Saturday, December 24, 2016

गोलपिठा...... नामदेव  लक्ष्मण ढसाळ

गोलपिठा...... नामदेव  लक्ष्मण ढसाळ
खरेतर कविता मला वाचायला आवडत नाही ,ऐकायला आवडते . कदाचित शाळेत तोंडी परीक्षेसाठी पाठ करायला लागायच्या आणि त्यावर प्रश्नोत्तरे द्यावी लागायची म्हणून आवडत नसवी. काही वर्षांपूर्वी पाडगावकरांचा जिप्सी कवितासंग्रह वाचला तेव्हढाच .नामदेव ढसाळांबद्दल आदर होताच ,पण एक विद्रोही कवी म्हणून जास्त माहिती होती . गोलपिठा हा कवितासंग्रह अचानक हाती लागला .विजय तेंडुकरांची सुरेख प्रस्तावना वाचून पुढे वाचण्यास अधीर झालो आणि खरेच ढसाळांच्या कविता वाचून अंगावर काटा आला .  एकापेक्षा एक धगधगत्या ,क्रांतिकारी  बंडखोर कविता .
यापुढे माझ्या वाचन प्रकारात कवितासंग्रहहि जमा झाले हि आनंदाची गोष्ट .

Friday, December 23, 2016

जनाआजी

दरवाज्यावर थाप पडली आणि मी खडबडून जागा झालो . घड्याळात लक्ष टाकले तर पहाटेचे 4 वाजले होते . थोड्या काळजीने दरवाजा उघडला तर समोर बंड्या उभा ."भाऊ चला ,जनीआजी सिरीयस आहे ,घेऊन जाऊ हॉस्पिटलला . मी कपडे चढविले ,मनात म्हटले म्हातारी आज गेली तर वांधे होतील,नेमके आजच महत्वाचे ऑडिट आहे .नाही गेलो तर साहेबांच्या शिव्या खाव्या लागणार .जनाआजी म्हणजे आमच्या बिल्डिंग मधील राहुल पवारांची आई . राहुल माझ्याच वयाचा .माझा मित्रच .आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले . राहुलने  काकांना फोन लावला तेव्हा उत्तर आले "काही घडले नाही ना ?? आणि तिथे आता येऊन काय करू ?? येतो सकाळी .मग आतेला ,..तर उत्तर ",आले असते रेआता ,पण नातवाला डबा करून द्यायचा आहे ,त्याचे आई वडील ऑफिसच्या पिकनिकला गेले आहेत ना ".राहुल काही न बोलता शांतपणे माझ्या बाजूला बसला ,त्याच्या मनातली खळबळ स्पष्ट दिसत होती.इतक्यात गावावरून फोन आला "अरे कशी आहे तब्बेत ?? काही होईल का ?? अरे बाजूच्या मनोजचे लग्न आहे ,काही घडले तर जाता  येणार नाही "आणि आता काही घडले तरी माझी वाट पाहू नका ,यायला जमणार नाही ताबडतोब" . राहुल होय म्हणाला .
कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या आपल्या बहिणीला त्याने फोन केला तेव्हा तीही म्हणाली "अरे असे कसे अचानक झाले "?? तुला आधी कळवता येत नाही का ?? लक्ष कुठे असते तुझे आईकडे ?? काहीतरी लक्षणे आधी दिसत असतील ना ?? मला किती त्रास होईल आता येताना .काही घडले तर माझ्यासाठी खोळंबून राहू नका 'ह्यांच्या मीटिंग आहेत ,आणि मलाही सुट्टीमिळ्णार नाही .आम्ही आताच सुट्टी घेऊन अमेरिका फिरून आलो . काळजी घे आईची ",असे म्हणून फोन ठेवला .
आता तर राहुल हताश झाला शांतपणे डोळे मिटून बसला . मी बंड्याला विचारले "अरे तू हैद्राबादला जाणार आहेस ना सेमिनार ला ?? आजच फ्लाईट आहे तुझी " तो म्हणाला "भाऊ मी कॅन्सल केले हैदराबादचे . आताच फ़ोन करून कळविले आज जमणार नाही  ,घरी प्रोब्लम आहे ,. मी आश्चर्यचकित झालो ."अरे किती महत्वाचे आहे हे सेमिनार तुझ्यासाठी . किती मेहनतीने presentation बनविले होतेस . तू टीम लीडर आहेस ना ? तुझ्या करियरवर फरक पडेल . जा तू . तो शांतपणे म्हणाला " भाऊ ह्या आजीने मला लहानाचे मोठे केलेय . तिच्या बटव्यातुन हळूच चणे शेंगदाणे काढून माझ्या हाती द्यायची .मनीला आणि मला कुशीत घेऊन गोष्टी सांगायची . तिची कळ काढली कि धपाटेहि मारायची . आज ती आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि मला माहित असूनही मी थांबायचे नाही ?? मग कशासाठी आणि कोणासाठी करायची नोकरी ?? आजीने कधीच आमच्यात भेदभाव केला नाही . घरात लाडू बनविले तरी प्रत्येकाला एक लाडू मिळेल याची काळजी घेतली तिने .  आम्ही आजारी पडलो कि दर तासानी चौकशी करायची ,घरगुती काढा चाटण बनवून प्रेमाने भरावयाची . आहो आम्ही तर शेजारी तर घरच्यांची किती काळजी घेत असेल ?? आज तिला आपली गरज आहे आणि आपण पळ काढायचा ?? का ? तर ती म्हातारी झालीय ,आयुष्य उपभोगले आहे तिने ,काय गरज आहे आता जास्त जगायची ?..असे बोलायचे का ??  ..आपले आयुष्य ,आपला संसार ,आपले करियर या नादात ज्यांनी आपल्याला घडवालाय त्यांचा उत्तरार्ध  असा घालवू द्यायचा का त्यांना ??मी विचारात पडलो भावनिक दृष्टीने विचार केला तर बंड्या कुठेच चुकत नव्हता " भाऊ ,आज जर मी सेमिनार ला गेलो तर आयुष्यात कधीही सुखाने झोपू शकणार नाही ,आणि सेमिनार मध्ये हि लक्ष लागणार नाही . आणि अशी संधी परत हि मिळेल ,पण हि वेळ परत येणार नाही .त्यापेक्षा भाऊ तुम्ही जा कामावर मी  थांबतो इथे काही झाले तर कळवेन तर या मग ताबडतोब .मी होय म्हटले प्रॅक्टीकॅली बंड्या बरोबर होता .मी कामावरून अर्ध्या तासात येऊ शकत होतो आणि इथे राहुल आणि बंड्या शिवाय इतर दोघे होतेच .ICU बाहेर बसून वाट पाहण्याशिवाय काही हातात नव्हते .
मी निघणार तितक्यात राहुलचे हुंदके ऐकू आले. ते पाहून मी खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि ऑफिसला येणार नसल्याचा मेसेज पाठवून राहुलच्या शेजारी जाऊन बसलो.

दरवळे इथे सुवास ... अंबरीश मिश्र

दरवळे इथे सुवास ... अंबरीश मिश्र
अनेक प्रसिद्ध ,अप्रसिद्ध ,साधी माणसे आपल्या आयुष्यात येतात ,संपर्कात येतात . त्यातील अनेकजणांचे बाह्यरूप वादग्रस्त असते. पण आतून ती कशी असतात हे फक्त आपल्यालाच माहित असते .
अश्याच काही व्यक्तींचा परिचय लेखकाने या पुस्तकात माणूस म्हणून करून दिला आहे. प्रसिद्ध नेते आणि माजी पंतप्रधान मोरारजी देसाई ,तर वादग्रस्त पत्रकार रुसी करंजिया ह्यांच्याबद्दल आपाल्याला थोडीफार माहिती आहे  ,पण फियरलेस नादिया ,कथाकार इस्मत चुगताई ,सर लॉरेन्स ओलिव्हर - विवियन लि यांची प्रेमकथा अश्या प्रसिद्ध पण कमी माहिती असलेल्या व्यक्तीबद्दल हि लेखकाने सुरेख लिहिले  आहे .गांधीजींच्या दांडियात्रेचे रोमहर्षक वर्णन लेखकाने केले आहे . गीतकार शैलेंद्र तसेच संगीतकार मदनमोहन यांच्यावरच  लेख वाचून आपण हेलावून जातो .पण काही अज्ञात असे बाबुभाई सारखे  गुंड हि आहेत ,आणि लेखकाची प्रेमळ दीदीहि आहे . अतिशय सुंदर पुस्तक आहे

Monday, December 19, 2016

अण्णा

घरात पाऊल टाकताच सौ. म्हणाली ",आहो ,अण्णा येऊन गेले ".तसे  एकदम आठवले ",अरे!!  हो आज 11 डिसेम्बर ,आजची संध्याकाळ अण्णांसोबत घालवतो दरवर्षी . गेली 6 वर्षे असेच चालू आहे .
अण्णा आमच्या वरच्या मजल्यावर राहतात ,वय वर्षे 72 असेल.. पूर्वी मिल कामगार ,मग छोट्या कंपनीत कारकुनी ,नंतर मोठ्या कंपनीतून अकाउंट ऑफिसर म्हणून निवृत्त .7 वर्षापूर्वीच पत्नी म्हणजे माई वारल्या ,मुलाने शेजारीच रूम घेतली. हे एकटेच पण मुलगा आणि सून व्यवस्थित काळजी घेतात . 11 डिसेंबर ला पत्नी देवाघरी गेली त्या नंतर दरवर्षी 11 डिसेम्बरला संध्यकाळी माझ्याकडे येतात आणि मला त्यांच्याकडे घेऊन जातात .मी फ्रेश होऊन त्यांच्या घरी गेलो, ते वाटच पाहत होते ."ये भाऊ ,बस."मी मुकाटपणे बसलो त्यांनी ग्लास भरला आणि चिअर्स केले . पुढे काय होणार ते ठाऊक होते मला . 3 ऱ्या घोटाने त्यांचे चालू झाले . "च्यायला कशाला लग्न केले मी भाऊ ?? का त्या भल्या बाईच्या आयुष्याची ससेहोलपट केली . कोणी अधिकार दिला मला??  आज फक्त ऐकायचे काम करायचे होते मला. मनात वर्षानुवर्षे साचलेले आज ह्या दिवशी बाहेर पडत होते . जाऊ द्या हो अण्णा  आता कशाला उगाच त्या आठवणी ?? मी बत्ती दिली तसे अण्णा उसळले उगाच ?? काय उगाच ?? अरे किती सहन करावे तिने मला ?? असे काय होते माझ्यात ? साधा मिल कामगार मी ,त्या चाळीतल्या खोलीत राहायला आली आणि त्यात संप झाला खायचे वांधे मी नुसता संपाच्या जोशात ,घरात काय आहे ,जेवण कुठून येते हे विचारलेच नाही ,मग एकदा कोणीतरी बोलले", अरे वहिनी दुसर्याकडे धुणी भांडी करते ,तेव्हा कुठे दुसरी नोकरी शोधली ,घर बदलले पण तिची मते ,तिला काय वाटते हे विचारातच घेतले नाही . पुरुष या नात्याने सर्व निर्णय मीच घेत होतो .एका मुलानंतर थांबण्याचा निर्णय हि माझाच तिलाही निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे मनातही आले नाही माझ्या . दिवसा जेवण आणि रात्री बिछाना जणू यासाठीच घरात आणली होती तिला. अण्णाचा आवाज चढला मी म्हटले "अण्णा आवरा स्वतःला "
.अरे भाऊ कसा आवरू . आज तिची कमतरता भासते मला . जिवंत असताना कधी विचारले नाही. अरे, सिनेमाही  माझ्या आवडीचा बघायचो मी . एव्हाना पहिला पेग संपला होता .मी ताबडतोब दुसरा भरला . 
आता अण्णा रंगात आले होते "पण खरे सांगतो भाऊ ,माझेही खूप प्रेम होते रे तिच्यावर पण ,साल व्यक्तच करायला जमले नाही ,आडून आडून कधी गजरा घेऊन या म्हणाली कि हातावर 5 रु टेकवून मोकळा व्हायचो . मुलाला शिल्पकार करायचे होते तिला ,मनातील भावना मातीच्या गोळ्यात गुंतवून आकार द्यायचे तिचे स्वप्न होते पण मी दगड होतोच ,टाकला मुलाला इंजिनीरिंगला . परत नोकरी बदलली आणि खोलीहि ,पण काही न बोलता ती सर्व संसार घेऊन या खोलीत आली . मुलाने प्रेमविवाह केला तेव्हा घरात आलेल्या सुनेचा प्रेमाने स्वीकार केला नशिबाने सून हि चांगली मिळाली .कदाचित हे तिच्या चांगुलपणाचे फळ असेल . मध्ये मध्ये तब्बेतीची तक्रार करायची तेव्हा मी डॉक्टरकडे जा असे बोलून जायचो . आणि एक दिवस झोपली ती सकाळी उठलीच नाही . लक्ष न देण्याच्या सवयीमुळे पहिले 2 तास लक्षातच आले नाही.सून उठवायला गेली तेव्हा कळले गेली ती. त्याक्षणी जाणवले मला ,काहीतरी गमावले मी . बोलता बोलता अण्णाचा चेहरा रडवेला झाला ,भावना काबूत ठेवणे जमेना . मी काही न बोलता बसून राहिलो ते शांत होण्याची वाट पाहत .थोड्या वेळाने ते शांत झाले .उरलेला पेग एका झटक्यात संपविला आणि म्हणाले "भाऊ खरेच का माझ्याशी लग्न करून ती सुखी झाली असेल ?? मी उठलो प्रेमाने त्यांचा हात हाथी घेतला आणि मान खाली घालून बाहेर पडलो .

लस्ट फॉर लालबाग ....विश्वास पाटील

लस्ट फॉर लालबाग ....विश्वास पाटील
हाडाचा मुंबईकर आपला वाईट भूतकाळ नेहमी विसरायचं प्रयत्न करीत पुढे जात असतो . त्यातील एक मोठा भूतकाळ म्हणजे गिरणी कामगार संप . ह्या संपाने खूप काही शिकवले .काहीजणांची आयुष्य घडली तर बऱ्याच जणांची आयुष्य मातीत मिळाली . दोन पिढ्यांनी या संपाचे चटके सोसले . मुंबईला खूप काही ह्या संपाने दिले त्यात एक महत्वाचे म्हणजे गुन्हेगारी . आजही संपाचा विषय काढला कि अंगावर काटा येतो आमच्या . या संपात कोणाची चूक कोण बरोबर हे महत्वाचे नाही पण संपाची झळ बसली ती सामान्य कामगारालाच.आयुष्य होत्याचे नव्हते झाले ,स्वप्न धुळीला मिळाली असा हा संप . आजच्या पिढीला हे सर्व माहित नसेल आणि आता त्याबद्दल बोलायची कोणाची इच्छा हि नाही . पण विश्वास पाटीलानी हा संपूर्ण इतिहास परत आपल्यासमोर मांडला आहे . नव्यापिढीला यातून नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल आणि आमच्या पिढीचे बरेसचे गैरसमज दूर होतील .अतिशय मेहनतीने आणि संपूर्ण अभ्यास करून लिहिलेले हे पुस्तक आपल्याला जुन्या लालबाग परळ मधल्या चाळीत घेऊन जाते . ह्या पुस्तकाबद्दल श्री .विश्वास पाटील यांचे अभिनंदन आणि मनापासून आभार .

Wednesday, December 14, 2016

माफिया क्वीन्स ऑफ मुंबई.. एस. हुसेन झैदी आणि जेन बोजर्स अनुवाद ..उल्का राऊत

माफिया क्वीन्स ऑफ मुंबई.. एस. हुसेन झैदी आणि जेन बोजर्स
अनुवाद ..उल्का राऊत
आतापर्यंत आपल्याला मुंबईच्या अंडरवर्डमधील माफिया माहित आहेत. पण या दुनियेत माफिया राण्याहि  होत्या याची कितपत आणि कितीजणांना माहिती  आहे . या सर्व राण्यांची रंजक माहिती यापुस्तकात आहे .हाजी मस्तान, कारीमलाला, दाऊद याना एकत्र आणणारी जेनाबाई दारूचा बेकायदा धंदा करणारी ,पोलिसांची खबरी ,दाऊद ची मानलेली आई ,तर मस्तानची मानलेली बहीण ,आणि स्वातंत्रलढ्यात भाग घेतलेली जेनाबाई अशी तिची अनेक रूपे ,तर दुसरी कामठीपुऱ्यातली साम्राज्ञी गंगुबाई ,आपल्या प्रियकराचा खून केला म्हणून दाऊदच्या मागे हाथ धुवून लागणारी सपना उर्फ अशरफ ,सायन कोळीवाडा येथे मादक पदार्थांचा व्यवसाय करणारी महालक्ष्मी ,तसेच अरुण गवळीची पत्नी ,छोटा राजनची पत्नी ,नीता नाईक,तसेच अबू सालेमची पत्नी मोनिका बेदी या सर्वांच्या कहाण्या यात आहेत .मुंबईच्या गुन्हेगारीजगात या स्त्रियांचे एक वेगळेच स्थान आहेत .  विशाल भारद्वाज यांची प्रस्तावना असलेले हे पुस्तक आपल्याला मुंबईतील काळ्या जगाची अनोखी सफर घडवून आणते .

Sunday, December 11, 2016

टेन मॅन आर्मी इन पी. ओ. के.... सुनिल वि. जावळ

टेन मॅन आर्मी इन पी. ओ. के.... सुनिल वि. जावळे
हातात पेन आले आणि दहशदवादाचा विषय असला कि कसेही लिहावे आणि प्रसिद्ध करावे याचे उदाहरण म्हणजे हे पुस्तक . एका 25 वर्षीय तरुण मुलीला नायिका बनवून तिच्या हाथी 9 ब्लॅक कॅट कमांडो देऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोवळे दहशदवादी बनवून प्रशिक्षणासाठी शिरकाव करायचा आणि त्यांचे तळ नष्ट करायचे अशी हि योजना . पण त्यामध्ये नाविन्य काहीच नाही . पाकिस्तानी अधिकारी ,ISIवाले कमांडोना ओळखू शकत नाही . नायिका तर एकदम सुपेरवूमन आहे .जिथे जाईल तिथे सर्व तिच्यावर फिदा होऊन विस्वास ठेवतात ,ती डायरेक्ट पंतप्रधानांशी बोलू शकते ,आपल्या योजना सहज कोणाच्याही गळ्यात उतरवू शकते . पाकिस्तानी अधिकारी डोळे झाकून तिच्यावर विस्वास ठेवतात .अरे इतके सगळे मूर्ख आहेत का?? आणि हि अतिशय शहाणी ,स्वतःच्या मनाप्रमाणे सर्व घडवून आणते . शेवटी हे वाचन कधी एकदा संपते असे होते.

Saturday, December 10, 2016

गुरुवारची संध्याकाळ

गुरुवारची संध्याकाळ .... नुकताच 2 रा कप चहा झाला होता आणि विक्रम आत शिरला ."चल बे बोलत त्याने हातच धरला ."अरे विक्रम आज गुरुवार आहे ,आज नको "मनातून खुश होत मी वरवरचे बोललो "च्यायला तात्या ,ढोसायला नाही . गाय शोधायला जायचे आहे . आमच्या हिची ऑर्डर आहे गाय शोधून या ,पान ठेवायचे आहे तिला ." मनातून खट्टू होत मी वरवर हसलो. पण आता नकार देण्याचा प्रश्नच नव्हता . "चल ,म्हणत त्याच्या बाईकच्या मागे बसलो . "अरे इथे असतात ,त्या देवळाजवळ बघू", असे बोलत अर्धा तास गाय शोधत बसलो . शेवटी एके ठिकाणी सापडली. पण हायरे दैवा!!! तिथेही भलीमोठी बायकांची रांग होती . "विकी, अरे वहिनीचा नंबर बहुतेक उद्याच लागेल "असे म्हणून हसू लागलो . गर्दी बघून विक्रम हि भडकला होता  ."आता रे, "हताश होऊन त्याने मलाच विचारले  . मी हि गमतीने बोललो " गायीच्या मालकीणबाईची धमाल आहे ,तिची पिशवी बघ कशी भरलीय खाऊ ने" ." ते जाऊदे काय करायचे ते बोल ,एकतर आधीच गायी सापडत नाहीत आणि अश्यावेळी त्यांना डिमांड येतो . म्हटले "तुला राग येत नसेल तर माझे ऐकशील  तर हो म्हणाला " मी म्हटले चल घरी जाऊ तुझ्या . घरी आलो आणि वहिनीला म्हटले बाजूला ठेवा ते ताट आणि 20/25 जणांना पुरेल इतका चहा बनवा गरम गरम आणि 10 मारी बिस्किटचे पुडे घ्या . वहिनी अचंबित झाली तेव्हा तिला विक्रमने सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि आवाज चढवून बोलला", गप!" तो काय सांगतो ते ऐक "तिने चुपचाप चहा बनवून आणला आणि आम्ही परत तिघे बाहेर पडलो . नाक्यावरच्या गार्डनमध्ये गेलो तेव्हा तिथे 10/15 मुले अभ्यास करीत होते .विभागातील वेगवेगळ्या भागातून आणि घरात पुरेशी जागा नाही ,क्लासला जाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून इथे बसून विविध क्षेत्रात शिक्षण घेणारी हि मुले .बाहेर नुसत्या रिकाम्या भीक मागणाऱ्या भिकार्याना सर्व काही मिळते पण याना साधा चहादेखील कोण विचारात नाही.आम्ही सर्वाना जवळ बोलवून प्रेमाने चहा आणि बिस्किटे दिली. सर्व मुले खुश झाली "काका योग्य वेळी आलात हो ,अभ्यास करून करून कंटाळा आला होता ,झोपही येत होती ,पण या चहा बिस्किटामुळे कंटाळा पळून गेला आणि परत उत्साह आला " खरेच तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही " त्यातील एका मुलाने हाथ जोडून म्हटले . आणि वाहिनीच्या डोळ्यातून आसवे गळू लागली.कधी नव्हे ते विक्रम हि भारावून गेला .  त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मलाही आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटला.

Wednesday, December 7, 2016

सॉवरे रंग राची ... सोमनाथ केसकर

सॉवरे रंग राची ... सोमनाथ केसकर
सर्वप्रथम माझा मित्र श्री. सोमनाथ केसकर याचे ह्या कादंबरीबद्दल अभिनंदन.   आजच्या तरुणपिढीला मीराबाईबद्दल फारशी काही माहिती नाही .श्रीकृष्णाच्या भक्तीत वाहून गेलेली मीरा आणि तिची भजने याची माहिती लोकांना आहे पण तिचा इतिहास तिचे पूर्वज आणि तिचा परिवार याबद्दल कोणाला फारशी माहिती नाही .मीराबाईनीं प्रचंड छळ सोसला .  पण श्रीकृष्णावरची आपली भक्ती कधीही ढळू दिली नाही . माझ्यासारख्या सामान्य वाचकालाहि खिळवून टाकेल अश्या सहज सोप्या भाषेत लेखकाने हि कादंबरी लिहिली आहे .

Sunday, December 4, 2016

द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो.... आलेक्झांन्डर द्युमास .. अनुवाद .. प्रणव सखदेव

द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो.... आलेक्झांन्डर द्युमास .. अनुवाद .. प्रणव सखदेव
एडमंड डान्टे ,जहाजावरील एक तरुण खलाशी ,आपल्या हुशार आणि धाडसी स्वभावामुळे लवकरच कॅप्टन बनणार असतो . पण जहाजावरील त्याचे शत्रू आणि त्याच्या प्रेयसीवर एकतर्फी प्रेम करणारा एक तरुण त्याचे शत्रू बनतात आणि साखरपुड्या दिवशीच त्याची रवानगी तुरुंगात होते . त्याला देशद्रोही ठरविले जाते . तुरुंगात  त्याला एक गुरू भेटतो आणि त्याला खजिन्याचा पत्ता देतो . चौदा वर्षानंतर मोठ्या चातुर्याने डान्टे त्या तुरूंगातून आपली सुटका करून घेतो आणि तो खजिना ताब्यात घेतो . आता फक्त त्याला आपल्याला फसविणाऱ्या शत्रूंचा सूड घ्यायचाय आणि त्यासाठी तो सज्ज झालाय .
नेपोलियनच्या राजकीय पार्श्वभूमीवर घडणारी हि कादंबरी जगातील एक थरारक सहसकथा म्हणून ओळखली जाते .

Thursday, December 1, 2016

मनीचे लग्न

बंड्याच्या घरातून भांडी पडायचे आवाज येऊ लागले तसा मी सावरून बसलो. कारण वादाला सुरवात झाली होती आणि थोड्यावेळाने मला आमंत्रण येणार होते . हा जुना अनुभव होता माझा .त्याच्या आईला काही सुचले नाही कि भांडी खाली पडतात . मी तयारीतच  बसलो. अपेक्षेप्रमाणे वहिनी आल्याच " भाऊ ,चला ,आवरा त्या दोघांना ". मी निमूटपणे निघालो.
घरात शिरताच बंड्या म्हणाला " भाऊ बाबाना समजावा ,ह्या नोटबंदीच्या काळात ते मनीचे लग्न कसे होईल याची काळजी करतायत ." मनी उर्फ मनीषा कोपर्यात गरीब गाईसारखी अंग चोरून बसली होती . अतिशय शांत मुलगी ,कधीच स्वतःची मत व्यक्त करत नव्हती . बाबा आणि भाऊ म्हणतील ते मुकाट ऐकत होती . " आहो एकुलती एक मुलगी ,मग लग्न थाटामाटात नको का करायला ,सगळे नातेवाईक ,मित्रपरिवार येणार त्यांचे आदरातिथ्य नको का करायला ?". बाबा म्हणाले तसा बंड्या परत उसळला "आदरतिथ्यची नक्की व्याख्या काय आहे तुमची? ,त्यांना पोटभर खाऊ पिऊ घातले आणि फोटो काढले म्हणजे झाले का ?? मी तर म्हणतो पत्रिकेवर सरळ मनीचा बँक अकाउंट नंबर आणि IFSC  कोड छापा ,भांडी आणि भेटवस्तू नको असे सांगा ,त्यामुळे स्टेजवर येणाऱ्यांची गर्दी कमी होईल . सगळं आहेर मनीच्या अकाउंट मध्ये जमा होईल . त्यांची भविष्याची सोय होईल ,तो पैसे त्यांना त्यांच्या संसारासाठी वापरता येईल ,आणि सगळा पांढरा पैसा ,काळ्या पैशाचा प्रश्नच येत नाही . देणार्यांनाही प्रॉब्लेम नाही ,सगळ्यांना पुरावे मिळतील .  राहिला फोटो काढायचा आणि स्टेज वर गर्दी करायचा प्रश्न तर नवरा बायकोला खाली पाहुण्यात फिरू द्या ,ते तुम्हाला भेटण्यापेक्षा तुम्ही त्यांना भेटा ,तेव्हाच त्यांचे फोटो काढा ,म्हणजे पाहुणे खुश होतील . आणि हो जेवणात पंधरा वेगवेगळे पदार्थ ठेवण्यापेक्षा मोजकेच पदार्थ ठेवा म्हणजे जेवणही फुकट जाणार नाही . लोकांकडे निवडीचा पर्याय राहणार नाही ,दोन काउंटर जास्त ठेवू त्यामुळे गर्दी हि होणार नाही .  उलट येणाऱ्या नव वधूवराना  पाहुणे प्रेमाने भरवतील त्यातत त्यांचे पोट भरेल आणि शेवटी नवराबायकोचे संग्रसंगीत जेवण असते तेही वाचेल शिवाय  वेटरला जी सेवा न करण्याची भरमसाठ बक्षिसी द्यावी लागते ती हि वाचेल . "अरे बापरे ,बंड्याचे हे क्रांतिकारी विचार ऐकून मी हड्बडलोच. मग बाबाना किती धक्का बसला असेल ??  कुठेतरी मनातून हे पटत हि होते पण भारतीय संस्कृती आणि समाजाशी द्रोह हा विचार मनात शिरू देत नव्हता .  माझ्या गप्प बसण्याचा बंड्याने त्याला पाहिजे तसा अर्थ घेतला आणि जोरात बाबाना म्हणाला " बघा बघा ,भाऊंना हि पटतंय . बाबानी हताश होऊन माझ्याकडे पहिले . मी नजरेनेच त्यांना धीर दिला . म्हटले ," बंड्या परिस्थिती अजून इतकीही वाईट आली नाही ,लग्नाला अजून खूप दिवस आहेत आणि समोरच्या मंडळींचा हि विचार करायला नको का ? त्यांना हि विचार करायला वेळ दे"  शेवटी लग्न हे दोन्ही बाजूच्या संमतीने झाले पाहिजे . कदाचित तुझ्या काही गोष्टी पटतील त्यांना तसेच त्यांच्याही काही गोष्टी तुम्ही मान्य केल्या पाहिजेत . का उगाच आतापासूनच भांडायला सुरवात करतायत . तू संध्याकाळी घरी ये आपण नीट चर्चा करू " असे बोलून विषय संपवला आणि संध्याकाळच्या चर्चेची मनात तयारी करत घरी परतलो.