Wednesday, August 31, 2016

द डे ऑफ द जॅकल ...फ्रेडीक फोर्सिथ

द डे ऑफ द जॅकल ...फ्रेडीक फोर्सिथ
फ्रान्स चे द डे ऑफ द जॅकल ...फ्रेडीक फोर्सिथ
फ्रान्स चे अध्यक्ष चार्ल्स गॉल याना मारण्यासाठी बाहेरून एक माणूस पाचारण करण्यात आला आहे .जॅकेलने स्वतःची योजना आखली आहे ,सर्व सुरळीत झाले तर चार्ल्स नक्कीच मारला जाईल . पण या मार्गात अनेक अडथळे आहेत .विशिष्ट प्रकारची बंदूक या योजनेसाठी बनविली गेली आहे .चार्ल्स पर्यंत पोचताना अनेक जणांनी जॅकल कडून जीव गमावला आहे .आता जॅकल आपला हेतू पूर्ण करेल का ?? अतिशय नावाजलेली आणि थरारक अशी कादंबरी   चार्ल्स गॉल याना मारण्यासाठी बाहेरून एक माणूस पाचारण करण्यात आला आहे .जॅकेलने स्वतःची योजना आखली आहे ,सर्व सुरळीत झाले तर चार्ल्स नक्कीच मारला जाईल . पण या मार्गात अनेक अडथळे आहेत .विशिष्ट प्रकारची बंदूक या योजनेसाठी बनविली गेली आहे .चार्ल्स पर्यंत पोचताना अनेक जणांनी जॅकल कडून जीव गमावला आहे .आता जॅकल आपला हेतू पूर्ण करेल का ?? अतिशय नावाजलेली आणि थरारक अशी कादंबरी 

Thursday, August 25, 2016

कोकण आणि गणपती

आज परत एकदा शंकर माझ्यासमोर उभा होता. "साहेब, गणपतीला गावी जायचे आहे, सुट्टी हवीय." यावेळी त्याचा स्वर मवाळ होता आणि नजरही खाली झुकली होती. "अरे ,आताच तर  काविळीच्या आजारात 20 दिवस सुट्टी घेतलीस ना तू, सर्व सुट्ट्या संपल्या तुझ्या कुठून देऊ तुला सुट्टी? मी थोडा रागातच बोललो."काय करू साहेब, एकट्यालाच करावे लागते सर्व. गणपती तर आलाच पाहिजे ना.... सर्व काही इथूनच घेऊन जावे लागते." "मग इथेच का नाही आणत गणपती ??" मी विचारले "शक्य नाही साहेब, गणपती मूळ घरातच आला पाहिजे असाच रिवाज आहे "

खरेच कोकण आणि गणपती यांचे नाते अजूनही मला समजले नाही. प्रत्येक कोकणी माणसाच्या अंगात होळी आणि गणपती भिनलेले असतात त्यासाठी वाटेल ते करायची त्यांची तयारी असते. मी कधीही कोकणात माझ्या गावी गणपतीसाठी गेलो नाही पण होळीला मात्र दरवर्षी जातो. ज्या दिवशी माझे स्वतःचे घर बांधले त्याच दिवशी गावकर्यांनी सांगितले आता पालखी घरी येणार.  त्यावेळी मला झालेला आनंद मी कधीच विसरू शकत नाही. देवाना स्वतःच्या खांद्यावरून, डोक्यावरून वाजत गाजत घरी आणायचा आनंद काय असतो हे मी समजू शकतो, आणि म्हणूनच वाटेल ते झाले तरी शंकर गावी जाणारच हे माहित होते मला.

अजूनही कोकणात पारंपरिक पद्धतीनेच गणपती उत्सव साजरा केला जातो. घराची झाडलोट, दारासमोर सुबक रांगोळी, मखर आणि सजावटीसाठी रात्रभर जागरण, संपूर्ण घर शेणाने सारवलेले, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वहात असतो. गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा करणे हे केवळ कोकणातच अनुभवू शकतो .सर्व स्रीवर्ग नऊवारी नेसून,नाकात नथ आणि दागिने घालून हातात ओवाळणी तबक घेऊन गणरायाच्या वाटेकडे डोळे लावून दारात उभ्या राहतात. यजमानांचे पाय धुवून गणेशाचे स्वागत करतात, तेव्हा एका क्षणात त्यांच्या चेहर्यावरचे भाव टिपावेत. आपला लाडका लेक खूप दिवसांनी घरी आल्यावर जो आनंद त्या माऊलीला होईल तितकाच आनंद लाडक्या गणरायाचे स्वागत करताना असतो आणि आनंदानी त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात.

असे दुर्मिळ क्षण अनुभवायची संधी कोण वाया घालवेल?? हे सारे शहरात अनुभवता येत नाही. अजूनही कोकणात आपली संस्कृती, जुन्या रीती, परंपरा टिकून आहेत. त्या 10 दिवसात सर्व नातेवाईक, मित्र परिवार एकत्र येऊन हा सण साजरा करतात.रात्री मोजक्याच आरत्या, मग मनोरंजनाचे कार्यक्रम आणि शांतपणे लवकर झोपून परत भल्या पहाटे उठून बाप्पाची सेवा करण्यात कोकणवासीय धन्यता मानतात. मी शंकरची सुट्टी रद्द करून त्याचा हा आनंद हिरावून घेऊ शकत नाही.

Wednesday, August 24, 2016

सण

"अरे भाई ,आपला सण आहे ,आपण आपल्या पद्धतीनेच साजरा करणार " बंड्या माझ्यासमोर गोविंदा ची बनियन नाचवत बोलत होता .मी ऐकून न ऐकल्यासारखे केले ,मला माझी कामे होती तर बंड्या नुसता भटकायचा ,मिळेल ते काम करायचा .माझा सण साजरे करण्यावर कधीच आक्षेप नव्हता आणि नसणार हि .पण बंड्याच्या विधानावर आक्षेप होता .कोणीही अडविले नाही कोणाला सण साजरे करायला पण ते कसे साजरे करावे यालाही बंधने असावी.
पूर्वी ठीक होते लोक जनजागृती आणि एकत्र येण्यासाठी सण साजरे करत पण आता दुसऱ्यांच्या वरचढ कसे व्हायचे याचा विचार जास्त होऊ लागला .९ थर लावून असा काय आनंद मिळणार कि जो ५ थर लावून मिळणार नाही ??आपला मुलगा सण साजरा करायला घराबाहेर पडलाय तो संध्याकाळी धडधाकट येईल का ?? याचीच आई वडिलांना काळजी .
तीच परिस्थिती इतर सणांची. गणपती पूजेसाठी आणायचा कि उंच दाखविण्यासाठी?? माझ्या गणपतीला सेलिब्रिटी येतात म्हणून तो गणपती पावणारा?? लोक स्वतःच्या घराचा गणपती सोडून आधी सार्वजनिक गणपतीला जातात आणि नंतर अभिमानाने सांगतात पहिल्या दिवशी दर्शन घेऊन आलो
.काळ बदलत गेला आणि लोकांची मानसिकता बदलत गेली .सण  हे धार्मिक न राहता प्रसिद्धीचे कारण बनले आहेत ,लोकांच्या भावनांशी खेळून अधिकाधिक कसे प्रसिद्ध होता येईल याचा अभ्यास चालू झाला .कधी सुधारणार आजची पिढी ,कधी डोळे उघडतील त्यांचे ?? आज सण कसे साजरे करायचे हे कोर्टाला सांगावे लागते यातच आपली हार आहे.

Monday, August 22, 2016

ओल्ड सिटी हॉल ...रॉबर्ट रोटेनबर्ग ..अनुवाद अनिल काळे

ओल्ड सिटी हॉल ...रॉबर्ट रोटेनबर्ग ..अनुवाद अनिल काळे
केव्हिन ब्रेस कॅनडातील रेडिओवर कार्यक्रम करणारा  प्रसिद्ध निवेदक एक दिवस आपल्या पत्नीचा खून केल्याचे कबुल करतो ,शांतपणे पोलिसांच्या स्वाधीन होतो ,स्वताहून आपल्या वकिलाची नेमणूक करतो . शेवटी खटला उभा राहतो ,वरवर सरळ सोपा वाटणारा खुनाचा खटला अनपेक्षित वळण घेऊ लागतो ,पोलिसांना धक्कादायक पुरावे हाथी लागतात आणि शेवट वेगळाच .एका न केलेल्या खुनाच्या तपासाची कथा

Sunday, August 21, 2016

ऑनलाइन मैत्री

अनिरुद्ध बापट आणि मी एकाच कंपनीत. त्याचे डिपार्टमेंट वेगळे. तो मला ज्युनियर. वयाने आणि अनुभवानेही. इथे तो भाड्याने राहायचा. एकटाच असल्याने कामावरून सुटल्यावर घरी जायची घाई हा प्रकार नाहीच. सतत मोबाईलवर असायचा. कधी गेम तर कधी चित्रपट. विचारले तर म्हणायचा " काय करू साहेब?? काहीतरी टाईमपास हवा ना??"

एक दिवस अचानक धावत माझ्या केबिनमध्ये शिरला आणि मोबाईल माझ्या हाती दिला म्हणाला "बघा भाऊ लॉटरी लागली". मीही उत्सुकतेने पाहिले तर मोबाईल मध्ये एका सुंदर बाईचा फोटो आणि खाली मोबाईल नंबर पण. "अरे हे काय? कोण हि?" एका सोशल साईट वर भेटली आताच फोन नं दिला वॉट्स  अॅपचा ". "मग", तू काय काय करणार ??" तसा हसून म्हणाला "अहो मिळाली ना शेवटी कोणतरी. बरेच दिवस प्रयत्न करत होतो शेवटी आज नं दिला. "छान, पण कोण कुठली?" म्हणाला "दिल्ली, गुङगावची आहे, पंजाबी. मैत्री करू, गप्पा मारू तेवढाच टाईमपास". मी हात जोडले म्हटले चालू द्या. त्यादिवासानंतर तो सतत ऑनलाइन राहू लागला. काही दिवसांनी मी बाहेरगावी गेलो त्यामुळे त्याच्याशी संपर्क तुटलाच.

2 महिन्यानी मी परत आलोब, बघतो तर हा चुपचाप कॉम्पुटर वर काम करत होता बऱ्याच वेळाने उठला आणि चहा घेऊन समोर बसला. मी म्हटलं "अरे हे काय? मोबाईल कुठे आहे? मैत्रीण काय  म्हणते ??" तर थोडा नाराज होऊन म्हणाल "हल्ली वाटत नाही चाट करावेसे" " का"?? मी आश्चर्याने विचारले "अहो किती बोलणार रोज रोज ? आणि काय बोलणार?"  एक तर आमची लेव्हल वेगळी " मी मिडल क्लास ती हाय फा.  पण तरीही ती छान बोलायची. कधीही वेगळेपणा दाखवला नाही. जेव्हा कधी मेसेज द्यायचो ती लगेच उत्तर द्यायची. खूप वेळ चाट करायचो आम्ही. तिची प्रत्येक विषयावर बोलायची तयारी. सुरवातीला जाम भारी वाटायचं. एकदम वेगळं, खूप छान. रोज ठराविक वेळी ती ऑनलाइन यायची आणि चाट करायची. पण एक ठराविक काळ लोटल्यावर काय बोलायचं रोज कळेनासं झालं. आणि परत एका अदृश्य बाईशी जी कधीही दिसत नाही तिच्याशी किती वेळ बोलणार "? मग मलाच कंटाळा यायला लागला. तिलाही जाणवू लागले ते. हल्ली तीही ऑनलाइन नसते, असली तरी gm आणि gn करतो आम्ही "मलाही सुचत नाही रोज रोज काय बोलावे?? आता तर मनात ठरावावे लागते काय बोलायचे. आम्हाला एकमेकांबद्दल पूर्ण माहिती आहे. आवडी निवडी ,घरची परिस्थिती, सर्व काही. एकवेळ अशी आली की वाटलं आमचा चाट आता फक्त सोपस्कार उरला की काय?? काय नवीन बोलू रोज??

हे सगळं रामायण मला ऐकवून तो गेला परत कामाला. पण मी मात्र विचारात पडलो खरेच हेच आहे का सोशल लाईफ?? अशी कशी ही ऑनलाइन मैत्री, कि बोलायलाही विषय सुचत नाहीत. मग आम्ही कसे 30 वर्षे मैत्री निभावतोय. भेटलो तर एक दिवस कसा जातो ते कळतसुद्धा  नाही. घरी आलो की फ्रेश होऊन बाहेर पडायचं मित्राला हाक मारून खाली बोलवायचे, टपरीवर चहा ढोसायचा. गप्पांना अंत नसायचा आणि आरामात घरी जायचो. आम्हाला कधीही ऑनलाइन मैत्रीची  गरज पडली नाही. आणि मित्रांचा कंटाळा आला नाही.

Saturday, August 20, 2016

हाऊस ऑफ कार्ड्स...मायकेल डॉब्स... अनुवाद ..सुनीती काणे

हाऊस ऑफ कार्ड्स...मायकेल डॉब्स... अनुवाद ..सुनीती काणे 
एक अप्रतिम राजकीय कादंबरी  .कॉलिंग्रीज हा ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा जिंकून आलाय पण ह्या वेळी त्याला फारसे बहुमत मिळाले नाही आणि त्यामुळेच त्याचे सहकारीच त्याचे शत्रू झाले आहेत त्याला खाली खेचून ती खुर्ची आपण कशी मिळवायची यावर कट कारस्थाने सुरु झाली आहेत.आता सुरु झालाय राजकारणाचा हिडीस खेळ .त्यातही एकहर्ट ला राजकारणातील प्रत्येक सभासदांची गुपिते ठाऊक आहेत ,त्याचे तेच काम आहे पडद्यामागून काम करणारा कुशल राजकारणी, पण पंतप्रधानपदासाठी तो सर्वांचा विश्वसघात करायला तयार आहे ,मॅटी नावाच्या तरुण पत्रकार स्त्रीचा आणि पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुखचा त्याने कुशलतेने वापर करून पंतप्रधानांना राजीनामा देणे भाग पाडले आहे आणि आता तो पदासाठी इच्छुक असणाऱ्या इतर उमेदवारांच्या मागे लागला आहे त्यांची गुपिते फोडून सफाईदारपणे त्यांना दूर केले आहे.त्याच्या या योजनेची माहिती मॅटीला लागली आहे पण आता खूप उशीर झाला आहे.
.एकदा हाथी घेतली कि खाली ठेवू नये अशी हि कादंबरी आहे.मराठीतील अरुण साधू यांच्या सिहासन या कादंबरीशी मिळती जुळती .माणूस सत्तेसाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे कळते.

Monday, August 15, 2016

स्वातंत्र्य

आज आपल्या भारताने स्वातंत्र्याच्या ७०व्या वर्षात पदार्पण केले. मी कधीच हा विचार केला नाही की या देशाने ७० वर्षात काय केले ?? काय करायला पाहिजे? मी मला जे योग्य वाटेल तेच करत आलो. मला वाटते सर्वजण तेच करतात.

लहानपणी फक्त इतिहासात मार्क्स  मिळविण्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामाचा अभ्यास केला. मोठे झालो तेव्हा पैसे कमवून सुखी आयुष्य जगायचे या एकाच ध्येयाच्या मागे लागलो. देशभक्तीची गाणी फक्त या दिवशीच ऐकायची, तेव्हाच सर्वाना देशभक्ती सुचायची. कवी प्रदीप यांनी लिहिलेले सुप्रसिद्ध गाणेही याच दिवशी ऐकायला मिळायचे. व्हाट्सअॅपमुळे एक फायदा झाला की, यादिवशी घरबसल्या सर्वांना देशप्रेमाचे गोडवे गाता येऊ लागले.

हळू हळू आयुष्यात सुख स्थिरावलं आणि तेव्हा कळू लागलं "अरे या देशानेच खूप काही दिले मला. आज मी जो काही आहे तो या देशामुळेच ना ? काय दिले नाही मला या देशाने?? शिक्षण दिले, उत्तम नोकरी दिली, छान कुटुंब दिले आणि मुख्य म्हणजे संस्कार दिले ज्यांनी मला खर्या अर्थाने माणूस बनवले. त्या संस्कारांनीच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची मला जाणीव करून दिली.

आज शिक्षणाच्या क्षेत्रात आम्ही "Start Giving Foundation" च्या माध्यमातून जे काही कार्य करतो आहोत ते सर्व या जाणिवेतूनच आले आहे. फूल ना फूलाची पाकळी पण काहीतरी आपण समाजाला  आणि पर्यायाने देशाला कृतज्ञतापूर्वक परत करतो हे समाधान घेऊन आम्ही रोज झोपतो. आमचं कार्य हे सागरातल्या एका थेंबासारखं जरी असलं, तरी ते आम्हाला आभाळाएवढं समाधान देतं. खरेच आज या देशाचा नागरिक असल्याचा आम्हाला अभिमान आहे .

Friday, August 12, 2016

सरकारशाहीं

"और कितनी बार आऊ ??मेरा हि पैसा लेने के लिये"?? माझ्या शेजारील ती वृद्ध महिला रडावेल्या आवाजात समोरच्या क्लार्कला विचारत होती." दस हजार रुपये के लिये 4 बार आना पड रहा है"?दादर पोस्ट ऑफिसमध्ये ती माझ्यासमोर उभी होती.NSC चे पैसे तिला पाहिजे होते ,मीही त्यासाठीच उभा होतो .समोरचा क्लार्क हताशपणे तिच्याकडे पाहत बसला होता 'मॅडम ,सर्वर डाउन है"मै कूछ नहीं कर शकता".दोघांचीही अडचण होती.बोलता बोलता दोघांचाही तोल सुटला आणि त्याने संतापून त्याच्या वरिष्ठांकडे तक्रार करायला सांगितली.तीहि तनतनत आत गेली .पण रिझल्ट आम्हा तिघांनाही माहित होता .ती आत जातात परत गरीब चेहऱ्याने तो क्लार्क मला म्हणाला "काय करू सर??रोज सर्वर चा प्रॉब्लेम आहे ,आणि सर्वर आहे चेन्नईला".कोणाला काय आणि किती सांगणार रोज रोज ??बघा इथे काउंटरच्या मागे  सगळे गप्प बसून आहेत ,चार मिनिटात NSC क्लिअर होऊन पैसे मिळतात,पण अश्या प्रॉब्लेममुळे सगळ्यांच्या शिव्या खाव्या लागतात." कोणीही काहीही बोलतो ,मग शेवटी आमचाही तोल सुटतो"
अर्थात या प्रॉब्लेमची थोडीफार माहिती असल्यामुळे मी शांत बसलो.पण असे शांत राहून प्रॉब्लेम सुटू शकतील का ?.समोरच्या क्लार्कचा पूर्ण दिवस काही काम न करता भरला गेला ,पण त्या वृद्धेचे काय ??? माझाही दिवस फुकट गेला .
आज सगळ्या सेवा संपूर्णपणे संगणीकृत झाल्या आहेत पण ते वापरण्यासाठी कितीजण सक्षम आहेत .पैसे घेताना ह्यांच्याकडे बरेच पर्याय असतात पण देताना ह्यांच्याकडे न देण्याची बरीच कारणे असतात ,सर्व नियम लागू असतात .परत अश्या विभागात पैसे गुंतवायचे कि नाही याचा विचार नक्कीच माणूस बाहेर पडताना करतो.

Tuesday, August 9, 2016

ऑनलाइन संसार

रात्री 2 वाजता अचानक फोन वाजला. थोड्या काळजीनेच  उचलला. तर समोरून वरूण बोलत होता. "काका, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या नेत्राला ऍडमिट केलेय. आणि डॉ. म्हणतात घरातील मोठ्या माणसाना बोलवा." मी येतो बोलून फोन ठेवला आणि बायकोला घेऊन निघालो. जाता जाता नकळत मन भूतकाळात गेले.

वरूण एक I.T. इंजिनियर. MBA अतिशय हुशार मुलगा. माझा दूरचा नातेवाईक पण जवळच राहणारा.आईवडील गावी. तसा तो स्वभावानी  हेकट. माझे कोणावाचून काही अडत नाही या वृत्तीचा. माझा मोबाइल आणि इंटरनेट हेच माझे विश्व असे मानणारा. दोन वर्षांपूर्वी अचानक घरी पेढे घेऊन उभा राहिला."काका, लग्न ठरलंय. मी ताबडतोब मोठेपणाचा आव आणून विचारले "अरे वा!!!कधी ,?? कुठे पाहिलीस मुलगी ?? कोणी ठरविले??? तो फक्त हसला "काका काय गरज आहे कोणाची ?? एका साईट वर तिला पाहिले,आवडली. विडिओ पाहिला तिचा. तिचा आणि माझा प्रोफाइल जुळला आणि आम्ही ठरविले. इथून जात होतो म्हणून तुम्हाला सांगायला आलो." अभिनंदन, मग आता पत्रिका कधी छापूया, खरेदी वगैरे. माझा मोठेपणा चालू झाला. तर तो जोरात हसला "काहीही गरज नाही. मी व्हाट्स अॅप वरून सगळ्यांना आमंत्रणे पाठवली आहेत,आणि खरेदीही ऑनलाइन केली आहे. इथे वेळ कोणाला आहे ? खूप कामे असतात." माझा थोडा हिरमोड झाला ,म्हटले "अरे बायकोला तरी वेळ देतोस का ??? "नाही हो, तीही माझ्यासारखी बिझीच. मग वेळ मिळेल तेव्हा व्हाट्स अॅपवर चाट करतो सेल्फी काढतो, विडिओ पाठवतो". मी न राहवून हाथ जोडले.

काही दिवसांनी आम्ही त्याच्या लग्नाला गेलो, फक्त 50 माणसे हजर पाहून धक्काच बसला. स्टेजवरही आहेर द्यायला गर्दी नव्हती. अरे ह्याने आहेर आणू नये असे लिहिले होते कि काय ??? ह्या विचाराने थोडा सुखावलो. भेटायला गेलो तेव्हा विचारलं "इतकी कमी माणसे कशी आली ???" तेव्हा परत तो हसला आणि म्हणाला " सगळ्यांनी व्हाट्स अॅपवर अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या आहेत. तो बघा एक माणूसच खास रिप्लाय द्यायला ठेवलाय. मी उडालोच."बरे आहेरचे काय ???" माझा बालसुलभ प्रश्न?? त्यानेहि लहान मुलाला समजवावे तसे मला सांगितले "अहो काका, प्रत्येकाच्या घरी मिठाई आणि गिफ्ट्स पाठवले आहे curriar ने अगदी घरपोच डिलिव्हरी". धन्य आहेस बाबा तू. मी हाथ जोडले आणि पोटभर जेवून निघालो.

दुसर्यादिवशी पूजेला गेलो पण यावेळी घरात 6 माणसे बघून मुळीच आश्चर्य वाटले नाही. सर्व कसे आरामात बसले होते. म्हटले अजून भडजी आले नाही वाटते?? तेव्हा उत्तर आले "अहो काका रेकॉर्ड लावून पूजा केली अगदी पूर्णपणे कुठेही शॉर्टकट नाही. कशाला हवाय भडजी?? प्रसादाची ऑर्डर दिलीय आता येईल, शिवाय 15 माणसांच जेवण सांगितले आहे. चला म्हणजे माझे जेवण होईल इथे. मी सुखावलो. परत एकदा पोटभर जेवून समाधानाने घरी आलो.

काही दिवसांनी तो रस्त्यात भेटला,एकटाच होता म्हणून विचारले "अरे कुठे गेलास कि नाही हनिमूनला "? तर नेहमीसारखे हसून बोलला कुठे वेळ आहे काका ?? तीही नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी अणि मीही. मी अचंबित झालो. मग मित्रत्वाच्या नात्याने त्याच्या खांदयावर हाथ ठेवुन विचारले "ते सर्व झाले का "?? तर लाजून म्हणाला सध्या तरी सेक्स चाट सुरु आहे, कधीतरी सेल्फी आणि व्हिडिओ", कप्पाळ!!!! मग नाटक सिनेमा तरी ??? अहो नवीन चित्रपट आला कि downoad करतो आणि पाहिजे तेव्हा बघतो. वेळही वाचवतो. मी दरवेळी नवीन नवीन धक्के खात घरी येत होतो.

आता काही महिन्यापूर्वी त्याचा messege आला बायकोला दीवस गेले आहेत. पटकन मनात आले.... "हेही ऑनलाईन नाही ना??" फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि काही मदत पाहिजे का असे विचारले.पुन्हा त्याचे परिचित हास्य ऐकून नवीन काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता लागली. त्याने सांगितले काही गरज नाही काका. हिचे सर्व काही करण्यासाठी एका कंपनीला ऑनलाइन  पॅकेज दिले आहे. आता ते लोक हिची व्यवस्थित काळजी घेतील मला फक्त बाळाला हातात घ्यायचे आहे..हे मात्र अतीच झाले, मी थोडा चिडलोच आणि तणतणतच  घरी आलो.

हॉस्पिटलमध्ये शिरत असताना हे सर्व आठवले आणि समोरच हा उभा राहिला. रडवेला चेहरा, खांदे झुकलेले, आम्हाला बघून त्याचा बांध फुटला. माझ्या कुशीत शिरून हमसाहमशी रडू लागला. मी विचारले "अरे काय झाले, तू तर पॅकेज दिले होतेस ना ?? मग अचानक काय झाले ?? तर म्हणाला त्यांनी नेत्राची क्रिटिकल कंडिशन पाहून हाथ वर केले, डॉक्टरांनीहि सांगितले तुमचे कोणीतरी नातेवाईक बोलवा परिस्थिती गंभीर होत चालली आहे. इथे मला सगळ्यांनी एकटेच सोडले सगळेजण भावनाशून्य चेहऱ्यानी  वावरत होते. त्यांना फक्त त्यांच्या पॅकेजशी मतलब आहे. आज मला जाणवले आपलेपणाची भावना असलेले पॅकेज कितीही किंमत दिली तरी विकत मिळत नाही.

Sunday, August 7, 2016

मैत्री दिन

ते दिवसच छान होते. सकाळी 8.30  ला ठाणे स्टेशन ला सर्व एकत्र S.T. स्टँड वर एकत्र भेटायचो. आणि Bus मध्ये रिकामी सीट मिळविण्यासाठी पळापळ करायची. शेवटी मोठ्या कष्टाने पकडलेली सीट शेजारी उभ्या राहिलेल्या सराना किंवा मॅडमना द्यायची. कधी सर किंवा मॅडम नसायचे Bus मधे. त्या दिवशी वाटायचं.... चला, एवढ्या कष्टाने मिळविलेल्या जागेवर आज आपणच बसणार तर...! पणं..... एवढ्यातच कॉलेजमधील एखादी गोड मुलगी येऊन उभी रहायची आणि जास्तच गोड हसून प्रेमाने पहायची. झालं.....  गेली परत आमची सीट. एकाला जागा मिळाली कि सर्वांच्या बॅग्ज त्याच्या मांडीवर विराजमान व्हायच्या आणि नंतर चालू व्हायचा खरा प्रवास. नुसता धिंगाणा, गाणी गात, शिट्या फुंकत कॉलेजपर्यंतचा तो प्रवास अविस्मरणीय.

कॉलेज मध्ये तसे फारसे lecture अटेंड केले नाहीच. मागचा डोंगर,तलाव आणि धान्यांची गोदामेच आम्हाला खुणवत असायची. मित्र तर सगळेच त्यामुळे दिवस कसा जायचा हेच कळायचेच नाही. त्या दिवसात सर्व समविचारी, उद्दिष्ट्य नसलेले ,निरागस असे सर्व मित्र आम्ही.कदाचित त्यामुळेच आजही एकत्र आहोत आम्ही. आज जो तो आपापल्या उद्दिष्टा पर्यंत पोचला आहे पण मैत्रीचा तो नाजूक धागा अजूनही आम्ही घट्ट धरून आहेत. कधीही नुसती हाक जरी मारली तरी ओ देतात.

तीच गोष्ट गार्डन मधील दगड ग्रुपची. कॉलेज संपले किंवा नसले कि सकाळपासून आमचा मुक्काम गार्डन मध्ये असायचा. इथे पुस्तक घेऊन आला नाहीत तरी चालते कारण आमच्या दगडावर तुम्हाला पाहिजे ते पुस्तक मिळेल हि खात्री....! शिवाय ग्रुपमधील कोणीतरी असायचाच. मग भेळ चणे फुटाणे  खात दिवस चालू व्हायचा. एकमेकांची थट्टा करीत अभ्यासाच्या नावाने दिवसभर गार्डनमध्ये पडून राहायचे. सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात अभ्यास करणारे पण परिस्थिती कमी-अधीक प्रमाणात सारखीच. घरी जागा नाही, पुरेशी पुस्तके नाहीत, तर क्लासला जायला पैसे नाहीत. मग काय ????? गार्डन झिंदाबाद !!!! तीथे सर्वकाही मिळे.कोणतेही पुस्तक मिळे. प्रत्येकाची प्रत्येक  अडचण सिनियर्सकडून सोडविली जाई. मग त्या कोणत्याही असोत, सर्वच एकमेकांना सांभाळून घ्यायचे. खरेच मी खूप भाग्यवान आहे. असे मित्र मला मिळाले आणि आजही ते माझ्या बरोबर आहेत.

Monday, August 1, 2016

काहुरी

कलत्या सांजवेळी तुझ्या येण्याची काहुरी
झाली बघ कशी माझी काय हि बावरी
काय सांगू , कसे सांगू,नाही पटत अंतरी
कशी थांबवू मी तरी तुझ्या येण्याची भरारी
रुक्ष , कोरड्या या भूवर
कसा येतो तरी कसा तुझ्या इच्छ्येचा अंकुर
एक तू जरा माझे , हे सूज अंतरीचे
जरी तुला ते वाटती बोल जीगुतीचे
जावे विरुनी तू आता
तुझ्या असत्या उमगातून
आणि संपवून टाक तुला तुझे
नाही अस्तित्व समजून