Friday, January 31, 2020

युवर प्राइम मिनिस्टर इज डेड... अनुज धर

युवर प्राइम मिनिस्टर इज डेड... अनुज धर
एका पंतप्रधानाचा मृत्यू .....अनुवाद .. सीमा भानू 
विश्वकर्मा पब्लिकेशन
लालबहादूर शास्त्रीच्या मृत्यूचे हे मोठे संशोधन. लेखकाने त्यांच्या मृत्यूच्या अधिकृत  निवेदनाला छेद देणारी दुसरी बाजू मांडली आहे.
ललिता शास्त्रींनी जेव्हा शव पाहिले तेव्हा त्यांचा चेहरा निळा पडला होता. शरीर इतके सुजले होते की कपडे फाडून काढावे लागले . शरीरावर विचित्र छेद होते . चेहऱ्यावरचे डाग लपविण्यासाठी चंदनाचा लेप लावला होता.मृत्यूपूर्वी ते पाणी प्यायले होते.तो पाण्याचा थर्मास गायब झाला होता .त्यांची खाजगी डायरी ही गायब होती. मृत्यूच्या सर्टिफिकेटवर रशियन डॉक्टरची सही नव्हती.अश्या अनेक संशयास्पद घटना.
त्यानंतर त्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू झाली.
त्यातून अनेक गोष्टी चर्चेत आल्या.
सीआयए ...केजीबीचा.. यात हात आहे का ...?? नेताजी बोसच्या गूढ मृत्यूविषयी शास्त्रींजवळ काही माहिती होती का ....?? विमान अपघातात मरण पावलेले  अणूशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांचा शास्त्रींच्या मृत्यूशी संबंध होता का ...?? असे अनेक प्रश्न विचारले गेले.

Monday, January 27, 2020

लिटिल डॉटर..... झोया फन/ डेमियन लुईस

लिटिल डॉटर..... झोया फन/  डेमियन लुईस
अनुवाद ... ब्रह्मकन्या ... श्रद्धा भोबड
मेहता पब्लिकेशन
 झोया पूर्व ब्रह्मातील करेन वंशाची निर्वासित तरुणी . जंगलात तिचे बालपण गेले . तिची आई आणि वडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक. नदी जंगल दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या झोयाचे वयाच्या चौदाव्या वर्षीच बालपण संपून गेले . तिच्या गावावर बर्मी सैनिकांनी हल्ला केला . जीव वाचविण्यासाठी त्यांना घरदार सोडून पळावे लागले.तिच्याबरोबर हजारो निर्वासित थायलंडमध्ये आले.निर्वासित छावणीत असताना तिने शिष्यवृत्ती मिळवून  इंग्लंडमध्ये प्रवेश केला .इंग्लंडमधील फ्री बर्माच्या मोर्च्यात नेमके तिलाच बोलण्यासाठी निवडले गेले . त्या संधीचा फायदा घेऊन तीने त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांची कहाणी सगळ्यांसमोर मांडली आणि त्यानंतर ती बीबीसीवर मुलाखत दिली. 
हळू हळू ती बर्मातील स्वातंत्र्याचा आवाज बनली . पण त्याचबरोबर ती बर्मा सरकारची प्रमुख शत्रूही बनली.बर्माच्या स्वातंत्र्यासाठी ती अनेक राजकारण्यांना भेटली . प्रसिद्ध अभिनेत्यांना हाताशी धरून ती जगाला मदतीचे आवाहन करते . बर्मा सरकारचे तिच्या हालचालींवर कडक लक्ष आहे. तिच्या जीवाचा धोका वाढलाय .
झोया सध्या लंडनमध्ये रहाते आणि मानवी अधिकार संघटना असलेल्या बर्मा कॅम्पेन यूकेसाठी काम करते .

Sunday, January 26, 2020

वंदे मातरम

वंदे मातरम 
"आंदोलन करतायत साले .... अरे.. दिवस.. वेळकाळ तरी बघा .. ..उद्या सव्वीस जानेवारी आहे .आधीच जादा बंदोबस्त... जास्त त्यात तुमची भर..."कोठडीचा दरवाजा उघडून त्याला आत ढकलत तो पोलीस ओरडत होता.
तो तरुण मागून ढकलताच आत धडपडला.पंचवीस सव्वीस वर्षाचा कोवळा तरुण होता तो. पण चेहऱ्यावरचे गंभीर भाव बरेच काही सांगून जात होते.
पोलिसांकडे पाहत तो नुसताच हसला.
"च्यायला.... आंदोलन ही वेळ..काळ.. दिवस ..पाहून केली जातात का .....?? मनात म्हणत तो कोपऱ्यात शांतपणे बसला . बाहेर बरीच गडबड चालू होती .
काही वेळाने पुन्हा कोठडीचा दरवाजा उघडला गेला आणि आतमध्ये ते दोघे आले.एकतर स्थानिक नेता होता.त्याच विभागातील होता बहुतेक . याने बऱ्याचवेळा त्याचे पोस्टर चौकात पाहिले होते.
 एक जून वाढदिवस .... लक्षात येताच तो हसला. सरकारने पूर्वीपासून काही गोष्टी चांगल्या केल्या होत्या .जन्म दाखला नाही तर  एक जून टाकून पुढे जा ... त्याच्याबरोबर दुसरा त्याचा उजवा हात असावा . आल्याआल्या त्याने खिश्यातील रुमाल काढून फरशी साफ केली.पण काय उपयोग..?? मगाशी त्याला ढकलून देणाऱ्या शिपायाने खुर्ची आणूनही ठेवली . त्याचबरोबर बिसलरी बाटली . 
" हे लवकर आटपा.. उद्या सव्वीस जानेवारी आहे . बरीच तयारी करायची आहे ..संध्याकाळ फ्री पाहिजे . तो नेता आपल्या उजव्या हाताला म्हणाला.
"साहेब बाहेर कार्यकर्ते बसूनच आहेत .तुम्हाला घेऊनच बाहेर पडतील ...."उजवा हात ताबडतोब म्हणाला . 
अचानक त्याच्याकडे त्यांचे लक्ष गेले ."तू आमच्यातला आहेस का ....?? त्या नेत्याने त्याला विचारले .त्याने मान हलवून नकार दिला . 
"मग इथे कसा ...."?? 
"एक आंदोलन केले. जिल्हा अधिकार्यासमोर . आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून .... ."त्याने शांतपणे उत्तर दिले .
" तू एकटाच .... ?? बाकीचे कुठेय ....?? उजव्या हाताने आश्चर्याने विचारले .
 "मी एकटाच होतो .बरोबर त्या शेतकऱ्याची विधवा बायको ,सासू सासरे ,दोन मुले .... जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे धरले . काहीवेळाने पोलिसांनी अटक केली. त्या बाई.. वृद्ध मुलांना सोडून दिले आणि मला घेऊन आले .."तो हसत म्हणाला .
"अरे त्याने काय होणार आहे का ...?? आमच्याकडे यायचे .. आम्ही केले असते काहीतरी .. .."??तो नेता म्हणाला .
"ती विधवा बाई चारपाच वेळा तुमच्याकडे येऊन गेली.तुम्ही दरवेळी दोन दिवसानी या असे म्हणत होतात..." चेहऱ्यावरची रेषा न हलवता तो म्हणाला .
 "भाऊ बरीच कामे असतात आम्हाला.पूर्ण विभागाचा विकास करायचा असतो . एकेकट्याकडे लक्ष देता येत नाही..."कपाळावर आठ्या आणून तो नेता म्हणाला . 
इतक्यात तो शिपाई  हातात दोन कप चहा घेऊन आला .  
"हे काय दोनच कप ... ?? इथे आम्ही तीनजण आहोत.."तो नेता चिडून म्हणाला .
"ओ साहेब... हा पहिल्यांदाच येत नाही इथे ... सतत काहींना काही चालू असते याचे.कधी मोर्चा ..तर कधी धरणे  .. पुढच्या वेळी देईन..आता उद्याची गडबड चालू आहे . तुम्ही पुन्हा कधी येणार नाही इथे म्हणून तुम्हाला खास आणलाय ...."तो शिपाई हसत म्हणाला.यानेही बरोबर आहे अश्या अर्थाने मान डोलावली.पण उजव्या हाताने आपला कप त्याच्या पुढे केला . त्याने ही न बोलता घेतला . 
"मग हे आंदोलन ...मोर्चे तुझे काम आहे तर..?? नेत्याने विचारले आणि त्याला ठसका लागला.
"काम ...?? आतापर्यंत इतके मोर्चे काढले ,आंदोलने केली पण पैसे कधी मिळाले याची आठवण नाही आली त्याला . हो पण हातापायावर ,पाठीवर पोलिसांच्या लाठीचा बराच प्रसाद मिळालाय हे नक्की....त्याने नकारार्थी मान हलवली .
"मग हे सर्व फुकट करतोस का ...?? पुन्हा तो उजवा हात आश्चर्याने म्हणाला .
तो "हो..." म्हणाला .
"माझ्याबरोबर राहा ..खूप पुढे येशील ..भविष्य बनेल . तो नेता म्हणाला.आज मी ही आंदोलन केले . महागाई विरुद्ध ,बेकारी विरुद्ध . सरकार झोपले आहे त्याला जाग आणायला नको . पुढच्या वेळी आमचे सरकार येईल तेव्हा तुम्हाला आंदोलन करायची गरज भासणार नाही . एकेकाला वठणीवर आणू .आज आपल्या विभाग बंद आहे ,रस्त्यावर एक वाहन दिसणार नाही . मगाशी देशातील प्रमुख नेत्यांचे पुतळे जाळले .काही कार्यकर्त्यांनी दोन तीन गाड्या जाळल्या.आता सर्व न्यूज चॅनलमध्ये आपल्या विभागातील ब्रेकिंग न्यूज आहे . बाहेर काही पत्रकार माझ्या बाईट्स साठी उभे आहेत...." नेता आवेशात बोलू लागला .
अच्छा म्हणजे हा विरोधी पक्षात आहे तर .अरे पण मागच्या वेळी सत्ताधारी पक्षात होता.
बाहेर सर्व बंद आहे असे कळताच तो हादरला . वडिलांची आजच डॉक्टरची अँपॉईमेंट होती .
ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला  आता जायला जमेल का ...?? बरे फोन करावा तर मोबाईलही पोलिसांनी काढून घेतला . चालत जातील ते पण मध्येच काही घडले तर पळापळ जमेल का त्याला.......... 
शेजारच्या छोट्या निखिलची आज पिकनिक होती .गेले  कित्येक दिवस तो आपण पिकनिकला किती मज्जा करणार हेच सर्वाना सांगत होता . पिकनिक कॅन्सल झाली ऐकून त्याची काय अवस्था होईल.
 त्याला आता घराची काळजी वाटू लागली आणि हे सर्व घडविणारा त्याच्यासमोर बसून बरोबरीने चहा पीत होता . किळस येऊन त्याने चहा बाजूला ठेवला .
इतक्यात तो शिपाई आत येऊन त्या दोघांनाही बाहेर घेऊन गेला.
" याला आज आतच ठेवा...बाहेर आल्यावर गडबड करेल ...असे पुटपुटताना त्याने ऐकले आणि पुन्हा तो काळजीत पडला.
सकाळी पोलीस चौकीत झेंडावंदन होताच त्याला बाहेर सोडण्यात आले .बाहेर  शेतकऱ्याच्या कुटुंबाला पाहताच त्याला धक्का बसला.
" साहेब... खूप वाईट वाटलं बघा ..आम्हाला सोडून ते तुम्हाला घेऊन गेले .कालपासून इथे बसून आहे . तुमच्या जामीनाची व्यवस्था करायला खूप फिरलो .शेवटी चौकीतला मोठा साहेब म्हणाला सकाळी सोडतो.सुनबाई घरून चहा चपाती घेऊन आलीय . खाऊन घ्या थोडं .."त्या विधवेचा सासरा हात जोडून म्हणाला "आणि हो...तुम्ही गेल्यावर तहसीलदारांच्या ऑफिसात आम्हाला बोलावून सांगितले लवकरात लवकर तुमचे काम होईल .लय आनंद झाला साहेब .. म्हाताऱ्याला डोळ्यातील अश्रू थांबविता येत नव्हते . त्याने आपल्या डोळ्यातील अश्रू लपवित चहाचा घोट घेतला .  कालच्या चहा पेक्षा आताच गुळाचा चहा खूप छान लागत होता .
घरी आला तेव्हा बाप त्याची वाट पाहत होता.
"या चिरंजीव ...लवकर आटपा ...,झेंडावंदन करायचे आहे ना ....??  
"होय पण काल डॉक्टरकडे गेलेला का ... ??त्याने विचारले.
"हो तर .. अरे बाहेर शुकशुकाट.. म्हटले अचानक काय झाले ..बस बंद रिक्षा बंद ..शेवटी नाक्यावरच्या काही मुलांनी विचारले कुठे जायचंय ...??? डॉक्टरकडे म्हणताच आपल्या बाईकवरून घेऊन गेले आणि इथे आणून सोडले सुद्धा ..तुला सांगतो आजचा तरुण खूप सेन्सिटिव्ह आहे . देशाचे भविष्य उज्ज्वल आहे बघ आपल्या ... बाप खुश होऊन बोलत होता .
 काही न बोलता  तो हसला आणि बाथरूममध्ये शिरला .बाहेर येताच वडिलांनी इस्त्री केलेला खाकी युनिफॉर्म त्याचा हातात दिला .
अनेक वर्षे जुना असलेला तो युनिफॉर्म आता विरत चालला होता .
"हे काय ... ..?? दरवर्षी तुम्ही घालता हे ..आज मला का ....??  त्याने आश्चर्याने विचारले.
"कारण आजपासून हा हक्क तुला दिलाय ...तुझ्या आजोबांचा आझाद हिंद सेनेचा हा युनिफॉर्म मी दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला घालतो.आम्ही दोघांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला . आझाद हिंद सेनेत तुझ्या  आजोबांना वीरमरण आले.स्वातंत्र्यानंतर काही काळ सर्व ठीक चालले होते . आम्ही ही शांत बसून राहिलो .पण आता तू लढा चालू केलायस . अन्यायाविरुद्ध लढतोस ,आपल्यामागे कोण आहेत कितीजण आहेत याचा विचार न करता लढतोस . हाच विचार तेव्हा आम्ही करायचो आणि त्याच विचाराने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज हा युनिफॉर्म घालण्याचा मान तुला आहे."
त्याने थरथरत्या हाताने तो युनिफॉर्म उघडला.अनेक भोके पडून चाळण झालेला युनिफॉर्म पाहून तो भारावून गेला. लहानपणापासून तो ती भोके मोजायचा . एकूण चाळीस भोके त्या युनिफॉर्मला होती. छातीपासून ते पायापर्यंत.बंदुकीच्या गोळ्यांनी छळणी झालेले आजोबा त्याच्या डोळ्यासमोर यायचे .विशेष म्हणजे एकही गोळी पाठीमागे नव्हती . युनिफॉर्मची मागची बाजू पूर्ण चांगली प्लेन होती . मागच्या वर्षीपर्यंत वडील हा युनिफॉर्म चढवून त्याला घेऊन झेंडावंदनला जायचे.ह्या वर्षीपासून ही मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली होती . भारावलेल्या अवस्थेत त्याने तो युनिफॉम् अंगावर चढवला आणि त्याच आवेशात वंदे मातरम तोंडातून कधी निघून गेले हे कळलेच नाही .
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

Monday, January 20, 2020

लीझ माईट्नर .... वीणा गवाणकर

लीझ माईट्नर .... वीणा गवाणकर 
राजहंस प्रकाशन 
बहुतांश शास्त्रज्ञ श्रीमंत असतात आणि उत्तम प्रतीची उपकरणे वापरून संशोधन करताय असे आपण वाचतो. पण लीझ ही अशी स्त्रीशास्त्रज्ञ आहे जिने आयुष्यभर गरीबीच पाहिली.वेळोवेळी तिला डावलण्यात आले. त्यात ती ज्यू असल्यामुळे जर्मनीत तिच्या वाट्याला प्रचंड मानहानी आली.
ती मुळात ऑस्ट्रीयन अणूशास्त्रज्ञ .मादाम मारी क्युरीच्या तोडीची दुसरी स्त्रीशास्त्रज्ञ.अतिशय कष्टाने तिने भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.तिथून ती बर्लिनला आली.किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञानात तिने सखोल संशोधन केले.पण स्त्री म्हणून प्रत्येकवेळी तिची अवहेलना झाली.
तरीही तिने आपले संशोधन चालूच ठेवले. अन्न... वस्त्र.. निवारा... सारे काही तिच्यासाठी महाग होते.
 हिटलरशाहीत तिला ज्यू असल्याचा जास्त त्रास भोगावा लागला.तिचे संस्थेतील अधिकार काढून घेण्यात आले.
शेवटी तिला परक्या देशात आश्रय घ्यावा लागला .ऑटो हान सारखा प्रिय मित्रही तिच्यापासून दुरावला .आपल्या संशोधनाचा उपयोग अणुबॉम्ब निर्मितीसाठी करणे तिने नाकारले.
आईन्स्टाईन तिला अवर मादाम क्युरी म्हणायचा. पंधरा वेळा नामांकन होऊनही तिला शेवटपर्यंत नोबेल पुरस्कार मिळाला नाही . तिच्या शोधाचे श्रेय वेळोवेळी तिच्यापासून हिरावले गेले.  ऑस्ट्रियात जन्म ,जर्मनीत कर्म स्वीडन मध्ये आश्रय आणि वयाच्या नव्वदाव्या वर्षी इंग्लंडमध्ये दफन अशी तिची कर्मकहाणी.

Thursday, January 16, 2020

त्यांची ही संक्रांत

त्यांची ही संक्रांत 
नेहमीप्रमाणे नेहमीच्या स्टेशनवर तो माझ्या डब्यात शिरला. ती विशिष्ट टाळी ऐकून मी पुस्तकात घातलेली   मान वर केली.त्याचवेळी आमची नजरानजर झाली आणि तो ओळखीचे हसला.माझ्याही चेहऱ्यावर ओळखीचे हास्य पसरले.
आज तो संक्रांतीची काळी साडी नेसुनच आला होता . हलव्याचे दागिने म्हणून पांढरे दागिने अंगावर होते . सर्वांजवळ फिरून झाल्यावर माझ्या शेजारी येऊन बसला.
"संक्रात जोरात आहे तुझी ..." मी हसत म्हणालो . "धंदा आहे भाऊ ... तो टाळी वाजवत हसत म्हणाला . जसा सण तसे राहावे लागते.तरच कोणतरी आपले मानून पैसे देईल.
" खरे आहे... मी म्हटले. यावेळी त्याच्या खांद्यावर पर्स ऐवजी पिशवी बघून मी चमकलो.
"यात काय आहे ....?? पैश्याऐवजी वस्तू ही घेतोस का...."?? मी नजर रोखून विचारले.
तसे त्याने पिशवी उघडून दाखवली.आतील वस्तूवर नजर जाताच मी चमकलो . पिशवीत दहा पंधरा सॅनिटरी पॅड होते.
"हे कशासाठी ...?? तुम्हाला याची गरज भासते का ...."?? मी अज्ञान प्रकट केले.
"हे माझ्यासाठी किंवा आमच्यासाठी नाही भाऊ . पण संक्रातीला स्त्रिया वाण देतात.हळदीकुंकू करतात . त्या निमित्ताने चार स्त्रिया एकत्र येतात .. लेडीज डब्यातही हळदीकुंकू मोठ्या प्रमाणात साजरा होतो . मी कालपासून सगळ्या लेडीज डब्यात सांगून आलोय मला पैसे नकोत फक्त एक सॅनिटरी पॅड द्या . भाऊ आमच्या वस्तीत आणि आजूबाजूला खूप वयात येणाऱ्या मुली राहतात . गरिबीमुळे त्यांना ह्या वस्तू विकतही घेता येत नाहीत . काहीजणी ब्रिजखालीही राहतात . सर्वच जण पोटाच्या मागे . ह्या शारीरिक गोष्टीकडे कोण लक्ष देत नाही . म्हणून मी ठरवले यावेळी काही दिवस  कोणत्याही स्त्रीकडून पैसे घ्यायचे नाही तर एक पॅड घ्यायचे . आता दुपारी जेवायला जाईन तेव्हा जमतील तितके पॅड मुलींना वाटून टाकेन. भाऊ.....!!  समाजसेवा फक्त तुम्हालाच जमते का ....?? आम्ही ही याच समाजात राहतो . आमचाही काही हिस्सा असू दे ..तो हसत हसत म्हणाला.
मी भारावलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले . काही न बोलता खिशातून शंभर रुपयांची नोट काढून त्याला दिली.
" अरे नको भाऊ.. ... !! तुमचा नियम तुमची तत्वे मोडू नका.भरपूर आहेत इथे पैसे देणारे...." तो माझा हात पकडत म्हणाला.
" हे तुझ्यासाठी नाही .यातून काही पॅड विकत घे आणि गरजवंतांना दे . या पैशाचा योग्य उपयोग तूच करशील याची खात्री आहे मला...."
आज त्यांच्यातील माणुसकीची वेगळीच ओळख झाली मला .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, January 14, 2020

आंधळ्या बाईचे वंशज .... अनीस सलीम

The Blind Lady's Descendants 
आंधळ्या बाईचे वंशज .... अनीस सलीम
अनुवाद .....श्यामल चितळे 
मेहता पब्लिकेशन
ही आहे एका मुस्लिम कुटुंबात घडणारी कथा . कथेत एक आंधळी आजी आहे . तिच्या घरात ... मुलगी ..जावई ..आणि तिची नातवंडे राहातायत.
तिचा एक नातू अमर या कथेचा नायक. तो नास्तिक आहे . नमाज पडणे त्याला मान्य नाही . आपला भाऊ आणि बहिणीबद्दल त्याला फारसे प्रेम नाही . स्वतःच्या स्वप्नरंजनात तो मग्न आहे .त्याने आपल्या मोठ्या बहिणीचा अपघाती मृत्यू अनुभवला आहे . तर  नानीला झोपेचे औषध खिरीतून पाजताना आईला पाहिले आहे .वडिलांचा हृदविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू पहिला आहे . वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तो आपली कथा काल्पनिक श्रोत्यांना सांगतोय आणि या कथेतून बऱ्याच आठवणी बाहेर पडतात .हे पुस्तक म्हणजे एका कुटुंबाची गुंतवून  टाकणारी कथा आहे . एका कुटुंबाची जगण्यासाठीची धडपड...भीती...कष्ट ...महत्त्वाकांक्षा अश्या सर्व गोष्टी आहेत .
नायकाने ही कथा सांगताना विनोदाचा साज चढविला आहे . त्यामुळे त्यांचे संवाद वाचताना खूप हसू येते .
"द हिंदू "चे 2013 सालचे पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट पुस्तक .

Wednesday, January 8, 2020

ती कुठे काय करते ...??

ती  कुठे काय करते ....
पहाटे पाचचा गजर होताच तिचे डोळे खाडकन उघडले.दुसऱ्या मिनिटाला ती बाथरूममध्ये घुसली होती.नंतर अर्धा तास घरातल्याच ट्रेंडमिलवर धावून शरीर मोकळे केले आणि  मग ती किचनमध्ये घुसली.
 घरातील सर्व नेहमीप्रमाणे झोपले होते.आज टिफिन काय...??  असा नेहमीचाच प्रश्न स्वतःला विचारला आणि मग स्वतःशी हसत चहाचे आधण ठेवून पुन्हा बाथरूममध्ये घुसली.आंघोळ करून बाहेर येईपर्यंत चहा उकळला होता . स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी चहा घेऊन तिने बेडरूममध्ये प्रवेश केला.घोरत पडलेल्या नवऱ्याकडे पाहत ती प्रेमाने हसली आणि त्याचे बोट हातात घेऊन चहात बुडविले. टुणकन उडी मारूनच तो जागा झाला.रागाची एक ठिणगी डोळ्यात दिसली पण तिचा हसरा चेहरा पाहून तो शांत झाला.
" तू सरळ हलवून उठवू शकत नाहीस का ...?? रोज उठवायचे नवीन प्रकार असतात तुझ्याकडे ..." तो चिडून म्हणाला.
"तू सरळ उठणार आहेस का ....?? मला वेळ नाही तुझे लाड करायला....  रोज सकाळी एकत्र चहा पितोय ते पुरे..." ती चहाचा कप हातात देऊन म्हणाली.चहा संपताच ती परत किचनमध्ये घुसली आणि तो बाथरूममध्ये . तिने भाजी फोडणीला टाकली आणि पिल्लूच्या बेडरूममध्ये धावली. बेडवर ती शांतपणे झोपली होती. मध्येच मंद हसत होती . बहुतेक छानसे स्वप्न पाहत असावी . तिला अश्या वेळी उठवायचे तिच्या जीवावरच आले होते . पण शाळा बुडवून चालणार नव्हते . तिने अलगद झुकून तिच्या गालावर ओठ ठेवले." गुड मार्निंग बेटा .. उठ उठ शाळेत जायचे आहे ना .....??  तसे तिने नाराजीने कुस बदलली.हिने पुन्हा गालावर ओठ ठेवून गुड मॉर्निंग म्हटले तशी ती जागी झाली.
" ममा... तू दुष्ट आहेस .. तिने गाल फुगवून म्हटले  आणि तिच्या गळ्यात हात टाकून छान पप्पी घेतली. "हो ..आहेच दुष्ट पण चल तयारी कर पटकन .. शाळेत उशीर नको..... 
"मम्मी आज खायला काय आहे ....??? आणि डबा ...."?? तिने टूथब्रश तोंडात कोंबून विचारले.
" तुझ्या आवडीची मॅगी आणि डब्यात भाजी चपाती.."तिचे उत्तर तयार होते .
"शी बाबा... तू डब्यात मॅगी का देत नाहीस ...?? ती कुरकरली.
"कारण तुझ्या शाळेत त्याची परवानगी नाही .."
ती आंघोळीला गेल्यावर तिने नाश्ता ,टिफिन तयार केला . तोपर्यंत सासूबाई आल्या.
"आई ..पिलू बाहेर आल्यावर नाश्ता द्या .तोपर्यंत मी माझी तयारी करते ."असे बोलून बेडरूममध्ये पळाली.
 ती फ्रेश होऊन बाहेर आली तोपर्यंत पिलूची तयारी झाली होती.तितक्यात नवरा ही तयार होऊन आला होता. तिने पिलूची बॅग स्वतःच्या पाठीवर घेतली तशी सासू ओरडली " तिची बॅग तिलाच घेऊ दे ..फार लाडवून ठेवू नकोस .
"राहू द्या हो आई .... गेटपर्यंतच तर जायचंय.बसमध्ये तीच घेणार आहे .."असे बोलून तिने मुलीला जवळ घेतले. अचानक तिच्या नाकाला परफ्यूमचा सुगंध आला." हे काय ....?? कोणता परफ्यूम लावलास .. मला हा वास आवडत नाही माहितीय ना तुला ...?? तिने थोडे  रागानेच म्हटले.
"पण मला आवडतो ... तिने ही गाल फुगवून म्हटले.
" बरे बाबा ....उगाच गाल फुगवू नकोस ."तिने हात जोडले आणि बाहेर घेऊन गेली. बसमध्ये बसवून ती परत आली तेव्हा सासूबाई नवरा तिची वाट पाहत होते . तिघांनी मिळून नाश्ता केला. ही पुन्हा तयारी करायला बेडरूम मध्ये घुसली नवऱ्याने तिला जातो अशी आरोळी दिली .तिने आतूनच ओ म्हटले .
काही वेळाने ती ऑफिसच्या ड्रेस मध्ये बाहेर आली . ब्लॅक पॅन्ट..,व्हाईट शर्ट ..वर ब्लॅक ब्लेझरमुळे तिचे रूप पूर्ण पालटून गेले होते . बिल्डिंगच्या गेटवर उभी राहिली पण तिची कार अजून आली नव्हती .पाच मिनिटाने तिची कार आली  आणि दरवाजा उघडताच शोफरवर ती डाफरली .. इतका उशीर कसा ....?? पाच मिनिटे उभी आहे मी इथे ..."कारमध्ये बसताच एअर फ्रेशनरने तिचे तोंड वाकडे झाले ."खबरदार यापुढे हा एअर फ्रेशनर गाडीत मारलास तर ....."
काही मिनिटाने तिने आपल्या ऑफिसमध्ये झोकात प्रवेश केला . त्या कंपनीची ती व्हाईस प्रेसिडन्ट होती . आल्या आल्या तिच्या मिटिंग चालू झाल्या . व्हिडीओ कॉल ,कॉन्फरन्स यात ती पूर्ण बुडून गेली . काही करोडोचे डिल तिने फायनल केले .
संध्याकाळी थकून ती घरी निघाली . बिल्डिंग जवळ येताच तिने गाडी सोडून दिली .गेटमधून आत शिरताना  तिला फोन आला . "अग..येताना एक किलो कांदे आणि कोथिंबीर घेऊन ये ... आणि सकाळच्या नाश्त्याला अंडी .. तुझ्या पोरीने कांदा भजीची फर्माईश केलीय आणि बाप बनवून देणार आहे . उद्या नाश्त्याला ऑम्लेट हवेय .  घेऊन ये ... फोनवरूनच सासूबाईनी ऑर्डर सोडली .
अरे बापरे ...!! उद्याचे राहिलेच .तिने होय म्हटले आणि आल्या पावली परत बाजाराच्या दिशेने निघाली .
ती कुठे काय करते ....??
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

Tuesday, January 7, 2020

ते १२७ तास .... अनुवाद ...रेश्मा कुलकर्णी -पाठारे

127 HOURS  Between a rock hand place. अँरन रालस्टन 
ते १२७ तास .... अनुवाद ...रेश्मा कुलकर्णी -पाठारे
मेहता पब्लिकेशन
अँरन  हा गिर्यारोहक आहे .अति आत्मविश्वास हा त्याचा दुर्गुणच आहे . त्यामुळे तो अनेक वेळा जिवावरच्या संकटात सापडला आणि नशिबाने वाचलाही.आताही तो कॅनियन बेटावर अतिशय दुर्गम भागात गिर्यारोहणासाठी निघालाय . त्याने आपल्या प्रवासाची माहिती कोणालाच दिली नाही .या आधी ही त्याने असे केले होते .अचानक काही ठरविणे हा त्याच्या स्वभावाचा भाग होता.
त्या भागात फिरताना अचानक तो एका खिंडीत पडला. त्याच्या उजवा हात 800 पौडच्या दगडाखाली अडकला आणि दगड घट्ट बसला . पण त्यापुढचे सहा दिवस त्याच्यासाठी  फक्त नरकयातना देण्यासाठी ठरले . अन्न नाही ...पुरेसे पाणी नाही..एक हात दगडाखाली गच्च अडकलेला...आजूबाजूला लोकवस्ती नाही. दिवसा रणरणते ऊन तर रात्री हाड गोठवणारी थंडी.त्यावेळी त्याच्यस भयानक  मनस्थितीचे वर्णन अंगावर काटा आणते. वेळ काढण्यासाठी त्याने आपल्या गतजीवनातील आठवणी जागवल्या . स्वतःचे व्हिडीओ शूटिंग केले . फोटो काढले .  पण आता शेवटी अन्न पाणी संपल्यावर आपण इथेच अडकून मरणार ही जाणीव झाल्यावर अचानक आणि क्रूर पद्धतीने त्याने स्वतःची सुटका केली. शेवटी 127 तासाने तो मोकळा झाला .या घटनेवरून 127 अवर्स हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता .
 अंगावर काटा आणणारे आणि जगण्याची प्रेरणा देणारे पुस्तक .
© किरण कृष्णा बोरकर

Wednesday, January 1, 2020

घेई छंद .... सुबोध भावे

घेई छंद .….. सुबोध भावे
शब्दांकन ....अभय अरुण इनामदार 
ग्राफ्ट 5 पब्लिकेशन्स
एखाद्या उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती कशी होते ...?? ती निर्मिती घडविण्यामागे काय कारणे असतात...?? ती पूर्ण करण्यात किती आणि कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात ....?? याची कल्पना प्रेक्षकांना रसिकांना नसते . ते फक्त ती पूर्ण झाल्यावर तिचा आस्वाद घेतात आणि मनापासून दाद देत डोक्यावर ही घेतात . त्यावेळी निर्मितीकाराचा आनंद हा फक्त त्यालाच अनुभवता येतो.
हे पुस्तक म्हणजे सुबोध भावेचे आत्मचरित्र नाही तर अश्याच काही त्यांनी निर्मिती केलेल्या कलाकृतींची पडद्यामागील कहाणी आहे. 
साधारण एखादा लोकप्रिय अभिनेता निर्मिती क्षेत्रात उतरतो तेव्हा त्याला खूप सोपे जात असेल असे आपल्याला वाटते . पण पैसे ..जागा ...कलाकार.. वेळ ...अश्या अनंत अडचणींना त्याला सामोरे जावे लागते .
सुबोध भावेनी या पुस्तकात कट्यार काळजात घुसली हे नाटक आणि बालगंधर्व ,लोकमान्य ,आणि कट्यार काळजात घुसली  या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी सांगितली आहे . त्यामागे त्यांची सहकलाकाराना घेऊन केलेली धडपड , शूटिंगच्या वेळी येणाऱ्या अडचणी ,निर्मितीमागची प्रेरणा ,बुजुर्ग कलाकारांनी केलेली मदत ,इतकेच नव्हे तर आपल्या या वेडाचे कुटुंबावर होणारे छोटे छोटे परिणाम ही सांगितले आहे .
आपणांस आवडलेल्या कालाकृतीमागे कितीजणाचे  कष्ट आहेत...अविश्रांत मेहनत आहे हे जाणून घ्यायचे असेल तर घेई छंद नक्कीच वाचायला हवे.
© श्री. किरण कृष्णा बोरकर