Thursday, December 22, 2022

लंडन हॅज फॉलन (londan has follen )

लंडन हॅज फॉलन (londan has follen )

अंजल हॅज फॉलन ( angle has fallen )
ओलंपास हॅज फॉलन ( olympus has fallen )
या तिन्ही चित्रपटात एकच सूत्र आहे .अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाना ठार मारणे.पण त्यासाठी कोणत्या योजना आखल्या जातात आणि नायक एकहाती त्या कश्या धुळीस मिळवतो हे पाहण्यासारखे आहे .अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असूनही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाना कसे कोंडीत पकडले जाते त्यासाठी दहशतवाद्यांनी आखलेले प्लॅन्स पाहून प्रेक्षक अचंबित होतात .
ब्रिटिश पंतप्रधानांचा मृत्यू होतो आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जगभरातील राष्ट्रप्रमुख लंडनमध्ये एकत्र येतात .माईक हा अमेरिकेच्या राधट्राध्यक्षांचा प्रमुख सिक्युरिटी ऑफिसर असतो .त्याने याआधीही दोन वेळा राष्ट्राध्यक्षाना वाचविलेले असते.त्याचा आक्षेप असूनही राष्ट्राध्यक्ष लंडनला अंत्यसंस्कारासाठी जायचे ठरवितात .नाईलाजाने माईकला होकार द्यावा लागतो.
सर्व राष्ट्रप्रमुख लंडन येथे जमतात आणि लंडन शहर अतिरेक्यांच्या ताब्यात जाते.ते प्रथम लंडन शहरातील वीज बंद करतात .कॉम्प्युटर हॅक करतात .ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून रहदारी बंद करतात .यात काही देशांचे राष्ट्रप्रमुख मारले जातात..माईक हुशारीने राष्ट्राध्यक्षाना बाहेर काढायचा प्रयत्न करतो .काही अतिरेकी पोलिसांच्या वेशात आहेत तर लंडनच्या गुप्तहेर संघटनेतही अतिरेकी आहेत . माईक कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही .त्याला कसेही करून राष्ट्राध्यक्षाना अमेरिकन दूतावासात पोचवायचे आहे .
अमेरिकन राष्ट्राध्यक्षाना जिवंत पकडून लाईव्ह हत्या करायची आणि जगभरात त्याचे प्रसारण करायचे अशी अतिरेक्यांची योजना आहे .माईक त्यांची योजना हाणून पाडेल का ??
चित्रपट प्राईमवर आहे .

Saturday, December 17, 2022

वधांधी..द फेबल ऑफ वेलोनी

वधांधी..द फेबल ऑफ वेलोनी
अमेझॉन प्राईम
कन्याकुमारीतील छोट्या गावातील एका शेतात वेलोनीचा मृतदेह सापडतो.तो आधी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा असल्याचा मीडियावर प्रसिद्ध होते पण नंतर ती अभिनेत्रीच या गोष्टीचा खुलासा करते. मग ही कोण ?? 
तिच्या छायाचित्रावरून एक तरुण ती वेलोनी असल्याचे सांगतो.वेलोनी आपल्या आईसोबत राहत होती.तिच्या आईचे लॉज असून ती स्वभावाने खूप कडक आहे.वेलोनीचा मृतदेह पाहून ती कोसळून पडते.
 मीडियावर पुन्हा तिच्या खुनाला प्रसिद्धी मिळते.म्हणून ती केस विवेकवर सोपवली गेली.विवेक हुशार आहे थोडा सेन्सिटिव्हही आहे .त्याने वेलोनीच्या केसवर काम करायला सुरवातही केली. पण म्हणावे तसे यश येत नाही .वेलोनीचा होणारा नवरा दारू पिऊन आत्महत्या करतो आणि तोच वेलोनीचा खुनी आहे असे दाखवून केस बंद करण्यात येते. 
पण तो खुनी नाहीय याची खात्री विवेकला आहे. पण वरून दबाव असतो त्यामुळे ती केस पुन्हा ओपन करायची परवानगी वरिष्ठ देत नाही.
आपल्याकडून वेलोनीला न्याय मिळत नाहीय हे पाहून विवेक खूप अस्वस्थ होतो .तो आपल्या परीने ही केस सोडविण्याचा प्रयत्न करतोय .त्यासाठी त्याने आपल्या चार वर्षाच्या इन्क्रीमेंटवर पाणी सोडलंय. आपल्या पत्नीशी होणारे वाद टाळतोय.त्याला काहीही करून वेलोनीच्या खुन्याला पकडायचे आहे त्यामागचा हेतू शोधून काढायचा आहे .
तिच्या लॉजमध्ये एक लेखक राहायला आला होता.वेलोनीने आपली कहाणी मनातल्या भावना त्याला सांगितल्या होत्या.त्याने तिच्यावर पुस्तक लिहिले .खुनाच्या वेळी तोही कन्याकुमारीत होता.विवेक त्यांच्यापर्यंत ही पोचला .त्याने विवेकला जी काही माहिती दिली ती विवेकला उपयोगी पडेल ?? 
प्रत्येकवेळी खुन्याच्या जवळपास जाऊन विवेकला दुसरेच रहस्य कळत होते. एकदा तर संशयाची सुई वेलोनीच्या आईकडे ही वळते.पण तिथेही तो चुकीचा ठरतो .
वेलोनी वाईट चालीची मुलगी आहे असा मीडिया प्रसार करत असतो .पण विवेक आपल्या परीने तो हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत असतो .
शेवटी अचानकपणे एक वेगळेच सत्य विवेकसमोर येते आणि संपूर्ण रहस्याचा उलगडा होतो.
आठ एपिसोडमध्ये असलेली ही साऊथची सिरीज हिंदी भाषेत डब आहे. कुठेही हाणामारी नाही .शिव्या नाहीत .अतिशय शांत आणि संयमित वातावरणात ही सिरीज चालते .

Wednesday, December 14, 2022

तक्षशिला-पाटलीपुत्र- झंझावात

तक्षशिला-पाटलीपुत्र- झंझावात
चाणक्य-चंद्रगुप्त-अशोक- त्रिधारा  कादंबरी -दोन
श्रेयस भावे
अनुवाद..अनघा नाटेकर
राजहंस प्रकाशन 
सम्राट बिंदुसार आता वृद्ध झालाय .त्यानंतर त्याचा थोरला मुलगा सुमेष सम्राट होईल असेच सर्वजण समजून चालतायत.पण आर्य चाणक्याना ते मंजूर नाही. चंद्रगुप्ताला हाताशी धरून त्याने हे साम्राज्य उभे केलेय.पण आपल्या आईच्या हत्येला कारणीभूत ठरवून बिंदुसारने चाणक्यला हद्दपार केले होते.पण चाणक्यने कधीही हार मानली नाही. चिरंतन वैदिक कृतीदलाची साथ घेऊन त्याने शहराबाहेर वेश्यालय सुरू केलंय आणि आपल्या हेरांचे जाळे सगळ्या राज्यात पसरविले आहे. 
राजपुत्र सुमेष अर्ध यवन आहे .म्हणजे त्याची आई ग्रीक होती . म्हणूनच तो सम्राट होणे चाणक्यला मान्य नाही .मग दुसरा उत्तराधिकारी कोण असेल ?? अशोक बिंदुसारचा ९८ वा पुत्र. त्याची आई वैश्य आहे आणि तो बिंदुसारचा नावडता पुत्र.लहानपणापासूनच त्याला सैनिकांसोबत वाढविले गेले .त्याने सतत लढाया केल्या.त्यामुळेच तो क्रूर आहे.
राजपुत्र सुमेषचे इतर भाऊ दारू आणि स्त्रियांत मग्न आहेत.त्यांना फक्त ऐशआराम हवाय. चाणक्यने सम्राटपदासाठी अशोकची निवड करून  त्याप्रमाणे योजना तयार केली.त्याने बिंदुसारच्या पुत्रांना एकत्र पाटलीपुत्रात जमा केले आणि त्या सर्वांची अशोकाकरवी हत्या केली.त्याआधी त्याने एक षडयंत्र आखून अशोककडूनच राजपुत्र सुमेषच्या अश्वमेध घोड्याची हत्या केली होती आणि सुमेषच्या मनात अशोकाविषयी द्वेष निर्माण केला.
आता अशोक पाटलीपुत्रच्या सिंहासनावर बसून सुमेषची वाट पाहतोय.त्याच्यासोबत त्याची प्रेयसी देवी आहे.देवी हुशार आहे .ती उत्तम वैद्य आणि उत्कृष्ट नर्तिका आहे .पण ती शूद्र आहे.आणि एक शूद्र स्त्री सम्राटाची पत्नी होणे चाणक्यला मान्य नाही .योग्य वेळ येताच तो तिलाही अशोकपासून दूर करेल .
पाटलीपुत्र बाहेरून जिंकणे कोणालाही शक्य नाही ते आतूनच जिंकता येईल.हेच सूत्र चाणक्य आणि चंद्रगुप्ताने पन्नास वर्षांपूर्वी वापरून पाटलीपुत्र जिंकले होते.पाटलीपुत्रात जमिनीखाली असंख्य भुयारांचे जाळे आहे .त्यांचा योग्य मार्ग चाणक्यशिवाय कोणालाही माहीत नाही.चिरंतन वैदिक कृतीदलाचे सदस्य या भुयारांचे रक्षण करतायत .
सर्व काही आचार्य चाणक्यच्या योजनेनुसार घडेल का ??
अशोक चाणक्यच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करेल ?
प्रचंड सैन्य घेऊन स्वारी करायला निघालेल्या सुमेषचा पराभव अशोक कसा करेल ??
चाणक्य-चंद्रगुप्त-अशोक त्रिधारातील ही दुसरी कादंबरी 
 

Monday, December 12, 2022

यशोदा

यशोदा
यशोदा सोरोगेट आई बनणार आहे.कारण ती गरीब आहे आणि तिच्या छोट्या बहिणीच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत.तिला सरकारी हॉस्पिटलमधिल एका नर्स ने हा सल्ला दिला. चांगले पैसे मिळणार होते म्हणून तिने नाईलाजाने हा मार्ग स्वीकारला. तीन महिन्यानंतर तिच्या घरी पैसे घेऊन एक माणूस आला आणि तिला गाडीतून घेऊन गेला.
आता ती मोठ्या इमारतीत आहे.तिची रूम खूप आलिशान आहे. योगा ,सकस अन्न रोजच्या रोज तपासणी करून तिच्या तब्बेतीची काळजी घेतली जातेय.पण कुठेतरी काही  खटकतंय . तिच्यासोबत अनेक मुली आहेत ज्या सोरोगेट आई बनायला आल्यात. त्या सर्वांना पैश्याची गरज आहे. पण इथे कोणालाच घरच्यांशी संपर्क ठेवता येत नाही. त्यांना दिवस रात्र कळत नाही. किती वाजलेत ते कळत नाही. हळूहळू यशोदा त्यामागची कारणे शोधून काढायचा प्रयत्न करते आणि वेगळ्याच संकटात फसते.
दुसऱ्या एका घटनेत एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आपल्या खोलीत मृतावस्थेत सापडते . एक अनोळखी ड्रग घेतल्यामुळे तिचा मृत्यू झालाय हे सिद्ध होते.
अजून एका घटनेत एका प्रसिद्ध मॉडेलचा अपघाती मृत्यू होतो .पण तो अपघात नसून खून आहे असे एका पोलीस अधिकाऱ्याला वाटते .
यशोदा जे काही शोधायचा प्रयत्न करतेय त्याच्या या दोन्ही घटनांशी संबंध असेल का...?? 
मग त्यासाठी यशोदा पाहायला हवाच .
साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री सामंथा यशोदाच्या भूमिकेत आहे .संपूर्ण चित्रपट तिने व्यापून टाकलाय .

Wednesday, December 7, 2022

चूप

चूप
त्या कमोडवरच बसलेला त्याचा मृतदेह सापडतो. तोंड प्लॅस्टिकच्या पातळ पेपरने गुंडाळलेले.संपूर्ण अंगावर पद्धतशीरपणे वार केले होते.त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. कोणीतरी अमानुषपणे त्याला मारले होते.पण तो तर एक साधा चित्रपट समीक्षक होता.दर शुक्रवारी  प्रदर्शित होणाऱ्या नवीन चित्रपटाचे समीक्षण लिहिण्याचे काम होते त्याचे. मग त्याचा खून कोण करेल आणि का ?? खुन्याने त्याच्या कपाळावर काही स्टार कोरलेले असतात .त्याचा खुनाशी संबंध असेल का ?? 
वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद माथूरकडे ही केस येते. काही दिवसांनी दुसऱ्या समीक्षकाचा खून होतो.त्याचे प्रेत रेल्वे ट्रॅकवर सापडते .हा नक्कीच सिरीयल किलर आहे हे पक्के होते आणि तिसऱ्या समीक्षकाचा मृतदेह किकेटच्या मैदानात सापडतो .यावेळी त्याच्या शरीराचे तुकडे अनेक ठिकाणी पसरून ठेवलेले असतात .
अरविंद माथूर आता खुन्याला पकडण्यासाठी डॉ. झेनोबीया श्रॉफ या क्रिमिनल सायकॉलॉजी तज्ज्ञ स्त्रीची मदत घेतो. तिच्या मदतीने तो संपूर्ण केसचा अभ्यास करून एक योजना बनवतो .पण तो यशस्वी होईल का ?
डॅनी एक फुल विक्रेता तरुण.बांद्रामध्ये त्याचे घर आणि फुलांचे दुकान आहे . नीला मेननला हवी असलेली ट्युलिपची फुले फक्त त्याच्याकडेच मिळतात .डॅनी गुरुदत्तचा फॅन आहे .त्याचा शेवटचा चित्रपट कागज के फूल डॅनीला फार आवडतो आणि हाच चित्रपट फ्लॉप झालाय याची सल त्याला असते. त्याचे आणि नीलाचे एकमेकांवर प्रेम आहे. अरविंद माथूरने खुन्याचे सावज म्हणून नीलाचीच निवड केलीय. उद्या काय वाईट घडले तर डॅनीचे काय होईल..??
अरविंद माथूरची संयमित भूमिका सनी देओलने छान उभी केलीय. तर मामुटीचा मुलगा दुलकर सलमान डॅनीच्या भूमिकेत शोभून दिसतो. अतिशय सहज आणि सुंदर अभिनय आहे त्याचा . श्रेया धन्वंतरी नीला मेननच्या भूमिकेत भाव खाऊन जाते .तर डॉ. झेबोनिया श्रॉफच्या छोट्या भूमिकेत पूजा भट बऱ्याच वर्षांनी दिसलीय.
या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर गुरुदत्तचा कागज के फूल व्यापून राहतो.त्याच्या चित्रफिती ,गाणी संपूर्ण चित्रपटात आपल्या सोबत राहतात.महान कलाकार गुरुदत्त याना ती एकप्रकारे आदारांजलीच आहे .
चित्रपट कुठेही वेडीवाकडी वळणे घेत आपल्याला चकित करत नाही. उलट खुनी कोण असेल याचा अंदाज आपण फार लवकर बांधतो .फक्त तो पकडला कसा जाईल याची उत्सुकता प्रेक्षकांना असते .

Sunday, December 4, 2022

मॉन्स्टर

मॉन्स्टर
अनिल चंद्रा आय टी चा जॉब सोडून एका खाजगी टॅक्सी वाहतुकीच्या धंद्यात घुसतो .आता त्याचा धंदा नुकसानीत चालू आहे. त्याची बायको भामिनी त्याच कंपनीत टॅक्सी चालविते आहे .त्यातच अनिल चंद्राचा छोटा अपघात झालाय. भामिनी त्याची दुसरी पत्नी पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे.आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे .
भमिनीला आज एका कस्टमरला एअरपोर्टपासून पीक अप करायचे ड्युटी आहे. त्याने दिवसभर तिची टॅक्सी बुक केली होती.कस्टमर एक पंजाबी पुरुष आहे.लकीसिंग नावाचा तो कस्टमर एकदम हसतमुख होता.योगायोगाने तो जो फ्लॅट विकायला आलाय तो नेमका भामिनीच्या सोसायटीमधील होता. 
दुपारी लकीसिंगला वेळ होता म्हणून तो अनिल आणि भामिनीच्या घरी वाढदिवस साजरा करायला जातो.तो आपल्या हसतमुख स्वभावाने सगळ्यांवर छाप पाडतो .मध्येच तो वकिलाला पैसे देण्यासाठी भामिनीला पाठवतो आणि त्यावेळेत अनिल चंद्राची गोळ्या घालून हत्या करतो. हत्येचा विडिओ आणि बंदूक पोलिसांना सापडेल अश्या पद्धतीने ठेवतो .नंतर तो अनिल चंद्राचे शव भामिनीच्या टॅक्सीत ठेवतो आणि एअरपोर्टवर निघून जाते.
एअरपोर्टवरून भामिनी घरी येते तेव्हा तिची मुलगी आणि अनिल चंद्रा दोघेही गायब झालेले असतात.ती त्यांचा भरपूर शोध घेते शेवटी पोलीस तक्रार करते.
पोलिसांना त्याचे प्रेत भामिनीच्याच टॅक्सीत सापडते.पुरावाही घरी सापडतो.पोलीस तिला अनिल चंद्राच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करतात .लकीसिंग नावाचा कोणीही व्यक्ती भामिनीच्या घरी आला नाही असे वॉचमन सांगतात.सर्व पुरावे भामिनीच्या विरुद्ध आहेत आणि मध्यंतर होतो.
मोहनलालची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मध्यंतरापर्यंत अतिशय हलका फुलका वाटतो.लकीसिंगचा गमतीदार स्वभाव ,त्याचे भामिनीच्या घरी येऊन जेवण करणे ,मुलीसोबत खेळणे यावरून पुढे काय घडणार याचा अंदाज प्रेक्षक बांधत बसतो . मध्यंतरानंतर जे घडते ते अतिशय वेगवान आणि आश्चर्यचकित करणारे आहे . लकीसिंग कोण आहे?? तो अनिल चंद्रा सारख्या आजारी आणि कर्जबाजारी व्यक्तीची हत्या का करतो ? तो भामिनीला यात का अडकवितो ?? याची उत्तरे तुम्हाला मध्यंतरानंतरच मिळतात.
चित्रपट मोहनलाल व्यापतो पण हनी रोजने भमिनीच्या भूमिकेत त्याला उत्तम साथ दिली आहे.जी जितकी सुंदर दिसते तितकाच सुंदर अभिनय केला आहे . चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.

Friday, December 2, 2022

कथा परमवीरचक्र विजेत्यांच्या आणि ऑपरेशन सदभावना

कथा परमवीरचक्र विजेत्यांच्या आणि ऑपरेशन  सदभावना
अनुराधा विष्णू गोरे
ग्रंथाली प्रकाशन 
सैन्यदलात सर्वोच्च पुरस्कार म्हणून परमवीर चक्र ओळखले जाते.आपल्या जीवाची बाजी लावून युद्धात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या सैनिकाला परमवीरचक्र पुरस्काराने गौरविले जाते.
1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि  त्यानंतर 1947 ते 1999 या कालावधीत झालेल्या युद्धात केवळ एकवीसजणांना परमवीरचक्राचा बहुमान मिळाला.
1947 साली भारत पाक युद्धात मेजर सोमनाथ शर्मा हे पहिले परमवीरचक्र मानकरी ठरले त्यानंतर झालेले भारत चीन युद्ध , कांगोमधील शांतिसेनेत कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया तर 1999 कारगील युद्धात परमवीरचक्र मिळविणाऱ्या सर्व वीरांच्या कहाण्या आहेत.
युद्धात दाखविलेली त्याची अतुलनीय आणि अचाट कामगिरी वाचून आपल्याला भारतीय सैन्यदलाचा अभिमान वाटतो.
ऑपरेशन सद् भावना 
भारतीय सैन्यदल युद्धात जितके क्रूर आणि कठोर आहेत तितकेच ते शांतीप्रिय आणि मानवतावादी हळवेही आहेत.त्यांचे हे रूप ऑपरेशन सद् भावना मोहिमेत दिसून येते.जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात आणि ईशान्य भारतात सैन्यदलाने स्थानिकांचा विश्वास संपादन करून अनेक योजना राबवील्या .त्यासाठी त्यांनी सामान्य जनतेचे सहाय्य घेतले.शाळा कॉलेज ,वैद्यकीय सेवा सुरक्षितपणे सुरू केल्या.भारतातील इतर राज्यांच्या संस्कृतीची ओळख करून दिली.तिथल्या तरुण विद्यार्थ्यांना भारताची सफर घडवून दिली. जसजसे ऑपरेशन सद् भावना यशस्वी होत गेले तसंतसे सैन्यदलाने आपला सहभाग कमी करून ते जनतेला अर्पण केले.ऑपरेशन सद् भावनामध्ये सामान्य नागरिकही कसे सहभागी होऊ शकतात याची माहिती यात दिली आहे .
प्रत्येक भारतीयांना आपल्या सैन्यदलाचा अभिमान वाटेल असे हे पुस्तक आहे