Sunday, December 31, 2017

बंड्याचे थर्टी फर्स्ट

फूडबझारमध्ये बंड्याला पाहून मी काहीसा चकित झालो. मलाही बघून तो हसला.समोर येऊन उभा राहताच मी म्हटले"आहेस कुठे  हल्ली.... ?? आणि हे काय..? थर्टी फर्स्ट ची तयारी का... ??
" काय हो भाऊ ...?? थर्टी फर्स्टला कोणी भाजी, साखर नेतो का ...?? हे सर्व घरच्यांसाठी. माझी थर्टी फर्स्ट घरीच.मी, आईबाबा आणि मनी.तुम्हीही या... विक्रम आणि वहिनींना घेऊन.मी जेवण बनविणार आहे सर्वांसाठी.मस्त बिर्याणी खाऊ घालतो तुम्हाला".बंड्याने खुले आमंत्रण दिले.
" तू ...आणि थर्टी फर्स्ट घरात ..?? शक्यच नाही.तीस तारखेपासून संध्याकाळी चालू करणारा तू ..चक्क घरच्यांसोबत नवीन वर्ष साजरे करणार.... ?? कोणी ऐकेल तर काय म्हणेल.... ?? मी अविश्वासाने बोललो.
" हो खरेच आहे भाऊ .... मागच्या एक जानेवारीला सकाळी मित्रांनी उचलून घरी आणले.नंतर दिवसभर झोपून होतो. मग संध्याकाळी बाबानी मस्त हजामत केली माझी. सोबतीला आई होतीच पण कधी नव्हे ते बहिणीनेही तोंडसुख घेतले . तिचा चेहरा पाहून खूप लाज वाटली मला स्वतःची.सर्वांची माफी मागितली पण बाबानी नवीन अट समोर ठेवली .कष्टाच्या पैश्याची किंमत तुला समजली पाहिजे असे ते म्हणाले.मग शेवटी त्यांनी सांगितले फक्त एक वर्ष तू घरची पूर्ण जबाबदारी घे.असे समज आपले चारजणाचे हे कुटुंब आता तुला चालवायचे आहे. घरात एक पैसा देत नाहीस आणि मीही मागत नाही . त्याचा परिणाम काल दिसून आलाच . आजपासून घरातील खर्चाची जबाबदारी तू घ्यायची आहेस. ती ही केवळ आर्थिक नाही तर सामाजिक आणि मानसिकही. शिक्षा म्हणून मी ते स्वीकारले .पाहिले काही दिवस काहीच वाटले नाहीं पण हळू हळू खर्च म्हणजे काय..? संसार कसा चालवतात हे समजू लागले . आई वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जा .औषधपाणी बघा. मनीचे ड्रेस ,तिचा पॉकेटमनी . रोजचे खर्च . गॅस बुकिंग . पहिल्यांदाच मला कळले घरातील लाईट बिल किती येते . एकदा तर आईच्या गोळ्या संपलेल्या. रात्री अकरा वाजता घेऊन आलो . पहिल्यांदा मजा वाटली पण मग हळू हळू कळत गेले आईवडिलांनी संसार कसा केला . बनियन ,शर्ट,चपला वरून नेहमी बाबाना बोलायचो पण आता कळू लागले ते का असे वागायचे .केवळ पैश्याचेच नाही तर नाती कशी जोडायची सांभाळायची तेही शिकलो . कोणाच्या प्रेताला,दिवसाला ,लग्नाला ,बारशाला पूजेला मलाच जावे लागले . काय करणार अटच तशी होती ना . पण आपली माणसे कोण आपले स्थान काय ते समजून आले . त्यांच्या डोळ्यात आपलेपणा दिसला .आहो मी वर्षात इतके कमावले मग बाबानी किती कमावले असेल?? लोक आपल्याबद्दल चांगले बोलतात ही भावनाच किती आनंददायी असते .बाहेर पडलो की मित्रांसोबत असतो पण घरात शिरलो की कुटुंबप्रमुख होऊन सर्व जबाबदारी स्वीकारतो .त्यामुळे छान वाटते आता.
मी हसलो"तरीच वर्षभर कुठे जास्त दिसला नाहीस .आणि आम्हाला थांगपत्ताही लागू दिलास नाहीस.पणवर्ष संपले. आता तू मोकळा झालास त्या अटीतुन . उद्यापासून परत जुना बंड्या दिसणार आम्हाला.मी मुद्दाम म्हटले .
"सॉरी भाऊ ...आता जुना बंड्या गेला . यापुढेही हीच जबाबदारी घ्यायची ठरविले आहे मी . हे सर्व करूनच बाकीचे करेन.एक सांगू इतकी वर्षे दारू पितोय पण दारूची चव काही बदलली नाही हो. मग तिच्याच मागे का धावावे सारखे .काहीतरी निमित्त काढून पियालाच पाहिजे का ?? त्यापेक्षा नवीन काही तरी शिकूया म्हणतोय . तुम्ही आहातच पाठीशी".बंड्याही हसत म्हणाला .मीही त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि फूडबाझारमधून बाहेर पडलो .
© श्री.किरण बोरकर

Monday, December 25, 2017

नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस

नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस ...जेफ्री आर्चर
अनुवाद .......अजनी नरवणे
मेहता पब्लिकेशन
हार्वे मेंटकाफ हा शेअर मार्केटमधील किडा. नवीन नवीन कंपन्या काढून त्याचे शेअर विकायचे आणि गायब व्हायचे हा त्याचा धंदा. यावेळी ही त्याने नवीन ऑइल कंपनी काढलीय. त्यासाठी त्याने डेव्हीड केसलर हा तरुण बकरा शोधलाय. डेव्हीडने चार लोकांना त्या कंपनीचे मोठे शेअर घ्यायला भाग पाडले .त्यापैकीय एक आहे स्टीफन . डेव्हीडचा वर्गमित्र आणि गणितज्ञ. दुसरा आहे अँड्रीयन .हा डॉक्टर आहे . तिसरा आहे लंडनमधील आर्ट गॅलरीचा मालक जीन पियरी आणि चौथा लॉर्ड जेम्स हा खानदानी श्रीमंत आणि व्यावसायिक नट. काही दिवसात याना कळते आपण फसवले गेलोय आणि कंगाल झालोत . कायद्यानुसार ते काहीच करू शकत नाहीत म्हणून ते एकत्र येतात आणि इतर कायदेशीर मार्गाने आपली पै न पै हार्वे मेंटकाफकडून कशी वसूल करतात त्यासाठी आपल्याकडील गुणांचा कसा वापर करतात ते वाचणे उत्कंठावर्धक आहे .कुठेही रक्तपात न करता कायद्याचा आधार घेऊन आपले पैसे कसे वसूल करावे याचा धडा हे पुस्तक देते .

Sunday, December 24, 2017

वडिलांचे कष्ट

आज बऱ्याच  दिवसांनी आदेशला भेटायचे ठरविले होते . आदेश माझा आणि विक्रमचा गुंतवणूक सल्लागार . ऑफिसखाली असलेल्या कॉफीशॉपमध्ये तो मला घेऊन आला . अतिशय स्वछ आणि पॉश असे कॉफीशॉप होते ते. शेजारच्या कॉलेजमधील मुलामुलींनी शॉप गजबजलेले होते . मेनुकार्ड वरील कॉफीच्या किमती बघून मी हडबडलोच . तिथून उठून जाण्याचा विचार मनात आलासुद्धा इतक्यात आदेशने दोन कॉफी आणि केकची ऑर्डर दिलीसुद्धा .बिल ही क्रेडिट कार्डने भरून मोकळा झाला.सहज विचारले तेव्हा साडेचारशे झाले असे म्हणाला.बापरे .....!! इथली साधी कॉफीच शंभर रुपये होती.त्याच्याशी बोलत असतानाच मागून काही मुलांचा गोंधळ ऐकू आला त्यात एक आवाज ओळखीचा वाटलं म्हणून मागे वळून पाहिले तर आमच्या हर्षलचा मुलगा आर्यन . नेमक्या त्याच वेळी त्याची आणि माझी नजरानजर झाली त्याने हसून हात हलविला मीही प्रत्युत्तर केले.
काही वेळाने तो सर्व ग्रुप निघाला जाता जाता आर्यनने सर्व बिल क्रेडिट कार्डद्वारे भरल्याचे मी पाहिले . त्याने मलाही विचारले तुमचे बिल भरू का ...?? मी नकार दिला . आर्यन कॉलेजला जात होता . नोकरीही करीत नव्हता तरी त्याच्याकडे क्रेडिट कार्ड पाहून मी चक्रावून गेलो .
संध्याकाळी नेमका आर्यन खालीच भेटला." भाऊ.. आज तिथे कोणाकडे आलेलात..?? आणि तेही चक्क कॉफीशॉपमध्ये.??
मी सर्व सांगून त्याला विचारले" तू नेहमी तिथे असतोस का ...?? तर तो सहजपणे होय... म्हणाला .
"ते ठीक आहे रे ..पण किती महाग आहे ?? कोण पैसे भरतो रोज.. ??
"आम्हीच मित्र आलटूनपालटून भरतो.बाबानी क्रेडिट कार्ड दिले आहे अडीअडचणीला त्याचा उपयोग करतो..
"अरे वा ....!!. मग अजून कशा कशासाठी उपयोग करतोस क्रेडिट कार्ड चा ..?? मी हसून विचारले .
"काय भाऊ ..?? हल्ली काय कमी खर्च आहेत होय. कुठे बाहेर पडलो तर चहा नाश्ता खर्च असतोच . शिवाय ग्रुपमधील मित्रांचे वाढदिवस आहेतच .सतत खर्च होत असतात" आर्यनचे स्पष्टीकरण तयार होतेच .
"पण हे खर्च करायची गरज पडतेच का. ?? एक विचारू हा खर्च तुझ्या खिशातून नाही तर तुझ्या वडिलांच्या खिशातून जातो ना ..?? तुला माहितीय तुझ्या वडिलांनी हे पैसे कमवायला किती कष्ट केलेत ?? मी थोड्या कडक आवाजात विचारले तसा आर्यन गंभीर झाला.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले "मला माहितीय हर्षा तुला  या गोष्टी कधीच कळू देणार नाही. पण त्याने दिवसभर नोकरी केली आणि रात्र रात्र गार्डनमध्ये बसून अभ्यास केला .सकाळी सहा वाजता त्याचा दिवस सुरू व्हायचा . पेपर टाकून झाले की तो ऑफिसला जायचा . मग संध्याकाळी डायरेक्ट गार्डन मध्ये अभ्यासाला यायचा . रात्री एक वाजता घरी जाऊन जेवायचा . कोणाला त्रास होऊ नये म्हणून लाईटही न लावता मेणबत्तीच्या उजेडात जेवायचा . दुसर्यांना त्रास देणे त्याच्या स्वभावातच नव्हते . अरे पुस्तकेही शक्यतो विकत घ्यायचा नाही .अगदी गळ्याशी आले की खरेदी असायची त्याची ".बोलता बोलता जुने दिवस आठवून माझा कंठ दाटून आला.
आर्यनही  भावनाविवश झाला", पप्पा मला हे कधीच बोलले नाहीत.उलट त्यांनीच हे क्रेडिट कार्ड मला दिले आणि लागेल तसे खर्च कर म्हणाले.
"हो ..कारण त्यांना जे मिळाले नाही ते तुला मिळावे म्हणून . पण तुलाच काय माझ्या मते प्रत्येक मुलाला/ मुलीला कळले पाहिजे त्यांच्या पालकांनी आज ह्या स्थानावर येण्यासाठी किती कष्ट केलेत .आज आम्हाला पैश्याचे महत्व कळतेय कारण तो आम्ही कष्टाने कमावलाय. तुम्हाला आयत मिळतोय म्हणून तुम्ही कसाही उडवू शकत नाही . वाढदिवस मित्रांच्या घरी जाऊन साजरे करा त्यानिमित्त घरच्यांशी ओळख होईल. आपल्या मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत तेही पालकांना कळेल . सार्वजनिक ठिकाणी एकत्र भेटून गप्पा मारा .एक सांगतो आर्यन ..जेव्हा स्वतः कष्ट करून पैसे कमावशील तेव्हा तू नक्कीच पैसे उडवणार नाहीस याची खात्री आहे मला.
माझे बोलणे ऐकून आर्यन खजील झाला . मान खाली घालून म्हणाला" सॉरी भाऊ.. मी आतापर्यंत पप्पाना वेगळाच समजत होतो. पण तुम्ही माझे डोळे उघडलेत . यापुढे खर्च करताना नक्कीच विचार करेन.
© श्री.किरण बोरकर

Friday, December 22, 2017

गुलजार पटकथा ...….. गुलजार

गुलजार पटकथा ...….. गुलजार
अनुवाद ......... वसंत पाटील
मेहता पब्लिकेशन
पटकथा हा साहित्यातील एक प्रकार .आपण जे दृश्य पाहतो त्या दृश्यातून सांगितलेल्या कथेला पटकथा म्हणतात. छोट्या छोट्या फ्रेममधून पटकथा लिहिली जाते आणि संपूर्ण दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते .या पुस्तकात गुलजार यांनी त्यांच्या तीन चित्रपटांच्या पटकथा मांडल्या आहेत . हुतूतू ,लिबास,आणि माचिस अतिशय संवेदनशील अश्या विषयांचे दिग्दर्शन गुलजार यांनी केले आहे . पटकथा वाचताना संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर उभे राहतात .

Tuesday, December 19, 2017

प्रलयंकार .....रेखा बैजल

प्रलयंकार .....रेखा बैजल
कॉन्टिनैटल प्रकाशन
ज्यूडीथ दहा वर्षाचा असतानाच जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले गेले . हा ज्यू असल्यामुळे त्याच्या कुटुंबाचे खूप हाल झाले . त्याचे आईवडील बॉम्बस्फोटात मारले गेले . मोठी बहीण जगण्यासाठी शरीरविक्रय करू लागली .अजून त्याच्या मागे दोन लहान बहिणी होत्या .शेवटी घराण्यातील एक जण जिवंत रहावा म्हणून त्याच्याआजीने नाईलाजाने त्याला भारतात पाठविले .  जहाजावरील कटू अनुभव पचवत तो भारतात आपल्या काकांकडे आला . काकीचे टोमणे खात हॉटेलमध्ये फडके मारू लागला . अवकाशातील ताऱ्यांविषयीच्या आवडीमुळे तो शास्त्रज्ञ झाला . भारतीय मुलीशी प्रेमविवाह केला . शेवटी जर्मनीला जाऊन आपल्या वेड्या आजीला शोधले .आपल्या लहान बहिणींच्या मृत्यूचे दुःख पचविले . मोठ्या बहिणीचा संसार पाहिला . दुसऱ्या महायुद्धात हिटलरने केवळ 60 लाख ज्यू मारले नाहीत तर 60 लाख पिढ्या संपवून टाकल्या .

काजळमाया ......जी. ए. कुळकर्णी

काजळमाया ......जी. ए. कुळकर्णी
पॉप्युलर प्रकाशन
जी.ए. चा नेहमीप्रमाणेच शैलीदार कथासंग्रह.एकूण चौदा कथा या संग्रहात आहेत.काहीश्या गूढ आणि उत्कंठावर्धक.पण काही कथा फारच हळुवारपणे पुढे सरकतात.उत्कंठा वाढवत शेवटच्या ओळीपर्यंत वाचकाला घेऊन जायचे ही जी. ए.ची सवय कधी कधी कंटाळा आणते.थरारक आणि गतिमान वाचायची सवय असलेल्या वाचकांना हा कथासंग्रह फारसा आवडणार नाही . पण एकूण जी. ए. प्रेमींना आवडणारा हा कथासंग्रह आहे .

Monday, December 18, 2017

एकटी

माझ्या फेसबुकवरील फ्रेंडच्या मुलीने तिच्या भावना व्यक्त केल्या .त्या त्यांनी मला शेअर केल्या . मला त्या खूप आवडल्या आणि मी त्या मराठीत भाषांतर केल्या . तुम्हालाही त्या आवडतील अशी आशा आहे .
"तू उद्या जाणार आहेस ना.. ?? चल आज आपण बाहेर जाऊ .मी छोटा भीमचा एपिसोड सोडून देतो". माझा छोटा नऊ वर्षाचा भाऊ बोलत होता .
एकुलती एक मुलगी असल्यामुळे मी एकटीच असायची .माझ्या वयाची जवळची अशी चुलत भावंडेही नव्हती . त्यामुळे एकटीनेच खाणे ,ऐशआरामात जगणे नित्याचेच झाले होते .
पण हा छोटा नटखट माझ्या आयुष्यात नवीन उर्मी घेऊन आला .आम्ही पाच ते सहा दिवस एकत्र राहिलो . पण त्यातही छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणेच भरपूर केली आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या संधी शोधत राहिलो .
तो नऊ वर्षाचा होता .मी माझ्या आजीकडे दोन दिवसासाठी राहायला आले होते.मागाच्यावेळेपेक्षा ही भेट काहीशी वेगळीच होती . यावेळी त्यांच्यातील बदल जाणवला मला .तो मला त्याचे चॉकलेट देत होता .माझ्याबरोबर त्याच्या आवडीचे टिव्ही शो सोडून फिरायला येत होता .
पण सगळ्यात सुंदर गोष्ट...... जेव्हा आम्ही संध्याकाळी फिरून घरी आलो आणि मी पुढे काय करायचे हे ठरवीत असतानाच हा छोटू मॅगीने भरलेला बाउल घेऊन समोर उभा राहिला आणि काहीही न विचारता एक घास माझ्या तोंडात भरविला .पहिला घास भरवून म्हणतो "अजिबात लाजू नकोस .हे मी आपल्या दोघांसाठीच आणले आहे .माझ्यातले तुला देणे फार आवडते मला .
तुम्हाला आता वाटेल यात काय मोठी गोष्ट आहे ..?? पण एक मुलगी.. जीला आतापर्यंत भाऊ बहिणीचे प्रेम काय ते माहीतच नाही. तिच्यासाठी फारच मोठी गोष्ट होती ती.त्याची ही छोटीशी गोष्ट माझ्या डोळ्यात पाणी आणण्यास पुरेशी ठरली.माझे डोळे पुसत तो माझ्या कुशीत शिरला .कदाचित ह्यालाच आनंद म्हणत असतील का ?? उद्या संध्याकाळी मी घरी असेंन पण भरलेले हृद इथेच ठेवून जाणार आहे .

Thursday, December 14, 2017

डिजिटल लग्न

व्हाट्सअँपवर अग्निहोत्रीसाहेबांच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण पाहून मी थोडा चकित झालो.ते माझे बॉस. त्यामुळे रोजचा संबंध.असे असूनही डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांना व्हाट्सअँप वरून आमंत्रण देणे थोडे विचित्रच वाटत होते.त्यात माझे आणि त्यांचे संबंध खूप जुने आणि घरचे . निदान मला तरी त्यांच्याकडून पत्रिकेची अपेक्षा होती.थोडा नाराज होऊनच मी त्यांना केबिन मध्ये भेटायला गेलो.
मला पाहताच ते खुश झाले."या भाऊ !!.बसा..आमंत्रण मिळाले ना ..?? लग्नाला नक्की या.
मी म्हटले "हो साहेब ....आताच मेसेज आला तुमचा .पण पत्रिका छापल्या नाहीत का ...?? आपण डिपार्टमेंटमध्ये पत्रिका लावतो.नेहमीची पद्धत आहे आपली.
"वाटलेच तुम्ही विचारणार मला" ते थोडे गंभीर झाले. "भाऊ आम्ही रियाचे लग्न डिजिटल करायचे ठरविले आहे... ???
" काय ....?? डिजिटल लग्न ..?? ही काय भानगड आहे ...?? मी आश्चर्यचकित होऊन विचारले.
"आम्ही एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले आहे .संपूर्ण लग्न डिजिटल पद्धतीने होईल. तू जर मेसेज नीट पाहिलास तर तुला मेसेजमध्ये लिंक दिसेल . त्या लिंकवर तू क्लीक केलेस तर तुला काही प्रश्न विचारण्यात येतील त्या तू हजर राहणार का.. ? किती माणसे येणार.?नाही हजर राहणार तर तुझा ऍड्रेस... घरात किती माणसे आहेत ..??असे प्रश्न असतील . तू मुलीकडून असलास तर मुलीचा बँक अकाउंट नंबर.तिच्या घरचा ऍड्रेस असेल".
"हे सर्व कशासाठी.."??मी उत्सुकतेने विचारले.
"याची बरीच कारणे आहेत.काहीजणांना वेळ नसतो.काही आयत्यावेळी प्लॅन बदलतात.काहींना गर्दी .वाट पाहणे पसंद नसते .आता तू प्रत्यक्ष हजर राहणार असे तिथे नोंद  केलेस तर तुम्ही सांगाल तितक्या माणसांचे जेवण ठेवण्यात येईल . अशा प्रकारे  माणसांचे जेवण ठरविणे सोपे जाईल .काहीजणांना रांगेत उभे राहून आहेर देणे पटत नाही .त्यामुळे वेळ खूप जातो .म्हणून तुमचा आहेर तुम्ही डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करू शकता .काहीजणांना आहेर द्यायचा असतो पण प्रत्यक्ष हजर राहायला जमणार नसते तेव्हा त्यांनी आहेर दिला की ताबडतोब त्यांच्या घरी जेवणाचे पार्सल जाईल याची ही व्यवस्था केली आहे.
"ते कसे बुवा ...?? माझी उत्सुकता काही संपत नव्हती.
"त्या कंपनीने जी लिंक तयार केली आहे ती वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरशी जोडली आहे . तुम्ही हजर नाही राहणार असे लिहून दिले असेल आणि तरीही तुम्ही ऑनलाइन आहेर दिलात की त्याचे नोटिफिकेशन जेवणाच्या कॉन्ट्रॅक्टरला जाईल . तो तुमचा ऍड्रेस पाहून आणि किती माणसे आहेत हे पाहून जेवण तुमच्याघरी पार्सलने पाठवेल .दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण लग्न सोहळा या लिंक वरून तुम्हाला ऑनलाइन दिसेल.तुम्ही लग्न ऑनलाइन बघता आहात हे ही आम्हाला कळेल आणि त्याची नोंद होत जाईल.त्यासाठी हॉलमध्ये सगळीकडे कॅमेरे लावले आहेत" .
"पण सगळ्यांनाच हे जमणार नाही आणि तुमचे नातेवाईक प्रत्यक्ष हजर राहणारच ना"..?मी नेहमीप्रमाणे शंका काढलीच.
"हो ..जे प्रत्यक्ष हजर राहतील त्यांनाही वधूवराना भेटता येणार नाही उलट वधूवरच त्यांना खाली येऊन भेटतील . ते स्टेजवर उभे राहणार नाहीत. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतील.त्यांच्याशी गप्पा मारतील . त्यांच्याबरोबर सेल्फी काढतील. लोकांचा वेळ ही वाचेल."
"अरे बापरे ...! हे असेही असते का ?? पण काहीजणांना वस्तुरूपात आहेर द्यायचा असेल त्याचे काय .."?? माझे प्रश्न संपत नव्हते.
"ज्यांना वस्तू द्यायच्या असतील त्यांनीही ऑनलाइन डायरेक्ट वधू वरांच्या घरी पाठवून द्याव्या. त्यासाठी पत्ताही दिला आहे . शिवाय आम्हालाही कोणाला रिटर्न गिफ्ट द्यायचे असेल तर आम्हीही त्यांच्या अड्रेसवर पाठवू म्हणजे इथे कोणाचे मानपान नको" साहेबांकडे उत्तर तयारच होते .
" ते ठीक आहे हो ...पण लग्न म्हटले की आनंद सोहळा असतो . नाचगणे असते . नटणे मुरडणे असते" मी काय साहेबांना सोडायला तयार नव्हतो.
"हो ...ते सर्व आहे . मेहंदी ,हळद वरात सर्व काही आहे . तेही कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे आणि जो हजर राहणार नाही त्यांना ते ऑनलाइन दिसेलच .आम्ही फक्त लोकांचा वेळ आणि नको त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करतोय . माझी आई अंथरुणावर असते तिला हॉलवर आणणे शक्य होणार नाही त्यामुळे ती घरातील टीव्ही वर सर्व सोहळ्याचा आनंद घेईल."
"ठीक आहे ...असे बोलून मी उठलो.
" हे बघ भाऊ ....मला कळतंय तुम्हालाहे  पटत नाही .आहो मलाही पटत नाही .पण हल्लीच्या फास्ट जीवनात लग्नासाठीही पूर्ण दिवस देणे कोणाला जमत नाही . काही स्वखुशीने येतात.तर काही इच्छा नसताना हजर राहतात . तर काही मानापमानासाठी येतात.सर्वाना खुश करण्याचा हा एक प्रयत्न आहे . त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतलीय इतकेच . मला तर भीती वाटते की आपल्या नातवंडांची लग्ने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच होतील. नवरा नवरी तरी प्रत्यक्ष स्वतःच्या लग्नाला हजर राहतील का.." ??
मी खेदाने हसून मान डोलावली आणि केबिन बाहेर पडलो .
© श्री. किरण बोरकर

Monday, December 11, 2017

गुलजार पटकथा ........ गुलजार

गुलजार पटकथा ........ गुलजार
अनुवाद .............अंबरीश मिश्र
मेहता पब्लिकेशन
गुलजार हे फक्त कविच नाहीत तर उत्तम लेखक आणि दिग्दर्शक आहेत . त्यांच्या नायकाचे एक वैशिष्ठ म्हणजे तो मिशिवाला असतो . विनोद खन्ना  त्याचा आवडता नायक आहे असे वाटते .या पुस्तकात त्यांनी आपल्या चित्रपटाच्या तीन पटकथा सांगितल्या आहेत . तिन्ही कथा वाचताना जणू चित्रपट डोळ्यासमोर दिसतोय याची जाणीव होत रहाते .मेरे अपने ,परिचय आणि कोशिश ह्या गाजलेल्या चित्रपटाच्या पटकथा वाचायला मिळतात .

हक्क

हल्लीच व्हाट्स अपवर एक व्हिडिओ किंवा एक फोटो फिरत होता.रशियातील एक गावात एका लहान मुलीला फक्त शाळेत नेण्यासाठी सरकारने ट्रेन चालू ठेवली होती . त्या मुलीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ती ट्रेन चालू होती आणि शाळेच्या वेळेनुसार तिची वेळही बदलत राहिली.सर्वांनी रशियन सरकारचे कौतुक केले . बघा एक मुलींसाठी ट्रेन चालू ठेवले सरकार नाहीतर आपल्या इथे ......??
पण त्या दिवशी आम्ही देवगड येथील मुणगे गावातील टोपीवाला प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत भेट दिली. तेव्हा त्या शाळेत फक्त पहिली ते चौथीपर्यन्त तीनच विद्यार्थी होते . अनेकजण तीन विद्यार्थ्यांसाठी काय मदत करायची असे म्हणत होते . शाळेतील शिक्षकही बोलायचे की आम्हाला शाळेत तीन विद्यार्थी आहेत हे सांगायला देखील लाज वाटते . पण म्हणून त्या विद्यार्थ्यांचा  उत्तम शिक्षणाचा हक्क हिरावून घ्यायचा का ...?? इतर विद्यार्थ्यांना जे लाभ मिळतात ते त्यांना मिळायला नको का.. ??? डिजिटल शिक्षण किंवा इ लर्निंग शिक्षणाचा त्यांचा हक्क नाही का.. ??
कोण्या एका सद्गृहस्थाने शाळेला तीन टॅब भेट म्हणून दिले. त्यावेळी आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन त्या तिन्ही टॅबमध्ये पहिली ते चौथी इयत्तेचा इ लर्निंग अभ्यासक्रम इन्स्टॉल करून दिला . आज दुसऱ्या देशाने काही केले तर उदो उदो होतो पण आपल्याच देशातील परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार फारच कमीजण घेतात .
© श्री. किरण बोरकर

Tuesday, December 5, 2017

मी मुंबईकर

च्यायला ......आज परत उशीर !!. आता नेहमीची माझी सवय ह्यांना माहीत नाही का... ???? तरीही नेमक्या त्याच वेळेस हा पोरगा आत घुसला ..बरे पटकन बाहेर पडावे, ते नाही... नेहमीसारखी दहा मिनिटे घेतलीच . ऍडजस्ट करायला कधी शिकणार देव जाणे.हिला बोललो तर त्याचीच बाजू घेईल आणि पुढच्या वेळी फ्लॅट घेताना दोन बेडरूमच्या नाही तर निदान दोन टॉयलेटचा तरी घ्याअसे  बोलेल. अर्थात आता ते पुढच्या जन्मात शक्य आहे म्हणा.
तर महत्वाचा मुद्दा म्हणजे नेहमीची ट्रेन गेली ...म्हणजे जागा गेली ...मित्र गेले ....नाश्ता गेला. आणि हो... ती हसून गुड मॉर्निंग म्हणणारी दीक्षितही गेली.जाऊदे.. कामावर जाणे महत्वाचे . कालच परदेशी माणसे आलीत त्यांच्या मीटिंग ची तयारी करायची आहे . मिळेल ती ट्रेन पकडून निघू तिकडून टॅक्सी मारू . त्याचे वाउचर लावू .असे मनात विचार करीतच तो स्टेशनला निघाला.
स्टेशन जवळ येताच एक वृद्ध त्याच्या समोर उभा राहिला . उभ्या रेषांचा हाफ शर्ट बाहेर असलेला ..सैलसर पॅन्ट ..आणि एकदम ओरडला "बोक्या ..... पाचवी ,सहावी ,सातवी  अ वर्ग .डोळ्यात ओळ्खल्याची खूण आणि आनंद .एक क्षणात वैद्य मास्तरांचा तो तरुण चेहरा डोळ्यासमोर आला . त्यांनी मारलेला धपाटा अजून आठवतोय .ज्यांनी  आम्हाला घडविले त्यात सर्वात मोठा वाटा असलेले वैद्य सर . "अरे सर ...तुम्ही  ,किती दिवसांनी ?? आज उशीर झाला म्हणून तुम्ही भेटलात .पण सॉरी.... खरेच उशीर झालाय आपण पुन्हा भेटू.. बाय निघतो . त्यांना सावरायचा अवकाश न देता तो निघाला . नेहमीसारखा घाई घाईत . ब्रिजवर चढल्यावर सहज खाली पाहिले ते अजून तिथेच उभे राहून त्याच्याकडे बघत होते .चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव येथूनही दिसत होते . काय साल लाईफ झालय ....!! इतके खाली उतरलो आपण.. की ज्यांनी घडविले त्यांच्याशी ही बोलायला वेळ नाही. वाह.... रे... मुंबई ..वाह ..!
© श्री. किरण बोरकर