Monday, March 27, 2023

दराज

काही महिन्यांपूर्वी अचानक नाविद इनामदारचा मला फोन आला "दादा घरी येतोय सगळ्यांना भेटायला .मी ही नेमका घरी होतो .नाविद इनामदार म्हणजे बाबांचा आवडता शिष्य .अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् च्या  पहिल्या बॅचचा विद्यार्थी. 
मुंबई युनिव्हर्सिटीने पहिल्यांदाच अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् सुरू करून नाट्यविषयक अभ्यासक्रम सुरू केला होता.  पद्मश्री प्रो. वामन केंद्रे प्रमुख होते आणि त्यांनी माझे वडील कै. कृष्णा बोरकर याना रंगभूषेचे प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले होते.त्यानंतर बाबा जवळजवळ दहा ते बारा वर्षे अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसशी संबंधित होते.
नाविद इनामदार आणि बाबांचे चांगलेच ट्युनिंग जुळत होते.नाविद हा हरहुन्नरी कलाकार.केवळ अभिनय या गोष्टीवर अवलंबून न राहता बाकीच्या क्षेत्रात ही आवडीने लक्ष घालत होता. तो एक चांगला कवी आहे .उत्तम लिहिणारा आहे. एक हुशार आयोजक आहे.
 पु.ल.कला अकादमीमध्ये होणारे बरेचसे कार्यक्रम तोच आयोजित करतो . तसेच सांस्कृतिक कार्य संचनालयाच्या सहकार्याने महाराष्ट्रभर हौशी राज्य नाट्यस्पर्धाही आयोजित करतो. 
पण त्याला अजून काहीतरी करायचे होते. आपली स्वतंत्र ओळख व्हावी असे त्याचे स्वप्न होते आणि त्यासाठीस त्याचे प्रयत्न चालू होते.
त्या दिवशी तो घरी आला आणि त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची माहिती आम्हाला दिली.त्याला चित्रपट बनवायचे होते पण त्या आधी एक शॉर्ट फिल्म बनवायची होती आणि त्याचा मुहूर्त त्या दिवशी रविंद्र नाट्य मंदिर म्हणजेच पु. ल.देशपांडे कला अकादमीमध्ये होणार होता.त्यापूर्वी बाबांचे स्मरण आणि आईचे आशिर्वाद घेण्यासाठी तो घरी आला होता. माझी शॉर्ट फिल्म पूर्ण झाली तर नक्कीच तुम्हाला सर्वाना यावे लागेल असा प्रेमळ आग्रह करून तो बाबांच्या फोटोला नमस्कार करून बाहेर पडला.
काल रविवार 26 मार्च ला रविंद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये त्याच्या 'दरज' या शॉर्ट फिल्मचा खाजगी शो आयोजित करण्यात आला होता.त्याने दोन तीन वेळा मेसेज पाठवून आग्रहाचे आमंत्रण दिले .त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात पद्मश्री प्रो.वामन केंद्रे आणि कुटुंबीय ,सुप्रसिद्ध नाटककार शफाअत खान , कला अकादमीचे संचालक श्री.रोकडे ,माजी संचालक आशुतोष घोरपडे हजर होते.त्यावेळी केलेल्या भाषणात नाविद इनामदारने बाबांची आठवण काढली आणि मलाही स्टेजवर बोलावून बाबांच्या वतीने सत्कार केला .
हा आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण होता.बाबांना जाऊन आता सहा वर्षे होतील पण अजूनही त्यांचे काही शिष्य आठवणीने वेळात वेळ काढून घरी येतात त्यांच्या नावाने कार्यक्रम करतात .
नाविद तुझ्या या शॉर्ट फिल्मला भरघोस प्रतिसाद लाभो आणि यापुढे तुला चित्रपटक्षेत्रात खूप यश मिळो यासाठी बोरकर कुटुंबियांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा .
असाच मोठा हो यशस्वी हो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Wednesday, March 22, 2023

रन बेबी रन

रन बेबी रन
त्या मेडिकल कॉलेजच्या गच्चीवरून सोफियाने उडी मारली आणि एकच हल्लाकोळ झाला. त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केलीय हे सिद्ध झाले.
सत्या एक बँक ऑफिसर. त्याचे लग्न ठरलंय. आपल्या होणाऱ्या बायकोसाठी तो गिफ्ट घेऊन गाडीत बसला तेव्हा त्याची नजर मागे लपलेल्या तरुणीवर पडली.त्या तरुणीच्यामागे काही गुंड लागले आहेत आणि तिचा जीव धोक्यात आहे असे तिने सत्याला सांगितले.नाईलाजाने सत्या तिला सर्वांच्या नजरेपासून लपवून घरी घेऊन आला.ती त्याच्याकडे रात्रभर राहिली.बोलताना तिने अनाथ आहे असे सांगितले.
सकाळी सत्याने पाहिले तेव्हा ती बाथरूममध्ये मरून पडली होती.त्याच्या इन्स्पेक्टर मित्राने तिच्या बॉडीची व्हिलेवाट लाव असा सल्ला सत्याला दिला.नाईलाजाने सत्याने तिचे शव मोठ्या बॅगेत भरले आणि ती बॅग डिकीत टाकून शहराबाहेर निघाला.पण रस्त्यात त्याची गाडी बंद पडली.म्हणून एका छोट्या खाजगी वाहनातून तो बॅगेसकट पुढे निघाला. गाडीत त्याच्याबरोबर इतर प्रवासीही होते. रस्त्यात पुन्हा पोलिसांनी ती खाजगी गाडी अडवली .खाजगी वाहनातून व्यवसाय करता येत नाही असे सांगत सत्यासह सर्व प्रवाशाना बाहेर काढून सरकारी वाहतूक गाडीत बसवून दिले. 
सत्या बॅग गाडीत ठेवून त्या बसमध्ये चढला .काही अंतर जाताच त्याला ती खाजगी गाडी दृष्टीस पडली.तो लपून त्या गाडीवर नजर ठेवू लागला .काही वेळाने गाडीच्या ड्रायव्हरला गाडीत ती बॅग दिसली .कुतूहलाने त्याने बॅग उघडली आणि तरुणीचे शव पाहून धक्काच बसला.आपल्यावर खुनाचा आळ येऊ नये म्हणून त्या ड्रायव्हरने तिचे प्रेत स्मशानात नेऊन जाळले.शवाची परस्पर विल्हेवाट लावली गेली हे पाहून सत्याचा ताण हलका झाला आणि तो शांतपणे घरी जाऊन झोपला.
 दुसऱ्या दिवशी सकाळी गावाबाहेरच्या स्मशानात एक अर्धवट जळलेले प्रेत मिळाल्याची बातमी गावभर झाली.सत्या पुन्हा त्या स्मशानात गेला तेव्हा पोलीस तपासणी चालू  होती.पोलीस डॉग त्या खाजगी गाडी पर्यंत गेला.गाडीत बॅग असल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आणि पोलीस त्या ड्रायव्हरला अटक करायला गेले.पण त्या ड्रायव्हरने घाबरून आत्महत्या केली.
आपल्यामुळे दोन व्यक्ती हकनाक जीवास मुकल्या याची जाणीव सत्याला सतत होत होती. त्याने हे प्रकरण नक्की काय आहे याचा छडा लावण्याचा निर्णय घेतला.त्याच्या इन्स्पेक्टर मित्रालाही धमक्या येऊ लागल्या.त्याने आपली ट्रान्स्फर दुसऱ्या शहरात करून घेतली.
सत्या पुरावे शोधण्यास सुरवात.त्या तरुणीचे नाव तारा असल्याचे कळते. हळूहळू तो रहस्याच्या मुळाशी जातो आणि अनपेक्षित सत्य सामोरे येते.
कोण आहे तारा ?? तिचा सोफियाच्या आत्महत्येशी काय संबंध आहे ? तिच्या जीवावर कोण उठले आहे?? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपटाच्या शेवटीच मिळतील.
चित्रपट हॉटस्टार वर आहे

Friday, March 17, 2023

अलोन

अलोन 
ALONE
कोविडमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले.कोचीही त्याला अपवाद नव्हते.त्याचवेळी कोचीतील स्ट्रॉबेरी  नावाच्या उचभ्रू लोकांच्या सोसायटीत काली दासचे आगमन झाले.काली दास हा एकटाच आहे.त्याने 13 A फ्लॅट भाड्याने घेतलाय.
सिक्युरिटी गार्डच्या केबिनमधून फ्लॅटची चावी घेतली.सिक्युरिटीने फोनवरूनच त्याला दरवाज्याबाहेर सर्व गरजेच्या वस्तू मिळतील याची खात्री दिली. 
काली दास स्वतःची पूर्ण काळजी घेणारी व्यक्ती आहे.तो एका हातात सॅनिटरायझर स्प्रे आणि तोंडावर मास्क लावूनच फिरतो.
तो फ्लॅटमध्ये प्रवेश करतो .त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू जाग्यावर हजर आहेत.तो त्याच्या मैत्रिणीशी आणि फॅमिली डॉक्टरशीच बोलतो. पण बोलण्यावरून वाटते त्याच्या अनेक ओळखी आहेत.
काही वेळाने त्याला फ्लॅटमध्ये कोणीतरी आहे असे वाटते.फ्लॅटमध्ये एक आई आणि तिच्या मुलीचे बोलणे त्याला ऐकू येत असते.कोण आहेत त्या दोघी ?? काली दासला त्या दिसत का नाही ?? 
काली दास हळू हळू या गोष्टीचा माग घेण्यास सुरुवात करतो आणि एका मोठ्या रहस्याचा  उलगडा करतो.त्यासाठी तो फक्त फोनवरूनच आपल्या काही मित्रांची मदत घेतो.
पण हा काली दास नक्की कोण आहे ?? आणि तो या फ्लॅटमध्ये का राहायला आलाय ?? 
शेवट पाहून आपणच चक्रावून जातो.
सुपरस्टार मोहनलाल आणि फक्त मोहनलाल या चित्रपटात एकमेव पात्र आहे.तोच संपूर्ण चित्रपटात वावरतो.बाकीच्या व्यक्तिरेखा फक्त फोनवर आहेत तर काही  कोविडमुळे बंद दरवाजाआड बोलतात. सव्वादोन तासांचा हा चित्रपट आपल्याला जाग्यावरून उठू देत नाही.
यापूर्वी सुनील दत्त याने 1964 साली यादे चित्रपटात एकपात्री भूमिका केली होती.त्यानंतर हा चित्रपट असेल.
हॉटस्टारवर आहे .साऊथ चित्रपटसृष्टी किती वेगवेगळे प्रयोग करते हे आपल्याला पाहायला मिळते.

Tuesday, March 14, 2023

घोल

घोल
GHOUL

सैतानाला बोलावयाचे असेल तेव्हा स्वतःच्या रक्ताने एक विशिष्ट असे चिन्ह काढले की तो सैतान त्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतो आणि मग तो दुसऱ्याच्या शरीराचे मास खाऊन त्याचे रूप धारण करतो .त्यालाच घोल असे म्हणतात.
त्या गर्द जंगलात सैन्याचा तळ उभारला होता.अतिशय मोजकेच ट्रेन सैनिक आणि त्यांचा कठोर बॉस  कर्नल सुनील दाकुन्हा .त्यात महिला अधिकारीही आहेत.खतरनाक दहशतवाद्यांना इथे चौकशी साठी आणण्यात येथे त्यानंतर जिवंत बाहेर कोणीही येत नाही.
मेजर निदा रहीम नवीनच सैन्यात भरती झालीय.जरी अल्पसंख्याक असली तरी कट्टर देशप्रेमी आहे.तिने आपल्या वडिलांनाही देशविरोधी प्रक्षोभक भाषणे करतात म्हणून पकडून दिले आहे.
तिची बदली त्या तळावर केली जाते.अर्थात तिच्याकडे सगळे संशयानेच बघतात.अली सईद हा खतरनाक अतिरेकी या तळावर चौकशीसाठी आणलाय.पण चौकशी दरम्यान तो निदाला तिच्या टोपणनावाने हाक मारतो तर कर्नलच्या कुटुंबाची विचारपूस करतो इतकेच नव्हे तर काही खाजगी गोष्टी ही सांगतो.
तो तोंडाने काही मंत्रासारखे पुटपुटोय.कैदेत असलेला मौलवी ही भाषा हजारो वर्षांपूर्वीची आहे असे सांगतो .अली सईद नक्की कोण आहे .प्रचंड मारहाण होऊनही तो जिवंत कसा ?? त्याने कैदेतून सुटका कशी करून घेतली ?? आता तो सर्व सैनिकांच्या मागे का लागलाय ?? निदा ते सर्व रोखू शकते का ??
ही चार भागाची मालिका राधिका आपटेने व्यापून टाकलीय.संपूर्ण मालिकेत तिचा वावर आहे.तिचे चिडणे ,अगतिकता ,भीती आपल्या चेहऱ्यावर ठळकपणे दाखवली आहे.संपूर्ण मालिकेवर एक उदास गडद काळी छाया आहे .
एक अनुभव म्हणून पाहायला हरकत नाही .
नेटफ्लिक्सवर आहे.

Wednesday, March 8, 2023

महिला दिन

महिलादिन
ती संध्याकाळी रोज प्लॅटफॉर्मवर भेटणारी. मला पाहून हसणारी .दिवसभर स्टेशनवर उभे राहून सतत सावधपणे सगळीकडे लक्ष ठेवून अडलेल्याना मदत करायला तत्पर असणारी पोलीस इतकी प्रसन्न कशी राहू शकते ??
ती सकाळी रस्त्यावर झाडू मारून कचरा काढणारी. एका कोपऱ्यात तिचे लहान मूल तिच्याकडे बघतय.त्याच्या शेजारी पाण्याची बाटली आणि खुळखुळा .एक डोळा त्याच्यावर आणि एक डोळा रस्त्यावर चालणाऱ्या माणसांवर ठेवून ती संपूर्ण रस्ता कसा झाडू शकते.ते ही सतत आडवे येणाऱ्या व्यक्तींसाठी थांबत हातातील झाडू त्यांच्या पायात येऊ नये याची काळजी घेत ...??
ती रात्रभर आय सी यू वॉर्ड ला .सरकारी हॉस्पिटलचे आय सी यू म्हणजे पन्नास ते साठ पेशंट. प्रत्येक पेशंटला दर तासांनी चेक करायचे .पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ती फिरत असते.पेशंट रोज किमान दोन मृत्यू तिच्यासमोर होतात. पेंगुळेल्या अवस्थेत ती घरी पोचते आणि मुलांची तयारी करते .त्यांना शाळेत सोडताना तिचा चेहरा इतका प्रसन्न कसा ??
यावेळी बीएसएफ च्या स्पेशल तुकडीत तिची निवड झाली .गेली तीन वर्षे ती या तुकडीत निवड होण्यासाठी खडतर प्रयत्न करत होती. दोन वर्षे झाली घराचे तोंड पाहिले नव्हते तिने.आता ती सीमेवर जाणार होती जिथे फक्त बर्फ होता .पण मायभूमी चे असे रक्षण करण्याची संधी प्रत्येकालाच मिळत नाही .यातून सुखरूप परत येऊ याची खात्री नसतानाही तिने हसत हसत हे आव्हान स्वीकारलेच कसे ?
जिथे अन्याय होतोय तिथे जाऊन ती लढायची.आज इथे तर उद्या तिथे.कपड्यांची शुद्ध नाही.खाण्यापिण्याची शुद्ध नाही.भर उन्हापावसात उभे राहून अन्यायाविरुद्ध घोषणा द्यायच्या .विजय मिळाला की समोरच्याला नमस्कार करून दुसरीकडे पळायचे. ह्या बाईला घर दार कुटुंब आहे की नाही .पण सतत आजूबाजूची गर्दीने तिला याची जाणीव कधीच करून दिली नाही .
या सर्व आपल्या आजूबाजूला आहेत .फक्त आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. हरकत नाही . रोज नाही पण कधीतरी त्यांच्या कर्तुत्वाला सलाम करू .
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

© श्री.किरण कृष्णा बोरकर