Tuesday, October 31, 2023

पोलीस स्टोरी लॉकडाऊन

पोलीस स्टोरी लॉकडाऊन
Police story Lockdown
त्या दिवशी डिटेक्टिव्ह झोन्ग वेन आपल्या मुलीला भेटायला वू बारमध्ये गेला होता. मिओ डॉक्टर होती आणि वू जियांगची गर्लफ्रेंड होती. वू जियांग वू बारचा मालक होता.
आपले वडील पोलीस ऑफिसर आहेत हे मिओने वू जियांगला सांगितले नव्हते. आज बारमध्ये जास्तच गर्दी होती.झोन्ग वेनचे आपल्या मुलींबरोबरचे संबंध थोडे ताणलेले होते.पण तरीही त्याचे मुलीवर प्रेम होते.
झोन्ग वेन बारमध्ये आपल्या मुलीशी बोलत असताना वू जियांगने सर्व कस्टमरला बंदी बनवले.त्याने झोन्ग वेनला ही पकडले. सर्वांच्या सुटकेच्या बदल्यात त्याने तुरुंगातील एका कैद्याच्या सुटकेची मागणी केली .
झोन्ग वेनने त्याची मागणी पूर्ण करायची तयारी दाखवली .पण एका साध्या कैद्याची मागणी वू जियांग का करतोय हा प्रश्न त्याला पडला होता .
काय कसेल त्यामागचे कारण ? झोन्ग वेन  सर्वांची सुटका करेल का ? आपल्या मुलींबरोबरचे संबंध पूर्ववत होतील का ??
पोलीस स्टोरी सिरीजमधील हा चित्रपट 2013  ला रिलीज झाला.आता पोलीस ऑफिसर झोन्ग वेन म्हातारा झालाय.तो पूर्वीसारखा चपळ आणि गरम डोक्याचा राहिला नाही.त्याच्या हालचालींवर बंधन आलीत.पण आता तो शांतपणे विचार करतो.परिस्थितीला सामोरे जातो. सामोपचाराने वाद मिटवतो पण शक्य असेल तेव्हा प्राणपणाने लढतो .
प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.जॅकी चेन प्रेमींनी आवर्जून पाहावा.

Saturday, October 28, 2023

IRAIVAN

IRAIVAN
इराईवन
एसीपी अर्जुन कडक प्रामाणिक ऑफिसर आहे.त्याच्या सनकी स्वभावामुळे सगळेच घाबरून असतात.तो पोलीस असूनही कायदे पाळणारा नसतो.
शहरात तरुण मुलींचे क्रूरपणे खून होत असतात .खुनी स्वतःला स्मायली मॅन  म्हणवून घेतो.त्याला शोधण्याची जबाबदारी अर्जुन आणि आंद्रेववर आहे.अर्जुन आणि आंद्रेव खास मित्र.आंद्रेवची बहीण प्रिया अर्जुनवर प्रेम करतेय. खूप प्रयत्न करून अर्जुन स्मायली किलरला पकडतो पण त्यात आंद्रेव मारला जातो .या प्रकरणाचा धक्का बसून अर्जुन  नोकरी सोडून प्रियासोबत कॉफी शॉप उघडतो.
स्मायली मॅन तुरुंगातून पळून जातो.  तिथे अर्जुनची बहीण नाहीशी होते.अर्जुन पुन्हा स्मायली मॅनला पकडतो आणि पोलीस त्याला गोळ्या घालतात .
स्मायली मॅन एकटाच नाही तर अजून कोणीतरी त्याला मदत करतोय याची अर्जुनला खात्री पटते पण पोलीस त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.
शेवटी दुसरा स्मायली मॅन पकडला जातो का ? तो कोण आहे ? त्याची कोणती किंमत अर्जुनला द्यावी लागते.
जा
जयम रवीने अर्जुनची भूमिका जोशात केली आहे.तर नयनताराला प्रियाच्या भूमिकेत फारसा वाव नाही.स्मायली मॅन राहुल बोस भाव खाऊन जातो.
पण चित्रपट खूपच लांबला आहे.रक्तरंजित दृश्ये खूप आहेत त्या मानाने रहस्य फारसे नाही .उगाच लांबविला असे वाटते .
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Friday, October 27, 2023

बॉडीस

Bodies
बॉडीस
साल 1890 इंग्लंडमधील लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटवर  इन्स्पेक्टर आल्फ्रेड हिलींगवूडला एका माणसाची बॉडी सापडते .तो माणूस नग्न असतो .त्याच्या डोळ्यात गोळी घुसून मृत्यू झालाय . मनगटावर एक विशिष्ट निशाणी आहे.पण पोस्टमार्टेममध्ये गोळी सापडत नाही.
साल 1941 इंग्लमधील  पोलीस मुख्यालयात इंस्पेक्टर चार्ल्स व्हाईटमनला एक फोन येतो .लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटवर एक बॉडी पडलेली आहे  तिची विल्हेवाट लाव. व्हाईटमन तिथे जातो.तिथे एक नग्न बॉडी पडलेली आहे.तिच्या डोळ्यात गोळी घुसून मृत्यू झाला आहे .मनगटावर एक विशिष्ठ निशाणी आहे.व्हाईटमन ती बॉडी घेऊन जाताना एक सहकारी त्याचा पाठलाग करतो पण महायुद्धात होणाऱ्या बॉम्बहल्ल्यात दोघेही जखमी होतात .त्याचा फायदा घेऊन व्हाईटमन आपल्या सहकाऱ्याला ठार करतो आणि बॉडी त्याच्याच डिकीत सापडली असे भासवितो.
साल 2023 लंडनमध्ये काही लोकांनी आंदोलन केलंय.  महिला इंस्पेक्टर शहारा हसन  बंदोबस्तासाठी तिथे आहे.एक तरुण मुलगा संशयास्पदरित्या फिरताना तिला दिसतो .त्याच्या हातात बंदूक आहे.ती त्याचा पाठलाग करत लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटकडे जाते.तिथे तिला एक नग्न पुरुषाची बॉडी आढळते .त्याच्या डोळ्यात गोळी लागून मृत्यू झालेला असतो तर मनगटावर एक विशिष्ट खूण असते.शेजारी तो तरुण मुलगा गन घेऊन असतो .पोस्टमार्टेममध्ये गोळी सापडत नाही.
साल 2052 महिला इंस्पेक्टर इरिस मापेलवूड काही संशयितांच्या मागावर लॉंग हॉरवेस्ट स्ट्रीटवर जाते .तिथे तिला एक नग्न माणूस पडलेला सापडतो .त्याच्या डोळ्यात गोळी घुसलीय आणि मनगटावर विशिष्ट खूण आहे.तिला तो मेलाय असे वाटते पण जवळ जाताच तो डोळे उघडतो . ती त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करते. तिथे तो जिवंत आहे पण कोमात आहे.ती त्याचा डीएनए घेऊन खरी ओळख काढते तेव्हा तो एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे असे कळते.ती कॉलेजमध्ये जाते तेव्हा तो तिथे लेक्चर देत असतो .ती हैराण होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते तेव्हा हॉस्पिटलमधील बॉडी मृत होते.
काय आहे हा प्रकार ?? हादरून गेलात ना ?? चार वेगवेगळ्या काळात एकच बॉडी एकाच ठिकाणी एकाच विशिष्ट प्रकारे सापडली जाते. चारही काळात आपल्यापरीने त्या गुन्ह्याचा शोध घेतला जातोय.यात तपासात भाग घेणाऱ्या इंस्पेक्टरची फारच महत्वाची भूमिका आहे.प्रत्येक एपिसोड डोळ्यांची पापणी न हलविता पाहिला पाहिजे.शेवटच्या दोन एपिसोडमध्ये हे रहस्य सुटत जाते.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत ही सिरीज आहे.नक्की पहावी अशी सिरीज आहे.

Wednesday, October 25, 2023

काला पानी

काला पानी
Kaala Paani
साल 2027 
अंदमानमध्ये स्वराज महोत्सव होणार आहे.खूप माणसे त्यासाठी अंदमानात आलीत. फक्त हेल्थ डिपार्टमेंट कडून परमिशन बाकी आहे.डॉ.सौदामिनी सिंह त्यासाठी सही करायला तयार नाहीत.तिला एका विचित्र रोगाची चिंता आहे.मानेवर काळे डाग असणारा हा रोग पहिल्यांदा बरा होतो पण काही दिवसांनी त्या व्यक्तीला उचक्या सुरू होतात आणि तोंडातून काळे रक्त बाहेर पडून ती व्यक्ती मृत्यू पावते.
गव्हर्नर  झिब्रांन काद्री डॉ. सौदामिनी सिंहवर दबाव टाकून ती परमिशन घेतात. एसीपी केतन कामतला अंदामानातून बाहेर पडायचे आहे.त्यासाठी तो आटोसच्या प्रमुखाला सर्वतोपरी मदत करत.आटोसचे मोठे प्रोजेक्ट अंदमानात चालू आहेत.स्वराज महोत्सव ही त्यांनीच भरविला आहे.
शेवटी डॉ.सौदामिनी सिहने त्या आजाराचे मूळ  कारण शोधून काढले.हा रोग पाण्यातून पसरतोय हे तिच्या लक्षात येते.ते पाणी एका तलावातून ऑटोसच्या पाईपलाईन मधून शहरात आणले जातेय. पण ते इतरांना कळण्याआधीच तिचा अपघाती मृत्यू झाला.
आता तो आजार सगळीकडे पसरला आहे. अंदमानातून कोणीही बाहेर जाऊ शकत नाही आणि कोणीही आत येऊ शकत नाही . अंदमान जगासाठी सील झाले आहे.त्या आजाराचे औषध शोधून काढायचे प्रयत्न सर्व स्तरातून चालू आहेत.
ओराको आदिवासी जमातीकडे या रोगावर औषध आहे पण ती जमात कुठेतरी गायब झाली आहे.असे म्हणतात त्यांना शेकडो वर्षांपासून या रोगाची कल्पना आहे. 
अंदमानात हाहाकार माजला आहे.शेवटी गव्हर्नर काद्रीने एक उपाय शोधून काढला .पण त्यात ते यशस्वी होतील का ??
आपल्याला पुन्हा करोना काळात घेऊन जाणारी ही सिरीज आहे.मानवी स्वभाव परिस्थितीनुसार कसा बदलत जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही सिरीज आहे.
मोनासिंह , चिन्मय मांडलेकर, अमेय वाघ ,आशुतोष गोवारीकर ,अशी स्टार मंडळी यात आहे.प्रत्येक एपिसोड आपली उत्कंठा वाढवतो.अंदमानातील जंगल आपल्या अंगावर येते.याचा दुसरा सिजन येणार याची कल्पना शेवटच्या भागात मिळते.
ही सिरीज नेटफ्लिक्सवर आहे

Guns of the Magnificent Seven (1969 )

Guns of the Magnificent Seven (1969 )
 मॅग्नफीसंट सेवन सिरीजचा हा चित्रपट आहे . मेक्सिकोतील क्रांतिकारी नेता क्वांटेरॉ  प्रेसिडन्टच्या सैन्याकडून पकडला जातो .अटकेपूर्वी तो  सहाशे डॉलर आपल्या मॅक्स नावाच्या अधिकाऱ्याकडे देतो आणि आपल्या सुटकेसाठी ह्याचा वापर कर असे सांगतो .
मॅक्स मेक्सिको बॉर्डर पार करून क्रिस ऍडमला भेटतो.क्रिस व्यावसायिक आहे .तो या कामासाठी काही माणसे निवडतो .किनो घोडेचोर आणि हाणामारीत तरबेज आहे.कॅस्सी बॉम्ब बनविण्यात हुशार आहे. स्लॅटर एका हाताने अधू आहे पण निशाणेबाज आहे. मॉर्गन सुरफेकीत निष्णात आहे.
हे सर्व मॅक्स सोबत मेक्सिकोत येतात .आता तुरुंगात जाऊन क्वांटेराला कसे सोडवितात हे पाहणे उत्कंठावर्धक आहे.
हा एक क्लासिक वेस्टर्न चित्रपट आहे.मेक्सिकोतील ओसाड जमीन , रखरखीत ऊन ,तुफान घोडेस्वारी आणि पिस्तुलबाजीची रेलचेल असलेला हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर इंग्रजी भाषेत आहे.
ज्यांना जुने वेस्टर्न चित्रपट आवडतात त्यांनी हा चित्रपट चुकवू नये.

Saturday, October 21, 2023

king of kotha

KING OF KOTHA
किंग ऑफ कोथा
राजू ,कन्नन, टोनी आणि अजून काहीजण एकत्र फुटबॉल खेळायचे .त्यात राजू आणि कन्नन खास दोस्त.तामिळनाडू केरळच्या बॉर्डरवर समुद्रकिनारी कोथा नावाचे छोटे गाव होते .तिथे हे राहायचे.
राजूचे वडील रवी त्यावेळचे मोठे गँगस्टर होते .त्यामुळे राजूलाही गुंडगिरीची सवय लागली.आता गावात राजूचेच राज्य होते पण काही गोष्टीवरून त्याचा आणि कन्ननचा वाद झाला दोघात वैर आले आणि राजू कोथा सोडून गेला . 
या गोष्टीला दहा वर्षे  उलटून गेलीत .आता कोथामध्ये कन्ननचे राज्य आहे.गुंडगिरी ,अमली पदार्थ यात तो राजा आहे .त्याला थांबविणारा कोणीच नाही . टोनी पोलीस अधिकारी झालाय पण तो ही शांत आहे.
सिनियर इंस्पेक्टर शाहुल हसनची बदली कोथात झालीय.एक कडक ऑफिसर म्हणून त्याचे नाव आहे .आल्याआल्या तो कन्ननच्या कॅसिनोमध्ये जातो पण तिथे त्यालाच धमकी दिली जाते.कन्नन त्याच्या कपाळावर बंदूक ठेवतो .अपमानित होऊन शाहुल तेथून निघून जातो तेव्हा टोनी त्याला राजू आणि कन्ननची कथा सांगतो.कन्ननला संपविणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे राजू.
शाहुल कन्ननला संपविण्यासाठी एक योजना बनवतो.तो राजूला शोधतो आणि कोथाला बोलवून घेतो .आता फक्त त्याला राजू आणि कन्ननच्या युद्धात प्रेक्षकांची भूमिका घ्यायची आहे .
राजू कन्ननला संपवेल का ?? 
पण इथेच सर्व संपत नाही .कदाचित दुसऱ्या भागात आपल्याला अजून काही भयानक पाहायला मिळेल.
दुलकर सलमानने राजू उभा केलाय तर शबीर कल्लारक्कलने कन्नन .
एक तुफान हाणामारीने भरलेला चित्रपट हॉटस्टारवर हिंदी भाषेत आहे.ज्यांना हाणामारी असलेले असलेले साऊथचे चित्रपट आवडतात त्यांनी नक्की पहावा.

Thursday, October 19, 2023

THIRUCHITRAMBALAM

THIRUCHITRAMBALAM
थिरुचित्रामबालम
थिरुचित्रामबालम उर्फ डरपोक डोनिकमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करतोय. तो स्वभावाने शांत आणि भित्रा आहे, म्हणूनच त्याला डरपोक नाव पडलेय. घरी त्याचे वडील आणि आजोबा आहेत.घरात स्त्री कोणीच नाही. डरपोकचे वडील इन्स्पेक्टर आहेत .पण त्याचे आणि डरपोकचे पटत नाही .दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. दोघांच्यात आजोबाच एकमेव दुवा आहेत.
डरपोकची फक्त एकच मैत्रीण आहे .शोभना लहानपणापासूनच डरपोकसोबत आहेत.दोघेही एकाच बिल्डिंगमध्ये राहतात.शोभना खाली तर डरपोक वरच्या मजल्यावर.दोघांच्या कुटुंबाचेही खूप चांगले संबंध आहेत.
डरपोकला जी तरुणी आवडते ते तो शोभनाशी शेयर करीत असतो . एक दिवस लहान मुले पळविणार्या टोळीची माहिती डरपोक पोलिसांना देतो आणि डरपोकचा बाप त्या गुंडांना पकडतो. 
काही दिवसांनी डरपोकच्या बापाला पॅरॅलीसिसचा अटॅक येतो. त्यातून त्यांचे संबंध चांगले होतात. पण डरपोकचा घाबरट स्वभाव काही जात नाही .ते आजोळी एका लग्नाला जातात तिथेही डरपोक एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि ते शोभनाला सांगतो .पण तिथेही फेल होतो. 
आजोबा डरपोकला एक सल्ला देतो . पण त्या सल्लाचे परिणाम वाईट होतात आणि शोभनाशी असलेले संबंध दुरावतात .शोभना कॅनडाला जॉबसाठी निघून जाते. असे काय घडते की इतकी सुंदर निखळ मैत्री तुटायला येते. 
फक्त डरपोकच आहे जो पुढाकार घेऊन शोभनाबरोबर पूर्वीसारखी मैत्री जुळवू शकतो .पण डरपोक पुढाकार घेईल का ?
एक अतिशय सुंदर ,निखळ मैत्री कशी असते हे अनुभवण्यासाठी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे पहावा.
धनुषने डरपोक उत्तम सादर केलाय.त्याचे बुजरेपण ,मुलीला प्रपोज करणे,शोभनाशी निखळ स्वच्छ मैत्री.,आजोबांसोबत मित्रांसारखे वागणे तर बापाशी फटकून बोलणे सुरेख सादर केलंय. प्रकाशराजने डरपोकचा बाप आणि इन्स्पेक्टर सादर केलाय.पॅरालिसिस अटॅक आल्यावर आलेली हतबलता .आपल्या बापावर अवलंबून रहाणे, डरपोकची माफी मागणे पाहून हलायला होते.
नित्या मेननने शोभना बनून धमाल उडवली आहे.डरपोकबरोबर भांडणारी , त्याची टेर खेचणारी पण त्यासाठी इतरांशी भांडणारी, काळजी करणारी शोभना. आपलीही मैत्रीण अशी असावी असे वाटते.
सगळ्यात धमाल केली आहे ते डरपोकचा आजोबा बनलेल्या भारतीराजाने. आपला मुलगा आणि नातू यांच्यामधील दुवा बनलेला. नातवासोबत दारू पिणारा तर मुलाची सेवा करणारा बाप सुरेख रंगविला आहे. तो जीवनाकडे खूपच सकारात्मक नजरेने पाहतो आणि आनंदाने दिवसाचे स्वागत करतो .
एक छान कौटुंबिक चित्रपट धनुषने आपल्याला दिला आहे.
चित्रपट प्राईमवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, October 18, 2023

आखरी सच

AAKHARI SACH
आखरी सच 
नवी दिल्लीमध्ये एकाच कुटुंबीयांनी समूहायिक आत्महत्या केल्या होत्या.त्याच घटनेचे कथानक घेऊन ही सिरीज बनविण्यात आली आहे.
राजावत परिवारात एकूण अकरा जण आहेत. भुवन अमन हे दोन भाऊ ,त्यांच्या पत्नी ,आई ,भाची,आणि मुलं असा परिवार आहे. अमनची डेअरी आणि मिठाईचे दुकान आहे. 
एके दिवशी पहाटे घरातून काही हालचाल दिसत नाही आणि कुत्रा सारखा भुंकतोय म्हणून शेजारी घरात जातात आणि त्यांना सर्व कुटुंब छताच्या पाईपला लटकलेले आढळते.भुवनची आई म्हातारी आहे म्हणून तिने बेडरूमध्येच  फाशी लावून घेतली. सारी दिल्ली या प्रकरणामुळे हादरली.
इन्स्पेक्टर अनया उर्फ अन्या तरुण हुशार अधिकारी . तिच्याकडे ही केस तपासासाठी दिली जाते.सर्वप्रथम ही आत्महत्या नसून खून आहेत असा तिचा समज होतो .पण जसजशी ती तपासात गुंतत जाते  तशी अधिकाधिक गोंधळात पडते.
तिला पुरावे सापडत जातात आणि ती शेवटी एका निष्कर्षावर पोचते.
अंतिम सत्य काय आहे ??
तमन्ना भाटिया इन्स्पेक्टर अन्याच्या तडफदार भूमिकेत आहे. तर अभिषेक बॅनर्जीने गूढ भुवन रंगविला आहे.
हॉटस्टारवर सहा भागात ही सिरीज आहे.

Tuesday, October 17, 2023

किल बोकसून

KILL BOKSOON
किल बोकसून 
कोरियात काही प्रोफेशनल कंपन्या होत्या.त्या आपल्या क्लायंटसाठी प्रशिक्षित मारेकरी पुरवायचे.त्याचे काही कडक नियम होते. एमके ही त्यातील मोठी कंपनी होती. गिल बोकसून ही त्यांची टॉपची मारेकरी .ती नेहमीच उच्च दर्जाची कामे करायची . चा मिन क्यू हा एमकेचा चेयरमन होता तर त्याची बहीण चा मिन ही डायरेक्टर होती.
बोकसून ही सिंगल मदर आहे. तिला पंधरा वर्षाची मुलगी आहे. नेहमीप्रमाणे बोकसूनला एक कामगिरी मिळाली.तिच्या मदतीला एक शिकाऊ मुलगी किम याँग दिली गेली.एका मंत्र्यांच्या मुलाला ठार मारून ती आत्महत्या आहे असे दाखवायचे होते.
पण काही कारणाने ती त्याला मारत नाही.एमकेच्या नियमात ही मोठी चूक आहे. डायरेक्टर चा मिन या संधीची वाट पाहत असते .ती ताबडतोब इतर कंपन्यांतील मारेकऱ्यांना बोकसूनला मारायची कामगिरी देते.
जे मारेकरी बोकसूनचे मित्र आहेत तेच तिच्या जीवावर उठतात .पण बोकसून सर्वाना ठार मारते. तिच्या या कृत्याचे पडसाद सर्वच कंपन्यात उमटतात .चेयरमन चा मिन क्यू ही घटना दाबायचा प्रयत्न करतो .त्यासाठी तो या घटनेची साक्षीदार किम याँगला ठार मारतो.
बोकसूनला ही घटना कळते तेव्हा ती चा मिनला ठार मारते आणि रक्ताने माखलेला सुरा चा मिन क्यू ला पाठविते.याचाच अर्थ आता ती चा मिन क्यूला लढण्याचे आव्हान दिलंय आणि दोघांतील एक जिवंत राहील.
या शेवटच्या युद्धात कोण जिंकेल ??
एक तुफान हाणामारी असलेला हा कोरियन थ्रिलर चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

Sunday, October 15, 2023

जेमिनी मॅन

GEMINI MAN (2019 )
जेमीनी मॅन
हेन्री ब्रोगन एक उत्कृष्ट स्नायपर होता.230 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनमधील एका पॅसेंजरला दोन किलोमीटर अंतरावरून उडवले होते. पण आता तो थकला होता.पन्नास वर्षाचा झाला होता तो.त्याला निवृत्त जीवन जगायचे होते.पण तो एजन्सीमध्ये सर्वोकृष्ट होता. तो निवृत्त झाला तर काम कोण करणार ? त्यात त्याला कळले की एजन्सी आपल्याला चुकीची माहिती देऊन माणसे मारत होती. तो हादरला.आपल्याकडून काही निरपराध व्यक्ती मारल्या गेल्या याची खंत त्याला लागून राहिली.
तो आता जॉर्जियामध्ये शांत जीवन जगतोय.त्याच्याकडे पुन्हा एजन्सी काम घेऊन आली पण त्याने नकार दिला. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी डॅनी नावाची एक स्त्री एजंट नेमली होती.पण त्याने तिला ओळखले. 
आता एजन्सीने त्याला मारण्यासाठी एका हुशार मारेकऱ्याची नेमणूक केलीय. हेन्री आणि त्याचा सामना झाला तेव्हा त्याला कळले ही आपल्या तोडीस तोड आहे. पण आपल्याला त्यांच्याविषयी आपलेपणा का वाटतो हे हेन्रीला समजेना. डॅनीने दोघांचे सॅम्पल डीएनए साठी पाठविले. तपासात दोघांचे डीएनए सारखेच असल्याचे सिद्ध झाले.
हेन्रीच्या आयुष्यात कधीच कोणती स्त्री आली नव्हती मग हा मारेकरी कोण ? पुढे तपासात एक वेगळेच सत्य हेन्री आणि डॅनीसमोर आले.आणि त्यांनी ते प्रकरण संपवायचा निश्चय केला .
विल स्मिथ अभिनित हा चित्रपट प्रचंड हाणामारीने भरलेला आहे.एक अत्याधुनिक रहस्य असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे .

OMG 2

OMG 2
ओएमजि 2
यासाठी पहिला पार्ट बघायची गरज नाही.याची कथा पहिल्या भागापेक्षा वेगळी आहे.पण संकल्पना तीच आहे.
कांती शरण एक सज्जन गृहस्थ .महाकाल मंदिराजवळ महादेवाची पूजा करणारा भक्त.तो देवळाजवळ पूजेचे सामान विकतो तसेच मंदिरात सेवेकरी म्हणून काम ही करतो.त्याला विवेक नावाचा मुलगा आहे आणि एक मुलगी आहे .
विवेक शहरातील चांगल्या शाळेत जातोय.एक दिवस विवेकचा शाळेच्या टॉयलेटमध्ये हस्तमैथुन करतानाचा विडिओ व्हायरल होतो. संपूर्ण शहरात विवेक आणि त्याच्या परिवाराची बदनामी होते.कांती शरणला काय करावे ते सुचत नाही.शाळा विवेकला काढून टाकते. तर मंदिराचा पुजारी त्याला शहर सोडून जायला सांगतो.
त्याचवेळी महादेव शहरात येतो.तो विवेकचा जीव वाचवतो आणि कांती शरणला कोर्टात जायला भाग पाडतो .
कांती शरण हस्तमैथुन पाप नाही तर मुलाला लैगिक शिक्षण देणे गरजेचे आहे असे कोर्टात सांगतो .तो रस्त्यावर बसणारा भोंदू, सेक्स पॉवरच्या गोळ्या देणारा दुकानदार, सेक्स पॉवर चेक करणारा खोटा डॉक्टर , आणि शाळेवर अब्रूनुकसानीची केस करतो .महादेव वेळोवेळी त्याला अप्रत्यक्षपणे सल्ला देत असतो.
कोर्टात कामिनी महेश्वरी शाळेच्या बाजूने उभी राहते.ती शाळा तिच्या सासऱ्याची असते.कांती शरण स्वतःच आपली केस लढण्याचे ठरवितो .जज पुरुषोत्तम पुढे केस उभी राहते आणि पुढे काय घडते हे पाहणे रंजनकारक आहे.
लैंगिक शिक्षण कसे गरजेचे आहे हे अतिशय हलक्या फुलक्या गमतीशीर पद्धतीने मांडले आहे .तरीही या विषयाची गंभीरता कमी होऊ देत नाही.
कांती शरणच्या हातखंडा भूमिकेत पंकज त्रिपाठी आहे. तो आहे तसाच या भूमिकेत आहे .तर यामी गौतमी विरुद्ध बाजूची वकील आहे.दोघांचे कोर्टरूममधील सिन बघण्यासारखे आहेत.महादेव बनलेला अक्षयकुमार आपल्या मोजक्याच सिनमध्ये भाव खाऊन जातो.तोच या चित्रपटाचा प्रमुख आधारस्तंभ आहे.
एका नाजूक विषयावरील हा चित्रपट सर्वांनी कुटुंबासह पहावा असा आहे .
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

Saturday, October 14, 2023

अवेअरनेस

AWARENESS
अवेअरनेस
इवान आणि त्याचा बाप  व्हिसेन्ट छोट्या मोठ्या चोऱ्या करून जगत असतात.इवानकडे छोटी सुपरपॉवर आहे.तो समोरच्याच्या डोळ्यासमोर भ्रम निर्माण करू शकतो.एकदा दुकानातून दारूच्या बाटल्या चोरत असताना इवान दुकानाच्या मालकीणी समोर बंदूक धरल्याचा भ्रम करतो तर पाठलाग करणाऱ्या पोलिसांसमोर बर्फाच्या वादळाचा भ्रम निर्माण करतो.
योगायोगाने काही लोकांना या गोष्टीचा सुगावा लागतो आणि त्या एजन्सी इवानच्या मागे लागतात. दुसऱ्या वर्ल्डवॉरनंतर रशियन शास्त्रज्ञांनी एक फॉर्म्युला तयार करून तो काही जणांच्या शरीरात सोडलेला असतो.या फॉर्म्युलामुळे त्यांच्या शरीरात काही सुपरपॉवर तयार झालेल्या असतात. काही काळानंतर त्या सर्वांना ठार मारले जाते.पण ती सुपरपॉवर इवानच्या शरीरात कशी आली याचा प्रश्न त्या एजन्सीला पडतो आणि ते इवानला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात.इवानच्या रक्तातून तो फॉर्म्युला परत मिळवता येईल का हे चेक करायचे असते.
पण त्याला विरोध करणारे ही आहेत.एक व्यक्ती सतत इवानचे संरक्षण करीत असते .त्या व्यक्तीकडेही सुपरपॉवर असतात .तो इवानला त्याच्या शक्तीची जाणीव करून देतो .दुसऱ्या व्यक्तीच्या मनात शिरून आपल्या म्हणण्याप्रमाणे वागवायचे अशी एक सुपरपॉवर असते. 
आता इवानला एजन्सीपासून स्वतःला वाचवायचे आहे.
एक चमत्काराने भरलेला चित्रपट हिंदी भाषेत प्राईम व्हिडिओवर आहे.ज्यांना सायन्स फिक्शन चित्रपट आवडतात त्यांना नक्की आवडेल.

Friday, October 13, 2023

खुफिया

KHUFIYA
खुफिया
हिना रेहमान रॉच्या कृष्णा मेहरा उर्फ के एम साठी बांगलादेशात काम करते. ऑपरेशन ऑक्टोपसच्या मिशनवर ती बांगलादेशाचे संरक्षण मंत्री मिर्झाला मारायचा प्लॅन करते पण एका फोन मुळे ती फसते आणि मिर्झा च्याच हातून मारली जाते.
रॉमध्ये कोणतरी फितूर आहे हे केएमला कळते .रॉमध्ये काम करणाऱ्या रवीवर रॉचा संशय असतो.ते त्याच्या घरात केबिन मध्ये कॅमेरे बसवितात. रवी फितूर आहे हे सिद्ध होतेच पण तो ती माहिती कशी आणि कोणाला पोचवतो हे शोधून काढायचे आहे .रॉला तीही माहिती कळते आणि एक दिवस प्लॅन करून केएम त्याला पुराव्यानिशी पकडायचे ठरविते .पण त्याचवेळी अचानक रवी ला या गोष्टीची खबर लागते आणि तो ताबडतोब रॉचे दोन अधिकारी आणि विरोध करणाऱ्या आपल्या पत्नीला जखमी करून नाहीसा होतो .सोबत आपल्या आई ला आणि मुलाला घेऊन जातो .
सहा महिन्यानंतर रवीची पत्नी चारूला योगायोगाने केएमची माहिती मिळते.ती केएमला भेटते आणि आपल्या मुलाला परत आणायची विनंती करते.त्यासाठी ती सर्वप्रकारची मदत करायला तयार आहे .
एक योजना बनवून चारूला अमेरिकेत रवीकडे पाठविले जाते.चारू आपल्या मुलाला पुन्हा भारतात आणेल ? रॉची योजना यशस्वी होईल का ? 
केएमच्या भूमिकेचे तब्बू शोभून दिसते.तर अली फाजल रवीच्या भूमिकेत आहे.वामीक गाब्बीने चारूचे काम उत्तमपणे रंगविले आहे .
नेटफिक्सवर हिंदी भाषेत आहे .

Thursday, October 12, 2023

STRONG GIRL NAM-SOON

STRONG GIRL NAM-SOON
स्ट्रॉंग गर्ल नाम सून 
गॅंग नाम सून पाच वर्षांची असतानाच मंगोलियात हरवली होती.तिचे वडील फोटोग्राफर होते आणि आई एक प्रसिद्ध उद्योजिका . ती एका गरीब मंगोलियन कुटुंबात मोठी होतेय.विशेष म्हणजे तिच्याकडे जन्मापासूनच सुपरपॉवर आहे.  तिच्या आईच्या घराण्यात हजारो वर्षापासून स्त्रियांच्या अंगात सुपरपॉवर असतात.आता तिची आई आणि आजी कोरियात आहेत.
ती मंगोलियन नसून कोरियन आहे हे त्या कुटुंबाने लपविले नाही.उलट ती बावीस वर्षाची झाल्यावर त्यांनी आपल्या शेळ्या बकऱ्या विकून तिला कोरियात जाण्यासाठी पैसे दिले.
कोरियात नाम सूनची आई दरवर्षी आशिया स्ट्रॉंग गर्लची स्पर्धा भरविते.कधी ना कधी आपली मुलगी ही स्पर्धा जिंकेल अशी तिला आशा आहे.
नाम सून आपल्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी कोरियात आलीय.ती आपली शक्ती वापरून विमान अपघात टाळते. कोरियात तिला एक एजंट फसवितो आणि पासपोर्ट पैसे घेऊन जातो.एक तरुण पोलीस अधिकारी तिला मदत करतो.
नाम सून च्या आईला शेवटी त्या स्पर्धेत एक स्ट्रॉंग गर्ल सापडते .ती तिला नाम सूनच समजते.
कोरियात मोठ्या प्रमाणात एक नवीन ड्रग दाखल झालेय. तो तरुण पोलीस अधिकारी त्याच ड्रगच्या मागावर आहे.विमानतळावरील अपघात ही त्याच ड्रग साठी झालाय अशी त्याला शंका आहे.
ही मजेशीर कोरियन सिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर आलीय.आतापर्यंत तिचे दोन भाग आलेत.एकूण सोळा भागाची सिरीज हिंदी भाषेत आहे.
एक विनोदी थ्रिलर सर्व कुटुंबांनी मिळून पहावी अशी सिरीज आहे.

Monday, October 9, 2023

लुपिन 3

लुपिन 3
LUPIN 3
अस्सान डिओप अतिशय चातुर्याने म्युझियमच्या कडेकोट बंदोबस्तातून ब्लॅक पर्ल चोरतो.त्याने या चोरीची कल्पना आधीच सोशल मीडियाला दिलेली असते . ही शेवटची चोरी करून तो नाहीसा होणार असतो.त्यासाठी त्याच्याकडे प्लॅनही तयार असतो .
पण ब्लॅक पर्ल हातात येताच त्याला फोन येतो .तो फोन त्याच्या आईचाच असतो .तिचे  कोणीतरी अपहरण केलेले असते आणि तिला जिवंत ठेवायचे असेल तर अस्सानला त्यांच्यासाठी अधिक चोऱ्या कराव्या लागतील .
आईला जिवंत ठेवण्यासाठी अस्सान एक मौल्यवान पेंटिंग आणि पुरातन ब्रेसलेट चोरतो .पण त्यासोबत आपल्या आईचा कौशल्याने माग काढतो . 
कोण आहेत ही माणसे ज्यांनी अस्सान सारख्या चोराला वेठीस धरलेय ?अस्सान लुपिनच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय.तो अतिशय सभ्य चोर आहे. 
आपण एक शांत आयुष्य जगूया असे अस्सानचे कुटुंब सांगतेय.अस्सानपण यासाठी तयार झालाय .पण त्याचे शत्रू त्याला सुखाने जगू देतील का ?? 
सात भागाचा हा तिसरा सीजन आधीच्या दोन सीजनपेक्षा उत्कंठावर्धक आहे.यातील ब्लॅक पर्ल ,ब्रेसलेटची चोरी पाहण्यासारखी आहे .अस्सानची वेगवेगळी रूपे आणि त्याचे प्लॅनिंग पाहून आपण चक्रावून जातो .तोच प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच घडवून आणतो .
चौथ्या सीजन येणार हे तिसऱ्या सीजनमधून सूचित होते.
पाहायलाच हवी अशी ही अफलातून सिरीज नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

Sunday, October 8, 2023

इनफिनिट

INFINITE
इनफिनिट
ते इनफिनिट होते.हजारो वर्षे ते जगाचे रक्षण करत होते.मृत्यू पावले की पुनर्जन्म घ्यायचे. बाथर्स्ट हा इनफिनिट चा हजारो वर्षापासूनचा शत्रू .चांगले विरुद्ध वाईट हा सामना पुरातनकालापासून चालू आहे.
1985 साली बाथर्स्टच्या हल्ल्यात हेन्रीच ट्रेंडवे आणि त्याचे साथीदार मारले जातात .पण हेन्रीच त्याच्या हाती लागले धातूचे अंडे लपवून ठेवतो .बाथर्स्टला ते अंडे हवेय .त्या अंड्यामुळेच जगाचा नाश होईल .
इनफिनिट पुनर्जन्म घेणार हे बाथर्स्टला माहितीय .कारण त्याचाही पुनर्जन्म होणार आहे.
आता 2020 चालू आहे. इवान मॅकली मानसिक आजाराने त्रस्त आहे.त्याला मध्येमध्ये भयानक स्वप्न पडत असतात. तो अतिशय उत्कृष्ट सामुराई तलवार बनवितो.त्याला माहित नाही असे काही नाही.त्याच्याकडे माहितीचा खजिना आहे. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे.तलवार विकताना त्याचे वाद होतात आणि तो सर्वाना चोप देतो .त्यात तो जखमी होतो.पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी करायला बाथर्स्ट  पोलीस अधिकारी बनून येतो .तो इवानला त्याची सगळी माहिती सांगतो .तो इनफिनिट आहे याची कल्पना देतो .ते धातूचे अंडे कुठे आहे हे ही विचारतो.पण इवान त्याला काहीच आठवत नाही असे सांगतो तेव्हा पोलीस स्टेशनवर भयानक हल्ला होतो . त्यात इवान निसटतो.
आता इवान इनफिनिटच्या ताब्यात आहे.ते त्याच्यावर पुनर्जन्म आठविण्यासाठी उपचार करतात .
शेवटी इवान आपले पुनर्जन्म आठवतात का ?? ते धातूचे अंडे कुठे लपविले आहे ते इवानला कळेल का ? पुन्हा तो बाथर्स्टला जगाचा नाश करण्यापासून वाचवेल का ?? 
मार्क वाहलबर्ग इवानच्या भूमिकेत आहे.
प्रचंड हाणामारी असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Saturday, October 7, 2023

RDX

आरडीक्स
RDX
रॉबर्ट डॅनी झेवीयर तिघे पक्के दोस्त .कोचीनमधील छोट्या गावात ते राहतात . गावातील मुलांना ते मार्शल आर्ट शिकवतात. रॉबर्टचे एका मुलीवर प्रेम आहे एका कार्निवलमध्ये रॉबर्ट तिला भेटायला जातो आणि तिथे त्यांची काही गुंडासोबत झटपट होते.संपूर्ण कार्निवल उधळला जातो . रॉबर्टचे वडील त्याला गाव सोडून जायला सांगतात .
या गोष्टीला दोन तीन वर्षे होऊन गेलीत.आता डॅनीचे लग्न झालेय .त्याला छोटी मुलगीही आहे.एक छान आयुष्य ते जगतायत .गावात पुन्हा कार्निवल सुरू झालाय.काही गुंड दारू पिऊन मुद्दाम त्यात गोंधळ घालतात.डॅनीचे वडील शांतपणे त्याना समजवण्याचा प्रयत्न करतात पण ते गुंड त्यांच्यावरच हात उचलतात .ते पाहून डॅनी भडकतो आणि गुंडांना चोप देतो.
प्रकरण इथेच संपले असे समजून डॅनी कुटुंबासोबत घरी येतो आणि तेच गुंड त्यांच्या घरात येऊन हल्ला करतात.यात सर्वच जखमी होतात.
ही गोष्ट रॉबर्ट आणि झेवीयरच्या कानावर जाते आणि ते बदला घेण्यासाठी गावात परतात.
एक नेहमीची सुडकथा पहायची असेल तर आरडीएक्स पहा.
हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .

मिशन रानीगंज

मिशन रानीगंज
पश्चिम बंगाल येथील रानीगंज येथे कोळशाची खाण आहे. त्या खाणीत अडकलेल्या 65 कामगारांच्या सुटकेची ही सत्यघटना.
ही गोष्ट 1989 ची आहे. खाणीत काम करताना एका सुरूंगाच्या स्फोटात भुयारातील भिंतींना तडे जातात आणि नदीचे पाणी प्रचंड वेगाने आत घुसते.बहुसंख्य कामगार बाहेर पडतात पण साधारण 65 कामगार आत अडकतात .
यशवंतसिंह गिल हा तरुण इंजिनियर जो रेस्क्यू स्पेशालिस्ट आहे.तो त्या कामगारांच्या मदतीसाठी पुढे सरसावतो. खाणीच्या सर्वात उंच पॉईंटला कामगार जमा होतील आणि तिथे ड्रिल करून त्यांना कॅप्सूलद्वारे बाहेर काढू अशी त्याची योजना असते.
त्यासाठी आवश्यक असतो एक सर्व्हे सुपरवायझर आणि ड्रीलिंग इंजिनियर . खाणीचा हेड  उज्ज्वल त्याला सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शवितो. बिंदल हा हुशार तरुण ड्रीलिंग इंजिनियर ताबडतोब आपली वाहने घेऊन येतो तर तपन घोष हा सर्व्हे इंजिनियर संपूर्ण सिस्टीमवर चिडलेला असतो .त्याची नोकरी गेलेली असते .सर्व पैसे अडकलेले असतात.जसवंतसिंह त्याच्या हातापाया पडून घेऊन येतो.
या रिस्क्यू मिशनमध्येही राजकारण सुरू आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्याना त्या खाण कामगारांना बाहेर काढायचे नाही .त्यासाठी ते प्रयत्न करत असतात .
पण यशवंतसिंह गिल आपल्या मतावर ठाम असतो .एक माणूस उभा राहील अशी कॅप्सूल बनवायची . ती ड्रिल केलेल्या होलमधून खाली सोडायची आणि एकेकाला वर घ्यायचे अशी गिलची योजना आहे .यात तो यशस्वी कसा होतो हे बघण्यासारखे आहे.
संपूर्ण चित्रपटात गिल आणि त्याची टीम खूप सकारात्मक आहे .अक्षयकुमार ने तरुण तडफदार यशवंतसिंह गिल नेहमीप्रमाणेच उभा केला आहे .सतत सिगारेट ओढत टेन्शनमध्ये असलेला उज्ज्वल कुमुद मिश्राने रंगविला आहे .सतत टेन्शनमध्ये असणारा कामगारांना आपले मानणारा आणि गिलवर प्रचंड विश्वास ठेवणारा उज्जवल मनाला भिडतो .कमी बोलणारा पण कामात वाघ असणारा प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला बिंदलच्या भूमिकेत पवन मल्होत्रा आहे .  शेवट माहीत असूनही आपल्याला श्वास रोखून पाहायला लावणारा मिशन रानीगंज आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे .

Thursday, October 5, 2023

क्रॅकडाऊन

क्रॅकडाऊन
काश्मीर मधील छोट्या गावात रॉच्या रियाझ पठाण आणि त्याच्या साथीदारांना एका घरात चार अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली .त्यांनी हल्ला करून चारही अतिरेक्यांना ठार मारले पण तिथे मारियम नावाची तरुणीही .तीही त्या हल्ल्यात ठार झाली.ती अचानक तिथे कशी कोणाला भेटायला आली याविषयी रॉकडे कोणतीच माहिती नव्हती.
अश्विनी रॉचा हेड.त्याने दिव्याला एका लग्नात पाहिले.दिव्या ब्युटीशियन होती.दिव्या हुबेहूब मारियमसारखी दिसत होती.अश्विनीने पठाणला दिव्याला मारियम बनविण्याची जबाबदारी दिली. तिला शत्रूच्या गोटात सोडून अधिकाधिक माहिती काढायची असा पठाण आणि अश्विनीचा प्लॅन होता. ठरल्याप्रमाणे प्लॅन यशस्वी झाला आणि दिव्याच्या मदतीने कट्टर अतिरेकी हमीद मारला गेला .पण इथेच काही संपले नव्हते .हमीदने मरणापूर्वीच तसे पठाणला सांगितले .याहून ही भयानक काही घडणार आहे निश्चित.
रॉच्या कार्यालयात बॉम्बस्फोट होतो .अश्विनी आणि रॉचे एजंट मारले जातात.यातून पठाण वाचतो.रॉचा नवीन चीफ झोरावर याची जबाबदारी पठाणवर टाकतो .
अफगाणिस्तानातील तुरुंगातून आयएसआय  अझीझ काझीची सुटका करते आणि तो दिल्लीत येतो. त्याच्याकडे स्लीपर सेलची लिस्ट आहे . त्यानेच रॉच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणलाय असा संशय आहे. आता तो अजून मोठा घातपात घडविणार आहे.
हा मोठा घातपात पठाण आणि दिव्या थांबवू शकतील का ?? काझी आपल्या योजनेत यशस्वी होईल का ? रॉमध्ये गद्दार कोण आहेत ?
श्रिया पिळगावकर ,सकीब सलीम, यात प्रमुख कलाकार आहेत.
जिओसिनेमावर फ्रीमध्ये ही सिरीज आहे .

Wednesday, October 4, 2023

प्रतिपश्चंद्र

प्रतिपश्चंद्र
डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे 
न्यू इरा प्रकाशन 
विजयनगर साम्राज्यातील राजांना आपल्या भूमीवर आज ना उद्या परकीय आक्रमण होणार हे माहीत होते.कारण शत्रू उत्तरेकडून निघाला होता. म्हणून त्यांनी दक्षिणेकडील सर्व राज्यांचा खजिना एकत्र करायला सुरुवात केली.
साधारण सोळाशे हत्तीवरून ती प्रचंड संपत्ती एके ठिकाणी एकत्र केली गेली .पण आज ना उद्या ते ठिकाण त्यांना सापडेल म्हणून सुमारे पंचवीस वर्षे हळूहळू तो खजिना पुन्हा दुसरीकडे हलविला गेला .
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ताबडतोब महाराजांनी दक्षिणेकडे मोहीम काढली. या मोहिमेत ते सर्वाना भेटले .अनेक करार केले .अनेक लोक त्यांना भेटायला यायचे .त्यात ते दोघे होते.चेहऱ्यावरून पितापुत्र वाटत होते .एक वृद्ध तर दुसरा तरुण .दोघांनी शिवाजी महाराजांची एकांतात भेट घेतली आणि विजयनगरच्या खजिन्याचे रहस्य त्यांना सांगितले.महाराजांनी आपण त्या खजिन्याचे मालक होणार नाही तर रक्षक होऊ असा शब्द त्यांना दिला .
बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योजना आखून तो खजिना बंद केला .बहिर्जी नाईकांनी काही शिलेदारांची निवड त्या खजिन्याच्या रक्षणासाठी केली.आता त्या खजिन्याची जबाबदारी त्या शिलेदारांवर पिढ्यानपिढ्या राहणार होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते रहस्य सुपूर्द केले जात होते.
 मानसोपचारतज्ञ डॉ. रवीकुमार औरंगाबादला एका कॉन्फरन्ससाठी आपला मित्र आदित्यसोबत आला होता. न्यायमूर्ती कृष्णकांत दीक्षित यांच्या वाढदिवसाची पार्टीही त्याच हॉटेलमध्ये होती जिथे रवीकुमार आणि आदित्य थांबले होते.न्यायमूर्ती कृष्णकांत दळवी यांनी रवीकुमारवर विशेष लक्ष दिले .त्यांनी त्याला एक बुद्धमूर्ती गिफ्ट म्हणून दिली.पण दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या रूममध्ये कृष्णकांत दीक्षित गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले.आय बी ऑफिसर विजय मानेने त्यांच्या मृत्यूची जबाबदारी रवीकुमार  टाकली.
रवीकुमार आणि आदित्यच्या जामीनाची व्यवस्था प्रियल ह्या तरुणीने केली .पण आता डॉ. रवीकुमारला सत्य काय आहे ते शोधून काढायचे आहे .त्याने बुद्ध मूर्तीची कसून पाहणी केली आणि त्याला पहिला संदेश सापडला.
वीस वर्षांपूर्वी  हम्पीच्या भग्न अवशेषात प्रशील सोनवणेला अथक परिश्रमातून हवी ती वस्तू सापडली आणि तो ताबडतोब डॉ.रंगनाथस्वामींकडे आला .डॉ.स्वामींनी ती वस्तू चेक करून त्याला सरकारी वकील कृष्णकांत दीक्षित यांच्या हाती सुपूर्द केली होती.पण काहीवेळातच त्याला डॉ.स्वामींच्या खुनाची वार्ता कानावर आली .आपल्याही जीवाला धोका आहे हे तो समजून गेला .घरी गेल्यावर त्याला आपली पत्नी मृतावस्थेत सापडली .तो आपल्या मुलीला घेऊन ताबडतोब फरार झाला .
काय आहे हे खजिन्याचे रहस्य ज्यामुळे अनेकांचे जीव जातायत. रवीकुमार आणि आदित्य ,प्रियल ह्या खजिन्यापर्यंत पोचतील का ?

Monday, October 2, 2023

द बोन कलेक्टर

The Bone Collector (1999 )
द बोन कलेक्टर
लिंकन रायम पोलीस अधिकारी होता.एक फॉरेन्सिक एक्सपर्ट असे त्याला म्हटले जायचे. अनेक केसेस यशस्वीरित्या सोडविल्या होत्या. एका केसचा तपास करताना त्याचा अपघात झाला .आता तो बेडवर पडून आहे.त्याच्या फक्त मानेवरील भाग हालचाल करतो आणि डाव्या हाताचे पाहिले बोट चालते. त्याच्या मदतीला चोवीस तास नर्स आहे. त्याने अनेक पुस्तके ही लिहिलीत .अजूनही तो पोलीस खात्यात आहे .किचकट गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना मदत करतो .
अमेलिया  तरुण पोलीस ऑफिसर. ती नुकतीच पोलिसात भरती झालीय.
एक करोडपती बिल्डर आणि त्याच्या पत्नीचे विमानतळावरून अपहरण होते. अमेलियाला त्या बिल्डरची बॉडी जुन्या रेल्वे स्टेशनजवळ जुन्या रेल्वे रुळाजवळ सापडते. टीम येईपर्यंत ती सर्व पुराव्यांचे फोटो काढते. 
पोलीस मदतीसाठी लिंकनकडे येतात .लिंकन अमेलियाचे काम पाहून खुश होतो आणि अमेलियाला या तपासात येण्याचा आग्रह करतो .तिने दिलेल्या पुराव्यावरून तो बिल्डरच्या पत्नीपर्यंत पोचतो पण त्या आधीच तिचाही खून झालेला असतो .लिंकन पुन्हा अमेलियाकडून पुरावे गोळा करून घेतो.
खुनी खून करून एक पुरावा जाणूनबुजून मागे ठेवत असतो. तो जणू काही लिंकनला चॅलेंज देत असतो.
असे कोणते पुरावे आहेत जे त्या खुन्यापर्यंत लिंकनला घेऊन जातील. इथे बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. लिंकनच्या सोबत आता अमेलिया आहे. 
लिंकन आणि अमेलिया खुन्याला पकडण्यात यशस्वी होतील.
यात डेंझल वॉशिंग्टन लिंकनच्या प्रमुख भूमिकेत आहे. तो संपूर्ण चित्रपट बेडवर हालचाल न करता पडून आहे.तो चेहऱ्यातून आणि डोळ्यातून अभिनय करतो आणि ठामपणे बोलतो. तर अँजेलिना ज्यूली अमेलियाच्या भूमिकेत आहे. ती डेंझल वॉशिंग्टन समोर खंबीरपणे उभी राहिलीय.
1999 चा हा गाजलेला चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

Sunday, October 1, 2023

पाट

पाट
"चला, यावर्षीही सगळे पाट संपले बघ.गजानना तुझीच रे ही कृपा " राम मार्केटमधील आपले दुकान आवरीत गजा पावसकर मुलाला पाठीवर धपाटा मारीत म्हणाले. 
"बाबा दरवर्षी आपले पाट संपतात .गणपती दरवर्षी नवीन पाटावर बसून येतो का ?" समीर पाठ चोळत म्हणाला .
"छे रे ,त्याला काय फरक पडतो पाटाचा .अरे साधी मातीची मूर्ती ती.आपल्याला धंदा करायचा असतो .त्यामुळे पाट हलकेच बनवावे लागतात .नाहीतर दरवर्षी विकत कोण घेईल आपले पाट. दोन वर्षात पाट बदलावे लागतील असेच पाट बनवितो आपण.आणि काहीकाही इतके हलके असतात की गणपती त्या पाटासकट वाहून जातो "खो खो हसत गजा म्हणाला.
हा आमचा गजा पावसकर म्हणजे पक्का व्यवहारी .ह्याचा व्यवहार पाहून हा कोकणातला आहे यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
आहो स्वतःच्या मुलांकडून ही पैसे घेईल ,फुकट देणार नाही.राम मार्केटमध्ये त्याचे लाकडी वस्तूंचे दुकान होते.म्हणजे टेबल ,चौरंग ,पोळीपाट लाटणे वगैरे. आपल्या वस्तू कश्या संपवायच्या याचे नेमके ज्ञान होते त्याला .
"बाबा आपण ही यावर्षी पाट बदलायचा का ?"चार हात लांब होत समीरने विचारले.
" वेडा झालास का ? घोडेने गवताशी दोस्ती केली तो खायेगा क्या ?"कुठेतरी वाचलेला एक डायलॉग त्याच्या तोंडावर फेकून गजाने त्याला जवळ बोलावले.
पण समीरला परिणामांची कल्पना होती .तो अजून दूर सरकला.
गजाच्या खिशातून दहा रुपयांची नोट काढणे ही दिव्यच होते. भलेभले तो प्रयत्न करून थकले होते. त्या भल्याभल्यात त्याची पत्नी ,समीर, आणि बाबा इतकीच माणसे येत होती.शेजारीपाजारी तर याला हाय हॅलो म्हणायचेही पैसे घेईल या भीतीने शांतच राहत होते.
"बाळा आपल्याकडे गणपती एक जुनी परंपरा म्हणून येतो.आपण कोकणवासी एकदम रूढी परंपरा संस्कृती पाळणारे म्हणून जगात आपल्या गणपतीला मान आहे." 
"मुंबईत आल्यापासून परत कधी गावी गेलात का ?" हा प्रश्न समीरने गाडीवरच्या पाणीपुरी खाणाऱ्या मुलीकडे पाहत गिळून टाकला.
"आपण सर्व वर्षानुवर्षे वापरत असलेल्या वस्तूच वापरतो . त्यामुळे गणपती खुश असतो आपल्यावर. आपला  चौरंग साधारण ऐंशी वर्ष जुना आहे .आजोबांनी तेव्हा मधल्या आळीतून घेतला होता .तिथेच बाजूला टिळक राहायचे म्हणे." गजा शून्यात नजर ठेवून म्हणाला.
बाबांनी इतकी नजर कुठे लावली आहे हे समीरने पाहिले आणि तो चमकला .लाकडी चाळीतील सुनंदा पारकर आपले दुकान बंद करत होती.
"चौरंगाचे ठीक आहे पण निदान पाट तरी बदलू."समीर आता बिनधास्तपणे म्हणाला.सुनंदा पारकरसमोर तरी बाप धपाटा मारणार नाही याची खात्री होती त्याला .
" आपण काही बदलायचे नाही .गणपतीला आवडणार नाही." निर्वाणीचा इशारा नजरेतून देत गजा समीरकडे रोखून बघत म्हणाला .
"पण कितीतरी लोक दरवर्षी पाट बदलतात ,डेकोरेशन बदलतात काहीजण मूर्तीही बदलतात " आपण सुनंदा पारकरच्या जवळ आलोत याचा फायदा घेत समीर म्हणाला .
गजा चिडून समीरकडे सरकणार  इतक्यात सुनंदा पारकरची मधुर हाक त्याच्या कानावर पडली.
"काय गजाशेठ आज लवकर दुकान बंद केलेत "
तो स्वर ऐकताच गजा पाघळला .
"गजासेठ नका बोलू हो ,गजानन किंवा गजाननराव बोला " तो ही हळुवार आवाजात उत्तरला .
आख्खे मार्केट याला गजा नावाने ओळखते आणि याला गजाननराव बोलायचे .च्यायला माझे मित्र ही यांना गजाच बोलतात .नशीब माझा बाप आहे नाहीतर मलाही गजाच बोलावे लागले असते " समीर मनातल्या मनात पुटपुटला.
आज गणपती येणार .गजाच्या घरात गडबड उडाली होती. म्हणजे बाकी सर्व शांत होते फक्त गजाचाच आवाज ऐकू येत होता.मखर तर रेडी होता. बाकी डेकोरेशनही तयार होते. आता फक्त बाप्पाच्या आगमनाची सर्व वाट पाहत होते.
गजाच्या हातावर बसून तो घरात आला आणि थोड्या नाराजीनेच मखरात बसला .
"तुम्ही का येता यांच्याकडे ?" पाटाच्या भेगेतून आपली शेपटी सोडवत उंदीर म्हणाला." माझी शेपटी बघा काय हालत झालीय. गेली कित्येक वर्षे या पाटावर बसून येतोय आता भेगा पडल्यात त्याला .तो बदलायची तरी बुद्धी द्या."
" माझीही हालत फारशी चांगली नाहीय.चौरंग कसा डुगडुगतोय बघ " समीर आधी मला बसवितो मगच चौरंगाचा बॅलन्स सेट करतो .
खरेच बाप्पाला बसविल्यावर समीरने चौरंग सेट केला .योग्य ठिकाणी पॅकिंग दिले.
"तुझी शेपटीच अडकली नाही , तर माझाही शालू त्या फटीत अडकून फाटलाय."आपला शालू दाखवत तो म्हणाला.
"देवा त्याला मखर आणि बाजूचे डेकोरेशन तरी बदलायची बुद्धी दे.दरवर्षी तेच तेच .आपण इथेच कायम राहतो असे वाटते बघ " उंदीर चिडून म्हणाला.
" यावर्षी थर्माकोल वापरायचे शेवटचे वर्ष अशी ऑर्डर काढायला लावली आहे मी त्यामुळे पुढच्या वर्षी नवीन मखर असेल अशी आशा करू. हळू हळू प्लास्टिकवर ही बंदी आणू म्हणजे हा प्लास्टिक वापरायचे ही बंद होईल."तो हसतहसत उंदराला म्हणाला .
"पण तुम्ही कधीही त्याच्याविषयी तक्रारीचा सूर काढत नाही . ते बघा, गेली पाच वर्षे मी त्याचा तोच ड्रेस बघतोय." पूजेला बसणाऱ्या गजाकडे पाहत उंदीर म्हणाला ."तरी नशीब बाबांचा ड्रेस मागच्या वर्षी आरती करताना थोडा जाळलात , नाहीतर त्यांच्याही अंगावर नवे कपडे दिसले नसते.
"अरे ती तर गंमतच झाली .ती सुनंदा पारकर आरती संपल्यावर याच्या घरात शिरली आणि हा वेड्यासारखा तिच्याकडे पाहत बसला तीच संधी घेऊन मी बाबांचा ड्रेस खराब केला. नाहीतर आपल्याला कुठे अशी जादू करायला जमतेय"जुन्या आठवणीत तो रमून गेला .
" पण इतके असूनही दरवर्षी उत्साहाने त्याच्या घरी येता" उंदीर आश्चर्याने म्हणाला 
" हो ,गजा व्यवहारी आहे .इतरांच्या भाषेत कंजूस आहे.पण तो प्रामाणिक आहे.कष्टाळू आहे.घरी खाण्यापिण्यात कोणाचे हाल करत नाही ." समोरच्या मिक्स ड्रायफ्रुटच्या प्रसादकडे हात दाखवीत तो म्हणाला .
"पण उगाच वस्तू घ्यावी आणि जुनी चांगली वस्तू फेकून द्यावी हे पटत नाही त्याला .त्याचा धंदा चोख आहे. मुलांवर चांगले संस्कार आहेत .वहिनींवर मनापासून प्रेम करतो .अर्थात इतर स्त्रियांकडे पाहणे हा पुरुष स्वभावाचा एक भाग आहे म्हणा."तो हळूच डोळा मारीत उंदराला म्हणाला .
"पण या वस्तू बदलायला हव्या.हल्ली लोकांनाच काय पण आपल्याला ही चेंज आवडतो " उंदराने आपले म्हणणे पुढे रेटले 
" हो पण काहीजणांना समजवायला वेळ लागतो.हा चौरंग जुना असला तरी गेली ऐंशी वर्ष यावर बसतोय मी आणि याच्या आजोबांनी यासाठी किती मेहनत घेतली तेही पाहिलंय मी.नवीन चौरंग पाहून गजाच्या बापाचा चेहरा कसा हरकून गेला होता ते आठवतंय का ? त्यावेळी तू ह्याच चौरंगावर माझ्याभोवती प्रदक्षिणा घालायचाच. पण आता मी ही तोच आहे, चौरंग ही तोच, फक्त तूच आळशी झालास " रागाने उंदराकडे नजर टाकून तो म्हणाला.
" देवा हल्ली वेळ कुठय आणि प्रदक्षिणा  मारायला जागा ही नाहीय.त्यादिवशी चुकून खाली उतरलो आणि एका भक्तांच्या पायाखालीच आलो. नशिबाने वाचलो बघ " उंदीर शहारून म्हणाला .
"सोड , प्रत्येक गोष्टीची वेळ येते .याची ही येईल ,डोळे मिटून तो म्हणाला आणि शांतपणे घोरू लागला.
हे सहा दिवस  त्याचे मोठ्या आनंदात गेले. विसर्जनाला गाडीत बसून तो समुद्रावर आला .भरतीची वेळ आणि विसर्जनासाठी खूप गर्दी.आपल्या मित्रांना हात दाखवून त्यांचा निरोप घेत होता.सर्वांचे डोळे पाणावले होते.या दहा दिवसांत त्यांना जो आनंद मिळत होता तो वर्षभर पुरणार होता.
समुद्राला भरती आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे कोणाला समुद्रात जाऊ देत नव्हते.काही पट्टीच्या पोहणार्यांनी गणेश विसर्जनाची जबाबदारी अंगावर घेतली होती.
त्याला पाहून दोन माणसे पुढे झाली.पाटासकट त्याला उचलले आणि समुद्राकडे निघाले.डोळे पुसत गजाने हात हलवीत त्याला निरोप दिला आणि पाटाची वाट पाहू लागले.
पण हे काय ? ती माणसे रिकामीच हात हलवीत परत आली.
"पाट कुठेय ?" गजाने काळजीने विचारले .
"माफ करा साहेब.पण गणपती पाण्यात बुडवला आणि अचानक हाताला फटका बसला , त्यात पाट हातातून निसटला आणि बाप्पा सोबत वाहून गेला " दोन्ही हात जोडत ते दोघे म्हणाले.
"म्हणजे बाबा पुढच्या वर्षी नवीन पाट आणावा लागेल " समीर खुश होऊन म्हणाला ."पण यावेळी पाट मी आणेन माझ्या पैशांनी ,मला पाहिजे तसा.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या "
© श्री .किरण कृष्णा बोरकर

THE DEVIL"S PLAN

THE DEVIL"S PLAN
 द डेव्हिल प्लॅन 
त्या बंद बंगल्यात एकूण बारा व्यक्तींना बोलाविण्यात आले होते. हे बाराही जण आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध होते.यात काही तरुणीही होत्या.एक जण विज्ञानप्रेमी होता.तर एक वकील ,एक नामवंत अभिनेता ,तर एक पत्रकार ,एक खेळाडू  .एक तरुण आणि एक तरुणी प्रेक्षकांतून निवडून आले होते. बंगला अतिशय सुसज्ज अत्याधुनिक सुखसोयीने सज्ज होता.
इथे त्यांना आठवडाभर राहायचे आहे.प्रत्येकाला एक सोन्याचे नाणे दिले होते.त्यांना तिथे विविध खेळ खेळायचे आहेत . खेळाचा सूत्रधार तोंडावर बुरखा घालून खेळाचे नियम समजावून सांगायचा.
प्रत्येक खेळातून अधिकाधिक सोन्याची नाणी मिळवायची असतात.अर्थात या खेळात ते सोन्याची नाणी गमवूही शकतात .हे खेळ कसे असतील ? काय नियम असतील ? याची कल्पना कोणालाच नसते .
यातील खेळाडू काही काळ काळकोठडीत जाऊ शकतात . कधी एकमेकांची साथ घेऊन तर कधी एकमेकांवर वरचढ होऊन हे खेळ खेळायचे आहेत.बुद्धीला चालना देणारे हे खेळ त्या बाराही जणांच्या बुद्धीचा कस पाहणारे आहेत.यात जो जास्त नाणी मिळवेल तो प्रचंड श्रीमंत होईल .पण त्यासाठी त्याला खूपच प्रयत्न करावे लागतील.
यात हाणामारी नाही,रक्तपात नाही,एकमेकांवर आरडाओरड नाही.राजकारण नाही .शिव्या आणि घाणेरडी भाषा नाही.फक्त खेळा आणि जिंका.हसतखेळत चालू राहणारी ही स्पर्धा निश्चितच बघण्यासारखी आहे. चला आपणही या कोरियन सिरीजचा भाग होऊ आणि खेळाचा आनंद घेऊ.
नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.