Thursday, January 31, 2019

प्रगती देशाची

प्रसंग एक
"तरी तुला सांगितले... त्या आय xx x च्या मागे लागू नकोस.पक्का भिकारxx आहे तो.पण तुझ्या xxx मस्ती".... फोनवरून ती मुलगी मस्तपैकी मोठ्याने बोलत चालली होती. जीन्स पॅन्ट तीही लेटेस्ट फॅशनप्रमाणे गुढग्यावर फाटलेली... .एका खांद्यावरून सतत खाली घसणारा टी शर्ट आणि त्यामुळे उघडा पडणारा खांदा हातात  सहा इंच स्क्रिनचा लेटेस्ट मोबाईल..मनगटावर टॅटू. अश्या पेहरावात कोणाची पर्वा नसलेली बेफिकीर चेहरा असणारी साधारण सोळा ते सतरा वर्षाची मुलगी होती ती.
प्रसंग दोन
"दोन एकदम कॉर्नरच्या दे.... हो पुढच्या चालतील ..पण शक्यतो रिकाम्या रोमधील भिंतीच्या कॉर्नरच्या दे..." मल्टिप्लेक्समधील सकाळच्या नऊच्या शोला ती मुलगी काउंटरवरून तिकीट्स मागत होती. सैलसर वनपीस पाठीवर सॅक ,चार जणांचे डोळे खिळतील अशी शरीरयष्टी.हातात तिकीट्स घेऊन तिने समोर उभ्या असलेल्या तरुणाला थम्सअपची खूण केली. कमरेच्या खाली सारकणारी जीन्स...काळपट टी शर्ट..मळलेले स्पोर्ट शूज...वाढलेली दाढी... फुंकेनेही उडून जाईल अशी शरीरयष्टी असणारा तरुण हसत हसत तिच्या जवळ गेला आणि पाहणाऱ्यांनी मनातल्या मनात त्याला खूप शिव्या दिल्या.
प्रसंग तीन
"हे बघ .....इंडियन असतील तरच दे. त्या फॉरेनच्या बायका परक्याच वाटतात . माझ्याकडे दोन जीबी मेमरी फ्री आहे . मी शेयरिंग ऑन करते . पार्कातील कट्ट्यावर तो सहा जणांचा ग्रुप बसला होता . चार मुली दोन मुले. सर्वांच्या हातात स्मार्टफोन होता."पण इंडियन बायकांना कुठे फिगर असते ...?? सगळ्या काळ्या ,पोट सुटलेल्या तरी कसे बघता तुम्ही ..."??एक मुलगा  हसत म्हणाला."असू दे कशाही ...त्यातच ओरिजनलपणा जाणवतो ..."एक मुलगी दुसरीच्या हातावर टाळी देत म्हणाली. आणि सर्वच हसू लागले.
प्रसंग चार
"अण्णा दो बडा गोल्डफ्लेक ..पाकिटातून पन्नासची नोट पुढे करीत तिने त्या सिगारेट्स हातात घेतल्या.ऑफिस सूट ..आत टाईट टी शर्ट..मांड्याच्याही वर असणारा तंग स्कर्ट, हातात आयफोन .गोल्डन बट असणारी शोल्डर कट हेयर स्टाईल."अंकल ..माचीस प्लिज .. असे म्हणत माझ्या हातातली माचीस काढून घेऊन आपली सिगारेट शिलगावत मित्राची ही शिलगावली .गोड हसत परत माझ्या हातात माचीस दिली. "तुला सांगते गौरव ....त्या भडव्याला आपले प्रेझेन्टेशन काही पसंत पडणार नाही . परत नव्याने धंद्याला लावणार बघ हा. साला पंधरा दिवस अहोरात्र केलेल्या मेहनतीची वाट लावणार .असे वाटते एक दिवस तीन पेग टाकून घाल घाल शिव्या द्याव्या त्याला . जिंदगीची xxx टाकलीय त्याने ".तिचा मित्र समोर उभा राहून आणि मी पाठ करून तिची मुक्ताफळे ऐकत होतो .
देशाची प्रगती अशी ही होतेय .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, January 28, 2019

दगड ग्रुपमधून ज्ञानसेवा

दगड ग्रुपमधून ज्ञानसेवा

सिद्धिविनायक मंदिराशेजारचे साने गुरुजी उद्यान म्हणजे आमच्यासारख्यांसाठी अभ्यासिकाच होती. इतरांसाठी ते आठ वाजता बंद व्हायचे पण आमच्यासाठी मात्र  दिवसरात्र चालू असायचे.
उद्यानातील लाईट बंद झाले म्हणून काय झाले ....जाहिरातींच्या होर्डिंगवरील मोठे लाईट तर चालू असायचे. मग आम्ही तिथे रात्रभर अभ्यास करायचो . तिथे सर्व क्षेत्रातील मुले अभ्यासाला यायची . कोण कॉमर्स तर कोण मेडिकल तर कोणी इंजिनियरिंग.पण त्यामुळे मैत्रीत काहीच फरक पडत नव्हता .
तिथेच आम्ही एकत्र आलो. काही कॉमर्सचे तर काही इंजिनियरिंगचे . आमच्यातले काही पार्ट टाइम जॉब करून शिकायचे . साने गुरुजी उद्यानच आमचे दुसरे घर झाले होते . तिथे ठेवलेल्या दगडांवर बसून आमचा अभ्यास चालायचा . म्हणूनच आमचा ग्रुप दगड ग्रुप ओळखला जाऊ लागला .शिक्षण पूर्ण झाले तरी एकाच विभागात रहात असल्यामुळे भेटीगाठी चालूच होत्या . प्रत्येकजण छोटी मोठी नोकरी करीत होते . नंतर सर्वच लग्नबांधनात अडकले . मग काहीजण दुसरीकडे राहायला गेले त्यामुळे थोडे दुरावले . भेटीगाठी कमी झाल्या.
मग काही वर्षांनी अचानक महेंद्र भेटला . त्याने माझ्यासारखेच इतरांनाही गोळा केले होते. पुन्हा दगड ग्रुप एकत्र झाला . पुन्हा पिकनिक ..पार्ट्या चालू झाल्या . पण महेंद्रच्या मनात काही वेगळेच होते.
अचानक त्याने एक दिवस आम्हाला विचारले रात्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काही करूया का ...?? त्याच्याकडे प्लॅन होता . शाळा होत्या. प्रसिद्धीत कोणालाच इंटरेस्ट नव्हता.मुलांना मदत करायची आणि निघायचे असे ठरले.
पहिल्या वर्षी काळाचौकीच्या दोन शाळा घेतल्या . शाळा शोधण्याचे काम ही त्याचेच . रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके मिळत नाहीत . आम्ही नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके दिली. तेथील मुख्याध्यापकांनाही आमची नावे.. संस्थेचे नावही माहीत नव्हते . केवळ अर्ध्यातासात एका शाळेतील विद्यार्थ्यांना वाह्यापुस्तके वाटून पुढच्या शाळेत निघालो . तेथेही तेच झाले . संध्याकाळी दीड तासात कार्यक्रम आटपला .बाहेर येऊन हॉटेलात चहा पियाला बसलो आणि सगळा हिशोब काढला.त्याचे आठ भाग केले आणि त्याप्रमाणे पैसे काढले . दुसर्यावर्षी ही त्याच शाळा पुन्हा घेतल्या पण यावेळी अजून एक शाळा स्वतःहून आमच्याकडे आली . आम्ही त्याही शाळेला मदत करण्याचे ठरविले.यावेळी बाहेरून दोन जणांनी मदत केली.
अश्यातऱ्हेने गेली सात वर्षे आमचा हा उपक्रम चालू आहे .दुसऱ्या वर्षी आम्हाला संस्थेचे नाव विचारण्यात आले . आम्ही नावाचा कधीच विचार केला नव्हता . मग सर्वानुमते ज्ञान वाढविण्यासाठी हा उपक्रम आहे म्हणून ज्ञानसेवा असे नाव ठरविले . आमचा हा उपक्रम आम्ही सोशल मीडियावर फेसबुक वर पोस्ट करायचो .गेल्यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलला आणि सर्व शाळांची नवीन पुस्तकांची मागणी येऊ लागली . आमचे हे कार्य पाहून एका मित्राने नाव कुठेही जाहीर न करण्याच्या अटीवर 25 मुलांना पुस्तकांचा नवीन सेट देण्याचे कबूल केले . त्याचवेळी फेसबुक वरील मित्रयादीतील सौ. सुनीता खेबुडकर मॅडमनी आम्हाला नुसतीच मदत नाही तर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे इच्छा प्रदर्शित केली. आणि त्याप्रमाणे त्या वरळी येथील दोन शाळांच्या कार्यक्रमाला उपस्थित देखील राहिल्या .खरे तर या मॅडम तश्या कोणाच्याही प्रत्यक्षात ओळखीच्या नाहीत . पण फेसबुक वरील पोस्ट आणि फोटो पाहून त्या प्रभावित झाल्या आणी ज्ञानसेवेत सहभागी झाल्या . आमच्या जुन्या साहेबांनी ही यावर्षी मदत केली. सर्वांच्या मदतीमुळे आणि सहकार्याने आम्ही एकूण सात शाळेना वह्या पुस्तके वाटली . साधारण 300 मुलांना नवीन साहित्य ज्ञानसेवा मार्फत मिळाले .
तुम्ही जर खरोखरच निस्वार्थीपणे कार्य करीत असाल तर बाहेरूनही तुम्हाला तितकाच पाठिंबा मिळतो हे सिद्ध झाले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
ज्ञानसेवा फौंडेशन
K.borkar1@gmail.com

Sunday, January 27, 2019

निवडक र.अ. नेलेकर .भय गूढ कथा

निवडक र.अ. नेलेकर .भय गूढ कथा
र.अ.नेलेकर
राजेंद्र प्रकाशन
मराठी साहित्य प्रकारात भय आणि गूढ कथा हा साहित्यप्रकार नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांनी यशस्वीपणे हाताळला आहे . त्याच प्रकारात आता र.अ.नेलेकर यांनीही यशस्वी प्रवेश केला आहे.एकूण सोळा कथा या पुस्तकात आहेत.त्यातील काही कथा एकदम धक्कादायक आहेत.तर काही अगम्य .त्यांच्याकडे विषयांचे वैविध्य आहे.अनपेक्षित शेवट असलेल्या काही कथा खरोखरीच धक्का देऊन जातात .ज्यांना गूढ भय कथांची आवड आहे त्यांच्यासाठी योग्य पुस्तक आहे .

रेझोनान्स....अजय पांडे

रेझोनान्स....अजय पांडे
अनुवाद.... उज्ज्वला गोखले
मेहता पब्लिकेशन
भारताविरुद्ध नवा कट रचला जात आहे .पण यावेळी विज्ञानाचा वापर करून नैसर्गिक आपत्ती निर्माण होणार आहे. अशी नैसर्गिक घटना ज्याने भारत परत कधी उभा राहू शकणार नाही.एक मोठ्या हुद्द्यावरील व्यक्ती मारताना टू पाक टू इतकेच सांगून प्राण सोडते. काय आहे हे टू पाक टू. इंटेलिजन्स ब्युरोचा सहाय्यक संचालक सिद्धार्थ राणा या गोष्टीचा शोध घेतोय. पण हे तितके सोपे ही नाही आहे . अल कायदा ,पाकिस्तान आणि भारतातील काही प्रमुख व्यक्तीही यात सामील आहेत .  क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी आणि अति प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत लिहिलेली कादंबरी आपल्याला शेवटच्या पानापर्यंत गुंतवून ठेवते .

Monday, January 14, 2019

लेफ्ट टू टेल...मूळ लेखक ..इम्माकुली इलीबागिझा

लेफ्ट टू टेल...मूळ लेखक ..इम्माकुली इलीबागिझा
स्टीव्ह एर्विन
अनुवाद..... ज्योत्स्ना लेले
रवांडा या आफ्रिकेतील छोट्या देशात वर्षानुवर्षे हुतु आणि तुत्सीया जमातीत वंशभेद होता .शेवटी 1994 साली या दोन्ही जमातीमध्ये भीषण हत्याकांड घडून आले.जवळजवळ दहा लाख लोक या हत्याकांडात बळी पडले .कोणताही देश त्यांच्या मदतीला आला नाही .लेखिका इम्माकुली इलिबागिझा ही तुत्सी जमातीची तरुणी.या हत्याकांडात तिचे दोन भाऊ आईवडील मारले गेले . हुतु जमातीच्या मुरिंझी नावाच्या इसमाने तिला आणि इतर सात महिलांना आपल्या बेडरूनमधील चार बाय तीनच्या  बाथरूममध्ये लपविले . तिथे त्या सर्व नव्वद दिवस राहिल्या . त्या नव्वद दिवसात ती पूर्ण वेळ देवाचा धावा करीत होती . देवावर असीम श्रद्धा असली की चमत्कार घडू शकतो हे तिने सिद्ध केले .या नव्वद दिवसात तिने खूप काही अनुभवले. मृत्यूची टांगती तलवार सतत त्यांच्या डोक्यावर होती. नव्वद दिवस ते धड बसू शकत नव्हते ..झोपू शकत नव्हते..,एकमेकांशी बोलू शकत नव्हते. त्या नव्वद दिवसात त्यांनी कपडेही बदलले नाही की आंघोळही केली नाही . या दंगलीत शेजारीही त्यांचे शत्रू झाले .ज्यांच्याबरोबर ती खेळली मोठी झाली त्यांच मित्रांनी मैत्रिणींनी तिच्याकडे पाठ फिरवली .त्याही परिस्थितीत  ती तगली . आपले सर्व अनुभव तिने लिहून काढले .अंगावर काटा आणणारी इम्माकुलीची ही सत्यकहाणी .

Sunday, January 13, 2019

प्री शूट

प्री शूट
दादांची तब्बेत बरी नाही कळताच प्रकाश उर्फ पक्या ताबडतोब भारतात आला.तसा तो अमेरिकेत स्थयिक होता. तिथे त्याचे कुटुंब होते अर्थात बायकोही नोकरी करत होती आणि तिला सुट्टी घेऊन निघणे शक्य नव्हते . मुलांचाही शाळेचा प्रॉब्लेम होताच त्यामुळे यावेळी एकाने जावे असे ठरले.
दादा आणि आईला काहीही करून यावेळी इथे घेऊन ये असे बायकोने खडसावून सांगितले होते.इथे आल्यास त्यांचे उरलेले आयुष्य स्वतःच्या कुटुंबात सुखाचे जाईल इतकीच माफक अपेक्षा होती तिची.बघतो असे सांगून प्रकाश निघाला.
ऑफिसमध्ये सौचा फोन आला आणि प्रकाश आल्याचे सांगताच मी चमकलो. वाटले दादा गेलेच.पण तिने संध्याकाळी डायरेक्ट घरीच या पक्या भाऊजीना बोलायचे आहे असे सांगताच जीव भांड्यात पडला.
संध्याकाळी घरी फ्रेश होऊन बसलोच तर विक्रमही दारात हजर. नेमके डोसा, कांदेपोहे ,वडे असतानाच हा घरी कसा हजर होतो ..??याचे कोडे अजूनही उलगडले नाही मला.असो.... आज मला दोन डोसे कमी पडणार याची खात्री झाली .पण याने आल्याआल्या भाऊ आज नाश्ता इराण्याकडे असे सांगून मला उठवले आणि बाहेर  आणले.
इराण्याकडे बसतोय तोच प्रकाशही हजर झाला . दादांची तब्बेत नाजूक ही बातमी सोसायटीत पसरली होतीच .त्यामुळे तो येणार ही अपेक्षा होती.
"भाऊ ....आमच्या म्हाताराम्हातारीला समजाव तुमच्या भाषेत ...... सांगा त्यांना जा अमेरिकेत पोरा बरोबर . सुखात आयुष्य काढतील ती... सांगा ना त्यांना .या वयात बघवत नाही रे इथे एकटे राहताना ..पक्याने डायरेक्ट विषयाला हात घातला .
"तुझा बाप किती खडूस आहे माहितीय ना ..?? आजही सकाळी उठून दूध घेऊन येतो ...येताना पेपर असतोच ..किती वेळा सांगितले सकाळी सकाळी एकटे बाहेर पडू नका दूध पेपर घरी टाकायची सोय करतो पण नाही ऐकत .."विक्रम चिडून म्हणाला .
"पक्या...!  तुला माहितीय तुझे आईवडील कसे आहेत..आपला देश.. आपली माणसे त्यांना महत्वाची आहेत.तुझे चांगले व्हावे ही त्यांची इच्छा ...तुला कधीच कुठे रोखले नाही त्यांनी . अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतलास तेव्हाही खुश होते ते . तुझ्या प्रगतीच्या आड येऊ नये असेच त्यांना अजूनही वाटते...." मी शांतपणे म्हणालो.
"हो ..आणि समजवायला जाईल कोण..? च्यायला अजूनही त्यांना वाटते आपण त्यांचे विद्यार्थीच आहोत. काही चुकीचे बोललो असे वाटले की अजूनही काठीने मारतात.." विक्रम चिडून म्हणाला .
"अरे यावर उपाय काय मग.. ?? मी नोकरी सोडून इथे येऊ ..?? चल.. तेही करेन पण बायको मुलांचे काय ?? पोरांना इथे कायमचे राहणे जमणार नाही ...".हताशपणे पक्याने विचारले
"हम्मम्म ..आम्ही माना डोलावल्या आणि मुकाटपणे समोरचा खिमा पाव खाऊ लागलो.
"दादाचे किती दिवस राहिलेत .....??अचानक विक्रमने विचारले .
"सांगता येत नाही .यातून बाहेर पडले तर तीन चार  महिने काढतील...पण मला अजून 15 दिवसच राहता येईल "पक्या शांतपणे म्हणाला.
"तुला त्यांची काळजी आहे ना... ?? आपण त्यांच्यासाठी चोवीस तास माणूस ठेवू.आहे माझ्या ओळखीच्या काही संस्था.." विक्रम म्हणाला .
अचानक काहीतरी सुचल्यासारखा पक्याचा चेहरा झाला."विकी.... माझ्या घरात सीसी कॅमेरे बसव . घरातील प्रत्येक हालचाल त्या कॅमेऱ्याने टिपली पाहिजे . त्यांचे आजारपण ..त्यांची शुश्रूषा सर्व काही रेकॉर्ड झाले पाहिजे आणि हो त्यांचे शेवटचे क्षणही रेकॉर्ड झाले पाहिजे . मग ते कुठेही असो . हॉस्पिटलमध्ये गेले तरी त्याचे रेकॉर्डिंग करायची जबाबदारी तुझी.कितीही पैसे लागो आपण भरू ..." पक्या आग्रही स्वरात म्हणाला .
"हे काय अचानक सुचले तुला ...?? हे काय मध्येच सी सी टीव्ही, दादाचे रेकॉर्डिंग ... ??? आणि हो उद्या ते शेवटचे क्षण मोजत असताना मी त्यांचे रेकॉर्डिंग करायचे .....?? मीच का.. ??? तर लोक मला हरामखोर भावनाहीन म्हणतात म्हणून ...?? हा भाऊ का नाही ...?? कारण हा सभ्यतेचा पुतळा म्हणून ??
अरे बापरे ...विक्रम एव्हडा चिडलेला कधी पहिला नाही मी. त्याच क्षणी नाश्त्याचे बिल मला दयावे लागणार हे पक्के झाले .मी मुकाटपणे खाली मान घालून खाऊ लागलो.पक्याचा हसरा चेहरा पाहून विक्रम निवळला.
"खरे बोललास विकी... हे तुलाच जमू शकते .फार फार तर बंड्याला.पण बंड्या पहिला त्यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीला धावेल म्हणून तो नको. तूच योग्य आहेस .."पक्या हसत हसत म्हणाला . मीही हसून त्याला साथ दिली तसा एक रागाचा कटाक्ष माझ्याकडे टाकला .
"विकी ... लोक लग्नाची रेकॉर्डिंग लोक का करतात ?? तर ते पुढच्या पिढीत किंवा कधीही ते क्षण जागवावे एन्जॉय करता यावे म्हणून ना ..? हल्ली प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्डिंग चालू आहे .प्री शूटच्या नावाखाली सगळे शूट करतात . लग्न ठरले की फोटो शूट,साखरपुड्याचे फोटो शूट ,मग लग्नाचे रेकॉर्डिंग आणि फोटो शूट आणि आता तर गरोदर बाईंचे ही फोटो शूट करतात.काय तर म्हणे प्री डिलिव्हरी शूट .मग मूल जन्माला आले की प्रत्येक महिन्यात त्याचा जन्मदिवस साजरा करतात.,लोकांना आनंदाचे क्षण जपून ठेवायला आवडतात .दुःखाची फक्त आठवण काढतात रे ...पण मला ते क्षण अनुभवायचे आहेत . दादांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे आहेत .आईच्या डोळ्यातील काळजी अनुभवायची आहे. च्यायला ...!! ज्या माणसाने माझ्यासाठी इतके काही केले त्याच माणसाला आयुष्याच्या  उत्तरार्धात मी काहीच देऊ नये ...त्यांना फक्त वेळ हवाय रे आणि तोच नेमका आमच्याकडे नाही . मग ही आमच्यासाठी एक शिक्षा आहे असे समज आणि आमच्या मुलांसाठी एक शिकवण . उद्या दादा गेल्यावर ज्या ज्या वेळी आम्हाला त्यांची आठवण येईल तेव्हा आम्ही त्यांचे हे अखेरचे दिवस पाहू ..त्यांचे चेहरे पाहू . त्यावेळी आम्ही त्यांच्या जवळ नसल्याची ही शिक्षा भोगू . लोक आनंद एन्जॉय करतात पण आम्ही हे दुःख आमच्या अखेरपर्यंत भोगू . मुलांना सांगू सुख मिळविण्याच्या मागे किती दुःख सहन करावे लागते ते पहा... . तुम्ही काय कमावले आणि काय गमावले हे तुम्हीच ठरवा .आणि हो दादा गेले की म्हातारीला उचलून घेऊन जाईन मी .तिची इच्छा असो व नसो त्यासाठी तुमची साथ हवी..." असे बोलून पक्याने डोळे पुसले .
मी आश्चर्यचकित होऊन म्हटले "आयला ...!! पक्या कुठून ही भारी आयडिया आणलीस... ?? 
"अरे भाऊ कालच फेसबुक वर मी एका मैत्रिणींच्या मुलीचे प्री डिलिव्हरीचे फोटो शूट पाहिले . तिला विचारले तर म्हणते हल्ली प्रत्येक गोष्टीची प्री शूट होते. लग्न एकदाच होते आणि हल्ली एकाच मुलाची फॅशन आलीय म्हणे मग ते क्षण जपून ठेवायला नको . तेव्हा मला हे सुचले की माणूस एकदाच मरतो मग त्याच्या मृत्यूचे क्षण प्री शूट केले तर काय हरकत आहे ...??. त्यांची जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा ती शूटिंग बघायची .आता मी गेल्यानंतर जे काही होईल ते तुमच्या डोळ्यासमोर घडेल पण मी ते कसे अनुभवणार.."?? असे बोलून त्याने विक्रमकडे पाहत डोळे मिचकवले . विक्रमने मुकाटपणे त्याला हात जोडून नमस्कार केला .
"एकदम मान्य आहे तुझा हा प्लॅन ..आजच एका मित्राला फोन करून सर्व व्यवस्था करून ठेवतो." एक मोठा प्रॉब्लेम सुटल्याच्या खुशीत आम्ही इराण्यातून बाहेर पडलो.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

Saturday, January 12, 2019

चौरंग .....ऋषीकेश गुप्ते

चौरंग .....ऋषीकेश गुप्ते
मनोविकास प्रकाशन
ही कथा आहे राधेची आणि तिच्या आयुष्यात असणाऱ्या तीन पुरुषांची .त्यात एक तिचा नवरा आहे जो लग्न झाल्यावर काही वर्षातच वेडा होऊन मृत्यू पावला. दुसरा कथेचा नायक जो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे नवऱ्याचा खूप जवळचा मित्र आणि नायकाचे बाबा.स्त्रीला मानसिक आणि शारीरिक आधाराची गरज लागतेच.आपली वस्तू वापरली नाही तर दुसरा वापरणार असे तिचे मत . लेखकाचा नायक साधारण त्याच्या दंशकाल पुस्तकातील नायकाचेच रूप आहे .गोंधळलेला ,स्वार्थी .
पुस्तक नेहमीप्रमाणेच गूढ मानवी मनाचा तळ शोधणारे . त्यानुसार पुस्तकाची भाषा ही भडक.लैंगिकता हा मूळ गाभा वाटतो.पुस्तक छोटे आहे .त्यामुळे एका बैठकीत संपेल.लैंगिकता आणि गूढ वाचणाऱ्याना आवडेल .

Wednesday, January 9, 2019

द हंगर गेम्स ... सुझान कॉलिन्स

द हंगर गेम्स ... सुझान कॉलिन्स
अनुवाद......सुमिता बोरसे
डायमंड पब्लिकेशन
दर वर्षी त्या बारा डिस्ट्रिक्टमधील प्रत्येकी बारा ते सोळा वर्षातील दोन मुले निवडली जातात आणि राजधानीत नेली जातात. तिथे त्यांना प्रशिक्षित केले जाते आणि मग चालू होतो हंगर गेम्स. या खेळात ही चोवीस मुले एकमेकांना ठार मारण्याचा प्रयत्न करणार .देशभरात या खेळाचे थेट प्रक्षेपण केले जाते.यात  जो जिंकेल त्याची आणि कुटुंबियांची वर्षभर काळजी घेतली जाईल .अश्याच एक बाराव्या डिस्ट्रिक्टमध्ये सोळा वर्षाची कॅटनिस आपल्या आई आणि लहान बहिणीबरोबर राहतेय .आपल्या बहिणीच्या जागी ती हंगर गेम्समध्ये सहभागी होते .हंगर गेमचे ठिकाण ,नियम प्रेक्षक तिच्यासाठी नवीन आहेत पण इथे एक गोष्ट नक्की आहे मारा नाहीतर मरा.
जगण्यासाठी केलेली धडपड,जीवघेणा पाठलाग आणि गतिमान प्रसंग यामुळे ही कादंबरी खूपच वेगवान आणि खिळवून टाकणारी झाली आहे .

Tuesday, January 8, 2019

संस्कार

संस्कार
प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये तो धावत धावत चढला.ट्रेन रिकामीच होती.खिडकीजवळच्या सीटवर तो बसला . त्याचा शेजारी मस्तपैकी मोबाईल पहात समोरच्या सीटवर पाय ताणून बसला होता. नशीब चपला तरी काढल्या होत्या. त्याने एक नजर त्याच्याकडे टाकली आणि परत मोबाईलमध्ये डोके खुपसले . ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली आणि एक वृद्ध जोडपे  त्यांच्या डब्यात शिरले . त्याच्या समोरची मोकळी जागा पाहताच त्या दिशेने आले.त्यांना पाहून मोबाईलवाल्याने पाय खाली घेतले पण डोके मात्र मोबाईलमध्येच होते.ते बसणार इतक्यात त्याने  थांबवून खिश्यातून रुमाल काढला ती सीट साफ केली आणि त्यांना बसण्याचा इशारा केला . मोबाईलवाला ते पाहून ओशाळला आणि मुकाटपणे उठून दरवाजाजवळ उभा राहिला .
आज छोट्याला गार्डनमध्ये घेऊन जायचा दिवस होता . घरी आला तेव्हा छोटू तयार होऊनच बसला होता . पटापट आवरून तो त्याला घेऊन गार्डनमध्ये शिरला.संध्याकाळची वेळ असल्यामुळे गार्डन गर्दीने फुलून गेले होते. छोटूला पाळण्याजवळ सोडून तो रिकाम्या बेंचवर बसला . सहज आजूबाजूला नजर टाकली असता भेळेचे कागद,कुल्फीच्या कांड्या, फ्रुटीचे पाऊच विखरलेले दिसले . काही न बोलता त्याने तो कचरा गोळा करण्यास सुरवात केली. आजूबाजूचे त्याच्याकडे नुसते पाहू लागले . थोड्यावेळाने त्याचा बाजूला अजून काही छोटी पावले दिसून आली मान वर करून पाहिले तर छोटू आणि त्याचे दोन मित्र जमिनीवरचा कचरा गोळा करून पेटीत टाकत होते .
मार्गशिषाचा शेवटचा गुरुवार ती आणि तिची सासू जेवणाचे पान घेऊन गाय शोधायला नाक्यावर निघाले .एकमेव गाय तिथल्या झाडाखाली बांधली होती .गायीची मालकीण सर्वांच्या हातून पान घेत होती . त्यातील नेमके  जिन्नस ती बाजूला काढून ठेवत होती आणि थोडेच गायीच्या पुढ्यात ठेवत होती . सुनेने सासुकडे पाहिले. सासूने आपल्या हातातील पान थोड्या अंतरावर बसलेल्या कुत्र्याच्या पुढ्यात ठेवले तर सुनेने त्यातील मोतीचुराचा लाडू काढून कोपऱ्यात बसलेल्या लहान मुलाच्या हाती दिला .
रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडल्यावर प्रत्येकाला घरी जायची घाई होती . तोही इतरांसारखाच घाईघाईने घराकडे निघाला होता. आज त्याला जास्तच  उशीर झाला होता .रस्त्यातून चालताना एका ठिकाणी मध्येच काहीजण उद्या मारून जात होते . जणू तिथे एक खड्डा किंवा घाण असावी. तर रिकामटेकडे नुसते त्याठिकाणी पाहत उभे होते. तो त्यातिथे आला आणि पाहिले एक कावळ्याचे छोटे पिल्लू पडले होते. क्षीण आवाजात ते ओरडत होते . जाणारे येणारे फक्त त्याच्याकडे नजर टाकून जात होते तर काही ओलांडून. इतरांसारखा तोही त्याला ओलांडून गेला पण काही केल्या त्याच्या मनातून त्याचा विचार जाईना. काही अंतर जाताच तो थांबला आणि मागे फिरला . पुन्हा त्या पिल्लाजवळ आला . लोकांची पर्वा न करता ते किळसवाणे पिल्लू त्याने हळुवारपणे उचलले आणि बंद दुकानाच्या कोपऱ्यात ठेवले . शेजारच्या चणेवाल्याकडून दोन रुपयांचे कुरमुरे विकत घेऊन त्याच्या बाजूला पसरले आणि पुन्हा घराच्या दिशेने वळला .आज रात्री त्यालाछान झोप लागणार होती हे निश्चित.
नेहमीप्रमाणे ते बार मधून बाहेर पडले . दिवसभर कष्ट करायचे आणि रात्र झाली की थोडी पोटात ढकलून उशीरा घरी जायचे हा नेहमीचा शिरस्ता. आज रस्त्यावर जास्त काळोख दिसत होता बहुतेक अमावस्या असावी . त्या सुनसान रस्त्यावरून आरामात चालत ते निघाले . काही अंतरावर ती उभी होती . प्रत्येक ऑटोला हात करीत होती पण कोणतीही ऑटो थांबायला तयार नव्हती. ते जवळ येताच तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली .अंग चोरून ती मागे झाली . ते काही न बोलता रस्त्याच्या मध्ये उभे राहिले . येणाऱ्या ऑटो ला थांबविले. "ए बेवड्यानो....निघा असे म्हणत तो ऑटोवाला बाहेर आला . एका क्षणात त्यातील एकाने त्याच्या कानाखाली जोरदार आवाज काढला ." या ताईला पाहिजे तिथे सोडून ये नाहीतर गाठ आमच्याशी आहे" असे म्हणत तिला आत बसण्याचा इशारा केला .ती थँक्स म्हणत ऑटोत शिरली आणि ते काहीच न घडल्यासारखे पुढे चालू लागले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर