Saturday, September 29, 2018

तयारी

आरश्यात बघून वैष्णवी निघण्याची तयारी करत होती. शेजारच्या सोफ्यावर बसून विनायक हसतहसत तिची लगबग पाहत होता. नुकताच तो टूरवरून परतला होता आणि आता वैष्णवीची पाळी होती.तयारी करता करता तिने ड्रॉवर उघडून दोन रिव्हॉल्व्हर असलेला पट्टा बाहेर काढून कंबरेला बांधला .मग कपाटातून जाळीदार चिलखत काढून अंगावर  घातले . हातात मावणारा एक छोटा स्प्रे पर्समध्ये टाकला .हे पाहुन हसणारा विनायक स्तब्ध झाला.
"अरे हे काय ......?? इतकी तयारी कसली ...? तू काय युद्धाला चाललीस का ...???  तो ओरडला .
"हल्ली तीच परिस्थिती आलीय बाबा ...... तुझे काय ..??.तू पुरुष ...... तुला कसली भीती .इथे आम्हा स्त्रियांनाच जास्त काळजी घ्यावी लागते . कोण कुठून हात घालेल सांगता येत नाही".ती कमरेवर हात ठेवून विनायकाला म्हणाली.
"खरे आहे तुझे ...... पण हल्ली इतकीही वाईट परिस्थिती नाही राहिलीय.प्रत्येकजण आपल्यापरीने शांततेत राहायला बघतो .पण कधी कधी सुटतो कंट्रोल ...."विनायक हसत म्हणाला."माझ्यासमोर तरी सगळे मुकाट रांगा लावून येत होते. सर्वच जण काहीतरी मागत होते . त्यांचे ऐकता ऐकता दिवस कधी सरायचा कळलेच नाही . तर काही ठिकाणी कोणीच नसायचे तेव्हा कार्यकर्त्यांचा पत्त्याचा खेळ बघता बघता रात्र निघून जायची . खरेच या देशाचे काही कळत नाही . इथे नवस बोलण्यासाठी रांग तर नवस फेडण्यासाठी रांग . तर काहीं फक्त रात्रभर पत्ते खेळतात.. मागत काहीच नाही . तरी बरे यावर्षी जाताना आवाजाचा गोंधळ नव्हता .त्या डीजे की काय त्यावर म्हणे बंदी घातलीय".
"काय म्हणतोस .....!! म्हणजे यंदा येताना शांततेत जयजयकार होत परत येणार तर मी ...." वैष्णवी हसत म्हणाली"अरे... तुझ्या मानाने मी सुखी आहे बघ....एकतर मोजक्याच ठिकाणी जाते . त्यातही बऱ्याच ठिकाणी हल्ली गरबा नावाचा एक नृत्य प्रकार चालत असतो . सर्व सजूनधजून येत असतात . लग्नाला करीत नाहीत इतका मेकअप आणि नवरा नवरीपेक्षा भारी कपडे दागिने घालून आलेले असतात . एक दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी जे काही प्रकार चालतात ते पाहून खूप करमणूक होते . रात्री जागरण होते पण दिवसभर कोण मंडपात फिरकत नाही . एक दिवस होम हवन करून गरिबांना जेवू घालतात ते पाहून बरे वाटते पण बरेच अन्न वाया जाते हे पाहून राग ही येतो खूप. रात्रीच्या गर्दीत लुटमारीचे प्रकार ही घडतात तर नको तेव्हडे अंग प्रदर्शन आणि स्पर्श हे प्रकार वाढले आहेत.लोकांची मानसिकता इतकी बदलली आहे की ते उद्या माझ्या अंगावरचे दागिनेही काढायला कमी करणार नाही . एकट्या स्त्रीला अजूनही सुरक्षितता वाटत नाही . लहान मुलीही सुटत नाहीत यांच्या तावडीतून . म्हणूनच ही सर्व तयारी करून जावे लागते बाबा ... कितीही झाले तरी मी स्त्री आहे विसरून चालणार नाही .
"ठीक आहे ..जातेस .....मग काळजी घे . पुढचे नऊ दिवस तुला आराम नाही . मी मात्र आता भरपूर आराम करणार आहे . ऑल द बेस्ट बाय.... असे बोलून विनायक निघून गेला.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

Tuesday, September 25, 2018

इस्त्रायलची मोसाद ......पंकज कालुवाला

इस्त्रायलची मोसाद ......पंकज कालुवाला
परममित्र पब्लिकेशन
ज्यू अर्थात यहुदी म्हटले की आठवतो हिटलर.ज्यू म्हटले की आठवतात दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीतील गॅस चेंबर .जगातील जवळजवळ सर्व देशांनी बहिकृत केलेली ही जमात . ज्यांना आपल्याच भूमीवरून परागंदा व्हावे लागले आणि जगभर निर्वासितासारखे जीणे जगावे लागले .ख्रिस्ती धर्माचा संस्थापक येशू हा ज्यू पण त्याच्याच बांधवाने गद्दारी करून येशूच्या मृत्यूला कारणीभूत झाला म्हणून ख्रिश्चनांच्या रागाला कारणीभूत झाले . तर आपल्या जागेवर अतिक्रमण केले म्हणून अरबांचा राग .तरीही ते शतकानुशतके लढत राहिले.आपल्या जन्मभूमीची आस त्यांनी जागवत ठेवली . जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी ते एकत्र राहिले. शेवटी त्यांना त्यांची भूमी परत मिळाली आणि त्यातून उभे राहिले इस्त्रायल . जगायचे असेल तर लढत राहिले पाहिजे....हेच त्यांचे तत्व . म्हणूनच मोसाद ही जगातील सर्वोत्तम गुप्तहेर संघटना त्यांनी स्थापन केली. आज मोसादबद्दल अनेक कहाण्या सांगितल्या जातात . बऱ्याच जणांना त्या सुरस आणि अविश्वसनीय वाटतात .आपल्यावर अन्याय करणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी वेचून धडा शिकवला .  60 लाख ज्यूचे शिरकाण करणारा हिटलर त्यांच्या हाती पडण्याआधीच मृत्यू पडला पण त्याच्या साथीदारांना मोसादने जगाच्या कानोकोपर्यातून शोधून काढून आपल्या देशात आणले आणि शिक्षा दिली.
लेखकाने या पुस्तकात इस्रायलच्या स्थापनेपासूनची माहिती दिली आहे . यामध्ये मोसदच्या फसलेल्या कारवाया ही आहेत . पण त्यांच्या यशस्वी कारवाया वाचून आपण अचंबित होतो .आईकमनचे अर्जेटीनातून अपहरण आपल्याला माहीत आहेच त्याशिवाय त्यांच्या इतर मोहिमांची माहितीही त्यात आहे . त्यात ऑपरेशन ब्लॅंकेट,ऑपरेशन ऑपेरा अश्या अनेक मोहिमांच्या कथा आहेत.
लेखकाने यासाठी फारच संशोधन केले आहे हे कळून येते आणि अशी माहिती त्यांनी सोप्या भाषेत आपल्यासमोर मंडळी त्याबद्दल त्यांचे अभिनंदन .

Monday, September 24, 2018

इंटरव्हेन्शन..... रॉबिन कूक

इंटरव्हेन्शन..... रॉबिन कूक
अनुवाद....डॉ. प्रमोद जोगळेकर
मेहता पब्लिकेशन
जॅक स्टेपलटन न्यूयॉर्कमधील वैदकीय अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ. सध्या आपल्या चार महिन्याच्या बाळाला झालेल्या कर्करोगामुळे चिंतीत आहे .
शॉन डॉत्री आपल्या पाचव्या पत्नीसोबत इजिप्तला आलाय . तो एक पुरातत्वशास्त्रज्ञ आहे आणि त्याची पत्नी डीएनए तज्ज्ञ आहे . इजिप्तमध्ये त्याला योगायोगाने अशी गोष्ट सापडते की त्यामुळे तो सेंट पिटर्सच्या कबरीपाशी पोचतो आणि त्यातून हाडांचा सांगाडा घेऊन जातो .
जेम्स कार्डिनल... न्यूयॉर्कचा आर्चबिशप ...कदाचित तो पुढे पोप होईल .
हे तिघेही कॉलेजपासूनच जिवलग  मित्र आहेत. बरीचवर्षे ते दोघे जॅकच्या संपर्कात नाहीत .
शॉनला अशी काही गोष्ट सापडली आहे जी उघड झाली की जनतेचा चर्चवरील विश्वास उडेल .हे रहस्य शॉन उघडकीस आणू नये म्हणून जेम्स जॅकची मदत मागतो.
काय आहे ते रहस्य....?? इ. सन पूर्व 62 सालातील तो हाडांचा सांगाडा कोणाचा आहे ...? त्याचे डीएनए आता कोणाशी जुळतायत ...?? जॅक ते रहस्य उघडकीस येण्याआधी थांबवू शकेल..?? की जेम्सची कारकीर्द धोक्यात येईल...??
विज्ञान आणि श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ असलेली कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते .

Tuesday, September 18, 2018

मनोगत

हरकिशन मुंडा ..... कारखानदार
बरे झाले.... उद्या एकदाचा जाईल तो.दरवर्षी कमीतकमी पाच दिवस खूप ताप असतो डोक्याला.ही कोकणातील लोक त्याच्यासाठी बिनपगारी रजा घेतील पण गावी जाणारच.आज इतकी वर्षे हा उद्योग संभाळतोय पण यांच्यावर कंट्रोल नाही करू शकलो मी.या दिवसात किती ओव्हरटाईम होतात...अनुपस्थिती आहेच. नुकसान होतेच. मेमो देतो असे सांगूनही ऐकत नाही.पण एक नक्की ....या दिवसात कारखाना कसा उत्साहाने भरलेला असतो. कसले भांडण नाही.तंटा नाही.आजपर्यंत बॅलन्सशिटमध्ये नुकसान कधीच दिसले नाही . ही कोकणातील माणसे कामात मात्र प्रामाणिक आहेत.असो उद्यापासून येतील कामावर .
अल्बर्ट पिंटो .... दारूच्या दुकानाचा मालक
चला आपली रजा संपली कालच स्टॉक भरून ठेवलाय.गणपती आले की भलेभले बेवडे दारू बंद करतात . खूपच नुकसान होते या दिवसात . एरव्ही कधी बसायला वेळ मिळत नाही पण या दिवसात मोबाईल गेम खेळत बसतो . काय पण ह्याचा प्रभाव बघा ... भले भले तळीराम विसर्जनापर्यंत दारूला स्पर्श करीत नाहीत . अरे या दिवसात स्कीम लावली तरी फारशी गर्दी होत नाही . पण मानले पाहिजे या बाप्पाला.....दहा दिवस का होईना दारूचे नाव ओठावर आणीत नाही काही जण.नंतर सर्व भरपाई करतील ती गोष्ट वेगळी
सदानंद धुले.... मुंबई पोलीस
उद्याचा दिवस  त्रास आहे अजून मग जाऊ सुट्टीवर.ह्या दिवसात खूप त्रास असतो. त्यात ट्रॅफिक आणि गर्दीची भर आहेच.ह्या गर्दीला कसा कंट्रोल करायचा तेच कळत नाही.नीट चाल म्हणून बोललो तर अंगावर येतात.हल्ली तर पटकन विडिओ काढून वायरल करतात . कोणाला काही बोलायची सोय नाही . दिवसेंदिवस गणेशोत्सवाची गर्दी वाढतेच आहे . त्यात आमचे कोकणातले बांधव गावी जाणारच त्यांचाही लोड आम्हीच घ्या.तसे तेही सहकार्य करतात हो....त्यांना तरी काय कमी त्रास आहे . सर्व गाड्या भरभरून जातायत आणि याना सुट्टी आयत्यावेळी पास होते .कसे प्रवास करतात तो बाप्पाचं जाणे... ते आल्यावर आम्ही जाऊ दिवाळीत गावी.पण तोपर्यंत काही घडायला नको हो....हल्ली भाविकही समजूतदार झालेत.आमचे हाल कळतात त्यांना . सतत काहीतरी खायला देत असतात.मान ही देतात.बाप्पाने हळूहळू का होईना बुद्धी दिलीय त्यांना .
लक्ष्मी पाटील .... मासेमार्केट मधील कोळीण
संपला एकदाच उपवास. आता येतील उद्यापासून धावत मासे घ्यायला. ह्या श्रावणात धंद्याची वाट लागते . घर कसा चालवते माझे मलाच माहीत . हल्ली श्रावण पाळायची फॅशन आलीय . बाप्पाचे विसर्जन करूनच खाऊ असा ठरवतात . मेल्यानी असा विचार केला तर आम्ही काय खाऊचा...? कधी एकदा तो बाप्पा जाताय याची वाट बघता आम्ही. आता येतील उद्या पापलेट आणि सुरमाईचे भाव विचारत ...
मंडपात बसलेला तो
हुश्शहह ...निघालो शेवटी.हल्ली इथे येणे खरेच जीवावर येते.काय मिळते मला येऊन....? पाच मिनिटे विश्रांती नाही.हे सर्व आपल्या मनाप्रमाणे मला वागवतात.अरे नाचायला पाहिजे म्हणून दोन दिवस आधीच घेऊन येतात . आणि काहीजण तर एक दिवस नंतरच जाऊ देतात . लोकमान्य हेच दिवस दाखवायचे होते का मला ....?? बिचाऱ्या गरिबांची दुःखे बघवत नाहीत म्हणून त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या मी . पण त्यांनी परतफेड म्हणून मलाच पैसे दागिने दिले . सर्वच आपली दुःखे माझ्याकडे मांडतात पण दुसऱ्यांची दुःखे दूर करेन असे कोण बोलत नाही . तो एक गृहस्थ त्या दिवशी पैश्याचे बंडल पेटित टाकून गेला ...पण भाऊ मला त्या पैश्याची गरज आहे का ??? तुम्हीच त्याचा उपयोग गरजू लोकांसाठी करा ना ... पण त्यासाठी वेळ नाही आमच्याकडे हो ...पण नवस बोलायला/ फेडायला दहा तास रांगेत उभे राहायला वेळ आहे आमच्याकडे. दरवर्षी अंगावरील सोने वाढतेय ....वजन पेलवत नाही मला.... पण ऐकतोय कोण..? तरी नशीब हल्ली पेटित पडलेला पैसा सामाजिक कार्यासाठी वापरला जातोय . दरवर्षी असेच काहीतरी त्यांच्या मनात सोडले पाहिजे.इथल्यापेक्षा कोकणात बरे वाटते . अजूनही दशावतार ,भजन ,चालू आहेत . मन प्रसन्न होते . आज गेली कित्येकवर्षं कोकणवासीयांनी परंपरा जपलीय .  पण सार्वजनिक ठिकाणी राहवत नाही हो . उद्या निघतोय पण दुःखाएवजी आनंदच का बरे होतोय....?
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, September 15, 2018

दुसरे जग

दुसरे जग
राज्यपरिवाहन मंडळाला शिव्या देत रोहन मांडवे शिरपूर स्टँडला उतरला तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता.आता पुढे काय .....??? Xxxx.... संध्याकाळी आठ वाजता येणारी बस इतका वेळ लावेल याची त्याला कल्पनाच नव्हती. ठीक आहे दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खराब होतच असतात पण आतापर्यंत फार त्रास झाला नव्हता.
शिरपूरमधील निलेवाडी हे साधारण चाळीस घरांचे त्याचे गाव.रात्री आठनंतर तिथे जाण्यासाठी काही वाहन नाही . सरकारी वाहन आणि मोबाइल रेंज अधूनमधून येते.त्याचेही गावात असे कोणीच नव्हते . स्वस्तात घर मिळले म्हणून घेऊन ठेवले होते .सहा महिन्यातून एक फेरी मारायचा .
रात्रीचे दोन वाजले होते.तो खाली उतरताच भुंकणारी कुत्री अचानक शांत झाली होती. तो हसला.च्यायला.... ह्यांना बरोबर कळते कोण सज्जन आणि कोण वाईट आहे ते . पण ती कुत्री लांब उभी राहून परत भुंकू लागली. हे जरा जास्त धोकादायक आहे असे मनात म्हणत त्याने हातात काठी घेतली.आजूबाजूला भयाण काळोख पसरला होता . इथेच झोपायचे की चालत जायचे याचा विचार करू लागला . गाव म्हटले की भुते आलीच पण त्याला त्याची भीती वाटत नव्हती तर अचानक अंगावर येणाऱ्या जनावरांची किंवा पायाखाली येणाऱ्या साप विंचूची जास्त भीती वाटत होती . भुत नाही तरी ते  भेटतील याची खात्री होती त्याला. शेवटी इथे थांबण्यापेक्षा चालत जावे असे ठरविले .नाहीतरी चार किलोमीटर अंतर होते. असा विचार करून त्याने चालायला सुरुवात केली .
काही अंतरावर त्याला डाव्या बाजूला हालचाल जाणवली.कोणतरी माणूस होता हे नक्की....त्याने मोठ्याने आवाज दिला "कोण आहे....."??  दोन मिनिटांनी एक साधारण पन्नाशीचा गृहस्थ पँटीची चेन लावत बाहेर पडला."कोण तुम्ही ....."?? त्या व्यक्तीने रोहनला विचारले .
"आठची गाडी आता आली शिरपूरला.... आता निलेवाडीला चाललो...तुम्ही ..."?? रोहनने आपली ओळख करून दिली .
"मी वामन गीते ..बुलगावचा .....तुमच्या बाजूलाच. शिकारीला आलो होतो .दहा बारा जण होतो . डुकराच्या मागावर शिरलो आणि फाटाफूट झाली बघा .शेवटी एकटाच निघालो घरी ..."शेजारी ठेवलेला भाला हातात घेत त्याने उत्तर दिले .
"बरे झाले सोबत झाली... जाऊ एकत्र.." असे म्हणून रोहन सिगारेट पेटवली दुसरी त्याला देऊ केली . त्याने नाकारली आणि खिश्यातून तंबाखूची पुडी बाहेर काढली . दोघेही चालू लागले.
"असे रात्रीचे फिरताना भीती वाटत नाही का हो .???. काहीतरी संभाषण असावे म्हणून रोहनने विचारले.
" कसली ...?? जनावरांची काय भीती ...ती असणारच ... कधी कधी घराजवळून जातात "...वामन सहज म्हणाला .
"मग भुतांची  ..."?? रोहन हसून म्हणाला.
" मुळात भुते असतात का ....?? मोठा गहन आणि चर्चेचा विषय ... कित्येक वर्षे मी असा शिकारीला जातोय पण भूत म्हणून कोणाला पाहिले नाही .माझा जन्म याच भागातला आणि  आयुष्य ही याच भागात गेलेय..."वामन हसत म्हणाला.
दोघेही भराभर पाय उचलत निघाले .
"तुम्हाला एक जाणवले का ..??? दोघे आहोत म्हणून आपल्याला भीती वाटत नाही .वातावरण ही शांत आहे . जनावरांचा आवाजही ऐकू येत नाही" रोहन सहज म्हणाला.तसा वामन चरकला.
"अरेहो ....माझ्यालक्षात आले नाही हे.घाबरलेत की काय आपल्याला ....?? असे म्हणून जोरात हसला.थोड्या वेळाने रोहनचे घर आले तसे वामन उद्या भेटायचे आश्वासन देऊन पुढे गेला .
रोहन कुलूप उघडून आत शिरला आणि दमल्यामुळे तसाच झोपून गेला . सकाळी बाहेरच्या गोंगाटामुळे त्याला जाग आली . बाहेर आला तेव्हा ओसरीवर काही माणसे जमली होती .
"चला निघायचे ना ....??? एकाने आवाज दिला. तो काही बोलायच्या आत दुसर्याने आवाज दिला हो ..आले सर्व "असे बोलून सर्व निघाले . रोहन ही त्यांच्यात सामील झाला . कितीही झाले तरी गावकरी होता तो . त्यांच्यासोबत तो गावाच्या स्मशानात आला . तसा तो फार कोणाच्या ओळखीचा नव्हता त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही तरी त्याला फरक पडला नाही .पण त्याच्याकडे इतके दुर्लक्ष होत असलेले पाहून जरा खटकलेच. शेजाऱ्याला काही विचारायला जाणार इतक्यात वामन दिसला . हायसे वाटून त्याने हाक दिली.वामन त्याच्याकडे पाहून हसला.
"इथे कुठे ..?त्याने वामनला विचारले.
"प्रेताला आलोय .....". असे बोलून त्याने चितेवर ठेवलेल्या प्रेताकडे बोट दाखविले.
जवळ जाऊन त्याने पाहिले आणि तो हादरला ..... चितेवर वामन शांतपणे आडवा झाला होता.
"वामन तुम्ही इथे ....? मग काल..... ??? त्याने हादरून वामनला विचारले.
"हो ....मीच होतो ..परवा शिकारीला गेलो तेव्हा डुक्कर चालून आला डायरेक्ट अंगावर. फाडुनच गेला मला.जाग्यावरच गेलो..... मग पोलीस केस . रात्रीच बॉडी घरी आणली.म्हणून फिरत होतो मी. तू भेटलास म्हणून वेळ गेला ..."असे म्हणून हसला.
" अरे पण इथे बिनधास्त कसा फिरतोयस तू ...?? माझ्याशिवाय कोणालाच दिसत नाहीस का तू ..?रोहन भीतीने बोलला .
"नाहीच दिसणार कोणाला मी ..फक्त तुलाच दिसतोय कारण आपण एकाच जातीचे आहोत ...तू ही आमच्यातलाच झालाय आता ...."वामन छद्मीपणे म्हणाला.
"म्हणजे .....रोहनने ओरडूनच विचारले.
काही न बोलता वामनने जवळ येणाऱ्या अँबुलन्सकडे बोट दाखविले .त्या अँबुलन्समध्ये रोहन अंगावर पांढरे वस्त्र पांघरून पडला होता . त्याच्या अंगाखाली अजूनही रक्त दिसत होते .
"हे कसे शक्य आहे ....??. मला  काय झाले .."?? धक्का बसून रोहन ओरडला.
"कालच परिवहन मंडळाच्या गाडीला अपघात झाला त्यात तुझ्याबरोबर अजून तीन जण गेले.आताच तुला इथे आणले आणि इथून मुंबईला घेऊन जातील .. असे बोलून वामन समुद्राकडे चालू लागला .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, September 14, 2018

दि रोझाबल लाईन .....अश्विन सांघी

दि रोझाबल लाईन .....अश्विन सांघी
अनुवाद....संकेत लाड
यात्रा पब्लिकेशन
लष्कर-ए-तोयबाच्या अंतर्गत एक अतिविशिष्ट गट निर्माण झाला आणि त्यात फक्त तेराजण आहेत.गालिब हा काश्मिरी युवक त्याचा नेता आहे . अल्लाच्या कामासाठी मृत्यू पत्करणे हा त्यांचा सन्मान आहे . हे तेराजण जगभरात पसरले आहेत .
लंडन विद्यापीठाच्या ग्रंथालयात प्राध्यापक टेरी ऍक्टन यांनी भगवदगीतेची  मागणी केली होती . बार्बरा हिने शेल्फमध्ये गीतेऐवजी चौरासकृती खोके पाहिले . कुतूहलाने तिने ते खोके उघडले तर त्यात प्राध्यापक टेरी ऍक्टन यांचे शीर होते .
विन्सेंट सिंकलेयर या अमेरिकन प्रिस्टला वेगवेगळे भास होतायत . त्याला आपल्या परिचयाची माणसे त्यात दिसतात पण ती कोणत्यातरी वेगळ्याच काळात असतात . आता या गोष्टीचा शोध घेण्यासाठी तो भारतात आलाय पण त्याच्या प्रत्येक हालचालीवर क्रक्स डेकुरसाटा पार्म्युटा ही गुप्त संघटना लक्ष ठेवून आहे . या संघटनेला काही प्राचीन रहस्य उघड होऊ द्यायची नाहीत तर ती नाहीशीच करायची आहेत.
व्हॅटिकन मधील एक धर्मगुरूने येशूविषयी संशोधन करण्याऱ्याना जगातून नाहीसे करण्यासाठी एक मारेकरी नेमली आहे .स्वाकिल्की ही सुंदर जपानी तरुणी अश्या कामात तरबेज आहे .
काश्मीरमध्ये रोझाबल नावाच्या कबरीत एका कोड्याची गुरुकिल्ली आहे . तिचे मूळ जेरुसलेममध्ये निर्माण झाले आहे आणि ते कोडे सुटणार आहे वैष्णवदेवीत .
ही अतिशय गुंतागुंतीची रहस्यमय काल्पनिक कादंबरी आहे .डॅन ब्राऊन यांची दा विंची कोड वाचणार्यांनी ही कादंबरी वाचलीच पाहिजे .इतिहास,धर्म अध्यात्म आणि रहस्य यांचा उत्तम मिलाफ या कादंबरीत आढळतो .एक अनपेक्षित धक्कादायक घटना ही कादंबरी आपल्यासमोर साकारते . डॅन ब्राऊन याना लेखकाच्या रूपाने भारतातूनच आव्हान मिळाले आहे .

Wednesday, September 12, 2018

विश्वसत्ता.... टॉम मार्टिन

विश्वसत्ता.... टॉम मार्टिन
अनुवाद ...... उदय भिडे
मूळ इंग्रजी पुस्तक किंगडम 
अतिशय जखमी अवस्थेत तो परकीय माणूस वादळी पावसात मठाच्या दारात आला . त्याला त्या अवस्थेत पाहून तिबेटी धर्मगुरूंच्या मनात अभद्र शंकेची पाल चुकचुकली . याचे आगमन म्हणजे मठाचा विनाश हे त्याला कळून चुकले . तरीही त्याने त्या प्रवाश्याला वाचवायचा निर्णय घेतला . काही साथीदारांसमवेत त्याला घनदाट जंगलातील जादूगाराच्या गुहेत पाठविले . तो गेल्यावर काहीवेळातच चिनी सैनिकांचा हल्ला झाला . त्यांनी मठाच्या प्रमुख धर्मगुरूंना ठार मारले . 
इकडे इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्युन या मान्यवर वृत्तपत्राच्या भारतीय शाखेत नॅन्सी केलीची प्रमुख म्हणून  निवड झाली . कारण येथील प्रमुख अंतोन हरगोज तीन महिन्यापासून गायब होता .  दिल्लीत आल्याबरोबर पोलिसांकडून नॅन्सीची कसून चौकशी करण्यात आली  आणि तिला हरगोजच्या काही वस्तू ताब्यात देण्यात आल्या . त्यात होते एक पुरातन हाड कोरुन तयार केलेली तुतारी . त्यावर आहे तिबेटमधील एक गूढ राज्याचे वर्णन . शांग्रीला नावाच्या राज्याची ती माहिती  आहे .लामांच्या काही वयोवृद्ध धर्मगुरूनाच त्याची माहिती आहे . त्या राज्यात गेलेला एकही माणूस जिवंत परत आला नाही असे म्हटले जाते . चीन सरकारही त्या तुतारीचा शोध घेत आहे .  नॅन्सी या गूढ अज्ञात राज्याचा शोध घ्यायला निघाली आहे .
जगावर नियंत्रण करणारे अदृश्य शांग्री-ला राज्य यांची चित्तथरारक सफर

Sunday, September 9, 2018

द एस्केप..... डेव्हिड बॅल्डसी

द एस्केप..... डेव्हिड बॅल्डसी
अनुवाद ...डॉ. अजित कात्रे
श्रीराम बुक एजन्सी
अमेरिकेतील लिवेनवर्थ किल्ल्यात असणाऱ्या अतिसुरक्षित अश्या लष्करी तुरुंगातून रॉबर्ट पुलर शिताफीने निसटतो. तो वायुदलातील  अण्वस्त्रे आणि सायबर क्षेत्रातील तज्ज्ञ आहे  आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याला अटक झालीय . त्याला पुन्हा पकडायची जबाबदारी लष्कराने त्याच्या लहान भावावर जॉन पुलरवर सोपवली आहे . जॉन पुलर हा धाडसी हुशार लष्करी पोलीस अधिकारी आहे . तरीही त्याला आपल्या भावाला नेमक्या कोणत्या आरोपाखाली अटक केली होती तेच अजूनही कळले नाही .दोघेही भाऊ भिन्न मार्गाने आपल्या परीने शोध घेत सत्याच्या जवळपास पोचतात . त्यासाठी त्यांना गुप्तहेर अधिकारी नॉक्स मदत करते .  असे कोणते षडयंत्र होते ज्यात रॉबर्ट पुलर गुंतला होता आणि काही शक्तिमान लोक त्याच्या मागे लागली होती . असे कोणते रहस्य होते की जे उघडकीस येऊ नये म्हणून जॉन पुलरचे प्राण संकटात सापडले होते .  एक असा चक्रव्यूह आहे ज्यात दोन्ही भाऊ अडकले आहेत .

Tuesday, September 4, 2018

डिजिटल फॉस्ट्रेस ....... डॅन ब्राऊन

डिजिटल फॉस्ट्रेस ....... डॅन ब्राऊन
अनुवाद ........ अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
एन. एस. ए. या अमेरिकेच्या सरकारी संस्थेने महासंगणक बनविला आहे जो जगातील कोणत्याही स्वरूपाच्या सांकेतिक मजकुराचा भेद करू शकतो कोणत्याही कॉम्पुटरमध्ये घुसून त्यातील माहिती चोरू शकतो .त्या संस्थेत काम करणारा जपानी प्रोग्रॅमर टंकाडो याचा ह्या गोष्टीला विरोध आहे . मानवाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी ही गोष्ट आहे असे त्याचे म्हणणे आहे . म्हणून त्याला काढून टाकण्यात येते . बाहेर जाऊन तो असा प्रोग्रॅम बनवितो ज्यामुळे हा महासंगणक काम करू शकणार नाही . सुसान ही त्या संस्थेत काम करणारी प्रमुख अधिकारी आणि भाषातज्ञ . तिच्यावर  ह्या संकटातून बाहेर काढण्याची कामगिरी सोपवली जाते . पण स्पेनमध्ये टंकाडो मारला जातो . त्या प्रोग्रॅमची की पासवर्ड त्याच्याजवळ असतो आणि ते आणण्यासाठी सुसानच्या प्रियकराला डेव्हिडला स्पेनमध्ये पाठविले जाते . टंकाडोच्या हातातील सोन्याच्या अंगठीत त्या कीची अक्षरे आहेत हे त्याला कळते पण उशीर झालेला असतो . ती अंगठी त्याच्या बोटातून नाहीशी झालेली असते . आता डेव्हिडला लवकरात लवकर ती अंगठी शोधायची आहे .त्या एका सॉफ्टवेअरने महासंगणकाला ओलीस धरले आहे . आता सुसानचा जीव ही धोक्यात आहे . .
डॅन ब्राऊनची ही पहिली कादंबरी . त्याच्या नेहमीच्या वैशिष्ट्यांप्रमाणे चोवीस तासात घडते . या चोवीस तासात अनेक घटना ,खून, पाठलाग , थरार घडून जातात .