Friday, July 24, 2020

अलक ..७

अलक....७
 गेले चार दिवस तो विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्काराचे काम करीत होता .आताही एक म्हातारा ट्रॉलीवर झोपला होता.बटन दाबून ट्रॉली आत जाणार इतक्यात एक तरुण हातात केकचा बॉक्स घेऊन धावत आला. "आज त्यांचा वाढदिवस आहे. जाण्यापूर्वी केक भरवू का ....??  काही न बोलता तो बाजूला झाला आणि घरी फोन केला . गेले कित्येक दिवस तो बापाशी बोलला नव्हता." मला वाटलेच तू फोन करशील . कालच माझा वाढदिवस सुनेने आणि नातवाने साजरा केला फक्त तुझी कमतरता जाणवली .."डोळ्यातील अश्रूंना वाहू देत त्यानं विद्युतदाहीनीचे बटन दाबले . ट्रॉलीवरचा म्हातारा छातीवर केकचा तुकडा घेऊन आत गडप झाला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

706 ... (2019)

706 ...( 2019)
आज बारा दिवस झाले डॉक्टर अनिल अस्थाना गायब आहेत. संपूर्ण मुंबई पोलीस त्यांचा शोध घेतेय. डॉक्टर शहरातील नामांकित व्यक्तींपैकी एक . त्यांचे स्वतःचे मोठे हॉस्पिटल आहे . त्यांची पत्नी सुमन ही प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ आहे . हे प्रकरण फार गंभीर आहे म्हणून स्वतः डीसीपी शेखावत या केसमध्ये लक्ष घालतायत . 
याच वेळी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये एक दहा वर्षाचा मुलगा नीरज ऍडमिट होतो . त्याला मधेमध्ये झटके येतात . खरे तर त्याचे संपूर्ण रिपोर्ट्स नॉर्मल आहेत . तरीही असे का होते....??. डॉक्टर त्याला डिस्चार्ज देतात पण तो डॉ.सुमनला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणतो .
नाईलाजाने डॉ.सुमन त्याची भेट घेण्यास तयार होते . केबिनमध्ये आल्याआल्या तो डॉ. सुमनला विचारतो तुमची बसण्याची जागा बदलली आहे . इतकेच नव्हे तो तिचे पती डॉ.अनिल जिवंत नाहीत हेही सांगतो आणि पोलिसांना ते कुठे सापडतील याची माहिती ही देतो .
ती माहिती खरी ठरते आणि शेखावत हादरतो. दहा वर्षाच्या मुलाला ही माहिती कशी....?? याचा छडा लावायचा प्रयत्न करतो.प्रसंगी तो निराजला धमकीही देतो . ते ऐकून नीरज शेखावतला असे एक रहस्य सांगतो की जे फक्त शेखावतलाच माहीत असते.
थंड डोक्याने शेखावत यामागील रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि काही धक्कादायक गोष्टी समोर येतात . या सगळ्या घटनांचा संबंध मेघदूत हॉटेलमधील रूम नंबर 706 शी आहे . काय घडलंय त्या 706 मध्ये....??? काय आहे शेखावतचे रहस्य ...??
एक उत्कंठावर्धक चित्रपट 
यात शेखावतच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी तर डॉ. सुमानच्या भूमिकेत दिव्या दत्ता आहे . 
चित्रपट श्रवणकुमारने दिग्दर्शित केलाय .

Wednesday, July 22, 2020

अलक ...६

अलक .........?????
गेले चार दिवस सतत तो स्मशानात कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत होता . मृतांची नुसती रांग लागली होती . एकच काम करता करता तो थकून गेला होता .त्याच वेळी दोघेजण त्याला आत येताना दिसले . च्यायला स्मशान काय फिरायची जागा आहे . तो मनात म्हणाला . पण ते दोघे त्याच्याजवळ आले . एकाने त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि बाजूला नेऊन म्हणाला . भाऊ किती काम कराल . थोडी विश्रांती घ्या . असे म्हणून त्याला बाजूला बसवले . या  कडक लॉकडाऊनमध्ये ही बाटली देऊन काळजी घेणाऱ्या मित्रांचे त्याला कौतुक वाटले . बाटली तोंडाला लावून दोन घोट घेऊन म्हणाला दोस्ती बडी चीज हैं .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

अलक ...५

अलक...५
जेवणाच्या वेळेलाच जिवलग मित्र घरी आलेला पाहून तो खुश झाला..आज बऱ्याच महिन्यांनी दोघे मित्र पोटभर गप्पा मारत जेवले.
"अरे ..उद्या  एक काम करशील.प्रकाशकडे जाऊन माझे पेपर्स घेऊन ये. मी ऑफिसला जाणार आहे मला जमणार नाही.याच वेळेस जा.."
मित्र होकार देऊन बाहेर पडला. तो जाताच याने प्रकाशला फोन केला.
"उद्या त्याला तुझ्याकडे पाठवतोय . जेवल्याशिवाय सोडू नकोस . काम नाहीय त्याला.आपणच सांभाळून घेऊ . मी चाळीस मित्रांची लिस्ट काढलीय . खूप स्वाभिमानी आहे तो . पैसे घेणार नाही . पण रोज कोणाकडे काही कामासाठी पाठवून जेवणाची सोय तरी करू .. दोस्ती बडी चीज हैं .."असे म्हणत अलगद डोळे पूसले.
कॉलेजमध्ये असताना वाईट काळात एकमेकांना सांभाळून घेऊ या शपथेचा मान राखण्याची वेळ आज आली होती.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Friday, July 17, 2020

अलक...४

अलक...४
"बाबा...रोज दाढी करा हो .. काय हा अवतार बनवलाय...?? विडिओ कॉलवरून तो वडिलांना ओरडला.तसे हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार देणारा डॉक्टरही हसू लागला ."इकडे कोण करणार माझे ..?? असे बोलून त्यानी कॉल बंद केला .
पण आज स्मशानात त्या प्लास्टिक बॅगमध्ये नुकत्याच गुळगुळीत दाढी केलेल्या चेहऱ्यात त्याचे वडील शांत झोपलेले दिसत होते .
घरी आल्यावर त्याने डॉक्टरांना फोन केला . पलीकडून इतकेच उत्तर आले ."इतके तरी तुझ्या बाबांसाठी मी नक्की करू शकत होतो".
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, July 14, 2020

फॉर अ फ्यू डॉलर्स मोर ..1965

फॉर अ फ्यू डॉलर्स मोर ..1965
दिग्दर्शक सर्जिओ लिओनचा डॉलर्स ट्रिलॉजीमधील हा दुसरा चित्रपट.याही चित्रपटात क्लिंट इस्टवूड प्रमुख भूमिकेत आहे . पण त्याच्यासोबत ली व्हॅन क्लीफ हा तगडा कलाकार आहे .जियन मारिया हा प्रमुख खलनायिकेच्या भूमिकेत आहे .
पार्श्वसंगीत चित्रपटाचा प्राण आहे . संथ अंगावर काटा आणणारी थीम आपल्याला श्वास रोखून धरायला लावते .
क्लिंट आणि ली व्हॅन हे दोघेही शिकारी आहेत. सरकारने जाहीर केलेल्या गुन्हेगारांना शोधून त्यांना पुन्हा सरकारच्या ताब्यात देऊन बक्षीस कमावणे हा दोघांचा हेतू .दोघेही स्वतंत्र काम करतात . 
एका तुरुंगातून जियन मारिया आपल्या टोळीच्या मदतीने पळून जातो आणि एक बँक लुटण्याची योजना आखतो . त्याच्यावर नेहमीप्रमाणे मोठे बक्षीस जाहीर होते . त्याला पकडण्यासाठी हे दोन्ही शिकारी गावात दाखल होतात . पण जियनची टोळी बघता ते दोघे एकत्र येण्याचा निर्णय घेतात .
पुढे काय ....??
 खरोखर जियन बँक लुटेल...??  दोन्ही शिकारी आपल्या योजनेत यशस्वी होतील ...?? त्यासाठी त्यांनी काय केले हे मात्र बघण्यासारखे आहे .
क्लिंट इस्टवूडने आपली काऊबॉयची भूमिका अतिशय प्रभावीपणे केली आहे . यात हाणामारी नाही पण बंदुकबाजी खूप आहे . डोळ्यांची पापणी लवायच्या आत रिव्हॉल्वर होस्टरमधून बाहेर काढून गोळ्या झाडणे हे केवळ क्लिंट इस्टवूडलाच जमू शकते . कमीत कमी देहबोलीतून अभिनय कसा करून घ्यावा हे सर्जिओ लिओनकडूनच शिकावे

Monday, July 13, 2020

अलक ....३

अलक ...३
आज तीन महिन्यांच्या कोरोना  लॉकडाऊनंतर त्याने फॅक्टरीच्या गेट मधून आत प्रवेश केला .आतमध्ये पटांगणावर सर्व एकत्र जमले होते.समोर व्यासपीठावर चेअरमन उभे होते.त्यांनी हातातील कागदात पाहून नावे वाचण्यास सुरवात केली.आज त्याचा पहिला दिवस आपल्या बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यातच गेला .
©  श्री . किरण कृष्णा बोरकर

Sunday, July 12, 2020

द लॉस्ट सिम्बॉल .... डॅन ब्राऊन

द लॉस्ट सिम्बॉल .... डॅन ब्राऊन 
अनुवाद.......अशोक पाध्ये
मेहता पब्लिकेशन
अमेरिकेतील मेसन हा खूप जुना पंथ होता. असे म्हणतात की जॉर्ज वॉशिंग्टन हा मेसनच्या उच्च स्थानावर होता . गूढ आणि प्राचीन रहस्ये मेसनपंथीय प्राणपणाने जपत होते. पंथाच्या सर्वोच्च पातळीवर अर्थात 33 व्या पातळीवर गेलेल्या मेसनला सर्वोच्च रहस्ये ज्ञात होतात आणि त्याचा स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग खुला होतो अशी दंतकथा प्रचलित आहे.
मालख... एक क्रूर गुन्हेगार आज कपटाने मेसन पंथाच्या 33 व्या स्थानी पोचला आहे . पण त्याला अजूनही ती रहस्ये सांगितली नाहीत . शेवटी त्याने ती रहस्य जाणून घेण्यासाठी पीटर सॉलोमनला पळवून नेले . त्याच्याकडून फक्त त्याला एका प्रवेशद्वाराची माहिती मिळाली.होय... तेच ते मानवाचे देवात रूपांतर होणारे प्रवेशद्वार .. पण ते आहे कुठे ...?? त्याची चावी कोणाकडे आहे ...?? जो या रहस्याचा भेद करून प्रवेशद्वार शोधेल त्यालाच इथे येण्याचे निमंत्रण दिले पाहिजे .
कॅपिटोल इमारतीच्या गोल भागात बरोबर मध्यभागी एक वस्तू ठेवली आहे.त्यावर पाच भेसूर चिन्हे आहेत. ती वस्तू पाहताच चिन्हशास्त्रज्ञ असलेल्या रॉबर्ट लँग्डनला कळून चुकले की त्याला निमंत्रण दिले आहे .एका गुप्त जगात ज्याची माहिती फारच कमी जणांना आहे अश्या जगात त्याला बोलावले आहे आणि तो हे निमंत्रण टाळू शकत नाही .रॉबर्टचा गुरू आणि मार्गदर्शक पीटर सॉलोमन याला अतिशय क्रूरपणे पळवून नेण्यात आले होते. पीटर हा मेसन होता .त्याला सोडवून आणण्याची जबाबदारी अश्या निमंत्रणाद्वारे रॉबर्टवर टाकली गेली. ते त्याला स्वीकारावेच लागणार आहे .त्यासाठी त्याला गूढ रहस्ये ,चिन्हे यांचा अभ्यास करावा लागेल .
पण खरोखरच वॉशिंग्टन शहरात अशी काही रहस्ये गूढ जागा होत्या....?? असे कोणते प्रवेशद्वार आहे जे मेसनपंथीयांनी शेकडो वर्षे दडवून ठेवले होते . खरेच त्या सर्वोच्च पातळीवर पोचल्यावर माणसाचे देवात रूपांतर होते..?? अशी कोणती गोष्ट रॉबर्टकडे आहे जी ते रहस्य उलगडवू शकेल . यामध्ये सीआयए काय करतेय...?? तिला ही घटना राष्ट्रीय सुरक्षितता का वाटत आहे ....?? सीआयए ची प्रमुख या प्रकरणात जातीने का लक्ष देत आहे ..?? 
पीटरला सोडविण्यासाठी आणि ते रहस्य सोडविण्यासाठी आता रॉबर्टकडे फक्त काही तास शिल्लक आहेत .
नेहमीप्रमाणे चोवीस तासात घडणारी ,रहस्यांनी गुंतलेली...वेगवान कादंबरी
© श्री. किरण कृष्णा बोरकर

शौर्य

शौर्य 
खरे तर कॅप्टन जावेदखानचे कोर्टमार्शल एकदम सरळ आणि सोपे होते. काश्मीरमधील पुंछ गावात भारतीय सैन्याचे सर्च ऑपरेशन सुरू असताना कमांडिंग ऑफिसर राठोड कॅप्टन जावेदखानच्या हातून मारला गेला.सर्व पुरावे आरोपीच्या विरुद्ध होते ..या घटनेला आय विटनेसही होते. इतकेच नव्हे तर स्वतः जावेदखानने आपला गुन्हा कबूल केला होता. त्यामुळे फक्त प्रोसिजरनुसार कोर्टमार्शल होऊन कॅप्टन जावेदखानला शिक्षा होणार हे नक्की .
मेजर आकाश आणि मेजर सिद्धार्थ दोघेही जिगरी दोस्त . दोघेही आर्मी लॉयर.सिद्धार्थ थोडा हौसमौज करणारा दऱ्याखोऱ्यात भटकणारा आर्मी जीवन नकोसे असणारा .या दोघांची नेमणूक जावेदखानच्या कोर्टमार्शलसाठी वकील म्हणून होते .
सिद्धार्थ जावेदखानचा बचावाचा वकील होतो .अतिशय सरळ दिसणाऱ्या घटनेमागे सिद्धार्थही सरळ नजरेने पाहत असतो.
बिग्रेडियर प्रताप या विभागाचा प्रमुख ऑफिसर . अतिशय कडक ,निडर जो अतिरेक्यांची गय करीत नाही अशी त्याची ख्याती . ते सर्च ऑपरेशन त्याच्या परवानगीनेच झालेले असते .
काव्या एक लोकल पत्रकार ..दिसायला सुंदर . ती सिद्धार्थला विचारते तू या केस चा अभ्यास तरी केला आहेस का...?? 
जावेदखानची आई सिद्धार्थला सांगते माझा मुलगा दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
कोर्टमार्शल सुरू होते तेव्हा सिद्धांत आरोपी निरपराध आहे असे सांगून सर्वांना धक्का देतो . अगदी जावेदखानला सुद्धा .
मग या घटनेमागे नक्की काय घडलंय याचा शोध सुरू होतो. काव्या सिद्धार्थच्या  मदतीला येते. त्यातून उलगडते एक अनपेक्षित सत्य .. जे फार भयानक आहे ... सर्वांना पचवायला जड जातेय ...
काय आहे हे सत्य...?? हे सत्य कॅप्टन जावेदखानला निर्दोष शाबीत करेल का ...?? 
 हा चित्रपट हिंदी नाटक कोर्टमार्शल आणि हॉलिवूड चित्रपट फ्यू गुड मेन यावर बेतला आहे असे म्हणतात .
चित्रपटात राहुल बोस,जावेद जाफरी,मनीषा लांबा ,के के मेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत . तक्षक मधील क्रूर थंडगार रक्ताच्या खलनायकी भूमिकेनंतर एकदम विरुद्ध स्वभावाची भूमिका राहुल बोसने केली आहे .जावेद जाफरी गंभीर भूमिका ही छान करतो हे यातून कळते .
समर खान ने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एप्रिल 2008 साली प्रदर्शित झाला होता .

द फिस्टफुल ऑफ डॉलर्स 1964

द फिस्टफुल ऑफ डॉलर्स  1964
दिग्दर्शक सर्जीओ लिओनच्या डॉलर्स ट्रीलॉजीमधील पहिला चित्रपट . यानंतर आलेल्या फॉर फ्यू डॉलर्स मोर आणि द गुड द बॅड अँड द अग्लि हे चित्रपट खूप गाजले.
क्लिंट इस्टवूडचा हिरो म्हणून पहिला चित्रपट. या चित्रपटाने त्याला काऊबॉयची अजरामर इमेज मिळवून दिली . त्याची हॅट ..ओठांच्या कोपऱ्यात छोटी सिगार ठेवून पुटपुटणे, खुरटी दाढी ,थंडगार नजर ,सहज घोडदौड आणि मुख्य म्हणजे विजेच्या वेगाने कमरेवरच्या होस्टरमधून रिव्हॉल्वर काढून गोळ्या झाडणे हे फक्त त्यालाच जमू शकते.
पार्श्वसंगीत हा या तिन्ही चित्रपटांचा प्राण आहे .विशेषतः द गुड द बॅड अँड द अग्लि या चित्रपटाची थीम तर जगप्रसिद्ध आहे . आजही ती कॉलर ट्यून म्हणून अनेकांच्या मोबाईल मध्ये आहे .
हा पहिला चित्रपट विशेष प्रसिद्ध नाही .मेक्सिको आणि अमेरिकेच्या बॉर्डरवर असलेल्या छोट्या गावात एक अनोळखी काऊबॉय येतो . अतिशय शांत स्वभावाचा हा काऊबॉय एक उत्कृष्ट गनफायटर आहे . आल्या आल्या तो चौघांना गोळ्या घालून ठार मारतो.
पण तिथे दोन तस्करी टोळ्या आहेत . सोन्याच्या तस्करीत ते नेहमी एकमेकांवर कुरघोडी करत असतात . पोलिसांच्या ताब्यातील एक सोन्याचा साठा त्यातील एक टोळी पळवते आणि दुसरी त्यांच्या मागे लागते . या दोन्ही टोळ्यांना आपसात भिडवून तो गनफायटर आपला आणि गावाचा फायदा करून देतो .
चित्रपटात फारशी हाणामारी नाही पण संपूर्ण चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतो .

अलक।...२

अलक...२
त्याचे वय साधारण सहा वर्षे असावे. कोथिंबीरच्या दोन जुड्या हातात घेऊन एका हाताने चड्डी सावरत बाजारात फिरत होता.सगळ्यांसमोर त्या जुड्या पुढे करायचा .  माझ्याही समोर येऊन मुकाटपणे दोन जुड्या समोर केल्या . मी मान नकारार्थी हलवली.पण उपदेश करायचा माझा स्वभाव स्वस्थ बसू देत नव्हता . "शाळा नाही का रे ...?? जाऊन अभ्यास कर .. शिकलास तरच मोठा माणूस बनशील पुढे .... "तो शांतपणे माझे ऐकून घेत होता.इतक्यात कुठूनतरी त्याची आई समोर आली.त्याच्या पाठीत धपाटा पडला . "तुला काय गप्पा मारायला पाठवलंय होय ...  चार जुड्या विकल्या असत्यास आतापर्यंत. इथे उपदेश देण्यापेक्षा दहा रुपयांची जुडी घेतली असती तर संध्याकाळी चहासोबत बिस्कीटचा एक पुडा खाता आला असता...".
दोघांची नजर बरेच काही शिकवून गेली मला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

अलक ..१

अलक ...१
पैसे ब्लाऊजच्या खळगीत खोचून ती त्याचा हात धरून घरात शिरली . पण घरात त्या चार महिन्याच्या बाळाला पाहून तो थबकला."काही नाही ..तो झोपलाय ..नाही उठणार..." असे म्हणत तिने त्याला अंगावर ओढले . तो रंगात येऊन पुढे पाऊल टाकणार इतक्यात ते बाळ जोरजोरात रडत जागे झाले . तिने त्याला अंगावरून बाजूला केले . बाळाला मांडीवर घेऊन छातीशी लावले."झोपेल तो आता ....." ती अपराधी चेहऱ्याने म्हणाली.रंगाचा बेरंग होताच त्याचा मूड गेला.कपडे नीट करत पायात चपला घालून तो बाहेर पडला.तिचे दोन अश्रू बाळाच्या मांडीवर असलेल्या लाल भागावर पडले . चिमटा काढून लाल झालेली मांडी त्याच्या गोऱ्या शरीरावर उठून दिसत होती .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात मला भेटलेली माझ्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती माझी गुरुच आहे. प्रश्न हा आहे.. की मी चांगला शिष्य आहे का ...?? 
आमच्या पिढीतील सर्वच पहिले गुरू आपले आई वडील आहे असेच सांगतात . दर गुरुपौर्णिमेला तेच ..  कारण त्यांनी संस्कारच असे दिलेत आपल्याला.मुख्य म्हणजे वेळ दिला . अगदी स्वतःची धुवायला शिकविण्यापासून कपडे कसे घालावेत...समाजात कसे वावरावे .. स्वतःची तयारी कशी करावी..?? इथपर्यंत सगळे शिकवले.
पण आताच्या पिढीचे पाहिले गुरू आईवडील आहेत का ...??  मूल झाले की आणि रजेचा पिरियड संपला की त्याची रवानगी पाळणा घरात ..
 मग त्याची पहिली गुरू पाळणाघरातील मावशी. नंतर  दोन वर्षांनी त्याच्या हाती स्मार्टफोन दिला जातो. भरपूर गेम डाऊनलोड करून . मग तो स्मार्टफोन त्याचा दुसरा गुरू होतो .तोच हळू हळू सगळे शिकवतो त्याला .
मला आठवतंय दरवर्षी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे गुरू भेटले . वयात आल्यावर मस्तराम आणि हैदोस वाचायला देऊन कामजीवनाची ओळख करून देणारा पहिला गुरू मित्रच होता . तर दारूची पहिली ओळख करून देणारा मित्र हाही गुरुच .स्वतः कितीही घाईत असलात तरी अडचणीत सापडलेल्याची मदत करूनच पुढे जावे हे शिकवणारा तो अपरिचित ही गुरुच असतो.
आम्हाला सर्व गुरू मानवी रुपात भेटले .पण हल्ली स्मार्टफोन तरुणाईचा गुरू झालाय . तोच त्यांना सर्व शिकवतो . त्यांच्यावर बरे वाईट संस्कार करतो . अगदी चार वर्षाच्या मुलांपासून ते नव्वदीच्या म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांचा गुरू असतो तो . लहानांना खेळ शिकवतो .गोष्टी सांगतो ,तरुणांना जे हवे ते देतो...अगदी त्यांना हवी तशी जोडीदार ही मिळवून देतो. वयस्कर लोकांना फायदे तोटे समजावून सांगतो . तर वृद्धांना एकटेपणात सोबत करतो .
पण यांच्याकडून चांगले वाईट काय आहे ते कोण समजावणार .....?? . काही म्हणतात वाईट काय ते समजायला चांगले काय ते आधी कळले पाहिजे .आणि ते समजवायला माणुसरूपी गुरुच पाहिजे .
आयुष्यात पाच मिनिटासाठी भेटलेली व्यक्ती खूप काही शिकवून जाते .म्हणून म्हणतो गुरू सर्वच असतात आपण चांगले शिष्य बनणे महत्वाचे असते .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

दगड... दोस्ती बडी चीज है

दगड ....दोस्ती बडी चीज हैं ..
साने गुरुजी उद्यानातील हाच तो दगड . लोकांसाठी तो नुसता बसण्यासाठी ठेवलेला दगड असेल . पण आमच्यासारख्या वेगवेगळ्या परिस्थितीत राहणार्यांना  एकत्र आणणारा हा एक दुवा आहे . खूप काही दिले या दगडाने आम्हाला . मुख्य म्हणजे जीवाला जीव लावणारे मित्र दिले . याच दगडावर बसून आम्ही अभ्यास केला . बाहेरून जाणाऱ्या मुलींची थट्टा केली . आंधळ्या भिकाऱ्याला चिडवले . त्यांच्या शिव्या खाल्ल्या . सिनियर्स कडून शिकवणी घेतली ती ही इथेच . आमच्यासाठी ही एकत्र येण्याची जागा होती .. तेव्हा मोबाईल नव्हते . लँडलाईन फोन ही नव्हते . पण वेळ मिळेल तेव्हा या दगडावर येऊन बसायचे . पाच ते दहा मिनिटात कोणीतरी येणार ही खात्री असायची आम्हाला . घरच्यांनाही आम्ही कुठे सापडू याची खात्री असायची .
काहीजणांना जुन्या आठवणी नकोशा वाटतात ,तर काहींना जुन्या आठवणी जगण्याची ऊर्जा देतात.
याच दगडावर ज्ञानसेवेची संकल्पना जन्माला आली . आमच्या हातून काहीतरी घडावे ही त्या दगडाचीच इच्छा असावी .
माझे नशीब थोर म्हणून अजूनही त्या दगडावर बसून अभ्यास करणारे मित्र माझ्या साथीला आहेत . आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत माझ्या पाठीशी उभे राहिलेत .
कदाचित या दगडबरोबर राहून त्याचे काही गुण ही घेतले असावेत आम्ही . तटस्थता .. मनाला काही लावून न घेणे ... सर्व गोष्टी सहजतेने स्वीकारणे .आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना कसा करावा हेही याच दगडाने शिकवले .
आमच्यासारखे कित्येक विद्यार्थी आतापर्यंत त्या दगडावर अभ्यास करून यशस्वी झालेत .
खरच दोस्ती बडी चीज हैं .... हे ही याच दगडाने शिकविले आम्हाला .

फादर्स डे ..२०२०

फादर्स डे...२०२०
तो बाप.... हॉस्पिटलमध्ये बायकोच्या प्रसूतीच्या वेळी काळजीने फेऱ्या मारणारा आणि बाळाच्या जन्माची बातमी ऐकताच हळूच डोळे पुसणारा.
तो बाप ... आईला त्रास होऊ नये म्हणून बाळाचे डायपर बदलणारा.
तो बाप... मुलाला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळावे म्हणून रात्रभर शाळेच्या दरवाजावर रांगेत उभा राहणारा.
तो बाप... मुलाचे पराक्रम अभिमानाने ऑफिसमध्ये सांगणारा.
तो बाप... दारूच्या नशेत आईला शिव्या देणारा पोराला लाथा घालणारा. 
तो बाप.... मुलाच्या खिशातून पैसे चोरून मित्रांना दारू पाजाणारा.
तो बाप.... मुलाला पोरगी पळवून आणली म्हणून अभिनंदन करणारा नंतर मुलीच्या बापापुढे हात जोडून माफी मागणारा.
तो बाप....मुलाला बार मध्ये पिताना पकडणारा आणि स्वतःचा बार बदलणारा.
तो बाप... एक बुवा सांगतो म्हणून मुलाच्या यशासाठी उपवास धरणारा.
तो बाप ... मुलासाठी टी शर्ट आणणारा आणि बायकोमार्फत त्याच्याकडे पोचवून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निखारणारा.
तो बाप.... पोरांना घरी यायला उशीर झाला की बायकोला फोन कर फोन कर म्हणून सतावणारा.
तो बाप... मुलाचा सर्व पगार झडप मारून ताब्यात घेणारा.
तो बाप... मुलाच्या शिक्षणासाठी बँकांचे ..सावकारांचे उंबरठे झिजवणारा.
तो बाप.... चार मुली झाल्या म्हणून वंशाच्या दिव्यासाठी पाचव्या वेळी पुन्हा प्रयत्न करणारा.
तो बाप... मुलगी आहे हे कळल्यावर गर्भाशयातच हत्या करणारा.
तो बाप... आपण बाप होऊ शकणार नाही हे कळल्यावर अनाथाश्रमातून मूल दत्तक घेणारा.
तो बाप... मुलावर बोजा पडू नये म्हणून आपला आजार लपविणारा.
कसाही असला तरी बाप तो बापच.
हॅपी फादर्स डे
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ..१३

लॉकडाऊन ...१३
ती वस्तीच पूर्ण सील केली होती.बाहेरचा कोणीही आत जाऊ शकत नव्हता . तर बाहेर जाणाऱ्या स्त्रियांची चौकशी करूनच सोडले जात होते .कारणच तसे होते . सोशल डिस्टन्स इथे पळाले जाणारच नव्हते . त्या वस्तीत येणारे तसेच होते . पैसे देऊन आपली शारीरिक भूक भागविणारे . 
त्या वस्तीतलीच ती एक होती .आयुष्यभर तिने लोकांची भूक मिटवली होती . अतिशय कडक स्वभावाची पण प्रामाणिकपणे धंदा करणारी . आज तीन महिने होत आले . एकही गिऱ्हाईक तिच्या दारात आले नव्हते . काहीजणी लपून छपून बाहेर जाऊन धंदा करून येत होत्या. पण तिला हे पसंद नव्हते . सरकार जी मदत देईल ती घ्यायची आणि पुन्हा घरात बसायचे हेच करत होती ती . मदत घेताना पुरुषांच्या नजरा आणि चुकून नको त्या ठिकाणी होणारे स्पर्श सहन करीत होती ती . कधी कधी तिला नवल वाटायचे या परिस्थितीत ही कसे जमते याना . या लॉकडाऊनमुळे ती मेटाकूटीस आली होती.
पण घरी तिची दहा वर्षाची मुलगी खुश होती.कधी नव्हे तर आईचा सहवास तिला मिळत होता . ती जे बनवून द्यायची ती ते चवीने खात होती .नाहीतर आईचा सहवास कमीच मिळायचा तिला . हीची रात्र व्हायची तसा आईचा दिवस चालू व्हायचा . कधी कधी रात्रभर खाटेच्या कुरकुरीने तिला झोप येत नव्हती .
ही सकाळी उठून शाळेची तयारी करायची तेव्हा आई झोपलेली असायची . पण या लॉकडाऊनमुळे आई तिच्याकडे लक्ष देऊ लागली . तिला आता घरीच कांदेपोहे उपमा असा नाश्ता मिळू लागला .नाहीतरी रोज त्या अण्णाकडचे मेदू वडा ,इडली खाऊन कंटाळाच आला होता. आई तिला गोष्टी सांगत होती ..तिच्याशी सतत बोलत होती .व्यायाम करीत असताना कसे फिट राहावे हे समजावत होती .
खरेच तिनेही हा लॉकडाऊन सकारात्मक घेतला होता . सकाळी लवकर उठून योगा, व्यायाम . मग दोघींसाठी भरपूर नाश्ता. बरेच वर्षांनी ती मोकळा श्वास घेत होती . मुलीला वेळ देत होती . लॉकडाऊनमध्ये आपल्या धंद्याचे काय होणार ही चिंता होतीच . पण तरीही खचू द्यायचे नाही असाच विचार करीत दिवस ढकलत होती . आपले शरीरच मोठे भांडवल आहे हे लक्षात ठेवून नेहमी फिट राहण्याचा प्रयत्न करीत होती.
त्या वस्तीत तो पहिल्यांदाच पहाऱ्यावर आला होता . कोवळा तरुणच दिसत होता तो . त्याची भिरभिरणारी नजर हे काही नवीनच आहे याची जाणीव करून देत होती. वस्तीतल्या स्त्रियांनी बरोबर हेरले होते त्याला . सूचक इशारेही चालू केले त्यांनी . ते पाहून ती स्वतःशीच हसत होती . "त्यांची तरी काय चूक ...?? हा तर धंदा आहे..." बरेच दिवस हे नजरेचे खेळ चालू होते पण गोष्ट पुढे जात नव्हती .
त्यादिवशी ती सामान घेऊन येत असताना त्याची आणि तिची नजरानजर झाली . त्याच्या डोळ्यातील भाव पाहून सुखावली . त्याच्या डोळ्यात वासना नव्हती तर स्वप्नाळू दिसत होते ,थोडे रंगीलही .त्याची नजर आपल्या पाठीवर रेंगाळते याची तिला जाणीव झाली .बरेच दिवस हे चालू होते.
 मग त्या दिवशी तिने खिडकीतूनच चहाचा कप दाखविला .त्याने लाजून मान डोलावली इकडे तिकडे पाहत तो तिच्या खोलीत शिरला . तिच्या मुलीला मोबाईलवर खेळताना पाहून तो हसला आणि गालाचा चिमटा काढला . मुलगी शहारली आणि आत धावत गेली . गप्पा मारत मारता त्याने सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले असे सांगितले . पण आता लॉकडाऊनमुळे  तीन महिन्यापूर्वीच बायकोला गावी पाठविले होते . सध्या एकटाच होता . वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी करत होता .
बोलता बोलता कधी जवळ आले ते दोघांनाही कळले नाही .तिचा ही गेले दोन महिने पुरुषांशी संबंध नव्हताच तर तो तीन महिने उपाशी . एक वादळ त्या खोलीत आले आणि काहीवेळाने शांत झाले . 
त्याने कपडे चढवून पैश्याचे पाकीट उघडले तिने मान हलवून नकार दिला . किती दिवस उपाशी राहून ड्युटी करतोय माझ्याकडून ही भेट समज असे बोलून पुन्हा चहाचा आग्रह केला . 
तो बेडवर बसला असतानाच ती छोटी बाहेर आली . तिला पाहून याचे डोळे लकाकले. त्याने पुन्हा तिच्या गालावरून हात फिरवला तिने तो झिडकारला आणि पुन्हा आत पळाली .
तिने दिलेला चहा पिऊन तो बाहेर पडला .काही दिवस हे असेच चालू होते.
  एक दिवस तो बाहेर पडताच ती छोटी बाहेर आली . 
"मला तो अजिबात आवडला नाही . त्याचा स्पर्श घाणेरडा होता. पुन्हा बोलावू नकोस त्याला ... "ती खिडकीतून त्याच्याकडे पाहणाऱ्या आईला म्हणाली .
"माहितीय बेटा ...तुला स्पर्श करताना त्याची नजर पहिली मी .म्हणूनच त्याला असे औषध दिलय की पुढचे सहा महिने त्याला कसलीच इच्छा होणार नाही . वासनेने पिसाट बनलेल्या पुरुषांना कंट्रोल करायचे औषध आपल्याइथे सर्वांना दिलंय. तेच चहातून दिले त्याला . मी सगळे सहन करेन पण माझ्या मुलीवर कोणाची वाकडी नजर पडू देणार नाही . पण तो ही आपला रक्षणकर्ता आहे . रक्षकाने भक्षक होऊ नये म्हणून काही महिने ही शिक्षा पुरेशी आहे त्याला ...ती छोटीला जवळ  घेत म्हणाली .
तो खाली आपल्या जागेवर बसून तृप्तीचे क्षण उपभोगत होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

सुट्टी

सुट्टी
त्या भल्या मोठ्या तुरुंगात आज थोडी गडबड दिसत होती. सर्व तुरुंग चकचकीत होता .कैद्यांचे कपडेही साफ स्वछ दिसत होते .आज कोणाला शिक्षाही  मिळणार नव्हती . कारण ही तसेच होते.
आज जागतिक नरकतुरुंगचे अध्यक्ष यशवंत मनोहर राज उर्फ यमराज आणि त्यांचे सचिव चिंतामणी त्रंबक गुप्त येणार होते.
वर्षातून एकदाच ते या तुरुंगात येत . काही कैदी पॅरोलवर सोडायचे अर्ज करीत . त्याची छाननी करून कैद्यांची मुलाखत घेऊन ते निर्णय घेत . आजही ते त्यासाठीच आले होते .
आपल्या काळ्या रंगाच्या बुलेटवरून त्यांनी तुरुंगाच्या आवारात जोरदार एन्ट्री घेतली आणि बोटावर जाडजूड चेन गरगर फिरवत उतरले. मागून आलिशान कारमधून  चित्रगुप्त उतरले . पाठीवरच्या सॅकमध्ये लॅपटॉप आणि हातातील  टॅब  त्यांच्या कॉर्पोरेट अधिकाराची जाणीव करून देत होता.
दोघेही वेळ न दडवता ऑफिसमध्ये शिरले .  सवयीनुसार चित्रगुप्तने अर्जाची फाईल उघडली आणि ते आश्चर्यचकित झाले . 
" महाराज... आज फक्त पाच अर्ज आहेत. त्यातील एक अर्ज तर दरवर्षीचा आहे .यावर्षी ही त्याला नाकारावे लागेल...." चित्रगुप्त हसत म्हणाले.
"नाही.. यावेळी सर्वांच्या मुलाखती घेऊ .... बोलव एकेकाला ..." ग्लासातील लाल सरबताचा घुटका घेऊन यमराजानी हुकूम सोडला.
चित्रगुप्तांनी बेल मारताच पहिला कैदी आत आला . 
"सांग तुझ्याबद्दल ...?? का तुला सुट्टी हवीय ..?? कधी आलास तू ..?? यमराज कडक आवाजात म्हणाले .
एक साधारण पंचावन्न वर्षाचा तो गृहस्थ होता. नुकताच मृत्यू पावल्यामुळे अजूनही चेहऱ्यावर तजेला होता .डोळ्यात बुद्धिमत्तेची चमक दिसत होती .
"नमस्कार साहेब .... मी व्यवसायाने डॉक्टर आहे . तुम्हाला माहीतच आहे सध्या जगभरात कोरोना विषाणूची साथ आली आहे ..." तो विनयशील आवाजात म्हणाला .
"माहितीय .. आम्हीच आणलाय तो विषाणू . हल्ली तुम्ही मानव फारच शेफारला आहात .त्यांना कंट्रोल करायला हे करावे लागले . त्यासाठी मला माझ्या कामगारांची कपात करावी लागली ...." यमराज चिडून म्हणाले.
"होय साहेब .. माझाही त्यामुळेच मृत्यू झालाय . सलग चोवीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करीत होतो . घरी गेलो नाही . विडिओ कॉलवर बायको मुलीशी बोलायचो .आहो एक दिवस सुट्टी घेऊन घरी गेलो तर सोसायटीवाल्यानी बिल्डिंगमध्ये घुसू दिले नाही . गेटवरच बायको मुलांना लांबून भेटलो . परत हॉस्पिटलमध्ये रुजु झालो . पण नंतर मला कोरोना झाला आणि डायबेटीस असल्यामुळे मृत्यू झाला . घरच्यांना माझे शेवटचे दर्शनही नीट करू दिले नाही हो . पुढच्या महिन्यात मुलीचा वाढदिवस आहे . त्यासाठी सुट्टी हवी आहे .उरलेल्या सुट्टीत पुन्हा रुग्णांवर उपचार चालू करेन...."त्याने हात जोडून विनंती केली.
"ठीक आहे.. .विचार करू ... जा बाहेर...". असे बोलून चित्रगुप्तनी दुसऱ्याला बोलाविले .
दुसरा कैदी साधारण चाळीशीचा होता.अंगाने मजबूत दिसत होता .चेहरा राकट आणि नजर शोधक दिसत होती . आल्या आल्या त्याने यमराजना सलाम केला .
"बोला... काय म्हणणे आहे तुमचे...."??  चित्रगुप्त छद्मी आवाजात म्हणाले .
"सर .. मी महाराष्ट्र पोलीस आहे ..मूळ कोकणातला. मुंबईत पोस्टिंग होती .  31 डिसेंबर पासून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तात होतो. 31 डिसेंबर ला चौपाटी ,26 जानेवारी शिवाजी पार्क .होळीला गावाकबी जावूक मिळाला नाय.....". तो जोशात येऊन म्हणाला .
"ए भाऊ.. मराठीत बोल ... तुझे ते मालवणी नको.  गोधळ उडतो खूप ....." डुलक्या घेणाऱ्या यमराजांना पाहून चित्रगुप्त म्हणाले .
"आहो दोन वर्षे झाली ...गावात पालखी खांदयवर घेतली नाय . राखण दिली नाही . मागच्या वर्षी गणपतीची सुट्टी ही चार दिवस दिली . मुलांकडे गणपती विसर्जनाची जबाबदारी देऊन आलो .  का..?? तर मुंबईला धोका आहे . इकडच्या मंडपात बंदोबस्त हवाय . रोज काही न काही कारण आहे . आता हा कोरोना ..  लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आम्ही घराबाहेर पडतो ,रस्त्यावर उभे रहातो. लोकांच्या शिव्या खातो . त्यांना पाया पडून घरी राहायला सांगतो.शेवटी मला ही कोरोना झालाच.हॉस्पिटलमधून डायरेक्ट स्मशानात  नेले मला . देहदान करायची इच्छा होती माझी . तीही अपूर्ण राहिली . गावी घर डबल करायचे होते. तर तुम्ही निसर्ग वादळ पाठविले . अर्धवट बांधलेले घर ही वाहून गेले असेल . तिकडे जाऊन लोकांना मदत तरी करतो . म्हणून सुट्टी हवीय..."
"ठीक आहे... विचार करु... झोपेतून जागे होत यमराज म्हणाले .
तिसरा कैदी आत आला . त्याच्या चालीवरूनच तो सैनिक आहे ते कळत होते . अर्थात यमराजाना सर्व कैदी सारखेच . 
"बोल बाबा ...तुला का सुट्टी हवी .....??
"सर... मी भारतीय सैन्यात कमांडो आहे. आतापर्यंत मी भारताच्या सर्व सीमेवर यशस्वी कारवाया केल्या आहेत . देशात घुसणार्या ,हल्ला करणाऱ्याला  शत्रूला ठार मारणे हेच माझे काम . त्या दिवशी लष्करचा मोठा नेता येणार अशी टीप मिळाली आणि आम्ही कारवाई केली . सहा तास कारवाई सुरू होती . भयानक गोळीबार झाला . मी आणि माझे दोन साथीदार गंभीर जखमी झालो.. त्यांचे दहा अतिरेकी मारले आम्ही . पण तो लष्करचा प्रमुख निसटला . त्याला ठार मारण्याची संधी मिळावी म्हणून सुट्टी हवीय . आणि तसेही मी ही दोन वर्षे घरी गेलो नाही . तीन महिने सियाचेनला होतो तर सहा महिने वाळवंटात . दोन महिने टायगर हिलला  होतो.
"बघू.... ."कान कोरत यमराज म्हणाले.
"नेक्स्ट..."असे चित्रगुप्त ओरडताच त्यांचा नेहमीचा कैदी आत आला . त्याला पाहताच यमराजानी कपाळावर हात मारला.
येणारा कैदी सडपातळ उभट चेहऱ्याचा होता . चार्ली चॅप्लिनसारख्या मिश्या त्याच्या ओठावर होत्या. पण नजर मात्र थंड आणि भेदक होती .अंगावरचा लष्करी युनिफॉर्म त्याच्या अधिकाराची जाणीव करून देत होती ..
"अरे बाबा... गेली सत्तर वर्षे तू आमच्याकडे सुट्टी मागतोयस . पुन्हा जगाची वाट लावायची आहे का तुला ...."??.यमराज संतापाने म्हणाले .
"नाही ...या वेळी जग वाचवायचे आहे मला..". तो आपली भेदक नजर यमराजांकडे रोखत म्हणाला . "मला भारतात जायचे आहे . तिथे कोरोनाचे पेशंट वाढतायत .लोक ऐकत नाहीत . लोकशाहीने या देशाची वाट लावून टाकली आहे . तिथे कठोर वागायला हवे . हुकूमशाही हवी तिथे . रस्त्यावर फिरणार्यांना ,नियम न पाळणार्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. इथे कोणतेही सरकार कितीही चांगले काम करो पण विरोधी पक्ष नावाला जागून विरोध करणार .अजूनही संपूर्ण भारतात शिक्षणाची सोय नाही ,रस्ते नाहीत ,ट्रान्सपोर्ट नाही . मलाच जाऊन व्यवस्थित करावे लागेल ...." म्हणून सुट्टी हवीय..
यावेळी यमराज चिडले नाही तर फक्त विचारपूर्वक मान हलवली.
"नेक्स्ट....".चित्रगुप्त टेबल आवरत ओरडले.
आत आलेल्या कैद्याला पाहताच दोघांच्याही चेहऱ्यावर  आश्चर्ययुक्त आनंदाचे भाव उमटले .
"आयला तुम्ही ...." दोघेही एकसाथ ओरडले .."तुम्ही कसे इथे ...बघ चित्रगुप्त काही गडबड नाही ना . चुकून तर आले नाही ना..." यमराज ओरडून म्हणाले .
आत आलेला कैदी एक उमदा हसतमुख हँडसम तरुण होता . दोघांच्याही बोलण्यावरून तो खूप फेमस असावा असे दिसत होते .
"सर.... मी नाटक.. मालिका आणि चित्रपटात काम करतो. माझे तीनचार चित्रपट खूपच प्रसिद्ध झालेत .दोन नाटके दोन सिरीयलही खूप प्रसिद्ध झाल्या होत्या.पण या कोरोना लॉकडाऊन मुळे सगळे काम बंद झाले . हातात पैसे नाही . डोक्यावर कर्ज.  काही सुचेना यापुढे आपल्याला कामे मिळतील की नाही ही भीती . उंची राहणीमान परवडणार नाही . नैराश्य आले आणि आत्महत्या केली. पण पृथ्वीवर खुपजण आठवण काढतायत माझी . म्हणून मला परत जाऊन पुन्हा नव्याने सुरवात करायची आहे ..."तो सहजपणे म्हणाला.
"खूप छान निर्णय .. ..तुमचे काही चित्रपट इथे पाहतो आम्ही . यावेळी तुमच्या  इंडस्ट्रीतील काहीजण आलेत इथे .. ठीक आहे आम्ही विचार करू .... चित्रगुप्त हसत म्हणाले.
"सर्व मुलाखती संपल्या. आता निर्णय घेऊ.." यमराज चित्रगुप्तांला म्हणाले .
"यातील कितीजणांची पृथ्वीवासीयांना गरज आहे .."?? त्यांनी प्रश्न केला .
हातातील टॅब  उघडून चित्रगुप्तांनी शोध घ्यायला सुरुवात केली. 
"महाराज.... डाँक्टर सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नाही . तो वैचारिक पोस्ट आणि त्याचे विचार मांडतो फार मित्र नाहीत ,त्याच्या जाण्याने घरचे आणि मित्रपरिवार सोडून कोणास दुःख झालेले दिसत नाही.
 "दुसरा तो पोलीस .. त्याला अकाउंट चालविता येत नाही . फक्त फेसबुक आहे . पण मागचे सहा महिने लॉगइन केले नाही .."
" तिसरा सैनिक .. त्याचे फक्त व्हाट्स अप आहे . रेंज मिळेल तेव्हा विडिओ कॉल करतो . दोन नंबर असतात.  एक बहुतेक बायकोचा दुसरा वडिलांचा ...
" तिसरे आपले जुने मित्र ... तेव्हा तर नेट वगैरे नव्हतेच . लोक पुस्तकातून  चित्रपटातून त्यांची चर्चा करतात.अजूनही शिव्या देतात त्यांना काहीजण.."
" पण हा शेवटचा कलाकार खूप प्रसिद्ध आहे . सोशल मीडियाचा वापर आहे . सगळीकडे ऍक्टिव्ह असतो . आणि हो त्याच्या मरणावर  खुपजणानी दुःख प्रकट केले आहे .जणू काही आपल्या घरातील कोण गेले असे लिहितात लोक....चित्रगुप्तांनी टॅबवरून सर्व माहिती दिली.
"पण त्याने तर आत्महत्या केलीय . त्याला जगायचे नव्हते म्हणून हे पाऊल उचलले त्याने....."यमराजानी आश्चर्यानी विचारले . 
"होय महाराज ...पण त्याच्या जाण्याने पृथ्वीवर दुःख झाले आहे . सोशल मीडियावर 80% लोकांना त्याच्या आत्महत्येचे दुःख झाले आहे. चूक सर्वांकडून होते महाराज . तुम्ही ही एकदा एका स्त्रीचे ऐकून तिच्या नवऱ्याचे प्राण परत केले होते . हल्ली त्यावरून ही खूप वाद चालू आहेत ... आणि शेवटी जनमताचा आदर केला पाहिजे...".तिरकस नजरेने यमराजांकडे पाहत चित्रगुप्त म्हणाले .
"ठीक आहे ...आता जनमत त्याच्या बाजूने आहे म्हणतोस तर त्याला परत पाठवून देऊ . बघू जनतेच्या जीवावर काय करतो पुढच्या आयुष्यात .. असे म्हणून त्यांनी समोरच्या कागदावर सही केली आणि बोटातली चेन  गरगर फिरवत बाहेर पडले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

वादळ

वादळ
निसर्ग वादळाचे लक्ष आमचा जिल्हा आहे हे ऐकून मी थोडा चिंतेत पडलो.
आधीच माझे घर समुद्राच्या समोर. त्यात छप्पर पत्र्याचे.कोणी राहत नव्हते म्हणा. सामानही तसे काही नव्हतेच.
आमचे राम भाऊच सगळे बघायचे . काही अडचण असेल तर फोन करून सांगायचे.
विक्रमला जेव्हा सांगितले तेव्हा पटकन म्हणाला "भाऊ ...घराचे नुकसान झाले तर आपले भाऊ रिसॉर्ट बंद .. बसायचे कुठे मग ...."?? 
च्यायला इथे मी घराच्या टेन्शनमध्ये आणि याला बसायची चिंता ....मी जरा चिडलोच.
गावी कडक लॉकडाऊन असल्यामुळे जायचीही सोय नव्हती. तेव्हा फक्त टीव्ही बघण्याशिवाय पर्याय  नव्हता. सौ ने रामभाऊना फोन करून विचारलेच . त्यांनी स्वतःच्या घराची काळजी घेतली होतीच . आता निसर्गापुढे कोणाचे चालता हा....  बोलून हसले होते.
टीव्हीवर वादळाचे रौद्ररूपपाहून आम्ही हादरलो.हळूहळू वादळ आमच्या गावाकडे सरले आणि गावाशी संपर्क तुटलाच . संपूर्ण दिवस आम्ही चिंतेत घालवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम दारात गाडी घेऊन हजर..."भाऊ चल निघुया .....बघू काय किती नुकसान झालेय ते .."
पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी पटकन गाडीत बसलो आणि निघालो .
"अरे पण गावात लॉकडाऊन असेल तर ..."?? माझी नेहमीची शंका .
"खड्ड्यात गेले लॉकडाऊन .आपल्याला घराची चिंता .. बघू काय होतंय..".तो चिडून म्हणाला.
काही तासातच आम्ही जिल्ह्यात प्रवेश केला .
वादळाचे थैमान काय असते हे आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो. नैसर्गिक संकटे...  दहशदवादी हल्ले ..आम्ही मुंबईकरांनी खूप पचवली होती आणि त्यातूनही ताबडतोब उभे राहिलो होतो.पण इथे गावात मात्र ते सहन करायची ताकद नव्हती . कसे करणार .. रस्त्यारस्त्यावर विजेचे खांब पडले होते. घरांचे पत्रे उडाले होते .झाडे कोसळली होती. मदत मात्र कमी प्रमाणात होत होती.
गावात शिरलो आणि समुद्राच्यासमोरच्या घरांची दुर्दशा दिसू लागली. रस्त्याच्याकडेला लावलेली झाडे पडली होती .एकूणएक घराचे पत्रे उडाले होते. काही ठिकाणी तर भिंती ही पडल्या होत्या . काही वाड्यांमधील माड सुपारीची झाडे जमीनदोस्त झाली होती .
"भाऊ ... गेले आपले घर .... सगळे पत्रे उडाले असतील ....." विक्रम उदासपणे म्हणाला . मी तर गावाची अवस्था पाहून सुन्न झालो होतो .
गाडी माझ्या घराजवळ थांबली आणि घराची अवस्था पाहून धक्काच बसला . घराचे अर्धे पत्रे उडून गेले होते . विजेचे मीटर खाली लोबकळत होते. घरात चिखल होता. पंखे वाकडे झाले होते . थोडे थोडे पैसे वाचवून ,कर्ज काढून बांधलेल्या घराची अवस्था पाहून मी खचून गेलो.विक्रमने मला सावरले.
तसेच मागे आम्ही रामभाऊंच्या घरापाशी आलो . त्यांच्या घराची अवस्था पाहून माझे घर बरे.. असे म्हणायची पाळी आली . त्यांच्या घराचे सगळे पत्रे उडून गेले होते. वाडीतील झाडे पडली होती. एक आंब्याचे कलम तर त्यांच्या घरावर पडून दोन भिंतीच जमीनदोस्त झालेल्या दिसत होत्या.
रामभाऊ ओसरीत उभे होते. बनियन आणि हाफ पॅन्ट या त्यांच्या नेहमीच्या पोशाखात. आम्हाला पाहतच ते हसले . पण डोळ्यातील वेदना  लपवू शकले नाहीत.
"घराक जाऊन इलस....."?? त्यांनी विचारले.मग आजूबाजूला नजर फिरवत म्हणाले "होत्याचा नव्हता केलान रे ह्या वादळांन.."
रामभाऊनी घरावर ताडपत्री टाकून तात्पुरते छप्पर तयार केले होते . भिंतही झाडांच्या फांद्यांनी बनवली होती. एका कोपऱ्यात आंब्याची रास उभी होती. तर बाजूला शेवग्याच्या शेंगा आणि नारळ होते काही फणस ही होते.ओसरीत चूल पेटली होती . भाताची पेज त्यावर शिजत होती .
"बसून घेवा... असे म्हणून त्यांनी  आम्हाला दोन छोटी टेबल दिली.आणि स्टीलच्या पेल्यातून गरम गरम पेज आमच्या पुढ्यात ठेवली .
" मसाला आणि किराणा.. सर्व समान ..भिजून गेला बघ.तांदळाची पेज खा आज .रात्री बंदरावर जाऊ बघू काय मिळता ता.. .."ते हसत म्हणाले .
"रामभाऊ काकू दिसत नाही ..."?? मी इकडे तिकडे नजर फिरवत विचारले .
"अरे तिका काल शाळेत बसिवलंय.आता दोन दिवस येव नको बोल्लय. ह्या सर्व बघून तिचा तर जीवच जाईल...."असे बोलून हसले .
"काय रामभाऊ इतके होऊन तुम्ही हसता..."?? विक्रम आश्चर्याने म्हणाला .
"मग काय करू....?? माझ्या रडण्यान ह्या सर्व भरून येवचा काय ....?? असात तर दिवसभर रडत राहतय .." ते कठोरपणे म्हणाले ..."अरे या निसर्गानं आपली जागा दाखवून दिली आमका. माणसाक जगूसाठी काय लागता ते दाखवून दिलान. आता ह्याच बघ ना ही ह्या पेजेने पॉट भरता आणि या ताडपत्रीने पाणी आत येऊचा नाय . रात्री झोप लागात ना ...?? 
"म्हणजे इथे झोपणार तुम्ही ...."?? मी चिंतेत विचारले . 
"आपण झोपुचा हयसर... जमीन सुकी हा.. पाऊस पडलो तरी पाणी शिरणार नाय घरात . तुम्ही खय जाणार...?? एक दिवस तरी ह्यो अनुभव घेवा..  अरे भाऊ घर पडला ना तुझा ...?? नुसता बघूनच जातस.. मुंबई घर असा तुमचा पण आम्ही खय जाऊचा ..."ते विषदाने म्हणाले .
"रामभाऊ आम्ही थांबू आज .. विक्रम म्हणाला .घराची दुरुस्ती ताबडतोब केलात ..."?? 
"मग काय सरकार येवुची वाट बघायची . तो पर्यंत हाय ता पन व्हावून जायचा . ताडपत्री होती,पडलेल्या कलमाच्या फांद्या तोडल्या . एक जाळा उसावला त्याचे दोरे काढले आणि जमेल तशी दुरुस्ती केली . लेक आणि सून होतेच मदतीला ..." रामभाऊ खुशीत म्हणाले .
"अरे आता हयसर महिनाभर लाईट येऊचा नाय . मुंबईतून मेणबत्ती कोणी पाठवल्यांन तर बरा होईल. ह्या तीन तासाच्या वादळात पन्नास वर्षे मागे गेलंय बघ मी . तेव्हा लाईट नाय ,चुलीवर जेवण . जे आहे ते खाऊन जगायचं . आज रात्री बंदरावर जाऊन जाळी फेकू . मिळात ता आणू ,त्याने दहा दिवस आरामात जातील.सकाळी जंगलात जाऊ ,जांभळा करवंदा जमा करू.., शिकार मिळाली तरी करू ... पोटाचो प्रश्न नाय रे ..... पण ह्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी पडला त्याचा दुःख होता.. असे म्हणून त्यांनी हळूच डोळे पुसले . 
रात्री तसेच आम्ही उघड्या आकाशाखाली अंगणात झोपलो.दुपारी जेवून निघताना विक्रमने रामभाऊच्या हातात पैसे ठेवले .
"अरे कित्याक हे .. आमच्याकडे पाहुण्यांकडून पैसे घ्यायची पद्धत नाय ओ. आलात ताच बरा वाटला बघा. ह्या वादळामुळे जास्त काय करता आला नाय तुमच्यासाठी त्याचा वाईट वाटता.. आणि भाऊ माझा व्यवस्थित झाला की तुझा घर घेतंय करून . बाय ला सांग काळजी करू नकोस ...." मी मानेने होय म्हटले .
"रामभाऊ.. हे पैसे तुम्हाला असेच देत नाही मी . ते आंबे टाका गाडीत आणि काल पकडलेले मासे ही . आणि त्या फणसाचे गरे ही द्या ... आलोच आहोत तर कोकणचा मेवा घेऊन जाईन म्हणतो . काही दिवसांनी येईल तेव्हा अजून मिळेल ते घेऊन जाईन . त्याचेच हे पैसे.... "विक्रम नेहमीच्या शैलीत म्हणाला .
पैसे घेताना रामभाऊचा बांध फुटला." ह्या वादळाने एका फटक्यात उध्वस्त केलान आमाक.. पण आम्ही परत उभे राहू .. ज्या निसर्गाने आमच्याकडून ओढून घेतलान त्याच निसर्गाकडून आम्ही पुन्हा काढून घेऊ . पुन्हा उभे राहू. पण हारणार नाही ..."
मी अश्रू पुसत रामभाऊच्या मिठीत शिरलो.

© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ...१२

लॉकडाऊन ....१२
"पप्या चल खेळायला ....." काखेत बॅट.. हातात बॉल आणि एका हाताने चड्डी सावरत पिंट्याने दारासमोर उभे राहून नेहमीसारखा आवाज दिला.
"आयला.... आज पप्याचे दार बंद कसे..." असा विचार करीत असतानाच शेजारच्या मालतीकाकूने त्याच्या पाठीत धपाटा हाणला.
"मेल्या... जेव्हा बघावे तेव्हा खेळ चालू तुमचे. शाळा बंद आहेत त्याचा फायदा घेताय होय. पळ घरी ... पप्या नाही येणार आजपासून...."ती आवाज चढवून म्हणाली.
 पाठीवर बसलेल्या धबक्याने पिंट्या थोडा हादरलाच. पाठ चोळतच तो वळला.पण जाता जाता तिला जीभ काढून वेडावून दाखवायला विसरला नाही. 
पिंट्या आणि पप्या एकाच शाळेतील वर्गमित्र.सध्या दोघेही सातवी क मध्ये आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या चाळीत राहतात . चाळीतील सगळेच कामगार असल्यामुळे सर्वांची परिस्थिती सारखीच.
 नेहमीच पोटाची काळजी.... तेव्हा पोरांकडे कोण लक्ष देणार .....?? आणि त्यात हा कोरोनाचा लॉकडाऊन त्यामुळे सर्वच त्रासलेले होते . ह्या दोघांना कोरोना काय तेच माहीत नाही . शाळा बंद आहे यातच त्यांना आनंद होता. घरासमोरच्या ग्राउंडवर दोघेच क्रिकेट खेळायचे .  घरच्यांनी मास्क घालूनच खेळायला जा या अटींचे पालन मनापासून करायचे .
 मालतीकाकूला मनातून शिव्या देतच तो घरात शिरला . आणि आईला विचारले "पप्याचे दार बंद का ..?? कुठे गेलाय तो .." नेहमी चिडून बोलणारी आई आज त्याला जास्तच गंभीर दिसली . 
" हे बघ.... त्या पप्याला चिकटू नकोस.लांब राहा.त्याच्या आईवडिलांना कोरोना झालाय ,ते हॉस्पिटलमध्ये आहेत . पप्याला ही घरात बसायला सांगितले आहे..."तिने थोडा आवाज चढवूनच सांगितले.
"आयला.... म्हणजे पप्या आता घरातच बसणार ..."?? आश्चर्याने पिंट्या म्हणाला.
"हो ....आणि तू त्याच्या जवळही गेलास तर तंगडी तोडून ठेवीन ..."आईने तिची आवडती धमकी दिली .
पप्या एकटा कसा राहील घरी ...?? त्याला रात्री भीती वाटते एकट्याने झोपायला .. चहा बरोबर आख्खा ग्लुकोजचा पुडा लागतो . मध्ये मध्ये चॉकलेट गोळ्या लागतातच . कोण देईल त्याला ....??  असा विचार करीतच तो मुकाटपणे खाटेवर बसला .
इतक्यात त्याची आई कपात चहा आणि कागदात चपात्या घेऊन बाहेर पडली . निघताना म्हणाली "मी पप्याला चहा देऊन येते .तू जाऊ नकोस बाहेर .त्याने मान डोलावली .
"काही करून पप्याला भेटलेच पाहिजे . त्याच्याशी बोललेच पाहिजे. पिंट्याचे विचारचक्र चालू झाले .पण कसे....??? अरे हो .. मागच्या गल्लीतून पप्याच्या खिडकीजवळ जाता येते की .. बरेचजण त्या गल्लीत संध्याकाळी प्यायला बसतात म्हणून आई तिथे पाठवत नाही.पण आता कोण नसेल तिथे ....मनात येताच तो टुणकन उडी मारून उठला.
शाळेच्या बॅगेत दहा रुपयांची नोट त्याने जपून ठेवली होती . त्याने धावत वाण्याकडे जाऊन कुरकुरेचे पॅकेट घेतले आणि त्या मागच्या गल्लीतून पप्याच्या बंद खिडकीसमोर उभा  राहिला .मग हळूच इकडेतिकडे पाहत खिडकीवर थापा मारल्या आणि त्याच्या नावाने हाका मारल्या . थोड्या वेळाने आतून खिडकी उघडली आणि पप्याच समोर आला .
"आयला पिंट्या तू ....."?? पप्या आनंदाने ओरडला. 
"शु.... हळू आणि लांब राहून बोल ... " पिंट्याने मोठेपणाचा आव आणत ऑर्डर सोडली. मग हातातील कुरकुरेचे पॅकेट फोडले त्यातील काही काढून स्वतःच्या खिश्यात टाकले आणि उरलेले पॅकेट त्याच्या दिशेने फेकले .एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे पप्याचे ते लीलया झेलले . दोन कुरकुरे तोंडात टाकून म्हणाला बरे झाले रे आणलेस .. तुझी आई चहा चपाती बाहेर ठेवून गेली . चहा बरोबर चपाती कशी खाता रे तुम्ही ..."??
"नाही खाल्ली तर पाठीत धपाटे खावे लागतात .. बरे सांग आता तू एकटाच राहणार का ....?? रात्री पण एकटाच झोपणार ...?? डोळे मोठे करत पिंट्याने विचारले . 
"हो रे .. माझी तर खूप फाटते रात्री एकटे झोपायचे म्हटल्यावर . लवकर येऊ दे आई बाबा  ...." पप्या रडवेला चेहरा करीत म्हणाला .
"पप्या ...तू मुळीच काळजी करू नकोस. मी इथेच येईन दिवसभर . असेच लांब अंतर ठेवून गप्पा मारत बसू. तुला काय हवे ते सांग . मी देईन आणून तुला . तुला माझ्याकडची सगळी खेळणी आणि गेम आणून देतो . कंटाळा आला की खेळत बस .. आणि दिवसा अजिबात झोपू नकोस मग रात्री टीव्ही पाहता पाहता झोप लागेल....."पिंट्या मोठेपणाचा आव आणत म्हणाला .
 रात्र होईपर्यंत दोघेही गप्पा मारीत बसले . तो पर्यंत कोणी ना कोणी अधेमध्ये त्याच्या दरवाजावर काही ठेवून जात होते . दरवाजा वाजला की पिंट्या लपून बसायचा .
बाबांच्या आणि इतरांच्या बोलण्यावरून पिंट्याला कोरोनापासून कसा बचाव करायचा हे कळत होते . तो रोज ती माहिती पप्याला सांगत होता.
" लिंबू सरबत कर ...हातातील पाच लिंब पिंट्याच्या हाती देत आई ओरडली . कोरोनापासून लांब ठेवते लिंबू सरबत ..."
पिंट्याने हळूच एक लिंबू आपल्या खिश्यात टाकले . थोडया वेळाने धावत जाऊन खिडकीतून पप्याकडे फेकले ." लिंबू सरबत पी ...कोरोना होणार नाही.." असे त्यालाही ओरडून सांगितले . 
हळू हळू पिंट्या त्याच्या खाण्यातील वस्तू बाजूला ठेवून ते पप्याला देऊ लागला .त्याच्याशी गप्पा मारीत वेळ घालवू लागला.
 तिथे पिंट्याची आई दिवसभर हा असतो कुठे याची काळजी करू लागली .हल्ली भूकही त्याला जास्त लागते हे लक्षात येऊ लागले तिच्या. तिने पिंट्याच्या बाबांच्या लक्षात आणून दिले .बाबांनी काही न बोलता फक्त मान डोलावली.
त्या दिवशी पुन्हा पिंट्या खिशातून खाऊ घेऊन पप्याच्या खिडकीवर आला . पप्या त्याची वाटच पाहत होता . त्याने फेकलेली खाऊची पिशवी त्याने सहज झेलली  आणि डोळे विस्फारून पिंट्याच्या मागे पाहू लागला .
पिंट्याच्या मागे त्याचे बाबा उभे होते . पिंट्याचीही त्यांना पाहून तरतरली. त्यांनी हसून पिंट्याच्या खांद्यावर हात ठेवला .
"छान घेतोस मित्राची काळजी...पण तितकीच स्वतःची ही घे .किती वेळ घाणीत उभा राहून गप्पा मारणार तू . चल आपण ही जागा साफ करू ..."असे म्हणत त्यांनी खिडकीखालील जागा झाडून साफ केली आणि बरोबर आणलेले टेबल तिथे ठेवले .
"हे घे टेबल...यावर बसून बोल त्याच्याशी . पाय दुखाणार नाहीत तुझे ....  पण हो त्याच्यापासून लांब राहायचे . तोंडावरचा मास्क काढायचा नाही . आणि कुठेही स्पर्श करायचा नाही ..अश्या प्रेमळ सूचना देत पिंट्याच्या डोक्यावरून  प्रेमाने हात फिरवला आणि परत निघाले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ....११

लॉकडाऊन ..११
बातम्यांमध्ये यावर्षीची वारी रद्द होणार अशी बातमी पाहिली आणि तो जेवता जेवता उठून उभा राहिला. एक निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आली.
अरे रे ....चक्क वारी रद्द .. काय परिस्थिती आणलीय या कोरोनाने.
तो पंचवीस वर्षाचा उमदा तरुण.वडील उद्योगपती...त्यामुळे पैश्याची कमतरता नव्हती. दोन वर्षांपूर्वी घरच्या बिझनेसमध्ये वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली होती . अहोरात्र काम करायचा तो . पूर्णपणे घराच्या व्यवसायात स्वतःला झोकून दिले होते त्याने . वडीलही खुश होते त्याच्यावर.
पण त्याची एक गोष्ट त्यांना फारशी पटत नव्हती.
तो दरवर्षी न चुकता वारीला जायचा.
नाही ...तसा फारसा आस्तिक नव्हता तो. पण वारीला आपल्यातर्फे काही मदत करता येईल या हेतूने जायचा. एक सेवेकरी  म्हणून काम करायचं तो . त्यावेळी मात्र बिझनेस डोक्यातून निघून जायचा आणि वारकऱ्यांची सेवा हेच डोक्यात असायचे . गेली चार वर्षे न चुकता तो वारीत सहभागी व्हायचा . 
पण आज वारी रद्द झाल्याची बातमी ऐकून तो सुन्न झाला . इतक्या वर्षांनी सवय ...ती वारी ..तिची शिस्त ...सेवाभाव अंगात भिनले होते त्याच्या.
बातमी ऐकून त्याचे वडील थोडे खुशच झाले.
"चल मग... या वर्षी ते कॅनडाचे डील फायनल करून टाकू .तू जाऊन ये तिथे .नाहीतरी या लॉकडाऊनमुळे बरीच कामे रखडली आहेत,नुकसान ही भरून येईल .. त्याने काहीच उत्तर दिले नाही . मुकाटपणे पानावरुन उठला .
दुसऱ्या दिवशी मनात बेचैनी ठेवूनच तो ऑफिसला निघाला.सरकारने नुकतीच लोकांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली होती. 
रस्त्यावर ..मोठ्या मैदानाजवळ सर्वजण गर्दी करून होते . सर्वांना आपापल्या घरी जाण्याची घाई दिसत होती . चेहऱ्यावरची चिंता काही लपत नव्हती.
तो ती गर्दी पाहत गाडी चालवत होता.दोन ठिकाणी त्याला ही अडविले पोलिसांनी पण अधिकृत पेपर असल्यामुळे काही त्रास झाला नाही .
पण गाडी चालवताना तो रांगेत उभ्या असलेल्या कुटुंबाकडे पाहून बैचेन होत होता . त्याच्याही  धंद्यावर परिणाम होणार होताच .पण या लोकांसाठी आपण काही करू शकत नाही याचे जास्त दुःख होत होते.
अचानक त्याचे लक्ष त्या वृद्ध जोडप्यांकडे गेले . चेहऱ्यावरून तरी ते व्यवस्थित वाटत होते .ती वृद्ध स्त्री टिपिकल नऊवारी नेसून तर तो सदरा आणि साधा पायजमा घालून.
"हे मजूर कसे असतील ..?? त्याने स्वतः ला प्रश्न विचारला .तिच्या चेहऱ्यावरील हताश भाव पाहून त्याला राहवेना . गाडी थांबवली आणि त्यांच्याजवळ गेला.
तो वृद्ध थोडा अस्वस्थ दिसत होता . त्याने हळूच वृद्ध स्त्रीला विचारले " आई ...काही प्रॉब्लेम आहे का ...?? कुठे जायचे आहे तुम्हाला ...??
 तसे तिचे डोळे भरून आले ."आम्ही कोकणातले..वैभववाडीचे...ती हळूच म्हणाली . मुलगी परदेशी गेली तिला सोडायला आलो होतो. एकुलती एक मुलगी . पहिल्यांदाच परदेशी गेली नोकरीसाठी . म्हटले आलो तर दोन दिवस फिरून घेऊ आणि जाऊ नंतर घरी . तसेही आता आम्ही दोघेच . पण हे अचानक लॉकडाऊन सुरू झाले. हॉटेलात किती दिवस राहणार . पैसे संपत आले तसे बाहेर पडलो . पण आता नातेवाईकही दूर झाले . काही दिवस गुरुद्वारात राहिलो . आता मिळेल त्या गाडीने पुढे पुढे जाऊ ..."ते ऐकून तो मनातून हलला.
काही दिवस यांची सोय करावी असे त्याला वाटू लागले.आणि त्यांना गाडीत बसवले.
 "चला माझ्याबरोबर... दोन दिवस आराम करा.मग पुढे काहीतरी सोय होईलच ..." तो हळुवारपणे म्हणाला.तसे त्या बाबांनी हात जोडले .
"आहो... तुमच्या मुलासारखा आहे मी चला.." असे बोलून त्यांचे सामान गाडीत टाकत तो ऑफिसला आला.
ऑफिसच्या वरच त्याचा एक फ्लॅट रिकामा होता . त्याने तिथे त्यांची सोय केली . त्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची सोय करून तो संध्याकाळी घरी आला. 
रात्री अचानक त्याचा मोबाईल वाजला . घड्याळात पाहिले तर रात्रीचे दोन वाजले होते.अनामिक भीतीने त्याने फोन उचलला . समोरून ती वृद्धा बोलत होती . "अरे बाळा ...हे बघ कसेतरी करतायत . खूप अस्वस्थ वाटतेय त्यांना. मी काय करू सुचत नाहीय.."
तो तसाच उठला आणि तयारी करून बाहेर पडला . त्याची वेळीअवेळी येण्याजाण्याच्या सवयीमुळे घरच्यांनी लक्ष दिले नाही .तो वेगाने ऑफिसजवळ आला आणि धावतच फ्लॅटमध्ये शिरला .
ते बाबा शांतपणे खुर्चीत बसून होते आणि माई केविलवाण्या चेहऱ्याने त्यांच्या डोक्यावर हात फिरवत होती . त्याने बाबांना आधार देऊन उभे केले आणि हळू हळू खाली घेऊन आला . दोघांना धीर देत त्याने गाडीत बसविले आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात घेऊन गेला .
पण त्यांना पाहताच डॉक्टरने ऍडमिट करून घ्यायला नकार दिला .पहिली कोरोना टेस्ट करून या मगच ऍडमिट करतो .अशीच उत्तरे त्याला  बऱ्याच खाजगी हॉस्पिटलमधून मिळाली.
पहाटे पहाटे तो नाईलाजाने सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला . तिथे डॉक्टरांनी चेक केले ..काही नाही प्रेशर वाढले आहे .कदाचित गोळी घेतली नसेल . असे म्हणत त्यांना गोळ्या लिहून दिल्या . माईने मान खाली घालून गोळ्या संपल्यात हे कबूल केले.
त्याने हॉस्पिटलच्या मेडिकल मधून गोळ्या आणि कॅन्टीनमधून चहा बिस्किट्स आणून दोघांना दिला . बाबांना गोळ्या घेताच बरे वाटू लागले.
तो तसाच त्यांना परत फ्लॅटवर घेऊन आला पण गेटवरच सोसायटीचा सेक्रेटरी आणि इतर कमिटी मेम्बर हजर होते . कमिटीने त्यांना आत घेण्यास नकार दिला .  "साहेब ... बाहेरच्या लोकांमुळे सोसायटीला त्रास नको..."ते हात जोडून म्हणाले . त्यांचेही तसे चुकीचे नव्हते . पण आता वाद कोण घालेल असे मनात म्हणत तो चूप बसला . गाडी मागे वळवून तो दोन तीन मित्रांच्या घरी फिरला . पण तिथेही नकारघंटा मिळाली .
"बाळा.. नको आमच्यासाठी तू कष्ट घेऊ. कोणत्यातरी हॉटेलमध्ये आमची सोय कर थोडी पैश्याची मदत कर .गावी गेल्यावर तुझे पैसे पाठवून देऊ .. "बाबांनी त्याच्या खांदयवर हात ठेवून म्हटले. 
"बाबा.. हे लॉकडाऊन किती दिवस राहील ते सांगू शकत नाही.त्यापेक्षा मीच तुम्हाला सोडून येतो गावी . तुम्ही कुठे त्या परमिशन काढीत बसणार ..."? असे म्हणत त्याने परत सरकारी हॉस्पिटलात गाडी आणली.
 पुन्हा डॉक्टरला भेटून त्यांची वैदयकीय प्रमाणपत्रे मिळवली .तेथील योग्य ती कागदपत्रे पूर्ण करून तो इ पास च्या मागे लागला .त्या दोघांचे इ पास मिळाले पण ह्याला काही मिळेना.
 अचानक त्याला वडिलांच्या मित्राची आठवण झाली .ते पोलिसात मोठ्या हुद्द्यावर होते. अजूनपर्यंत त्याने त्याची कधीच मदत घेतली नव्हती . पण आता नाईलाज होता.वडिलांना फोन करून त्याने अडचण सांगितली . सर्व प्रकार ऐकून वडिलांनी मदतीचे आश्वासन दिले आणि  दहा मिनिटात त्याच्या मोबाईलवर इ पास आला . 
त्याने ताबडतोब दोघांना घेऊन प्रवासाला सुरवात केली .  शहरातून बाहेर पडताना त्यांच्या कागदपत्रांची तपासणी झाली पण पुढे त्यांना त्रास झाला नाही . हायवेवर रांगेत गाड्या चालू होत्या तर रस्त्याच्याकडेने शेकडो माणसे चालत होती . काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसून माणसे जेवत होती तर पाण्याच्या ठिकाणी चक्क आंघोळ ही चालू होती.  बऱ्याच सेवाभावी संस्था जेवणाची सोय करत होते . लोकांना थांबवून आग्रहाने जेवण देत होते .
"अरे ही तर वारीच आहे .इथला प्रत्येकजण आपल्या हक्काच्या ठिकाणी जात आहे . विठ्ठलाला भेटायची आतुरता जशी वारकऱ्यांच्या चेहऱयावर दिसतेय तीच आतुरता.. घराची ओढ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतेय . आणि लोकही किती हौसेने त्यांची सेवा करतायत...".त्याने मनोमन देवाचे आभार मानले आणि मागे बघितले.दोघेही डोळे मिटून देवाचे नामस्मरण  करत होते.
 दोघांना कसलाही त्रास होऊ न देता तो वैभववाडी जवळ आला आणि काही अंतरावरच त्यांची गाडी अडवली गेली .गावात शिरण्यास त्यांना मनाई केली गेली . बाबांनी  हात जोडून आपली ओळख दाखविली तेव्हा  फक्त त्यांनाच चालत जाण्याची परवानगी दिली गेली. मग ह्याने निदान त्यांना घरापर्यंत सोडून तरी येतो असे हात जोडून सांगितले.त्यांची कहाणी ऐकून गावकऱ्यांनाही दया आली.
त्यांनी परवानगी देताच तो दोघांसोबत गावाच्या दिशेने चालू लागला. नकळत त्या वृद्ध दाम्पत्याच्या तोंडून विठ्ठल नामाचा जप सुरू झाला.ते पाहून त्यानेही जप चालू केला .
काही वेळाने ते त्यांच्या घरापाशी आले . तो दारात उभा राहिला ते घरात शिरले . मग दोघांनी ही मागे वळून त्याला आशीर्वाद देण्यासाठी हात उंचावले . जणू विठ्ठल रुखमाई आशीर्वाद देतायत याचा त्याला भास झाला . 
आज खऱ्या अर्थाने त्याची वारी पूर्ण झाली होती .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ..१०

लॉकडाऊन ...१०
"काय साहेब ...!!  सध्या काय चालू आहे ..?? फोनवर  मुलाचा आवाज ऐकताच बाप खुश झाला .
"काही नाही सर...  तुमच्यासारखाच आघाडीवर आहे इथे ....."त्यानेही हसत खेळत नेहमीच्या आवाजात उत्तर दिले.
ते दोघे बाप लेक.
बाप पोलिसात साधा कॉन्स्टेबल तर मुलगा सैन्यात कमांडो तुकडीत.
 बाप सध्या कोरोना असलेल्या एका भागात ड्युटीवर तर मुलगा काश्मीरमध्ये आघाडीवर.
दोघे महाराष्ट्रातील एका छोट्या गावातले.यांचे पूर्वज सगळे सैन्यात आणि पोलिसात.पोरांचा आजोबा तर चीनच्या लढाईत शाहिद झालेला .
आज दोघेही आपापल्यापरीने देशाची सेवा करत होते.
 वेळ मिळेल तेव्हा न चुकता फोन करायचे एकमेकांना.
बापाची बायको म्हणजे पोरांची आई तर  तीन वर्षांपूर्वीच वारली होती आणि पोराचे लग्न व्हायचे होते .त्यामुळे दोघेच एकमेकांचे मित्र बनले होते.
 नेहमी वेळ मिळेल तेव्हा फोन करीत एकमेकांना .आजही तसाच फोन चालू होता.
 "काळजी घ्या साहेब .. .साधे पोलीस आहात तुम्ही. सेफ्टी काही आहे का ...??  तो कोरोना आहे . वय झालेल्याना जास्तच त्रास देतो . तसे तुम्ही तरुण आहात म्हणा.पंचावन्न हे काही वय नाही . पण मास्क नसेल तर रुमाल तरी बांधा आणि मी मागे ठेवून गेलो होतो ते ग्लोव्हज घाला.आणि हो.... तो युनिफॉर्म रोजच्या रोज धुवा .. म्हातारी गेल्यानंतर तुम्ही आळशी झालात खूप ......"पोरगा हसत हसत म्हणाला .
"साल्या बापाची खेचतो का ...?? समोर असतास तर एक लावून दिली असती. .. मी माझी काळजी घेतो रे . मास्क ,सॅनिटायझर .. सगळे व्यवस्थित चालू आहे . युनिफॉर्मचा त्रास आहे रे ...तुझी म्हातारी गेली आणि माझे कपडे मीच धुतो . पण आता या कोरोनामुळे घरी जाण्याची निश्चित वेळ नाही . मग गेल्यावर हा टाकतो पाण्यात आणि दुसरा घालून येतो . मग पुन्हा घरी जातो तेव्हा तो बाहेर निघतो पाण्यातून ..."असे बोलून खो खो हसू लागला .
"काय पिताजी .... तेव्हाच म्हटले गावातल्या आरती काकूंशी लग्न करा . पण ऐकले नाहीत . किती दिवस नुसते तिला बघत बसणार आणि व्हाट्स अप चॅटिंग करणार ....." तो अजून खेचत म्हणाला 
"अरे किती खेचशील बापाची... ,तुला काही काळ वेळ आहे का ..?? इथली परिस्थिती किती गंभीर आहे . लोक घाबरली आहेत..." बाप काळजीने म्हणाला .
"बाबा परिस्थितीचे मला सांगू नका ... इथे रोज मरणाच्या दारात आहोत आम्ही.इथल्या रहीवाश्यांचे चेहरे बघा . रात्री आठ नंतर कोणाच्या घरावर थाप मारली आणि त्यांनी दरवाजा उघडला तर मरणाची भीती काय ते कळते .तिथे तर फक्त रोग आहे इथे रोगही आणि बंदुकीच्या गोळ्याही ...पण जाऊ द्या हो आपण गंभीर बोललो तर परिस्थिती पालटेल का ...?? त्यापेक्षा हसत खेळत बोलू .. काय माहीत कधी भेट होईल आपली ...." तो थोडा गंभीर होत म्हणाला.
"अरे मित्रा बस क्या ... माहितीय आम्हाला किती कठीण परिस्थितीत काम करतोस तू ..."बाप आठवणीने हळवा झाला .
"माझे जाऊ द्या हो..आर्मी मला खूप काही देते .पण तिथे काय परिस्थिती आहे....."??त्याने परत मूड आणत विचारले .
"इथे परिस्थिती बिकट आहे .लोक ऐकत नाही रे.. वेड्यासारखे फिरतात बाहेर. हात जोडून सांगावे लागते बाबांनो घरात राहा .. पण नाही .मारले तर कोणीतरी विडिओ काढतो आणि करतो व्हायरल . आमची दोन्ही बाजूने मारली जातेय.. रस्त्यात किती लोकांच्या संपर्कात येतो आम्ही . तरी बरे जेवण खाण्याची चिंता नाही...तरीही किती काळजी घेणार..."?? बाप पुन्हा भावनिक झाला .
"म्हणजे बाबा..आपण दोघेही आता लढाईवर आहोत तर ...हो पण आता  शाहिद व्हायचे नाही हा.नाहीतर अंत्ययात्रेला कोणीच यायचे नाही ..आजोबांच्या वेळी आख्खा गाव आलेला अंत्ययात्रेला . काय ती गर्दी ,काय तो जयजयकार ... साल मरण ही खुश झाले असेल तेव्हा अशी प्रसिद्धी मिळाली म्हणून ..आपण ही तसेच शाहिद व्हायचे .घराण्याचे नाव राखायचे ...पोरगा हसत म्हणाला .
"ए भानावर ये .. चल मी निघतो राउंड ला .. आज थोडे थकल्यासारखे वाटतेय...."बाप जड आवाजात म्हणाला.
दोघांनी फोन ठेवले आणि आपापल्या कामाला लागले .
दुसऱ्या दिवशी सकाळी एका घरात काही अतिरेकी लपल्याची टीप त्यांना मिळाली.तिथे निघायची तयारी करत असतानाच बाप गेल्याचा फोन आला.
अचानक मिळालेल्या बातमीने त्याला धक्का बसला .  "शेवटी शाहिदाची परंपरा कायम राखली तर ..."?? तो मनात म्हणाला.
 "जवान दो मिनिटंमे तय्यार होकर रिपोर्ट करो .."त्याच्या कॅप्टनचा करडा स्वर कानावर आला तसा तो पटकन उठला .खिश्यातून बापाचा फोटो काढून एक कडक सॅल्युट ठोकला आणि Ak47 घेऊन बाहेर पडला .
दोन दिवसांनी 
त्या छोट्या गावात सैन्यदलाची एक गाडी उभी राहिली . चार सैनिकांनी त्यातून एक शवपेटी बाहेर काढली . पूर्ण गावात लॉकडाऊन होते . गावात एकही माणूस बाहेर दिसत नव्हता . गावाचा सरपंच पुढे आला त्याने जवानांना स्मशानभूमीचा रस्ता दाखविला . चारही सैनिकांनी लष्कराला साजेशा इतमामात त्याचे अंत्यसंस्कार केले . अंत्यसंस्काराला गावातून फक्त सरपंचच हजर होता . दोन दिवसांपूर्वीच त्या शाहिद सैनिकांचा  कॉन्स्टेबल बाप कोरोनामुळे शाहिद झाला होता . त्याचे प्रेत तर डायरेक्ट विद्युतदाहीनीत नेले होते . सोबत फक्त त्याचे दोन सहकारी होते.
त्याच दिवशी हा त्याचा मुलगा काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढता लढता शाहिद झाला होता .आपले अंत्यसंस्कार गावी व्हावे अशी त्याची इच्छा होती .सरपंचाने संपूर्ण गावातर्फे त्याला श्रद्धांजली वाहिली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ...९

लॉकडाऊन ....९
"मला ही बिस्किट्स नको.तुला माहितीय ना.. मला ती ओरीयौच हवी..."छोटा अंबर आईकडे चिडून पाहत  म्हणाला.
"हो रे राजा... पण आता संपली ती .आपण उद्या आणूया हं.."आई त्याला समजावत म्हणाली.
 घरात बसून कंटाळलेल्या सदाशिवला अंबरचे बोलणे ऐकूना राग आला.
त्याच्या पाठीवर धपाटा देत तो ओरडला .. "खायचे असेल तर खा..बापाने पैशाचे झाड नाही लावलंय".पाठ चोळत रडवेला चेहरा करून चहा पिऊ लागला .
अंबर सदाशिवचा एकुलता एक मुलगा.
सदाशिव खाजगी कंपनीत कामाला . कडक शिस्त पाळणारा.त्यामुळे घरातही तेच वातावरण.
आईच्या लाडाने अंबर बिघडलाय ही त्याची तक्रार . अंबरच्या प्रत्येक मागणीत तो हस्तक्षेप करायचा.
त्याची शिस्तही तशीच होती . वेळच्यावेळी उठणे ,पूजा ,अभ्यास  अगदी चोख पाहिजे त्याला.
बाप घरात असला की अंबर  जरा जपूनच वागायचां.
पण ओरियो बिस्किट्स त्याचा जीव की प्राण . त्यासाठी तो आकंडतांडव करायचा . दुसरे काहीही चालायचे नाही त्याला .  आई बराच स्टॉक भरून ठेवायची.
 सदाशिवपुढे मात्र त्यांचे काहीही चालायचे नाही.
त्यांच्या विभागात काही कोरोन रुग्ण सापडले होते  आणि त्यामुळे संपूर्ण एरिया सील  केला होता.
सदाशिवही घरात बसून होता .लॉकडाऊन सुरू झाले तसे त्याने बायको आणि अंबरला घराबाहेर पडण्यास बंदी घातली होती. तो स्वतः ही फारसा बाहेर जात नव्हता . ताटात पडेल ते मुकाट्याने गिळायचे अशी तंबीच त्याने दिली होती.
आज  सकाळी उठलाच तो अंबरच्या ओरडण्याने.आईकडे तो ओरियोची मागणी करत होता . गेले पंधरा दिवस तो चहाबरोबर मिळेल ते खात होता.पण आता त्याचा बहुतेक कंट्रोल सुटला होता. सदाशिव चिडून उठला तसा तो भीतीने शांत झाला पण मुसमुसणे बंद झाले नाही. 
सदाशिवने कपडे चढविले . मास्क घातला आणि त्याच्याकडे एक जळजळीत  कटाक्ष टाकून बाहेर पडला.
बराचवेळ झाला पण सदाशिव आला नाही म्हणून बायकोला चिंता वाटू लागली . तिने फोन केला तेव्हा तो दहा मिनिटात येतो म्हणाला पण अर्धा तास झाला तरी आला नाही .
काळजीने ती गॅलरीत उभी राहून त्याची वाट पाहू लागली . बऱ्याच वेळाने शेजारचा निखिल वर येताना दिसला.
 तिला पाहून त्यानेच विचारले "वहिनी ....भाऊ आले का ..?? नाक्यावर  बऱ्याचजणांना पोलिसांनी पकडलेय बाहेर फिरतात म्हणून . उठाबशा काढताना भाऊंना पाहिले मी मगाशी . काठीचे फटके ही दिलेत बऱ्याच जणांना . मी आलो पळून भाऊ ही येतील आता .."
 "देवा ....!! मनातल्या मनात ती देवाचा धावा करू लागली . इतक्यात सदाशिव तिला गल्लीच्या कोपऱ्यातून येताना दिसला .
काहीसा हताश ..त्याची चाल ही मंदावली होती . दुर्मुखलेल्या चेहऱ्याने तो तिच्यासमोर उभा राहिला.
"काय हो ...?? किती उशीर ..?? त्याच्या हातातील पिशवी हातात घेत तिने विचारले . काही न बोलता तो आत शिरला.
खुर्चीवर बसताना एक वेदनेची चमक त्याच्या डोळ्यात उतरली आणि थोडा हुंकारही . तिने काळजीने त्याच्याकडे पाहिले .
"आज काही मिळालेच नाही म्हणून थोडा उशीर झाला ग ..."तो हसत म्हणाला .
तिने काही न बोलता पिशवी उलटी केली . आतून ओरियो बिस्किट्सचे पाच पुढे बाहेर पडले . 
  इतका वेळ फुरंगटून बसलेला अंबर धावत येऊन सदाशिवच्या  गळ्यात हात  टाकून गालाची पापी घेत आनंदाने नाचू लागला  .ते पाहून कडक शिस्तीच्या आवरणात गुरफटलेल्या बापमाणसाच्या दुखऱ्या वेदनेवर अलवार फुंकर घातली गेली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

मुंबईकर आणि कोरोना ...३

मुंबईकर आणि कोरोना....३
आयच्या गावात.. ..!!  हा लॉकडाऊन वाढला की ... मला वाटले पंधरा दिवस असेल .मग सुरू होईल नेहमीप्रमाणे रुटीन...
पण कसले काय...
आले त्या दिवशी साहेब टीव्ही वर ...हल्ली ते असे टीव्हीवर येऊन मित्रो बोलले की जीवच दडपतो बघा...
 मागच्या वेळी नेमके आठ वाजता मित्रो म्हणून नोटबंदी केली. 
नाही नाही माझे काहीच प्रॉब्लेम झाले नाहीत .. पावणेतीनशे रुपये होते फक्त खिश्यात..च्यायला..!! पाच सहा हजार खिश्यात ठेवून फिरायची हिंमत आहे का आपली.पाकीट नुसते त्या पाकिटमाराला दाखवायला असते.
असो आता तो विषय नाही .विषय आहे लॉकडाऊनचा . साहेब प्यारे देशवासीयो बोलले आणि समजलो काही खरे नाही .. लॉकडावून वाढला ... बसा अजून काही दिवस घरात.
आपली घरात बसायची तयारी आहे हो ... पण बरेच दिवस ह्याची सोय नाही .. म्हणजे दारू हो.
ती ही बंद...  पुढचे दिवस काढायचे कसे ...?? नाही म्हणजे आपले रेग्युलर बसणे नाही म्हणा .. पण कधी कधी साहेब घेऊन जातात पार्टीला .. तर कधी ते फॉरेनर्स येतात त्यांना घेऊन लंचला जावे लागते .. नाहीतर कधी कधी मित्र प्रेमाने आग्रह करून घेऊन जातात . तेव्हा महिन्यातून तीन चार वेळा होतेच.
छे.. छे.. आपल्याला व्यसन नाहीच.अजून पोरांची लग्न आहेत ..जबाबदाऱ्या आहेत  आपल्याला हे रोज रोज पिणे परवडते का ....?? आणि बसल्यावर ही दोन पेगच्या वर घेत नाही बरे का ..?? 
विचारा विचारा कोणालाही विचारा .. सगळे हेच सांगतील .. आहो घरी येतो तेव्हा आजूबाजूच्याना कळत देखील नाही हे घेऊन आलेत.
सौची कटकट आहेच हो. ती तिचे कर्तव्य करणारच .. कोणाच्या बायकोला आवडेल आपला नवरा दारू पिऊन येतो ते.पण मीही माझे कर्तव्य करतो.कोणालाही नाराज करीत नाही .जो विचारेल त्याच्याबरोबर जातो.तो जे देईल ते पितो.तो जे मागवेल ते खातो .. समोरच्याला नाराज करायचे नाही .आपल्यावर विश्वास आहे म्हणून घेऊन जातात ना .. 
तर आता तो प्रश्न नाही .प्रश्न हा आहे अजून किती दिवस दारूची दुकाने बंद राहतील ..?? राज्याचा किती महसूल बुडतोय याची कल्पना आहे का कोणाला ....??
त्या दिवशी नटराजचा शेट्टी म्हणाला रोजचे लाखाचे नुकसान होतेय त्याचे .... मला महसूलाची काळजी नाही हो.त्या अण्णा परबची आहे . दारू नाही मिळाली की राक्षस बनतो तो . समोर आलेल्या प्रत्येकाला शिव्या देतो . हात पाय थरथरतात त्याचे .पण पियाल्यावर त्याच्यासारखा देव माणूस नाही.काय  त्या वैचारिक चर्चा, साहित्यिक गप्पा .. जगातील कोणताही विषय नाही ज्यावर अण्णा बोलू शकत नाहीत आणि दयाळूपणा तर किती ....??  अर्धा चकाना तर दुसर्यांना वाटण्यात जायचा.खंबा संपला की हा चुपचाप घरात जाऊन ताटात पडेल ते खाऊन सरळ अंथरुणात ... अश्या माणसांसाठी तरी दुकाने उघडा. पन्नास टक्के भांडणे मारामाऱ्या बंद होतील. आपले चॅलेंज आहे .
माझे काय विचारता ....?? नाही हो हवीच असे काही नाही.लॉकडावूनच्या आधी आमच्या मेव्हण्याने अर्धा खंबा  दिला होता मला. तो देतो अधूनमधून  स्वतःचा मोठेपणा दाखवायला.मी पण मग एकदम उपकार केल्यासारखे दाखवतो.
एकदा बायकोला विचारले हा फुल खंबा का देत नाही...??  तर म्हणते दिली तर चार दिवसात संपवाल. म्हणून मीच सांगितलीय अर्धाच दे .
बघा ह्या बायका अशीच माहेरी इज्जत काढतात . पण त्याच मेव्हण्याच्या नोकरीसाठी मी प्रयत्न केले ते सोयिस्कर विसरून गेलीय .
पण काही म्हणा या लॉकडाऊनमुळे ती बाटली पुरवून पुरवून वापरली इतके की शेवटी मुलाने औषधांची मेजर कॅप हातात दिली आणि म्हणाला आता यातून प्या. या पोरांना काय सांगू अरे दारू चवीचवीने प्यायची असते . 
पण आता पुढे काय ..?? बर्याचजणांना खुशाली विचारायला फोन केला असे सांगून दारूचा विषय काढला .पण सगळीकडे माझ्यासारखेच हाल . म्हणजे सध्या निदान महाराष्ट्रात तरी माझ्यासारखे बहुसंख्य लोक आहेत याचा आनंद झाला .
आ हा हा .... शेवटी तो दिवस आलाच.किती दिवस सरकार दुकाने बंद ठेवेल.उद्यापासून उघडणार बघा दुकाने. नाही हो मी कशाला जाऊ  आणायला .. आपल्याला नसली तरी चालते . आणि किती वर्षे तीच तीच दारू पिणार . नाही बुवा मी काही लाईन लावायला जाणार नाही ... चार दिवस नाही मिळाली तर जीव जाणार नाही ..पण हिला सांगतो म्हणजे फोन करून मेव्हण्याला सांगेल . बहिणीचे कर्तव्य पार पाडूक नको...?? 
आज सकाळी लवकरच जाग आली . बायकोने समजले अश्या अर्थाने मान का डोलावली समजली नाही .नाहीतरी तिच्या बऱ्याच गोष्टी समजत नाही मला . अशी मीच समजूत करून घेतो . खाली जरा राउंड मारून येऊ.
गल्लीच्या कोपऱ्यावर आज बरीच गडबड दिसतेय . अरे महाजन काका रांगेत कसे .. काय पोर आहेत बापाला या वयात रांगेत उभे राहायला सांगतात ...?? झाडले पाहिजे एकेकाना .. काका मलाच बोलावतात वाटते .... काय ही दारूसाठी रांग आहे ...?? देवा दुकान तर त्या टोकाला आहे ... चारशे माणसे तरी असतील रांगेत .... संध्याकाळ होईल बाटली हातात पडेल तेव्हा .. बघू अजून कुठे काय चालू आहे ...
अबब... सगळीकडे तीच परिस्थिती . नुसत्या रांगाच रांगा लागल्यात प्रत्येक दुकानात .... पण लोक बघा किती शिस्तबद्ध...  योग्य अंतर राखून..,कुठे गडबड गोंधळ नाही .एका हातात पैसे तयार ,ब्रँड फिक्स ,दोन मिनिटात काउंटरवरून दूर . आजूबाजूच्यांची चौकशी , एकमेकांना सहकार्य .. शिका काहीतरी शिका .. या दुकानावर तर महिलांसाठी वेगळी रांग, वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य .... वा  हात जोडले पाहिजे .
इथे जरा रांग कमी दिसतेय .राहूया थोडा वेळ उभे . आपला तर अर्धा खंबा कोटा.पण नको एक बाटली घेऊच .लॉक डाऊन वाढला तर ...?? असलेली बरी.. रांग तशी पटापट पुढे जातेय .. येईल नंबर पंधरा मिनिटात ...
 आयला...!! आता हे पोलीस कशाला आले.. ??
काय..??  दुकान बंद करतायत ..नको हो दहा मिनिटे थांबा ..मी घेतो मग काय हवे ते करा . बघा बघा पब्लिक किती चिडलय ..
अरे.. आज किती महसूल वाढेल याचा विचार करा ..  लोक ऐकत नाहीत .. कशी ऐकणार .. कधीपासून रांगेत उभे आहोत आम्ही . नाही हटणार.. अहो साहेब मारताय काय आम्ही सभ्य लोक आहोत तोंडाने बोला .दादागिरी सहन करणार नाही .फुकट पीत नाही विकत घेऊन पितोय . मारू नका मारू नका.
देवा...ह्यांचा दंडुका तर जोरात बसतोय .... आई ग ढुंगण सुजणार बहुतेक . किती जोरात बसला फटका ... पळूया घरी नाहीतर अजून फटाके बसतील . उद्या मेव्हण्याला सांगतो आण बाबा अर्धी बाटली .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ...८

लॉकडाऊन...८
"काही आणायचे आहे का मॅडम ...?? मी खाली उतरतोय ...." त्याने कापडी पिशवी हातात घेत कोपऱ्यातील चपला पायात घालत विचारले.
" आता कशाला जाताय खाली ..?? माहितीय ना काय चालू आहे ...?? उगाच रोगाला आमंत्रण ..".तिने त्रासून म्हटले.
 "मग काय करू मॅडम....?? काल पासून दूध नाही. साखर तर कमी लागते आपल्याला त्यामुळे त्याचे टेन्शन नाही . डायबेटीस असल्याचा काय फायदा असतो हे या रोगाने जाणवून दिले आपल्याला ..."तो हसत म्हणाला.
"होईल हो सर्व काही व्यवस्थित....आजचा दिवस दुधाची पावडर वापरू ... उद्या कोरा चहा पिऊ .. तोपर्यंत काहीतरी होईल ...." ती म्हणाली .
"हो ना...जुने दिवस आठवले बघ .. तेव्हा दुधाच्या बाटल्या मिळायच्या केंद्रावर . आपली तर ऐपत नव्हती . मग जाधवांकडून एक रुपयांचे दूध आणून चहा करायचो . आणि एक रुपयाचा बिस्कीटचा पुडा आणून पोराला द्यायचो.दूध त्यांच्या चहातच संपून जायचे आणि आपण कोरी चहा प्यायचो.... "तो जुन्या आठवणीत रमला.
"आणि हो .... रात्री अमितचा व्हिडिओ कॉल येईल त्याला हे सांगत बसू नका .. आणि ती दाढी करून घ्या हो आधी .. किती गबाळे दिसतायत तुम्ही .. काल बोललाच तो .. पप्पा कसे रहातायत...?? ती थ्री फोर्थ कशी  आणि टी शर्ट ही जुना ...." ती ओरडली.
"ओ बाई ...माहितीय ना.. इथले सलून बंद आहेत ते . मी घरी दाढी करत नाही हे चांगले माहीत आहे त्याला. म्हणून तो किटही पाठवून देत नाही . त्या नेहमीच्या सलूनवाल्याच्या अकाउंटवर पैसे पाठवितो आठवणीने .  आणि कपड्याचे काय ग ....??  हल्ली कुठे  बाहेर जातो आपण...??  आणि तुला तर कपडे धुवायला जमत ही नाही ..."त्याच्या बोलण्यात वेदना होती .
"सगळं मान्य आहे... पण तिकडे त्याला का त्रास द्यायचा .. किती करतो तो आपल्यासाठी . दर महिना रेशन... गरजेच्या वस्तू दारात येतात . कामवाल्या बाईला वेळच्या वेळी पगार . डॉक्टरची बिल आपल्या गोळ्या... सर्व काही व्यवस्थिती मॅनेज करतो ते ही परदेशात राहून....आहो ... त्या गोळ्यांवरून आठवण झाली .. या दोन दिवसात तुमच्या गोळ्या संपतील . आठवणीने घेऊन या ......" ती कपाळावर  हात मारून म्हणाली.
"आणि तुझ्यातर अजून महिनाभर चालणारच आहेत  नाही का ...?? कालच रिकामी पाकिटे पाहिली मी  .. आणि म्हणूनच खाली चाललोय आणायला ... त्या मेडिकल वाल्याकडे काही खायला असेल तर तेही घेऊन येतो ...." तो डोळे मिचवकात म्हणाला.
"आहो ....आपला अमित ठीक असेल ना ...?? आपल्या इथे इतकी गडबड चालू आहे ,तिथे तर बघायलाच नको . रोज शंभरावर माणसे मरतायत .ते सर्व रोज बोलतात आपल्याशी पण चेहऱ्यावरची काळजी काही लपत नाही त्यांच्या ...." ती अश्रू टिपत म्हणाली .
"सरकार.... त्याला स्वतःची काळजी नाहीय तर आपली काळजी आहे. इथे सर्व लॉकडाऊन आहे. कोणी कोणाकडे जात नाही.आपली कामवाली येत नाही . दूधवाला येत नाही. हे सर्व माहीत आहे त्याला .. आणि तिथे राहून खिश्यात बक्कळ पैसे असूनही काहीही करू शकत नाही याचे दुःख आहे त्याला .....म्हणून तुम्हाला सांगतो हसत खेळत बोला त्याच्याबरोबर .." तो आता गंभीर झाला . 
"ठीक आहे... मग आज मस्त हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जाऊ त्याला .. मी तुमच्यासाठी आज छान ड्रेस काढून ठेवते . पण तुम्ही आज खाली जाऊ नका प्लिज .. "ती अगदी गोड आवाजात म्हणाली.
"हाय.. हाय ..!! इसी अदा पर तो हम फिदा हुये थे .. लग्नाआधी असाच एकदा  बिल्डिंगखाली आलो होतो तुला भेटायला.. तेव्हाही तू असेच म्हटले होतेस आणि तेव्हाही मी थांबलो थोडा वेळ...परिणाम कांय झाला माहितीय ना ....?? तुझ्या बापाने कानाखाली काढलेला जाळ अजून चटका देतोय ...." तो गालावर हात ठेवून नाटकी आवाजात म्हणाला .
"इतके ही नको हो कुजकट बोलायला... तरीही लग्न केलेच ना शेवटी तुमच्याशीच .... ते राहू दे आज मी तुमची दाढी करते.. माझ्याकडे हेयर रिमूविंग क्रिम आहे . त्यानेच करू ... .."ती ताठ मान करून म्हणाली .
काय क्रिम..?? हे कधी आणलेस तू ..?? आणि तुझे वय आहे का हे ...."?? तो थोडा चिडून म्हणाला .
"गप बसा हो .. मागे सुनबाई आली होती तेव्हा तिचा मेकअप बॉक्स इथेच ठेवून गेली माझ्यासाठी .आई वापरा तुम्ही छान दिसाल अशी म्हणाली.मग मीही ठेवून घेतला . त्यात हे होते . आज तेच वापरू मस्त दाढी करूया तुमची ... .." ती टाळी वाजवत म्हणाली.
मान डोलवत  तो हताशपणे तिच्यासमोर जाऊन बसला . 
संध्याकाळी दोघेही तयार होऊन त्याच्या विडिओ कॉलची वाट पाहत बसले . त्याचा कॉल आला आणि आईवडिलांना इतके टापटीप बसलेले पाहून तो खुश झाला.
त्याने हळूच मुलाला थांब अशी खूण केली .मग आत जाऊन ओवाळणीचे तबक आणले आणि तिला ओवाळले .मग ती उठली आणि त्याला ओवाळले . मुलगा हे सारे स्क्रिन वर पाहत होता . त्याने आश्चर्याने विचारले .." हे काय .."?? 
"अरे ..आज आमच्या लग्नाचा वाढदिवस नाही का ...? तो ही  एकोणपन्नासावा .. नेहमी शेजारी आणि नातेवाईक येतात शुभेच्छा द्यायला पण या लॉकडाऊन मुळे कोणाच्या लक्षात आलेले दिसत नाही . नेहमीचे फोन आठवणीने आले तेव्हढेच . पण हा दिवस साजरा करायला हवाच .  आज आम्हीच एकमेकांना ओवाळणार .. एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार ...." तो हसत हसत मुलाला म्हणाला . तिने ही अलगद डोळे पुसले.
"माफ  करा बाबा .. या परिस्थितीमुळे मला तुमच्यासाठी काहीच करता येत नाही . पण एक वचन नक्की देतो .तुमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आपण झोकात साजरा करू . त्यावेळी मी विडिओ कॉल करणार नाही तर प्रत्यक्ष हजर असेन . कदाचित पुढचे सर्वांचे वाढदिवस आपण एकत्रच साजरे करू ..
© श्री. किरण कृष्णा बोरकर 
8286837133

Tuesday, July 7, 2020

मुंबईकर आणि कोरोना ...२

मुंबईकर आणि कोरोना ....२
सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली. पहिल्या अलार्मलाच बायकोला उठवले.शिस्त म्हणजे शिस्त .. मोडायची नाही.
"ओ झोपा गप .... रजेवर आहात तुम्ही.." ती कूस बदलून पुटपुटली.
"च्यायला... हो..आजपासुन लॉकडाऊन नाही का ....?? मोबाईल बोंबलला की उठायची सवय काय जात नाही .... 
"जाऊदे ..आता उठलो आहेच तर आज चहा करू. किती वर्षे झाली स्वतः चहा करून ....?? हॉस्टेलमध्ये करायचो त्यानंतर नाहीच.आमची ही बघा  किती गाढ झोपलीय .अजूनही सुंदर दिसते ..काहीतरी गोड स्वप्न बघत असावी ..झोपेतही किती गोड हसतेय. .. 
"साला.. या नोकरीमुळे बायकोला गाढ झोपलेले कधी पाहिलेच नाही.माझ्या आधी उठून चहा ठेवणार मग गिझर चालू करून गरम पाणी काढणार.आम्ही आपले आयतेच बाथरूनमध्ये घुसून फक्त आंघोळ करणार. बाहेर आल्यावर आयता गरम चहा पुढ्यात. मग बाहेर पडेपर्यंत ती काहीतरी करत राहणार.."
 "बरे सुट्टीच्या दिवशी झोप म्हणावे..तर आम्हीच आठ वाजेपर्यंत ढारढुर झोपून राहणार आणि ही उठून कामाला लागलेली . च्यायला ह्या 8.40च्या लोकलने पक्की वाट लावून टाकलीय आयुष्याची .. 
"ते जाताना हसऱ्या चेहऱ्याने ओठाचा चंबू करत बाय बाय करायचे आहो काहीतरी आज विसरलात तुम्ही .. असे लाजत विचारायचे.. ते फक्त सिनेमातच पहायचे आम्ही. आज सौला सरप्राईजच देतो  बघा .."
"पण हे काय साखर ..चहापत्ती कुठेय ...?? या बायका ना.... कुठे काय ठेवतील ते त्यांचे त्यांनाच माहीत. मिळाली साखर आणि चहा पण .... चला फक्कड चहा करू ..... वा..!! वा....!! . किती मस्त घमघमाट सुटलाय चहाचा ... जुने दिवस आठवले हो ... वा चहापण फक्कड झालाय बायको पीयेल तर खुश होईल..."
"अरे वा... उठलीच की ती ... डोळे उघडले तर समोर मीच .. काय स्माईल आहे ... अरे यार काय काय मिस करतोय मी ...एकदम भारी .. आणि समोर चहाचा कप पाहून अय्या ही म्हणाली .. लाव लाव तोंडाला कप लाव लवकर आणि परत एक स्माईल दे .... "
"अरेच्चा...तिचे तोंड वाकडे का झाले ..."
" काय हो किती गोड....??  तुम्हाला माहितीय ना मला डायबेटीस आहे .... "
"अरे देवा ...ह्या प्रेमाच्या नादात तिला डायबेटीस आहे हे विसरूनच गेलो मी.बोंबला.....!! आता दिवसभर बोलणी ऐकावी लागणार हिची...."
"आता काय करावे बरे .. पेपर तर येणार नाही .. हिला कामात मदत करावी का ... ??? की टीव्ही लावून बातम्या पहाव्या... ..
"ओ.... गप्प एका जागेवर बसा हो.. मध्येमध्ये लुडबुड करू नका ...  उगाच अजून गोंधळ घालाल.."
"बापरे...बायको फारच चिडली हो ... बरोबर आहे तिचेही .. आपल्या कामात कोण मध्ये आले तर चिडतोच ना आपण .. जाऊ दे टीव्ही लावून बातम्या ऐकू ...
"ओ पप्पा... झोपू द्या ना थोडा वेळ .. कशाला तो टीव्ही लावलाय ...?? आवाज किती ....??
 बापरे आता ही पोरपण आपल्यावर रुबाब दाखवणार ... चला गॅलरीत तरी जाऊन बसू ....
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, July 4, 2020

लॉकडाऊन ...७

लॉकडाऊन... ..७
ऑफिसच्या कामानिमित्त तो परदेशात गेला होता.तसे त्याच्यासाठी हे नवीन नव्हते.महिन्या दोन महिन्यातून तो असाच कुठेतरी टूरवर जायचा.घरच्यांनाही त्याची सवय झाली होती.
यावेळी थोडे गणित बिघडले.अचानक भारतात लॉकडाऊन सुरू झाले आणि परदेशी विमानप्रवासाला बंदी आणली.
 तो तिथेच अडकला.काम तर संपले होते. इथेही लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे हॉटेलच्या बाहेर पडायला बंदी होती.
नाईलाजाने त्याचे मोबाईलवर खेळ सुरू झाले . अचानक त्याला फेसबुकची आठवण झाली या कामाच्या गडबडीत बरेच महिने त्याने फेसबुक उघडले नव्हते.आज वेळ आहे तर सर्फिंग करूया....मनात येताच त्याने फेसबुक उघडले .बापरे ...!! इतक्या नोटिफिकेशन ...??
काही महिन्यांपूर्वी त्याने एक ड्रॉईग दोन तीन ग्रुपवर पोस्ट केले होते. त्याच्या हाताला वळण होते . छान चित्र काढायचा तो .त्याच चित्रावर बऱ्याच कॉमेंट दिसल्या त्याला.आता कॉमेंट आल्या म्हणजे रिप्लाय देणे आलेच..हळूहळू तो प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय देऊ लागला. अचानक एका कॉमेंटवर तो थबकला . त्याच्या चित्रावर तिने एक छान चारोळी केली होती.जणू त्या चित्राचा अर्थ तिलाच कळला होता . त्याने तिला रिप्लाय केला ताबडतोब तिचा पुन्हा रिप्लाय आला.आता मात्र त्याला  राहवेना . त्याने तिचे प्रोफाइल चेक केले . प्रोफाइल फोटोत तर ती साधी ,सुंदर दिसत होती . योगायोगाने ती त्याच्याच शहरात राहत होती.
"अरे वा ....!! असे बोलून त्याने फेसबुक बंद केले . सहज चाळा म्हणून त्याने पेन्सिल हातात घेतली आणि बघता बघता समोरच्या पानावर सुंदर चित्र निर्माण झाले .
त्याने ते फेसबुकवर अपलोड केले . काही वेळाने मोबाईलवर नोटिफिकेशन आले . पुन्हा त्या चित्रावर तिची नवीन चारोळी होती. न राहवून त्याने तिला मेसेंजर केला . वाट पाहत असल्याप्रमाणे तिचे ताबडतोब उत्तर आले . पहिल्यांदा एकमेकांची स्तुती झाली आणि हळूहळू काही गोष्टी पर्सनलवर आल्या . तो आपल्याच शहरात राहतो इतकेच नव्हे तर आपल्या विभागात राहतो ते ऐकून ती खुश झाली . दुसऱ्या चॅटिंगमध्येच व्हाट्स अप नंबर शेयर झाले .या लॉकडाऊनमुळे एक चांगली मैत्रीण मिळाली याचा आनंद झाला त्याला .
ती एका सुखवस्तू फॅमिलीतील .घरात फक्त तीनच माणसे . त्यात मुलगा शिकायला अमेरिकेत गेला होता . नवरा बिझनेसनिमित्त राज्याबाहेर गेला होता .
दोन दिवसात परत येणार होता. पण अचानक लॉकडाऊन सुरू झाले. देशांतर्गत सर्वच प्रवास बंद झाले आणि  तिकडेच अडकला . मोठया घरात ती एकटीच . फारसे मित्र मैत्रिणी नव्हतेच .ती चारोळ्या करायची कधी कधी.... . पण वेळेअभावी तेही हल्ली जमत नव्हते.
 एकदा एका ग्रुपवर कोणीतरी छान चित्र पोस्ट केले होते . ती व्यक्ती कलाकार दिसत होती . न राहवून तिने चारोळी केली . पण बरेच दिवस त्याचा रिप्लाय आला नाही.
सकाळी सगळे आवरून तिने सहज फेसबुक उघडले तेव्हा नोटिफिकेशनमध्ये तिला त्याचा रिप्लाय दिसला . तिने परत त्यावर कॉमेंट केली . नंतर काही घडले नाहीच . दुपारी जेवून पुन्हा फेसबुक उघडले तेव्हा  त्याची नवीन पोस्ट अपलोड झाली होती .
किती छान चित्र काढतो हा ..?? त्यावर एक पटकन चारोळी केली . पुन्हा त्याची कॉमेंट आली . यावेळी तिने त्याचे प्रोफाइल चेक केले . साधारण तिच्याच वयाचा कदाचित दोन वर्षांनी लहान ,हसतमुख तरुणांचा फोटो होता . योगायोगाने तिच्याच शहरातील होता.
 इतक्यात मेसेंजर वर त्याचाच मेसेज आला . तिने रिप्लाय दिला . बोलण्यात कळले तो तिच्याच विभागात राहत होता . मग बोलता बोलता व्हाट्स अप नो ची देवाण घेवाण झाली . चला या लॉकडाऊन मुळे एक चांगला कलाकार आपला मित्र झाला म्हणून ती आनंदून गेली.
आज लॉकडाऊनला साधारण दोन महिने झाले . दोघेही आता बरेच मोकळेपणानं चॅटिंग करत होते . आहोजावो वरून कधी अरेतुरेवर आले ते कळलेच नाही . कधीतरी विडिओ चाट ही व्हायचे . तरी कधी चित्र चारोळ्या ही व्हायच्या . तसे दोघेही आपापल्या फॅमिलीसोबत कनेक्ट ही होतेच . मधेच तो काही प्रमाणात फ्लर्ट ही करायचा . तीही थोडी धीट होऊज प्रत्युत्तर करायला शिकली होती. संसारातील अडीअडचणी शेयर होत होतेच . आता कधी एकदा लॉकडाऊन संपतोय आणि कॉफी प्यायला भेटतोय असे झाले होते त्यांना .
आजच सरकारने परदेशी नागरिकांना भारतात आणण्याची घोषणा केली होती. तिसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने तो भारतात परतला . योग्य त्या तपासण्या औषधे घेऊन तो घरी पोचला . कुटुंबासोबत काय बोलू असे झाले होते . दोन महिन्याची कसर भरून काढायची  होती.
 दुसऱ्या दिवशी तिचा मेसेज आला . इथेही काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल केले होते . तिने त्याला घरीच कॉफी प्यायला बोलावले . त्यालाही ते बरेच झाले . उगाच या वातावरणात बाहेर भेटण्यापेक्षा घरीच भेटलेले बरे असा विचार करून तो तिच्या घरी पोचला.
दार उघडताच समोर ती उभी होती. भडक मेकअप.  . विडिओवर दिसत होती त्याहून ती आकर्षक हॉट दिसत होती. त्यातही तो स्लीव्हलेस टॉप आणि टाईट लेगिंग तिच्या सौंदर्यात भर टाकत होता. तो आत येताच तिने प्रेमाने त्याला हग केले . पण तिच्या मिठीचा दाब जाणवून तो हडबडला. हळू हळू त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. पण कुठेतरी त्याला काही खटकत होते . तिची देहबोली ...बोलण्याची ढब.. ती नव्हती जी फोनवर होती. त्याने जी कवयित्री ..साहित्यिक चर्चा ..करणारी मैत्रीण पाहिली होती ती ही नव्हतीच आणि कॉफी की ड्रिंक....??  असे तिने विचारताच तो स्तब्ध झाला. हळू हळू तिच्या बोलण्याचा रोख त्याच्या शारीरिक संबंधावर घसरला . बोलता बोलता  ती कधी जवळ आली ते त्याच्या लक्षात आले नाही . आता तर ती खूपच बोल्ड बोलू लागली . सूचक हस्तस्पर्श होऊ लागले .तो भांबावला...
अचानक तिने त्याला घट्ट मिठी मारली काही कळायच्या आत तिचे ओठ त्याच्या ओठात गुंफले गेले .
ओह गॉड..... हे त्याला अपेक्षित नव्हते . तो तिला एक चांगली मैत्रीण समजत होता . हळुवार मनाची एक कवियत्री . वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणारी. सुशील त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे समस्येचे तिच्याकडे उत्तर असायचे . लॉकडावूनच्या काळात आपल्याला आधार देणारी एका जवळच्या मैत्रिणीप्रमाणे धीर देणारी हीच का ती .....??. प्रत्येक पुरुष स्त्रीकडे केवळ शारीरिक  सुखाचीच अपेक्षा ठेवतो का ...??  एका मित्राप्रमाणे ती त्याची मैत्रीण होऊ शकत नाही का ....?? हिने ही आपल्याला त्या दृष्टीनेच पाहिले का ...?? त्याला  एक अनपेक्षित धक्का बसला.आताचे तिचे हे रूप  पाहून त्याचा भ्रमनिरास झाला.
 तिला मिठीतुन वेगळे करून तो उठला आणि दुखऱ्या मनाने बाहेर पडला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

मुंबईकर आणि कोरोना ..१

मुंबईकर आणि कोरोना....१
आयच्या xx या चीनच्या ... वाट लावून टाकलीय सगळ्यांची .घरी बसवून ठेवलंय सगळ्या देशाला .तरी नशीब ते फॉरेनर्स दिवाळीच्या आधीच कंपनीत येऊन गेले .नाहीतर आता माझ्या हातावर  होम कॉरेंटईनचा शिक्का बसला असता आणि आख्खी बिल्डिंग माझ्यानावाने बोंब मारीत रिकामी झाली असती.त्यांची सेवा करायला ही मीच भेटलो म्हणा.....का..?? तर नवीन मशिनरी माझ्या डिपार्टमेंट मध्ये लावणार होतो ना .... ?? तुम्हाला सांगतो.. अजूनही आपण या परदेशी लोकांना खूपच डोक्यावर बसवून ठेवले आहे. त्या दिवशी त्यांच्या सिगारेट संपल्या म्हणून मला आणायला सांगितल्या त्यांनी .... मला .. या कोकणी माणसाला ....??  अरे तुमची गुलामी करण्यासाठी हा माणूस कोकणातून इथे आला नाही .चांगली दीड एकर शेती आहे माझी . नोकरीवर लाथ मारून गावी जाईन केव्हाही ...शेवटी किसन पाटील कडून विड्याचे बंडल घेऊन त्यांना दिले आणि सांगितले try new brand .. दोन दम मारताच खुश झाले . जाईपर्यंत विड्याच पीत होते . किसनचे पण भले झाले ..
तर मी काय बोलत होतो त्या चिन्यांनी कोरोना विषाणू आणला आणि आख्ख्या जगाची वाट लावली .जगाची जाऊ द्या हो पण आमच्या मुंबईची वाट लागली त्याचे काय ....?? लोकल बंद ...... अरे स्वप्नातही विचार करू शकत नाही मी ... हा आता कधी कधी 8.40 रद्द होते पण 8.44 असते ना .. तितके ऍडजस्ट करतो हो आम्ही .पण संपूर्ण लोकल बंद .... तेही 21 दिवस ...
विमानसेवाही बंद केली म्हणता... त्याने मला काय फरक पडतोय हो.. मी काय रोज रोज  विमानाने जातो का ....?? मी चाकरमानी  लोकलने प्रवास करणारा आणि ती ही चौथी सीट ... तुम्हाला सांगतो नऊ ची ड्युटी आहे माझी पण पंच 9.12 ते 9.13 च असतो . साहेब टपून बसलेत कधी ह्याचा 9.16 ला पंच होईल . पण आमच्या लोकलने कधीच मला दगा दिला नाही .
आता लोकल बंद म्हणजे देशपांडेकडून फुकट वाचायला मिळणारा सामना बंद.. सावंतच्या डब्यातील भजी पराठे बंद ... तर स्वामींच्या राजकारणावरील चर्चा ही बंद .ते सोडा ... स्टेशन मधून बाहेर पडताना समोरून हसत येणारी गोखले बाई ही दिसायची बंद ....देवा  कसली ही शिक्षा देतोय आम्हाला...
आता हे वीस दिवस घरी राहून करू काय .....?? आधीच सुट्टी घ्यायची सवय नाही . घराबाहेर थोडे जास्त फ्री असतो हो आपण . आणि काही करायचे असेल तर ऑफिसच्या नावाखाली खपून जाते .म्हणजे आता त्या दिवशीचेच बघा ना ... प्रल्हाद मोरेने आजोबा झाल्याची पार्टी दिली .एक दिवस आणि रात्र अलिबागला रिसॉर्ट बुक केले. घरी सांगितले असते तर किती हंगामा झाला असता... आहो युद्धच ... मग काय इन्स्पेशनचे  कारण सांगून पार्टीला गेलो .घरची काही कामे ही ऑन ड्युटी करता येतात .मागच्या महिन्यात समीर दादांच्या पोराचे लग्न ऑन ड्युटीच अटेंड केले होते . बँकेची कामे ही होतात . 
आजच पहिला दिवस आहे लॉकडाउनचा .. कालच पोरांना दम दिलाय बाहेर गेलात तर तंगड्या तोडून ठेवीन . पण त्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने का पाहिले तेच समजत नाही . रात्री झोपताना सौ. म्हणाली ती घरातच असतात मोबाईलवर तुम्हीच उकिरडे फुंकत असतात. च्यायला हे असं होय ...बघतोच उद्या..
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ...६

लॉकडाऊन ....६
पंतप्रधानांनी लॉकडाऊन जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशीपासूनच तो घरी बसला.
त्याची कामावरची वेळ म्हणजे सकाळी साडेसहाला बाहेर पडायचे  आणि रात्री जेवायलाच घरात शिरायचे. घरी काय चालू त्याच्याकडे लक्षच द्यायचे नाही.काम नसेल तेव्हा मित्रांबरोबर बसणे आलेच.मग रात्री जेवून बेडवर पडले की दिवसभर काय घडले याचा वृत्तांत सौ.कडून ऐकत झोपून जायचे.
 पाहिले काही दिवस छान गेले.सौ.ला नवीन नवीन पदार्थ बनवायची ऑर्डर सोडायची.मुलाच्या हातातून रिमोट हिसकावून घेऊन आवडते चॅनेल लावायचे. आईला सतत काहीतरी सूचना द्यायच्या.
काही दिवस सर्वांनी समजून घेतले पण हळूहळू सर्वांना त्रास होऊ लागला . त्याच्या घरात असल्यामुळे इतर सर्वांचा दिनक्रम बिघडला. 
हळूहळू कुरबुरी सुरू झाल्या.सासूसून किती काळ शांत राहणार...??
आता सकाळीच पहा ना... दोन कळश्या भरल्या नाही म्हणून सुरवात झाली आणि त्याचे पर्यवसान वादात झाले.झोपमोड झाली म्हणून हा मध्ये पडला.किती फालतू गोष्टींवरून वाद घालतेस म्हणत सौच्या अंगावर धावून गेला .सौ.ने तो राग मुलावर काढला . अंगावरचे पांघरूण जोरात खेचून तिने मुलाला उठविले.अचानक काय झाले हे न समजून तो डोळे चोळत उठला.मग दिवसभर घरात तणावग्रस्त स्थिती होती . हळूहळू हे रोजच होऊ लागले.घरात कोणाचेही वाद सुरू झाले की हा मध्ये पडायचा.मग त्याचा राग कोणावरही निघायचा .  
"शी. ..!!  किती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे करतात ही ..." रिमोट मुलाच्या हातातून घेत तो पुटपुटला.
"आई सर्व आटपून बेकिंग क्लासला जाते . तिचा तिथे छान ग्रुप झाला आहे .रोज काहीतरी नवीन डिश बनवून आणते.आजी दुपारी सोसायटीच्या नानानानी पार्कमध्ये जाते . तिथे ते गाणी म्हणतात. हसतात . चहापाणी करून संध्याकाळी परत येते. माझे कॉलेज.. नंतर क्लास....  दिवस कसा जातो तेच कळत नाही .पण ह्या लॉकडाऊन मुळे सर्वच ठप्प झाले आहे .." मुलाने शांतपणे सांगितले.त्याने फक्त मान डोलावली . 
संध्याकाळी सौ.ने  त्याच्या हातात पिशवी आणि सामानाची लिस्ट दिली ."मिळेल ते घेऊन या .. "असे बोलून पुन्हा किचनमध्ये गायब झाली .'ही दिवसभर किचनमध्ये काय करते ..."?? बरेच दिवस त्याला प्रश्न पडला होता.
रस्त्यावर तर बऱ्यापैकी गर्दी होती .आयला हेच का लॉकडाऊन ...?? लोकांना कितीही समजावले तरी बाहेर पडणारच. लिस्टमधील मिळतील त्या वस्तू त्याने पटापट घेतल्या . किमती पाहून दोघीही चिडणारा याची खात्री होतीच त्याला पण इलाज नव्हताच.
कॉम्प्लेक्सच्या कोपऱ्यावर ती उभी होती.  थोडा कळकट फ्रॉक ..केसांच्या दोन वेण्या कशातरी बांधल्या होत्या . बारा वर्षापेक्षा जास्त वय वाटत नव्हते . हातात मोगऱ्याचे दहा बारा गजरे होते . पण विकत घेण्यासाठी कोणाला फोर्स करीत नव्हती. फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांना दाखवीत होती. काहीजण हसून तर काही या परिस्थिती कोण गजरे घेणार ..?? असा भाव चेहऱ्यावर आणून पुढे  जात होते.
तिने त्याच्यापुढे ही गजरे धरले . "घेणार ..."?? तिने हसून विचारले .
"अग पोरी... या परिस्थितीत कोण घेईल गजरे...?? सगळ्या स्त्रिया घरात बसून आहेत..."तोही हसत म्हणाला.
" सकाळपासून तीन चारच विकले गेले . अजून चार पाच गेले तर जेवणाची सोय होईल आमची . आमचा हाच धंदा आहे .." तिने निरागसपणे सांगितले.
तो आतून कुठेतरी हलला . हे घेऊन घरी गेलो की आणखी चार शब्द ऐकायला लागतील याची खात्री होती त्याला . पण त्या छोटीचा निरागस चेहरा समोर दिसत होता .शेवटी  त्याने तिच्याकडून चार गजरे घेतलेच . तिने सांगितलेली किंमत देऊन तो सोसायटीत शिरला.
घरी वातावरण शांतच होते. हातातली पिशवी ओट्यावर ठेवत त्याने सौ.कडे नजर टाकली. ती शांतपणे कणिक मळत होती. किती वर्षे तिची थट्टा केली नाही आपण ...?? त्याने स्वतःला प्रश्न केला. 
"बॉबी मधली डिंपल आठवली .. "तो हळूच तिच्या कानाशी कुजबुजला.तिने चमकून त्याच्याकडे पाहिले तिच्या नजरेत राग होता पण त्याच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून ती थंड झाली आणि एक हलके हसू चेहऱ्यावर उमटले.
"येताना काही घेऊन आला नाहीत ना .."?? तिने अंगठा  तोंडाशी नेऊन विचारले.
त्याने खिशातून गजऱ्याची पुडी काढून तिच्या हातात दिली.
"हे काय आता ...?? गरज होती तेव्हा कधी आणले नाही.सध्या खायला पुरेसे सामान नाही मिळत आणि तुम्हाला हे बरे सुचते.घर कसे चालवते माझे मला माहित ..." तिच्या तोंडाचा पट्टा चालू झाला आणि तो हिरमुसला होऊन बाहेर आला.
रात्रीचे जेवण शांततेत झाले. तो ताबडतोब बेडरूममध्ये जाऊन झोपला .सौ रात्री कधी येऊन बाजूला झोपली ते कळलेच नाही.
सकाळी घरातील गडबडीने त्याचे डोळे उघडले . बाहेर आई ..मुलगा..सौ यांची थट्टा मस्करी चालू होती. सगळे हसत होते. मुलगा काहीतरी सौ ला सांगत होता .न रहावून तो हॉलमध्ये आला आणि डोळे विस्फारून समोर पाहू लागला.
 समोरच सौ. नवीन साडी ,छानसा हलका मेकअप करून खिडकीजवळ उभी होती . मुलगा हातात मोबाईल घेऊन सूचना देत  वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत होता . आई  सोफ्यावर बसून कौतुकाने तिच्याकडे पाहत होती. प्रत्येक पोजमध्ये  केसात माळलेले गजरे समोर येतील याची काळजी ती घेत होती .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन नंतर ...१

लॉकडाऊन नंतर ..१
स्थळ.... मुंबईतील एक मध्यमवर्गीय वस्ती 
शंकर सुर्वे नेहमीप्रमाणे उशिराच घरी आला . लॉकडाऊन संपल्यावर त्याचे घरी उशिरा येणे चालू झाले होते.
अडीज महिने लॉकडावूनचे दिवस त्याच्या दृष्टीने भयानक होते . बायकोने सर्वांना धीर देऊन मिळेल त्या साधनात घर चालविले होते.
 आता त्याची पाळी होती . आज तो घरात शिरला तेव्हा मुलं जागीच होती . काहीतरी ऐकावे लागणार हे तो समजून गेला.
"ओ बाबा .. ह्या वर्षी गणपतीत जाऊचाना  गावात ...?? मोठ्याने विचारले.
"दरवर्षी जाताव.. मग नवीन काय ..?? छोटी म्हणाली."बाबांनी तिकीट काढलान की नाय ..?? नायतर दरवर्षी गर्दीत घुसून जाताव. माझे पाय आणि कंबर दोन दिवस दुकतत.
".या वर्षी गणपतीत गावी जाऊचा नाय.आपलो गणपती हयच..." शंकर शांतपणे म्हणाला.
 तसे बायको आणि पोराने चमकून त्याच्याकडे पाहिले.
 त्याने मुलीला जवळ घेतले.
" अडीज महिने घरात बसून होतो.कंपनी बंद . तरीही कंपनीने पगार दिला.संकटकाळी आपल्या मागे उभी राहिली . आज कंपनीला नुकसानीतुन बाहेर काढायचे आहे . त्यासाठी आम्ही चार तास जास्त काम करतोय तो ही विना मोबदला . आम्ही फक्त कष्ट करू शकतो आणि तेच करतोय कंपनीसाठी . अश्यावेळी पुन्हा सुट्टी घेऊन गावी जाणे मनाला पटत नाही . इतकी वर्षे गणपतीला जातोय . एक वर्ष नाही गेलो तर देव रागावणार नाही .  पुढचे वर्ष आहेच की . पण आज जे आपल्याला पोळी भाजी देतात त्यांना आमची गरज आहे . माझे ठीक आहे पण कंपनीत असे कितीतरी कामगार रोजंदारीवर काम करतात . त्यांना तर पैसे मिळालेच नाही . म्हणून आम्ही काही मित्रांनी बाहेरची कामे घेतली आहेत .  सुट्टीच्या दिवशी बाहेर मिळतील ती कामे करून येणारा पैसा त्यांना देणार आहोत . शेवटी गेली अनेक वर्षे आमच्या सोबत काम करतात" शंकर भावुक होऊन म्हणाला.
"ठीक आहे बाबा ... या वर्षी आम्हाला गणपती ..दिवाळीत कपडे नको . तेच पैसे त्यांच्यासाठी वापरा..".मुलगा म्हणाला.
"उद्या सकाळीच सुदामभाऊना फोन लावून सांगा यावर्षी आमाक जमुचा नाय. त्यापेक्षा चार गोणी तांदूळ जास्त पाठवा .. हयसर गरिबांक वाटू..आपल्या गरजेक जे उपयोगी पडले त्यांका देऊन नको काय ..", बायको म्हणाली.
दुसऱ्या दिवशी शंकर कामावर हजर झाला . त्याला पाहतच मी म्हणालो.." शंकर शेठ.. गणपतीला जाणार ना यावर्षी . सुट्टी टाका  पटकन .."
"साहेब यावर्षी सुट्टी नको .त्यापेक्षा आपला कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या अंबादासला सुट्टी द्या .  तो गणपती छान  रंगवतो . त्याचे काम मी करेन . बिचाऱ्याचे जास्त पैसे सुटतील...".शंकर हात जोडून म्हणाला .
मी हसत हसत त्याच्या खांद्यावर थाप मारली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ...५अ

लॉकडाऊन ...५ अ
रात्री आठची वेळ. त्या वस्तीत कमालीची शांतता होती..तशीही ती वस्ती शहरात असूनही  इतरांपासून अलगच होती.
 सामान्य माणूस त्या वस्तीपासून दूरच राहायचा . वस्तीतील माणसेही गुप्तता पाळून राहत होते.
 तसे तिथे फक्त एकच प्रकारचे लोक राहत होते .ते ना पुरुष होते ना स्त्री...
खरे आहे ... ते तेच होते .. नाव उच्चारले की सर्वसामान्य माणसाला भीती वाटायची . त्यांचे विचित्र हावभाव ,त्या विशिष्ट प्रकारच्या टाळ्या वाजवून अश्लील बोलणे . बिनधास्त वागणे.ह्यांना कुठेही फिरण्यास आडकाठी नव्हती . कोणत्याही ट्रेन बस रस्त्यावरील गाड्यामध्ये हात पसरून पैसे मागायचे . काही लोक त्यांची टिंगल करत तर काही घाबरून त्यांना पैसे देत . पण आज लॉकडाऊन मुळे ती वस्ती घरातच बसून होती .
तो ही त्याच वस्तीतील एक .. ट्रेनमध्ये फिरून टाळ्या वाजवत पैसे मागायचा . न देणार्याला ही आशीर्वाद द्यायचा  तर देणाऱ्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवयाचा . कधी कोणाच्या मागे लागणे नाही . ट्रेन बंद झाल्यामुळे तो ही घरातच बसून होता . घर म्हणजे साधी पत्र्याची खोली होती . त्यात ते चार जण होते . हे दोघे सिनियर आणि त्यांचे दोन शिष्य .
इथे फक्त एकच नाते होते गुरू शिष्याचे . प्रत्येकजण आपल्या शिष्याला आपल्या पंथाचे ज्ञान देत होता . नियम समजावून देत होता .
 लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते घरातच बसून होते . आता बाहेरील समाजाला त्यांच्याकडे लक्ष  देण्यास वेळ नव्हता . जो तो आपली सुरक्षितता जपत होता .
त्या दिवशी तो घरातून बाहेर पडला तर नाक्यावरील पोलीस त्याच्यावर धावून आला . ए चल निघ इथून ,साले आले टाळ्या वाजवायला .. तो हिरमुसला ..चेहरा पाडूनच घरी आला.
आम्हाला पोट नाही का ..?? अजूनही आम्हाला वेगळी वागणूकच मिळणार का ..?? तो विचार करू लागला .
"अण्णा उद्या तांदूळ आणावे लागतील . दोन दिवस पुरतील इतकेच आहे ..".त्याचा शिष्य डबा उघडून म्हणाला.
 आता तर बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता . तो उठला पिशवी हातात घेऊन बाहेर पडला.
आज रस्त्यावर दुसराच साहेब उभा होता . पण तो ही धावत अंगावर आला ..." चल निकल यहा से .. "काठी घेऊन तो अंगावर आला . 
"मारा मला... मारा... नागडे करून मारा .. थांबा मीच कपडे काढतो....." असे बोलून तो साडी सोडू लागला.
."ए चूप... क्या कर रही हो .. त्या साहेबाने लाजेने डोळे मिटले.
" जा.. कुठे जायचे तिकडे .." तो चिडून म्हणाला .
तीने वाण्याकडे जाऊन  रांगेत उभे राहून तांदूळ आणि साखर घेतली . येताना  पुन्हा त्या अधिकाऱ्याकडे पाहिले यावेळी तो हसत त्याच्याकडे पाहत होता . 
"एक काम करशील .."?? त्याने विचारले .
"साहेब ...दोन घास पोटाला मिळाले तर काहीही करू ....."त्याने पोटावर हात मारून उत्तर दिले .
"रोज सकाळी इथे येऊन उभे राहायचे आणि या  मॉर्निंग वॉक आणि फुकट फिरणाऱ्यांच्या मागे लागायचे. त्यांना स्पर्श न करता काहीही करून पळवून लावायचे . दुपारचे जेवण आम्ही देऊ . खूप लोड आहे इथे आमच्यावर . लोक सांगून ऐकत नाहीत . तुम्हाला तरी घाबरतील....." त्या अधिकाऱ्याने विचारले .
" आम्ही चारजण आहोत साहेब .तुम्ही सांगाल तिथे..पाहिजे तितका वेळ उभे राहू ..फक्त जेवणाचे बघा . खूप हाल होतात हो ... आमच्या वस्तीकडे कोण लक्ष देत नाही ...".तो हात जोडून म्हणाला .
"ठीक आहे . या तुम्ही चारही ....तसे तुमच्यापासून दूर राहतात सामान्य माणसे . थोडा तरी फायदा होईल . चल घेऊन ये त्यांना ... साहेबाने ऑर्डर सोडली  आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटला म्हणून तो आनंदाने घरी गेला .
त्या शोले चित्रपटात एक डायलॉग होता ठाकूर ने हिजडोंकी फौज तयार की हैं. आज हीच फौज कोरोनाच्या युद्धात खारीचा वाटा उचलण्यात सिद्ध झाली होती .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ..५

लॉकडाऊन ...५
तसा मी लॉकडाऊन फारच कडक पाळतो. पण कधीकधी नाईलाज होतो आणि खाली उतरावेच लागते.
 आताही तेच झाले. सौ.ची काही औषधे संपली आणि ती आणण्यासाठी खाली उतरलो. नशीब सोसायटीबाहेरच मेडिकल शॉप होते. मिळतील ती औषधे घेतली काही त्याच्याकडे नव्हती ..म्हटले आल्यावर फोन कर आणि परत निघालो .
तेव्हड्यात समोर तो आला . चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे मी पहिल्यांदा ओळखले नाहीच . पण ती साडी नेसायची पद्धत ,खांद्यावरील पर्स आणि मुख्य  म्हणजे ती विशिष्ट टाळी वाजवून हाक मारायची पद्धत...
" क्या भाऊ.... कैसा हैं... "?? माझ्यासमोर येऊन पुन्हा ती टाळी वाजवत तो म्हणाला.
त्याला पाहून मी उडालोच .
"तू इथे कसा ...?? आणि इथे कोण पैसे देणार तुला ...?? मी ताबडतोब सुरू झालो.
"  हो .. हो .. भाऊ ..सावकाश ... काही होणार नाही मला ...?? उलट पोलिसांच्या मदतीलाच आम्ही आलोय...?? त्याने उत्तर दिले.
 अरे वा छानच .. म्हणजे पोलिसांना ही आता तुमची गरज भासू लागली तर .....चल चहा पिणार का ...?? पण घरी नेणार नाही हा .. बाहेरच पिऊ... "मी हसत म्हणालो. 
"हा..हा..हा.. भाऊ ..!! असेही कोण आम्हाला घरात घेत नाहीत. तर या परिस्थितीत कोण घेईल ...?? पण चहा पाजाच... "तो म्हणाला.
मी सौला फोन करून थर्मासमधून चहा आणि कागदी पेले आणायला सांगितले. सोसायटीच्या गेटजवळच्या बाकड्यावर बसलो.
"मग सध्या  धंदा बंदच ना ...?? मी विचारले.
"होय भाऊ .. ट्रेन बंद ,बस बंद ,रहदारी बंद .. आम्ही तर लोकांकडे हात पसरून जगणारे .. आता लोकच दिसत नाहीत तर कोणाकडे हात पसरणार ...?? सुरवातीचे काही दिवस छान गेले पण पोटाला काहीतरी लागतेच ना .. आमच्या वस्तीतही कोण येणार ..??  स्वतःचेच करायला त्रास होतोय तर आमच्याकडे कोण येईल ....??.तो हसत म्हणाला . पण डोळ्यात वेदना दिसत होती .
"खरे आहे ..."मी सहानभूतीने म्हटले.
"पैश्याचा प्रश्न नव्हता भाऊ .. चोवीस तास आम्ही लोकांपुढे हात पसरत असतो .. 90% लोक पैसे देतात . काही घाबरून ...तर काही आशीर्वादासाठी . पण जगायला फक्त पैसेच लागतात का ...?? बाजारात गरजेच्या वस्तू कमी आहेत . डाळ भात खाऊन राहावे लागते . सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे . सामान्य माणसाचे हे हाल मग आम्ही मधलेच .. तिरस्कारणीय माणसे ..  शेवटी त्या दिवशी बाहेर पडलो . नाक्यावर पोलीस उगाच फिरणार्यांना शिक्षा करीत होते . पण चार पोलीस कितीजणांना पुरणार . लोक ऐकत नाहीत ..मॉर्निंग वॉकला बाहेर पडतात . वेळ काळ समजतच नाहीत . तो साहेब आला माझ्या अंगावर धावून मी म्हटले मारा पण वाण्याकडून डाळ साखर आणून द्या .. आणि साडी सोडू लागले तसे आजूबाजूचे सर्वच पळाले..."तो हसत म्हणाला.
मीही हसून हात जोडले .
"त्या साहेबाने पण असेच हसून हात जोडले  आणि जाऊ दिले . येताना त्याने मला बोलावले म्हणाला काय करतो घरी बसून ...?? काय करणार आम्हाला काय येतेय . तो म्हणाला  मी तुमची जेवायची सोय करतो तुम्ही आम्हाला मदत करा .. त्याने आमचा ग्रुप बनवला आणि नाक्या नाक्यावर उभे केले . जे लोक उगाच फिरत असतील त्यांना त्रास द्यायचा ,त्यांच्या मागे फिरून पळवून लावायचे . त्याबदल्यात दोन वेळचे जेवण देणार .. आयला हे तर बरे झाले ना भाऊ आमच्यासाठी . आता पाच सहा ग्रुप आहेत आमचे .पोलिसांना मदत करतात . वृद्धाना मदत करतात . सुरक्षिततेचे नियम पाळून जमेल ते करतो आम्ही .... मेलो तरी आमच्या मागे कोण आहे रडायला .... "तो मुद्दाम मोठ्याने हसत म्हणाला.
 सौ चहा घेऊन आली . मी तिची त्याच्याशी ओळख करून दिली . त्याने लांबूनच तिला आशीर्वाद दिला . मग बाकीच्या साथीदारांना बोलावून सर्वांना चहा पाजला.
इतक्यात बंड्या खाली उतरला .  त्याला पाहून चमकला.
" काय दादा कसे आहात ..?? त्याने बंड्याला हात उंचावत विचारले.
" मी मस्त .. तू काय करतोस इथे ...??  मग माझ्याकडे वळून म्हणाला .."भाऊ रक्तदान शिबिर आयोजित केलय  दिवसभरात पन्नास बाटल्या तरी गोळा करायच्या आहेत . पण या लॉकडाऊन मुळे कोण बाहेर पडत नाही हो ...?? टेन्शन आलेय ..  
 मी  खेदाने मान डोलावली.." बघू काहीतरी ..."
 तसा तो बंड्याला म्हणाला .. दादा माझे रक्त चालेल का ....?? 
"का तू माणूस नाहीस का ..?? बंड्या ताडकन म्हणाला.
 मग चला मी येतो आणि हे चार आहेतच .. फक्त जेवणाची सोय करा तीही पार्सल .वस्तीतही म्हातारे आहेत हो.त्यांची ही सोय होईल.
" जेवणाची जबाबदारी मी घेतो ... चला..." असे म्हणून बंड्या पुढे निघाला. 
तो ही उठला मला हात जोडून म्हणाला " शेवटी आम्ही ही समाजाचे देणे लागतोच ना . आज आमची वेळ आलीय ..." असे बोलून मान उंचावत बंड्याच्या मागून निघाला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

लॉकडाऊन ..४

लॉकडाऊन ..४
संध्याकाळी साडेसहा झाले आणि दरवाजाची बेल वाजली.त्याचक्षणी घरात एकदम शांतता पसरली.
आतापर्यंत हसत खेळत गाणी गुणगुणारी ती अचानक शांत झाली.चेहऱ्यावर भीती पसरली आणि ती आत बेडरूममध्ये पळाली. 
स्वयंपाकघरातून एक स्त्री घाईघाईत बाहेर आली...तिने दरवाजा उघडला.
दारात तो उभा होता. चेहऱ्यावर त्रासिक भाव."इतका वेळ दरवाजा उघडायला....."??  त्याने चिडून विचारले आणि आत शिरला.
" किचनमध्ये होते.. म्हणून उशीर झाला .. "बायकोने घाबरत उत्तर दिले.
"मग ती काय करतेय...."?? त्याने पुन्हा चिडून विचारले इतक्यात ती हातात पाण्याने भरलेला ग्लास घेऊन आली . त्याने रागाचा कटाक्ष टाकून त्या थरथरणाऱ्या हातातून ग्लास ओढून घेतला.ती ताबडतोब आत पळाली .
"उद्यापासुन लॉकडाऊन आहे.मी घरीच राहणार आहे.." बायकोला सांगून तो बाथरूममध्ये शिरला.तो आत शिरताच बायकोने कपाळावर हात मारला आणि आपली गरीब नजर तिच्यावर टाकली.
तो एका सरकारी खात्यात चांगल्या पदावर होता. हातात पैसा बऱ्यापैकी असल्यामुळे कधीतरी बाहेर पिणे व्हायचे . लग्न झाले आणि बायको आधुनिक विचारांची असल्यामुळे तिची कधीतरी घेण्याला हरकत नव्हती.
लग्न झाले आणि तिचा जन्म झाला  तसा तो पिसाटला. मुलगी होणे त्याला अपेक्षित नव्हते.त्यातच पुन्हा रिस्क घेऊ नका.आईला धोका होईल असे डॉक्टरांनी सांगताच तो अजून चिडला .
घरी आल्यावर बायकोला स्पष्ट सांगितले.मला ही डोळ्यासमोर नको. हिचे सर्व तूच करायचेस. माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस.
 तेव्हापासून त्याचे पिणे दररोज सुरू झाले.घरी यायचे फ्रेश व्हायचे..नेहमीच्या बारमध्ये बसायचे.एक 90 चा पेग मारायचा .घरी जायचे जेवून ताणून द्यायचे . हाच रोजचा दिनक्रम झाला . रविवार असेल तर दुपारी. 
हा घरात असला की ती बेडरूममधून बाहेर पडायची नाही . आता कुठे बारावे लागले होते तिला.पण वयाच्या दहाव्या वर्षीच कळले की आपले आणि वडिलांचे संबंध ताणलेले आहेत.
कारण कळले नाही पण  नकळत्या वयातच  समजूतदार झाली ती. कारणाशिवाय वडीलांसमोर जायचे नाही .
ते असताना हळू आवाजात बोलायचे .शक्यतो समोर जायचे नाही . काही प्रॉब्लेम आला तर आईलाच सांगायचे . अश्या काही गोष्टी तिच्या मनात पक्क्या बसल्या .आणि एकदा का काही गोष्टी मनात बसल्या की पुढील गोष्टी सोप्या होतात.
लॉकडावूनचे पाहिले काही दिवस ठीक गेले.
ती आपल्या रूममध्ये अभ्यास करीत किंवा काहीतरी करीत असायची. अधूनमधून आईला मदत करायची . चुकून वडिलांच्या समोर आली तरी मान खाली घालून.
त्यानेही कधी तिला विचारले नाही.हा दिवसभर लोळत बसायचा . आता घरचा टीव्ही त्याच्या हातात गेला होता . संध्याकाळ झाली की घरचा स्टॉक बाहेर काढायचा . पण तो ही किती दिवस पुरणार ...?? शेवटी तेही संपले. 
आता मात्र त्याची चीडचीड सुरू झाली .त्यात संध्याकाळी काहीच नसल्यामुळे अजून परेशान .. बायको त्याची तळमळ पाहून तिला अजूनच जपत होती. हो कोणाचा राग कोणावर निघायचा ...?? मित्रांकडचा ही स्टॉक संपला . ती रात्र कशीबशी तळमळत काढावी लागली त्याला.
दुसऱ्या दिवशी बायकोने उठवलेच नाही.याला जाग आली तेव्हा दहा वाजून गेले होते.
काही न बोलता तो उठला. फ्रेश होऊन बाहेर आला तर  समोरच नाश्ता तयार होता. टीव्ही पाहत वेळ कसा गेला ते कळलेच नाही. संध्याकाळी बायकोने ऑर्डर सोडली . किचनच्या माळ्याची साफसफाई करूया.
 काही न बोलता त्याने मान डोलावली आणि  वर चढला . जुन्या बॅग्स ..पेपर.. काही भांडी.. सगळे खाली घेऊन तो बाहेर बसला.
"नको असलेले बाजूला काढा .. तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते..." बायकोने पुन्हा एक ऑर्डर सोडली . तो मुकाटपणे सर्व सामान चेक करू लागला.
आयला  आपल्याकडे पु. ल. ..चि .वि. जोशी. रणजित देसाई ..कुठून आले...??  त्याच्या जुन्या आठवणी चाळवल्या. 
"काय ग...!!  ही पुस्तके कोणाची आहेत ..??? त्याने ओरडून बायकोला विचारले. 
"तुमचीच आहेत ... किती वर्षे झाली त्याला ..आता ठेवा बाजूला वाचू आम्ही ... " तिने आतूनच सांगितले.
 आम्ही ....तो मनात म्हणाला मग त्याने हळूच तिच्या बेडरूमकडे नजर टाकली.दरवाज्याआडून ती त्याच्याकडे पाहत होती...भयचकित नजरेने.
 काही न बोलता त्याने पुस्तके बाजूला काढली .एके काळी त्याला  वाचनाची प्रचंड आवड होती .  किती वर्षे झाली शेवटचे पुस्तक वाचून ..?? त्याने विचार केला . चला आता वेळ आहे ..वाचून घेऊ .. 
आता संध्याकाळ वाचनात जाऊ लागली . दारूची आठवण थोड्या प्रमाणात का होईना कमी झाली.
आता त्याचे रुटीन बदलले होते .सकाळी उशिरा उठायचे . टीव्ही पाहणे , पुस्तक वाचन .मग नेमकी संध्याकाळी बायको काहीतरी काम हातात द्यायची ,. मग काम करता करता जुन्या आठवणी जागवायच्या.आपली वाचून झालेली पुस्तके ती आपल्या रूममध्ये वाचते हे त्याच्या लक्षात आले होते.
त्यादिवशी सकाळी अचानक त्याला जाग आली .काय झाले ते कळलेच नाही पण कसलातरी आवाज होता हे नक्की. डोळे उघडून पाहिले तर सहा वाजले होते.बायको ही शेजारी नव्हती.तो उठला.
तिच्या खोलीतून मंजुळ सूर ऐकू येत होते . सुरेल नाहीत पण सलग वेडेवाकडे बासरीचे सूर होते ते . त्याने हळूच तिचा दरवाजा उघडला . समोर मोबाईल ठेवून तिचे बासरी वाजवणे चालू होते . शेजारी बायको बसली होती . दरवाजात त्याला पाहताच तिची बासरी पटकन थांबली. भयचकित चेहऱ्याने ती आईच्या कुशीत शिरली.
तो काही न बोलता परत फिरला.
" रागावू नका हो ...तुम्हाला नाही त्रास होणार .आवड आहे तिला बासरी वाजवायची . मी क्लासही घातलंय . शनिवार रविवार क्लास असतो. हल्ली लॉकडाऊनमुळे तो ही बंद  मग ऑनलाईन घरीच शिकते ती .."बायको रडवेला चेहरा करून म्हणाली.
त्याने पुन्हा आत पाहिले.कोपऱ्यात ती बासरी छातीशी घट्ट धरून उभी होती . डोळ्यात भीती . कुठेतरी आतून हलला तो . इतकी भीती आपल्याबद्दल .खरच आपण इतके वाईट आहोत ..
"अजून काय काय येते तिला ...??  तसे बायकोने काही ड्रॉईग पेपर समोर केले .तिने काही चित्रे काढली होती.
"ही अशी चित्र काढतात का ..?? बोलाव तिला...तो सवयीनुसार खेकसला . 
ती खाली मान घालून त्याच्यासमोर उभी राहिली .हात पाय कापत होते तिचे.
" हे बघ..ही लाईन अशी पाहिजे .इथे डार्क कर .हा सर्कल बरोबर काढ .."?? त्याने विविध सूचना केल्या . दोघीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत उभ्या राहिल्या.
"बघता काय... मीही एकेकाळी छान ड्रॉइंग काढायचो . तीन वर्षे क्लासही केला होता . पण पुढे नाही जमले.उद्यापासून संध्याकाळी रोज दोन तास ड्रॉइंग शिकवीन मी तिला . आणि ते बासरीचे चालू राहू दे तुमचे ... "तो हसत म्हणाला .
बायकोने तिला जवळ घेत डोळे पुसले.आज लॉकडाऊन मुळे बापलेकीच्या नात्याला नव्याने सुरवात झाली हे ही नसे थोडके ....
© श्री किरण कृष्णा बोरकर