Saturday, November 28, 2020

धुंदी

धुंदी
काही व्यक्ती किंवा काही गोष्टी पहिल्या की आपल्याला आपोआप आनंद होतो .बरे वाटते .त्या व्यक्तींचा आणि त्या घटनांचा आपल्याशी कधीही संबंध आलेला नसतो.पण त्यांच्या देहबोलीतून खूपच सकारात्मकता जाणवते .उदासीनता दूर होते .सालं.... असे लाईफ हवे मनात शब्द उमटतात.मला ही कधीकधी अश्या व्यक्ती अधूनमधून दर्शन देतात. 
मार्केटमध्ये खरेदीला गेल्यावर एका गल्लीत स्कुटर पार्क करून मी उभा राहतो. सौ.इथून हलू नका असा दम देत त्या गर्दीत घुसते.तिथे दोन चार ते पाच वर्षांची मुले खेळत असतात. हातात बॉल आणि काठी . दोघेही जगाशी संबंध नसल्यासारखे बागडत असतात .आपल्यात विश्वात मग्न,आजूबाजूच्या गाड्या डोक्यावरचे ऊन, पायाला चटके देणारा रस्ता याकडे लक्ष न देता ते आपल्या धुंदीत खेळत असतात.त्यांच्याकडे पाहून वाटते असे लाईफ हवे.....
शेट्टीच्या नटराजमध्ये आठवड्याच्या ठराविक दिवशी एका कोपऱ्यात तो बसलेला असतो. मला आणि विक्रमला पाहताच तो ओळखीचा हात हलवतो. मला कसेतरी वाटते पण विक्रम जुनी ओळख असल्यासारखा हात दाखवतो .थोड्या वेळाने त्याच्या गळ्यातून मुकेश रफी किशोर बाहेर येतात . पूर्ण नटराज ते ऐकत असते पण कोणीही त्याला थांबवित नाही . साल इतके सहज कसे वागता येते याला असा विचार मनात येतो....पण आत कुठेतरी बरे वाटलेले असते .
अण्णाच्या बाजूच्या टपरीवर ती नेहमी येते.मांड्यांना घट्ट बसणारी जीन्स...टाईट बिझनेस शर्ट असा तिचा पेहेराव . झोकात ती मेंथॉल सिगारेट मागते . आजूबाजूला कोण आहे...?? कोण बघतेय...??याची पर्वा न करता जोरदार कश मारत मोबाईलशी चाळा करीत ती एका कोपऱ्यात उभी राहते .दुनियेला कस्पटासमान समजणाऱ्या तिच्या देहबोलीकडे पाहून बरे वाटते .
संध्याकाळो धावतपळत गर्दीने भरलेल्या त्या रेल्वे स्टेशनात आपण शिरतो .समोर 6.40 ची ठाणे फास्ट उभी .फक्त एक मिनिटात गाडी सुटणार असते आणि अचानक ठेका धरणारे म्युझिक सुरू होते .चारी बाजूने काही तरुण तरुणी अचानक तो ठेका पकडून नाचायला सुरवात करतात .म्युझिक वाढत जाते वातावरण अजून धुंद होते समोरची ट्रेन सोडून आपण त्या ठेक्यावर नाचायला सुरवात करतो .xxx गेली दुनिया ...पाच मिनिटात म्युझिक बंद होते आणि आपण 6.50 ची डोंबिवली फास्ट पकडायला धावतो .पण ती पाच मिनिटे खूप काही देऊन जातात ...
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, November 14, 2020

अलक ....१८

अलक ....१८
बऱ्याच वर्षांनी तो दिवाळीत गावी आला होता .गावातील लहान मुलाना जमवून रात्री छान गप्पा रंगल्या होत्या . गावाच्या शेवटी असलेल्या घरातील म्हातारी फटाके वाजल्यावर कश्या शिव्या द्यायची तो ते रंगवून सांगत होता . इतक्यात एक पोरगा म्हणाला "होय काका.....ती अजूनही फटाके वाजल्यावर शिव्या देत बाहेर येते." कसे शक्य आहे....??  तो हादरला . त्यानेच तर तिचे प्रेत पहिल्यांदा पाहिले होते .. शुभ दीपावली 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

अलक ..१७

अलक......१७
लाडूची टेस्ट बिघडली म्हणून तिने सगळे लाडू कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. तिची पाठ वळतात कोपऱ्यातील अंधाऱ्या गल्लीतून त्या मुलांनी धावत येऊन त्यावर झडप टाकली . आज कित्येक वर्षांनी त्यांना  दिवाळीचा ताजा फराळ मिळाला होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

पहिली आंघोळ

पहिली आंघोळ 
रात्रीपासूनच ती खुश होती.रात्री झोपताना त्याने अचानक सांगितले उद्या कामावर जाणार नाही.पहिल्यांदा तिला नेहमीप्रमाणे थट्टाच वाटली.
"नाहीतर काय ..."?? हा माणूस अत्यावश्यक सेवेत असलेला.कधीही उठून कामावर निघायच्या तयारीत. अर्थात लग्नाआधी याची कल्पना त्याने तिला दिली होती. पण प्रेमाच्या धुंदीत तिने थोडे दुर्लक्ष केले.
 लग्नानंतरची पहिली दिवाळीच काय.... पण बरेच सण एकत्र साजरे केले होते.त्यामुळे  ती बेसावधच होती. पण नव्याची नवलाई संपली आणि त्याचे रुटीन चालू झाले . त्यानंतर ते आतापर्यंत तो कोणत्याच सणाला घरी नव्हताच .पण काल रात्री त्याच्याकडून कळल्यावर तिने आनंदाने त्याला मिठीच मारली आणि जुन्या आठवणी उगाळत कधी झोप लागली ते कळलेच नाही .
सकाळी तिला उशिराच जाग आली. त्याला बाजूला झोपलेले पाहून रात्री ऐकलेले सत्यच होते याची तिला खात्री पटली. गाढ झोपेत त्याचा चेहरा किती निरागस दिसत होता....आज कित्येक वर्षांनी त्याला असे गाढ झोपलेले पाहिले होते. न राहवून तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकले आणि त्याने खाडकन डोळे उघडले .अर्थात वर्षानुवर्षाचे सावधगिरीचे प्रशिक्षण त्याच्या अंगात मुरलेले होते.
"काही नाही हो झोपा अजून ... तिने अलगद त्याच्या गालावर चापट मारीत म्हटले . त्याने हसून कूस बदलली . ती गुणगुणत स्वयंपाकघरात शिरली . जाताजात बाजूच्या बेडरूममधील मुलांकडे नजर टाकायला विसरली नाही .आज सर्व काही आरामात करायचे होते. तिने सर्वांच्या अभ्यंगस्नानाची तयारी केली. उटणे आणि गरम पाणी तयार करून पुन्हा बेडरूम मध्ये शिरली .
तिला पाहून तो उठला.हात धरून तिने पाटावर बसविले आणि हळुवारपणे सर्वांगाला उटणे चोळू लागली. आजचा हा क्षण तिला जपायचा होता . तो भान हरपून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता . मनासारखे उटणे लावून झाल्यावर तिने त्याला बाथरूममध्ये ढकलले .
तो आंघोळ करून बाहेर आला आणि मुलांच्या बेडरूममध्ये घुसला . दोघांनाही आवाज देत त्याने अंगावरून पांघरूण खेचले . समोर पप्पांना पाहून मुलांना आश्चर्याचा धक्काच बसला . ओरडून त्यांनी त्याच्या अंगावर उड्याच मारल्या . आजच्या दिवशी पप्पा सोबत दिवाळी साजरी करायला मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता .
सर्वांची आंघोळ झाल्यावर एकत्रच फराळाला बसले .तिच्या आणि मुलांच्या अंगावर नवीन कपडे शोभून दिसत होते .त्याने मात्र जुनेच कपडे चढविले होते. सणासुदीला कामावर जायचे असेल तर नवीन कपडे घेऊन फायदा काय ....?? हा त्याचा हिशोब .
ती मात्र आज जास्तच सुंदर आणि खुश दिसत होती. सतत स्वतःशी गुणगुणत हसत वावरत होती. आज पहिल्यांदा तो मुलांसोबत ओवाळणीला बसला होता .
खरे तर आज तो मनातून अस्वस्थ  होता.सणाला घरी राहून काय करायचे हेच विसरून गेला होता.सकाळी मुलांना उठवून पुन्हा बेडरूममध्ये जाऊन मोबाईलशी चाळा करीत बसून होता .बायकोची लगबग मुलांचा आनंद यामध्ये तो स्वतः कुठेच नव्हता.
 आजच का आपल्याला घरी राहायला सांगितले...??? सिनियर म्हणून..??? त्या नितीन मानेला बोलावले . त्याचे तर मागच्या वर्षी लग्न झालेय.एक वर्ष सगळे सण साजरे करायला दिले त्याला आणि या वर्षीपासून त्याला ड्युटी...?? हे चक्र असेच चालू राहणार . माझ्याजगी तो असणार .  नको त्याच्यावर ही पाळी नको . मला सवय झालीय मीच यापुढे ड्युटी करेन. मनाशी निश्चय केल्यावर त्याला जरा हायसे वाटले. 
फराळ करताना त्याला हे आठवले आणि समोर तिचा सुंदर चेहरा आला .भावना अनावर होऊन त्या डोळ्यातून अश्रूवाटे बाहेर पडल्या. 
त्याच्या अश्रूंचा थेंब ताटातील चकलीवर पडला . घाईघाईने ती चकली उचलणार इतक्यात मुलाने झडप टाकून तीच उचलली. तोंडाने एक तुकडा तोडला आणि मोठ्याने ओरडला ." आई चकली खारट...." ती धावत बाहेर आली आणि त्याचा चेहरा बघताच ती थबकली . हळूच मुलाच्या हातून चकली काढून घेतली आणि तोंडात टाकली . कुठे खारट आहे ....?? उलट ही चकली आज पहिल्यांदा गोड लागतेय मला ....
शुभ दीपावली 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, November 10, 2020

दोस्ती बडी चीज है ...३

दोस्ती बडी चीज है ...३
 कॉलेजच्या त्या खाचखळग्यांनी दगडधोंड्यानी भरलेल्या ग्राउंडवर खेळायला भीतीच वाटायची. अश्यावेळी फुटबॉल मॅचला गोलकिपर कोण...?? ही चिंता आम्हाला सतावायची.... शेवटी उड्या मारून जखमा कोण करून घेईल....??
.शेवटी आम्हाला एकजण सापडला. कधीही कोणाच्या आध्यातमध्यात नसलेला. लेक्चर संपताच सरळ घरची वाट पकडणारा....आमच्या ग्रुपला लांबून हात दाखवणारा.. रितेश नवरंगे हा गोरा गोमटा नाजूक  मुलगा आम्हाला नाही बोलणार नाही याची खात्री होतीच. तो गोलकीपर म्हणून तयार झाला.
 पहिल्या मॅचमध्ये गोल अडवताना त्याने ज्या अचाट उड्या मारल्या ते पाहून आम्ही हादरलोच. अंगावर जखमा घेऊन विजयी वीरांच्या जोशात त्याने सर्वाना अभिवादन केले त्याच क्षणापासून तो आमच्यातील झाला.
 कसलाही विचार न करता झोकून देण्याची हीच सवय त्यांच्या पुढील आयुष्यात यशाची गुरुकिल्ली बनली .पुढे त्याने इंजिनियरिंगची पदवी घेतली .पण त्या मशीन आणि टेक्नॉंलॉजीमध्ये मन रमले नसावे.
 बऱ्याच वर्षांनी ठाण्यात भेटला. अर्थात तेव्हा आम्ही सर्व पुरुष झालेलो. पण हा आमच्यापेक्षा वयाने लहान असूनही विचारी पुरुष वाटत होता. डोक्यावरचे केस गायब झालेले .
गाडीत बसून त्याने मारलेली हाक पुन्हा जुन्या काळात घेऊन गेली.मग टपरीवर कटिंग पिता पिता जुन्या आठवणी जाग्या झाल्या.तो टुरिझम क्षेत्रात उतरला होता. मामाच्या गावाला जाऊया हि संकल्पना घेऊन संगमेश्वर येथे तुरळ या गावात त्याने छोट्या मुलांना नजरेसमोर ठेवून छान पिकनिक प्लॅन अरेंज करत होता . छोट्या छोट्या मुलांचे कॅम्प घेऊन जायचे त्यांना गावाची ओळख करून द्यायची..संस्कृतीची ओळख करून द्यायची...भारतीय परंपरा ,रीतिरिवाज शिकवणे .मुलांसोबत मुक्त मनाने मैदानी खेळ खेळावे, झाडावरील फळे तोडणे..विहिरीत डुंबणे, बैलगाडीतून प्रवास करणे अश्या गोष्टीत रमून गेला .त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मन मोकळे करू लागला.
आमच्या स्टार्ट गिविंगच्या कामात नेहमी बॅकफूटवर राहून अडचणींवर मात करणारा रितेश खरोखरच स्वतःचे आयुष्य मनासारखे उपभोगतोय हे पाहून खूप आनंद होतोय. आजही आमच्यासाठी तो गोलपकीपरच आहे .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

दोस्ती बडी चीज है ..२

दोस्ती बडी चीज है ....२
शासकीय तंत्रनिकेतन ठाणे  (जीपीटी )ला तिने सिव्हिल इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेतला तेव्हा आम्ही तिसऱ्या वर्षात होतो. त्यामुळे सर्वात सिनियर अर्थात दादा होतो. ती लहान चणीची  मुलगी  छोट्या बहुलीसारखी दिसायची. ठाण्यातच वास्तव्य असल्यामुळे एक प्रकारचे धाडसीपणा  तिच्यात दिसत होते.ममता वाडकर असे शुद्ध मराठी नाव.दिसायला सुंदर आणि मुळातच  कॉलेजमध्ये मुलींची संख्या कमीच.... त्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्याकडेच.तिच्या बरोबर अजून तीन चार जणी होत्या.त्यांच्यामुळे मुलींची संख्या अचानक वाढली.पण दहाचा आकडा काही पार झाला नाही. आमचा ग्रुपतर इतर गोष्टीतच लक्ष घालून होता आणि एकदम ज्युनियरकडे कुठे लक्ष द्यायचे म्हणून फारसे काही मागे लागलो नाहीच .ठाणे एसटी डेपो आणि कॉलेजमध्ये समोरासमोर आलो की हाय... हॅलो... व्हायचे तेव्हडेच. हळू हळू आमचे कॉलेजला जाणे कमी झाले आणि इतरांचा दंगा वाढू लागला . त्यावर्षी गॅदरिंगला तिने सुंदर डान्स केला आणि तिच्यातील ह्या गुणाचीही ओळख झाली .  पुढे आम्ही बाहेर पडून आपापल्या मार्गाला लागलो . काही वर्षांनी आमचा ग्रुप सोडला तर दुसऱ्या कोणत्याही ग्रुपशी आणि कॉलेजशी संबंध राहिला नाही.व्हाट्स अप सुरू झाले आणि आमच्या बॅचचे बहुतेक सर्वच एकत्र झालो . 
एके दिवशी फेसबुकवर सर्च करताना तिचा फोटो पाहिला.रिक्वेस्ट टाकावी की नाही या विचारात दोन तीन दिवस गेले.आपल्याला इतक्या वर्षानंतर ती ओळखेल का ..?? हा मोठा प्रश्न .शेवटी बघू तर ... इतर शिव्या देतात तशी ही शिव्या देईल आणि फार फार तर ब्लॉक करेल . असा विचार करून रिक्वेस्ट पाठविली .काही दिवसांनी तिने रिक्वेस्ट स्वीकारून चक्क ओळख ही दाखवली. मग मोबाईल नंबर घेणे आलंच . पण फोनवर बोलणे काही झाले नाही . चॅटिंग करताना कळले की ती आता हरयाणा येथील गुरगावमध्ये स्थायिक झालीय. ठाण्यातून डायरेक्ट गुरगाव म्हणजे मोठीच उडी ... एक मुलगा आणि नवरा असे त्रिकोणी कुटुंब . . त्याच दरम्यान आमच्या ग्रुपचे स्टार्ट गिविंग फौंडेशन सुरू झालेले .  त्याचे अपडेट्स फेसबुकवर होतेच.अचानक तिने मेसेज केला .. मलाही तुमच्या उपक्रमात सहभागी होणे आवडेल . आमच्या उपक्रमात सगळ्यांचे स्वागत असते त्यात ही जीपीटीची...... हिला नाही बोलूच शकत नव्हतो . ती आमच्या ग्रुपमध्ये सामील झाली आणि वेळोवेळी आमच्या उपक्रमाला प्रोत्साहन देत राहिली . वेळेवर आर्थिक मदत करायला ही पुढे राहिली . 
मागच्या आठवड्यात तिचा मेसेज आला . ठाण्यात एका आठवड्यासाठी येतेय .. भेटू शकतोस का ...?? तिचे घर ही माझ्या कंपनीजवळ . मी ताबडतोब हो  म्हटले आणि आज तो योग जुळून आला . बिल्डिंग खाली तिला पाहिले आणि मधली 28 वर्षे निघूनच गेली . तोच हसरा चेहरा....  जणू कालच कॉलेज संपलाय . अर्थात आता ती लहान चणीची बाहुली राहिली नव्हती आणि मीही तो कॉलेजकुमार नव्हतो . पण तीच ओळख ,आणि चेहऱ्यावरचे भाव बरेच काही सांगून गेले . गडकरीच्या हॉटेलमध्ये बसून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . काय बोलू काय नको असे झालेले . कॉलेजच्या आठवणी ..स्टार्ट गिविंगचे उपक्रम ...मित्रांची चौकशी यात तास कसा गेला ते कळलेच नाही .  अजून बरेच काही बोलायचे होते पण वेळेअभावी शक्य झाले नाही . शेवटी आठवणींचा सेल्फी काढून आम्ही विरुद्ध दिशा पकडली . 
खरेच दोस्ती बडी चीज है ... 
© श्री . किरण कृष्णा बोरकर

मिर्झा गालिब

मिर्झा गालिब..... गुलजार 
अनुवाद...... अंबरीश मिश्र
ऋतूरंग प्रकाशन
गुलजार म्हणतात गालिबचे तीन सेवक होते.एक कल्लू .. गालिबला त्यांनी शेवटपर्यंत साथ दिली. दुसरी बोबडी बोलणारी वफादार ..आणि तिसरे स्वतः गुलजार ...दोघेही वयानुसार सुटले पण गुलजार अजूनही स्वतःला गालिबच्या सेवेत आहोत असे समजतात.
 गालिब त्यांच्या अंगात आहे .ते गालिबच्या घरी राहतात असे त्यांना वाटते.हे पुस्तक म्हणजे गालिबचे चरित्र नाही.फक्त त्यांची ओळख आहे .
१८६९ साली  गालिबने जगाचा निरोप घेतला . १८५७ च्या बंडात गालिब खचला. त्यात त्याचे खूप आप्तस्वकीय मारले गेले .त्याची अखेरची वर्षे निराशेत गेली. 
पण त्यापूर्वी तो दरबारी फारसी त्याग करून उर्दूत लिहू लागला होता.ऊर्दूमुळे तो लोकांपर्यंत पोचला. उर्दूला त्याने मोठे केले.एकविसाव्या शतकात गालिबचा एकमेव शिष्य म्हणजे गुलजार .गालिबचा शिष्य म्हणून आजही  त्यांचा मोठा सन्मान आहे .
 एकदा गालिब म्हणाला होता जगाच्या पाठीवर एक अक्षर आहे मी. एकदा लिहिलं की तुम्ही मला पुसू शकत नाही .
खरच ठरलंय त्याच.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

वाढदिवस

वाढदिवस 
ती... ए..... तुझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट देऊ.. ??        परफ्यूम..??
तो..😔😔😔
ती... नको.... तुझ्या घामाच्या वासात त्याचा सुगंध जाणवत नाही . वॉलेट देऊ ...???
तो....😔😔
ती..... नको . खिसा तर नेहमी रिकामा असतो तुझा .रिकामा वॉलेट बरा दिसत नाही . शर्ट घेऊ का ...??
तो...😔😔
ती....नको.. कधी घालणार तू..??.फॅक्टरीत गेल्यावर युनिफॉर्म चढवतोस तो रात्री आठ वाजता काढतोस. नवीन शर्ट कधी घालणार तू ....?? मागच्या वर्षी दिला तो सहा महिने पडूनच होता. राहू दे ....नंतर बघू ते गिफ्टचे 
तो...😔😔😔😔😔
एका इंजिनियरचा वाढदिवस संपला .😂😂😂
© श्री. किरण बोरकर