Saturday, January 30, 2021

रॉ... रवींद्रकुमार आमले

रॉ... रवींद्रकुमार आमले 
भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा
मनोविकास प्रकाशन 
रॉची स्थापना 1968 सालाची.त्या आधी देशाची फाळणी झाल्यानंतर  भारतीय केंद्रीय गुप्तचर यंत्रणा स्थापन झाली. तिचे नाव इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबी.
चीन युद्धाच्या अपयशानंतर देशाला बाह्य हेरगिरी यंत्रणेची आवश्यकता वाटू लागली. लष्करप्रमुखांनी या योजनेला मान्यता दिली आणि ती कशी असावी...?? याचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्तींनी अमेरिका आणि ब्रिटनला भेट दिली.
लालबहादूर शास्त्रीच्या अकाली निधनानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी या योजनेला मंजुरी दिली पण त्यावर पंतप्रधान कार्यालयाचे नियंत्रण असेल हे स्पष्ट केले आणि त्याची जबाबदारी रामेश्वरनाथ काव
कोण होते रामेश्वरनाथ काव ...??
रॉने स्थापने पासून कोणत्या कामगिरी केल्या.. ?? त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला .?? याचा आढावा लेखकाने या पुस्तकात घेतला आहे.
भारतात काहीही भयंकर घडले की पंतप्रधान या मागे परकीय शक्तीचा हात असल्याचा उल्लेख करतात. सामान्य नागरिकांना ते नेहमीच हास्यास्पद वाटते . पण खरोखरच परकीय शक्ती नेहमी यामागे असत. चीन,पाकिस्तान ,श्रीलंका नेपाळ नेहमीच आपल्या देशाविरुद्ध काही षडयंत्र रचत असतात. त्यांच्यावर सतत नजर ठेवणे,त्यांच्या कारवाया रोखणे तसेच त्यांच्या देशात आपले हेर घुसवून बातम्या गोळा करणे हे रॉ चे प्रमुख कार्य .
१९७१ च्या युद्धाच्या आधी काश्मीरमधून इंडियन एयरलाईन्सच्या विमानाचे अपहरण झाले . त्यात 26 प्रवासी होते.दहशतवादयानी ते विमान लाहोरला नेले .यात पाकिस्तानचा हात आहे असे इंदिरा गांधीनी जाहीर केले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी दहशतवाद्यांशी चर्चा केली नंतर 26 प्रवाश्यांना सोडून देण्यात आले आणि विमानाला आग लावली गेली. जगाला वाटले यात भारताची मानहानी झाली . पण यासर्व घटनेमागे रॉ चा हात होता. कसा ?? त्याने भारताला काय फायदा झाला ??? 
बांगला देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात रॉ ने बांगला देशाला पाठिंबा दिला.त्यांनी स्वातंत्रसैनिकाना प्रशिक्षण दिले.शस्त्र पुरवठा केला .याह्याखान पूर्व पाकिस्तानवर हल्ला करणार याची खबर इंदिरा गांधी आणि रॉ ला आधीच होती. त्यांनी आधीच आपली रणनीती ठरवली. 
 सिक्कीमच्या विलीनीकरणात रॉचा मोठा हात आहे.सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी रॉ ला काय काय करावे लागले याची रंजक माहिती मिशन सिक्कीम प्रकरणात मिळते.
मिशन काहुटा मध्ये रॉ ने पाकिस्तानात काहुटा गावी असलेल्या अणूऊर्जा प्रकल्पाचा कसा पर्दाफ़ाश केला याची माहिती मिळते .
पंजाबातील खलिस्तान चळवळ रॉने मोठ्या हिकमतीने मोडून काढली पण नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या रोखण्यात अपयशी ठरले.
10 एप्रिल 1983 ला रॉ चे प्रमुख बेपत्ता झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ते दुसऱ्या राष्ट्रात पळून गेले अशी बातमी पसरली.पण ते कुठे गेले होते..?? त्यांनी मॉरिशसचे बंड कसे मोडून काढले .. याची माहिती आपल्याला ऑपरेशन लालदोरा प्रकरणात मिळते.
श्रीलंकेतील  राजकारणात हस्तक्षेप आणि राजीव गांधींची हत्या हे रॉचे प्रमुख अपयश मानले जाते.आंतराष्ट्रीय राजकारणात भारताच्या पाठीमागे रॉ खंबीरपणे उभी आहे.पाकिस्तान नेपाळ श्रीलंका आपली शेजारी राष्ट्रे अशांत ठेवण्यात रॉचा हात आहे.
एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घटनेमागे किंवा साध्या वाटणाऱ्या घटनेमागे किती मोठा कट असू शकतो.हे या पुस्तकातून कळते.

Wednesday, January 27, 2021

परेड

परेड
चेहऱ्यावर टेन्शन दाखवतच त्याने मेजरला सवयीनुसार कडक सॅल्युट ठोकला.
"क्या बात है जोकर...?? बडे टेन्शन मे दिख रहे हो...?? घरकी याद आ रही है क्या ..."?? मेजर नेहमीप्रमाणे कडक आवाजात म्हणाला .आवाजात जरी विनोद असला तरी तो त्याच्या करड्या नजरेपर्यंत पोचत नव्हता.आवाजाची धारही कमी झाली नव्हती.
काश्मीरच्या दाट खोऱ्यात त्यांचे युनिट बरेच महिने तळ ठोकून होते. एकही दहशतवादी त्यांच्या तावडीतून जिवंत सुटत नव्हता.
त्याचे बोलणे ऐकून तो मनातच चिडला पण चेहऱ्यावर दाखवू दिले नाही .
"सर... यावर्षी सव्वीस जानेवारीला परेडमध्ये भाग घ्यायची इच्छा आहे . मुलाला आणि आई वडिलांना परेड बघायचीय .तुम्ही काही करु शकता का ...?? तो चाचरत म्हणाला .
 " साला जोकर.... गेली पाच वर्षे या जंगलात राहातोस. सरळ चालता तरी येते का तुला ...? कसली परेड ....?? चल भाग ... सव्वीस जानेवारीला इथे किती सावध राहावे लागते माहितीय ना तुला ..."?? मेजर चढ्या आवाजात बोलला तसे तो मान खाली घालून परत फिरला.
बाहेर आला तसा त्याचा फोन वाजला . पलीकडून छोटू बोलत होता.." काय झाले  पपा ..?? जायचे ना परेड पाहायला. मिळाली परमिशन ..."?? 
सहा वर्षाच्या छोटूशी खोटे बोलायचे त्याच्या जीवावर आले ."अरे मला नाही जमणार पण तुमच्यासाठी करतो काहीतरी.... "म्हणत त्याने फोन ठेवला.
सकाळी पुन्हा मेजरने त्याला बोलावले. मनात शंभर शिव्या घालत तो पुन्हा त्याच्यासमोर उभा राहिला. 
"ये लेटर ले और भाग परेड के लिये..सबको बुलाओ दिल्ली और दिखा.. अपने रेजिमेंट की ताकद..." मेजर हसत म्हणाला .
आश्चर्याचा धक्का बसून त्याने लेटर हाती घेतले आणि कडक सॅल्युट करून बाहेर धाव घेतली. डायरेक्ट लेटर घेऊन छोटुसमोर उभा राहिलो तर त्याचा चेहरा कसा होईल ..?? याची कल्पना करत त्याने स्वतःचे समान बांधायला सुरवात केली.
रात्री सर्व तयारी करून झोपायला जाणार इतक्यात मेजरसाहेबांनी सर्वाना केबिनमध्ये जमायची सूचना झाली . सर्व जमताच त्याने सर्च ऑपरेशनची घोषणा केली .पण त्याचे नाव डावलले होते.
"सर... मला ऑपरेशनमध्ये भाग घ्यायचाय ..."त्याने धीर करून साहेबाना सांगितले.
" अबे जोकर.. तुम तो छुट्टीपर हो. परेडमे शामिल हो जावो. लढाईया होती ही रहेंगी...मेजरसाहेब  नेहमीच्या करड्या आवाजात म्हणाला .
"नाही ... मी राहणार आपल्या जवानांसोबत....जिंदा राहा तो अगले साल परेडमे  जाऊंगा ..." यावेळी मात्र त्याच्या स्वर मेजरसाहेबांपेक्षा मोठा आणि करडा झाला होता.
इथे मात्र सहा वर्षाचा छोटू खुश होता .ह्या वर्षी त्याची परेड पहायची इच्छा पूर्ण होणार होती. आजी आजोबा सोबत तो दिल्ली ला जायला तयार झाला. त्याचे आजी आजोबा ही खुश होते.पोरगा सैन्यात होता पण ह्या वर्षी सव्वीस जानेवारीच्या परेडमध्ये तो दिसणार होता.त्या दिवशीच त्यांना एक पाकीट पोस्टातून आले होते. त्यात भारतीय सैन्यदलाकडून परेड पाहण्यासाठी आमंत्रण होते.आपला पोरगा साधा सैनिक असूनही भारतीय सैन्यदलाकडून आलेले आमंत्रण पाहून आजी आजोबा खुश झाले होते .तिघेही मोठ्या उत्साहाने दिल्लीला निघाले होते .
आज सव्वीस जानेवारी....दिल्लीला परेड चालू झाली होती. छोटू टाळ्या वाजवत भारतीय सैन्याचे कौतुक करत होता.आजीआजोबा मात्र आपल्या मुलाला शोधत होते.
तिकडे बेस कॅम्पवर मेजरसाहेब  टीव्हीवर ती परेड पाहत होते. त्याच्या हातात परवाच्या मोहिमेत शाहिद झालेल्या आपल्या शूर सैनिकांची नावे होती. सर्वांच्या घरी त्यांची पार्थिव पोचविण्याची व्यवस्था झाली होती . पण एक सैनिक मात्र अजूनही शवागृहात होता . कारण त्याचे आई वडील आणि सहा वर्षाचा छोटू दिल्लीला परेडचा आनंद घेत होते. आईवडील आणि मुलाची परेड पहायची आपल्या शूर सैनिकांची इच्छा त्यांनी पूर्ण केली होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, January 25, 2021

सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट

सिंगल पॉईंट कॉन्टॅक्ट
 दुपारी लाईट गेली आणि माझी झोपमोड झाली. सवयीनुसार कंपनीला चार शिव्या देऊन पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. पण गरम होऊ लागल्यामुळे झोप काही येईना.एक तास झाला तरी लाईट आले नाही म्हणून उठून बसलो.
इतक्यात सौ.बाहेरून आली आणि थोड्या काळजीनेच सांगितले की फक्त आपल्याच घरातील लाईट गायब आहे बाकी इतरांकडे आहे.
आता मात्र थोडा चिंतेत पडलो. रात्री आठ वाजता ऑनलाइन मीटिंग होती तो पर्यंत काही करणे भागच होते. ओळखीच्या एका इलेक्ट्रिशियनला फोन लावला तेव्हा महाराज नेमके गावी जाऊन बसले होते. आता मात्र मलाच काही हालचाल करणे भाग होते.
अंगावर शर्ट चढवून घराबाहेर पडलो. जवळच्या हार्डवेयर दुकानात कोणतरी इलेक्ट्रिशियन असेल याची खात्री होती.सौ. ने लाईट गेल्याचा निषेध म्हणून मला चहा द्यायला नकार दिला होता म्हणून कोपर्यावरच्या इराण्याकडे घुसलो आणि "भाऊसाहेब...."अशी दमदार हाक कानावर पडली.
कोपऱ्यातील टेबलवर आमचा केके बसला होता.समोर चहाचा कप हातात सिगारेट आणि चेहऱ्यावर तेच मिश्किल हासू.चहाला कंपनी मिळाली म्हणून मीही खुश झालो.आणि उत्साहाने त्याच्यासमोर बसलो.
केके उर्फ कमलाकर कदम.....नाव मोठे म्हणून आम्ही केकेच म्हणतो. त्याला आवडत नाही केके ऐकायला पण आमच्यासमोर काही चालत नाही .
"बोल भाऊ ... कुठे निघालास...?? वेटरला चहाची खूण करीत मला प्रश्न केला . 
"अरे इलेक्ट्रिशियन हवाय....लाईट गेलीय . संध्याकाळी ऑनलाइन काम आहे ..."मी पटकन बोलून गेलो. च्यायला ह्याने सुरवात केली तर माझे काम बाजूलाच राहील...मी मनात म्हटले 
"बस ... !! छद्मीपणे हसून त्याने फोन हातात घेतला . "पाच मिनिटात तुझे काम होईल...."असे म्हणत फोन कानाला लावला . मग समोरच्याला सूचना देत त्याने माझा अड्रेस त्याला सेंड केला .
"अरे त्याला भेटतो मी ... काही मदत किंवा सामान आणावे लागेल.....मी काळजीने म्हणालो 
"भाऊ ... बस शांतपणे .तो सगळे करेल फक्त काम झाल्यावर वहिनीला चेक करायला सांग आणि त्याला ऑनलाइन पेमेंट कर ....." चहाचा एक घोट घेत त्याने सांगितले.
"हुश्शह ....करीत मी आरामात बसलो.डोक्यावरचे टेन्शन गेले.
"मग ..... आता काय चालू तुझे केके.."?? मी सहज स्वरात विचारले. 
केके हा कमलाकर अकॅडमीचा मालक . जे विद्यार्थी 40ते 45% मार्क मिळवतात त्यांना समाजात उभे करायची जबाबदारी तो घेतो . त्यांना ताठ मानेने मेहनत करून जगायला शिकवतो.
"ह्या लॉकडाऊनमुळे प्रॉब्लेम झाले असतील खूप.मुले आली नसतील फारशी ....".मी चहाचा घोट घेत विचारले.
"नाय रे....!! .तो टिपिकल हेल काढीत म्हणाला. उलट खूप बिझी होतो आम्ही.."
"म्हणजे कसे ...."?? मी आश्चर्याने विचारले.
"भाऊ.... मी या लॉकडाऊनमध्ये सिंगल कॉन्टॅक्ट मोहीम राबवली.तुला माहितीय माझ्याकडे बरीच माणसे आहेत. लॉक डाऊनमुळे सगळेच घरी बसून. मग मी एक आयडिया काढली. सगळ्या सोसायटीत....सगळ्या चाळीत... माझा फोन नंबर दिला.काही काम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुमचे काम करून देईन..."
"अरे... पण बाहेरच्यांना सोसायटीत शिरायला ही परमिशन नव्हती..." माझ्या शंका सुरू .
"बरोबर आहे भाऊ ...पण काही गोष्टीला पर्याय नसतो .तुला ती कोपर्यावरची पारिजात माहितीय.तिथे तिसऱ्या मजल्यावर म्हातारी सिरीयस झाली. घरात म्हातारा म्हातारी दोघेच .शेजारचे दरवाजे बंद.मग त्यांनी मला फोन केला . दहा मिनिटात माझ्या पोरांनी गाडी तिच्या दारात आणली आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिटही केले .नंतर सर्व काळजी आमच्या पोरांनी घेतली.
"अरे वा ...!! पैसे भरपूर घेतले असशील मग .."मी हसत विचारले 
"अरे भाऊ ....त्यांना मदत करणारे बेकारच होते की. तो ड्रायव्हर, चोवीस तास हॉस्पिटलमध्ये राहणारे दोघे, सर्वच घरी.आणि ह्या आजीकडे भरपूर पैसा.काय झाले थोडे जास्त घेतले तर सेवाही तितकीच केली ना .असेच अनेक फोन मला येतात . कोणाला औषध हवी असतात ,कोणाला जेवण तर कोणाला गाडी. काहीजणांची पाण्याची पाईप लाईन तुटते तर काहींची वॉशिंग मशीन बिघडते . मला फोन आल्यानंतर मी सर्व कामे करून देतो.अरे भाऊ ...काहींचे अंत्यसंस्कारही मी केले तर काहींच्या तेराव्यासाठी भटजी शोधून दिले..." ताठ मान करीत के के म्हणाला .
"धन्य आहेस तू ..." मी हात जोडून म्हणालो.
"अरे यात काय मोठे ....??. आता तुझेच उदाहरण घे. आज तुला इलेक्ट्रिशियन भेटला नसता तर रात्रभर अंधारात राहावे लागले असते . तुझी ऑनलाइन मीटिंग ही झाली नसती .शिवाय इलेक्ट्रिशियन शोधायला वेळ लागला तो वेगळाच . एका फोनवर तुझा प्रॉब्लेम सोडवला मी वर तुला चहाही पाजला . खरे तर आभार मान माझे ....केके हसत म्हणाला.
"खरे सांगू भाऊ लोकांकडे पैसे भरपूर आहेत पण सर्व्हिस मिळत नाही .मी जास्तीतजास्त सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतोय..." अचानक केके थोडा गंभीर होत म्हणाला .
"खरंय मित्रा... तू आज या वाईट परिस्थितीत ही जगण्याचा नवीन मार्ग शोधलास. इतकेच नव्हे तर बेकराना कामे दिलीस . यातूनच खूप काही शिकलो मी .यापुढे काही लागले तर तुलाच फोन करेन मी फक्त मित्र आहे म्हणून पैश्यात सवलत देत जा ....असे म्हणून हसत बाहेर पडलो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, January 21, 2021

रावण....अमीश

रावण......अमीश 
आर्यावर्ताचा शत्रू
रामचंद्र मालिका पुस्तक 3
ऋषी विश्रव आणि कैकसीचा पहिला पुत्र रावण जन्मतः नागा होता.नागा म्हणजेच वैगुण्यासह जन्मलेले बालक. ह्यांना समाजात हीन दर्जाची वागणूक मिळते. म्हणूनच विश्रव ऋषी रावणाचा राग करायचे.
त्याचा भाऊ कुंभकर्ण हाही नागा म्हणूनच जन्माला आला . त्याला जन्मतः ठार मारण्याची योजना होती. पण रावणाने मारीचमामाच्या मदतीने त्याचे प्राण वाचविले आणि सर्वजण परागंदा झाले.
रावण लहानपणापासूनच चतुर आणि क्रूर होता. देवी कन्याकुमारी उर्फ वेदवतीवर त्याचे मूक प्रेम होते.पुढे त्याने लंकेचा धनाढ्य व्यापारी कुबेर याच्याशी मैत्री करून त्याचे राज्य हळू हळू बळकाविण्यास सुरवात केली. त्याने मोठ्या चतुराईने सप्तसिंधूचा सम्राट राजा दशरथ याचा पराभव करून संपूर्ण समुद्री व्यापार आपल्या ताब्यात घेतला आणि पुढे अधिकृतपणे लंकेचा राजा झाला . कुंभाकर्णाची त्याच्यावर निस्सीम भक्ती होती.
मलयपुत्रांकडे अतिशय बहुमूल्य धातू आणि औषधे होती. रावण आणि कुंभाकर्णाला लागणारी औषधे ही मलयपुत्रांकडे होती. ऋषी विश्वामित्र मलयपुत्रांचे प्रमुख . सातवा विष्णू ठरविण्याचा अधिकार ही त्यांचाच होता . 
सीता हीच सातवी विष्णू असेल असे रावणाला समजले. तिला ताब्यात घेतले तर मलयपुत्रांची सर्व औषधे ,महत्वाची खनिजे आपल्याला मिळतील असा रावणाचा डाव होता. सीतेच्या अपहरणाची योजना त्याने बनवली आणि त्यात तो यशस्वीही झाला ..
आता पुढे काय ....???
अमीशच्या रामचंद्र शृंखलेच्या तिसऱ्या पुस्तकातून एक वेगळा रावण आपल्यासमोर उभा राहतो. तो उत्कृष्ट वादक आहे ,गायक आहे ,चित्रकारही आहे. अर्थात हा रावण खलनायकच आहे .त्याची सीतेला पळविण्याची अनपेक्षित आणि वेगळीच कारणे आपल्यापुढे येतात.एखाद्या व्यक्तीला महान बनवायचे असेल तर त्याने काहीतरी भरीव लक्षात येण्याइतपत कार्य केले पाहिजे आणि ते भारी कार्य करण्यासाठी परिस्थिती निर्माण केली पाहिजे असे काहीसे सूत्र तिसऱ्या पुस्तकात स्पष्ट होते. सीता कोण याचेही रहस्य उलगडले जाते .
अपेक्षेपेक्षा वेगळेच रामायण आपण अमीशच्या पुस्तकातून वाचतो आणि अनपेक्षित धक्के मिळत जातात. पण हे रामायण वाचताना कंटाळा येत नाही उलट उत्सुकता ताणून धरते.

Monday, January 11, 2021

सीता.. मिथिलेची योद्धा ....अमीश

सीता.. मिथिलेची योद्धा ....अमीश
रामचंद्र शृंखला .....२
अनुवाद.......संध्या पेडणेकर
विष्णू ही एक पदवी आहे.ही पदवी जगात चांगली आणि महान कामे करणाऱ्या नेत्याला दिली जाते. ते लोकांना योग्य मार्ग दाखवितात.त्यांना नवीन जीवनशैली देतात. याआधी सहा विष्णू झाले.सहावे विष्णू परशुराम होते. आता सातव्या विष्णूचा शोध चालू आहे. परशुरामाचे वंशज मलयपुत्र विश्वामित्रांवर ही जबाबदारी आहे.त्यांच्यामते सीता यासाठी योग्य आहेत. तर ऋषी वशिष्टांच्या मते राम हा विष्णू आहे . 
सीता जमिनीच्या भेगेत जनक राजाला सापडली होती. ती त्यांची दत्तक मुलगी आणि सध्या मिथिलाची पंतप्रधान आहे .ती एक घातकी कमांडोही आहे .सर्व शस्त्रांच तिने तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे . ती राजनीतीही उत्तम जाणते. मिथिला नगरीचा विकास तिने आपल्या कल्पकतेने केला आहे. राम आणि आपण दोघांनी विष्णू बनावे असे तिला वाटते. त्यासाठी रामाने आपल्याशी लग्न करावे अशी तिची योजना आहे. तिने स्वयंवर आयोजित केले आणि राम त्यात भाग घेईल अशी व्यवस्था केली. राम तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे .
स्वयंवरात रावणाला बोलावले जाते आणि नंतर अपमानित करून बाहेर काढण्यात येते.त्यामुळे रावण चिडून मिथिलेवर हल्ला करतो .त्याच्या विरुद्ध राम संहारक अस्त्र वापरतो ज्याला रुद्रदेवाने बंदी घातली आहे. शिक्षा म्हणून रामाने चौदा वर्षे वनवास भोगण्याची तयारी केली आणि दशरथ राजाच्या विरोधाला न जुमानता वनवासाला निघतो . सोबत सीता आणि लक्ष्मणही आहेत. 
रावण ही विष्णूच्या  शोधात आहे . त्यासाठी तो सीतेच्या मागावर आहे.त्यातच शुखपर्णा लक्ष्मणाच्या हातून जखमी होते आणि रावण रामाच्या निवासस्थानावर हल्ला करतो.सीता अतिशय शूरपणे रावणाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देते.पण कमी मनुष्यबळामुळे तिला शरण जावे लागते .रावण तिला पुष्पक विमानातून लंकेला घेऊन जातो .
अमीशच्या या पुस्तकातून एक वेगळी धीट चतुर राजकारणी सीता आपल्यासमोर येते .

Wednesday, January 6, 2021

इजिप्शियन ममीचे रहस्य.... विजय देवधर

इजिप्शियन ममीचे रहस्य.... विजय देवधर
साकेत प्रकाशन 
यात मागील शतकात घडलेल्या अदभुत सत्यकथा आहेत. एकूण सोळा सत्यकथा आहेत.
काही भारतात घडलेल्या तर काही जगभरातील विविध देशात. पण अनपेक्षित असे काही नाही.
 अतींद्रिय शक्तीद्वारे लावलेल्या गुन्ह्याचा शोध असलेली एक कथा.
लिंकनचे अशुभ सूचक स्वप्न या कथेत लिंकन राष्ट्राध्यक्ष असताना त्याला आणि त्याच्या पत्नीला काही अशुभ संकेत होत होते. याविषयी रंजक माहिती आहे.
 काहीजणांना सहावे इंद्रिय असते आणि ते आधीच  संकटाची सूचना देते अशी एक कथा इशारा सहाव्या इंद्रियांचा या कथेत आहे. 
परकाया प्रवेश या घटनेवर उसना देह अशी कथा आहे.
अजब द्विरूपा या कथेत एका शिक्षकेच्या शरीरातून तिचीच प्रतिकृती बाहेर पडून काय करते याची कहाणी आहे .
यातील सर्व कथा  विलक्षण आहेत.पण वाचताना तितकी मजा येत नाही .

इश्वाकूचे वंशज .....अमीश

इश्वाकूचे वंशज .....अमीश
रामचंद्र शृंखला...१
अनुवाद...... संध्या पेडणेकर
अमीशच्या लेखणीतून उतरलेला आधुनिक राम अशी या पुस्तकाची ओळख करता येईल.पुराणकाळातील पूज्यनिय व्यक्तीला शास्त्रीय चौकटीत बसविण्याचे काम लेखक उत्तम प्रकारे करतो.सगळ्या भारतीयांचा पूजनीय आदर्श पुरुष राम आपल्या समोर लेखक उभा करतो आणि आपल्या मनातील रामायणाच्या कथेला छेद देतो.
अयोध्येच्या राजा आणि सम्राट दशरथ लंकेचा राजा कुबेर याच्याशी झालेल्या युद्धात पराभूत होतो.कुबेराचा सेनापती रावण याच्या कुशल युद्ध कौशल्यामुळे दशरथ राजाचा आयुष्यात पहिल्यांदा पराभूत होतो.या युद्धात दशरथाची पट्टराणी कैकयी आपलाजीव धोक्यात घालून त्याला वाचवते.
त्याचवेळी अयोध्येत पहिल्या पत्नीच्या पोटी रामाचा जन्म होतो.पण अयोध्येच्या पराभवामुळे राम अपशकुनी समजला जातो आणि दशरथाच्या तिरस्काराला कारणीभूत होतो.
आपल्या मनात रामानंद सागरचे रामायण असेल तर हे पुस्तक वाचताना आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतील. यातील नायक आणि इतर सहज सोपी भाषा बोलतात . ते  अंतर किलोमीटर मध्ये मोजतात आणि वेळेला तास मिनिट ही म्हणतात . यातील राम लक्ष्मण भरत एकमेकांना एकेरी नावाने हाक मारतात. 
रामाला चौदा वर्षे वनवास का भोगावा लागला याची कारणे वेगळी आहेत .तर मंथराची वेगळीच ओळख आहे . संपूर्ण पुस्तकात रामाला एका विशिष्ठ हेतूसाठी तयार केले आहे असे जाणवत राहते . यात ऋषी वशिष्ठ आणि ऋषी विश्वामित्र यांच्याही वेगळ्या भूमिका आहेत. 
लेखकाने  रामाला कायद्याचा आदर आणि कायदा कठोरपणे राबविणारा नगरप्रमुख बनविले आहे . कायद्यापुढे सगळे समान हेच त्यांचे प्रमुख सूत्र आहे .
दशरथाचे रावणाशी युद्ध येथून पुस्तकाची सुरवात होते आणि सीतेचे अपहरण येथे पुस्तकाचा शेवट होतो.
रामाचे प्रशिक्षण.. युद्धनीती.. कायद्याचे पालन करण्यासाठी कठोर भूमिका घेणारा राम ... सीतेचे स्वयंवर या सर्व प्रसंगाचे लेखकाने अतिशय बारकाईने वर्णन केले आहे. 
एक वेगळा राम आणि रामायण वाचताना आपल्याला कुठेही कंटाळा येत नाही .

Friday, January 1, 2021

दोस्ती बडी चीज है .....६

दोस्ती बडी चीज है .....६
साल १९९०
खरे तर त्या दोघीही माझ्यापेक्षा वयाने मोठ्याच. कॉलेजमध्ये बदली क्लार्क म्हणून आलेल्या.पण हळू हळू ओळख झाली आणि मॅडमच्या जागी कधी एकेरी उल्लेख होऊ लागला ते कळलेच नाही .
एक संगीता तर दुसरी सुनीता.
संगीता बडबडी...अग्रेसिव्ह .. ती सतत बोलत असते.झोपते....तेव्हाच तिची बडबड बंद असते असे आमचे म्हणणे.तिला फोन करायचा तर हातात दीड दोन तास तरी हवेच. 
तर सुनीता बहुलीसारखी दिसणारी शांत....हळुवार हसणारी. मोजून मापून बोलणारी. दोघांनाही माझे कान पकडण्याचा आणि टपल्या मारायचा अधिकार होताच आणि अजूनही आहे.
आम्ही तिघेही विरुद्ध स्वभावाचे .पण मैत्री जुळायला ट्युनिंग लागते आणि ते आमच्यात आहे. 
पुढे दोघीही कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर निघून गेल्या . पण संगीता माझ्या सतत संपर्कात होती. शक्य  असेल तेव्हा भेटायचो .घरी येणे जाणे होतेच . आयुष्यातील सुख दुःख ,चढ उतार आम्ही एकत्र पाहिले.. अनुभवले..शेयरही केले. चांगल्या वाईट क्षणांचे आम्ही साक्षीदार आहोत.
सुनीता मात्र गायब झाली. बरीच वर्षे आम्ही तिला शोधत होतो.एक दिवशी अचानक तिचा फोन नंबर मिळाला आणि पुन्हा संपर्क झाला.
सुनीता एका मूक बधिर शाळेत टीचर आहे.आमचे स्टार्ट गिविंग फौंडेशन नुकतेच सुरू झाले होते . तिला ते आवडले आणि आमच्या स्टार्ट गिविंग फौंडेशनची सक्रिय कार्यकर्ती झाली. समाजसेवेची आवड असल्यामुळे मनापासून आम्हाला मदत करते. आमच्यासोबत कार्यक्रमाला हजर राहते . 1990 पासून मैत्रीचा हा प्रवास चालू आहे . कधी काही वाटले तर फोन करणे मन मोकळे करणे चालूच असते.
परवा नेहमीप्रमाणेच सुनीताचा फोन आला . 31 डिसेंबर संगीताच्या घरी साजरा करायचा का ...?? अर्थात माझा होकार होता. तसेही दोन वर्षे तिला भेटलो नव्हतोच . मग 31 ला सकाळीच तिच्या घरी हजर झालो . मग चालू झाली बडबड ,हास्य विनोद ,जुन्या आठवणी मग छान शाकाहारी जेवण पुन्हा टेरेसवर बसून गप्पा .पाच कधी वाजले कळलेच नाही . वर्षातून दोन वेळा तरी भेटूच असे ठरवूनच तिथून निघालो .
दोस्ती बडी चीज है.....😀😀😀😀
© श्री. किरण कृष्णा बोरकर