Monday, January 23, 2023

प्रेम करावं पण जपून

#साहित्यसंपदा 
#मराठी_नाटक 
#प्रेम
#प्रेम_करावं_पण_जपून

प्रेम करावं पण  जपून 
मराठी नाटक 

प्रेम हा विषयच मोठा आहे .यात सर्व काही येते .
जवळीक,दुःख,आपलेपणा ,दुरावा ,गैरसमज .
प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि म्हणूनच या विषयावर अगणित कथा कादंबऱ्या चित्रपट नाटके लिहिली जातात .
काल साहित्यसंपदा समूहातर्फे श्री.वैभव धनावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत  मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात प्रेम करावं पण जपून या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी  प्रयोग पाहण्याचा योग आला .नवीन तरुण कलाकार ,दिग्दर्शक लेखक अशी सर्व तरुण टीम असूनही नाटकाचे पन्नास प्रयोग होणे ही कौतुकाची बाब म्हटली पाहिजे .सर्व टीमचे मनापासून अभिनंदन .
नाटकात नावाप्रमाणेच एका प्रेमाचीच कथा आहे .पहिला अंक संपेपर्यंत आपल्याला नक्की कथा पुढे कशी जाणार याची कल्पना येत नाही .पहिला अंक नायक नायिकेचे प्रेम कसे जुळते त्यांचा स्वभाव कसा आहे यातच पुढे जातो .पण खुसखुशीत संवाद ,सहज अभिनय ,कलाकारांचा रंगभूमीवरचा वावर आणि मुख्य म्हणजे कुठेही कोण अडखळत नाही यावरच प्रेक्षक नाटकाचा आनंद घेतात .
पण पहिला अंक संपताना नाटकात पुढे काय घडणार याची कल्पना येते आणि ते कसे घडेल या उत्सुकतेने प्रेक्षक दुसरा अंक  पाहायला सरसावून बसतो .
अपेक्षेप्रमाणे दुसरा अंकही मोठा आहे .दुसऱ्या अंकात लेखक प्रेमावर गंभीर झालाय .तरीही त्याने नाटकावरील पकड कमी पडू दिली नाही .मध्येमध्ये खुसखुशीत संवाद टाकून त्याने आपल्याला गंभीर बनविले नाही . शेवट अर्थात नेहमी प्रमाणे गोड .
नाटकात फक्त चार पात्रे आहे. दोन तरुण दोन तरुणी .चारही वेगवेगळ्या स्वभावाचे प्रतिनिधित्व करतात .
संतोष उर्फ संत्या कमी शिकलेला ,कोकणातून आलेला  .आपल्या भाषेवर आणि गावावर प्रेम आहे .ते त्याच्या भाषेतून आणि वागण्यातून स्पष्ट जाणवते.त्याचा लांबचा भाऊ आकाशकडे तो राहतोय .
आकाश नोकरी करणारा तरुण.तो प्रेमात पडलाय आणि आपली सुखदुःख संत्याकडे मोकळी करतोय.त्याच्या मते प्रेम जगले पाहिजे .आधी प्रेम करूया मगच ते स्वच्छंदी जगूया त्यासाठी आयुष्य पडलंय. 
त्याची प्रेयसी श्रावणी आताची तरुणी आहे .ती मुंबईत नोकरीसाठी आलीय.तिला स्वच्छंदी आयुष्य जगायचेय .तर तिची मैत्रीण सुरेखा तिच्या प्रियकरासोबत चार वर्षे फिरतेय .त्याला आपले सर्वस्व देऊन बसलीय पण आता त्याला तिचा कंटाळा येऊ लागलाय. दोन टोकाच्या स्वभावामुळे आकाश श्रावणीमध्ये दुरावा आलाय आणि तो कसा दूर होतो त्यासाठी हे नाटक बघायला हवे.
दिग्दर्शक विशाल असगणकर याने संत्याची भूमिका केलीय.कोकणी भाषेचा वापर ही नाटकाची प्रमुख बाजू आहे .कोकणी भाषेचा लहेजा वेगळाच आहे .नुसती हाक मारली तरी चेहऱ्यावर हासू उमटते .त्यांचा रंगमंचावरील वावर ही प्रभावी आहे .एक नवीन विनोदी कलाकार रंगमंचाला मिळालाय असे समजायला हरकत नाही.
लेखक संकेत शेटगे यांनी नायकाची आकाशची भूमिका केली आहे .आवाजातील चढउतार व्यवस्थित व्यक्त केले आहेत.
श्रावणीची भूमिकेत मृदुला कुलकर्णी आहेत.त्यांचा आवाज खूप छान आहे .भावनिक प्रसंग छान रंगविले आहे .
भक्ती तारलेकर हिने सुरेखाची छोटी पण आजच्या बिनधास्त तरुणीची भूमिका केली आहे .प्रेमात दुरावा आल्यानंतरही अस्वस्थता तिने प्रभावीपणे केली आहे.
आजच्या तरुणाईला आवडेल असे हलकेफुलके पण प्रेमाचा विशिष्ठ संदेश देणारे हे नाटक प्रत्येकाने एकदातरी पाहिले पाहिजे आणि या टीमचा उत्साह वाढविला पाहिजे.

© श्री.किरण कृष्णा बोरकर

२३/१/२०२३

Saturday, January 21, 2023

हंटर्स सिझन 2


हंटर्स सिझन 2
अमेझॉन प्राईम
ज्यांनी पहिला सिझन बघितला आहे त्यांनाच दुसरा सिझन लक्षात येईल .किंवा दुसरा सिझन पहायच्या आधी पहिला सिझन बघावाच लागेल.
पहिल्या सिझनमध्ये स्पेन येथील बॉम्बस्फोटानंतर सारे हंटर्स वेगळे झाले आहेत.त्यातील एक हंटर ज्योला काही नाझी पकडून अर्जेंटिनात नेतात आणि त्यांच्या नेत्यासमोर उभे करतात.तो नेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात अडोल्फ हिटलर असतो आणि स्वतःला कर्नल म्हणून घेणारी स्त्री इव्हा ब्राऊन आहे.
दुसऱ्या सीझनमध्ये जोनाह आपल्या परीने नाझीना शोधून त्यांचा खातमा करीत असतो .अश्याच एकाप्रसंगी त्याला हिटलर जिवंत असल्याची बातमी मिळते .आणि तो सर्व हंटर्सला पुन्हा एकत्र करतो .
सारे मिळून हिटलरच्या शोधात निघतात .शेवटी हिटलरला ते शोधून ते जगासमोर आणतात का ?? ज्यू हत्याकांडाचा प्रमुख आरोपी हिटलर सापडला की हंटर्सची शोधमोहीम संपेल का ??
या सीझनमध्येही अलपचिनो मेयर ऑफरमन च्या भूमिकेत आहे .खरेतर पहिल्या सिझनमध्येच त्याचा खोटेपणाचा मुखवटा दूर करून हत्या करण्यात आली होती.पण दुसऱ्या सिझनच्या प्रसिद्धीसाठी त्याला पुन्हा घेतले असावे.यात त्याचे पूर्वायुष्य उलगडताना दिसले आहे.
पहिल्या सिझनप्रमाणे दुसरा सिझनही थरारक आहे .

Wednesday, January 18, 2023

वाळवी

एक प्लॅन 
त्याची अनेक दिवस आधी पासून तयारी.
 अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन प्लॅन तयार केलेला.
पण तो प्रत्यक्षात आणताना अचानक आलेले छोटे छोटे प्रॉब्लेम 
तो प्लॅन पूर्ण करताना उडालेला गोंधळ 
अंगावर बेतलेल्या गोष्टी 
एक प्रॉब्लेम सुटतोय तोच दुसरा प्रॉब्लेम 
अचानक इतरांचे त्या प्लॅनमध्ये आगंतुकपणे घुसणे.
आणि अगदी शेवटी अनपेक्षित शेवट 
नावाप्रमाणेच सगळ्या प्लॅनला वाळवी लागली 

प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन सलग एका जागी बसून अंगावर येणारा अनुभव घ्या .

Monday, January 16, 2023

रेड टेप

रेड टेप ...अभिजित कुलकर्णी
मेहता पब्लिशिंग हाऊस
महेश देशमुख एक तडफदार तरुण आयएएस अधिकारी .नुकतीच त्याची बांद्राला बदली झालीय. शासकीय भूखंड असलेल्या बांद्रा येथील शासकीय वसाहतीच्या शेकडो एकर जमिनीवर बर्याचजणांचा डोळा आहे. यात बिल्डर सोबत काही राजकीय पुढारी ही सामील आहेत. त्या वसाहतीचा विकास योग्यप्रकारे झाला तर तेथील नागरिकांचाआणि सरकारचा प्रचंड नफा होईल याचा त्याने अभ्यास केलाय.पण या डेव्हलपमेंट मागे सरकारचे नुकसान आणि विकासकांचाच भरपूर फायदा होणार अश्याच हालचाली चालू आहेत.
महेश एका प्रामाणिक पत्रकाराला गाठून आपल्याकडील सगळी माहिती पुराव्यासकट त्याच्या हवाली करतो .ही बातमी वर्तमानपत्रात येताच मोठा गदारोळ उठतो .महेशवर चारही बाजूने प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो .त्याला काही बेकायदेशीर प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न होतो . पण महेश कुठेही अडकत नाही.
मग नेहमीसारखे एक मोठे प्रकरण शोधून त्यावर जनतेचे लक्ष वळविले जाते. हळूहळू जनता बांद्रा प्रकरण विसरू लागते .तीच संधी साधून महेशची बदली मंत्रालयातच केली जाते. आता हात चोळत गप्प बसण्याशिवाय महेशकडे  पर्याय नाही.पण त्यातूनही एक संधी महेशला मिळते आणि तो पुन्हा डाव कसा उलटवितो ते वाचण्यासाठी पुस्तक वाचायला हवे .

Saturday, January 14, 2023

जॅक रिचर

जॅक रिचर 
पिटर्सबर्ग शहरात त्या सुंदर सकाळी एक स्नायपर रस्त्यावरच पाच व्यक्तींना  गोळ्या घालतो .त्या पाचही व्यक्तींचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो .पोलीस कार पार्किंगच्या पासवरून आरोपी जेम्स बारला ताब्यात घेतात.
जेम्स बार हा अमेरिकन सैन्यदलातील स्नायपर असतो . सर्व पुरावे जेम्स बारच्या विरुद्ध असतात. तपासात जेम्स बार फक्त जॅक रिचरला बोलवा इतकेच लिहून देतो .पुढे तुरुंगात नेताना त्याच्यावर इतर कैदी जीवघेणा हल्ला करतात आणि तो कोमात जातो.
कोण आहे हा जॅक रिचर ?? 
जॅक रिचर सैन्यदलात मेजर होता .त्याने अनेक देशातील धोकादायक कामगिरीत भाग घेऊन अनेक मेडल मिळवली होती.त्याने काही काळ मिलिटरी पोलीस म्हणूनही काम केले होते.
सध्या तो कुठे आहे याविषयी कोणालाच माहिती नाहीय.त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाहीय.ड्रायव्हिंग लायसन्स नाहीय.  पेन्शनचे पैसे बँकेत जमा होतात पण तो कसे काढतो या विषयी कोणालाच काही माहिती नाही. तुम्ही त्याला शोधू शकत नाही पण त्याला वाटेल तेव्हा तो तुम्हाला भेटू शकतो .
जेम्स बारला मदतीची गरज आहे असे समजताच जॅक त्याच्या मदतीसाठी येतो.पण शहरात शिरताच त्याचा अज्ञात व्यक्तींकडून पाठलाग सुरू होतो .त्याच्यावर हल्ला ही होतो .
काय आहे नक्की प्रकरण ?? जेम्स बारसारखा  साधारण स्नायपर इतक्या अचूक गोळ्या झाडून अनोळखी व्यक्तींना कसा आणि का मारेल?? 
जेम्स बारच्या वकिलाच्या मदतीने जॅक या प्रकरणाच्या मूळाशी कसा जातो ते जाणून घ्यायचे असेल तर  जॅक रिचर पाहायला हवा.
टॉम क्रूज जॅक रिचरच्या भूमिकेत शोभून दिसतो.
ली चाईल्ड या प्रसिद्ध लेखकाच्या वन शॉट या कादंबरीवर आधारित हा चित्रपट कादंबरीपेक्षा जास्त थरारक आहे .ली चाईल्डचे जॅक रिचर हे पात्र एक सुपरहिरोच आहे .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे .

Sunday, January 1, 2023

हंटर्स

हंटर्स 
साठ लाख ज्यूच्या हत्याकांडास केवळ हिटलर जबाबदार होता. पण त्याला याकामी  मदत करणारे तितकेच जबाबदार होते. त्यातील काही नाझीनी युद्ध संपल्यावर जगाच्या कानोकोपऱ्यात आश्रय घेतला. अमेरिकेने बऱ्याच नाझीना आश्रय दिला. त्यातील काहींनी नासामध्ये काम केले. सर्वांनी आपली मूळ ओळख लपवून ठेवली होती. पण ते सगळे अजूनही एकमेकांच्या संपर्कात होते. एकमेकांना गुप्त संदेश पाठवून कोणती तरी योजना आखत होते .
दुसरीकडे नाझींच्या छळछावणीतून पळालेले ज्यूही अमेरिकेत आहेत.  त्यातील काही ज्यूनी गुप्त गट बनविलेला आहे आणि अमेरिकेत लपलेल्या नाझींचा शोध घेऊन त्यांना ठार करतायत . 
एक कृष्णवर्णीय महिला एफबीआय ऑफिसर एका वृद्ध महिलेच्या खुनाचा शोध घेतेय .तपासात तिला ती वृद्ध स्त्री एकेकाळी नाझी शास्त्रज्ञ असल्याचे समजते .पुढच्या तपासात ती या नाझी खूनसत्राचा माग काढत जाते .पण तिच्यावर ही हल्ला होतो .
ज्यू गुप्तगटाला एका नाझीकडे काही संगीताच्या टेप्स सापडतात आणि त्याचा खोलवर तपास केला असता पुढील काही आठवड्यात काहीतरी भयंकर घडणार असल्याचा सुगावा लागतो .
काय आहे ते कारस्थान ?? अजून किती नाझी अमेरिकेत आहेत.? ज्यू हंटर्स सगळ्यांचा खातमा करतील का ??
अमेझॉन प्राईमवर एक थरारक सिरीज