Thursday, July 28, 2016

एका मुलीची गोष्ट

काल रात्रशाळेत स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम झाला. याच निमित्ताने एका सरांशी भेट झाली. एखाद्या सहज भेटीत अगदी सहज बोलता-बोलता काय ऎकायला मिळेल याबद्दल अंदाज बांधणं खरच अवघड.

कोकणातील एका अगदी लहानशा  गावात ते सर कार्य करतात. तिथे कार्य करत असताना आलेले अनुभव ते आमच्याशी share करित होते. जे काही त्यांनी आम्हाला सांगितलं ते फार भयंकर होतं.

कोकणातील मुले खूप हुशार आहेत. त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरली आहे, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही ही खंत आहे. याशिवाय ज्या गावात ते काम करतात त्या गावात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पोषक वातावरण नाही. वगैरे वगैरे गोष्टी ते सांगत होते. त्यापुढे ते म्हणाले की कोकणात लैंगिक शोषण हि देखील फार मोठी समस्या आहे. आणि ह्याच मुद्द्याला धरुन त्यांनी एक अनुभव सांगितला, जो ऎकून आम्ही अवाक झालो.

६ वी इयत्तेमध्ये एक मुलगी शिकत होती. तिच्या वर्गावर बाई शिकवायला आल्या तर ती normal असे पण तेच जर सर आले तर अक्षरशः थरथर कापायची आणि अंग चोरून राहायची. तिचा नक्की काय problem आहे हे कोणाच्या लक्षात येत नव्हते. शेवटी त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली गेली आणि जे काही सत्य बाहेर आले ते फारच भयानक होते.

तिच्या आजीने तिला असे सांगितले होते कि परपुरुषाचा नुसता स्पर्श जरी झाला तरी बाई गरोदर राहते. तेव्हा कुणाही पुरूषाला तू स्वतःला स्पर्श करू देऊ नकोस. हे ऎकून सर्वांना धक्का बसला. का तिच्या आजीने तिला अशी आणि इतकी चुकीची माहिती दिली असावी यासाठी अधिक माहिती काढली असता असे लक्षात आले की तिच्या आत्याने आंतरजातीय विवाह केला होता जो  आजीला पसंत नव्हता. त्यानंतर तिची आत्या गरोदरपणात घरी आली होती तेव्हा आजीने तिच्याकडे बोट दाखवून त्या मुलीला हे सर्व सांगितले.

त्या मुलीवर व्यवस्थित उपचार केले गेले, हळू हळू ती सावरली ९ वि मध्ये ती पूर्ण बरी झाली आणि १० वि च्या परीक्षेत ९४% गूण मिळवले.

परंतू, तिचं नशीब चांगलं म्हणून शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी योग्य ती पावलं उचलून तिला त्यातून बाहेर काढले. पण एक क्षणभर आपण धरुन चालू की समजा शिक्षकांनी पुढाकार घेऊन हे सर्व केलं नसतं तर??? न जाणे अजून किती काळ ती मुलगी चुकीच्या समजूतीतच राहिली असती.

तिच्या आजीचा हेतू स्पष्ट कळतो की, जे त्या मुलीच्या आत्याने केले ते हिने करू नये म्हणून आजीने तिला त्यापासून कायमस्वरूपी परावृत्त करण्यासाठी हे सर्व केले. पण आजीने तिच्या कोवळ्या मनाचा जराही विचार न करता हे सर्व केल्याने तिला किती मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. अशी चुकीची माहिती या वयातल्या मुला-मुलींना देणं म्हणजे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखंच आहे.

Wednesday, July 27, 2016

द स्काय इज फॉलीग

द स्काय इज फॉल्लिंग .....सिडने शेल्डन ...अनुवाद माधव कर्वे
गॅरी विनथ्रोप अतिशय धनाढ्य कुटुंबातील लोकप्रिय व्यक्ती ,घरफोडीत त्याची हत्या होते आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याची जबाबदारी  डँना इव्हान्स हि वार्ताहर आपल्या अंगावर घेते .आणि शोध घेता घेता रहस्य अधिक गडद होत जाते .आणखी काही बळी पडतात ,भयानक पाठलाग सुरु होतो, रहस्याचे मूळ शेवटी रशियापर्यंत जाते .नेहमीप्रमाणे यातही लेखकाने एक धाडसी नायिका रंगवली आहे .

Thursday, July 21, 2016

पॅकेज

विक्रम.... माझा बालपणापासूनचा एक अवलिया दोस्त. त्याचं डोकं नेहमीच इतरांपेक्षा वेगळं चालायचं. बहुधा म्हणूनच आमची दोस्ती झाली असावी. एक एक खूप भन्नाट कल्पना नेहमीच त्याच्या डोक्यात असायच्या. अर्थात सगळ्या समाजसेवेशी संबंधित. पण ज्या कोणाला सुचणारही नाहीत अशा विचित्र.

माझ्या एक मित्राची आई नेहमी बिचारी अंथरुणावर खिळलेली असायची. मित्राला नोकरी सांभाळून आईकडे बघणं म्हणजे त्याची अगदीच तारेवरची कसरत व्यायची. हे सर्व पाहून त्यावरून ह्याला सुचले.

"अरे आपण तिची जबाबदारी घेऊया.  अगदी तिच्या आजारपणात तीची काळजी घेण्यापासून ते अगदी ती गेल्यानंतर तेराव्यावरपर्यंतची सगळी जबाबदारी घेऊ. एक पॅकेज बनवू म्हणजे तुझा मित्र तेवढे पैसे देऊन मोकळा होईल. आपण सर्व करू पाहिजे तर रडायला माणसे देखील आणू." मी म्हटले हे असं सगळं होईल न होईल माहित नाही पण वाजले किती बघ. आता मात्र रडशील तू. असं म्हणून आम्ही हसत निघालो आणि ही गोष्ट विसरूनही गेलो.

पण गेल्या आठवड्यात मित्राच्या आईला ऍडमिट करायला मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिथे एक श्रीमंत वृद्ध इसम मरण पावला होता. पण त्याचं जवळचं असं कोणीच नाही हे पाहून बराच वेळाने अगदी न राहवून मी Hospital staff ला विचारले की असे किती वेळ ठेवणार? तर उत्तर आले काळजी करू नका त्यांचे सर्व काही कॉन्ट्रॅक्टवर दिले आहे कुटुंबियांनी. हल्ली सगळीकडे पॅकेज सिस्टीम आहे. आता कंपनीची माणसे येतील आणि ती करतील सर्व.

अरे हा काय प्रकार ???? माझी उत्सुकता वाढली आणि तिथेच थांबलो, काही वेळाने 2 माणसे आली त्यांनी बॉडी ताब्यात घेतली. येतानाच त्यांनी कागदपत्रे आणली होती. सगळे सोपस्कार पूर्ण करून त्यांनी घरच्यांना फोन करून स्मशानभूमीत यायची वेळ दिली. मी त्यांना हा काय प्रकार आहे ते विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही लोकांच्या अंतिम पर्वाचे पॅकेज देतो. जसे लोक पिकनिकचे ,लग्नाचे पॅकेज देतात तसे आम्ही मृत्यूच्या विधीचे पॅकेज देतो. बऱ्याच श्रीमंत लोकांना आपले वृद्ध आईवडील ऍडमिट झाल्यास त्यांच्याकडे बघायलासुद्धा वेळ नसतो तसेच त्यांचे निधन झाल्यास अंत्यविधीची तयारी करायलाही जमत नाही आणि माणसेही गोळा होत नाहीत. त्यांच्याकडे पैसा असतो त्यामुळे ते ह्या गोष्टीचे पॅकेज देतात.आमची वेगवेगळी पॅकेज आहेत. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून डिस्चार्ज देईपर्यंत, तर काहीजणांना अंत्यविधीचे, तर काहींना अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंत अशी वेगवेगळी आहेत.

लोकांकडे पैसा आहे पण रडायला वेळ नाही. आता या मयताला स्मशानात नेले आणि सर्व तयारी केली की यांचे नातेवाईक येतील आणि अग्नी लावून निघून जातील. बाकीची कामे आम्ही करू. मला तेव्हा विक्रमची आठवण झाली 10 वर्षांपूर्वी त्याच्या डोक्यातून निघालेली कल्पना आज सत्यात उतरली होती.

इतक्यात मित्र धावत आला आणि म्हणाला चल रे आईला x ray काढायला घेऊन जाऊ वार्डबॉयला शोध. मी म्हटलं कशाला वॉर्डबॉय पाहिजे आपले माणूस आहे चल आपण घेऊन जाऊ.

Tuesday, July 19, 2016

गुरू

१९९३ ,माझा नोकरीचा पहिला दिवस ,मी एकदम फ्रेश तर उदय माळगावकर थोडा अनुभवी कारण तो इतर कंपनीमध्ये काम करून आलेला .वयाने मोठा.पण खूप काही शिकवले त्याने मला .हाताने काम करायचे कसे हे यांच्याकडून शिकलो .ड्रिलिंग,टॅपिंग, इलेक्ट्रिकल connection सर्व याच्याकडून शिकलो.राजकारण काय असते हे त्याला अजूनही माहित नसावे,आपल्याकडील जे जे आहे ते याने मला दिले.लहान भावासारखी माझी काळजी घेतली मला शक्य होईल तेव्हा साहेबांसमोर पाठीशी घातले.हा माणूस इतका साधाभोळा होता कि जेव्हा राजीनामा दिला तेव्हा मी आता कोणत्या कंपनीत जाणार आहे हे हि त्यात लिहून दिले.पुढे आमचा संबंध नाही राहिला पण त्याच्या शिकवणीचा आज खूप फायदा होतोय .प्रॅक्टिकल ज्ञान देणारा हा माझा पहिला गुरू ,त्यानंतर कंपनी राजकारण ,स्पर्धा ,रस्सीखेच, मानसिक खच्चीकरण हे विषय शिकविणारे अनेक गुरू मिळाले ,पण निस्वार्थी वृत्तीने खरे ज्ञान देणारा हा पहिला गुरू.

दशक्रिया

स्मशानात दशक्रिया विधीला जाणे म्हणजे एक छोटासा समारंभच असतो .जी माणसे विभागात राहूनही आणि कुटुंबात असूनही कधी भेटत नाहीत ती यावेळेला हमखास भेटतात .आमच्यात किंवा कोकणात भावकी म्हणतात .काही जण इतर कुठेही भेटणार नाहीत पण भावकीतल्या प्रेताला नाहीतर दशक्रीयेला भेटणारच .मला आठवतंय आमचे एक लांबचे काका त्यावेळी गिरणीत कामाला होते पण कोणाच्याही मरणाची बातमी त्यांना मिळाली कि अर्धा दिवस भरून घरी यायचे ,त्यांचे  या कार्यासाठी कपडे हि ठरले होते .ते कपडे घालून अंत्यविधीसाठी जायचे आणि सगळी सूत्रे हाती घ्यायचे .आम्हाला आजही आश्चर्य वाटते कि त्यांनी कधीच कामाची पर्वा केली नाही .नाहीतर आम्ही ताबडतोब रजेचे गोळाबेरीज चालू करतो ,कामाचा खाडा कसा करायचा याचीच काळजी जास्त आम्हाला .मी हि त्यातलाच आहे .माझा शाळेतला एक मित्र आहे .तो कधीच आमच्याबरोबर कुठे येत नाही पण कोणाचे देहवासन झाले कि हा कसाही हजर होतो .घरी आई वडील जिवंत असूनही तिरडी बांधायला पुढे असतो .अंत्यविधीच्या सर्व क्रिया आणि विधी तोंडपाठ प्रसंगी योग्य विधी होत नाहीत पाहून भांडायला हि तयार .खरेच आपण म्हणतो काय होणार या समाजाचे जिथे रडण्यासाठी माणसे भाड्याने बोलवावी लागतील .पण आजही अशी माणसे याच समाजात तयार होतायत .भले तिचे प्रमाण कमी असेल  पण  माणुसकी मारणार  नाही  अशी आशा आहे

अजिंक्य

तो नेहमीच हळू वर्गात यायचा. त्याची उपस्तिथी कधी जाणवलीच नाही.सोडलेला हाफ शर्ट, ढगळ पॅन्ट,   खांद्यावर शबनम बॅग अश्या एखाद्या पत्रकाराच्या अवतारात तो असायचा,मोजकेच मित्र. अजिंक्य सिद्धये असे कधीही न ऐकलेले आडनाव. कधी lectures लवकर संपली तर हा कधी निघून जायचा कोणाच्या लक्षातही कधी यायचं नाही. आम्ही आपले टिंगलटवाळ्या करत थांबायचो. पण हा कधीच आम्हाला join व्यायचा नाही. हा मात्र सरळ घर गाठणारा इसम.

आम्ही वर्गातली टारगट पोरं पण ह्याच्या चेहऱ्याकडे बघून खेचायला जात नव्हतो. कशाला गरीब बिचार्याची चेष्टा करा असे म्हणून  सोडून द्यायचो. आमचे बरेच उद्योग चालायचे. पण हा मूकपणे आमच्या कारवायांना पाठिंबा द्यायचा. सिद्धये इथे सही कर म्हटल्यावर हा सही करणार. स्वतः कधीच प्रत्यक्ष सहभागी नसायचा पण आमच्यावर खूप विश्वास होता त्याचा. त्यामुळेही कोणी त्याची थट्टा केली नाही.

कॉलेज संपले आणि प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला. तरीही आमच्या ग्रुप चा एकमेकांशी संपर्क होताच. पण हा मात्र पूर्णपणे विस्मरणात गेला. काय करतो हे कळलेच नाही. आणि एक दिवस व्हाट्स अॅप ग्रुप स्थापन झाला, मग कोणीतरी याचा नंबर दिला आणि हा ग्रुप मधे ऍड झाला. नंतर फेसबुक वर पण contact झाला. त्यानंतर कळले कि हा क्लासेस घेतो. ९ वि आणि  १० च्या विद्यार्थ्यांना शिकवतो. अरे वा!! त्याच्या स्वभावाला साजेसाच मार्ग मिळाला तर!

पण हा अबोल असणारा माणूस आता व्हॉट्स अॅप आणि फेसबुक च्या माध्यमातून मोकळा होत होता. आणि अजूनही आमच्या कार्याला पाठिंबा देत होता. अर्थातच प्रत्यक्ष हजर कधीच नसतो. आम्हीही त्याला ओळखतो. त्यामुळे force कधीच करत नाही. पण प्रत्यक्ष सहभागी झाला तर सर्वांनाच आनंद होईल हे निश्चित. पण आमच्या या कार्याला नेहमीच पाठिंबा असतोच.

खरेच आज २५ वर्षानंतरही जराही बदलला नाही तो. आपल्या तत्वांशी कधीही आणि जराही तडजोड केली नाही. आजही शिक्षणक्षेत्राच्या बाजारात अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपले काम करतोय.  कॉलेज संपल्यानंतर अजूनही आम्ही एकदाही भेटलो नाही पण व्हॉट्स अॅप आणि फेसबुकमुळे तोच जिव्हाळा जाणवतो. आज गुरुपौर्णिमा..... आणि म्हणूनच या देशाचे सुजाण नागरिक घडविण्यात मोलाचा वाटा उचलून मदत करणाऱ्या माझ्या या मित्राला त्रिवार वंदन !!! ईश्वर तुला आणि तुझ्या कुटुंबियांना उदंड आयुष्य देवो...!

Monday, July 18, 2016

मुसाफिर

आतापर्यंत अच्युत गोडबोले हे नाव एक संगणकतज्ञ म्हणून ऐकले होते ,त्यांच्या मुसाफिर ,मनात या पुस्तकांची नावे केवळ वाचली होती .पण कधी वाचायची इच्छा झाली नाही.डोक्यावरून जातील हि भीती .पण आज कळले हा माणूस कलंदर आहे .लहानपणापासून थोरामोठ्यांचा सहवास लाभला कि माणूस कसा परिपक्व बनतो ते कळते.कुमार गंधर्व,भीमसेन जोशी ,बिरजू महाराज ,दुबे,तेंडुलकर यांच्या सारख्या श्रेष्ठांच्या सहवास लाभलेला .सोलापूर ते पवई आयआयटी चा प्रवास ,हॉस्टेल मधल्या गमती वाचून खूप हसायला येते .बऱ्याच दिवसानी ट्रेनमध्ये पुस्तक वाचताना हसताना पाहून आजूबाजूच्या भुवया उंचावल्या.नंतर लक्षात आले कि पुस्तक वाचणारा मी एकटाच होतो.मोठंमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचा सिव्हीओ असणारा हा शहाद्यातील आदिवासी क्षेत्रातही तेव्हढाच सहजतेने कार्य करतो .प्रसंगी तुरुंगवास भोगतो एव्हडेच नाही तर त्या दहा दिवसात संपूर्ण तुरुंगविश्व उलगडून दाखवतो.तरुणांसाठी तर हे पुस्तक एक गाईड आहे.इंग्रजी कसे सुधारावे,कोणते साहित्य वाचावे, हे अगदी सहजरीत्या सांगितले आहे.सगळ्यांनी नक्कीच वाचले पाहिजे हा "मुसाफिर".

Saturday, July 16, 2016

डाय हार्ड

आज बरोबर २८ वर्षांपूर्वी ब्रूस विलीसचा" डाय हार्ड "प्रदर्शित झाला .तेव्हा मला फक्त स्टॉलोन, हॅरिसन फोर्ड ,माहीत होते .तर कुंग फू खेळणाऱ्यांची नावे हि माहित नव्हती.त्यावेळी मुंबईच्या स्टर्लिंग चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चक्क १७ आठवडे चालला .चुकीच्या जागी ,चुकीच्या वेळी ,चुकीचा माणूस अशी त्या चित्रपटाची थीम होती
.न्यू यॉर्क पोलीस असलेला डिटेक्टिव्ह जॉन मॅकलेन आपल्या पत्नीला भेटायला उंच अशा ४० मजली इमारतीत शिरतो आणि अतिशय उत्तम प्लॅन करून इमारतीत शिरलेल्या दहशतवादी संघटनेचा सामना करतो.दहशतवादी संपूर्ण इमारत त्याची संगणक प्रणाली त्याब्यात घेवून आपला कब्जा करतात आणि त्यामध्ये असलेले करोडो रुपये ताब्यात घेणाचा प्रयत्न करतात .इमारतीत हजर असणाऱ्या सर्व लोकांची यादी त्यांच्याकडे असते पण जॉन अचानक तिथे जातो .संपूर्ण चित्रपटात जॉन केवळ बनियन ,पॅन्ट अनवाणी पायाने त्या लोकांशी सामना करतो.या मध्ये जॉन का सर्व सामान्य पोलीस आहे ,कधी कधी तो खूप मारही खातो ,जिवंत राहण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो.त्यांनतर डाय हार्ड चे खूप भाग आले ,नवीन नवीन technology आल्या पण पहिल्या भागाची सर इतर भागात आली नाही .अजूनही टीव्ही वर डाय हार्ड सुरु झाला कि हातातली सर्व कामे बाजूला ठेवून तो बघत बसतो.अमिरखानच्या बाजी चित्रपटातील शेवटचे दृश्य ह्या चित्रपटवरून घेतले आहे .

Thursday, July 14, 2016

दगड ग्रुप

होय आम्ही दगड आहोत .
दुसर्यांच्या दुखः वर स्वताचे मनोरंजन करून आपले दुखः लपवणारे आम्ही दगड आहोत .
अभ्यास करायला घरी जागा नाही म्हणून उद्यानात दिव्याखाली  दगडावर बसून अभ्यास करणारे आम्ही दगड आहोत .पैसे नाहीत म्हणून क्लास न करता दुसर्याच्या नोटस वापरणारे आम्ही दगड आहोत .पेपरच्या आधी समोरच्या सिद्धीविनायकाचे आशीर्वाद न घेता teliphone बूथ चालविणाऱ्या अंधाच्या शिव्या खावून जाणारे आम्ही दगड आहोत .राजकीय  पक्षांचे  banner चटई म्हणून वापरणारे आम्ही दगड आहोत garden मध्ये अभ्यासात कोणाला काही अडचण आल्यास त्याला मदत करणारे आम्ही दगड आहोत .मित्रांसाठी वेळी अवेळी धावून जात त्यांना मदत करणारे आम्ही दगड आहोत .आज तीच दगडे  परिस्तिथी शी सामना करत ,लढत मोठे झालेत ,समाजात मान्यवर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत ,पण ते garden मधील त्या दगडाला विसरले नाहीत .अजूनही एकत्र येतो आणि सुरु होते तीच भंकस ,तीच मस्ती ,अजूनही हालाकीच्या परीस्तीतीत अभ्यास करणाऱ्या मुलांबद्दल सहानभूती ,आपुलकी आहे म्हणूनच स्वताच्या  पदरचे  पैसे  भरून रात्रशाळेत शिकणाऱ्या ९ वि आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटतो .असाच आहे आमचा दगड ग्रूप

सुनीता

कॉलेज च्या क्लार्क् मध्ये  २ महिन्यासाठी कोणतरी रजेवर गेले आणि ती त्याजागी आली .आम्ही दुसर्या वर्षाचे विद्यार्थी ,पण तिला म्याडम कधीच म्हटले नाही .बाहुली सारखी दिसणारी  ,५' उंचीची ,लांब केस ,एक वेणी घालणारी ,आणि हळुवार गोड आवाजात बोलणारी  सुनिता .आम्ही तिच्यापेक्षा ५/६ वर्षांनी लहान ,पण दोस्ती जुळल्यावर वयाचा प्रश्नच कधी आला नाही ,तिच्या बरोबर दुसरी मैत्रीण संगीता ,.खूप बडबड करणारी .छान ग्रुप जमला आमचा ,खूप धमाल केली तेव्हा ,एकमेकांच्या घरी जाने ,एकत्र जेवणे ,सिनेमा बघणे ,आणि गप्पाच्या मैफिली जमवल्या .आणि २ महिन्यानंतर नोकरी सुटताच ती गायब झाली .सर्व आठवणी मागे सोडून ,खूप शोधले तिला ,पण कुठलाही संपर्क होवू शकला नाही .अगदी परवापर्यंत .ठाणे स्टेशनावर जुन्या शिक्षिका भेटल्या .अर्थात मी त्यांना आठवतच नव्हतो पण जुन्या आठवणी सांगितल्या आणि ओळख पटली .मग तिने सुनीताचा नंबर दिला .आणि इतर काही जणींचा .मग मी तिला भीत भीत च पहिला मेसेज पाठविला .आणि संध्याकाळी तिचा फोन आला .तिने स्पष्ट सांगितले तुझा चेहरा आठवत नाही .मग जुन्या आठवणी जाग्या झाल्या आही हळू हळू सर्व आठवले .मग अजून २/३ मित्र मैत्रिणी एकत्र झालो .आणि ग्रुप बनला .तिचे आपलेपणाचे बोलणे ऐकून असे वाटले कि मधली वर्षे गायबच झाली नव्हती .अजूनही आम्ही १९९० च्या काळातच आहोत .मग तिच्या घरी आम्ही ४ जन जमलो .ओल्ड इज गोल्ड ,जुन्या आठवणी जागल्या ,डोळे पाणावले .जणू मधला काळ गेलाच नव्हता .खरेच यालाच म्हणतात का खरी ,सच्ची मैत्री ,देव तुला खूप सुखात ठेवो सुनिता .

वाढदिवस

आज तुझा वाढदिवस
   माझ्यासाठी हा सुदिन
आज तुझ्या रुपात
    मला मिळाला प्रसाद

तुझे येणे माझ्यासाठी
    असे खूप गोष्ट मोठी
तुझ्या आगमने झाली
   माझ्या घरट्यात दाटी

तुझे पडता पाऊल
    आपल्या या घरात
चमचमले रे  तारे
   माझीया अंगणात

तू ही माझा तारा
  असाच गोजिरा
तुझ्याच साठी मांडीला
  खेळण्याचा हा पसारा

     मोठा होशील तू जरी 
करू नको शिरजोरी
  नम्रतेने होते बाळा
  उंच भरारी आपली

थोरा मोठ्यांचे रे हाथ
  असावे आपल्या शिरावर
नाही त्याविण होत कुणी
   या जगात रे थोर 
       
       

माझे घर

घर माझ गावातल
     आहे जणू स्वप्नातलं
समुद्राच्या काठावरच
     खाऱ्या फेसाळ लाटांच
लाल विटांच्या ओलाव्याच
     प्रेमाच्या स्वागताचं    ll१ ll

स्वामींच्या आशीर्वादाचं
  आहे छप्पर मायेच
आत येणाऱ्या सर्वांच
मन आपलस करण्याच     ll २ ll

    मन:शांती मिळ्ण्याच
    आहे ठिकाण हक्कांच
    भांडण्याच , प्रेमाच
    आहे सगळाच कौतुकाच   ll ३ ll

छपरातून पडणाऱ्या कवडशांच
अंगणात येणाऱ्या चांदण्यांचे
रखरखणांऱ्या उन्हातही
मंद शांत झुळाकेच

     वाडवडिलांच्या छात्रछायेच
     सख्यांच्या प्रेमळ स्पर्शाचे
      मुलींच्या हसण्या बागडण्याचे
      आनंदाच्या तृप्तीचे            ll ४ ll    

कृष्णा बोरकर

साल २००९..... ते झी गौरव पुरस्काराचे १० वे वर्ष होते. नाटक आणि चित्रपटाची नामांकने जाहीर झाली होती, सर्व जण या सोहळ्याची उत्सुकतेने वाट पहात होते.चंद्रलेखाच्या चेहरा मोहरा या नाटकाला नामांकन नव्हते, तरीही नाट्यविभागाचे परीक्षक श्री. सुरेश खरे यांनी खास नाटकाच्या रंगभूषेला नामांकन नसतानाही खास  पारितोषिक देण्याची शिफारस आयोजकांना केली होती आणि ती मान्य देखील झाली.

त्या नाटकात प्रमुख कलाकाराचा चेहरा कमीत कमी वेळात पूर्णपणे बदलून टाकण्याची किमया ज्येष्ठ  रंगभूषाकार श्री. कृष्णा बोरकर यांनी केली होती आणि म्हणूनच ते परीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले होते. अनधिकृतरीत्या बोरकरांना परितोषिकबद्दल कळले होतेच आता तो कधी जाहीर होणार याची फक्त वाट पहायची होती.

अचानक एके दिवशी संध्याकाळी सुप्रिया विनोद हीचा बोरकरांना फोन आला "काका तुम्ही कुठे आहात, आता इथे झी गौरव पुरस्कार सोहळा  चालू आहे आणि तुमच्या नावाची पुरस्कारासाठी घोषणा झाली, पण तुम्ही हजर नव्हता म्हणून मी तो तुमच्यावतीने स्वीकारला. बोरकरांना धक्काच बसला, अरे हे काय ?? आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले पण अशापद्धतीने कधीच वागणूक मिळाली नव्हती. त्यांनी या गोष्टीचा निषेध करायचा निर्णय घेतला पण त्यांना इतर मान्यवरांनी समजावले आणि मोठ्या मनाने माफ करण्याचा सल्ला दिला. बोरकरांनीही यागोष्टीबद्दल जास्त चर्चा केली नाही.शेवटी झी परिवारानेही आपली चूक मान्य केली आणि २ दिवसांनी घरी येऊन हा पुरस्कार बोरकारांना प्रदान करण्यात आला.

Tuesday, July 12, 2016

मैत्री

किरण राणे - सावंत ,इयत्ता ३ री आणि ४ थी ला माझ्या बाजूला बसायची ,घाबरट आणि सहनशील स्वभाव त्यामुळे तिला छळायला खूप मजा वाटायची ,पुढे ५ वीत वेगळे झालो आणि तिला  विसरून गेलो .पुढे नवीन मित्र आणि मैत्रिणी भेटल्या पण मनाच्या एका कोपर्यात कधीतरी आठवायची ,आणि स्वतः हसायचो .६ महिन्यापूर्वी शाळेतले जुने मित्र भेटलो आणि एक जण म्हणाला अरे किरण तुझी आठवण काढते .मग तिच्याबरोबर पुन्हा संपर्क झाला आणि chating  सुरु झाले ,वेळ नसल्यामुळे प्रत्यक्ष भेट होत नव्हती .रोज तिच्या शिव्या खायचो शेवटी आज योग आला आणि तिच्या घरी आम्ही दोघे मित्र गेलो ,दरवाजा उघडला तिने आणि तिच्या चेहऱ्यावरचे निखळ आणि निर्व्याज्य मैत्रीचे भाव पाहून मधली ३४ वर्षे कशी उडून गेली ते कळलेच नाही .तिने स्वतः बनविलेला केक खाल्ला आणि त्यातील मैत्रीचा गोडवा पुढील आयुष्यभर जिभेवर रेंगाळत राहील हे नक्की .किरण भावी आयुष्य तुला आणि तुझ्या परिवाराला खूप खुख समाधान आणि आनंद देवो हीच प्रार्थना आमच्यातर्फे करतो .