Thursday, September 30, 2021

नवी सुरवात

नवी सुरवात
आज सकाळीच बरीच कामे होती म्हणून ऑफिसला उशीराच निघालो होतो.जी मिळेल ती लोकल पकडून निघायचे असे ठरवून प्लॅटफॉर्मवर पोचलो.तसेही लॉकडाऊन अजून पूर्ण संपले नसल्यामुळे ट्रेनला गर्दी कमीच दिसत होती.
 मी जी लोकल आली त्यात चढलो आणि नेहमीसारखा पुस्तकात डोके घालून बसलो .ट्रेन विक्रोळीला थांबून निघाली आणि थोड्याच वेळात माझ्या बाजूला ती परिचित टाळी ऐकू आली .त्यानंतर भाऊ...!! करून ओळखीचा आवाज.तो आवाज ऐकून मी त्याच्याकडे मान वळवली तेव्हा तो हसत हसत बाजूला बसला आणि सोबत असलेल्या दोन लहान मुलांना समोरच्या सीटवर बसविले .
"भाऊ ... कसे आहात..?? ड्युटी बदलली का ..."?? त्याने आपल्या पुरुषी खर्जातील आवाजात विचारले .
"नाही ...आज लेट निघालोय .पण तू वेळ बदलली हे नक्की ...आणि हे काय ....?? या लहान मुलांनाही हे शिकवतोस का ...."?? मी थोड्या चढ्या आवाजात विचारले.
"बस काय भाऊ .....?? हीच किंमत का आपली ..."?? तो हात जोडत म्हणाला . "मी सर्व बंद केले आता . बघून वाटत नाही का ...."?? 
"खरेच की ... मी पूर्वीच्याच नजरेने त्याच्याकडे पाहत होतो. पण आता तो बदलला होता . छान साडी ,हलका मेकअप . व्यवस्थित बांधलेली एक वेणी . आणि विशेष म्हणजे बऱ्यापैकी स्त्री सारखे बोलणे .अर्थात तिच्यातील पुरुष लपत नव्हता पण ती स्त्री दिसण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होती.
"अरे वा.... हे छान आहे .." मी ताबडतोब कॉप्लिमेंट दिली. तसा तो हसला." पुरुषीपणा लपत नाही म्हणा पण मी प्रयत्न करतेय.."
"मग ही कोण..." ?? मी दोन्ही मुलांकडे बोट दाखवून विचारले .
"आहो हे अनाथाश्रमातील मुले आहेत .मी विक्रोळीला  एका म्हातारीच्या सोबतीला जाते. ती आजी छान बालसंस्कार वर्ग घेते . मग म्हटले महिनाभर याना घेऊन जाऊ . काहीतरी चांगले शिकतील .आमचाही वेळ जाईल. काही पैसे ही मिळतील .आता त्यांना सोडून घरी जाईन ..." तिने मुलांकडे हसून पाहिले.
" वा छान ...!! . पण तुझी कमाई बंद झाली .पूर्वीपेक्षा कमी पैसे मिळत असतील..." मी हसत विचारले .
" किती वर्षे लोकांपुढे टाळ्या वाजवत त्यांना धमकावत ..अचकट विचकट बोलून ..प्रसंगी शरीरावर हात फिरवायची संधी देऊन पैसे काढू भाऊ ...??  उद्या वय झाले की कोण विचारणार नाही आणि हेच जीवन का जगायचे आम्ही. आता चांगले वागायची सुरवात केली तर पुढच्या पिढ्यातरी समाजात ताठ मानेने वावरतील. मानवजातीतील तिसऱ्या वर्गाला आता कुठे हळू हळू सन्मान मिळू लागलाय तो अजून पुढे न्यायला आम्हीच काहीतरी केले पाहिजे...."त्याच्या बोलण्यात कळकळ दिसत होती.
"खरे आहे तुझे ...मग भीक मागणे बंद केले तर भागते कसे तुझे ....."?? मी कुतूहलाने विचारले .
" खूप कामे आहेत भाऊ... हल्ली सर्वाना ऑनलाईन कामे करायची सवय लागली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गरज भासते तिथे माणसेच उपलब्ध नसतात .उदा. हॉस्पिटलमध्ये आजारी माणसांची शुश्रूषा करायला .अनाथाश्रमातील वृद्धांची सेवा करायला . जेवणाचे डबे पोचवायला.  तसेच छोट्या मोठ्या डिलिव्हरीसाठी माणसे हवी असतात .तिथे मी जातो .,जे मिळतील ते पैसे घेतो.तुला माहितीय...मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा ही कोर्स केलाय .."तो मोठ्याने हसत म्हणाला .
"अच्छा …..म्हणून हा बदल आहे तर .…" मी त्याच्याकडे निरखून बघत म्हणालो . तसा तो लाजला आणि क्षणात गंभीर झाला .
"भाऊ... भीक मागण्यापेक्षा हे बरे नाही का ..?? समाजातील उपेक्षित समाज म्हणून आमची गणना होते. गेल्या कित्येक पिढ्या हेच भोगत जगतोय आम्ही.हळू हळू बदल घडतायत.आमच्यातील कित्येकजण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतायत.मग मी ही नव्यानं सुरवात का करू नये ...?? झिरो मिळण्यापेक्षा एक मिळवणे चांगले नाही का ..?? आणि एक मिळाला तरच दोन पुढे तीनचार मिळत जातील ..तो बोलताना हळवा झाला 
.आयुष्याच्या नवीन सुरवातीस माझ्या शुभेच्छा....असे म्हणत मी त्याचे हात प्रेमाने दाबले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, September 29, 2021

फिडेल कॅस्ट्रो ....अतुल कहाते

फिडेल कॅस्ट्रो ....अतुल कहाते
मनोविकास प्रकाशन 
क्युबा म्हटले की डोळ्यासमोर येतो तो हवाना सिगार ,मुष्ठीयोध्ये आणि फिडेल कॅस्ट्रो.
अर्थात नवीन पिढी कोण हा कॅस्ट्रो..?? म्हणून विचारेल आणि म्हणूनच लेखकाला कॅस्ट्रोला नवीन पिढीसमोर आणावेसे वाटले.
1959 साली फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी युवकांनी क्युबात स्वातंत्र्याचे वारे आणले.अमेरिकेने आपल्या आज्ञेत राहतील असे हुकूमशहा क्युबाला दिले पण एकटा फिडेल कॅस्ट्रो त्या सर्वांना पुरुन उरला. अमेरिकेने त्याला खूप त्रास दिला. त्याला मारण्याचे शेकडो प्रयत्न केले. पण फिडेल आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि अमेरिकेशी सतत संघर्ष करीत राहिला .जेमतेम मुंबई इतकी साधारण दीड कोटी लोकसंख्या आणि फक्त 100 चौ. किलोमीटर आकार असलेल्या क्युबावर कॅस्ट्रोमुळे अमेरिकेला कधीच वर्चस्व राखता आले नाही. त्याने जवळजवळ पन्नास वर्षे क्युबाचे नेतृत्व केले. अमेरिकेने त्याला वेठीस आणण्यासाठी क्युबाची आर्थिक राजकीय कोंडी करायचे प्रयत्न केले पण सोव्हिएत युनियनच्या पाठिंब्यावर कॅस्ट्रोने अमेरिकेवर मात केली.
क्युबा चार शतके स्पॅनिश सत्तेच्या नियंत्रणाखाली होती पण 1898 ला क्रांतिकारांनी क्युबा स्वतंत्र केले आणि ताबडतोब अमेरिकेने यात उडी मारली. फिडेलचे बालपण अतिशय सुखात गेले.  अभ्यासात फार गती नव्हती पण इतिहासात रस होता . त्याची भाषणे अतिशय प्रभावशाली असत. तो दोन ते चार तास सलग एका जागी उभे राहून भाषण देऊ शकत असे.
अखेर 26 नोव्हेंबर 2016 साली फिडेल क्रिस्टोने जगाचा निरोप घेतला .
लेखकाने अतिशय सुरस आणि रोमांचकारी पद्धतीने चरित्र लिहिले आहे त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही . अमेरिकेविरुद्ध त्याने सतत वेगवेगळे डावपेच वापरले .तो शेवटपर्यंत अमेरिकेचा विरोधकच राहिला .

Thursday, September 23, 2021

पगारी मित्र "ह्या म्हाताऱ्याचे काय करावे तेच कळत नाही....." बाजूच्या खुर्चीवर धपकन बसत अव्या पुटपुटला. मी आणि विक्रमने चमकून त्याच्याकडे पाहिले. आम्ही बऱ्याच दिवसांनी अण्णाकडे बसलो होतो. "काय झाले अव्या...."?? बशीतले शेवटचे बिस्कीट त्याच्याकडे सरकवून विक्रमने विचारले .अर्थात म्हातारा म्हणजे अविचा बाबा हे सांगायची गरज नव्हती."भाऊ ...हल्ली बाबांची खूप चिडचिड चालू आहे . काय करावे कळत नाही.. सारखे समोर कोणतरी हवे असते. माझे ऐकत नाही कोणी हीच तक्रार ..."अवि चिडून म्हणाला ." म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात फेक..." विक्रम चहाचा घोट घेत म्हणाला ." गप रे...तुला माहितीय मी असे करणार नाही .... वृद्धाश्रमाची कल्पनाच आम्ही करू शकत नाही .पण तुम्हीच सांगा ..सकाळी आठला आम्ही घरातून बाहेर पडतो.ते रात्री सातनंतर घरी .आई होती तोपर्यंत चालत होते .आता घरात ते एकटे ..."अवि भावुक झाला ." माणूस ठेव ..." विक्रमकडे सल्ल्याची कमी नव्हती." माणूस काय करणार....?? तो पगारी नोकर ..जेवण औषधे वेळच्यावेळी देईल. पण ह्यांच्याशी गप्पा कोण मारेल...?? तुम्हाला माहितीय बाबांना राजकारणात किती इंटरेस्ट आहे .सगळ्या पक्षांच्या चार चुका काढल्याशिवाय जेवत नाही .आणि हो त्यांचे ते हार्मोनियम वादन कोण ऐकेल.तो माणूस पळून जाईल .." अवि माझ्या हातावर टाळी देत हसत म्हणाला."करू काहीतरी..." असे म्हणत विक्रम उठला तसे आम्हीही उठून बाहेर पडलो.त्यानंतरच्या रविवारी अव्याच्या घरची बेल वाजली .दारात आम्हाला पाहून अव्या उडाला .आमच्यासोबत एक तरुण होता. विक्रमने त्याची ओळख मुलाचा मित्र अशी करून दिली. बाबा खुर्चीत बसून पेपर वाचत होते." एक खाजगी काम आहे .."असे म्हणत आम्ही अव्याला गॅलरीत घेऊन आलो आणि तो तरुण बाबांशी गप्पा मारत बसला.अव्या आणि त्याची बायको अधूनमधून बाबांकडे नजर टाकत होते .पण कसे काय..कोण जाणे म्हातारा खूप खूष होऊन त्या तरुणाशी बोलत होता .मग आम्हीही निश्चित होऊन गप्पा मारत बसलो. दोन तासानी आम्ही उठलो जाता जाता बाबांनी त्या तरुणांच्या पाठीवर थाप मारून "उद्या ये..मी हार्मोनियम ऐकवतो तुला.." असे प्रेमाने आमंत्रण दिले तश्या अव्याच्या कपाळावर आठ्या पडल्या."कशाला त्याला त्रास ..."?? असे तो पुटपुटला. तसा तो तरुण म्हणाला " काही हरकत नाही ...फोन करा ..येईन मी .…"असे हसून म्हणताच अव्या उडालाच ."ही काय भानगड आहे विकी .."?? खाली येताच अव्याने कमरेवर हात ठेवून विचारले."दोनशे दे त्याला ..." तरुणांकडे बोट दाखवत विक्रम म्हणाला." म्हणजे ....."?? अव्या चिडलाच." तूच म्हणालास ना म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात ठेवणार नाही . मग वृद्धाश्रम तुझ्या घरी आले तर ...?? हा तरुण निखिल ..तुझ्या बाबांसोबत राहील . त्यांना पाहिजे तेव्हा तो हजर होईल. त्यांच्याशी पाहिजे त्या विषयावर गप्पा मारेल. त्यांचे सर्व काम करेल. त्यांना औषधांची आठवण करून देईल शक्य झाल्यास देईलसुद्धा . त्यांचे हार्मोनियम ऐकेल. पत्ते खेळेल .अगदी आतल्या गोष्टींवरही चर्चा करेल. त्यांना कंटाळा येईल तेव्हा निघून जाईल. पण संध्याकाळी तो जो चार्ज लावेल तो तुला द्यावा लागेल ...विक्रम अविकडे रोखून पाहत म्हणाला ." च्यायला विकी ...म्हातारा किती खडूस आहे ते तुला सांगायला नको...अरे चिडला तर शिव्या ही देईल त्याला .."अवि काळजीने म्हणाला ."खाईल तो शिव्या ... तो त्याचेच तर पैसे घेणार आहे .तो सगळे काही सहन करेल. आपण नाही का आपल्या साहेबांच्या शिव्या ऐकतो...तू फक्त त्याला वेळोवेळी पैसे देत जा ...जे वृद्धाश्रमात खर्च करणार ते याला दे ..." मी समजावले ."ठीक आहे ...पण हा उचललास कुठून ...?? अविने हसत विचारले . तसे मी आणि विक्रम एकमेकांकडे पाहून हसलो .काल संध्याकाळीच आम्ही कमलाकर अकॅडमीच्या कमलाकर कदम उर्फ केकेला जाऊन भेटलो होतो आणि आमची समस्या त्याच्यासमोर मांडली होती.नेहमी सारखे छद्मी हसत त्याने एक फोन फिरवला होता आणि त्या तरुणाला आमच्याकडे पाठवून दिले होते.त्याआधी त्याने अवीच्या बाबांची सगळी माहिती त्याला दिली होती . केके सहज म्हणाला बाबांना वृद्धाश्रमात जायचे नसेल तर आपणच वृद्धाश्रम घरी आणू.© श्री.किरण कृष्णा बोरकर

पगारी मित्र 
"ह्या म्हाताऱ्याचे काय करावे तेच कळत नाही....." बाजूच्या खुर्चीवर धपकन बसत अव्या पुटपुटला. मी आणि विक्रमने चमकून त्याच्याकडे पाहिले. 
आम्ही बऱ्याच दिवसांनी अण्णाकडे बसलो होतो. 
"काय झाले अव्या...."?? बशीतले शेवटचे बिस्कीट  त्याच्याकडे सरकवून विक्रमने विचारले .अर्थात म्हातारा म्हणजे अविचा बाबा हे सांगायची गरज नव्हती.
"भाऊ ...हल्ली बाबांची खूप चिडचिड चालू आहे . काय करावे कळत नाही.. सारखे समोर कोणतरी हवे असते. माझे ऐकत नाही कोणी हीच तक्रार ..."अवि चिडून म्हणाला .
" म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात फेक..." विक्रम चहाचा घोट घेत म्हणाला .
" गप रे...तुला माहितीय मी असे करणार नाही .... वृद्धाश्रमाची कल्पनाच आम्ही करू शकत नाही .पण तुम्हीच सांगा ..सकाळी आठला आम्ही घरातून बाहेर पडतो.ते रात्री सातनंतर घरी .आई होती तोपर्यंत चालत होते .आता घरात ते एकटे ..."अवि भावुक झाला .
" माणूस ठेव ..." विक्रमकडे सल्ल्याची कमी नव्हती.
" माणूस काय करणार....?? तो पगारी नोकर ..जेवण औषधे वेळच्यावेळी देईल. पण ह्यांच्याशी गप्पा कोण मारेल...?? तुम्हाला माहितीय बाबांना राजकारणात किती इंटरेस्ट आहे .सगळ्या पक्षांच्या चार चुका काढल्याशिवाय जेवत नाही .आणि हो त्यांचे ते हार्मोनियम वादन कोण ऐकेल.तो माणूस पळून जाईल .." अवि माझ्या हातावर टाळी देत हसत म्हणाला.
"करू काहीतरी..." असे म्हणत विक्रम उठला तसे आम्हीही उठून बाहेर पडलो.
त्यानंतरच्या रविवारी अव्याच्या घरची बेल वाजली .दारात आम्हाला पाहून अव्या उडाला .आमच्यासोबत एक तरुण होता. विक्रमने त्याची ओळख मुलाचा मित्र अशी करून दिली. बाबा खुर्चीत बसून पेपर वाचत होते.
" एक खाजगी काम आहे .."असे म्हणत आम्ही अव्याला गॅलरीत घेऊन आलो आणि तो तरुण बाबांशी गप्पा मारत बसला.
अव्या आणि त्याची बायको अधूनमधून बाबांकडे नजर टाकत होते .पण कसे काय..कोण जाणे म्हातारा खूप खूष होऊन त्या तरुणाशी बोलत होता .
मग आम्हीही निश्चित होऊन गप्पा मारत बसलो. दोन तासानी आम्ही उठलो जाता जाता बाबांनी त्या तरुणांच्या पाठीवर थाप मारून "उद्या ये..मी हार्मोनियम ऐकवतो तुला.." असे प्रेमाने आमंत्रण दिले तश्या अव्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"कशाला त्याला त्रास ..."?? असे तो पुटपुटला. तसा तो तरुण म्हणाला " काही हरकत नाही ...फोन करा ..येईन मी .…"असे हसून म्हणताच अव्या उडालाच .
"ही काय भानगड आहे विकी .."?? खाली येताच अव्याने कमरेवर हात ठेवून विचारले.
"दोनशे दे त्याला ..." तरुणांकडे बोट दाखवत विक्रम म्हणाला.
" म्हणजे ....."?? अव्या चिडलाच.
" तूच म्हणालास ना म्हाताऱ्याला वृद्धाश्रमात ठेवणार नाही . मग वृद्धाश्रम तुझ्या घरी आले तर ...?? हा तरुण निखिल ..तुझ्या बाबांसोबत राहील . त्यांना पाहिजे तेव्हा तो हजर होईल. त्यांच्याशी पाहिजे त्या विषयावर गप्पा मारेल. त्यांचे सर्व काम करेल. त्यांना औषधांची आठवण करून देईल शक्य झाल्यास देईलसुद्धा . त्यांचे हार्मोनियम ऐकेल. पत्ते खेळेल .अगदी आतल्या गोष्टींवरही चर्चा करेल. त्यांना कंटाळा येईल तेव्हा निघून जाईल. पण संध्याकाळी तो जो चार्ज लावेल तो तुला द्यावा लागेल ...विक्रम अविकडे रोखून पाहत म्हणाला .
" च्यायला विकी ...म्हातारा किती खडूस आहे ते तुला सांगायला नको...अरे चिडला तर शिव्या ही देईल त्याला .."अवि काळजीने म्हणाला .
"खाईल तो शिव्या ... तो त्याचेच तर पैसे घेणार आहे .तो सगळे काही सहन करेल. आपण नाही का आपल्या साहेबांच्या शिव्या ऐकतो...तू फक्त त्याला वेळोवेळी पैसे देत जा ...जे वृद्धाश्रमात खर्च करणार ते याला दे ..." मी समजावले .
"ठीक आहे ...पण हा उचललास कुठून ...?? अविने हसत विचारले . तसे मी आणि विक्रम एकमेकांकडे पाहून हसलो .
काल संध्याकाळीच आम्ही कमलाकर अकॅडमीच्या कमलाकर कदम उर्फ केकेला जाऊन भेटलो होतो आणि आमची समस्या त्याच्यासमोर मांडली होती.नेहमी सारखे छद्मी हसत त्याने एक फोन फिरवला होता आणि त्या तरुणाला आमच्याकडे पाठवून दिले होते.त्याआधी त्याने अवीच्या बाबांची सगळी माहिती त्याला दिली होती . केके सहज म्हणाला बाबांना वृद्धाश्रमात जायचे नसेल तर आपणच वृद्धाश्रम  घरी आणू.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Wednesday, September 22, 2021

सन्स ऑफ फॉर्च्युन... जेफ्री आर्चर

सन्स ऑफ फॉर्च्युन... जेफ्री आर्चर
अनुवाद..अजित ठाकूर 
मेहता पब्लिशिंग हाऊस
सुझान आणि मायकेल कार्टराईटच्या आयुष्यात चक्क जुळ्यांचा प्रवेश होणार होता.त्यातील थोरला नॅट तर दुसरा पीटर सहा मिनिटांनी जन्माला आला . 
रूथ डेव्हनपोर्टचा दोनदा अकाली गर्भपात झाला होता. आता ही आई होण्याची ही तिची शेवटची संधी असेल असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते. सुझान आणि रूथ एकाचवेळी सेंट पॅट्रिक हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी ऍडमिट झाल्या.रूथ त्या हॉस्पिटलची अध्यक्ष होती.
दुर्दैवाने रुथचा मुलगा जन्माला येतात काही वेळाने मरण पावला . हा धक्का तिला सहन होणार नाही याची कल्पना तिची खाजगी नर्स निकॉलला होती आणि म्हणूनच तिने पीटर कार्टराईटला रूथच्या हाती दिले आणि सुझानच्या हाती रूथचा मृत मुलगा दिला .
पुढे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी वाढू लागले .दोघेही जन्मतः हुशार असल्यामुळे त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत होता .
नॅट कार्टराईट तरुणपणातच सैन्यात भरती होऊन व्हिएतनाम युद्धात भाग घेतला आणि शौर्यपदक मिळवले नंतर तो प्रसिद्ध बँकर बनला तर पीटर उर्फ पलेचरने वकील होऊन राजकारणात शिरकाव केला .
पुढे दोघांनाही गव्हर्नरपदाची उमेदवारी मिळाली आणि ते एकमेकांसमोर उभे ठाकले. अचानक त्यातील तिसऱ्या उमेदवाराचा खून झाला आणि त्याचा आळ नॅट कार्टराईटवर आला .त्याला यातून वाचवण्याची ताकद फक्त एकाच व्यक्तीकडे होती आणि ती व्यक्ती म्हणजे पलेचर डेव्हनपोर्ट......
पण पलेचर डेव्हनपोर्ट त्याला या खूनाच्या आरोपातून बाहेर काढेल का ???  दोघांनाही आपले जन्म रहस्य माहीत होईल का ...?? शेवटी गव्हर्नरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल ...??
जेफ्री आर्चरने आपल्या नेहमीच्या शैलीत विस्ताराने ही कथा लिहिली आहे . यातील काळ खूप मोठा आहे. कथानायकाच्या जन्माच्या आधीपासून ते लहानाचे मोठे कसे होतात आणि त्याच मार्गाने त्यांच्या आयुष्यातील ठळक घडामोडी मांडल्या आहेत. पण हे वाचताना कुठेही कंटाळवाणे होत नाही . उलट काही ठिकाणी नर्म विनोद ही आहेत. सुरवातीलाच रहस्य उघड होऊनही आता पुढे काय घडेल याची उत्सुकता सतत वाटत आपण पुस्तक वाचत जातो ते अगदी शेवटच्या पानावरील शेवटच्या ओळीपर्यंत.

Tuesday, September 7, 2021

एक गहन षडयंत्र... डॉ. स्नेहल घाटगे

एक गहन षडयंत्र... डॉ. स्नेहल घाटगे
शब्दविश्व प्रकाशन
डॉ. राघव विद्यासागर हे प्रसिद्ध डॉक्टर होते. कथा सादर करणारा ईशान विद्यासागर हा त्यांचा नातू आहे . डॉ. राघव विद्यासागर यांचा नुकताच मृत्यू झाला म्हणून त्यांचे एक रहस्य ईशान इथे सांगत आहे .
डॉ. राघव हे व्यवसायाने डॉक्टर. त्याचा मित्र अंबर जेधे हा खाजगी गुप्तहेर. राघवची प्रेयसी तेजस्विनी आपली बहीण माया आणि तिचा नवरा हरी सरंजामे यांच्यासोबत राहत होती.हरी सरंजामे हे आजारी वृद्ध गृहस्थ आहेत तर माया ही सुंदर तरुण स्त्री.
डॉ. मनोहर हे राघवचे बॉस . ते शहरातील पाहिले नर्व्हस डिसऑर्डरचे तज्ञ म्हणून ओळखले जात.
त्या दिवशी अचानक रात्री तीन वाजता राघवला हरी सरंजामेकडे बोलविण्यात आले .एका चाकूने सरंजामे यांचा खून झाला होता. त्यावेळी घरात फक्त तेजस्विनी आणि दोन नोकर होते. माया आपल्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेली होती. 
जी व्यक्ती कर्करोगाने मरणार आहे तिचा खून करून कोणास फायदा होणार आहे. ??  पोलिसांसोबत या प्रकरणाचा छडा लावायची जबाबदारी अंबर जेधेने घेतली .पण त्याची प्रगतीही संथ होती. 
काही दिवसानी माया सरंजामेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . तो अपघात होता की आत्महत्या ...?? 
ही अतिशय गुंतागुंतीची केस शेवटी उलगडली गेली आणि वेगळेच रहस्य सर्वांसमोर आले .

Sunday, September 5, 2021

शिक्षकदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

शिक्षकदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
इथे मी सर्वाना शुभेच्छा देतोय याचे कारण माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या व्यक्तींना मी शिक्षकच समजतो. मग ते लहान असो वा मोठे. ऑनलाईन भेटणारे असो की ऑफलाईन असोत. 
प्रत्येक व्यक्तीने मला नेहमीच काहीतरी शिकवले आहे . खरेतर शाळेतील शिक्षकांविषयी माझ्या मनात कधीच फारसा आदर नव्हता . कदाचित मी साधारण बुद्धीचा , शिक्षणात ,वक्तृत्वात फारशी चमक न दाखवणारा असेन.म्हणूनच शाळेतील शिक्षकांच्या मी फारसा स्मरणात राहिलो नाही.आजही कोण समोर आले तर ओळखणार नाही हे निश्चित. अर्थात ती त्यांची चूक नाही म्हणा पण त्यामुळे कोणाच्या लक्षात राहायचे असेल तर कशात तरी चमक दाखविणे गरजेचे आहे हे शिकलो. 
पण शाळेच्या मित्रांकडून बरेच काही शिकलो . चेहऱ्यावरची एकही रेषा न हलवता निर्विकारपणे समोरच्याची टेर खेचणे. त्याने दिलेल्या शिव्या सहजपणे झेलणे . त्यावर हसणे . जर आपण एखाद्याला टार्गेट करत असलो तरी आपणही कोणाचे टार्गेट होऊ शकतो याचे भान ठेवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोस्ती निभावणे हे शिकलो.
 पुढे कॉलेज जीवनात अनेक चांगले शिक्षक लाभले . त्या सर्वांनी आम्हास खूप मदत केली . काहीजण अजूनही व्यक्तीशः ओळखतात .त्या शिक्षकांनी आम्हा मित्रात एकजूट आणली. एकमेकांवर विश्वास ठेवणे शिकवले . एकमेकांना समजून घेणे शिकवले . त्यामुळेच अजूनही आम्ही सर्व मित्र एकत्र आहोत .कॉलेजमधील आमच्या मित्रांनी आम्हाला व्यसने शिकवली पण त्या व्यसनांपासून दूर कसे राहावे हे ही शिकवले .ते ही शिक्षकच असणार.चांगले शिक्षणच आपल्याला चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक बनवते हे आम्ही कॉलेजमधून शिकलो .
त्यानंतर व्यावहारिक विश्वात आम्ही पाऊल  ठेवले . तिथे आमचे सिनियर आमचे शिक्षकच होते. त्यातील काहींनी आम्हाला टाईमपास कसा करावा . पाट्या कश्या टाकाव्या ,आपले काम दुसऱ्यांवर कसे ढकलावे ते शिकवले तर काहींनी प्रामाणिकपणे काम कसे करावे. आपली जबाबदारी कशी पार पाडावी. वरिष्ठांचा आदर करावा ज्युनियर्सना कसे ट्रेनिंग द्यावे हे शिकवले. 
पण मुळात चांगली व्यक्ती घडविण्यासाठी संस्कार महत्वाचे असते आणि हे लहानपणापासूनच  मुलांवर बिंबवले पाहिजे आणि तेच कार्य शाळेतील शिक्षकांकडून घडते . यासाठीच शाळा असतात आणि शाळेत जाणे गरजेचे असते. आजही ग्रामीण भागात शाळेचे महत्व शहरांपेक्षा कमीच आहे आणि म्हणूनच ग्रामीण भागातून फारच कमी मुले यशाच्या शिखरावर पोचतात .
आणि यावर अभ्यास आणि विचार विनियम करूनच स्टार्ट गिविंग फौंडेशनची स्थापना झाली . शहरातील अत्याधुनिक सोई ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळाल्या तर त्यांना शाळेत येण्यात उत्साह वाटेल ही मूळ संकल्पना घेऊन आम्ही मित्रांनी या क्षेत्रात पाऊल टाकले. एकमेकांना विचारून दुसऱ्यांच्या सूचनेचा आदर करून कोणाला न दुखावता आपल्या योजना यशस्वी होतील यावर आम्ही भर दिला . लाल फितीचा कारभार वगळून लवकरात लवकर कशी मदत गरजू कडे कशी पोचेल यावर भर दिला .आम्हाला वाटत नव्हते की यात फार काळ टिकून राहू पण विश्वास ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला आत्मविश्वास देते. त्याच विश्वासावर आज आठ वर्षे स्टार्ट गिविंग फौंडेशन डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात काम करतेय . गेल्या आठ वर्षात साधारण  25च्यावर शाळा आम्ही डिजिटल केल्या . त्याशिवाय पाणी फौंडेशन ,अनाथाश्रमात मेडिकल कॅम्प ,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, नाम फौंडेशन सारख्या संस्थेला मदत यासारखी छोटी मोठी कार्य केलीत. होय आमच्यासाठी ही कार्य छोटीच आहेत. कारण शैक्षणिक क्षेत्रात कराल तितके कमीच आहेत . पण आज काही केले नसते तर जे काही केले ते झालेच नसते .शून्य मिळविण्यापेक्षा एक मिळवा बडबड नको कृती करा हेच आमचे ध्येय .आम्हाला माहीत नाही यामुळे कोणाचा किती फायदा होईल पण सुरवात तरी केली हे महत्वाचे आहे.पण हे सर्व कशामुळे झाले ....?? आम्हाला का सुचले ...?? का आम्ही आमच्या खिशातील पैसे काढून या कार्यास देतो ...?? कारण आमच्यावर तसे संस्कार करणारेच आमचे गुरू आमचे शिक्षक आहेत मग ते आमचे  आमचे आईवडील असो ,मित्र असो .आमच्या आयुष्यात आलेला आणि पाठिंबा देणारा हा आमचा शिक्षक आहे .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, September 4, 2021

श्वास

श्वास
संतोष दिघेला हातात चिकूची पिशवी घेऊन घरात शिरलेले पाहताच मी उडालोच. सौ नेतर बाहेर जाऊन ह्याच्या मागे कोणी आले नाही ना याची खात्री करून आली.
मी मात्र या चिकूच्या बदल्यात मला कितीचा फटका पडेल...?? या चिंतेत पडलो.मुळात हे चिकू संतोषने माझ्यासाठी आणले का ..?? हा सर्वात मोठा गहन प्रश्न . मागच्या वेळी अननस आणला होता तेव्हा सुटे नाही म्हणून माझ्याकडून पैसे घेऊन त्या फळवाल्याला दिले आणि नंतर उपकार केल्यासारखे एक छोटा तुकडा मला देऊन उरलेला अननस एकट्याने संपविला होता .पुढे काही अघटित घडू नये म्हणून ही गोष्ट मी सौपासून लपवून ठेवली होती.
अरे हो ...!! हा संतोष दिघे कोण.. हे तुम्हाला माहीत असेलच . हो तोच.. जो स्वतःला लेखक समजतो . काही मराठी सिरियलचे लेखनही करतो असे आम्हाला सांगतो. सौ ला आणि तिच्या नातेवाईकांना  सिरीयलमध्ये काम करायची संधी देतो असे सांगून बऱ्याचवेळा भरपेट जेवून जातो . कधी कधी सौच्या शिव्या ही खातो.
लेखक असल्यामुळे त्याच्या शबनम बॅगेत दोन चार वह्या.. तीन पेन.. दोन पेन्सिली नेहमी असतात . मला नेहमी आपले लिखाण दाखवतो पण ते ऐकून माझे तोंड बघून ताबडतोब फाडून टाकतो आणि तो कचरा माझ्या हॉल मध्ये सोडून जातो.पण आज त्याच्या खांद्यावर बॅग नव्हती हे पाहून हायसे वाटले.
पण आता त्याने सौला चक्क हाक मारून तिच्या हातात ती चिकूची पिशवी दिली आणि आम्हाला एकदम सुचेनासे झाले .
"घ्या वहिनी ...दोन डझन आहेत.यापुढे तुम्ही चिकू कधीच बाहेरून विकत घ्यायचे नाहीत ..." दिघे हसत म्हणाला .
"म्हणजे या पुढे चिकू तुझ्याकडून विकत घ्यायचे का ..."? मी छद्मीपणे हसत विचारले.
"गप बसा हो...आपल्या माणसाला कोण पैसे देते का ...सौ त्याच्या हातातील पिशवी जवळजवळ हिसकावून घेत म्हणाली आणि संतोषचा विचार बदलायच्या आत ती आत पळाली.
"काय भाऊ ...कामाला जातोस की नाही …."त्याने माझ्या पाठीवर थाप मारून विचारले .
"तुझ्यासारख्या मित्राकडून त्या भयानक कथा ऐकण्यापेक्षा ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या खाल्लेल्या परवडल्या..." मी तिरकसपणे म्हणालो.
माझ्या बोलण्याकडे लक्ष न देता  त्याने खिश्यातून स्मार्टफोन काढला आणि त्यातून एक फोल्डर ओपन करून त्यातील कथा मला वाचायला दिली.
"आयला हे काय...?? दिघ्या चक्क हायटेक झालाय.मोबाईलवर लिहितो.म्हणून त्याची ती सुप्रसिद्ध शबनम बॅग मला दिसली नव्हती.
" म्हणजे तू हल्ली कागद पेन वापरणे सोडून दिलेस तर....!! असा अचानक कोणता साक्षात्कार झाला तुला..?? मी कुतूहलाने विचारले .
ह्या माणसाने कथा लेखनाच्या नावाखाली किती कागद वाया घालवले असतील त्याची कल्पना फक्त मला आणि विक्रमला होती. त्या कागदाचा अर्धा फायनान्सर तर विक्रमच होता.
"मी हल्ली कागद वापरणे सोडून दिले भाऊ.."संतोष गंभीरपणे म्हणाला .
"फक्त कागद ...?? कथा नाही .."?? मी चिडून विचारले.पण त्याचा चेहरा पाहून गप बसलो.
"तुला माहितीय आपण आतापर्यंत किती रिम कागद वापरले असतील .…?? त्याने प्रश्न केला . 
"मी तुझ्यापेक्षा नक्कीच कमी वापरले आहेत..." मी मान उंचावून सांगितले .
" मान्य.. तुला माहितीय भाऊ एक झाड आपल्याला सतरा रिम कागद देते आणि एका रिममध्ये साधारण पाचशे कागद असतात...विचार कर भाऊ आपण आतापर्यंत किती झाडांची हत्या केलीय...." दिघे गंभीर होऊन म्हणाला .
"च्यायला ...मी हा विचारच केला नव्हता. दिघ्याला नक्कीच कोणतरी गुरू भेटलाय.
"काय झाले संतोष .."?? मी गंभीरपणे विचारले .
"काही महिन्यांपूर्वी ट्रेनमध्ये एक गृहस्थ भेटले . कणकवलीत एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहेत ते . माणूस हुशार .माझे पेपरवर चाललेले चाळे पाहून अस्वस्थ होत होते. शेवटी ते चिडलेच आणि हेच प्रश्न मला विचारले. माझे ही तुझ्यासारखेच झाले.मग त्याने ही थियरी सांगितली आणि मी गप्पच झालो. आपल्याला मिळणाऱ्या शुद्ध ऑक्सिजनची निर्मिती ही झाडांकडून होते.आपल्याला ऑक्सिजनची किती गरज आहे ते करोनाने दाखवुनच दिलेय. मी आजारी असताना तुम्ही ऑक्सिजन सिलेंडरसाठी किती धावपळ केलीत ते वहिनीने सांगितलंय मला.एका माणसाला रोज 550 लिटर ऑक्सिजन लागतो .एक पूर्ण वाढ झालेले झाड दोनजणांना आयुष्यभर पुरेल इतका ऑक्सिजन देते .पण ते झाड कोणी लावलेले असते .…?? आपण किती झाडे लावतो...? आपण झाडे लावत नाही मग आपल्या पुढच्या पिढीला कोण ऑक्सिजन देईल...?? मी त्यांचे बोलणे ऐकून हादरलो. खरेच किती विचार न करता वागतो आपण . असे कागद वापरून किती झाडांची हत्या केली असेंन मी ..किती लोकांचा श्वास हिरावून घेतला असेल . मी त्यांची माफी मागितली  आणि झाडे लावून ती जगविण्यासाठी काही उपाय आहे का ते विचारले .."
"मग .."?? आता माझीही उत्सुकता वाढली 
" त्यांनी सांगितले तू फक्त माझ्या जमिनीत एक झाड लाव.आणि वर्षाला एक ठराविक रक्कम दे .ते झाड मी जगविन . त्या झाडाला तुझे नाव देईन संतोष दिघेचा श्वास . तू कधीही ये त्या झाडाखाली बस सेल्फी काढ त्या झाडाला जितकी फळे /फुले लागतील  ती सर्व तुझी. तू सर्व घेऊन जा .मला फक्त ते झाड जगविण्यासाठी नाममात्र पैसे देत जा .त्या झाडावर तुझी आणि तुझ्या कुटुंबाची मालकी असेल . फक्त दोन झाडे लाव आणि आपल्या कुटुंबाचा श्वास निश्चित कर ...भाऊ मला ती कल्पना आवडली. अरे त्यांनी जी रक्कम सांगितली ती त्या कार्याच्या बदल्यात काहीच नव्हती.मग मी चिकुचे झाड लावले .आज पहिल्यांदा त्या झाडाला फळे लागली.ते घेऊनच मी पहिला तुझ्याकडे आलो.आणि हो मी हल्ली मोबाईलवरच टाईप करतो त्यामुळे कागद वाचतात  आणि माझ्या झाडांमुळे कमीतकमी दोन जणांना ऑक्सिजन मिळतोय याची जाणीव ही सतत होत असते..….हळवा होत दिघे म्हणाला.
"वा संतोष ....आज तू मलाही नवीन दृष्टी दिलीस.चल मी ही तुझ्या मित्राकडे जाऊन माझ्या आवडीचे एक झाड लावतो .पर्यावरणाची चर्चा करण्यापेक्षा पर्यवरणात वाढ कशी होईल याकडे लक्ष देऊ ..".मी संतोष दिघेला सलाम करीत म्हणालो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर