Thursday, September 22, 2016

कावळे आणि पितृपक्ष

आजपासून कोणाच्या खिडकीवर भीक मागायला जायला नको ,आणि नको त्या कोळिणीच्या शिव्या खायला ,सकाळी उठल्या उठल्या पंख फडकवत आणि आपली काळीभोर चोच दगडाला घासत त्याने विचार केला .होय ,पितृपक्ष सुरु झाला होता .नेहमीच त्याला हाड हाड करणारे आजपासून पंधरा दिवस तरी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणार होते .अर्थात त्याला खाण्याची कमतरता कधीच नव्हती.पण सकाळी 7 ला उठून स्मशानात उडत जाणे फार कंटाळवाणे काम होते त्याच्यासाठी ,शिवाय मेन्यूहि ठरलेलाच असायचा ,त्यामुळे तिथे जाण्यापेक्षा चालत  जाणाऱ्या कोळिणीच्या डोक्यावरील पाटीमधून एखादा रसरशीत मासा काढणे आवडायचे त्याला .शिवाय सकाळचा व्यायाम हि होतो त्यामुळे .
त्याने नेहमीची काव काव आरोळी ठोकत हवेत सूर मारला ,एका इमारतीच्या गच्चीवर राजासारखा उतरला ,समोर दोन पाने होती .एक बहुतेकम्हातारा असावा  ,कारण पानात पालेभाज्यांच जास्त दिसत होता ,दुसरा मात्र दारू पिऊन गेला असावा ,शेजारी वाटीत थोडी दारू दिसत होती ."काय साली माणसे आहेत ,निदान एक  क्वार्टर तरी ठेवायची " तो चिडला आणि निषेध म्हणून म्हाताऱ्यांच्या पानातले वरण भात खाऊन उडाला ."बघा बघा ,पाहिलेत ना ह्या बेवाड्याच्या पानाला कावळेहि शिवायला तयार नाही ,जिवंतपणी त्रास दिला मरणानंतर हि पिच्छा सोडत नाही " एक स्त्री पुटपुटली .त्याने तुच्छतेने काव काव करून दुसरीकडे प्रस्थान केले .एके ठिकाणी खूप गर्दी दिसली तो खुश झाला ,बहुतेक पंचपक्वान्न असतील म्हणून आनंदाने सूर मारला .पण जवळ जाताच एक शांतता दिसून आली ,हे काय पानाच्या बाजूला बंदूक ,आणि पदके? तो अजून जवळ गेला ,त्याला पाहून जमलेली लोक खुश झालेली दिसली "आला आला ,हा नक्कीच शिवेल "गर्दीतून आवाज  .पण हे काय तो  चित्काराला' "अरे ,हा तर शाहिद झालेला सैनिक आहे ? काश्मीर मधील अतिरेक्यांशी लढताना शाहिद झालेला हा कोवळा सैनिक आहे ??याला कशी मुक्ती देऊ मी ?? अरे हा स्वतःच अजून अतृप्त आहे ? देशासाठी फार काही करू शकलो नाही याचे दुःख मनात ठेवून गेला आहे  . मग याला कशी शांती देऊ ? आमच्या कावळे संघाने ठरविले आहे कि दहशदवाद्यांशी लढणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या पिंडास शिवायचे  नाही  कारण त्यांना अतृप्तच राहायचे आहे .जोपर्यंत भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्या अतिरेक्यांचे आणि दहशदवादी संघटनांचे उच्चाटन होत नाही तो पर्यंत आमच्या आत्म्यांना शांती मिळणार नाही असे तेच म्हणतात ना ?? म्हणूनच कोण कावळा आला नाही .त्यांच्या मतांचा आदर केलाच पाहिजे ,माफ कर बाबा इच्छा असूनही मला तुला शांती देता येत नाही .अरे तुझ्या पानाला शिवलो तर तुला शांती मिळेल, पण माझे काय ? मी आयुष्यभर अतृप्तच राहीन ना ?.परत फिरून त्याने वर सूर मारला पण त्या पंख फडकविण्यात उत्साह दिसत नव्हता .एका पराभूत योध्यासारखा आपल्या ठिकाणाकडे परतला .

Thursday, September 15, 2016

सिटीलाईट

सिटीलाईट ..
चार्ली चॅप्लिनचा हा सिनेमा म्हणजे हास्य आणि कारुण्य यांचा उत्तम मिलाफ आहे .खळखळून हसण्याला कारुण्याची  झालर लावली कि काय घडू शकते ?याचे उत्तम उदाहरण म्हणजेच सिटीलाईट .
एक फुले विकणारी अंध मुलगी ,तिच्यावर मनापासून प्रेम करणारा ,फटका गरीब चार्ली ,आणि सतत दारूच्या नशेत राहणारा त्याचा श्रीमंत मित्र यांच्या भोवती गुंफलेली हि कथा .हा श्रीमंत मित्र दारूच्या नशेत असल्यावर चार्लीवर खूप प्रेम करतो .पण दारू उतरल्यावर त्याला घरातून हकलावून लावतो .त्या अंध मुलीसाठी चार्ली खूप काही करतो ,प्रसंगी मारहि खातो . आपल्या मित्राने दारूच्या  नशेत दिलेले पैसे तिला डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी देतो आणि चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात जातो. काही महिन्यांनी तो कफल्लक अवस्थेत बाहेर येतो तेव्हा ती मुलगी पूर्ण बरी होऊन फुलांचे दुकान चालवत असते .तिच्या मते चार्ली अत्यंत श्रीमंत आहे त्यामुळे प्रत्येक श्रीमंतांच्या रुपात ती चार्लीला शोधत असते .अतिशय कंगाल अवस्थेत चार्ली तिच्यासमोर उभा राहतो तेव्हा ती त्याला एक फुल देते आणि काही नाणी हातावर ठेवते.ज्यावेळी ती त्याचा हाथ पकडते तेव्हाच ती चार्लीला ओळखते .भावना केवळ चेहऱ्यातून आणि अभिनयातून कश्या व्यक्त कराव्या ,त्यासाठी संवादांची गरज नाही हेच हा मूकपट सिद्ध करतो . चार्ली चॅप्लिनला लोकांनी का डोक्यावर घेतले ते कळते .
1931 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही खळखळून  हसता हसता केव्हा रडवितो ते कळतच नाही.मला वाटते आजच्या काळात 300 रुपयाची तिकिटे काढून सलमान ,अक्षयकुमारची चित्रपट लोक बघतात पण कधीतरी 2 तास वेळ काढून असे  चित्रपटहि यू ट्यूब वर फुकट पहा .

Wednesday, September 14, 2016

समाजसेवा पण नकोशी वाटत असलेली

आज आरतीला बंड्या नाही बघूनच थोडा आश्चर्य चकित झालो .घरात गणपती आणि हा आरतीला हजर नाही ?थोडा चिडलोच ,न राहवून त्याच्या आईला विचारले "बंड्या ""??? तिने थोड्या घुश्यात उत्तर दिले गेलाय कर्जतला ,जल्लि मेली ती समाजसेवा," मी त्याच्या बाबांकडे नजर टाकली तर ते फक्त हसले .आरती संपता संपता बंड्या दारात हजर झाला पण आत शिरला नाही तसाच मागच्या दारातून बाथरूममध्ये घुसला .हा काय प्रकार आहे ते कळेना ,मी बंड्याशी बोलायचे ठरविले .तशीही बायको गणपतीसाठी चार दिवस माहेरी गेली होती त्यामुळे माझ्याकडे हि वेळ होता ."काका तुम्ही घरी निघा ,मी येतो तुमच्याकडे " माझ्या मनातले विचार ओळखूनच बंड्या म्हणाला .
थोड्या वेळाने तो समोर बसला " काय रे ?,घरातला गणपती सोडून कुठे बाहेर  फिरतोस ?हे पाच दिवस तरी घरी राहा ,नंतर तुलाच करायचे आहे सगळे , कुठे गेलेलास भटकायला "??माझा प्रश्नाचा भडीमार चालू झाला ."प्रेताला"? बंड्याने मान खाली घालून  उत्तर दिले .मला भयानक धक्का बसला ,"अरे कोणाच्या "? घरचे बोलले कसे नाही मला " कोण गेले "?? मला राहवत नव्हते ."काका  ती आजी कोण आहे ?,होती ?मला माहित नाही ,पणती अनाथ होती आणि तिच्या मागे करणारे कोण नव्हते एव्हडेच मला माहित आहे " बंड्याने पडलेल्या चेहऱ्याने उत्तर दिले .'काय चाललंय ते नीट सांग बंड्या "?? मी रागाने बोललो . "काका मागच्या महिन्यात आमचा ग्रुप कर्जतला गेलेला ,आठवतंय? "अरे तू नेहमीच कुठे तरी भटकत असतोस .पुढे बोल ".मी म्हटले " तिथे सहज आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट दिली .तेव्हा तिथे एका वृद्ध माणसाचे निधन झाले होते आणि सर्वजण महानगरपालिकेच्या गाडीची वाट पाहत होते .आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे नजर टाकली आणि कुठेतरी मनातून हाललो ,त्याच्या चेहऱ्यावर  वेदना होती ,एक दुःख दडलेले दिसत होते.न राहवून आम्ही त्याची चौकशी केली ,तर एका मोठ्या सरकारी कंपनीतून मोट्या अधिकारपदावरून निवृत्त झालेला वृद्ध होता तो .दोन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन परदेशात होती ,इथे कोणीच नाही,वेळच्या वेळी त्यांच्या खात्यात पैसे जमा होत होते.पण कोण भेटायला येत नव्हते ,.नेहमी बोलायचे खूप काही कमावले मी आयुष्यात पण खांद्यावर घेऊन जाणारी चार माणसे जमवू शकलो नाही .ते ऐकून आम्ही ठरविले याचे अंत्यसंस्कार आम्ही करू.आम्ही विधिपूर्वक त्याचे अंत्यसंस्कार केले .चितेवर ठेवताना का कुणास ठाऊक त्यांचा चेहरा समाधानी दिसला . आम्हालाही काहीतरी केल्याचा आनंद झाला .तेव्हापासून आम्ही त्या आश्रमातील बेवारशी मृतदेहांचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार करायचे ठरविले ,.आज तिसरी व्यक्ती होती जिचे अंत्यसंस्कार आम्ही करुंन आलो काका कसे हे आयुष्य हो ,तरुणपणी या माणसांनी खूप मजा केली असेल ,कुटुंबासाठी खूप कष्ट घेतले असतील ,मित्रासाठी रात्री अपरात्री धावून गेले असतील,पार्ट्या केल्या असतील पण आज ते एकटे पडलेत ,त्यांचे कोणी ऐकत नाही त्यांना सांभाळायला नको म्हणून इथे आणून टाकतात पण जिवंत आहेत कि मेलेत हे हि पाहत नाहीत काय वाटत असेल हो त्यांना ?"म्हणून आम्ही ठरविले कमीत कमी याना बेवारशी मरण येऊ नये याची काळजी आम्ही घेऊ ,त्यांचे विधिपूर्वक अंत्यसंस्कार करू .मला माहित आहे असे कोणाच्याही बाबतीत घडू नये पण हे घडतेय मग आमच्यापरीने जे जे काही होईल ते आम्ही करू..मला काही सुचेना. हि कसली समाजसेवा ?आणि तीही यावयात .मी म्हटले अरे तुझ्या घरचे काय म्हणतील" ?"आई नाराज आहे पण बाबा काहीच म्हणाले नाहीत "." ठीक आहे ,मी बोलतो बाबांशी " मी त्याला आस्वासन दिले .
. दुसऱ्या दिवशी त्याचे बाबा रस्त्यातच भेटले " काल बंड्या बोलला माझ्याशी ,तुमचे काय मत आहे ? "खरे सांगू का " ?? बाबा म्हणाले " आज अभिमान वाटतो मला बंड्याचा , ,तो जे करतोय ते समाजाच्या दृष्टीने चुकीचे असेल ,रूढी परंपरेच्या विरुद्ध असेल पण त्याला जे योग्य वाटतेय तो ते करतोय ,आज माझे संस्कार कामी आले त्याच्या " मी ताबडतोब बंड्याला फोन केला " बंड्या पुढच्यावेळी जाशील तेव्हा सांग मला ,मीही खांदा द्यायला येईन .

Monday, September 12, 2016

एक रुका हुवा फैसला

एक रुका हुवा फैसला .. बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट १९८६  ला प्रदर्शित झाला .आर्ट फिल्म म्हणून या चित्रपटावर त्यातील कलाकार पाहूनच शिक्कामोर्तब झाले होते .उत्कृष्ट वादविवाद ,ग्रुप डिस्कशन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतिस  उतरला नाही .कदाचित यात नावाजलेले कलाकार ,हिट गाणी ,भरपूर मारामारी नसावी .
19 वर्ष्याच्या मुलाला आपल्या वडिलांचा खून केल्याच्या आरोपावरून अटक झाली आहे आणि त्याचा खटला पूर्ण झाला आहे .कोर्टाने वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत असे 12 ज्युरी नेमले आहेत .त्यांनी एकमताने आरोपी अपराधी कि निरपराधी असा निर्णय द्यायचा आहे .सर्व पुरावे आरोपीच्या विरुद्ध आहे ,खून पाहणारा एक आय विटनेस हि आहे .10 मिनीटात निर्णय होईल असाच ज्यूरीसकट सर्वांना वाटते .सर्व ज्युरींना रिकाम्या खोलीत निर्णय घ्यायला सोडण्यात येते आणि अचानक एक ज्युरी आरोपी निरपराधी आहे असे मत व्यक्त करतो .मग चालू होते वादावादी ,चर्चा ,परत सगळ्या पुराव्याची तपासणी होते आणि एक एक ज्युरी आपले आधीचे मत बदलत जातो .
1957 साली गोल्डन बेअर अवॉर्ड  मिळवलेला 12 अँग्री मेन या सुप्रसिद्ध चित्रपटाचा हा रिमेक .क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा हा चित्रपट .के. के. रैना ,अनु कपूर ,पंकज कपूर असे कलाकार .हा चित्रपट मन लावून बघितला तरच मजा येईल

Sunday, September 11, 2016

आठवणीतील मोती ....प्रभाकर पणशीकर

आठवणीतील मोती ....प्रभाकर पणशीकर .....खरे तर यावर काही लिहायला शब्द अपुरे पडतील .प्रभाकर पणशीकर उर्फ पंत हे नावच पुरेसे आहे .मराठी रंगभूमीचा इतिहास ह्यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही .नाट्यसंपदेच्या माध्यमातून त्यांनी सादर केलेली  नाटके कोण विसरू शकेल.? हे काही त्यांचे आत्मचरित्र नाही .सन १९४८ ते २०११ पर्यंतचा हा एक प्रवास आहे .या काळातील प्रत्येक क्षण ते रंगभूमीसाठी जगले .या कालावधीत त्यांना अनेक व्यक्ती ,व्यक्तिरेखा भेटल्या ,अनेक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या.या साऱ्या स्मृती त्यांनी आपल्या शब्दांमध्ये मांडल्या आणि त्यांना मोत्यांचे स्वरूप प्राप्त झाले .

Thursday, September 8, 2016

गणेशाचे दुखणे

"बाबा ,आज जायलाच पाहिजे का "? गणेश थोड्या नाखुषीनेचे बोलला "अरे बाळा हा रिवाज आहे ,दरवर्षी 10 दिवसाची रजा मंजूर होते ना तुला ,नाहीतर आम्ही बघ ,फक्त एकच दिवस जाऊन येतो "महादेव हसून म्हणाले ."तसे नाही हो बाबा , पूर्वी छान होते जाण्याचा दिवस जसजसा जवळ यायचा तेव्हा किती हुरहुर व्हायची ,कधी एकदा जातो आणि माझ्या भक्तांना भेटतो असे व्हायचे " काय तो टाळ मृदूंगचा ठेका धरत म्हटलेली आरती ,डोक्यावर टोपी घालून माझ्या पुढे नतमस्तक होणारे आबालवृध्द, भरजरी शालु ,पैठणी नेसून ,साजशृंगार करून हातात ओवळणीचे तबक घेऊन वाट पाहणाऱ्या माझ्या माता बहिणी ,सभोवताली दरवळणारा धूप ,स्वच्छ नीटनेटके आसन ,सर्व काही छान होते "गणेश  भावनावश होऊन बोलत होता .मग आता ?? महादेवनी थोडे हसून विचारले "काही वर्षापासून खाली जाऊच नसे असे वाटते .हल्ली काहीजण 2/3 दिवस आधीच मला न्यायाला येतात का ?? तर म्हणे ट्रॅफिक असतो ,आणि मग मनासारखे नाचायला मिळत नाही "अरे तुमच्या समाधानासाठी मला हि शिक्षा का ?? बरे तिथे नेऊन तोंडावर रुमाल टाकून बसवतात मग कोणी लक्ष देत नाही ,साधे खायला पण देत नाहीत ,समोर बसून पत्ते खेळतात आणि चहा डोसत असतात " ."अरे हे चालणारच ,महादेवना हि आता थोडा रस वाटू लागला .काळ बदलला आहे मूला "काळ बदलला म्हणून रिवाज बदलले नाहीत ना " पूर्वी मी घरा घरात जात होतो .त्यावेळी सगळे माझ्या सेवेसी असायचे ,कोणी बाहेर पडत नाही आणि स्वातंत्रलढ्यास जनजागृतीची गरज होती म्हणून लोकमान्य टिळकांनी मला घराबाहेर काढून  सार्वजनिक ठिकाणी बसविले ,तेथे इंग्रजांविरुद्ध नाटके व्हायची ,राष्टभक्तीचे पोवाडे गायले जायचे ,माझ्या पाठींब्याने लोक पेटून उठले ,स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सर्वत्र बोलू जाऊ लागले ,भक्तांना स्वातंत्रलढ्यासाठी एक नवीन दिशा मिळाली ,कित्येक शाहिरांनी माझ्या पुढ्यात पोवाडे गायले ,बालगंधर्वांनी आपल्या गाण्यांनी रात्रभर मंडप भारावून टाकला,टिळक आगरकर ,सावरकरांची अंगावर काटा आणून देशभक्ती फुलवणारी भाषणे  ऐकली.दशावतार बघितला.खूप मज्जा असायची त्यावेळी असे वाटायचे कि घरी जाऊच नये .10 दिवसांनी परत येताना डोळ्यात पाणी यायचे ,अनेक भक्त तर हमसा हमशी रडताना पहिले आहेत मी .इथे आल्यावर  खूप चुकल्या चुकल्या सारखे वाटायचे ,परत कधी जातोय याची वाट पहायचो."अरे मग आता काय झाले "?? बाबा हळू हळू लोक सर्व रिवाज विसरू लागली ,टिळक ,आगरकर ,बालगंधर्व गेले ,स्वतंत्र मिळाले मग माझा वापर करमणुकीसाठी होऊ लागला ,रात्र रात्रभर गाणी वाजवली जाऊ लागली .आजूबाजूला कोण आजारी आहे का ,म्हातारी माणसे आहेत का याचा विचारही केला जात नाही .मोठमोठे फटाके  फुटू लागले ,माझा उंदीर तर आता माझ्याजवळही राहत नाही ,माझेही कान दुखतात हो ,कारण  माणसे बदलतात मी नाही .आता तर माझा मंडप तर राजकीय पक्षांचा आयते व्यासपीठ झाले आहे .कोणीही येतो आणि माझ्या बाजूला उभे राहून मनात येईल।ते बोलतो ,आता इथे लोकांची मने पेटवली जातात पण ती आपल्याच लोकांवर वार करण्यासाठी .रात्री आरती म्हणण्याच्या नावावर जो धुडगूस  चालतो तो तर बघण्यासारखा असतो .एखादे गाणे हिट झाले कि त्या चालीवर माझी आरती सुरु होते.माझ्या नावावर हवे ते खपविले जाते .जनजागृती होतच नाही " महादेव खरेच आता विचारात पडले "बाळा ,ह्याला कुठेतरी आपण हि जबाबदार नाही का ? आपण त्यांना बुद्धी दिली पण त्यावर कॅट्रोल ठेवला नाही ,त्यांनी त्या बुद्धीचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टीसाठी केला .पण वाईट गोष्टी लवकर पसरल्या जातात ,आपण त्यांच्यापुढे ध्येय ठेवलेच नाही ,मानव प्रगतीच करत गेला पण कुठे थांबायचे तेच अजून कळले नाही". होय बाबा खरे आहे याला आपणही जबाबदार आहोत ,भक्तांचे आपण ऐकतो आणि ताबडतोब नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध होतो .मला भेटायला येणारे सर्व सारखेच पण लोकांच्याच्या मते काही सेलिब्रेटी असतात म्हणूनही मी प्रसिद्ध होतो.10 दिवसांनी पोट भरत नाही म्हणून पुन्हा माघी गणेश नावाने पुन्हा मला बोलावण्यात येते.मला माझी सुट्टी कधीच एन्जॉय करता येत नाही ,मंडपात हल्ली काही कार्यक्रम होतच नाहीत " काय करू मी बाबा ??? आता ह्या वर्षी त्या सैराटच्या तालावर आरती ऐकायला लागेल ", तुला जावेच लागेल गणेशा नाहीतर हि लोक तुला इथे येऊन घेऊन जातील ,त्यापेक्षा तू स्वतः निघ " महादेवन निक्षूंन सांगितले आणि गणेश नाईलाजाने निघाला भक्तांना भेटण्यासाठी.

Wednesday, September 7, 2016

Saving private ryan

दुसऱ्या महायुद्धाने खूप काही दिले आणि शिकविले आपल्याला .हिटलरसारखा क्रुरकर्मा तर चर्चिलसारखा कुशल राजकारणी नेते दिले .जगाचा संपूर्ण इतिहास आणि अर्थव्यवस्था दुसऱ्या महायुद्धाने बदलली.या युद्धावर अनेक चित्रपट ,मालिका ,पुस्तके लिहिली गेली ,अजूनही बनतायत.त्यातील एक 1998 साली  बनलेला स्पीलबर्गचा" SAVING PRIVATE RYAN  "टॉम हँक्स सारखा कलाकार आणि स्पीलबर्गसारखा हरहुन्नरी दिग्दर्शक एकत्र आले कि काय घडू शकते याचे उत्तम उदाहरण
.दुसऱ्या महायुद्धात वेगवेगळ्या ठिकाणी लाडात असलेल्या रायन बंधूंपैकी तीन मुलांच्या मृत्यूची तार एकाच दिवशी त्यांच्या आईच्या हाथी पडते ,तार टेलिग्राम तर्फे हि बातमी जनरलकडे जाते .तिचा चवथा आणि शेवटचा मुलगाहि युद्धात नाहीसा झालाय .अतिशय वरच्या पातळीवरून त्या रायनला शोधून काढून त्याला घरी पोचविण्याची जबाबदारी जॉन मिलर ( टॉम हँक्स) यावर येते .तो आणि त्याची ८ माणसे रायनचा कसा शोध घेतात हे बघायलाच हवे

Saturday, September 3, 2016

पिकनिक

नाक्यावर चहा प्यायला निघतो तोच बंड्या समोर उभा ठाकला ,होता घाईतच पण मला बघून थांबला हातात  काळी बॅग होती काय होते ते मी समजून गेलो .तरीहि विचारले "काय बंड्या ,कुठे ??  "पिकनिकला भाऊ,आज सगळे जुने मित्र पिकनिकला निघालोय,हि काय तयारी ."हातातली काळी बॅग नाचवत बोलला.मी त्याला बाजूला बसवून म्हटले "अरे वा मग काय करणार पिकनिकला ??  काय काय बघणार ? प्रोग्रॅम काय आहे ?? " ह्या ,कसला प्रोग्रॅम?? मित्राचा बंगला आहे ,संध्याकाळी जायचे ,मस्त मैफिल जमवायची.एकमेकांची खेचायची, बेहोष होईपर्यंत पियाची ."अरे छान ,मग सकाळी उठून काय करणार?? " काही नाही ,स्विमिंग पूलात उड्या मारायच्या ,तिथेही पाण्यात बसून पियाची,मग जेवायचे आणि घरी निघायचे ??
मला काहीच सुचेना ,बंड्याने पिकनिकची किती सोपी व्याख्या केली होती .मी पाठीवर  थाप मारून विचारले "अरे पण आठवड्यातून 2 वेळा पितोस ना ?तरीही तिथे जाऊन तेच करणार?? मग काय भाऊ ,त्यालाच तर एन्जॉयमेन्ट म्हणतात .माझा  चेहराच पडला .
.हयाला पिकनिक म्हणतात ?पूर्वी कुठल्यातरी नवीन ठिकाणी जायचे ,तेथील प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायची ,त्यांची माहिती घ्यायची ,एकत्र बसून जेवण करायचे ,भविष्याबद्दल बोलायचे ,नवीन ध्येय ठरवायचे  असे काहीसे पिकनिकचे स्वरूप होते .पण हल्ली रात्रभर बसून पत्ते खेळायला मिळत नाही ,दारू पीयाला मिळत नाही ,घराचे कटकट करतात म्हणून पिकनिक काढली जाते .सर्व जण रात्री एकत्र बसतात ,दारूच्या बाटल्या रिकाम्या करत एकमेकांची चेष्टा करतात .एखादा काही चांगले काम करत असेल तर त्याला टार्गेट बनवून रात्रभर छळले जाते ,कोणी काही चांगले हेतू ,चांगले विषय मांडायला गेला तर त्याला आम्ही मजा करायला आलो आहोत आमचे डोके खाऊ नकोस असे सांगितले जाते.मला मान्य आहे कि मीही त्यातलाच आहे पण कुठेतरी हे थांबायला पाहिजे असे वाटते .काही ग्रुपमध्ये अतिशय उत्तम कारकीर्द असणारे मित्र असतात पण त्याचा फायदा ग्रुप करून घेत नाही आणि ते हि स्वताहून काही योजना आणत नाहीत .अरे आम्हाला वेळ नाही असे सांगून मोकळे होतात ,पण आठवड्यातून 2 वेळा दारू पियाला 2 तास वेळ कसा मिळतो याचे कारण देऊ शकत नाही.
उद्या रात्री बंड्या घरी येईल आणि परवा दिवसभर डोके धरून घरी झोपून राहील याची खात्री आहे मला आणि त्यालाही ते माहित आहे .पण हे समजून कोण घेईल ????
,