Friday, August 21, 2020

अलक ....१३

अलक ....१३
सगळे त्याला शिव्या द्यायचे. काहीजण खविस म्हणायचे तर काही हिटलर. तो तसाच होता. शहरातील कोणताही विभाग त्याच्या हाती दिला की तो कठोरपणे कायदा राबवायचा. आताही तो ज्या विभागाचा प्रमुख होता तेथे अतिशय कडकपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली होती.रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता की फेरीवाला. तो सापडेल त्याला क्रूरपणे फटावले जात होते. शेवटी काही लोकांचा उद्रेक झालाच . बारा दिवसानंतर त्याच्यावर भयानक जीवघेणा हल्ला झाला . पण त्यामुळे लॉकडाऊन अजून कडक झाले . पण जेव्हा तो डिस्चार्ज होऊन बाहेर पडला तेव्हा विभागातील कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या जवळजवळ संपली होती .
© श्री .किरण कृष्णा बोरकर

Tuesday, August 18, 2020

अलक....१२

अलक.....१२
 त्या सेलिब्रिटीच्या आत्महत्येची चौकशीसाठी आंदोलन करण्याऱ्या जमावात तो घोषणा देत होता.साऱ्या जगभर त्या आत्महत्येची चर्चा चालू होती .संध्याकाळी मिळतील ते पैसे खिश्यात टाकून तो घरी निघाला. घरी येताच छोटी धावत त्याच्याजवळ आली आणि कमरेला मिठी मारून म्हणाली "बाबा...बँकवाले येऊन गेले".त्याने हसून मान डोलावली . यावर्षीही पाऊस मनासारखा झाला नव्हता.सकाळी त्या ओसाड शेतातील झाडावर गळफास लावलेला त्याचा देह लटकत होता.त्या सेलिब्रिटीसारखी आपल्या आत्महत्येचीही चौकशी करा अशी मागणी त्याच्या खिशातील चिट्ठीत होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, August 12, 2020

अलक ....११

अलक....११
"काय बायका आहेत या ...? इतक्या रात्री लाईव्ह कथा कवि संमेलन कसे जमते याना .. ?? वेडेपणा आहे नुसता ....." ती फेसबुक आपल्या मैत्रिणीला दाखवीत म्हणाली .कोणत्यातरी ग्रुपवर लाईव्ह कविता वाचनाचा कार्यक्रम चालू होता . दोघीही हसू लागल्या . 
"ए चल... आज लवकर निघू .परवा पुन्हा भेटणारच आहोत .. असे म्हणून दोघींनी आपापले पेग संपवित वेटरला बिल आणायची खूण केली तेव्हा पहाटेचे दोन वाजले होते.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, August 4, 2020

अलक ...१०

अलक...१०
रक्षाबंधन करून ती रिक्षात बसली तेव्हा उशीरच झाला होता. रिक्षावाल्याच्या मनगटावर बांधलेली राखी पाहून तिला आपल्या भावाची राखी आठवली . अगदी सेम होती . त्याच्या बहिणीच्या निवडीचे तिला कौतुक वाटले . कानात हेडफोन लावून ती डोळे मिटून गाणी ऐकत बसली .
सकाळी एका  निर्मनुष्य बोळातून तिच्या अब्रूची लक्तरे झालेला देह सापडला . पोलिसांना तिच्या मुठीतून एक तुटलेली राखी सापडली फक्त.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, August 3, 2020

MELVILASOM (THE ADDRESS )...2011

MELVILASOM (THE ADDRESS )...2011
खरे तर साऊथचे चित्रपट म्हटले की जगाची सफर ..  अत्याधुनिक गाड्या , बंगले आणि तुफान हाणामारी असेच चित्र असते . हिंदी चित्रपटापेक्षा त्यांचे बजेट जास्त असते . पण तितक्याच त्यांच्या कथा ही वेगवेगळ्या विषयांवर असतात . एखादी कथा घेतली की पूर्ण अभ्यास करूनच चित्रपट बनविला जातो .
एक असाच वेगळा चित्रपट म्हणजे मेलविलासोम अर्थात द अड्रेस 
हा चित्रपट म्हणजे एक कोर्टरूम ड्रामा आहे . दीड तासाचा हा चित्रपट आपल्याला श्वास रोखून पाहायला लावतो .
चित्रपटाची कथा फारच छोटी आहे . आर्मीतील एका साध्या जवानावर कोर्टमार्शल चालू आहे .जवानाने गार्ड ड्युटीवर असताना मोटारसायकलवरून येणाऱ्या आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या त्यातील एक  जागीच मेला तर दुसरा गंभीर जखमी झाला . त्या जवानाने आपला गुन्हा कबूल केलाय . कोर्टमार्शलमध्ये त्याला फाशी होणार हे नक्की झालेय . आरोपीचा वकीलही ते मान्य करतोय . पण त्याने असे का केले यामागचे सत्य त्याला शोधून काढायचे आहे .साक्षीदारांच्या जबानीतून आणि उलटतपासणीतून हळू हळू सत्य उलगडायला सुरवात होते . आणि त्यातून बाहेर येते आर्मीतील अधिकाऱ्यांची वर्तणूक भ्रष्टाचार आणि अनेक गोष्टी .
यात गाणी नाहीत ,नायिका नाही  फ्लॅश बॅक नाही .संपूर्ण चित्रपट एका सेट वर आहेत . यामध्ये सर्व गणवेशात आहेत . संपूर्ण चित्रपट केवळ नऊ दिवसात तयार झाला .

https://youtu.be/GtmuPiSKWMo

अलक ..८

अलक...८
 भर गर्दीत आपल्या नवऱ्याला त्या अनोळखी स्त्रीने "ओय गुरू.." म्हणत मारलेली घट्ट मिठी पाहून तिला ऑकवर्डच वाटले ."माझी कॉलेज मैत्रीण.." त्याने बायकोशी ओळख करून दिली. त्या टपरीवर कटिंग पीत जुन्या आठवणी उगळल्या गेल्या आणि ती निघून गेली." बर वाटल असेल ना तिच्या मिठीत...?? बायकोने सहज विचारले . तो हसला आणि तिच्या अश्रूंनी भिजलेला आपला खांदा बायकोला दाखविला 
दोस्ती बडी चीज हैं 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

अलक...९

"अरे पुरे झाले... किती पिशील ....?? इतकी वर्षे पितोयस पण दारूची चव बदलली का..?? तरी कसे पिता तुम्ही..??.पहिला चिडून आपल्या मित्राला म्हणाला .
"भाई हा शेवटचा .. हा संपला की निघू .... दुसरा डुलत म्हणाला .
पाहिल्याने तो पेग एका झटक्यात घशाखाली रिकामा केला..." हा बघ संपला आता निघुया .."
दोस्त साले हरामी असतात.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☺️☺️