Wednesday, September 27, 2023

LUPIN

LUPIN
लुपिन
बाबकर डिओप हा सरळ साधा पण स्वाभिमानी गृहस्थ .आपल्या चौदा वर्षाच्या मुलांसोबत राहतोय.अस्साने डिओप त्याचा मुलगा हा त्यांच्यासारखाच शांत आणि हुशार आहे.
बाबकारने त्याला लुपिनचे पुस्तक वाचायला दिलंय. लुपिन हा सभ्य बदमाश आणि हुशार चोर आहे .तो अतिशय हुशारीने चोऱ्या करतो आणि नेहमी सर्वांच्या दोन पावले पुढे असतो.
बाबकर पेल्लेग्रीनी नावाच्या उद्योगपतीकडे ड्रायव्हर असतो . आपल्या मुलाला तो नेहमी त्याच्याकडील लायब्ररीमधून पुस्तके वाचायला द्यायचा .पेल्लेग्रीनीकडे एक अतिशय दुर्मिळ हिऱ्यांचा नेकलेस आहे .त्याची किंमत करोडो रुपयात आहे.एक दिवस तो हार चोरीला जातो आणि त्याचा आळ बाबकरवर येतो. बाबकर गुन्हा कबूल करतो आणि त्याची त्याला मोठी शिक्षा होते. तो निराश होऊन तुरुंगात आत्महत्या करतो .त्याच्या मुलाची अस्सानची  रवानगी अनाथाश्रमात होते.पण पेल्लेग्रीनी पत्नी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेते.
पंचवीस वर्षानंतर  अस्सान मोठा होतो आणि लुपिनप्रमाणेच चोऱ्या करू लागतो . पेल्लेग्रीनीकडे असलेल्या त्या दुर्मिळ नेकलेसचा पुन्हा लिलाव होतो .यावेळी अतिशय शिताफीने अस्सान तो हार पळवतो.त्यावेळी त्याला कळते आपल्या वडिलांना यात मुद्दाम गोवण्यात आलेय.त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आलेय.तो हळूहळू या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि  सर्व पुरावे जमा करतो .
खरे तर ही सरळ साधी रहस्य कथा आहे .पण तिचे सादरीकरण उत्तम आहे .अस्सानचा नेकलेस चोरीचा प्लॅन, त्यानंतर तुरुंगात जाऊन बाबकरच्या मित्राला भेटणे,  त्याच्या सामानातून वडिलांचे पुस्तक घेऊन तुरुंगातून पलायन करणे, हे सर्व कसे करतो ते बघण्यासारखे आहे.
पाच भागाची ही मालिका हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .पाच पाच भागाचे दोन सीजन आहेत . यात फारशी ऍक्शन गोळीबार नाही पण वेगवेगळ्या युक्त्या आहेत.पाहायला कंटाळा येत नाही.

Tuesday, September 26, 2023

शवागृह

शवागृह
"साहेब ,बॉडी लवकर मिळेल ना ? "तो वयस्कर गृहस्थ हात जोडून विष्णूला विचारत होता.विष्णूने नेहमीसारखे प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
"तसे नाही हो .उद्या गणपती येणार आहेत .कोणाचा खोळंबा नको. शिवाय प्रेताला चार माणसे तरी यायला हवीत."तो गृहस्थ म्हणाला .
"मी माझे काम करून ठेवतो .बाकी सगळे डॉक्टरांवर आहे ."थंड आवाजात विष्णूने उत्तर दिले आणि शवागृहात शिरला .
होय, विष्णू शवागृहातच कामाला होता .रात्री प्रेताची राखण करायची तर कधीकधी पोस्टमार्टेमची प्रेतही फाडून द्यायच्या .
आता डॉक्टर कुठे प्रत्येक शव फाडत बसणार .ते फक्त विष्णूला सूचना देऊन जायचे  हळूहळू विष्णुच शिकला शवाला कसे कुठून फाडायचे ,कवटी कशी कापायची. 
त्याच्याशी मेलेली माणसे बोलतात असे बरेचसे त्याला ओळखणारी माणसे बोलायची .खरे खोटे देव जाणे पण त्याला कोणी विचारले "भीती वाटत नाही का ?" तर "भीतीची सवय झालीय "असेच म्हणून चालू लागायचा .
प्रेतांच्या संगतीत राहून त्याच्या शरीरालाही विशिष्ट वास येऊ लागला होता.आता हरी,बंड्या सारख्या माणसांना तो वास परिचयाचा होता .कारण त्यांनाही अंत्यसंस्काराची हौस होती.कुठे प्रेत झाले म्हटले की हे दोघे तिरडी बांधायला हजर .
गणेशोत्सव जवळ आला होता .अर्थात विष्णूला त्याच्याशी मतलब नव्हते . याचा अर्थ तो देवाला मानीत नव्हता असे नाही पण गणेशोत्सव असला तरी मरायचे कोण थांबतो का ?? आणि हॉस्पिटलमध्ये एक दोन शव पोस्टमार्टेमला येणार हे नक्की होते.
पहिल्यांदा वाईट वाटायचे असे सणासुदीला कोणी मरताना पाहून. पण आपण फक्त त्यांना फाडायचे काम करू शकतो हे मनात पक्के बसल्यावर काहीच वाटेनासे झाले. 
शवागृहात गार्डची ड्युटी कशाला ? ती प्रेत काय पळून जाणार आहेत ? असे ही प्रश्न नातेवाईक विचारायचे .पण ते पळून जाणार नाहीत त्यांना पळवणारे भरपूर आहेत हे अनुभवाने माहीत झाले होते.
उद्या गणपती येणार म्हणून  रस्ते गजबजलेले होते. दुपारी जेवून विष्णू शवागृहात हजर झाला तेव्हा दोन प्रेते त्या टेबलावर झाकून ठेवली होती. 
सवयीने त्याने  शवागृहातील देव्हाऱ्यात बसलेल्या गणपतीला नमस्कार केला आणि पिशवीतील हार काढून त्याला घातला .हातातील पेढ्याचा बॉक्स समोर ठेवला आणि नंतर  प्रेतावरचे पांढरे कापड हटविले.
एक साठीचा वृद्ध तर तरुण स्त्री .
त्या वृद्ध पुरुषाला आधी घे. अटॅकने गेलाय आणि दुसरी कॅन्सरने .साध्या केस आहेत मी येणार नाही गणपतीची तयारी करतोय .अशी डॉक्टरची चिट्टी होती. म्हणजे आता पुढे दरवर्षी डॉक्टरचे काम ही मीच करायचे ?
अप्रान घालून त्याने कवटी कापायला करवत हाती घेतली आणि दार लोटून तो तरुण डॉक्टर आत शिरला.
"आता हा कोण नवीन ?" विष्णूच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"काका , मी डॉक्टर अथर्व. मोठ्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्हच्या मदतीला जायला"तो प्रेताकडे बघत तोंड कसेनुसे करत म्हणाला .
"मला मदत ?? अरे , मलाच माहिती नाही किती प्रेतांचे पोस्टमार्टेम केले आहे मी ?"कामात व्यक्तय आल्यामुळे विष्णू चिडला .
"मला शिकायचे आहे पोस्टमार्टेम कसे करतात ते " तो तरुण म्हणाला .
"ठीक आहे ये .पण हीच वेळ मिळाली का ?? उद्या गणपती .म्हणजे आज पोस्टमार्टेम करून उद्या त्याची पूजा करणार का " देव्हाऱ्याच्या दिशेने हात दाखवीत विष्णूने विचारले.
देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती पाहून तो तरुण हसला .
"काय काका " इथेही त्याला आणलेच का ?? या असल्या जागेत त्याची पूजा तरी कशी करता ? आणि समोर काय तर ही फाडलेली प्रेत ? कसे जमते हो तुम्हाला ??" डॉ. अथर्व हसत म्हणाला.
"ही पण कामाचीच जागा आहे ना ? इथेच मृत्यूची कारणे शोधली जातात .माणूस आपल्या शरीराची वाट कशी लावतो हे इथेच कळते .तर आत्महत्या आणि खुनाचे वेगवेगळे प्रकार इथेच समजतात आणि त्याचा तपास ही इथे होतो .पण म्हणून काय देवाला इथे आणायचे नाही का ? " विष्णूने प्रश्न केला.
"कबूल ,पण तुम्ही कसे राहता इथे ? आणि तुमच्या घरी गणपती येत नाही का ?" त्या तरुणाने उत्सुकतेने विचारले.
"येतो ना .पण गावी. इथे माझ्या अंगाला येणारा वास पाहून आजूबाजूची माणसे दूर जातात मग हा कसा राहील तिकडे . त्यापेक्षा इथेच त्याची पूजा करतो ," देव्हाऱ्यात पाहून विष्णू म्हणाला . 
"चल आता काम सुरू कर लवकर " असे बोलून दोघेही कामाला लागले. ते काम करताना त्या तरुणाला मळमळून येत होते .शेवटी एकदाचे काम संपले .
"चला निघतो मी. हात जोडून तो तरुण म्हणाला आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागला .
"डॉक्टर अथर्व , खणखणीत आवाजात विष्णूने हाक मारली .तिकडे कुठे चाललात .तुमची जागा सोडून ?"
अथर्व वळला त्याच्या नजरेत आश्चर्य होते.विष्णूचे हात देव्हाऱ्याकडे होता .
"मी नाही समजलो " तो म्हणाला 
"अथर्व नावाचा कोणीही डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये नाहीय.नवीन तर मुळीच नाही .पण तू कोण हे ओळखले मी .हार घातलेल्या फुलाची पाकळी अजून तुझ्या कॉलरवर आहे. तर पेढ्याचे कण तुमच्या उंदराच्या तोंडाला लागलेय" सहजपणे विष्णू उद्गारला 
"खरे आहे ,तो मीच आहे .बरीच वर्षे बघतोय तुला .इतरांना तिरस्कारणीय असणारे काम तू करतोयस . तुझ्या अंगाला येणारा वास घेऊन लोक नाके मुरडतात .सुट्टी नाही म्हणून मलाही गावी पाठविलेस . कधी कधी वाटते तुझ्यातील भावना मेल्यात ,एक दगड ,यंत्र बनून राहिलास तू .पण आज ज्या तत्परतेने काम करून त्या माणसाच्या नातेवाईकांनाही मोकळे केलेस ते पाहून खुश झालो मी म्हटले तू काय घरी येत नाहीस मग मीच भेटायला जाईन " टेबलावरील गृहस्थाच्या प्रेताकडे बोट दाखवून तो म्हणाला .
"पण मला पाहून तुला काहीच वाटले नाही का ?? भीती आनंद ?? " अथर्व आश्चर्याने म्हणाला 
" काय वाटणार .मुदड्यांच्या सहवासात राहतो मी .मला भेटणारा जिवंत आहे की मुडदा हे एका नजरेत ओळखतो .तुझे वेगळेपण आत शिरताच जाणवले. थोडा वेळ का होईना एक प्रसन्न वातावरण इथे निर्माण झाले. पण माणूस ही नाही भूत ही नाही मग तिसरा कोण असणार हे कळले मला "हात जोडत विष्णू म्हणाला "बरे झाले रोज रोज त्या भुतांशी बोलून कंटाळा आलेला आज तू भेटलास".
त्याला आशीर्वाद देत अथर्व निघून गेला .
तिकडे गावी तो विष्णूच्या घरात शिरताच अचानक काही लोकांनी नाक मुरडली हे त्याच्या लक्षात आहे .
विष्णूच्या मुलाने तर "आये बाबा इले की काय ?" असे ही विचारले .
"आता मेलेल्यांचे शरीरही फाडायला लागलात तुम्ही " दोन्ही हाताने नमस्कार करीत त्याच्या शेजारचा उंदीर ओरडला ."हीच कामे करायला येता का इकडे .तुमच्या सोबत राहून हे असे काही पहायची पाळी येईल असे वाटले नव्हते आणि यावेळी त्याने तुम्हाला ओळखलेच ना " उंदराच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
"काय झाले रे, त्याला मदत केली तर.समाजात मोजकीच माणसे आहेत अशी कामे करणारी.दिवसरात्र, सणवार न पाहता त्यांना असली कामे करावी लागतात .कधीकधी त्यांच्याच जवळच्या नातेवाईकांचे पोस्टमार्टेम करावे लागते .त्यांच्या कामामुळे आणि वासामुळे लोक दूर पळतात. तर ते आपल्याजवळ येत नाहीत म्हणून मीच त्याच्याकडे गेलो आणि हो, या पुढे काहीही खाल्यावर तोंड व्यवस्थित पुसत जा .त्याने पेढा ठेवल्यावर पटकन तोंडात घातलास मला तयारीसाठी वेळ ही दिला नाहीस " रागाने उंदराकडे पाहत तो म्हणाला आणि तबकातील मोदक खात समोरच्या भक्तांना आशीर्वाद देत बसला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

SONG OF THE BANDITS

SONG OF THE BANDITS
सॉंग ऑफ द बँडिस्ट
हा काळ आहे साधारण 1920 चा. जेव्हा जपान आपल्या साम्राज्याचा विस्तार करीत होता.जेसन देश आपल्या स्वातंत्र्यासाठी जपानच्या विरुद्ध उभा राहिला होता. जेसन लोक क्रांतिकारक दल बनवून होते.काही जेसन सरकारी अधिकारी बनून क्रांतीकारकांना मदत करत होते.
ली यून आणि ली वांग उर्फ किमुरा दोघे बालमित्र.सैन्यातील एकाच डिव्हिजनमध्ये होते.ली वांग महत्त्वाकांक्षी आणि राजघराण्यातील तर ली यून गरीब त्याचा गुलाम  सरळ साधा माणुसकी असलेला .खरे तर दोघेही जेसन आहेत. 
एका  मोहिमेत अनेक निरपराध जेसन मारले जातात.त्या घटनेची जबाबदारी ली यून घेतो आणि सैन्यातून बाहेर पडतो तर त्याच घटनेमुळे किमुरा अजून मोठा अधिकारी बनतो .
नाम शिन ही तरुणी जापनीज रेल्वेत अधिकारी आहे .पण तिचा जेसन क्रांतीकारकांना पाठिंबा आहे.तीही एका क्रांतिकारी दलाला मदत करतेय.लवकरच किमुराशी तिचे लग्न होईल पण कीमुराला तिची खरी ओळख माहीत नाही .
जपान्यांचा  जेसन लोकांवर होणार अत्याचार पाहून ली यूनही क्रांतिकारी बनतो आणि स्वतःचे दल तयार करतो.
नियोन ही भाडोत्री मारेकरी आहे .तिला ली यूनला ठार मारण्याचे पैसे किमुराने दिले आहेत. पण ती प्रयत्न करूनही त्याला मारू शकत नाही .
रेल्वेच्या विस्तारासाठी दोन लाख वोन घेऊन नाम शिन गंडो गावात निघाली आहे .या पैशावर तेथील लुटारू ,क्रांतिकारक ,ली यून चा डोळा आहे.
नाम शिनला ही ते पैसे आपल्या दलासाठी हवेत आणि त्यासाठी तिने नियोनची मदत घेतलीय .
ते पैसे क्रांतिकारी दल चोरणार याची बातमी किमुराला लागते आणि तो सशस्त्र तुकडी घेऊन क्रांतिकारकांचा खातमा करण्यासाठी बाहेर पडलाय .
हे दोन लाख वोन ज्यांना हवे आहेत त्यांना मिळतील का ?? नाम शिनला अनेक धोके पत्करून  पैसे योग्य जागी पोचवाते कामात तिला ली यून मदत करतो .
हे सर्व इथेच थांबत नाही .कीमुराची तुकडी गावांवर हल्ला करते अनेक जण मारले जातात .
आता जपानी साम्राज्य जेसन जमातीला नष्ट करायचे ठरवितो त्यासाठी त्याने तिकडच्या लुटारूना हाताशी धरलेय. एक मोठे सैन्य जेसनचा बंदोबस्त करण्यासाठी निघालंय.
जेसनचा स्वातंत्र्यलढा यशस्वी होईल का ?? 
प्रचंड ऍक्शन ,गोळीबार ,हाणामारी असलेली ही नऊ भागाची मालिका हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे .
याचा दुसरा सीजन ही लवकर येईल .

Sunday, September 24, 2023

जाने जान

जाने जान
JAANE JAAN
क्लिंपोंग या निसर्गरम्य गावात माया डिसोझा आपल्या तेरा वर्षाच्या मुलीसोबत राहतेय .तिचा छोटा कॅफे आहे. साधारण तेरा वर्षांपूर्वी ती या शहरात आलीय. तिचा शेजारी नरेन व्यास हा गावातील शाळेत गणिताचा टीचर आहे.एकलकोंडा ,मितभाषी ,आणि मायावर मनापासून प्रेम करणारा .त्याचे मायाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे. तो गणितात एकदम मास्टर आहे.सर्व गाव त्याला टीचर म्हणून हाक मारते.
मुंबईतून सब इंस्पेक्टर विजय म्हात्रे गायब झालाय.विजय भ्रष्ट अधिकारी आहे .त्याला शोधून काढण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर करण आनंद वर येते. करण आनंद जरी हसऱ्या चेहऱ्याचा असला तरी खूप धूर्त आणि हुशार आहे.
विजय म्हात्रे मायचा शोध घेत क्लिंपोंगला येतो.खरे तर तो मायाचा नवरा आणि ताराचा बाप आहे. माया त्याला पाहून हादरते .कारण तीच साधारण तेरा वर्षांपूर्वी त्याच्या जाचालाच कंटाळून पळून आलेली असते. विजय दोघांनाही मुंबईत चलण्याचा आग्रह करतो आणि त्या झटापटीत मायाच्या हातून त्याचा खून होतो. 
मायाच्या हातून खून झालाय हे टीचरला कळते आणि तो मायाला मदत करण्याचे ठरवितो. इकडे करण आनंद विजयचा शोध घेत क्लिंपोंगला आलाय आणि तो मायापर्यंत पोचलाय .
करण आनंद हा योगायोगाने टीचरचा कॉलेज मित्र आहे .
आता टीचर विजयच्या प्रेताची कशी विल्हेवाट लावेल.तो माया आणि ताराला या खुनाच्या प्रकरणातून वाचवेल का ??
करण विजयच्या खुनाच्या मुळापर्यंत कसा जाईल ?
करीना कपूर मायाच्या भूमिकेत शोभून दिसते.आता तिचे वय दिसून येते .
विजय वर्माने करण आनंद हा हसऱ्या चेहऱ्याचा विनोद करणारा इन्स्पेक्टर  छान उभा केलाय.
नरेन व्यास उर्फ टीचर जयदीप अहलावतने पूर्ण ताकदीने उभा केलाय.त्याचे मोजकेच विचार करून ठामपणे बोलणे.ठराविक दिनक्रमात रमणे. मायावर मनोमन प्रेम करणे छान उभे केलंय.
चित्रपट थ्रिलर आणि थोडा वेगवान आहे.हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.

Saturday, September 23, 2023

मॅगी

मॅगी
त्या एकमजल्या चाळीत रवी कामतच्या हातावर बसून तो आत शिरला तेव्हा रविना वहिनीने गोड हसून त्याचे स्वागत केले.घरात ती एकटीच त्याच्या स्वागताला होती.अर्थात गेले पाच सहा वर्षे हीच परिस्थिती होती म्हणा .पण त्याला ते आवडायचे .कारण ते दोघे जी मनापासून त्याची सेवा करायची तेच आवडायचे त्याला .
आजही त्यात फरक पडणार नव्हता. रविना वहिनी खूप छान दिसत होती ते रवीच्या नजरेवरूनच त्याला कळत होते.साधी साडी,गळ्यात फक्त काळ्या मण्यांचे एक वाटीचे मंगळसूत्र .पण चेहरा हसतमुख आणि टापटीप होता . फक्त पावडरचा हलका हात फिरवला होता.रवी मुळातच हँडसम , कब्बडी खेळाडू .त्यामुळे शरीर कमावलेले होते.दोघांची जोडी शोभत होती.
"आता काय करायचे ?"मखरात फक्त गूळखोबरे पाहून त्याचा उंदीर चिडला .
"अरे ,सध्या नाही परिस्थिती त्यांची .पुढे करतील काहीतरी चांगले ." तो आजूबाजूला पाहत म्हणाला .साधा वेगवेगळ्या साड्यांची सजावट केलेला मखर होता. आपल्याला इतका ऐसपैस मखर देऊन हे दोघे झोपणार कुठे हीच चिंता त्याला पडली होती .
"हो पुढे देतील काहीतरी. हाच विचार करत गेली पाच वर्षे येतोय इथे. पण इथे आरतीच्या नावाखाली बोंबा मारायला ही कोणी नाही.अरे मागच्या वर्षी तुझा जयजयकार ही मलाच करायला लागला .उंदीरमामा की जय हे मलाच म्हणावे लागते."तो शेपटी आपटीत म्हणाला.
याला हजारो वर्षे आपण कसे सहन करतोय हाच विचार करीत तो शांत बसला.
रवी आणि रविना कामत यांचा संसारच तसा होता.रविना गावाहून शहरात आलेली तर रवी मूळ मुंबईतला.
 गिरणी कामगार संपातील फटका वडिलांना बसला पण त्यातही नुकसान लहानग्या रवीचेच झाले.शिक्षण सुटले. मग सोसायटीत गाड्या धू, पेपर टाक , दूध पोचव अशी वेगवेगळी कामे करतच मोठा झाला .शिक्षण नाही पण परिस्थितीने प्रॅक्टिकल होणे शिकवले. गावातील मुलगी मुंबईत ऍडजस्ट करणार असा अंदाज बांधूनच रविनाशी लग्न केले.
रविनाची परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती.गावी घर होते पण बाकी काही नाही .तीही तिथे मजुरी करायची.आपले केवळ नाव रविना आहे रविना टंडन नाही हे पक्के मनात ठेवून होती ती.
रवी तिला आवडला .व्यसन नाही .कामात कष्ट करायची तयारी .दोघांचा संसार बऱ्यापैकी चालू होता.अजूनही बाळाचा विचार केला नव्हता .आपलेच भागत नाही तर मुलाचे कसे करणार या भीतीनेच पुढे पाऊल टाकत नव्हते.
सकाळी आठला दोघेही घराबाहेर पडायचे ते रात्री आठला घरी यायचे.या बाबतीत ते पक्की वेळ पाळीत होते.तो एका सोसायटीत सिक्युरिटी होता आणि तिथून सुटल्यावर दोन तास स्वीगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून एक दोन ऑर्डर करायचा .तर रविना त्याच सोसायटीत दोन तीन घरात कामे करायची .दोन मुलांना पाळणाघरात सोडायची.
आताही दोघे त्याची पूजा आरती करून घराला कुलूप लावून बाहेर पडले. ते बाहेर पडताच तो मखरातून टुणकन उडी मारून बाहेर पडला .
"चल ये रे ,आपलेच राज्य आहे आता .चल क्रिकेट खेळू."कोपऱ्यातील छोटी बॅट हातात घेऊन त्याने उंदराला ऑर्डर सोडली. 
"म्हणजे बॅटिंग तू करणार आणि बॉलिंग मी करायची " तो चिडून म्हणाला.
" हे बघ, ही अशी संधी फक्त इथेच मिळते आपल्याला .इथेच आपण मनसोक्त आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो.काळजी करू नकोस .खेळून झाल्यावर मी तुला मॅगी करून देईन " त्याने लालूच दाखवली तसा उंदीर खुश झाला आणि बॉल घेऊन त्याच्या समोर उभा राहिला .
खेळून झाल्यावर त्याने मॅगी बनवली आणि दोघांनी जमिनीवर बसून खाल्ली .मग तिथेच झोपून गेले.
 संध्याकाळी रवी सोसायटीतून बाहेर पडला आणि स्वीगीला जॉईन झाला.पण नेहमी पाच मिनिटात मिळणारी ऑर्डर आज पंधरा मिनिटे झाली तरी मिळाली नव्हती. तो गेटजवळच बसला होता.
तेव्हाच प्लॅस्टिकचा बॉल त्याच्या डोक्यावर आदळला.चिडून मागे वळून पाहिले तर एक छोटा मुलगा हातात बॅट घेऊन उभा होता.
" काका ,बॅटबॉल खेळणार का ?" त्या छोटुने निरागसपणे विचारले . खरे तर आज एक ऑर्डर कमी करावी लागेल याचीच चिंता त्याच्या डोक्यात होती.त्यामुळे तो चिडून नाही म्हणाला .
त्याचे नाही उत्तर इतक्या जोरात आले की छोटू बावरला .
"माझ्याशी खेळायला कोणी नाही .पप्पा असते तर खेळले असते "तो डोळ्यात पाणी आणून उत्तरला. त्याचा चेहरा पाहून रवी मनातून हलला.
"चल खेळू ,तू बॅटिंग कर .मी बॉलिंग करतो "असे म्हणत त्याने बॉल हाती घेतला.आज त्याच्याशी खेळताना एक अनामिक आनंद त्याला होत होता. आठ वाजत आले तसा त्याने खेळ बंद केला आणि छोटूने बॅगेतून खाण्याचा डबा काढला .
"काका या मॅगी खाऊ " असे म्हणत डबा पुढे केला .त्या मॅगीची चव रविनाच्या मॅगी सारखीच होती.
तिथे रविनाही दोन घराची कामे आटपून पाळणाघरात पोचली .
"बर झाले बाई तू आलीस .जरा वेळ या मुलांकडे लक्ष देतेस का ? मी समोरच्या सोसायटीत जाऊन बाप्पाला नमस्कार करून येते."पाळणाघरातील बाईने विचारले.
तिने हो म्हटले.
तीन चार लहान मुले होती . साधारण तीन चार वर्षांनी .ती त्यांच्यात रमून गेली .त्यातल्या एका गोड मुलीने बॅगेतून डबा काढला आणि रविनाच्या हातात दिला .कुतूहलाने तिने तो डबा उघडला तर त्यात मॅगी होती. त्या मुलीने एक चमचा मॅगी रविनाला भरविली आणि रविनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .रवी अशीच मॅगी बनवतो .
नेहमीप्रमाणे आठ वाजता ते कुलूप उघडून घरात शिरले तेव्हा वेगळ्याच आनंदात होते.तिने घाईघाईने नैवेद्याची तयारी केली आणि त्याच्यासमोर ठेवला .दोघांनी मिळून त्याची आरती केली .
"बाप्पा पुढच्या वर्षी आरतीसाठी तिसरा माणूस घरात येऊ दे "असे दोघेही एकदम म्हणाले आणि चमकून एकमेकांकडे पाहिले.
"होय किती दिवस आपण आपलाच विचार करत बसणार .आता जसे दोघे जगतोय तसे तिघे जगू.पण आपल्याला बाळ हवेच "रवी तिला मिठीत घेत म्हणाला .
"घ्या, मगितलेच काहीतरी .बाप्पा तुला सांगतो इथे सर्व स्वार्थी आहेत.आपण त्यांची मॅगी खाल्ली तर बदल्यात त्यांनी हे मागितले."तो उंदीर चिडून म्हणाला.
"काय हरकत आहे रे .दोघेही कष्ट करतायत .त्यांना मूल जन्माला घालण्याचा अधिकार आहे.अशी कित्येक जोडपी आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे पण मुलांना वाढवितातच ना ? अरे आपण तशी व्यवस्थाच करून ठेवलीय यांच्यासाठी.त्यांना आतापर्यंत तो आत्मविश्वास नव्हता पण आज आपण त्यांना तो दिलाय .हेच तर त्यांच्या मनापासून केलेल्या निस्वार्थी सेवेचे  फळ आहे." तो आशीर्वाद देत म्हणाला.
रात्री साफसफाई करताना फळीवरील मॅगीचे पाकीट डस्टबीनमध्ये रिकामे कसे आले ? याचाच विचार रविना करत होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, September 22, 2023

द आउटफिट

THE OUTFIT 
द आउटफिट
1956 साली लिओनार्ड बर्लिंग शिकागोत इंग्लंडवरून शिकागोत आला होता. तो सूट शिवण्यात एक्सपर्ट होता .तो स्वतःला टेलर नाही तर कटर म्हणवून घेतो. शिकागोत त्याच्या दुकानात एक गँगस्टर सूट शिवायला येत असतो आणि त्याच्या दुकानाचा वापर आपल्या धंद्यासाठीही करत असतो .
रीची हा त्या गँगस्टर रॉयचा मुलगा .एकदा जखमी अवस्थेत रीची आपल्या साथीदारसोबत येतो. फ्रान्सिस हा रीचीचा बॉडीगार्ड आहे आणि रॉयचा उजवा हात.त्यांच्याजवळ एक कॅसेट असते ती एफबीआयपर्यंत पोचली तर सर्वच धोक्यात येणार असतात . अचानक ती कॅसेट नाहीशी होते आणि फ्रान्सिसच्या हातून रीची मारला जातो.
फ्रान्सिस बर्लिनला आपल्या बाजूने वळवितो आणि रीचीचे शव तिथल्या पेटीत लपवतो. इतक्यात रॉय दुकानात येतो आणि सुरू होतो संशयाचा खेळ. सर्व एकमेकांवर आरोप करीत असतात .या खेळात बर्लिन शांत असतो .
कॅसेट कुणाकडे आहे ??
रीचीचा पत्ता रॉयला मिळेल का ?
फ्रान्सिस रीचीच्या खुनातून बाहेर पडेल का ?
बर्लिनच्या सेक्रेटरीचा यात काय रोल आहे ?
एका टेलरच्या दुकानात घडणारी मोजक्याच पात्रांची ही कथा आपल्याला गुंतवून ठेवते.
एक संथ पण थ्रिलर चित्रपट .पुढे काय होईल याची सतत उत्कंठा वाढवीत राहतो.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे .

Thursday, September 21, 2023

मित्र

मित्र
दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ते सुट्टीवर यायचे. यायचे म्हणजे पाठविले जायचे. मग जो तो आपापल्या घरी जायचा .वर्षातून एकदाच पोरगा घरी येतो म्हणून उत्साहाने स्वागत व्हायचे त्यांचे.
आज तो आपल्या मित्राला भेटायला अमृतबागेत जाणार होता.खरे तर त्याचा मित्र दरवर्षी त्याला भेटायला बोलावयाचा.पण याचे त्या सुट्टीतही काम चालायचे थोडीफार समाजसेवा झाली पाहिजे असे त्याचे म्हणणे.बाकीचे त्याला वर्क फ्रॉम होम करतो असे कौतुकाने म्हणत. हा हसण्यावारी न्यायचा.
खरे तर नुसते बसून काय करायचे हाच त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता.तो येणार म्हणून भरपूर  नातेवाईक  भेटायला यायचे.गेट टूगेदर व्हायचे. टाईमपास तर भरपूर होत होता.पण हा काही त्यात रमत नव्हता.शेवटी त्याला अमृतबागेच्या मित्राची आठवण आली .दरवर्षी म्हणतो माझे घर बघ तर एकदा ? 
खरे तर लोकांना अमृतबाग कुठे आहे ? हे विचारायची गरजच भासली नाही. साधारण एक किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या .
"अरे बापरे ! याला वेळ आहे का आपल्याला भेटायला . किती लोकांचे कुटुंब आहे याचे. तो मनात पुटपुटत प्रवेशद्वारातून आत शिरला आणि कोणतरी त्याच्या कॉलरला पकडून मागे खेचले.
"ओ महाराज , कुठे चाललात ? " मागून आवाज आला .
त्याने दचकून मागे वळून पाहिले .तर एक मंडळाचे टी शर्ट आणि डोक्यावर टोपी घातलेला तरुण त्याला विचारत होता.
"त्याला भेटायला "त्याने भोळा चेहरा करीत सांगितले.
"काय पास ,पावती आहे का ? "त्याने पुन्हा विचारले. 
"पास पावती कश्यासाठी ? हे कधीपासून सुरू झाले .लहानपणी यायचो तेव्हा डायरेक्ट घरातच जायचो "तो प्रश्नांकित चेहरा करून म्हणाला.
"बरोबर आहे तुमचे. पण आता तुम्ही मोठे झालात .परिस्थिती बदलली .हे रांगेत उभे असलेले सर्व तिथेच जातायत  आणि जे महत्वाचे आहेत त्यांना आम्ही पास देतो पण त्यासाठी मोठे योगदान द्यावे लागते मंडळासाठी "त्या तरुणाने उत्तर दिले.
इतक्यात प्रवेशद्वाराशी गडबड झाली .कोणीतरी ओरडले सुपरस्टार विनायकुमार आलाय .तसे त्या तरुणाने त्याला बाजूला ढकलले .
"बाजूला हो, सुपरस्टार येतोय.त्याच्यासाठी रस्ता मोकळा कर ." तो त्याच्यावर खेकसत म्हणाला.
तो हेलपटत बाजूच्या दुकानाच्या शेडखाली उभा राहिला. सुपरस्टार विनायकुमार कार्यकर्त्यांच्या गराड्यात येत होता.मध्येच त्याच्यासोबत सेल्फी काढायला काही तरुणतरुणी आड येत होते.मंडळाचे कार्यकर्ते कुशलतेने त्यांना बाजूला काढत होते. पण स्वतः कॅमेऱ्यासमोर कसे येऊ याची पुरेपूर काळजी घेत होती. 
"साहेब ,तुमची ओळख आहे का ?"शेजारून नाजूक आवाजात प्रश्न आला आणि तो दचकला .एक तरुण स्त्री चार वर्षाच्या मुलाला घेऊन बाजूला उभी होती. "लांबून आलोय आम्ही ,याच्या दर्शनासाठी .हा लोकांचे ऐकतो असे म्हणतात.तीन तास उभे आहोत आम्ही .पण सतत कोण ना कोणी सेलिब्रेटी येते आणि आम्हाला थांबविले जाते. आमचा नंबर कधी येईल.नवस करायचा होता हो "ती स्त्री त्याच्यासमोर हात जोडून विनंती करत होती.
"घरी नवस करायचा. त्यासाठी इथे यायची काय गरज होती."तो तडकून म्हणाला.
" हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो असे ऐकून आहोत."ती नरमाईने म्हणाली. "ह्यांनी सरकारी परीक्षा दिलीय ती चांगल्या मार्कनी पास होऊ दे " असा नवस करणार आहे.
" त्यासाठी नवस कशाला ? चांगला अभ्यास केला असेल तर चांगले मार्क मिळून पास होणारच .हा काय करणार ? जादू करून पास करणार का ? तुला माहितीय बारा लाख लोकांनी हा नवस केलाय ? बारा लाख जागा तरी आहेत का ?" तो चिडून म्हणाला .
त्याच्याकडेच आज दिवसभरात नऊजण हीच इच्छा घेऊन आले होते.
"हे बघा ताई ,तुम्ही घरी जा ? या मुलाला घेऊन किती वेळ उभ्या राहणार .त्याऐवजी मीच त्याला सांगतो तुमची इच्छा आणि घरी गेल्यावर देव्हाऱ्यासमोर मनोमन नमस्कार करून हीच इच्छा बोला "तो समजावणीच्या सुरात म्हणाला.
"पण मी यासाठी अनवाणी घरून आलेय "ती त्याच्या चपलांकडे पाहत म्हणाली .
"ताई तुम्ही निघा.तुमच्या मुलाला किती त्रास होतोय पहा ."असे म्हणून हातातील मोदक त्या मुलाला दिला .
त्याला नमस्कार करून ती स्त्री मागे फिरली .पण ती जाणार नाही याची खात्री होती त्याला .
मित्रासमोर खूपच गर्दी दिसत होती.दोन पुरुष आणि दोन स्त्रिया त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते .त्यांची भरदार शरीरयष्टी पाहून त्यांना उलट बोलायची हिंमत कोणाच्यात नव्हती.
भेटायला येणार्यांना कोणत्याही व्यक्तीला त्याच्यासमोर पाच सेकंदापेक्षा जास्त वेळ उभे राहता येणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेत होते. त्यासाठी हाताला धरून बाजूला फेकण्याचीही परवानगी त्यांना होती.
पुन्हा एकदा प्रवेशद्वाराशी गडबड उडाली .याचा फायदा घेऊन आपण आत घुसावे असे त्याने ठरविले.देशातील मोठे उद्योजक आणि नेते यांची एन्ट्री झाली.त्यात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन तो आत घुसला .त्याला पाहून बाकीच्यांनी ही हिंमत केली आणि आत घुसू लागले.ताबडतोब मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते अजूनच सक्रिय झाले.तसेच नेत्यांचे बॉडीगार्डही पुढे सरसावले.समोर येईल त्याला लाठीचा आणि हाताचा वापर करून हुसकावून लावण्यात आले.यांच्याही पाठीवर दोन लाठ्या पडल्या आणि शर्टाचा खिसा फाटला गेला. जसा त्या गर्दीत घुसला त्याच्या दुप्पट वेगाने तो गर्दीच्या बाहेत फेकला गेला .पुन्हा त्या दुकानाच्या शेडखालीच तो उभा होता.
कसेनुसे स्वतःशी हसत त्याने डोळे मिटले आणि मित्रांचे स्मरण केले तसा मंडपात बसलेला तो अचानक जागा झाला.डोळे वर करून त्याने त्याच्याकडे पाहिले आणि केविलवाणे हसला .खजील होत त्याने मनोमन मित्राला आशीर्वाद दिला आणि पुन्हा समोरच्यांकडे पाहू लागला .
"खरेच सुट्टी मिळूनही काहीजणांना विश्रांती नाहीच.आपण बरे "असे पुटपुटत तो घरी आला आणि मखरात जाऊन बसला.
"आता मारही खाऊन आलात का ? हद्द झाली ."कोपरापासून नमस्कार करीत बाजूचा उंदीर म्हणाला .
"अरे इथे काहीजणांना भरपूर काम आहे तर माझ्यासारखे बरेचजण नुसते आराम करतायत बघ.लोक त्याला भेटण्यासाठी काय काय करतील त्यांचे त्यांना माहीत. ती एक स्त्री आपल्या लहान मुलाला घेऊन अनवाणीच चालत आली होती बघ "तो मोदक खात सांगत होता.
"मग तिला तुम्ही तुमच्या चपला दिल्यात का ?" उंदीर त्याच्या अनवाणी पायाकडे पाहत कुत्सित स्वरात म्हणाला.
त्याने चमकून आपल्या पायाकडे पाहिले तर चपला गायब झाल्या होत्या .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, September 19, 2023

जॅक रायन 2

जॅक रायन ..2
जीम ग्रेयर आता मास्कोचा स्टेशन चीफ झालाय .चायनाच्या समुद्रातून एक अनधिकृत  सॅटेलाईट सोडली जाते .ती सॅटेलाईट रशियाने सोडली आहे असा ग्रेयरला संशय आहे .तो त्या बोटीचा शोध घेत असतो. 
व्हेनेझुला देशात प्रचंड अराजकता माजली आहे. खरे तर हा देश सोने आणि तेलाच्या खाणीने समृद्ध आहे पण राष्ट्राध्यक्ष रियासमुळे तो रसातळाला गेलाय.काही कंटेनर त्याच्या देशात आलेय आणि कडेकोट पाहऱ्यात ते जंगलात लपविले गेले. त्या कंटेनरमध्ये रासायनिक शस्त्रे असावी असा जॅक रायनला संशय आहे .तो आपला खास मित्र आणि सेनेटर जिमीसोबत त्या कंटेनरविषयी माहिती घेण्यासाठी  व्हेनेझुलाची राजधानी कऱ्याकसला आलाय.
जॅक आणि जिमी राष्ट्राध्यक्ष रियासची भेट घेतात आणि त्या कंटेनरविषयी विचारतात .पण राष्ट्राध्यक्ष कानावर हात ठेवतात.परतीच्या प्रवासात जॅक आणि जिमीवर हल्ला होतो.त्यात जिमी मारला जातो.आपल्या मित्राच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांचा शोध घेण्याचे जॅक ठरवितो .त्याच्या मदतीला  ग्रेयर आलाय.
कोणीतरी मोठी रक्कम देऊन जिमी आणि जॅकची सुपारी दिलीय. आता जॅक आणि ग्रेयरला या सर्व प्रकरणाचा मुळाशी जाऊन शोध घ्यायचाय .खरोखरच राष्ट्राध्यक्ष जिमी आणि जॅकच्या हल्ल्यामागे आहेत की आणखी कोण यात अडकले आहेत.?
कऱ्याकसच्या जंगलातील सशस्त्र पहारेकर्यांच्या ताब्यात असलेल्या कंटेनरमध्ये नक्की काय आहे ? चायनातील समुद्रात अनधिकृत सॅटेलाईट कोणी लाँच केले ?? 
हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर प्राईमवर जॅक रायन सिझन 2 पाहायलाच हवा . हिंदी भाषेत ही सिरीज उपलब्ध आहे .

Sunday, September 17, 2023

जॅक रायन 1

जॅक रायन ..सिझन 1
 डॉ.जॅक रायन एनलिसिस्ट म्हणून काम करतोय.तो पूर्वी मरिन्समध्ये होता.अफगाणिस्तानमध्ये त्याने काही वर्षे काम केलंय.पण तिथे काहीतरी घडलंय म्हणून त्याने मरिन्स सोडली.इकोनॉमिमध्ये डॉक्टरेट केली आणि आता सीआयएमध्ये  परदेशी देवाणघेवाण होणाऱ्या पैश्यांवर नजर ठेवतो.
जिम ग्रेयरची सीआयएच्या मुख्यालयात बदली झालीय आणि तो जॅकचा बॉस बनून आलाय.ग्रेयर खरा तर एक फिल्ड ऑफिसर आहे. तो आधी कराचीत होता पण तिथे तो अडचणीत आला म्हणून त्याची बदली मुख्यालयात झालीय.
येमेनमध्ये एका बँकेत मोठ्या रकमेचे व्यवहार होतातय आणि त्यावर जॅकची नजर आहे.सुलेमान नावाच्या खात्यावर हे मोठे व्यवहार होतायत. नऊ कोटींची रक्कम त्या खात्यावर जमा झालीय आहे ही रक्कम मोबाईल अँपद्वारे ट्रान्स्फर होतेय.
काहीतरी गडबड आहे असे जॅक आपल्या बॉसला सांगतो पण तो फारसे लक्ष देत नाही.
येमेनमध्ये दोन मुस्लिम तरुणांना पकडले जाते.त्याची चौकशी करण्यासाठी जॅक आणि ग्रेयर येमेनला जातात.त्याच रात्री मुस्लिम अतिरेकी अमेरिकी तळावर हल्ला चढवून त्यातील एका तरुणाची सुटका करतात .त्यात जॅक जखमी होतो पण पळालेला तरुण सुलेमान होता हे जॅक ओळखतो.
पॅरिसमध्ये एका फादरची हत्या होते आणि त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी चर्चमध्ये जमलेल्या साधारण तीनशे लोकांना विषारी वायूचा स्फोट करून मारले जाते.
सुलेमानचा खरा प्लॅन काय आहे ? जॅक आणि ग्रेयर त्याचा प्लॅन हाणून पाडतील का ?
अतिशय उत्कंठावर्धक ही मालिका प्राईमवर हिंदी भाषेत आहे .

Friday, September 15, 2023

" दादा !! ते आले ना "

" दादा !! ते आले ना "
खोताच्या चाळीत गणेशोत्सवाची गडबड चालू होती. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेहमीपेक्षा जास्त गडबडीत दिसत होते.वय वर्ष साधारण पासष्ट,तरीही उत्साह तरुणांना लाजवेल असा. 
तशी खोतांची चाळ जुनीच. दरवर्षी गणपती येतो तसा बिल्डर यायचा आणि गणपती जातो तसाच दहा बारा मिटिंग घेऊन निघून जायचा. आता फक्त पुरातत्व विभागाने त्यांना ऐतिहासिक वास्तू म्हणून सर्टिफिकेट देणे बाकी होते.
वासुदेव निगुडकर उर्फ वासूकाका बरीच वर्षे मंडळाचे आणि चाळीचे अध्यक्ष होते. बरीच वर्षे ? यासाठीच की नवीन कोण ही जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता आणि तसेही तरुणवर्ग या चाळीत राहत नव्हताच. 
मुले मोठी झाली, चांगली नोकरी लागली,की चाळीचा विकास होईल तेव्हा होईल आपण आपला विकास करू असे म्हणत दुसरीकडे मोठा फ्लॅट घेऊन निघून जायचे.तर काहींची लग्ने चाळीत राहतो म्हणून जुळत नव्हती म्हणून दुसरीकडे भाड्याने फ्लॅट घेऊन राहायचे.
तसा खोतांच्या चाळीला फार इतिहास नव्हता .कोणीतरी म्हणायचे  लोकमान्य टिळक एकदा चाळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देऊन गेले .पण इतिहासात कुठे नोंद नाही.
त्या संध्याकाळी तो तरुण कोणालातरी शोधत चाळीत शिरला तेव्हा वासूकाका मंडप बांधणार्यांना विविध सूचना करीत होते.मध्येच हातातील मोबाईलवरून कोणाला तरी झापत होते. तो तरुण नेमका त्यांच्यासमोर उभा राहिला आणि हळू आवाजात वासूकाका म्हणून हाक मारली.
आपल्या नावाने कोण बोंब मारतोय हे पाहण्यासाठी वासूकाका वळले आणि त्याला पाहताच स्तब्ध झाले. "पवारांचो झील ना रे तू ?" ते चेहऱ्यावर ओळखीचे हास्य आणत म्हणाले.
"नाही हो ,मी या चाळीतील नाही .पण माझे काम होते तुमच्याकडे ."तो चेहऱ्यावर हास्य आणीत म्हणाला .
"अरे ,आम्हालाच वर्गणी कमी पडतेय तर तुला काय देऊ ? इथे खोल्या आहेत भरपूर पण काम करणारे कमीच आहेत.आहेत ते फक्त काकाकाकी,  आजीआजोबा, मामामामी , ते काय वर्गणी देणार तुला ? " वासूकाका आपले पत्ते ताबडतोब दाखवून मोकळे झाले.
"काका मला वर्गणी नकोय.मला इथे एकपात्री कार्यक्रम करायचा आहे " तो म्हणाला.
"म्हणजे वऱ्हाड निघालय लंडनला सारखे "प्रा. लक्ष्मणराव देशपांडे करायचे तसे."वासूकाकानी आश्चर्याने विचारले. 
"तसेच काहीसे."
"छान , पण आमचे कार्यक्रम फुल आहेत " थोड्या ताठ्यातच वासूकाकांनी उत्तर दिले.
" काका काहीही प्रोग्रॅम नाहीत तुमचे ,रात्री बारापर्यंत सगळे जेष्ठ नागरिक इथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, कधी पत्ते खेळात रात्री दोन नंतर फक्त उंदीर फिरतात इथे " कोनाड्यात फिरणाऱ्या उंदराकडे पाहत तो म्हणाला.
तसे वासूकाका गंभीर झाले."पोरा, खरे बोलतोस तू .पण तुझ्या कार्यक्रमाला द्यायला पैसे नाहीत आमच्याकडे ".
"काका मला पैसे नकोत.स्वातंत्र्यकाळातील संगीत नाटके यावर अभ्यास चालू आहे माझा.त्याकाळी बालगंधर्व स्त्री वेशात नायिकेची भूमिका करायचे.अजूनही काही पुरुष स्त्रीपात्राची भूमिका करायचे.संगीत नाटकात गाणी स्वतःच्या आवाजात तेही लाईव्ह म्हणायचे.अगदी चार पाच तास ही नाटके चालायची.मलाही स्त्रीवेशात त्या काळातील संगीत नाटकाची गाणी म्हणायची आहेत .नाट्यप्रवेश करायचे आहेत . तुमच्याकडे बापू वाडेकर म्हणून जुने नट राहतात असे कळले .त्यांच्यासमोर काही सादर करता आले तर आनंदच होईल "तो तरुण हात जोडून म्हणाला.
"अरे देवा ,त्यांचीच आठवण व्हावी का तुला ?" कपाळावर आठ्या पडत वासूकाका पुटपुटले.
"का हो ? बरे आहेत ना ते ? " तरुणाने काळजीने विचारले.
"आहो ते तोंडाने चांगले आहेत .म्हणजे म्हातारपणी काहींचे हातपाय चालणे बंद होते तर काहींचे तोंड .यांचे हातपाय चालत नाहीत पण तोंडाचा पट्टा सतत चालू बघा आणि गणेशोत्सव आला की येणाऱ्या जाणाऱ्यांना ओरडून जवळ बोलावतात आणि जुन्या आठवणी उगाळत बसतात .बालगंधर्वांसोबत गायचे म्हणे .टिळकांनी यांच्याही पाठीवर कौतुकाची थाप दिली असे सांगतात .कोणी पाहिलंय म्हणा.म्हातारा फेकत असतो असे सर्व म्हणतात ." वासूकाका हसत म्हणाले.
"वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण झाली की सगळेच म्हातारे " तरुण खोचकपणे म्हणाला तसे वासूकाका गप्प बसले.
"ठीक आहे ,ये तू कधीही. हो, पण तुझे सामान तूच आणायचे .इथे फक्त माईक आणि स्टेज मिळेल तुला.कार्यक्रम अकरापर्यंत संपव आणि कसलीही तक्रार करायची नाही "वासूकाकांनी ताबडतोब नियमावली तयार केली .
कधी नव्हे तो गणपतीच्या मंडपात बाहेरचा कार्यक्रम होणार म्हणून चाळकरी खुश झाले .त्या रात्री बापू वाडेकर तर तल्लीन होऊन तो एकपात्री प्रयोग पाहत होते.स्त्रीच्या भूमिकेत तो तरुण सुंदर दिसत होताच पण बेधुंद होऊन नाट्यसंगीत गात होता.अचानक त्याने "दादा ! ते आले ना "असा प्रसिद्ध डायलॉग मारला आणि बापू खाडकन जागे झाले.त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.त्या तरुणांकडे पाहून त्यांनी हात जोडले. त्यानेही बापूंकडे पाहून मान डोलावली .
बरोबर अकरा वाजता प्रयोग संपला .बापूनी त्याला जवळ बोलावले.
"कोण आहेस तू "त्यांनी हात जोडून विचारले.
"बापू ओळखले नाहीत का ? आहो कित्येक प्रयोग आपण एकत्र केलेत.टिळकांनी पाठीवर कौतुकाची थाप मारली तेव्हा बाजूला मीच होतो. बापू, चला आता. बरेचजण आहोत तिथे .तुमचीच कमी आहे , पुन्हा एकदा सौभद्र , मानापमान ,संशयकल्लोळ करू .
"होय देवा ,नक्कीच येईन मी " असे बोलून त्यांनी हात जोडले.त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसून तो तरुण निघून गेला.
आज तो उदास चेहऱ्याने मंडपात बसला होता."आता नाटकात काम करायची हौसही फिटवून घेतली का ? गाणेही गात होतात " बाजूच्या उंदराने शेपटी आपटत नाराजी व्यक्त केली."कालच्या तुझ्या नाटकामुळे आज सकाळचा नैवेदही आला नाही अजून"
"आज नैवेद मिळणार नाही आपल्याला " उदास चेहऱ्याने तो म्हणाला आणि डोळ्यातील अश्रू पुसत समोरच्या दिशेकडे बोट दाखविले. मंडपाबाहेर बापूंच्या अंत्ययात्रेची तयारी चालू होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर.

फराझ

FARAAZ
फराझ
फराझ अयाझ बांगलादेशातील उच्च फॅमिलीतील एक तरुण.त्याच्या आईने अमेरिकेतील युनिव्हर्सिटी त्याचे ऍडमिशन नक्की केलय.पण फराझला बांगलादेशात राहायचं .
निब्रस आणि त्याचे मित्र बांगलादेशी मुस्लिम तरुण.तेही उच्चशिक्षित. पण ते आयसिसशी संबंधित आहेत. ईदच्या दिवस चालू आहेत. त्या रात्री फराझ आपल्या दोन मैत्रिणीसोबत एका तारांकित हॉटेलच्या कॅफेत बसलाय. ढाका शहरातील तो कॅफे उच्चभ्रू लोकांसाठी आहे.तिथे अनेक परदेशी व्यक्तीही असतात.
निब्रस आपल्या सहा तरुण साथीदारांसह त्या कॅफेत प्रवेश करतो. सगळ्यांच्या हातात गन्स असतात.आत शिरताच ते बेछूट गोळीबार करून परदेशी व्यक्तींना ठार मारतात .फक्त बांगलादेशी मुस्लिमांना बाजूला ठेवतात.त्याचे फोटो आपल्या लीडरला पाठवतात.
आयसिस या हल्ल्याची जबाबदारी घेते.निब्रस फराझला ओळखत असतो.तो फराझला बांगलादेशाचा राजकुमार म्हणून संबोधतो. आपण युनिव्हर्सिटीत याच्यासोबत फुटबॉलही खेळलो आहे असे सांगतो.
पोलिसांना या घटनेची माहिती कळताच ते कॅफेवर  हल्ला करतात पण त्यात बारा पोलीस मारले जातात आणि त्यांना माघार घ्यावी लागते.स्पेशल फोर्सही हजर होते पण पंतप्रधान टेररिस्टशी बोलणी करायला सांगतात.
याचा शेवट काय होईल ?? त्या उच्चशिक्षित तरुण अतिरेक्यांच्या मागण्या काय आहेत ? फराजचा यात रोल काय आहे ??
इथे कोणतीही एक्शन नाही .कोणताही सुपरहिरो ओलीसाना वाचविण्यासाठी येणार नाही.बाहेर बसलेले ओलिसांचे नातेवाईक प्रचंड दडपणाखाली आहेत .तर आत असलेल्या ओलिसांची हालत ही वेगळी नाही.धर्माच्या नावाखाली हा हल्ला आहे हे आतील सर्वाना कळून चुकलंय .आता आपल्याच जातीचे अतिरेकी आपल्याला ठार करणार का याची भीती ओलीसाना वाटू लागलीय.तर स्थानिक पोलीस हतबल आहेत.
2016 साली बांगलादेशातील ढाका येथील होली आर्टिसन बेकरी येथे घडलेल्या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे .
फराझ अयाझला 2016 चा मदर तेरेसा मेमोरियल इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

Thursday, September 14, 2023

सेवा

सेवा
शेठ जयचंद परदेशी , एक प्रसिद्ध उद्योगपती. भारतीय उद्योगविश्वात त्यांचे वरचे स्थान .माणूस वरून साधा चांगला वाटायचा पण आतून काळा कपटी.अर्थात  बिझनेसमध्ये जितका सरळ राहत येईल तितके राहत होताच पण कधी कधी वाकडे मार्ग ही शोधावे लागतात तेव्हा तो त्या मार्गाचा वापर ही करायचा.
समुद्रकिनारी असलेल्या आलिशान बंगल्यात तो राहायचा .सारी सुखे त्याच्या पायाशी होती.गणेशोत्सव तर त्याच्याकडे दणक्यात साजरा व्हायचा. हो, पण त्यात देवाच्या भक्तीचा काही संबंध नव्हता. त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची बरीच कामे व्हायची .चार मोठ्या लोकांच्या ओळखी व्हायच्या.
 वर्षीचा गणेशोत्सव तर त्याच्यासाठी विशेष होता.काही महिन्यांपूर्वी त्याने शहरात कॅन्सरचे मोठे हॉस्पिटल उभारणार असल्याची घोषणा केली होती .त्यासाठी जागेची निवडही करण्यात आली होती .जागेचे थोडे वाद होते पण ते काहीतरी सेटलमेंट होऊन मिटतील याची खात्री होती त्यांना.
सकाळी आठ वाजता तो पालखीत बसला .पालखी कसली, तर मोठी आलिशान गाडीच होती ती.चारी बाजूने काचेच्या बॉक्समध्ये त्याला बसविले होते.बॉक्स वातानुकूलित होताच.मिरवणुकीत तर सर्व काही होते. ढोलताशा पथक, लेझीम ,.बँड , बेधुंद नाचणाऱ्या मुली.
तो मस्त सिंहासनावर बसून आजूबाजूचे दृश्य पाहत होता. खाण्यापिण्याची रेलचेल होती.खुश होऊन त्याने शेजारी बसलेल्या आपल्या उंदराकडे प्रेमाने पाहिले. तो ही खुशीत समोरचा शेंगदाण्याचा लाडू चवीने खात होता. 
नशीब या शेठकडे जाताना हा टोमणे मारीत नाही .पण आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही याचा त्याला संताप आला.आपल्याकडे ही निदान शंभर वर्षाने तरी वाहन बदलण्याचा कायदा करा असा महादेवांकडे आग्रह करावा असे निश्चित केले.
मिरवणुकीमुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम होते.आज त्याचाच दिवस होता. आपले भाऊबंद सगळीकडे त्याला दिसत होते.कोणी डोक्यावरून तर कोणी हातावर तर कोणी टॅक्सी मोटारीतून जात होते.लोकांच्या चेहऱ्यावर अमाप उत्साह दिसत होता.गणपती बाप्पा मोरया असा जयजयकार सगळीकडे निनादत होता.
"अरे , आज तर वेशभूषा स्पर्धेत भाग घेतल्यासारखे वाटतेय " पेढा खाणाऱ्या आपल्या उंदराच्या डोक्यावर टपली मारत तो म्हणाला .
"तर काय ? हल्ली तुमचे मूळ रूपच मी विसरून गेलोय बघा ".उंदराने शेपटी हलवत म्हटले.
" तो बघ काशिनाथ चव्हाण ,"रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या हवालदारकडे हात दाखवीत तो म्हणाला ."आज ही सुट्टी नाहीच त्याला.बिचारा या गाड्यांच्या गजबजाटात धूर आणि धूळ खात आपली ड्युटी करतोय."त्याही गोंधळात आपल्याकडे पाहून हात जोडणाऱ्या काशिनाथला मनोमन आशीर्वाद देत तो म्हणाला.
" मग आता काय हा ट्रॅफिक कंट्रोल करायला जाणार का तुम्ही ? समोरचे दोन तीन मोदक भरजरी अंगरख्याच्या खिशात कोंबत उंदीर भयचकित नजरेने म्हणाला.
" छेरे ,आज तर आपण श्रीमंत पाहुणचार घेणार आहोत .शेठ जयचंदकडे .पाच दिवस नुसता दंगा चालतो तिथे.नाच गाणी ,जागरण ,खाणे पिणे सर्वच काही आलिशान उंची.यावर्षी काही परदेशी पाहुणेही येणार आहेत म्हणे ",तो धुंदीत जात म्हणाला .
खरेच शेठ जयचंदकडे त्याच्या पाहुणचाराची जय्यत तयारी होती.नेहमीप्रमाणे पाच मिनिटात आरती करून शेठ जयचंद मिटिंगसाठी निघून गेले.त्यांनी नीट त्याच्याकडे पाहिलेही नव्हते.त्यानंतर घरातील नोकरवर्गाकडे त्याची जबाबदारी दिली गेली.
आज त्या चाळीत मोठी सभा भरली होती.शेठ जयचंद स्वतः त्या सभेत हजर होते. चाळीतील रहिवासी आपल्या घरातील गणपती सोडून सभेला हजर होते.
कॅन्सर हॉस्पिटलसाठी ती जमीन शेठ जयचंद याना हवी होती. आज स्वतः चाळीचा मालक त्यांना भेटायला येणार होता. शेठ जयचंद स्वतः बोलणी करायला आले तरच जागेचे डील होईल असा स्पष्ट निरोप चाळीच्या मालकाने दिला होता.
हातातील घड्याळाकडे पाहत मनोमन शिव्या घालीत शेठ जयचंद मालकाची वाट पाहत होते. एकदोनदा चिडून त्यांनी पायाजवळ घुटमळणार्या उंदरांना चिडून लाथा ही घातल्या होत्या. 
इतक्यात चाळमालक त्यांच्यासमोर येऊन बसले.वातावरणातील बदल त्यांना फारसा जाणवला नाही .पण चाळमालकाची नजर त्यांना ओळखीची वाटली .त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य खूपच आश्वासक होते.
"ही जमीन तुम्हाला देईन. पण माझ्या काही अटी आहेत." चाळ मालक गंभीर आवाजात म्हणाले. 
"तुमच्या ज्या काही अटी आहेत त्या मान्य आहेत.डबल पैसे हवे आहेत का ? तुम्ही पेपर वर सही करा आणि मोकळे व्हा.मला आज परदेशी जायचे आहे."शेठ जयचंद घाई घाईत म्हणाले.
"आहो तुमच्याकडे गणपती आहे ना ? तरीही तुम्ही कामासाठी बाहेर जाताय ?"चाळमालक आश्चर्याने म्हणाले.
"गणपती आहेत पण त्यासाठी मी कशाला तिथे हजर हवा.सर्व मोठ्या इव्हेंट कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत.अगदी त्याला घरी आणण्यापासून समुद्रात विसर्जनापर्यंत सर्व प्रोग्रॅम रेडी आहे.त्यासाठी मी का हवाय. माझ्या असण्याने काय फरक पडणार आहे ?" शेठ चिडून म्हणाले.
"खरंय , म्हणूनच माझी एक अट अशी आहे  हॉस्पिटल बांधल्यावर इथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा व्हावा आणि किमान दोन दिवस तुम्ही त्याची पूजा करावी आणि दिवसभर भक्तांचा पाहुणचार करावा .शिवाय या चाळकऱ्यांना इथेच पक्की घरे बांधून द्यावी"अतिशय शांत आवाजात चाळमालक म्हणाले.
"ही कसली अट ? मला नाही जमणार." शेठ जयचंद ताडकन उत्तरले.
" मग जमिनीचा विचार सोडा "असे म्हणून चाळमालक उठले .कुठून तरी दोन उंदीर त्यांच्या पुढे धावत गेले.
" सर ,आपणास जे अपेक्षित होते त्या मानाने ह्या अटी काहीच नाहीत .वर्षातून दोन दिवसांचा तर प्रश्न आहे .पुढे करू काहीतरी ऍडजस्ट "एक सहाय्यक हळूच त्यांच्या कानात कुजबुजला.
काहीतरी विचार करून त्यांनी होकार दिला आणि दोघांनी आनंदाने पेपरवर सह्या केल्या.
"तूच चाळमालक बनून गेलेलास ना ?"आपले भरजरी कपडे बदलत उंदीर छद्मीपणे म्हणाला.कशाला पाहिजे तो दोन दिवस आपल्या सेवेला .आहेत तेच जास्त आहेत.
 "अरे याना देत गेलो तर शेफारून गेलेत हे. मान्य आहे लोकपोयोगी काम करतायत पण समाजाला वेळ द्यायलाही हवा. पैसे तर सर्वच देतात. आज आपल्यासाठी तो सर्व काही करतो कुठेच कमी पडू देत नाही पण ते सर्व पैश्याच्या जोरावर.आपला चेहरा तरी त्याला आठवतो का ? तुला ही लाथा घातल्या त्याने."हसू दाबत तो म्हणाला.
"आठवण ही काढू नका त्याची .किती जोरात बसली माहितीय का ? तुमच्यासाठी मार खायचा बाकी होता तेही आज पूर्ण झाले." हाताने कुशीत दाबत उंदीर म्हणाला.
रात्री जागेचे पेपर गणपतीच्या पायाशी ठेवताना तो हसला का याचे कोडे रात्रभर शेठ जयचंदला सताविणार होते.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

अफवा

AFWAAF
अफवा 
अडचणीत सापडलेल्या तरुण मुलीला मदत करणे आपल्या जीवावर बेतेल हे रहाब अहमदला माहीत असते तर तो या वाटेला गेलाच नसता.
रहाब अहमद हा टेलिकॉम कंपनीचा सीइओ भारतात आलाय.राजस्थानातील एक छोट्या गावात त्याच्या पत्नीचा कार्यक्रम आहे. 
त्या रात्री भर रस्त्यात एका तरुणीला काही गुंड त्रास देत असताना तो पाहतो .तिला कोणीही मदत करत नसते म्हणून तो या घटनेचे विडिओ रेकॉर्डिंग करतो आणि इतरांनाही करायला सांगतो.
पण ते गुंड त्याच्यावरच हल्ला करतात. शेवटी ती तरुणी त्याचसोबत गाडीतून पळ काढते.निवेदिता उर्फ निवी नावाची ती तरुणी तेथील तरुण राजकारणी विकीची होणारी बायको तर तिथल्या मिनिस्टर ग्यानसिंहची मुलगी असते.
आता विकीची सगळी माणसे रहाब आणि निवीच्या मागे लागतात .या गोष्टीचा  फायदा आपल्या राजकीय प्रसारासाठी घेण्याचे विकी ठरवतो आणि एका मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला लव्ह जिहादचा वापर करून पळवून नेल्याचा विडिओ आपल्या आयटी सेलमार्फत व्हायरल करतो. 
चंदन विकीचा सर्वात विश्वासू आणि इमानी माणूस आहे.विकीच्या निवडणूक प्रसारात त्याने एका मुसलमान कसाईची हत्या केली होती आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यातून सुटका होण्यासाठी विकीला हे लव्ह जिहादचे कारण मिळाले. दुसरीकडे चंदनला मार्गातून नाहीसे करण्यासाठी त्याने इंस्पेक्टर संदीप थोमारला नियुक्त केलेय. निवीचे वडील ग्यानसिंह त्या गावाचे राजे आहेत.त्यांचा हुकूम कोणीच मोडू शकत नाही.
योगायोगाने चंदन वाचतो आणि पळ काढतो.इथे रहाब आणि निवीही विकीच्या गुंडांपासून वाचण्यासाठी पळताय .आता संपूर्ण राज्यातच नाही तर देशात तो व्हिडिओ व्हायरल झालाय. आता रहाबला कसेही करून नहारगढ किल्ल्यात पोचायचे आहे. तिथे एक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे आणि त्याची बायको तिथे आहे.
या घटनेवरून गावात हिंदू मुस्लिम दंगे चालू झालेत.या दंग्याचा आडोसा घेऊन रहाब आणि निवी नहारगढकडे निघालेत .त्यांच्या मागे विकीची माणसे लागली आहेत.वाटेत त्यांना चंदन भेटतो .चंदनच्या मागे इंस्पेक्टर संदीप आहेच. ते ज्या ट्रकमधून पळतायत त्याचा फोटोही आयटी सेलने व्हायरल केलाय.
आता रहाब ,निवी आणि चंदनची सुटका होणे अशक्य आहे .पण या गोष्टीचा अनपेक्षित शेवट होतो .तो काय असेल ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
आयटी सेलचा वापर गैरवापर कसा होतो. लोकांना भडकवून आपल्या फायद्यासाठी कसा वापर करावा . अति प्रामाणिकपणा आपल्याच जीवावर कसा बेततो. एक अफवा एखाद्याचे आयुष्य कसे उध्वस्त करू शकते यासाठी हा चित्रपट पहावा .
रहाब अहमदच्या प्रमुख भूमिकेत नवाझुद्दीन सिद्दीकी आहे .तर भूमी पेडणेकर निवेदिता सिंह बनली आहे.
सुधीर मिश्रा दिग्दर्शित हा चित्रपट नेटफिक्सवर आहे.

Wednesday, September 13, 2023

मोदक

मोदक 
"तात्यानो पोस्टिंगची ऑर्डर इली ? "हातातील कागद नाचवत महेश नाईक जोरात ओरडला.
"म्हंजे यावेळी पण तू गणपतीत घरात नाय ? "तात्या नाईक थोड्या नाराजीने बोलले.
"कधी असतंय ? यावेळी पोस्टिंग सियाचेनला असा . महेंश आश्चर्याने कागदावर नजर फिरवीत म्हणाला ."म्हणजे एक महिना ट्रेनिंग आणि तीन महिने सियाचेनच्या उंच बर्फाळ भागात."
"अरे देवा,.आता थयसर कित्याक जातस ? मागच्या वर्षी त्या वाळवंटात आणि आता बर्फात. तुका बरा असल्याचं जागा सापडतात काम करूक "तात्या चिडून म्हणाले.
खरेच होते ते.कॅप्टन महेश नाईक भारतीय सैन्यात होता.मुळात साहसी स्वभाव असल्यामुळे खडतर ठिकाणी पोस्टिंगसाठी प्रयत्न करायचा .
मूळ कोकणातील असल्यामुळे गणपती बाप्पावर प्रचंड श्रद्धा .पण गणपती येतात तेव्हाच याची पोस्टिंग व्हायची.यावर्षीही काही वेगळे नव्हते . गणपतीच्या मखराची सुरेख सजावट त्याने तयार केली आणि पोस्टिंगची ऑर्डर हातात पडली.
"तात्यानु , आपण सर्वच असे सण साजरे करत राहिलो तर देशाची रक्षा कोण करेल ? कोणीतरी तिथे जायला हवे, मग मी का नाही " तात्यांच्या खांद्यावर हात ठेवीत तो गंभीरपणे म्हणाला.
"ताबी खराच हाय .तू जा इथला काय ता आम्हीच बघतो ."
तात्यांच्या हातावर बसून तो घराजवळ आला आणि धूप अगरबत्तीच्या वासाने मन प्रसन्न झाले. तात्या नाईककडे यायला त्याला हेच कारण पुरेसे असते.स्वच्छ प्रसन्न वातावरण .बसायला मोठा चौरंग ,ऐसपैस मखर .समोर चार प्रकारचा प्रसाद .हा कोकणी माणूस खिसा फाटका असला तरी माझ्यासाठी हात सुसाट सुटतो. मनोमन आशीर्वाद देत चौरंगावर आरामात बसला.
"इथे आल्यावर जास्तच खुश असतोस " समोरच्या नैवेदाकडे आशाळभूत नजरेने पाहत उंदराने विचारले.
"अरे का नाही ? बघ किती प्रसन्न वातावरण आहे .मुलगा घरी नाहीय ,तो परत येईल की नाही याची खात्री नाही. तरीही तात्या किती हौसेने आपले आदरातिथ्य करतात बघ. गेली चार वर्षे मी बघतोय महेश घरी नाही .त्याला उद्याची खात्री नसते तरीही आपली तयारी करून तो जातो .उरलेले काम तात्या पूर्ण करतात ." तो हसत म्हणाला.
" यामागे तुम्हीच आहात. तुम्हीच हे घडवून आणता ना ? उंदराने अंग चोरीत विचारले.उंदराने अंग चोरताच तो चमकला आणि त्या दिशेने त्याने पाहिले .बाजूच्या खिडकीच्यावर मांजराचे चित्र होते. हाहा करीत तो हसला.
"होय ,तरुणपणी माझ्यासमोर वेडेवाकडे अंगविक्षेप करीत केलेल्या नाचाची शिक्षा म्हणून पाच वर्ष माझ्यासमोर न येण्याची शिक्षा आहे ही.अरे अशी शिक्षा केल्याशिवाय तरुणपिढी सुधारणार नाही .पण बघ, तो सैन्यात गेला आणि कोणीही सहजपणे काम करणार नाही अश्या ठिकाणी काम करतोय ".तो कौतुकाने महेशच्या फोटोकडे पाहत म्हणाला.
" पण यावेळी बर्फात ?? आहो तिथे फक्त त्यांचीच तुकडी असते म्हणे.कमरेइतक्या बर्फात एकमेकांना दोरी बांधून चालत असतात ."उंदीर आश्चर्याने म्हणाला.
" मग काय झाले.कोणीतरी जायलाच हवे . मग हा का नको ? देशाची सेवा म्हणजेच माझी सेवा " ताटातील मोदक उचलत तो म्हणाला .
सियाचेनच्या बर्फाळ प्रदेशात महेश नाईकची तुकडी आपल्या कॅम्पवर  गणेशोत्सवाची तयारी करीत होती. महेशने आपल्या सामानातून छोटी मूर्ती आणली होती.आजूबाजूच्या बर्फाचा वापर त्यांनी मखराच्या सजावटीसाठी केला होता.
आज गणपती उत्सव .बर्फाच्या मखरात ती छोटी मूर्ती विराजमान झाली .नेहमीप्रमाणे त्यांना शिधा घेऊन येणारे हेलिकॉप्टर कॅम्पच्या डोक्यावर आले.पण यावेळी हेलिकॉप्टरमधून सामानाची पॅकेट पडली नाहीत तर एक तरुण शिपाई दोरीच्या साहाय्याने सरसर खाली उतरला .त्याच्या हातात मोठा बॉक्स होता.
" कॅप्टन महेश नाईक, हे खास तुमच्यासाठी आलंय आणि तुमच्याच  हातात द्यायची ऑर्डर आहे ." तो तरुण शिपाई कडक सॅल्युट करून हसत म्हणाला.त्याचे हास्य खूपच आश्वासक आणि मधुर होते आणि हसताना कोपऱ्यातील एक तुटका दात लक्ष वेधून घेत होता .
आश्चर्यचकित होऊन महेशने तो बॉक्स खोलला तर त्यात उकडीचे मोदक होते.
"कोणी पाठविले हे ?" त्याने भावुक होऊन विचारले.
" मुंबईतल्या कोणी दानशूर व्यक्तीने तुमच्यासाठी पाठविले आहेत .नाव माहीत नाही  आणि हो तुमच्या त्या गणेश मूर्तीला जाड वस्त्र नेसवा .बिचारा थंडीने कुडकूडेल तो". हसतहसत त्या शिपायाने परतीचा सॅल्युट मारला आणि दोरीवरून सरसर चढत हेलिकॉप्टरमध्ये चढला.
तात्यांच्या घरातील मखरात तो शिरला तेव्हा थंडीने कुडकुडत होता.
"फिटली का हौस त्या बर्फात फिरायची.नशीब मला नाही घेऊन गेलात .ते हेलिकॉप्टर वापरलेत आणि त्याला सॅल्युटही मारलात. ही कसली हौस, मोदक त्याला तिथे बर्फात नेऊन द्यायचे. इथे आपल्यालाच कमी पडतायत माहीत आहे ना."कमरेवर हात ठेवून शेपटी जोरजोरात हलवीत उंदीर बडबडला.
" बापरे , कसे राहतात ते तिथे. नेहमीच्या अवतारात गेलो असतो तर बर्फच झाला असता माझा.आणि ते मोदक मुंबईतील एका दानशूर व्यक्तीने विकत घेऊन दिले मला. माझ्याकडे कुठे पैसे असणार ? मी नेहमीप्रमाणे गळ्यात पाठी अडकवून नाक्यावर उभा राहिलो .भारतीय सैन्याला उकडीचे मोदक पाठवायचे आहेत . ताबडतोब दोन तीन जणांनी आणून दिले.भारतीय सैन्याला मदत करायला सगळे तत्पर असतात बघ आणि सॅल्युट मारला तर काय झाले .मायभूमीच्या रक्षणासाठी त्या खडतर वातावरणात पहारा करणारा शूर शिपाई आहे तो. आपल्याला नमस्कार करतातच ना ? आणि माझ्यामुळे तुझाही जयजयकार होतो फुकटचा " छद्मीपणे हसत तो म्हणाला.
संध्याकाळी त्याच्या गळ्यातील हार बदलताना मूर्ती इतकी थंड का लागते ? हा प्रश्न तात्यांना पडला होता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Tuesday, September 12, 2023

Mrs. Serial Killer

Mrs. Serial Killer
मिसेस सिरीयल किलर
डॉ. मृत्युंजय मुखर्जी उर्फ जॉय हा शहरातील नामांकित डॉक्टर.आपल्या बायकोवर सोनावर त्याचे खूप प्रेम.त्या दिवशी तो शहराबाहेर गेला असताना सोनाचा आधीचा प्रियकर इंस्पेक्टर इम्रान तिच्या घरी येतो आणि जॉयचा कंगवा ,ओढलेल्या सिगारेटचे तुकडे घेऊन जातो.
शहरात काही तरुणींचे अपहरण होऊन खून झालेले आहेत.या हत्या डॉक्टर जॉय मुखर्जीने केल्या आहेत असे इंस्पेक्टर इम्रान चोरलेले पुरावे दाखवून सिद्ध करतो. पुढे त्या तरुणींच्या खुनाच्या आरोपाखाली जॉयला अटक होते.खून झालेल्या सर्व तरुणी लग्नाआधीच गरोदर असतात.
जॉय आपल्या सुटकेसाठी रस्तोगी वकिलाचे नाव सोनाला सुचवितो.सोना रस्तोगी वकिलाला भेटते पण तो आजारी अपंग असतो.तरीही तो जॉयची केस स्वीकारतो. रस्तोगी जामिनासाठी अर्ज करतो पण भक्कम पुरावे असल्यामुळे त्याचा जामीन फेटाळला जातो. 
रस्तोगी सोनाला पुन्हा एखाद्या गरोदर तरुणीचा खून झाला तर जॉयवरील संशय दूर होईल असा  सल्ला देतो.नवऱ्यावरील प्रेमाखातर सोना अशी तरुणी शोधून तिचा खून करायचा ठरविते.त्यानुसार ती एका गरोदर तरुणीचा शोध घेऊन तिचे अपहरण ही करते .
पण पुढे काय ??
जॉय मुखर्जीची सुटका होईल ?
खरा सिरीयल किलर कोण आहे ?
चित्रपट थोडा मजेशीर घेतला असल्यामुळे रंगत मध्येमध्ये कमी होते.पण एकदा टाईमपाससाठी पाहण्यास हरकत नाही.चित्रपट शेवटी अनपेक्षित वळण घेतो.
जॅकलीन फर्नांडिस ,मनोज वाजपेयी, आणि मोहित रैना प्रमुख भूमिकेत आहेत .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

भीड

BHEED
 भीड 
एक अस्वस्थ करणारा अनुभव
करोनाच्या पहिल्या लाटेचा लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्व व्यवहार ठप्प झाले.अनेक गरीब मजूर ,कामगार आपल्या कुटुंबासाहित मूळ गावी परतू लागले .पण वाहतुकीची सगळी साधने बंद होती.त्यातच राज्यांच्या ,जिल्ह्याच्या ,शहरांच्या सीमा सील केल्या होत्या.मजुरांना पायी आणि मिळेल त्या साधनांचा वापर करीत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
सुर्यकुमार सिंह हा तरुण पोलीस इंस्पेक्टर .खालच्या जातीचा म्हणून थोडा संवेदनशील. करोनाच्या साथीत आपली जबाबदारी निष्ठने पूर्ण करतोय.
 एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मजुरांचे लोंढे आपल्या कुटुंबासह निघालेत. या गर्दीत सर्व प्रकारची लोक आहेत. हायवेवर कडक पोलीस बंदोबस्त आहे म्हणून या सगळ्यांनी आडमार्ग स्वीकारला आहे.
यात एक तरुण मुलगी आपल्या दारुड्या बापासोबत सायकलवरून प्रवास करतेय .तर एक श्रीमंत स्त्री आपल्या मुलीला हॉस्टेलमधून घरी आणण्यासाठी कारमधून ड्रायव्हरसोबत निघालीय. त्रिवेदी नावाचा खाजगी सिक्युरिटी ऑफिसर आपल्या काही लोकांना एकत्र करून कुटुंबासह एका खाजगी बसने निघालाय.
सुर्यकुमारसिंहला तो आडमार्ग माहीत आहे ,म्हणून तो आपल्या सिनियरला सांगून तिथे चौकी उभारतो .त्यालाच त्या चौकीचा इनचार्ज बनविले जाते. रेणू शर्मा सुर्यकुमारसिंह प्रेयसी .ती डॉक्टर आहे.तिचीही ड्युटी त्याच चौकीवर लावली जाते.
हळूहळू त्या चौकीवर सगळ्या वाटसरूची गर्दी जमा होते.कोणालाच अपेक्षा नसते तिथे चेकपोस्ट उभारले जाईल.सुर्यकुमारसिंहलाही कल्पना नसते की इतकी गर्दी जमा होईल. चेकपोस्टच्या अलीकडेच सर्वाना अडविले जाते.यात ती कारमधील स्त्री आहे .त्रिवेदीची खाजगी बस आहे.पत्रकार आहेत. अल्पसंख्याक लोकांची बस आहे.
पुढील आदेश मिळेपर्यंत कोणीही चेकपोस्टच्या पुढे जाणार नाही असे सुर्यकुमारसिंह सर्वाना सांगतो. पण मग गर्दीतील आजारी लोकांचे काय ? सर्वांची खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल ?? स्त्रियांच्या टॉयलेटची व्यवस्था कशी होणार ??
चेकपोस्टच्या बाजूला एक बंद मॉल आहे .त्या मॉलमध्ये खाण्याचे पदार्थ आहेत हे त्रिवेदीला माहीत आहे .पण सुर्यकुमारसिंह ते आणायला नकार देतो.
एक सरकारी सिमेंट मिक्सरला पुढे जाण्याची परवानगी मिळते. पण त्या मिक्सरमध्ये काही माणसे लपून प्रवास करीत असतात. त्यात ती मुलगीही आपल्या दारुड्या बापासोबत असते.
हळूहळू तिकडे तणाव वाढतोय. त्रिवेदी आपल्या कुटुंबाला भुकेलेला ठेवू शकत नाही.ती तरुण मुलगी आपल्या बापाला जखमी अवस्थेत तिकडे ठेवू शकत नाही.तिने दुसरा मार्ग शोधलाय. सायकलवर आपल्या बापाला बसवून ती निघालीय.तो मार्ग अजूनच खडतर आहे याची तिला जाणीव आहे .पण तिला आपल्या घरी जायचेच आहे.
काय होणार त्या गर्दीचे ??
हे सर्व पाहताना आपण अस्वस्थ होतो.आपण त्या गर्दीतले एक भाग बनतो कारण कुठेतरी आपण असे अनुभव करोना काळात घेतले आहे.आपल्या कुटुंबासोबत पायी चालत जाणारी अनेक लोक आपण पाहिली आहेत कधीकधी आपणही त्यातील एक हिस्सा बनलो असणार.
या गर्दीतही जातपात, उच्चनीच सुरवातीला पाळले गेले पण नंतर ते गळून पडले आणि सुरू झाली फक्त जगण्याची धडपड .पण कोणी माणुसकी विसरले नाही.जगण्याचा हक्क सर्वाना आहे हे कोणीही विसरला नाही.
हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे त्यामुळे भीषणता जास्त जाणवते.
सतत अस्वस्थ असणारा सुर्यकुमारसिंह राजकुमाररावने प्रभावीपणे रंगविला आहे.तर हताश झालेला कुटुंबाची काळजी घेणारी त्रिवेदी पंकज कपूर आहे.भूमी पेडणेकर डॉ. रेणू शर्माच्या भूमिकेत आहे.
भीड आपल्याला अस्वस्थ करेल हे नक्की.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Monday, September 11, 2023

Mrs. Serial Killer

Mrs. Serial Killer
मिसेस सिरीयल किलर
डॉ. मृत्युंजय मुखर्जी उर्फ जॉय हा शहरातील नामांकित डॉक्टर.आपल्या बायकोवर सोनावर त्याचे खूप प्रेम.त्या दिवशी तो शहराबाहेर गेला असताना सोनाचा आधीचा प्रियकर इंस्पेक्टर इम्रान तिच्या घरी येतो आणि जॉयचा कंगवा ,ओढलेल्या सिगारेटचे तुकडे घेऊन जातो.
शहरात काही तरुणींचे अपहरण होऊन खून झालेले आहेत.या हत्या डॉक्टर जॉय मुखर्जीने केल्या आहेत असे इंस्पेक्टर इम्रान चोरलेले पुरावे दाखवून सिद्ध करतो. पुढे त्या तरुणींच्या खुनाच्या आरोपाखाली जॉयला अटक होते.खून झालेल्या सर्व तरुणी लग्नाआधीच गरोदर असतात.
जॉय आपल्या सुटकेसाठी रस्तोगी वकिलाचे नाव सोनाला सुचवितो.सोना रस्तोगी वकिलाला भेटते पण तो आजारी अपंग असतो.तरीही तो जॉयची केस स्वीकारतो. रस्तोगी जामिनासाठी अर्ज करतो पण भक्कम पुरावे असल्यामुळे त्याचा जामीन फेटाळला जातो. 
रस्तोगी सोनाला पुन्हा एखाद्या गरोदर तरुणीचा खून झाला तर जॉयवरील संशय दूर होईल असा  सल्ला देतो.नवऱ्यावरील प्रेमाखातर सोना अशी तरुणी शोधून तिचा खून करायचा ठरविते.त्यानुसार ती एका गरोदर तरुणीचा शोध घेऊन तिचे अपहरण ही करते .
पण पुढे काय ??
जॉय मुखर्जीची सुटका होईल ?
खरा सिरीयल किलर कोण आहे ?
चित्रपट थोडा मजेशीर घेतला असल्यामुळे रंगत मध्येमध्ये कमी होते.पण एकदा टाईमपाससाठी पाहण्यास हरकत नाही.चित्रपट शेवटी अनपेक्षित वळण घेतो.
जॅकलीन फर्नांडिस ,मनोज वाजपेयी, आणि मोहित रैना प्रमुख भूमिकेत आहेत .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Sunday, September 10, 2023

WHO IS ERIN CARTER ?

WHO IS ERIN CARTER
हू इज एरिन कार्टर ?
एका पहाटे घाईघाईने तिने आपल्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन इंग्लंड सोडले होते. आता या गोष्टीला साधारण पाच वर्षे झालीत.ती बार्सिलोनाला राहतेय. मुलगी मोठी झालीय .शाळेत जातेय. तीही त्याच शाळेत अर्धवेळ शिक्षिका आहे. तिला एरिन कार्टर नावाने सर्व ओळखतात.आपली मुलगी हार्पर आणि नवरा जोर्डीसोबत सुखाने संसार करतेय. त्यांचा शेजारी इमेलियो पोलीस ऑफिसर आहे.
एके दिवशी काही लोक सुपरमार्केट लुटण्याचा प्रयत्न करतात .त्यात एरिन आणि हार्पर ही अडकल्या जातात.एरिन हुशारीने हार्पर आणि स्वतःची सुटका करून घेते पण त्यात हल्लेखोर मारला जातो. 
एरिन आपल्या शहरात प्रसिद्ध होते. पण शाळेच्या एका कार्यक्रमात एक स्त्री तिला येऊन भेटते आणि जुनी ओळख दाखवते.झटापटीत त्या स्त्रीचा खून होतो .पोलीस अधिकारी इमेलियो एरिनला मदत करतो.पण त्याबदल्यात एका ड्रग माफियाला पकडण्यासाठी एरीकची मदत मागतो.
कोण आहे ही एरीक कार्टर ??
आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी ती कोणत्या थराला जाईल ?
तिचा भूतकाळ काय आहे ?
सात भागाची ही वेगवान सिरीज आपल्याला खिळवून ठेवते.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Tuesday, September 5, 2023

65

65
६५
65 मिलियन वर्षांपूर्वी अंतराळात सोमारीस नावाचा ग्रह होता. मिल्स हा त्या ग्रहावरील पायलट .आपल्या आजारी मुलीच्या उपचारासाठी तो एक कामगिरी स्वीकारतो.काही  प्रवाश्यांना घेऊन तो आपली शिप घेऊन सोमारिस ग्रहावरून उड्डाण करतो.पण प्रचंड उल्कापात आणि वादळामुळे त्याची शिप एका ग्रहावर आदळते.त्या ग्रहाचे नाव पृथ्वी आहे.
पृथ्वीवरील चिखलात त्याची शिप रुतते आणि नुकसान होते.शिपच्याबाहेर ओसाड गरम आणि दलदलीचे वातावरण आहे.तिथे ज्वालामुखीचा सतत उद्रेक होतोय. त्याला परत आपल्या ग्रहावर नेणारी छोटी शिप पंधरा किलोमीटरवरील उंच डोंगरावर अडकली आहे. हा रस्ता खूपच खडतर आहे पण त्यातही जंगलात फिरणारे अजस्त्र डायनासोर जास्त खतरनाक आहेत.
 प्रवासात त्याला सहा वर्षाची छोटी कोया भेटते. तीही त्याच्या शिपमधील प्रवासी आहे.तिचे आईवडील प्रवासात मृत्यू पावले .आता कोयाला आपल्या सोबत पुन्हा मायदेशी नेण्याची जबाबदारी मिल्स स्वीकारतो.
या प्रवासात क्षणोक्षणी धोका आहे. महाभयंकर क्रूर डायनासोर सगळीकडे त्यांची शिकार करायला टपून बसलेत.ते संधी मिळताच त्यांच्यावर हल्ले करत राहणार.
मिल्स आणि कोया या अवघड धोकादायक प्रवासातून सुखरूप शिपपर्यंत पोचतील का ??
केवळ दोन पात्रे आणि डायनासोर यांचे थरारक युद्ध पहायचे असेल तर 65 नेटफ्लिक्सवर नक्की पहा.
चित्रपट हिंदी भाषेत आहे.

Sunday, September 3, 2023

नीयत

NEEYAT
नीयत
आशिष कपूर उर्फ ए. के.प्रसिद्ध भारतीय उद्योगपती.पण भारतात वीस हजार कोटीची अफरातफर करून परदेशात पळून गेलाय.सध्या त्याने इंग्लंडमध्ये दूर एक राजवाडा विकत घेतलाय.आता तो हेलिकॉप्टरने राजवाड्यात आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलाय.त्याने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला तिथेच बोलावून घेतलंय. हळू हळू त्याचे नातेवाईक आणि मित्र राजवाड्यात दाखल होतात.पाहुण्यांची यादी इव्हेंट मॅनेजरच्या हातात आहे तो पाहुणे चेक करतोय.आज तिथे वादळाची शक्यता आहे म्हणून मॅनेजरचा सगळा स्टाफ लवकर घरी गेला. ए के चा मुलगा ,त्याची मैत्रीण , ए के चा प्रिय मित्र ,मेव्हणा अशी बरीच मंडळी तिथे हजर आहेत.
वाढदिवसाची पार्टी चालू असतानाच तिथे मीरा राव हजर होते.ए के तिची ओळख सीबीआय ऑफिसर म्हणून करून देतो.तिचे नाव पाहुण्यांच्या यादीत नाही .आपण भारतात परतणार असून सरकारच्या स्वाधीन होणार आणि आपली सगळी संपत्ती सरकारच्या ताब्यात देणार असे ए के पार्टीत जाहीर करतो .सगळेच खुश होतात . पण मध्येच काही वाद निर्माण होतात म्हणून ए के बाहेरच्या कड्यावर जातो .काही वेळाने त्याचे मृत शरीर कड्याखाली खोल दरीत सापडते.
सगळे समजतात त्याने आत्महत्या केलीय.तशी चिट्ठीही त्याच्या टेबलवर सापडते.एक आय विटनेसही आहे.पण मीरा ती आत्महत्या नसून खून आहे असे सांगते. ती तपासाला सुरवात करते. तिथे हजर असलेल्या प्रत्येकाजवळ खुनासाठी हेतू आहे हे सिद्ध करते. मग सुरू होते खूनसत्र .
मीरा राव आपले बुद्धिचातुर्य पणाला लावून खून कोणी आणि का केलाय हे सिध्द करेल का ?
एक अनपेक्षित शेवट असलेला अगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथेला शोभेल असा चित्रपट प्राईमवर उपलब्ध आहे.
विद्या बालन आणि राम कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.
ज्यांना मर्डर मिस्ट्री आवडते त्यांनी हा चित्रपट चुकवू नये.

Saturday, September 2, 2023

THE FREELANCER

द फ्रीलान्सर
THE FREELANCER 
इनायतखान आणि अविनाश कामत दोघेही मुंबई पोलीसमधील सहकारी आणि मित्रही. एका राजकीय प्रकरणात दोघेही निलंबित होतात.
या गोष्टीला आठ वर्षे होऊन गेलीत.मध्येच बरेच काही घडलंय. अविनाश कामत परदेशात गेला आणि त्याचे अस्तित्व जवळजवळ नाहीसे झाले.इनायतखान एका अपघातात अधू झालाय .त्याची मुलगी आलिया मोठी झाली .ती परदेशात शिक्षण घेतेय. तिथेच तिची ओळख असर फाजलशी होते.फाजल कुटुंबाचा मलेशियात बिझनेस असतो .ते चार भाऊ असतात.सर्वात छोटा भाऊ पायलट असतो.
आलियाचे विधिवत लग्न होते .महिनाभर सर्व व्यवस्थित चालू आहे .एक दिवस आलिया वडिलांना ते सर्व दुबईला जातायत असे सांगते.अचानक सर्व इस्तंबूलला जातात.तिथूनच आलियाचा आपल्या आई वडिलांशी कॉन्टॅक्ट तुटतो.आता ती इस्तंबूलमार्गे सिरीयात दाखल होते. सिरीयात आयसिसचे राज्य आहे.
इथे इनायतखान आपल्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.पण सगळीकडून त्याला अपयश येतेय.शेवटी तो अविनाश कामतला कॉन्टॅक्ट करायचे ठरवतो आणि त्यासाठी त्याला एक किंमत द्यावी लागते.
अविनाशला इनायतखानविषयी कळते आणि तो भारतात दाखल होतो.तो आता एक भाडोत्री सैनिक म्हणून काम करतोय.भरपूर पैसे घेऊन विविध देशात त्याच्या कारवाया चालू आहेत.भारतात त्याचा डॉ खान हँडलर आहे.
आता अविनाशवर आलियाला सोडवून आणण्याची जबाबदारी आहे. तो सुरवात कुठून करणार ? ती सिरीयात असेल तर तिथून बाहेर काढणे अशक्य आहे असे डॉ खानचे म्हणणे आहे.
अविनाश आलियाला सिरियातून बाहेर काढेल का ??
हॉटस्टारवर सुरू असलेली द फ्रीलान्सर अतिशय वेगवान ऍक्शन ,थरारक सिरीज आहे.
मोहित रैना ,अनुपम खेर, सुशांत सिंह सारखे स्टार कलाकार यात महत्वाच्या भूमिकेत आहेत.