Friday, August 31, 2018

फक्त 13 दिवस ....हेमंत सावंत

फक्त 13 दिवस ....हेमंत सावंत
मनोरमा प्रकाशन
रहस्यकथा वाचणाऱ्यांसाठी हेमंत सावंत हे नाव नवीन नाही . कधी कधी वेगळा प्रकार म्हणून रहस्यकथा वाचाव्यात. यात  तीन कथा आहे . वाचायला कंटाळा येत नाही . फार काही गुंतागुंत नाही त्यामुळे डोक्यावर ताण पडत नाही . वाचता वाचता वेळ कसा निघून जातो आणि छान टाईमपास होतो .त्यामुळे एकदा वाचायला हरकत नाही .

हिटलरचे अवतार ..... पंढरीनाथ सावंत

हिटलरचे अवतार ..... पंढरीनाथ सावंत
मनोरमा प्रकाशन
यात आपल्याला जो सर्वसामान्य जनतेच्या नजरेतील हिटलर दिसतो तो नाही तर अत्यंत खाजगीत राहणारा हिटलर वाचायला मिळते . जनतेतील देशातील हिटलरची जी प्रतिमा आहे त्यापेक्षा विरुद्ध प्रतिमा आपल्याला दिसते . म्हणूनच लेखकाने हिटलरचे अवतार असे नाव दिले असावे . त्याची राहणीमान ....त्याचे लैंगिक जीवन... त्याचे अनेक स्त्रियांशी असलेले गूढ संबंध ...याची छोट्या छोट्या कथेच्या स्वरूपात माहिती दिली आहे . त्याच्या संपत्तीचे गूढ आणि त्याचे स्पष्टीकरण दिले आहे . तर हिटलरने बांधलेले कॉफीहाऊस आणि त्यात रंगणाऱ्या पार्ट्या ....हिटलरची तिथेही चालणारी हुकूमशाही वाचून आपण हैराण होतो . हिटलरचे लैंगिक जीवनही यात रंगवून सांगितले आहे . स्त्रियांवर चालणारी त्याची जबरदस्ती वाचून आपले मत बदलते .राजकारणात त्याने आपल्या स्त्रियांचा आणि मित्रांचा धूर्तपणे वापर केला .त्याने बांधलेले बंकर हे स्थापत्यशास्त्रचे उत्कृष्ट नमुने समजले जातात . त्यामागची कहाणी ही वाचनीय आहे . थोडक्यात हिटलरची दुसरी बाजू मांडणारे हे पुस्तक वाचनीय आहे .

Tuesday, August 28, 2018

दिवस

दिवस

भर श्रावणात अचानक आंदोलन झाल्यामुळे श्री.काळूभाऊ कावळे चिडले होते.श्रावणात संपूर्ण महिना म्हणजे विविध पदार्थांची मेजवानी .काही ठिकाणी तर लोक स्वतःहून  बोलावतात.अश्यावेळी संघटनेच्या कावळ्यांनी आंदोलन करायची गरज काय..??  प्रत्येकाला जागा / हद्द ठरवून दिल्या आहेत....तेथे जे काही मिळेल ते त्यांचेच..... . अर्थात काही ठिकाणी काही कावळ्यांनी मोक्याच्या जागा पटकाविल्या आहेत हे मान्य ....आणि त्याबद्दलचा  योग्य हिस्सा श्री. कावळे याना मिळत होता ती गोष्ट वेगळी..... म्हणूनच काही कावळे चिडले होते.
घाईघाईने उडत ते नाक्यावरच्या वडाच्या झाडावर असलेल्या ऑफिसमध्ये शिरले. आत शिरताच एका सदस्याने ताबडतोब एक ताजी जिवंत अळी त्यांच्यासमोर ठेवली . पण श्रावण असल्याने त्यांनी रागाने काव काव करून चीड व्यक्त केली.
"कोणाचा प्रॉब्लेम आहे ....??? त्यांनी सेक्रेटरीला विचारले. तिने नाजूक आवाजात काव काव करीत एक निवेदन त्यांच्याकडे दिले .दशक्रिया विभागात  नेमलेल्या काहीजणांची तक्रार आहे .
"ते दहा वाजता आले तेव्हाच शंका आली मला.....दहानंतर मोकळेच असतात ते.. बोलवा त्यांना आत... "बाहेर फांद्यांवर बसलेले काही कावळे आत शिरले.
" साहेब..... आमची बदली करा .आता नाही जमत तिथे .ते हात जोडून श्री.कावळे याना म्हणाले.
" काय प्रॉब्लेम आहे तिथे...?? सगळ्यात आरामाची जागा आहे तुमची.सकाळी दोन  तास फक्त घाईचे.. नंतर आरामच असतो .स्वतःची पार्ट टाइम कामेही करता तुम्ही ..." श्री.कावळे चिडून म्हणाले.
" साहेब.... आहो तेच तेच अन्न खाऊन कंटाळा आलाय आम्हाला . किती वर्षे झाली तरी पिंडातील अन्नात बदल नाही . शिवाय हल्ली कामाचा लोड वाढलाय .पूर्वी रोज तीन ते चार कार्य व्हायची पण आता पन्नास कार्य होत असतात त्यामुळे पिंडाचा दर्जा ही खराब झालाय . आम्हाला धड काव काव ही ओरडता येत नाही . कसेही गोळे बनवितात आणि आमच्या पुढ्यात ठेवतात . बरे.. जोपर्यंत चोच मारत नाहीत तोपर्यंत ते  जात ही नाहीत "
"बरे ....बरे ..हे कळते मला. हल्ली तुम्हीही चोच मारायचा  कंटाळा करता... पण त्याचे परिणाम किती वाईट होतात ते माहितीय का.. ?? त्या दिवशी एका तरुणांच्या पिंडाला शिवलात नाही तुम्ही ...तेव्हा घरी गेल्यावर त्याच्या विधवा बायकोने सगळ्यांच्या शिव्या खाल्ल्या . तर परवा म्हाताऱ्याच्या पिंडावर चोच नाही मारलीत तर त्याची मुले म्हातारा अजूनही अतृप्त दिसतोय साला गेल्यावर ही त्रास देतोय असे ऐकावे लागले . तुमच्या न शिवण्यामुळे कित्येकजणाना उशीर होतो .... दिवस वाया जातो. कित्येकजण आंघोळ न करता कामावर जातात. लोकल ट्रेन बसने प्रवास करतात.आपल्याला शिव्या देतात.अरे.... फक्त ह्याच प्रसंगी आपल्याला मान देतात लोक आणि तुम्ही त्यातही शिव्या खातात....." . श्री कावळे चिडूनच बोलत होते कारण त्यांच्या जागी बदलीवर कोणताच कावळा जाणार नव्हता आणि श्री. कावळे यांनाही वरकमाई काहीच नव्हती . पण तरीही त्यांना संघटनेची काळजी होती कावळ्याना दुखावून चालणार नव्हते .
" ठीक आहे .....मी शोध घेतो आणि काही महिन्यासाठी तुमची बदली करतो .पण लक्षात ठेवा जिथे जाल तिथे नीट वागा.परवा एकाची बदली केली तो एका घरी सकाळी सहा वाजता जाऊन काव काव करू लागला तेव्हा वहिनीने गरम पाणी अंगावर ओतले त्याच्या अंगावर ...नंतर लक्षात आले जुना कावळा सकाळी दहा वाजता तिथे जायचा "....असे बोलून काव काव करीत श्री. कावळे उडून गेले
त्याच वडाच्याखाली ग्रामस्थांची सभा भरली होती . श्री.मुणगेकर मास्तर अध्यक्षस्थानी होते.
"दादानो..... ह्या दिवसाचा काय तरी ठरवा. हल्ली कोण दिवसाक येऊच नाय. पाया पडून पळून जातत. जेवान किती फुकट जाता....गावाच्या बायकांचे कष्ट वाया जातत नाय ....."??  अशोक सावंत चिडून बोलत होता.
" बरोबर हाय भाऊंचा .... हरी तिकडून बोलला .पण हातातली विडी काही टाकली नाही. लोक दिवसाक येतात ते चार लोका भेटतील ....एकत्र बसून जेवतील .....दुःख दाखवतील... पण तेराव्याचे जेवान काही बराबर नाय . किती वर्ष ताच ताच खाणार.... डाळ भात ....बिरडा खाऊन कंटाळा येता लोकांक . त्यात रविवार बुधवार असलो की घरातले सोडून बाहेरचो कुत्रो पण येऊचा नाय .एक तर लोकांका पॉटभर जेवूक घाला नाहीतर कायच देऊ नका...."
"ठीक आहे ....माका पटता. आता तुम्हीच उपाय सांगा...."??  मुणगेकरानी ग्रामस्थांना विचारले .
"गावात म्हातारी माणसे गेली तर मटनाचा जेवण ठेवू आणि भाकऱ्या ठेवू थोडो भात... बाकी काय नाय . तीनच वस्तू ....खर्च कमी आणि काय फुकटपन जवचा नाय ..आणि कोण तरणो मेलो तर चाय चिवडा ठेवू . नायतर हल्ली म्हाताऱ्यांका कोण विचारत नाय . जेवढे लवकर जातील तेवढे चांगले . बाहेरच्यांपेक्षा घरचेच खुश होऊचे.." हरी विडीचा झुरका मारत म्हणाला .
"व्हय.... व्हय ...! आमका चालता.. सगळ्यांनी हात वर केले .आणि मुणगेकरांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, August 25, 2018

रक्षाबंधन

रक्षाबंधन
रात्रीपासून ती आणि तिचे साथीदार अंधारात दबा धरून बसले होते.गडचिरोलीचे ते जंगल भयानकच होते पण त्याहीपेक्षा खतरनाक होते तेथील नक्षलवादी . अश्याच एका नक्षलवादी म्होरक्याच्या मागावर ती होती.
ती अनुजा रणदिवे . .... नक्षलवाद्यांच्या काळजात धडकी भरविणारी अधिकारी. गडचिरोली चंद्रपूरच्या दहशतवादी विरोधी पथकाची प्रमुख.आतापर्यंत तिने अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते.पण आतापर्यंत तिने एकालाही जिवंत कसे पकडले नाही याची चर्चाच जास्त होत होती.विचारले की ती म्हणायची पेपरवर्कचा कंटाळा येतो . तसेही तिला ऑफिसमध्ये बसलेले फारच कमीवेळा पाहिले गेले होते.
आज रक्षाबंधन होते तेव्हा नक्षलवाद्यांचा मोरक्या माखन बहिणीला भेटायला येणार याची खबर तिला मिळाली होती आणि म्हणून आपल्या वीस साथीदारांसह रात्रीपासून त्याच्या वस्तीजवळ दबा धरून बसली होती.सकाळचे सात वाजता आले होते . डोळ्यावरची झापड दूर करीत हातातील ए के 47 सांभाळत ती समोरच्या वस्तीवर नजर ठेवून होती . मध्येच तिला भावाची आठवण झाली . दरवर्षीप्रमाणे राखी पोस्टाने पाठविली होती . ह्या नोकरीत भावाला प्रत्यक्षात भेटून राखी ही बांधता येत नाही असा विचार मनात येउन स्वतःशी हसली.
इतक्यात वस्तीत काही हालचाल सुरू झाल्याची चाहूल तिच्या अनुभवी कानांनी टिपली . हात उंचावून तिने आपल्या साथीदारांना सावध केले .वस्तीभोवतीचा वेढा हळूहळू आवळला गेला . लक्ष ठरविली गेली आणि एकच क्षणी ती सर्व साथीदारांसहित त्यावर तुटून पडली . वस्तीतली सर्व रहिवासी भांबवून गेले . एक वादळ यावे तसा तिचा हल्ला होता .काही कळायच्या आतच काही नक्षलवादी अंगावर गोळ्या घेऊन पसरले तर काहींनी क्षीण प्रतिकार करीत मरण पत्करले.ती आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत एखाद्या झंझावतासारखी माखनच्या झोपडीत शिरली . आतमध्ये माखन आपल्या बहिणीचा ढालीसारखा वापर करून उभा होता . त्याची बहीण भीतीने थरथर कापत उभी होती .अनुजाने हातातली ए के 47 खाली केली आणि साथीदारांनाही इशारा केला.
"मारू नका त्याला ...."ती हात जोडून म्हणाली.अनुजाने मान डोलावली . मग हातातील राखी दाखवून नजरेनेच तिची संमती घेतली. तिनेही नजरेने होकार दिला . माखनच्या थरथरत्या हातावर तिने राखी बांधली आणि ओवाळणी केली तोपर्यन्त अनुजा आणि तिचे सहकारी सावधपणे उभे होते.
सर्व आटोपताच तिच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि सर्व बाहेर जाण्यासाठी वळले . अचानक अनुजाच्या कानावर ओळखीचा  बारीक हलका आवाज आला.... क्षणार्धात ती वळली आणि आपल्या हातातील रायफलीच्या गोळ्यांनी माखनच्या बहिणीच्या शरीराची चाळण केली. माखनने चमकून बहिणीकडे पाहिले तेव्हा ती माखनची रायफल हातात घेऊन खाली कोसळत होती.
" कुत्र्या...... तुझ्या बहिणीला माहीत नाही की नेहमी बंदुकीशी मैत्री करणार्यांना तिचा लोड करण्याचा आवाज झोपेतही ओळखून येतो.खरे तर तुला ही आताच वर पोचवणार होते  पण तुझ्यासाठी हिने मरण पत्करले त्याची आयुष्यभर तुला जाणीव राहायला हवी ती कशी मेली हे सतत तुला डोळ्यासमोर दिसायला हवे म्हणून तुला जिवंत ठेवते . आता बस आयुष्यभर तिची आठवण काढीत जेलमध्ये "असे बोलून बाहेर पडली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, August 21, 2018

ती आणि राखी

आज चांगलाच मूड बनवून त्याची पावले तिकडे वळली. नवीन पाखरू आल्याची साखरबातमी त्यालाही कळली होतीच. तिला बघायला, स्पर्शायला तो आतुर झाला होता.  नेहमीप्रमाणे ऍडव्हान्स देऊन तो तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. तेवढ्यात कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाजाने दार उघडले तसे त्याचे डोळे चमकले. 

खरे तर त्याला माहित होतेच की हे पाखरू नवं आहे त्यासाठीच तर तो आला होता. पण त्याला काहीतरी वेगळंच जाणवत होतं आज. ती ह्या वातावरणाला रुळली नाही हे तर स्पष्ट कळत होते. पण तरीही काहीतरी वेगळं त्याला सतत जाणवत होतं. ती कोपऱ्यात बसून होती.
"नई हो ...."?? त्याने नजर रोखून विचारले. तिने फक्त मान डोलावली.
नवीन मुलगी जशी गयावया करते "मुझपे रहम करो, मुझे यहासे निकलने में मेरी मदद करो" म्हणून पाय धरते तसेच काहीसे त्याला अपेक्षित होते. पण तसे काहीच न घडता तीही नजर रोखून त्याच्याकडे पहात होती. तसा आता तो अवघडला. का कोण जाणे पण आता त्याची इच्छा मरून गेली. कित्येक नवी पाखरे त्याने अंगाखाली घेतली होती पण हिच्यात काही वेगळे होते नक्की.
"बसायचं ना ..???" तिने सलवारची नाडी पकडत विचारले. तोंडातून मराठी शब्द येताच तो चमकला. "कुठून आलीस ....??" त्याने प्रश्न केला.
"मसणातून आले ...तुला काय करायचंय...??"
"इथे कशी ....??"  परत त्याने  विचारले.
"आई बापानेच पाठवली... दर महिना 25 हजाराच्या बोलीवर." 
"म्हणजे आईबापानेच विकल तुला..?? आणि हे तू इतक्या शांतपणे सांगत्येस...??." तो हादरला....
" काय करू तमाशा करून..?? लहान भाऊ खूप हुषार आहे. खूप शिकायचे आहे त्याला.घरात पैसे नाहीत आणि तशीही मुलगी म्हणून त्यांना मी नकोच होते पहिल्यापासून. लग्नासाठी ते खर्च करायला तयार नाहीत. म्हणून इकडे पाठवली भावाचे तरी भले करेल म्हणून...."  बोलताना तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तोही क्षणभर सुन्न झाला.
"तुला काय वाटते ...??? हे आवडते तुला ... त्याने मूर्खांसारखा प्रश्न केला.."  "इथे असलेल्या कोणत्या मुलीला आवडते ..??"तिचे तिखट उत्तर.
" आता भाऊ कुठे आहे तुझा ....?? त्याला माहित आहे तू कुठे आहेस....?" त्याची उत्सुकता संपेना.
"माहीत नाही ... कुठेतरी जाणार होता शिकायला. त्याला नाही आवडणार मी जे काही करतेय ते ...?? कोणत्या भावाला आवडेल ...?? तुम्हाला आवडेल ......??? ह्या   प्रश्नाने तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मनात म्हणाला, "खरेच असा विचार कधीच का शिवला नाही आपल्या मनाला."
तिने त्याच्याकडे पाठ केली आणि सलवार उतरवू लागली. अचानक त्यातून काहीतरी खाली पडले. त्याने ते उचलले. एक बंद पाकीट होते ते....त्यावर पत्ता लिहिला होता आणि स्टॅम्प लावला होता.
"हे काय आहे.....?" कशीतरी शब्दांची जुळवाजुळव करून त्याने प्रश्न केला. क्षणभर तिने त्याकडे पाहून ते पाकीट हिसकावून घेतले.
"राखी आहे त्यात... गेले पाच दिवस माझ्यापाशी आहे. पोस्टात टाकायचा धीर होत नाही." बोलता बोलता तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो काही न बोलता खाली मान घालून बाहेर पडला .
© श्री . किरण कृष्णा बोरकर

Monday, August 20, 2018

बंदा रूपाया ... विश्वास पाटील

बंदा रूपाया ....... विश्वास पाटील
मेहता पब्लिकेशन
हे आत्मचरित्र नाही ... हे प्रवासवर्णन ही नाही ...की ह्यात कथाही नाहीत ....ही आहे विश्वास पाटील यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील मुशाफिरी .त्यांना आलेले अनुभव ....त्यांना भेटलेली माणसे.... हे सर्व यात आपण अनुभवतो . महानायक लिहिताना  त्यांनी केलेला ब्रह्मदेशातील प्रवास नेताजींच्या आठवणी  डोळ्यासमोर उभे राहतात . फिल्मसिटीत  संचालक असताना आलेले अनुभव ही वाचनीय आहेत .मराठी नाटक आणि तमाशातील आठवणी ते आपल्याला फडात घेऊन जातात..झाडाझडती आणि संभाजीच्या मागे किती मेहनत आहे ते लक्षात येते .एकूणच या मुशाफिरीतून घडलेला हा बंदा रुपया आहे .

Saturday, August 18, 2018

सुखी संसार

सुखी संसार
प्रसादला मॉलमध्ये खरेदी करताना पाहून आम्ही हैराण झालो.स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने मॉलमध्ये सवलत होती म्हणून मी आणि विक्रम फिरायला आलो होतो .तसाही आज ड्राय डे असल्यामुळे कुठे बाहेर बसायचा चान्स नव्हताच .कमीतकमी मॅक्डोनाल्डमध्ये विक्रमच्यासोबत बर्गर खायला मिळेल म्हणून मीही निघालो होतो.
तेव्हाच आम्हाला  फूड सेक्शनमध्ये प्रसाद दिसला...... नुसता दिसला नाही तर खरेदी करताना दिसला.... आणि साधारण एका वर्षाच्या बाळाला घेऊन दिसला....!! . आम्हा दोघांसाठी ते धक्कादायकच दृश्य होते.
विक्रमने जवळ जाऊन त्याच्या पाठीवर थाप मारली तो पटकन वळला आणि आम्हाला पाहून आनंदाने ओरडला . त्याला घेऊनच आम्ही कॉफीशॉपमध्ये शिरलो .
प्रसाद उते हा आमच्या कॉलेजचा मित्र . अतिशय शांत आणि संथ ही . पुढे व्यावहारिक जगात याचे कसे होणार याची आम्हाला काळजी . पुढे जो काही गायब झाला तो आज असा दिसला.
" बोला प्रसाद साहेब ........!! कसे चालले आहे तुमचे .....?? विक्रमने नेहमीप्रमाणे सुरवात केली .
तो हसत म्हणाला "उत्तम .... ! मस्त....
" छान ......!! मी म्हणालो "काय करतोस सध्या .!!
तसा पुन्हा हसत म्हणाला "घरकाम ..आणि आराम..
आमचे प्रश्नार्थक चेहरे पाहून तो हसला " माझे लग्न ठरले ते इंटरनेटवर .बायको डॉक्टर आहे ...म्हणजे शास्त्रज्ञ आहे.....खूप शिकलेली आणि सतत अभ्यासाच्याआणि संशोधनाच्या मूडमध्ये... तिने लिहिले होते मला सहकारी हवाय जो माझ्या गरजा भागवू शकेल..मला मदत करेल....संसारात मला बायकोची भूमिका पाळणारा नवरा पाहिजे. तुम्हाला माहितीय ....मी किती आळशी ..संथ माणूस..  लगेच होकार देऊन टाकला .तिने भेटायला बोलावले आणि सर्व काही सांगून टाकले ...मला ते पटले.. मी हो म्हणालो . नंतर महिन्यांनी लग्न केले आणि तिच्या फ्लॅटवर आलो "
"काय म्हणतो ...??? घरजावई ...."?? विक्रम आश्चर्याने ओरडला .
"नाही रे .....! स्वतंत्र संसार ..... तुम्ही नाही का स्वतंत्र संसार करत ....आणि मी तिच्या घरी गेलो ..... लग्न झाल्यावर एक स्त्री आपले घरदार सोडून नवऱ्याकडे येते तर पुरुषाने बाईच्या घरी का जाऊ नये .....?? प्रसादचा प्रश्न ऐकून आम्ही चूप झालो .
"बरे मग पुढे..... विक्रमचा प्रश्न
"पुढे ...दुसऱ्या दिवसापासून मी घरातील सर्व कामे हाती घेतली.धुणी भांडी करायला बाई होतीच . पण उठल्यावर चहा, नाश्ता जेवण सर्व मीच करू लागलो आणि ती कामावर गेल्यावर आराम. संध्याकाळी ती घरी आल्यावर चहा मग रात्रीचे एकत्र जेवण.. हेही मीच पाहू लागलो. तिच्या आणि माझ्या घरच्यांबरोबर संवाद साधू लागलो " त्याचे उत्तर तयार होते .
"बरे पैश्याचा व्यवहार कसा... ??? माझा प्रश्न .
"भाऊ वहिनीला कसे देतोस तू ... ?? तसेच मलाही मिळतात ...दर महिना ... कमी पडले तर मागायचे . पैसे खूप आहेत आमच्याकडे . प्रचंड कमावते ती. प्रसाद म्हणाला .
" बरे मग ह्याचे काय....?? विक्रम हाताची मूठ मागे पुढे हलवत म्हणाला ..अर्थात विक्रमलाच त्याची काळजी असणार म्हणा .
"जसे तुमचे होते तसेच ..याबाबतीत मात्र बायको आहे ती . तिला दोघांच्याही शारीरिक गरजा माहीत आहे त्यामुळे त्यात कोणाचाही इगो आड येत नाही " प्रसाद हसत म्हणाला .
"मग ह्या मुलांसाठी तरी बायको बनली ना ती.....?? सहन केले ना बाळंतपण ...??? विक्रम छद्मीपणे हसत म्हणाला .
"अरे नाही .....हे आमचे दत्तक मूल आहे .... रेडिमेड डायरेक्ट हातात.....तिने स्पष्ट सांगितले माझ्या कामात अडथळा येईल असे काही नको .तुझी मूल सांभाळायची तयारी असेल पण माझी मुलाला जन्म देण्याची तयारी नाही .एक छोटे मूल दत्तक घेऊ त्याचा सांभाळ दोघेही करू पण आई तू बाप मी .....
"अरे देवा ....!! आता तर विक्रमचा धीर सुटू लागला .
"काय रे अशी वेळ येत नाही का  कोणावर ... ??पुरुष पत्नीला असे म्हणाला तर चालले असते पण स्त्री बोलते ते आवडले नाही का..." ?? मला पटले नाहीतरी जगात कित्येकजण आहेत ज्यांना मूल होत नाही ....ते दत्तक घेतात ना मुले ...?? तसे आम्ही घेतले ..प्रसाद सहजपणे उत्तराला.
"अरे तू पुरुष ना ....मग असे कसे वागतोस बायकांसारखे ....?? विक्रमचा तोल सुटला ...
" काय चुकते रे माझे .....? मी केवळ काम करून भरमसाठ पगार घरात आणत नाही की बायकोवर असेरावी करीत नाही ....?? एका बाईला वाटते आपला संसार सुखाचा असावा.... पुरेसे पैसे असावे...साथीदाराने वेळ द्यावा ....शारीरिक सुख द्यावे  नातेवाईकांचा आदर करावा ...सगळी सुखें पायाशी लोळण घ्यावी ..मग हेच माझ्याबाबतीत घडत असेल तर वाईट काय.... ??? माझ्या बायकोला व्यसन नाहीत. सरळ काम संपले की घरी येते ...माझ्याशी गप्पा मारते ...एकत्र बसून जेवतो ..कधी कधी एकत्र फिरायला जातो .संपूर्ण भारत फिरून आलो आम्ही . पुढच्या वर्षी परदेशात जाऊ .आमचे शारीरिक संबंध छान आहेत . ती दोघांच्याही आई वडिलांचा आदर करते . कितीही खर्च करायची मुभा आहे मला . मुलाला ही पुरेसा वेळ देते . संसार यालाच म्हणतात ना ...??? फक्त स्थान बदलले . याच जागी जर एखाद्या मोठ्या पगाराच्या मुलाने गावातून कमी शिकलेली मुलगी लग्न करून आणली असती आणि तिला असे वागवले असते तर त्याची वाह वाह केली असती तुम्ही . खरेच आज मी सुखी आहे . घरातील एक प्रमुख जबाबदारी घेऊन संसार करतोय . जरुरी नाही पुरुषांनी पुरुषाचे आणि स्त्रियांनी स्त्रियांचे काम करायला हवे. शेवटी सुखी संसार महत्वाचा "
मीही मान हलवून त्याला दुजोरा दिला " तू आणि तुझी बायको सुखी आहात ना ....??तेच महत्वाचे  ...
इतक्यात बिल आले तेव्हा आम्हाला अडवून त्याने खिश्यातून क्रेडिट कार्ड काढून दिले . विक्रम आ वासून त्याच्याकडे पाहत बसला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, August 15, 2018

उध्वस्त ...... उमेश कदम

उध्वस्त ...... उमेश कदम
मेहता पब्लिकेशन
अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्या युद्धातील ही एक गोष्ट आहे .मी लाय या क्वांग अंगै खेड्याजवळील छोट्या वस्तीत अमेरिकन सैनिक शिरतात आणि एकूण एक रहिवाश्यांना मारून टाकतात . त्यांच्या अत्याचारातून लहान मुले वृद्ध स्त्रियाही वाचत नाहीत. त्यांच्याबरोबर असलेला सरकारी छायाचित्रकार चोरून या संपूर्ण घटनेचे फोटो घेतो . योगायोगाने एक सहा वर्षाची मुलगी यातून वाचते पण तिला आपल्या आईवडिलांची प्रेते पहावी लागतात . अमेरिकन छायाचित्रकार ही सगळी माहिती प्रसारमाध्यमाला देतो आणि अमेरिकेत मोठी खळबळ उडते . सरकारला जनतेचा प्रचंड रोष सहन करावा लागतो. वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो .खरे तर ही एक सत्यघटना आहे आणि लेखकाने यात कल्पनाविस्तार केला आहे .मन सुन्न करणारी कादंबरी .

Sunday, August 12, 2018

सैनिक

दोघेही एकाच बोगीतून प्रवास करीत होते. पहिला शांत बसून एकटक बाहेरील दृश्य पाहत होता... तर दुसरा सतत काहीतरी हालचाल करीत होता.
अखेर दुसर्याने मौन तोडले."शी.....किती गरम होतेय. बोगीतील एसी काहीच कामाचा नाही.थोडा वाढवावा लागेल....." असे बोलून पहिल्याच्या चेहऱ्याकडे पाहिले.त्याच्या चेहऱ्यावरचे शांत भाव हाच होकार समजून त्याने अटेंडन्ट ला एसी वाढविण्यास सांगितले.
"खरोखर ....या भारतात राहायचे म्हणजे एक शिक्षाच आहे.सरकारला भरमसाठ कर द्यायचा पण त्याबदल्यात काही मिळत नाही "
पहिला नुसता हसला . इतक्यात अटेंडन्ट परत जेवणाची ऑर्डर घ्यायला आला .दुसर्याने मेनू काय..??? असे विचारले .मेनू ऐकताच तोंड वाकडे केले . नाईलाज झाल्यासारखे नॉनव्हेजची ऑर्डर दिली. पहिल्याने मात्र काही न विचारता व्हेज सांगितले.
"ह्यांना धड जेवण ही ठेवता येत नाही चांगले ...थोड्या वेळाने जेवण आले . दुसऱ्याची जेवणाबरोबर बडबड ही चालू होती. शेवटी कंटाळून दुसर्याने अर्धे अन्न टाकून दिले. पहिला मात्र ताटात एकही कण न ठेवता जेवला .दुसऱ्याची बिसलरी पाण्याची ऑफर नाकारत स्वतःच्या बाटलीतील पाणी पियाला.रात्री झोपताना दुसर्याने बेडवरील चादर बदलायला लावली .ब्लॅंकेट बदलून घेतले .पहिला मात्र तसाच बेडवर पसरला.
" आपण कुठे निघालात.... ??? दुसर्याने पहिल्याला प्रश्न केला.
"घरी ....."पहिल्याने मोजकेच शब्द उच्चारले.
"मी एक उद्योजक आहे ... भारतातील प्रमुख ठिकाणी माझी ऑफिसेस आहेत . त्यामुळे सतत प्रवास करत असतो . पण आम्ही कर भरूनही सरकार आम्हाला पुरेसा लाभ देत नाही म्हणून चिडतो.तुम्ही काय करता ....."???  दुसर्याने विचारले.
"मी भारतीय सैन्यदलात एक सैनिक आहे".पहिला अजूनही शांत होता.
"अरे वा ..... सैनिक .....फारच छान .. खूप अभिमानाची गोष्ट आहे ही . संपूर्ण भारतभर नोकरी असते तुमची . देशाच्या रक्षणासाठी चोवीस तास डोळ्यात तेल घालून शत्रूवर लक्ष ठेवून असता"..दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता ."पण एक विचारू....??  खूपच अशक्त आणि अबोल वाटता तुम्ही .इथे जे काही चालते त्याविषयी काहीच बोलला नाहीत ...???
"काय बोलायचे .....???पहिल्याने शांतपणे विचारले . ह्या एसीबद्दल बोलू . राजस्थानमधील वाळवंटात 46℃  हातात ऐ के 47 घेऊन दोन दोन दिवस उभा राहिलोय मी... ह्यापेक्षा भीषण गर्मी तुम्ही अनुभवली आहे का.... ???   मी नुकताच सियाचेनमधून येतोय. तीन महिने सीमेच्या रक्षणासाठी होतो तिथे . उणे १५℃  वातावरण होते . चहूकडे बर्फच बर्फ .हरवून जाऊ नये म्हणून एकमेकांच्या कमरेला दोरी बांधून होतो. समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट बर्फात उभे होतो . कसली करमणूक नाही . हवाबंद डब्यातील अन्न पुरवून पुरवून खायचे .पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब करावा लागायचा . खाली आलो तेव्हा वजन घटले होते .तिथे सर्व कामे आम्हालाच करावी लागायची . त्या तीन महिन्यात आम्हाला प्रत्येक गोष्टीचे महत्व कळले .आता इथे आल्यावर कळते तुम्ही किती सुखी आहात. तुम्हाला अन्नाची पर्वा नाही . तुम्हाला पाहिजे तसे वातावरण हवे . पाहिजे ते कपडे हवे . तुम्ही फार भाग्यवान आहात...करण तुम्ही कर भरता त्यामुळे मागण्याचा तुम्हाला हक्क अधिकार आहे .
" नाही हो तसे नाही ....माफ करा ... पण इथे ती परिस्थिती नाही ना ...?? आणि जे शक्य आहे ते मागण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला . आम्ही खूप तुमचा आदर करतो....." दुसरा ओशाळवाणे हसत म्हणाला .
नाही हो मी तुम्हाला  मुळीच दोष देत नाही . मला ज्या गोष्टीची सवय झालीय त्यातच मी राहतो तुम्ही ही तसेच राहता... पण दरवेळी या देशात काहीच होणार नाही असे बोलू नका .... तुम्हीही अप्रत्यक्षरीत्या हातभार लावू शकता . उदा. हे जे अन्न तुम्ही फेकून दिलेत त्या अन्नात अजून एक जण जेवला असता. खुपजणांची मेहनत त्या मागे आहे . तुम्हाला तर नेहमी गरम अन्न मिळते पण आमचे अन्न आधी विमानातून ,मग गाडीतून मग घोड्यावरून नंतर काहीजणांच्या पाठीवरून आमच्यापर्यंत पोचते . त्यामुळे त्याचा वापर योग्यरितीने करावा लागतो.."  पहिला हसत हसत म्हणाला .
"माफ करा सर ....यापुढे वागताना बोलताना योग्यती काळजी घेईन मी... दुसर्याने पहिल्याला नमस्कार करून डोक्यावरील दिवा बंद केला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर