Tuesday, December 29, 2020

द डार्कर साइड... कोडी मॅकफॅदियेन

द डार्कर साइड... कोडी मॅकफॅदियेन
अनुवाद....प्रकाश जोशी 
मेहता पब्लिशिंग हाऊस.
एफबीआय एजंट स्मोकी बॅरेटच्यासमोर त्या सुंदर तरुणीचे प्रेत आहे.मृत असूनही ती सुंदर दिसते.जेमतेम विशीची असावी ती.तिचा खून झालाय आणि तो ही तीस हजार फूट उंचीवरून उडणाऱ्या विमानात.पण हे तर स्मोकीचे कार्यक्षेत्र नाहीय.ती लॉस एंजलीस शाखेत काम करते. दक्षिण कॅलिफोर्नियातील वाईटतील वाईट गोष्ट हाताळतेय. विकृत खुनी,लिंगपिसाट , सिरीयल किलर अश्या लोकांच्या मागावर ती असते.पण एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या दबावामुळे तिला इथे बोलावले आहे. 
एजंट स्मोकी स्वतः एका विकृत खुन्याच्या हल्ल्याला बळी पडलेली आहे.त्यात तिचा चेहरा नको तितका विद्रुप झाला आहे .आता चेहऱ्यावरील खुणा आयुष्यभर तिला साथ देणार आहेत आणि तिने ते सत्य स्वीकारले आहे.
खून झालेली ती तरुणी एका मोठ्या राजकीय नेत्याचे अपत्य आहे. तिने एक धक्कादायक गुपित लपवून ठेवले होते. मृत मुलीच्या आईचा स्मोकीवर पूर्ण भरोसा आहे.
मृत तरुणीच्या शरीरात एक गोष्ट मिळते त्यावरून स्मोकीला आता खुनाची मालिका सुरू होईल अशी भीती वाटते आणि त्याच वेळी अमेरिकेच्या दुसऱ्या भागात एका तरुणीचा तसाच खून झाल्याची बातमी येते.हळू हळू अनेक खून उघडकीस येतात. खुन्याने खून केल्यावर त्या क्लिप सोशल मीडियावर अपलोड केलेल्या असतात. खून झालेल्या प्रत्येक मुलींच्या आयुष्यात एक गुपित लपलेले आहे जे खुनी उघड करून त्यांची हत्या करतोय.
त्याने आतापर्यंत किती खून केले आहेत ?? त्याचा हेतू काय आहे...??? त्याला त्यांची गुपिते कशी समजली जातात...?? स्मोकी आणि तिची टीम त्याचा शोध घेईल का ...???

नाईट ..... एली वायझल

नाईट ..... एली वायझल 
अनुवाद....... आशा कर्दळे
मेहता पब्लिशिंग हाऊस
हे आत्मकथन आहे एका ज्यूचे. जो नाझींच्या छळछावणीतून सुटून आलाय. माणुसकीचा अंत म्हणजे ज्यूची छळ छावणी.
नाझीनी पद्धतशीरपणे केलेला ज्यूचा नरसंहार यातून दिसून येतो.कोवळ्या मुलांनी भरलेल्या गाड्या गॅस चेंबरकडे जात होत्या. भट्टीचे इंधन म्हणून जिवंत माणसे वापरली जात होती. नाझीनी कित्येक लहान मुलांना आपली आई बहीण डोळ्यादेखत भट्टीत जळताना जबरदस्तीने पाहायला लावली.
नाझींच्या क्रौर्याच्या कहाण्या अनेक पुस्तकातुन वाचल्या गेल्यात . ट्रान्सील्वानियातील सिघेट गावातील  पंधरा वर्षाच्या ज्यू मुलाची ही कहाणी जी त्याने प्रत्यक्ष अनुभवली आहे.
छळछावणीतील  प्रत्यक्षात पाहिलेले दाहक अनुभव हा मुलगा आपल्याला सांगतो.
सिघेट गावातील तो मुलगा आपले आई वडील आणि तीन बहिणी यांच्यासोबत राहतोय.
एके दिवशी सिघेटमध्ये जर्मन सैनिक घुसले. त्यांनी सर्व ज्यूना पिवळा तारा धारण करायला लावला.त्यांना हॉटेल मंदिरात जाण्यास बंदी घातली. संध्याकाळी सहा नंतर घराबाहेर पडू नये असा आदेश काढला. ज्यूच्या बंदिस्त वसाहती उभारल्या गेल्या .त्यालाच घेटो नाव दिले गेले आणि एक दिवस त्या सर्वांना सिघेटमधून हद्दपार करण्यात आले.
हद्दपार केलेल्या ज्यूना छळ छावणीत नेण्यात आले.तिथे स्त्री पुरुष लहान मुले याना वेगळे केले गेले. त्या नंतर कोणीही आपल्या कुटूंबातील स्त्री पुरुषांना पाहू शकले नाही.
मग सुरू झाला फक्त छळ,अमानुष मारहाण ,जनावरांनाही मिळणार नाही इतकी क्रूर वागणूक. उपासमार आणि हाड गोठविणार्या थंडीत गुरांच्या डब्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास. कित्येकजण त्या भयानक थंडी गारठून मेले.काहीजण फक्त बर्फ खाऊन जगले. गॅस चेंबरमध्ये आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत राहिले. 
या छळछावणीतही त्या मुलाने आपल्या वडिलांची साथ सोडली नाही. प्रसंगी भयानक मार ही खाल्ला. कणाकणाने आपल्या वडिलांना मरताना त्याने पाहिले.शेवटी अमेरिकन सैन्याने त्या छळछावणीवर ताबा मिळवला आणि त्याची सुटका झाली .
लेखकाने ओस्लो येथे १० डिसेंबर १९८६ रोजी नोबेल शांती पुरस्कार स्वीकारला .
अंगावर काटा आणणारे आत्मकथन

Tuesday, December 15, 2020

डेड एन्ड.....राजश्री बर्वे

डेड एन्ड.....राजश्री बर्वे
एक भयकथा/ गूढकथा संग्रह.यातील सर्व कथा  यापूर्वी वेगवेगळ्या मासिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. काही कथा तर फारच विस्मयकारक आहेत.तर काही कथा वाचताना पुढे काय होणार याचा अंदाज येतो.पण लेखिकेने कथेची मांडणी चातुर्याने केली आहे .
आरपार कथेत वृद्ध बाईची कहाणी आहे. 
मानसीचा चित्रकार तो यात एका चित्रकाराची कथा आहे तीही संपूर्ण गूढ आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे .
बारा वाजायला एक मिनिट या कथेत तुम्ही काही केलेत तरी घडणारे चुकणार नाही हा आशय आहे.
चेहरा या कथेत एका गूढ जंगलात  हरवलेल्या माणसाची कथा आहे .त्याची अस्वस्थता आणि हतबलतेचे अचूक वर्णन लेखिकेने केले आहे .ही कथा ही शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.
 प्रश्न होता तितकाच गहन या वाक्यावर लेखिकेने दोन कथा लिहिल्या आहेत. दोन्ही कथेची मांडणी वेगळी आहे . एका वाक्यावर किती कथा बनू शकतात याचे उत्तम उदाहरण . 
सगळीच भुते वाईट नसतात या थीमवर रात्रीस खेळ चाले ही उत्तम कथा आहे.
 तर शेवटची डेड एन्ड ही एक रहस्यकथा आहे.
अतिशय सोप्या भाषेत  लिहिलेल्या कथा वाचकांना नक्की आवडतील .

Wednesday, December 9, 2020

फ्रिक्वेन्सी

फ्रिक्वेन्सी
दोन व्यक्तींची मैत्री जुळते म्हणजे काय ....??? इंजिनियरिंग किंवा विज्ञानाच्या भाषेत त्याला फ्रिक्वेन्सी जुळणे म्हणतात.तर संगीतावर प्रेम करणारे ट्युनिंग जुळणे म्हणतात.तर साहित्यिक लोक मन जुळणे म्हणतात .आमच्यासारखी सर्वसामान्य माणसे तर स्वभाव जुळतो असेही म्हणतात .
खरे तर प्रत्येक मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या बाबतीत फ्रिक्वेन्सी जुळतं नाही. काहीजणांचा मैत्री करण्यामागे विशिष्ट हेतू असतो. काही अपेक्षा असतात.
ग्रुपमध्येही एक दोनच असे मित्र मैत्रिणी असतात ज्याच्याशी आपली फ्रिक्वेन्सी जुळते.काही वाटले तर आपण त्याच्याशीच बोलतो. बाजूला राहणारा मित्र सोडून आपण त्याला भेटायला जातो. त्याच्याकडे आपले मन मोकळे करतो .
बरे ही फ्रिक्वेन्सी काहींशी ताबडतोब जुळते.जरुरी नाही की ती व्यक्ती आपल्या वर्षानुवर्षे सहवासात असली पाहिजे. काही तर पहिल्या भेटीतच आपल्याला आवडतात . त्याची देहबोली ...बोलणे... आपल्याला आवडून जाते . इसमे कुछ खास बात है असे आपण मनात म्हणतो आणि ती व्यक्ती आपल्या जवळची होते.
खरे तर या फ्रिक्वेन्सीची जास्त गरज सोशल मीडियावर भासते. फेसबुक किंवा व्हाट्स अप ग्रुपमध्ये बरेचजण असतात पण त्यातील काही मोजकेच आपल्याला आवडत असतात .त्यांच्याशी बोलणे आपल्याला आवडते . त्यांचे नंबर ही आपण सेव्ह केलेले असतात. फेसबुकवर ही तेच ... हजार मित्र आपल्या यादीत असतात पण त्यातले किती आपल्याशी कनेक्ट असतात ...?? काही तर लिस्टमध्ये आहेत हे ही आपल्याला माहीत नसते . पण एखादी व्यक्ती असतेच जी आपल्या पोस्टवर कधीही रिऍक्ट होत नसली तरी आपल्याशी इनबॉक्समधून बोलत असते .तर काही बरीच वर्षे आपल्या सोबत वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असतात आपल्याला ओळखतही असतात पण त्यांच्याशी का कोण जाणे आपली फ्रिक्वेन्सी जुळत नाही . त्यातील काहीजण आपल्या फ्रेंडलिस्टमध्येही नसतात .
असे म्हणतात की मैत्री सात वर्षे टिकली तर आयुष्यभर टिकते . सुरवातीच्या काळात नेहमी तासनतास बोलणारे पुढे हळू हळू कमी बोलू लागतात पण याचा अर्थ असा नव्हे त्यांचे विषय संपलेले असतात . त्यांची मैत्री अधिक गहिरी होत जाते एकमेकांवर हक्क दाखविला जातो. अधिकार येतो. कधीही केव्हाही बोलू शकतो आपल्या मनातील भावना शेयर करू शकतो इतकी दोस्ती घट्ट होते.
पण काहीजणाशी अनेक दिवस बोलूनही फ्रिक्वेन्सी जुळत नाही . ती अनेकवेळा तुटत जाते. दोघेही आपल्यापरीने फ्रिक्वेन्सी मॅच करायचा प्रयत्न करत असतात पण नाही जुळत .
असो माझ्याशी बरेचवेळा असे घडते . तुमच्या बाबतीत असे घडते का ....????
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Monday, December 7, 2020

THE IDOL THIEF....एस. विजय कुमार

THE IDOL THIEF....एस. विजय कुमार 
मूर्तिचोर..... डॉ. शूचिता नांदापूरकर- फडके 
मंजुल पब्लिशिंग हाऊस 
ही आहे भारतातील मंदिराच्या मूर्तीलुटीची सत्यकथा 
साधारण ख्रिस्तोत्तर शतकात तामिळनाडूतील अरियालूर स्थानजवळील एका लहानशा खेड्यात ती नटराजची मूर्ती घडवली गेली.आणि तेथील मंदिरात तिची स्थापना झाली.
ख्रिस्तोत्तर १३११  मंदिराच्या पुजाऱ्याने सर्व मूर्त्या काढून त्या विधिवत जमिनीखाली गाडल्या आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाला सामोरे गेला. या आक्रमणात त्यासकट पूर्ण गाव आणि मुलगाही धारतीर्थ पडला . पण आपण मूर्ती वाचवल्या याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
सुभाष कपूर अमेरिकेत राहणार  मूर्तीविक्रेता आणि मुख्य आरोपी. तामिळनाडूमधील मंदिरातून मूर्ती चोरल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याच्या अनेक गॅलरीमधून अमेरिकी अधिकाऱ्यांनी १०० दशलक्ष डॉलर किमतीच्या प्राचीन मूर्ती हस्तगत केल्या.
संजीवी असोकन  चेन्नईबाहेर राहणारे मूर्ती व्यापारी . तामिळनाडूतील अनेक वर्ष बंद असलेल्या मंदिरातून ते मूर्ती चोरून सुभाष कपूरला विकत .
मूर्तीचोरीच्या तस्करीसाठी तामिळनाडू पोलिसांनी आयडॉल विंग हा स्वतंत्र विभाग सुरू केला. अर्थात त्या विभागाकडे फारसे अधिकार ही नव्हते.ना पुरेसा स्टाफ. तरीही ते मूर्ती तस्करांच्या मागावर होते.
न्यूयार्क मधील गॅलरीत सुभाष कपूर यांनी चोल काळातील नटराज आणि शिवकामी या जोडीसाठी ८.५ दशलक्ष डॉलर्स इतकी किंमत ठेवली होती.
या मूर्त्या कोठून आल्या याचा शोध लेखकाने घेण्यास सुरुवात केली . 
लेखक विजयकुमार हे सिंगापूर येथे शिपिंग कंपनीत जनरल मॅनेजर असून ते चोरलेल्या मूर्तींचा शोध घेण्याचे कार्य करतात.
या पुस्तकात आपल्याला तामिळनाडू येथील अनेक मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्त्यांचा इतिहास सापडतो . त्यात उमा, पार्वती,नटराज, गणेश अश्या अनेक मूर्त्यांचा समावेश आहे . या मूर्त्या वेगवेगळ्या मार्गाने अमेरिकेत जात.अश्याच एका मुंबईतून आलेल्या पेटार्यावर अधिकाऱ्यांची नजर पडली आणि सुरू झाली शोध मोहीम. 
लेखक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करून या चोरीच्या मुळाशी गेले .अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी ही या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरवठा केला .
हे सर्व कसे घडते...?? मंदिरातून मूर्ती कश्या चोरीला जातात..?? त्या कश्या आणि कोणत्या मार्गाने योग्य जागी पोचतात.. त्यांचे खरीदार कोण असतात ...?? किंमत कशी ठरवली जाते..?? मूर्तीचोरीसाठी कायदे काय आहेत..?? मूर्तीचोरांसाठी शिक्षा काय आहेत ?? याची सर्व माहिती या पुस्तकातून मिळते.
लेखकाने या चोऱ्या फक्त तामिळनाडूतील मंदिरातील मूर्तीविषयी लिहिल्या आहेत.अजूनही महाराष्ट्र,मध्यप्रदेश, राजस्थान आणि इतर अनेक राज्यात मूर्ती चोऱ्या होत आहेत .आपले देव आपली हजारो वर्षांची संस्कृती परदेशात विकली जातेय.
लेखकाने अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीने संपूर्ण घटनांची मांडणी केली आहे . एका वेगळ्या विषयाची सखोल माहिती या पुस्तकातून आपल्याला मिळते.

Wednesday, December 2, 2020

द लास्ट गर्ल.... नादिया मुराद

द लास्ट गर्ल.... नादिया मुराद 
अनुवाद.... सुप्रिया वकील 
मेहता पब्लिकेशन
उत्तर इराकमधील कोचो गावातील यजिदी धर्माची ही तरुणी.याजिदी हा अल्पसंख्याक धर्म . इतर धर्मासारखीच त्यांचीही काही तत्वे आहेत. काही परंपरा आहेत. कोचो गावात ह्या धर्माचे बहुसंख्य लोक राहतात. धर्मांतर आणि लग्नाआधी कौर्मांयभंग या गोष्टी त्यांच्यासाठी निषिद्ध आलेत.
 सद्दाम हुसेनच्या अस्तानंतर आयसिस अर्थात इस्लामिक स्टेट तिथे प्रबळ झाली.हळूहळू ते उत्तर इराकच्या दिशेने सरकू लागले आणि एक दिवस त्यांनी या सुखी गावावर ताबा मिळवला.
 सर्वप्रथम त्यांनी पुरुष आणि स्त्रियांना वेगळे केले . नंतर एक मोठी कबर खोदून त्यांनी सर्व पुरुषांची गोळ्या घालून हत्या केली. नादियाचा एक भाऊ यातून कसाबसा वाचला . पण ती घटना त्याच्या मनावर शेवटपर्यंत कोरली गेली. नादिया आणि इतर स्त्रियांना दुसरीकडे हलविण्यात आले. पुढे नादिया आणि तिच्या आईची ताटातूट झाली. काही वर्षांनी एका सामूहाईक कबरीत तिच्या आईचा मृतदेह सापडला.
नादिया आणि इतर तरुणींना सेक्स गुलाम म्हणून विकले गेले . तिच्या मालकांनी तिच्यावर अमानुष बलात्कार आणि अत्याचार केले. तिला एका  माणसाकडून दुसऱ्या माणसाला विकले गेले. तिच्या शरीरावर सिगारेटचे चटके दिले गेले.एक दिवस ती तिथून पळून गेली. एका  मुस्लिम कुटुंबाने तिला आसरा दिला इतकेच नव्हे तर तिला कुर्दस्थानातील सुरक्षित जागी पोचवायला मदत ही केली.
 त्यानंतर  नादियाने आपली  कथा जगाला सांगितली . तिच्यामुळेच संयुक्त राष्ट्राने कोचोमधील हत्याकांड ही वंशहत्या आहे हे अधिकृतरित्या मान्य केले. संयुक्त राष्ट्राने तिला सदिच्छादूत म्हणून मान्यता दिली. यजिदी लोकांवर अत्याचार करणाऱ्या आयसिसला शिक्षा व्हायला हवी अशी तिची इच्छा आहे . कुणाचीही कहाणी माझ्यासारखी असू नये असे ती म्हणते . हे सर्व भोगणारी मी जगातील शेवटची मुलगी ....द लास्ट गर्ल ...असावी.
हे पुस्तक नाही तर माणुसकीला काळिमा लावणाऱ्या घटनांची कहाणी आहे. आताच्या अत्याधुनिक युगात जगाच्या एका कोपऱ्यात इतके काही भयानक चालू असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. तिथल्या लोकांना फक्त सुखाने जगायचे आहे . सत्तेवर कोणीही येवो पण आम्हाला सुखाने जगू द्या असेच त्यांचे म्हणणे आहे पण त्यांची ही इच्छा ही पूर्ण होऊ शकत नाही .

Tuesday, December 1, 2020

स्पर्श

स्पर्श
खरे तर स्पर्शाचे ज्ञान मला गर्भातच झाले होते. माझी वाढ होताना आईचा पोटावरुन फिरणारा हात फारच उबदार होता.
पण बाहेर आले तेव्हा डॉक्टरांचा स्पर्श एक आनंददायी आठवण होती . सुटकेसाठी धावून आलेला देव अशीही धारणा त्या स्पर्शात होती.
नंतर बाबांनी हळूच कुशीत घेतले तो स्पर्श जणू एका विश्वासाची अनुभूती होती.जगाच्या पाठीवर कुठेही कोणत्याही क्षणी हा स्पर्श माझ्यामागे उभा राहील हा विश्वास देत होता.
हळूहळू मोठी होत गेले तशी अजून स्पर्शाची भाषा कळू लागली. हात धरून शाळेत घेऊन जाणारा तो भावाचा स्पर्श . जणू रक्षण करण्यासाठीच त्याचा जन्म झालाय.
 आजीचा डोक्यावरून मायेने फिरणारा स्पर्श जगातील सर्व सुखे तिने आणून दिलीय हीच जाणीव करून देतात. तर काही चुकले तर कान पकडणारा आजोबांचा स्पर्श संस्कार घडवितात .
पण त्या शेजारच्या काकांचा स्पर्श नकोसा का वाटतो मला..??. त्यांचा पाठीवरून फिरणारा हात का अंगावर नकोसे वाटणारे शहारे आणतोय ...?? अंगावर पाल फिरतेय असेच का जाणवते मला .
कॉलेजमध्ये प्रियकराच्या मिठीत शिरल्यावर अंगावर मोरपीस फिरल्याचा आनंद देणारा गालावर गुलाबी लाली आणणारा स्पर्श... तर मित्राच्या मिठीत सुरक्षिततेची जाणीव करून देणारा स्पर्श...
पण बस आणि ट्रेनमध्ये शरीरावर नको त्या ठिकाणी होणारा किळसवाणा स्पर्श घरी येऊन आंघोळ केली तरी मनातून जात नाही .तर रस्त्यावरील भिकार्याचा स्पर्श होण्याआधीच अंग आक्रसून घेते.
लग्नाच्या पहिल्या रात्री शरीराचा रोम रोम फुलवीत जाणारा संपूर्ण शरीरावर फिरणारा नवऱ्याचा स्पर्श कधीच दूर होऊ नये असे वाटते.
नुकत्याच जन्मलेल्या बाळाला उराशी कवळटाच पान्हा फुटणारा तो एक स्पर्श .
तर आयुष्य संपताच स्वकीयांनी पायाला हात लावून अनंतात विलीन करण्यासाठी केलेला स्पर्श .
© श्री. किरण कृष्णा बोरकर