडी इन्स्पेक्टर समोर उभी राहिली.
"कितवा ....?? तिने विचारले.
"आठवा ..."समोरून मान खाली घालून उत्तर आले.
"जरा जास्तच पोट वाटते. जुळे आहेत का ...?? तिने मान हलवून नकार दिला.
"आशु हिला डायरेक्ट देवीजवळ घेऊन जा .. तिने ऑर्डर दिली आणि  रिकाम्या हाताने आलीस का ..?? तिचे मोकळे हात पाहून ती ओरडली. "आमच्यात गरोदर स्त्रिया ओटी भरीत नाहीत.."तिने खाली मान घालूनच उत्तर दिले."पण शरीराला त्रास होईल अश्या ठिकाणी एकटीने जाणे चालते का .."?? तीने  कुत्सितपणे विचारले .
कपाळावर हात मारत ती बाजूच्या फुलवालीला ओरडली "म्हातारे... हिला हार वेणी दे .. पैसे मी देईन..."
तशी म्हातारी म्हणाली" तुझा पैसा नको अश्या कामाला ...त्यापेक्षा मी अशीच देईन.होणाऱ्या बाळाला पहिली भेट माझ्याकडून.असे म्हणत हार वेणीचे ताट तिच्याकडे दिले .
ती त्या लेडी कॉन्स्टेबल सोबत गाभार्याच्या दिशेने जाताच सर्व स्त्रियांनी कौतुकाने वाट करून दिली. एक मोठ्याने पुजाऱ्याला म्हणाली "बाबा ..माझा ही वेळ तिला द्या आणि मनसोक्त दर्शन करू द्या . आज देवी दुसऱ्या देवीच्या दर्शनाला आलीय . मुलगीच होणार बघा .."तश्या सर्व स्त्रियांनी हो...हो..मुलगीच होणार .. उदे.. ग.. अंबे... उदे ...असा गजर केला.एक प्रफुल्लित वातावरण गाभाऱ्यात निर्माण झाले . सर्वांच्या मुखावर देवीचा प्रसन्न चेहरा दिसू लागला. थरथरत्या हाताने तिने हार वेणीचे ताट पुजाऱ्याकडे दिले आणि सवयीने हात पसरून देवीची करुणा भाकली.
पुजाऱ्याकडून प्रसाद घेऊन ती सर्वांच्या कौतुकाच्या नजरा झेलत देवळाच्या बाहेर पडली. बाहेर येताच सर्वांच्या नजरा चुकवून ती मंदिराच्या मागे असलेल्या कचराकुंडी जवळ गेली . इकडे तिकडे पाहत तिने गाऊन वर केला पोटाला लावलेला चामड्याचा अत्यानुधिक पट्टा बाहेर काढून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला .हात वर करून जणू देवाची माफी मागितली आणि भराभरा पावले टाकीत निघून गेली .
दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रसामाध्यमात बातमी होती . मंदिराच्या मागे असलेल्या कचराकुंडीत अत्यानुधिक बॉम्ब सापडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, October 4, 2019

एक देवी अशीही ....२

एक देवी अशीही ....२
"हे बघ.... ही कंपनी आहे. कुठल्या देवाचे मंदिर नाही...अनवाणी फिरायला.." अनवाणी पायांनी आत शिरणाऱ्या तिला पाहून सुपरवायझर मॅडम ओरडली.
" आहो मॅडम ...नवरात्र चालू आहेत.अनवाणी चालायचे व्रत असते.दरवर्षी करतो आम्ही . सर्वच ऍडजस्ट करतात .तुम्हालाच प्रॉब्लेम आहेत .."ती चिडून म्हणाली.
"ही असली थेर माझ्या डिपार्टमेंटमध्ये नको.हे व्रत उपवास ,रोज ठराविक रंगाचे कपडे वगैरे घरी बसून  करा.नऊ दिवस युनिफॉर्मची सूट दिलीय मॅनेजमेंटने ते पुरे नाही का ...?? मॅडम चिडून म्हणाल्या.'सुरक्षिततेचे नियम सगळ्यांना सारखेच लागू आणि आधी पोटाचे बघा... मग हे व्रत..उपवास .."
"अरे देवा...मॅडम काय ऐकणार नाहीत.दरवर्षी अनवाणी पायाचे व्रत असते .पण यावर्षी खरे नाही".ती मनात म्हणाली.
"दिलेले शूज चढव आणि आत ये ..सुटल्यावर जा अनवाणी ....रस्त्यावरच्या घाणीत पाय देत  तोंडाने देवीचे नाव घेत...." मॅडम डोळे वटारत म्हणाल्या.
काही न बोलता तिने लॉकरमधून शूज काढले मनातल्या मनात देवीची माफी मागितली आणि कामाला सुरुवात केली.डिपार्टमेंटमधील सगळ्या मुली चिडलेल्या होत्या. सुपरवाझर मॅडम दगड आहेत असेच सर्वांचे मत झाले .एक स्त्री असून इतर स्त्रियांच्या भावना समजून घेत नाही .देव तर मुळीच मानत नाहीत त्या.. असे म्हणत सर्वजणी हव्या तश्या तोंडसुख घेत होत्या.तिच्या कानावर येत होते ते ...पण ती लक्ष देत नव्हती .जगण्यासाठी फक्त देव.. देव उपास ...व्रतवैकल्य..करून भागत नाही तर कष्ट करावे लागतात यावर तिचा विश्वास होता.बायकांच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत तिने निराशेने मान हलवली आणि कामात गढून गेली.
दुपारी लंच झाल्यावर पुन्हा कामाला सुरुवात झाली.  अनवाणी व्रत तोडल्याचा राग अजूनही तिच्या मनातून गेला नव्हता. टेबलावरील मटेरियल संपले म्हणून ती नवीन मटेरियल घ्यायला उठली आणि तोल गेला . स्वतःला  सावरायच्या नादात तिचा हात टेबलावरील काचेच्या  बरणीला लागला आणि ती डायरेक्ट तिच्या पायावर पडली.आतील ऍसिड सारखा दिसणारा द्रव पदार्थ तिच्या पायावर पडला.तोंडातून निघणारी किंकाळी ती रोखू शकली नाही .सर्वजणी धावत तिच्याभोवती गोळा झाल्या.मॅडमने सर्वाना बाजूला करून तिचा पाय आपल्या मांडीवर घेतला.अलगद तिच्या पायातून शूज काढले.आतमध्ये पाय थोडा सुजला होता."दुखतय का बाळा.... ?? तिने हळुवारपणे प्रश्न केला .मॅडमच्या या प्रेमळ प्रश्नानेच तिचा बांध फुटला .डोळ्यातील अश्रू तिला रोखता आले नाहीत .फर्स्टएड मधील मलम  पायाला लावून तिला एका कोपऱ्यात बसविले. शिफ्ट संपल्यावर मॅडमने तिला आपल्या गाडीवरून घरापर्यंत सोडले . निघताना आपल्या पर्समधून देवीचा गुलाल तिच्या कपाळाला लावला . माता तुझे रक्षण करो असे म्हणून  स्कुटर चालू केली  त्या दूर जाणाऱ्या एका वेगळ्या देवीकडे पाहताना तिचे हात आपोआप जोडले गेले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर