Saturday, April 29, 2017

अ गोल्डन एज

अ गोल्डन एज ...तहमिमा अनम  तेच दिन सोनेरी ...अनुवाद  भारती पांडे 
पूर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या  बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संग्रामची ही कहाणी .१९७१ साली  रेहना आणि तिची दोन मुले ,जी स्वातंत्रसंग्रामात आघाडीवर आहेत त्यांच्याभोवती ही कहाणी फिरते .अश्या संग्रामात कुटुंबाला किती यातना भोगाव्या लागतात किती जणांना आहुती द्यावी लागते ,याचे प्रभावी चित्रण लेखिकेने केले आहे.
  द कोस्टा फर्स्ट नोव्हेल अवॉर्ड आणि द गार्डीयन फर्स्ट बुक अवॉर्ड यांच्या यादीत स्थान मिळवलेली अव्वल दर्जाची कादंबरी .
भारतीय स्वातंत्रलढ्यातही अश्या कित्येक कहाण्या आहेत ज्या अजूनही बाहेर आल्या नाहीत .

Thursday, April 27, 2017

अ डेलिकेट त्रुथ ...

अ डेलिकेट त्रुथ ...जॉन ली कॅरे .अनुवाद उषा तांबे
ऑपरेशन वाइल्डलाईफ ???? काय आहे हे ऑपरेशन ज्याची खबर यात सामील असलेल्या परराष्ट्र मंत्र्याच्या खाजगी सचिवालाही माहीत नाही .आणि एकमेकांशी संबंध नसलेली भविष्यात ही संबंध येणार नाही अशी माणसे यासाठी निवडली गेली आहेत .जिब्राल्टर या ब्रिटिशांच्या महत्वाच्या ठाण्यावर ही दहशतविरोधी मोहीम पार पडते .शस्त्र खरेदी विक्री करणाऱ्या दलालांवर ही कारवाई असते . अतिशय गुप्त असे कारवाईचे  स्वरूप असते .पण अचानक तीन वर्षांनी ही कारवाई उघडकीस येते आणि खाजगी सचिव या प्रकरणाने हादरून जातो .खरे तर हे पुस्तक अतिशय गुंतागुंतीचे आहे .सावधपणे आणि लक्ष देऊन वाचल्यास यातील रहस्य अनुभवता येते .विसाव्या शतकातील उत्तरार्धात ब्रिटनमधील सर्वात महत्वाचा कादंबरीकार असे जॉन ली कॅरेला म्हटले जाते .

Monday, April 24, 2017

सेमिनार

सेमिनार अटेंड करताना समोरची स्त्री कितीही सुंदर आणि टंच असली तरी झोप काही आवरत नाही . हाच अनुभव मी घेत होतो .
बरे ज्या विषयावर हा सेमिनार होता त्याचा आणि माझा काहीच संबंध नव्हता . पण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भरपूर नाश्ता ,दुपारचे जेवण जेवून आता मला सुस्ती आली होती . ह्या सेमिनार मुळे बऱ्याच जणांचा फायदा होणार असला तरी मला काहीच फायदा होणार नव्हता . खरेच अश्या सेमिनार बैठकीतून काय मिळते . शेवटी निर्णय हे परिस्थिती नुसार घ्यावे लागतातच . बैठक ,प्रवचन या गोष्टीला आता सेमिनार असे गोंडस नाव दिले गेले . आपण कसे वागावे ,कसे बोलावे हे समोरील व्यक्ती अधिकारवाणीने आपल्याला सांगत असतो . पूर्वी दाढी वाढवून गळ्यात हार घालून भारतीय बैठकीवर बसलेला साधू किंवा बुवा असायचा आता त्याची जागा सूट बूट घालून चकाचक गुळगुळीत चेहरा असणाऱ्या माणसाने घेतली आहे . तर कधी कधी सुंदर स्त्री आपल्या गोड आवाजात बोलत असते . मुख्य म्हणजे सगळे आपल्याला माहीत असते पटत ही असते पण ते दुसऱ्याच्या तोंडून ऐकायला काही काळ बरे वाटते ,जेवण झाल्यावर ह्या गोष्टी ऐकता ऐकता कधी झोप येते ते कळत नाही . माझा मुद्दा असा होता कोणत्या सेमिनार ,ट्रेनिंग साठी कोणती योग्य व्यक्ती असावी . एखादा मेन्टेनन्सचा असेल तर त्याला मशीनचे ट्रेनिंग द्यावे की तत्त्वज्ञानाच्या सेमिनारमध्ये बसवावे . किंवा hr वाला असेल तर त्याला कोणत्याही ट्रेनिंग ला पाठवावे का ?आता ह्या सेमिनारवरून आल्यानंतर मी थोडाच शिव्या देऊन काम करायचे थांबविणार आहे ???😊😊
(C) श्री.किरण बोरकर

Friday, April 21, 2017

नो कम बॅक्स ...फ्रेडरिक फॉरसिथ

नो कम बॅक्स ..फ्रेडरिक फॉरसिथ...अनुवाद ..विजय देवधर
दहा अतिशय गाजलेल्या रहस्यकथा . प्रत्येक कथा वेगळी आणि अनपेक्षित शेवट असणारी . एकदा वाचायला घेतलेली कथा पूर्ण झाल्याशिवाय पुस्तक खाली ठेवूच शकणार नाही .

Sunday, April 16, 2017

भावना

काल परत चार्ली चॅप्लिनचा सिटीलाईट पाहिला . भावना व्यक्त करायला संवादाची गरज नसते तर नुसते डोळे ,स्पर्श याद्वारेही व्यक्त करता येतात हे हा माणूस दाखवून देतो .
खरेच फार पूर्वीपासूनच असे चालत आहे . एकत्र कुटुंबीपद्धतीत स्त्रीला आपल्या नवऱ्याशी बोलणे शक्य होत नसे .त्यावेळी रूढी परंपरा ,संस्कार याचा पगडा होता .तेव्हा ती आपल्या डोळ्यातून नवऱ्याशी बोलायची .तोही आपल्या डोळ्यातूनच भावना व्यक्त करायचा मग ते प्रेम असो कौतुक असो की राग . चित्रपटातही तेच चालायचे . नायिका दाराआडून आपल्या नायकाशी डोळ्यांनीच संवाद साधायच्या . मग परिस्थिती सुधारत गेली . कुटुंबे विभक्त झाली . शिकलेली बाई बायको बनून घरात आली . ती मोठ्यांचा मान ठेवते पण घरातील न पटणाऱ्या गोष्टीला विरोध ही करू लागली आपली मते स्पष्टपणे मांडू लागली . आता नवरा बायको बिनधास्त हातात हात घालून फिरू लागले . वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा स्पर्श अनुभवाला जाऊ लागला. तो कधी आईच्या मायेचा ,भावाच्या प्रेमाचा ,मुलावरच्या वात्सल्याचा तर नवऱ्याचा अंगावर रोमांच उभे करणारा  आणि कधी कधी परक्याकडून जाणवणाऱ्या वासनेचा . चित्रपट ही आता बराच सुधारला . घरात कोणी नाही पाहून नायक नायिकेला मिठीत घेऊ लागला ,तर रस्त्यावरून अपरात्री जाणाऱ्या मुलीचा हात खलनायक धरू लागला .
पुन्हा काही वर्षे गेली .आता कुटुंबातही विभक्तपणा आला . नवरा बायको मुलगा असे कुटुंब असतानाही प्रत्येक जण एकटे राहू लागला . नवरा बायको दोघेही कामावर .मुले त्यांच्या विश्वात रमलेली . मग त्या स्पर्शाची जागा कॉम्पुटर आणि मोबाईलने घेतली . नवरा बायको मुले फॅमिली ग्रुप मधून एकमेकांशी संवाद साधू लागले . घरी येऊन प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा चाटद्वारेच बोलू लागले .मी निघालोय ,जेवण तयार ठेव .मुलगा अभ्यास करतोय का ? परीक्षा कधी आहे ??असे प्रश्न नवरा बायकोला आणि मुलाला मोबाइलद्वारे विचारू लागला .समोरासमोर न येता न बोलता स्पर्श ही न करता कश्या भावना व्यक्त कराव्या हे मोबाईल शिकवू लागला . त्याने राग ,प्रेम ,आनंद या सर्व भावनांना चित्राचे रूप दिले .चॅटिंग मधूनही आपण उत्तमप्रकारे आपल्या भावना व्यक्त करू लागलो .नवऱ्याचा आय लव्ह यु आणि त्याच्याबरोबर हृदयाचे चिन्ह असा मेसेज आला की बायको हुरळून जाते . तिच्या अंगावर अजून रोमांच उठतात .
शेवटी काय तर भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे महत्वाचे.
पण हे योग्य की अयोग्य हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे .
(C) श्री. किरण बोरकर

तो एक पाकिस्तानी... डग्लस फ्रान्झ

तो एक पाकिस्तानी... डग्लस फ्रान्झ / कॅथरीन कोलिन्स अनुवाद ..शेखर जोशी
  पाकिस्तानच्या अणुबॉम्ब निर्मितीचा जनक अब्दुल करीम खान ( ए. क्यू. खान ) याची ही सत्यकथा . खान हा पक्का भारतद्वेष्टा आणि त्या द्वेषापायी त्याने अणुबॉम्बच्या  निर्मितीत हात घातला .इतकेच नव्हे त्याने जागतिक पातळीवर अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा काळाबाजार सुरू केला .त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी इराण, लिबिया, उत्तर कोरिया अश्या देशांना आपले तंत्रज्ञान विकले होते . पाकिस्तानच्या अणूक्षेत्रातील त्याचा उदय आणि अस्त याची रसभरीत ही कहाणी आहे .

Friday, April 14, 2017

मुलगी झाली हो

"अरे तो बाळा बघ बाहेर आहे ,बोलावू का त्याला ? असे म्हणताच  विक्रम ने ऑम्लेट पावचा तुकडा तोंडातून खाली काढला आणि मनापासून एक शिवी मला दिली .
रविवारी नेहमीप्रमाणे आम्ही इराण्याकडे  नाश्ता करायला बसलो  होतो . रविवारी  घरी नाश्त्याला सुट्टी द्यायची असे आमचे पूर्वीपासूनच ठरले होते  आणि आळीपाळीने बिल भरत होतो . आज बिलाची पाळी विक्रमची होती म्हणून त्याला संताप आला होता.
तरीही मी बाळाला हाक मारून बोलावले . बाळा तसा आमचा लहानपणापासूनचा मित्र .थोडा पुरोगामी विचारांचा ,घरचे वातावरण ही तसेच.  हा सरकारी नोकर. आपण बरे आपले काम घर बरे अश्या वृत्तीचा .कधीतरी येऊन गप्पा मारायचा .विक्रमशी लांबच राहायचा . मी हाक मारताच बाळा आत आला आणि बसला.
"काय रे बाळा गेले काही दिवस बघतोय खूप उदास आणि टेन्शन मध्ये दिसतोस काय झाले ?? तसा बाळा हसला," अरे सुमीचे लग्न ठरले आहे त्याचे टेन्शन
"तुला कसले टेन्शन रे तिचे? नावाला बाप तू तिचा . काय केलेस तिच्यासाठी ??मुळात तुला मुलगी नकोच होती पण झाली आणि तुझ्या गळ्यात पडली . पाच दिवस सतत दारू पित होतास ते विसरलास का ??विक्रम चा पट्टा सुरू झाला.
" हो खरे आहे .पहिली मुलगी झाल्याबरोबर माझा मूडच गेला खूप निराश झालो आई बापाची इच्छा होती मुलगा व्हावा आमच्या घरात सर्वाना पहिला मुलगा मग माझ्याच बाबतीत का असे ? मग केवळ एक उपचार म्हणून पितृत्व स्वीकारले . सगळा राग बायकोवर काढायचो . मुलीला नजरेसमोर फार काळ ठेवायचो नाही . तिच्या पालनपोषणाची फक्त आर्थिक जबाबदारी मी घेतली बाकी सर्व बायकोवर सोपवले . हळू हळू सुमन मोठी झाली तेव्हा तिला जाणवू लागले इतरांसारखे आपले वडील आपल्याशी वागत नाही . आपला घरातील वावर अस्वस्थ करतो त्यांना . मग ती दबूनच राहू लागली . मी समोर आलो की तणावाखाली यायची . त्यामुळे एकलकोंडी बनली . हे पाहून मला अजून संताप यायचा . च्यायला मुलगा असता तर कुठच्या कुठे गेला असता पण ही मुलगी ?  तरीही बुद्धिबळात महाराष्ट्रातून पहिली आली . ह्या बैठ्या खेळाचे किती कौतुक करायचे .माझी प्रतिक्रिया पाहून तिने तेही सोडून दिले . आमच्या ऑफिस च्या आजूबाजूला बिनधास्त वावरणाऱ्या मुलांच्या बरोबर ,चित्रविचित्र कपडे घालून वावरणाऱ्या मुली पाहून मला अजून संताप यायचा . अश्याच वागतात का ह्या मुली ?? माझीही अशीच वागेल ???
शेवटी लग्न करायचे ठरल्याबरोबर आलेल्या स्थळाला होकार दिला आणि लग्नाच्या तयारीला लागली . पण आज तिचे लग्न ठरले हे ऐकून  का कोण जाणे आयुष्यात एक पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटली .घरात येताच खाली मान घालून कोपऱ्यात उभी राहणारी ती सुमा आठवू लागते .  मनात इच्छा नसताना तिचा वावर अनुभवायचो पण आता तीच दिसणार नाही . जाईल लग्न होऊन ती पण मला अस्वस्थ करून जाईल . एकदा चुकून तिचे खळखळून हसणे ऐकले होते मी . काळजात आता कळ उठते ते आठवून . आणि त्यात काल एक आघात झाला ,माझ्या बायकोने पहिली मुलगी होताच माझी अवस्था पाहून सरळ ऑपरेशन करून टाकले कदाचित दुसऱ्यांदा मुलगी झाली तर माझ्या हातून काही घडू नये म्हणून . खरेच भाऊ इतका दुष्ट आहे का मी ??
"प्रश्न तुझ्या दुष्टपणाचा नाही बाळा तर तुझ्या पुरोगामी विचारांचा आहे . मुलगा पाहीजे मुलगी  काय कामाची ?? तू मुलीचा कधीच छळ केला नाहीस पण प्रेमाने कधी जवळही घेतले नाहीस . तुझा अहंकार आड आला प्रत्येकवेळी . तुला चांगले माहीत आहे सुमी किती गुणाची मुलगी आहे पण तू ते कधी खुलेआम मान्य केलेस नाही आणि मुलगा मुलगा काय घेऊन बसलास आमचे चिरंजीव बघ आताच बोलू लागले की मी परदेशात स्थायिक होणार ".
", बरोबर आहे तुझे भाऊ ,माणूस नजरेआड झाला की त्याची किंमत कळते हे खरे आहे . म्हणूनच मीआजपासून बदलायचा प्रयत्न करणार "
" .अरे वा मस्तच!! मग आता या नाश्त्याचे बिल तू भरून टाक" असे विक्रम बोलताच आमच्या हास्याने हॉटेल हादरून  गेले .

(C) श्री.किरण बोरकर

Saturday, April 8, 2017

अ टाइम टू किल .

अ टाइम टू किल .....जॉन ग्रिशम ..अनुवाद .. बाळ भागवत
अंमली पदार्थ विकणाऱ्या त्या दोन गोऱ्या तरुणांनी दहा वर्षाच्या काळ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून ,गंभीर मारहाणहि केली .मिसीसिपी राज्य ह्या घटनेमुळे हादरून जाते .मग मुलीचा बाप त्या गुन्हेगारांना गोळ्या घालून ठार मारतो .पण हे राज्य गोऱ्यांचे आहे ,त्यांनी काही केले तरी चालेल ,पण काळ्या लोकांनी असे कृत्य केले तर त्यांना मान्य नाही .आणि मग सुरु होत जाळपोळ ,दंगल ,गोरे विरुद्ध काळे . बचाव पक्षाच्या वकिलालाहि स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागते . नेहमीप्रमाणेच जॉन ग्रिशम  यांची कोर्ट खटल्यावर आधारित थरारक कादंबरी

Tuesday, April 4, 2017

पक्या

संध्याकाळी घरी येताच सौ.ने सांगितले "आहो ,प्रकाश भाऊजी आलेत ,आणि तुम्हाला घरी बोलावले आहे "
ते ऐकूनच प्रवासाचा क्षीण कुठल्या कुठे पळून गेला . प्रकाश उर्फ पक्या आमचा बालपणापासूनचा मित्र . एकत्र वाढलो ,खेळलो ,शिकलो . तो हुशार ,आई वडील शिक्षक त्यामुळे पुढे शिकला आणि चांगली नोकरी हि लागली . त्यातून तो पुढे परदेशात गेला आणि बरीच वर्षे तिथेच राहिला . मध्येच एकदा महिनाभर आला आणि लग्न करून  बायकोला घेऊनही गेला . आज जवळ जवळ 15 वर्ष तो बाहेर होता ,कधीतरी 15 दिवसासाठी इथे यायचा . पण आल्यावर मला आणि विक्रमला भेटल्याशिवाय जायचा नाही.
मी आणि विक्रम त्याला भेटायला गेलो . आम्ही घरात शिरलो तेव्हा एकप्रकारची शांतता जाणवली .वातावरणात थोडा तणाव होता . आम्हाला बघून प्रकाश खुश झाला . विक्रम तर नेहमीच्या शैलीत" पक्या !! म्हणत मिठीत शिरला.
"चल बाहेरच बसूया" असे म्हणत पक्या बाहेर घेऊन आला .
मस्तपैकी कट्ट्यावर मांडी घालून  बसलो . विक्रमने त्याच्या मांडीवर थाप मारून विचारले ,  "काय झाले पक्या ,डोळ्यात पाणी का "??
" च्यायला ,ह्याचे बरे लक्ष " !! मी मनात म्हटले
"काहीं नाही रे नेहमीचेच ,दादा ऐकत नाहीत . यावेळी ठरवले घेऊन जायचेच .अनुही  मनात पक्के ठरवून आलेली . पण म्हातारा ऐकत नाही आणि म्हातारी त्याला शब्दाबाहेर नाही ".  निराश होऊन पक्या बोलला .आम्ही माना डोलावल्या.
" अरे मग तुम्ही का इथे येत नाही" ?? मी विचारले .
तसा  पक्या खिन्नपणे हसला.
" अरे खूप प्रयत्न केले  मी. मागच्या 8 वर्षात खूप प्रयत्न केले इथे राहायचे .पण खरे सांगू ?आता इथली लाईफस्टाइल नाही जमत . इथला ट्राफिक, रांगा ,काम होण्यास लागणार उशीर ,नाही जमत मला . च्यायला खिश्यात भरपूर पैसे आहेत तरी पुण्याला जायला चार  तास लागतात, खाजगी वाहन केले तरी . आणि ट्रेन नेहमी फुल . शिवाय इथले वातावरण ,प्रदूषण नाही सहन होत." पक्या हताशपणे म्हणाला.
" पक्या ,xxxx तुझा जन्म इथेच झालाय म्हटलं " विक्रम ने तोफ डागली .
मी दर्डावले तसा  पक्या बोलला "अरे बोलू दे त्याला .हाच आपलेपणा  तिथे मिळत नाही . तुमच्या शिव्या ऐकल्या कि छान वाटते "हे बघ विकी ,मी नाव ठेवत नाही पण माझे शरीर ,मन आता तिकडच्या वातावरणाला रुळावलंय ,त्यामुळे कितीही इच्छा झाली तरी इथले वातावरण आता मी स्वीकारू शकत नाही . अरे तिकडे कसे आरामात चालते सगळे . कसली घाई नाही ,मुलांना ऍडमिशनचे टेन्शन नाही ,कि घरातील दुरुस्तीचा त्रास नाही . सगळे कसे एका फोन वर होते . इथे कामाचे टेन्शन ,मग प्रवासाचे .अरे घरी येतो तेव्हा दिवस संपलेला  असतो .बाहेर पडायची इच्छा होत नाही ,आता मुले तर म्हणतात 'पपा आपण महिन्याभरासाठी जाऊ भारतात पण इथे कायमचे राहू . बायकोला हि वाटते इथे कधीतरी यावे ,म्हणून आम्ही दादांच्या मागे लागलोय तुम्ही पण चला . अरे इथे कोण आहे त्यांना पाहायला . सारखी त्यांचीच काळजी वाटत असते ,उद्या आजारी पडले तर कोण आहे पाहायला ,तिथे सर्व सोयी आहेत ,आम्ही असू .  तरूणपणी खूप खस्ता काढल्या माझ्यासाठी ,निदान उत्तरार्ध तरी सुखात जावा असे वाटते मला" .पक्याची काळजी स्पस्ट दिसत होती आम्हाला .पण दादांचा स्वाभिमान हि ओळखून होतो आम्ही . पक्या भावनिक आणि प्रॅक्टिकल अश्या दोन्ही बाजूने विचार करत होता . दादांचे संस्कार विसरला नव्हता .
पक्या हळूच मला म्हणाला भाऊ तुला कधी वाटले नाही का ,परदेशात नोकरी करावी खूप पैसे कमवावे आणि विकी तुला रे ??
मी हसलो "हे बघ पक्या ,प्रत्येकाने सारखाच विचार करावा असे काही नाही . तू पैसे कमावण्याच्या सुख मानतोस, मी नाही .याचा अर्थ तू चूक मी बरोबर असा नाही . मला फॅमिली जवळ असावी असे वाटते ,आणि मला आतापर्यंत पैश्याची कमी पडली नाहीच "
माझेही तसेच आहे " विक्रम उद्गारला ,मस्त चालले आहे आमचे , सर्वाना पुरेल असे घर आहे ,गाडी आहे .बारश्या पासून ,अंत्ययात्रेपर्यंत सगळे कार्यक्रम अटेंड करतो . तुमच्यासारखे 40 वर्ष जुने मित्र आहेत .अजून काय पाहिजे भाऊ ???
तसा प्रकाश थोडा शांत झाला ,त्याच्या चेहऱ्यावर हसू प्रकटले .
विक्रम शांतपणे त्याला म्हणाला ,"पक्या दादा ऐकणार नाहीत हि काळ्या दगडावरची रेष आहे . त्यांना दुसरीकडे करमणारही  नाही  आणि तुलाही ते रोखणार नाहीत . पण लक्षात ठेव, दादा माई एकटे नाहीत इथे . आम्ही आहोत त्यांच्या मागे . आमच्यावर हि त्यांनीच संस्कार केलेत .  तुला जेवढे प्रेम दिले तेवढेच आम्हाला दिले त्यामुळे त्यांचे काय होईल ती काळजी सोड .  आणि बिनधास्त जा तू . काही झाले तर आधी त्यांना बघू मग तुला कळवू .काय भाऊ बरोबर ना ?? माझ्याकडे वळून बोलला. मी हसलो आणि ते पाहून पक्या गहिवरला .

(C) श्री . किरण बोरकर

Sunday, April 2, 2017

मागे वळून पाहताना

मागे वळून पाहताना ( एका गुप्तचर अधिकाऱ्याची कहाणी ) ....विवेक देशपांडे
लेखक हे  अतिरिक्त पोलीस आयुक्त होते .आता ते निवृत्त झाले आहेत .नोकरी करताना आलेले विविध अनुभव ,सुरवातीचे दिवस, त्यांचे ट्रेनिंगचे अनुभव  सोप्या शब्दात मांडले आहेत .पोलीस आणि त्यातल्या त्यात गुप्तचर विभागात काम करणार्यांना किती कठीण परिस्थितीत राहावे लागते .कोणकोणत्या अनुभवला सामोरे जावे लागते  तसेच पोलिसांविषयीचा वाईट दृष्टिकोन या पुस्तकाद्वारे दूर करायचा प्रयत्न केला आहे . इंदिरा गांधी सारख्या महान नेत्यांतील माणुसकीचे दर्शन हि यातून घडते . अनेक वर्षे गुप्तचर खात्यात काम केल्यामुळे बऱ्याच जणांना त्यांच्याविषयी फार माहिती नसेल . पण अतिशय चांगले पुस्तक त्यांनी आपल्यासाठी आणले आहे .