Sunday, May 23, 2021

द स्ट्रीट लॉयर... जॉन ग्रिशॅम

द स्ट्रीट लॉयर... जॉन ग्रिशॅम
अनुवाद....शीला कारखानीस
मेहता पब्लिशिंग हाऊस
स्वतःला मिस्टर म्हणवून घेणारा तो गृहस्थ  मायकेल ब्रॉकच्या आयुष्यात आला नसता तर तो येत्या काही वर्षात ड्रेक अँड स्वीनी या देशातील पाचव्या नंबरच्या लॉ फर्मचा भागीदार झाला असता.
त्या दिवशी तो मिस्टर त्याच्याच लिफ्टमध्ये होता.अंगाला येणार घाणेरडा दर्प... एक फाटका ट्रेंच कोट .. अतिशय घाणेरडे काळे बूट ...असा तो मिस्टर त्याच्या पाठोपाठ ऑफिसमध्ये शिरला आणि पाहता पाहता मायकेलसह आठ वकिलांना ओलीस ठेवले. 
बोलता बोलता त्याने सांगितले की तो बेघर मनुष्य होता आणि त्याला जबरदस्तीने घराबाहेर काढले गेले होते. वेगवेगळ्या धर्मदाय संस्थांकडून मिळणारे फुकट जेवण आणि काही दिवस मिळणारा निवारा यावर जगत होता.
 त्या फर्मचे वकील वर्षाला लाखो डॉलरचे बिल करून देत होते. एकट्या मायकेलने गेल्या वर्षात साडेसात लक्ष डॉलर फर्मला कमावून दिले होते. त्यांना या बेघर लोकांविषयी काहीच माहिती असण्याची गरज नव्हती. शेवटी स्वाट टीमने शिताफीने ऑफिसमध्ये शिरून मिस्टरच्या डोक्यात गोळी घातली आणि आठ वकिलांची सुटका केली.
पण खरेच मायकेल यातून सुटला होता का ...?? मिस्टर त्याच्या डोक्यात बसला.मिस्टरने त्यांचीच फर्म का निवडली....?? काय असते बेघर लोकांचे आयुष्य...?? याचा शोध घेत तो लीगल क्लीनिकचा मुख्याधिकारी मोंदेकाय ग्रीन याला भेटला. त्याने सांगितले की मिस्टर एका गोदामात बेकायदेशीरपणे राहत होता आणि त्याला हुसकावून बाहेर काढले होते .
म्हणजेच त्यांना बाहेर काढण्यात मायकेलच्या फर्मचा हात होता का ....?? मायकेल मोंदेकाय ग्रीन सोबत राहून बेघर लोकांची माहिती घेऊ लागला. त्याच्यासोबत तो बेघर लोकांच्या अन्नछत्रात स्वयंसेवकांचे काम करू लागला.
एका चर्चच्या अन्नछत्रात मायकेलच्यासमोर  लॉन्टी बर्टन आली.तिच्या खांद्यावर एक तान्हे बाळ आणि मागे तीन मुले होती. मोठा ऑन्टारिओ फक्त चार वर्षाचा होता . ती त्या दिवशी अन्नछत्रात जेवली.मायकेलने ऑन्टारिओसोबत गप्पा मारल्या त्या तान्ह्या बाळाचे डायपरही बदलले आणि आपला कोट त्याच्या अंगाभोवती गुंडाळला .दुसऱ्या दिवशी ते कुटुंब त्याला दिसले नाही.
 पण तिसऱ्या दिवशी तो टीव्हीवरची बातमी पाहून हादरला . एका जुनाट बंद गाडीत लॉन्टी बर्टन आणि तिची चार मुले गुदमरून मृत्यू पावली होती.मायकेलने अधिक चौकशी केली तेव्हा लॉन्टी बर्टनही त्याच गोदामात राहत होती जिथे मिस्टर राहत होता.
 आता मात्र मायकेलने या प्रकरणात खोलवर जाण्याचे ठरविले.त्यांना बेघर करण्यामागे त्यांचीच फर्म आहे हे त्याला कळले आणि तो त्यांच्या विरुद्ध लढण्यास सिद्ध झाला . त्याला साथ द्यायला लीगल क्लीनिकचा मोर्डेकाय आणि त्याची टीम होतीच.
बेघर लोकांना न्याय मिळवून देण्यात मायकेल आणि त्याची टीम यशस्वी होईल का ...?? 
सतरा बेघर लोक ... जे एका गोदामात बेकायदेशीरपणे पण भाडे देऊन राहातायत .त्यातील दोनजण आणि चार लहान मुले मरण पावलीत ज्यांना कायद्याचे अजिबात ज्ञान नाही अश्या लोकांना भरपाई मिळेल का ...?? त्यासाठी काय मार्ग मायकेलने निवडले आणि मोर्डेकायने कश्या वाटाघाटी केल्या हे पुस्तक वाचूनच कळेल .
जॉन ग्रीशमची अजून एक कायदेशीर लढाई

Saturday, May 15, 2021

कालचक्र रहस्यमय जंगलाची गोष्ट.... अनिरुद्ध काटकर

कालचक्र रहस्यमय जंगलाची गोष्ट.... अनिरुद्ध काटकर
ही कथा आहे एका घनदाट अरण्याची. हे अरण्य दोन भागात आहे. 
एक भाग निसर्गसौंदर्याने नटला आहे .तर दुसरा भाग तितकाच क्रूर आणि भयानक आहे. मानवाला या अरण्यात जाता येत नाही कारण त्यात प्रवेश करायचा मार्गच कोणालाही माहीत नाही.
तरीही अजय शिरसागर उर्फ अण्णा आणि त्याचा मित्र वसंत यांनी जीवावर उदार होऊन त्या अरण्यात प्रवेश केला ते तिथे फिरले पण येताना अण्णा एकटेच बाहेर आले आणि वसंत तीथेच अडकला . ते साल होते १९९० 
आज २०२०साली अण्णांचा मुलगा संस्कार आणि पुतण्या आकाश अरण्यात जाण्यासाठी उत्सुक आहेत. अण्णा त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही एके रात्री संस्कार आणि आकाश अपुऱ्या माहिती आधारे त्या अरण्यात प्रवेश करतात.
जिथे त्यांची भेट अण्णांचा मित्र वसंतशी होते. वसंत अजूनही तरुणच दिसत असतो .गेले तीस दिवस मी या अरण्यात अडकून पडलो आहे असे तो त्यांना सांगतो. तो ती सर्व हकीकत सांगतो जी अण्णांनी संस्कार आणि आकाशला सांगितलेली असते. 
पण त्या गोष्टीला तर तीस वर्षे उलटून गेलेली असतात...मग वसंत फक्त तीस दिवस झाले असे का सांगतो ...?? 
वसंत त्या दोघांनाही  वीस दिवस अरण्याची संपूर्ण सफर घडवून आणतो. ती सफर पूर्ण व्हायला वीस दिवस लागतात .अरण्याबाहेर निघताना संस्कार आणि आकाश आपल्यासोबत वसंतलाही घेऊन जाण्याचे ठरवितात.पण कुठेतरी काही चुकते आणि आकाश आतच राहतो . 
संस्कार आणि वसंत घरी परतात तेव्हा वीस वर्षे उलटून गेलेली असतात आणि अण्णांचा मृत्यू झालेला असतो. पण मृत्यूपूर्वी त्यांनी एक डायरी आपल्या मुलीच्या हाती दिलेली असते . यात अरण्याची सगळी माहिती ...सगळी रहस्य लिहिलेली असतात.
आता संस्कार आणि वसंतवर आकाशला परत घेऊन येण्याची जबाबदारी आहे.पण यावेळी त्यांच्या हातात अरण्याचे रहस्य आहे . 
असे काय आहे या अरण्यात ....??
काय आहे कालचक्राचे रहस्य ...??
पुस्तक अतिशय गुंतागुंतीचे आहे . कधी कधी तर आपण बालकथा वाचतोय असे वाटते. विज्ञान ,पुराण आणि पर्यावरण यांचा मिलाफ करून ही कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला गेलाय .

Wednesday, May 12, 2021

ड्युटी

ड्युटी 
"आईचे बीपी वाढलंय वाटत... ?? काउंटरवरच्या त्या मुलीने हसत समोरच्या वृद्ध स्त्रीला विचारले.
त्या हॉस्पिटलमध्ये नेहमीसारखीच गर्दी होती . सतत कामात असूनही त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हास्य काही कमी होत नव्हते . 
"हो ना .. ! बीपी... शुगर...सर्वच. म्हटले चेकिंग करून घेऊया.. .." ती वृद्ध स्त्री सहज स्वरात म्हणाली .
"बसा नंबर येईल तेव्हा बोलावीन मी ...."तिने हातात स्लिप देऊन सांगितले .
ती एका खुर्चीवर इतरांसोबत बसली. समोर नेहमीप्रमाणे नर्सेस... डॉक्टरची.. गडबड चालू होती.. थोड्या वेळाने तिचा नंबर आला तशी आत गेली.आत गेली.. 
संध्याकाळी ड्युटी संपवून ती मुलगी घरी जाण्यास निघाली तेव्हा ती स्त्री बाहेर आली .सोबत एक नर्सही होती.
"आई अजून तुम्ही इथेच ..इतका वेळ चेकिंगला ...?? काही सिरीयस नाही ना मॅडम ....?? तिने शेजारच्या नर्सला विचारले.
"तसे काही सिरीयस नव्हते. म्हणून इतर सिरीयस पेशंटची तपासणी करत बसलो आणि हिला बाजूला बसवून ठेवले ... आता एकटी घरी जाईल इतकी एनर्जी आलीय तिच्यात..." त्या नर्सने तिच्याकडे हसत हसत पाहत सांगितले. ती मुलगी आश्चर्याने पाहत बसली.
"अग काही नाही ग .. ही माझी मुलगी .इथेच नर्स आहे. आठ आठ दिवस घरी येत नाही .आली तरी झोपून जाते आणि परत ड्युटी जॉईन करते. आम्हाला भेटायला.. बोलायला.. वेळच मिळत नाही. आज जागतिक परिचारिका दिवस. गेले आठ दिवस ही घरीच आली नाही . मग मी म्हटले आपणच भेटायला जाऊ तिला . आणि तपासणीच्या निमित्ताने आले . तिच्या वॉर्डमध्ये बसून तिची लगबग... कामाची घाई ..पाहत बसले. मध्ये मध्ये चार शब्द बोलून जात होती पण नजरेसमोर तरी होती माझ्या .तिचे काम पाहून अभिमान वाटला तिचा ...." मुलीच्या डोक्यावरून हात फिरवीत आई म्हणाली .
जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
© श्री.किरण कृष्णा बोरकर

वेटिंग

वेटिंग
 "अजून किती वेळ लागेल ..."?? स्मशानात अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याने विचारले.
"तरी अजून तीन तास लागतील साहेब...." त्या कर्मचाऱ्याने उत्तर दिले. 
"मग दहा मिनिटे आधी फोन कर ..मी येईन .. "त्याने उत्तर दिले आणि निघून गेला.
"काय माणसे असतात.....!! आपला माणूस कायमचा गेलाय तरी त्याच्यासाठी तीन तास थांबू शकत नाहीत .." एकजण चिडून पुटपुटला.
दुसऱ्या दिवशी शेजाऱ्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला म्हणून ऍडमिट करायला ते दोघे घेऊन गेले.
 हॉस्पिटलमध्ये अम्ब्युलन्स पोचली तेव्हा एकजण व्हीलचेयर आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊनच त्यांची वाट पाहत होता.
"अरे तुम्ही....??  काल स्मशानात आला होतात. तीन तास लागतील म्हणून परत निघून गेलात..." न राहवून त्यातील एकाने विचारले .
"हो मीच तो ...काल माझे वडील वारले. त्यांना घेऊनच गेलो होतो. पण तिथे तीन तास वाट पाहण्यापेक्षा इथे कोणाचा तरी जीव वाचवणे महत्वाचे वाटले मला. ह्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय आहे मी ... "असे म्हणून पेशंटला व्हीलचेयर बसवून आत शिरला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Monday, May 10, 2021

येणं..३

येणं....३
"डॉक्टर .... आज डिस्चार्ज मिळेल का .."?? त्या मध्यमवयीन स्त्रीने हात जोडत विचारले.
"ताई ...कसली घाई आहे तुम्हाला.. ?? किती सिरीयस कंडिशनमधून बाहेर आलाय तुम्ही हे माहितीय का ..?? दरवाजावर थाप मारून परत खाली आलात तुम्ही.आम्ही तर आशाच सोडून दिली होती .. .."तो तरुण डॉक्टर काळजीनेच म्हणाला . 
"खरंय तुमचे आणि आभार ही .. पण मला आज घरी जाऊदे .पाया पडते तुमच्या..." ती काळकुतीने म्हणाली.
"बघतो प्रयत्न करून. पण खात्री देत नाही. शेवटी नियम असतात काही ..."असे बोलून तो दुसऱ्या पेशंटकडे वळला . 
ती गप्प बसून मागील काही दिवसाचा विचार करू लागली .त्या दिवशी अचानक तिला ताप आला आणि नंतर खोकला.ती आपल्या तब्बेतीला खूप जपायची. त्यात लॉकडाऊन झाल्यानंतर जास्तच.
 तिने ताबडतोब तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी ऍडमिट होण्यास सांगितले. ते ऐकून तिचा धीर सुटला . आपल्यामागे आता काय होईल...??  ही चिंता सतावू लागली.
त्यात दोन दिवसांनी सिरीयस झाली .मध्येच तिला फोन यायचे .त्या दिवशी सिरीयस झाली तेव्हा फोन आला . डॉक्टरने नाईलाजाने तिच्या कानाला लावला . पलीकडचे बोलणे ऐकताना तिला रडू येऊ लागले तेव्हा डॉक्टरांनी फोन बंद केला.
 ती रात्र तिच्यासाठी धोक्याचीच होती. पण अचानक हळूहळू तिची तब्बेत सुधारू लागली .त्यानंतर ती काही दिवसांनी पूर्वपदावर आली .
नंतर काही दिवसांनी तिचा घरी जाण्याचा हट्ट सुरू झाला . ऍडमिशन कार्डवर तर ती अविवाहित असल्याचे लिहिले होते . मग घरी जाण्याची घाई का ...?? डॉक्टरला प्रश्न पडला होता. अर्थात हॉस्पिटलमध्ये इतके पेशंट ऍडमिट होत होते की प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहायला कोणालाच वेळ नव्हता . 
थोड्या वेळाने तो डॉक्टर तिच्याजवळ आला आणि तिला घरी जाण्याची परवानगी दिली.
"घरून कोणाला बोलवायचे आहे का..."?? असे विचारले असता तिने नकारार्थी मान डोलावली . "सरप्राईज देईन म्हणते...." तीने हसत उत्तर दिले.
"चला मीच सोडतो तुम्हाला .एकट्याला सोडू शकत नाही आम्ही आणि तशीही तुम्हाला इतकी घाई का याची उत्सुकता आहेच .."डॉक्टर हसत म्हणाला. तशी ती गोरीमोरी झाली.
सर्व सोपस्कार पार पाडून ती डॉक्टरच्या गाडीत बसली."आज बॉयफ्रेंडचा वाढदिवस आहे का .."?? त्याने हसून विचारले.
"नाही .. मला बॉयफ्रेंड नाही .घरीही कोणी नाही..." ती तुटक आवाजात म्हणाली .मग ती त्याला रस्ता दाखवू लागली. थोड्याच वेळाने एका रस्त्यावरील शेवटच्या गल्लीत त्याने गाडी वळवली आणि एका जुनाट बंगल्यासमोर उभी केली.
"घर मोठे आहे तुमचे.."तो सहज म्हणाला .
"या चहा पिऊन जा ... "तिने उत्तर न देता आमंत्रण दिले.
तो खाली उतरला आणि तिच्या पाठोपाठ आत शिरला. तो बंद दरवाजा उघडताच आज एकाच हल्लागुला झाला . गोंधळून त्याने समोर पाहिले तेव्हा सात ते बारा वर्षाची पाच सहा लहान मुले " वेल कम आई .. हॅपी मदर्स डे ...मिस यु ...असे फलक घेऊन उभे होते.त्यात  दोन मुलीही दिसत होत्या. 
"हेच ते सरप्राईज.... आज मदर्स डे आहे आणि यादिवशी कोणती मुले आपल्या आईशिवाय  एकटी राहतील.."?? तिने त्या मुलाना जवळ घेत विचारले. "मला बॉयफ्रेंड नाही पण ही  मुलेआहेत ना ..?? रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांना मी आधार दिलाय. हा वडिलोपार्जित बंगला आणि बँकेत वडिलांनी ठेवलेली रक्कम यावर आमची गुजारणा होतेय. अगदी छान चालले आहे आमचे. कोणाला काही होऊ नये म्हणून आम्ही खूप काळजी घेतो. पण तरीही हा आजार आमच्या घरात शिरला . माझ्यानंतर यामुलांचे काय होईल हीच काळजी सतावत होती.त्यादिवशी यांच्यापैकी एकाचा फोन आला.फोनवर तो रडत म्हणाला आई तुझ्याशिवाय आम्ही कसे जगू...??  तू काहीही करून परत ये. हा मदर्स डे तुझ्यासोबत साजरा करू... बस तेव्हा मी मनात पक्के केले आपल्याला परत घरी जायचंय . माझ्यासाठी नाही तर या मुलांसाठी. तीच माझ्याकडे पाहून जगण्याचे धैर्य गोळा करतात.आणि मी या आजारातून बरी झाले. मदर्स डे या मुलासोबत साजरा करायचा म्हणून मी तुमच्या मागे लागले होते डिस्चार्ज साठी.." ती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली.
त्या डॉक्टरने हात जोडून तिला नमस्कार केला आणि डोळ्यातील अश्रू थोपवीत गाडीकडे वळला 
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Sunday, May 9, 2021

लेट भुट्टो ईट ग्रास .....शौनक अगरखेडकर

लेट भुट्टो ईट ग्रास .....शौनक अगरखेडकर
अनुवाद...अक्षय कुल्हे
१९६५ साली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांनी जर भारताने बॉम्ब बनवला तर एक वेळ पान किंवा गवत खाऊ ..उपाशी ही राहू पण आम्ही आमचा बॉम्ब बनवूच असे वक्तव्य केले होते.
१९७४ साली भारताने हेरगिरीसाठी स्थापन केलेल्या एका विंगमध्ये सबलोकची नेमणूक झाली.
सबलोक १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामात लढला होता . युद्धाचे बक्षिस म्हणून आपल्या पायात तोफेच्या गोळ्यांचे छरे  घेऊन फिरत होता. 
अरोराने त्याला त्या विंगमध्ये आणले आणि अँनालिस्ट म्हणून ठेवले. परदेशातून वेगवेगळ्या हेरांकडून आलेल्या बातमीचा रेकॉर्ड ठेवणे त्या फाईल करणे इतकंच त्याचे काम .
पण त्या दिवशी इस्लामाबाद हाय कमिशनकडून आलेल्या साध्या टेलिग्रामने त्याचे लक्ष वेधून घेतले.पाकिस्तानी इंटरनेशनल एअरलाईन्सच्या एका हवाईसुंदरीच्या माध्यमातून ती माहिती आली होती.
कुतूहल म्हणून सबलोकने त्या माहितीचा पाठपुरावठा करण्याचे ठरविले आणि त्याच्या हाती काही धक्कादायक माहिती लागली . त्या माहितीचे कनेक्शन युरोपातील नेदरलँडशी होते.
आपल्या गॉडफादर अरोराची मदत घेऊन सबलोकने त्याच्या साहेबाना पटवून दिले की  पाकिस्तान अणुबॉम्ब निर्मितीचे प्रयत्न करीत आहे .
आता त्या  मोहिमेचा पाठपुरावठा करून ती मुळापासून उखडून टाकण्याची जबाबदारी सबलोक आणि अरोरावर पडली . खरच ते हे षडयंत्र रोखू शकतील का ...?? 
लेखकाने दोन भागात हे पुस्तक लिहिले आहे . हे पुस्तक पहिला भाग आहे . यात शेवट अनुत्तरित आहे .त्यासाठी दुसरा भागही वाचायला हवा .
लेखकाने १९७५ च्या कालखंडाचे उत्तम वर्णन केले आहे . सरकारी गुप्तहेरांचे ऑफिस ,लाल फितीचा कारभार ,प्रत्येक गोष्टीचा पुरावा देणे प्रतिज्ञापत्र सादर करणे, साहेबाना पटवून देणे ..पुन्हा मोठ्या साहेबांकडे जाणे, मोहीमेला परवानगी मागणे,खर्चात काटकसर करणे. एकूणच त्यावेळी आपले सरकार गुप्तहेरखाते कसे चालवत असेल याची कल्पना येते .
पुस्तक वाचता वाचता आपण त्यात गुंतून जातो हे मात्र नक्की.

येणं...३

येणं...२
"काय ग म्हातारे ...?? आलीस का देवाला लाच द्यायला.लॉकडाऊन आहे तरी तुला मोतीचुरचे लाडू कसे मिळतात ...."?? गणपतीच्या बंद दरवाजासमोर लाडूचा प्रसाद आणि हार ठेवणाऱ्या इंदूआतेला विक्रमने आवाज दिला तसा मी कपाळावर हात मारला.आता इथे विक्रमच्या कमीत कमी दोन पिढ्या खाली येणार हे नक्की.
"मेल्या आलास का इथेपण सतवायला.सगळे घरी बसलेत आणि तुम्ही दोघे इथे फिरतायत कसे...?? बरोबर आहे घरातील बायका किती वेळ सहन करणार तुम्हाला . संसार करतायत ते नशीब...." ती सत्तर वर्षाची इंदूआते आता चांगलीच चिडली आणि विक्रम बरोबर माझ्याही दोन पिढ्या खाली येणार हे विधीलिखित होते.
"आणि खबरदार.. देवाच्या पुढ्यातील लाडू घेतलास तर. हगवण लागेल .. या म्हातारीचा शाप आहे .." तिने विक्रमच्या मनातील भावना ओळखून शापवाणी उच्चारली आणि लाडवाच्या दिशेने पडणारी माझी पावले अडखळली.
"अरे पंधरा वर्षे झाली...माझ्या मुलाच्या घरात पाळणा हलला नाही .त्यासाठी दर मंगळवारी येते मी.. "ती हळवं होत म्हणाली.
"मग देव येणार का मदतीला .. ?? काही उपचार करा.हल्ली खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत.." विक्रम म्हणाला .
"नको त्या ट्रीटमेंट.. आमचा देव आहे पाठीशी "ती रागाने म्हणाली.
"चल तुला घरी सोडतो..."विक्रम तिचा हात धरत म्हणाला.तशी ती मुकाट्याने त्याच्यासोबत निघाली . 
दोन दिवसांनी रात्री अचानक  इंदूआतेचा मुलगा महेश घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.
"आईला बरे वाटत नाही..."
मी विक्रमला फोन केला आणि तो गाडी घेऊनच हजर झाला.आम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केले.
इंदूआते कोरोना पोसिटिव्ह झाली हे ऐकून आम्ही चिंतेत पडलो पण विक्रम "ह्या ....त्यात काय ..?? योग्यवेळी घेऊन आलोय.होईल दोन दिवसात बरी.."असे बोलून औषधे आणायला गेला.
थोड्या वेळाने आम्ही घरी आलो.दुसरा दिवस टेन्शनमध्ये गेला.इंदूआते बरी होती पण रात्री तिची तब्बेत बिघडली आणि ऑक्सिजनवर गेली. पहाटे तर अशी वेळ आली की डॉक्टरने आम्हाला बोलावून घेतले .विक्रमशी हलक्या आवाजात डॉक्टरने चर्चा केली आणि मान हलवत पुन्हा आत निघून गेले.
"तयारी करायची का ...?? बंड्याला बोलावू का ..?? मी दबक्या आवाजात विक्रमला विचारले.
"गप रे.. म्हातारी आहे अजून .... तो माझ्यावर उखडला. डॉक्टरांनी निर्णय दिल्याशिवाय काही करू नकोस . चला निघुया .. काही झाले तर डॉक्टर फोन करतील .."असे म्हणताच आम्ही मुकाट्याने त्याच्या मागून निघालो.
दुपारी डॉक्टरचा फोन आला...तिची तब्बेत सुधारतेय ...हे ऐकून आम्ही उडालोच.हळूहळू तिची ऑक्सिजन लेव्हल वाढू लागली आणि पंधरा दिवसात ती नॉर्मलवर आली.
अजून काही दिवस विश्रांती घेऊन महिन्याभरात घरी आली .आम्ही चार दिवसातून एकदा तिची चौकशी करत होतोच .काही दिवसांनी ती पुन्हा हिंडू फिरू लागली आणि आज पुन्हा देवळात आली .
"म्हातारे आलीस का परत देवाला लाच द्यायला ...? बरी झालीस म्हणून आलीस धावत त्याला भेटायला ...?? किती जगशील ...?? आणि कोणासाठी ...?? विक्रमने नेहमीप्रमाणे खेचायला सुरवात केली. पण यावेळी इंदू आजी चिडली नाही उलट आमच्या हातावर एक एक मोतीचूरचा लाडू ठेवला .
"अरे माझ्यासाठी नाही.. तर माझ्या येणाऱ्या नातवासाठी मी आलेय आज.सुनबाईला चवथा चालू झालाय .त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर माझ्या कानाशी तुमची सून गरोदर आहे आताच मुलगा रिपोर्ट घेऊन आलाय असे कानाशी पुटपुटला आणि मी कष्टाने डोळे उघडले. किती आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. गेली पंधरा वर्षे ह्याच क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते.मग मनाशी निर्णय घेतला ..नाही ..आता हे आजारपण दूर करायला हवे मला सुनेची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घ्यायला हवी आणि त्यासाठी उठायलाच हवे. ते मनात ठेवूनच मी या आजाराशी झुंजत राहिले आणि शेवटी त्यावर विजय मिळवला.खरेच आज मी खुश आहे . आता बघत राहा माझ्या सुनेची कशी काळजी घेते मी .. चल लवकर घरी सोड मला.. खूप कामे खोळंबली आहेत.."ती  उत्साहाने बडबडत होती.
विक्रम हसला त्याने तिचा हात पकडला आणि मला डोळा मारून निघाला.
रात्री गच्चीवर आम्ही पुन्हा  भेटलो.
"इंदूआतेच्या  प्रकरणात तुझा किती सहभाग आहे ...??? उगाच का त्या म्हातारीला आशा दाखवतोयस...??त्या डॉक्टरला तूच काहीतरी सांगितलेस ना ..?? माझ्या प्रश्नाच्या फैरी चालू झाल्या.
"हो.. हो.. मीच त्या डॉक्टरला सांगितले म्हातारीच्या कानात सांग म्हणून. अरे तिची सून गेले वर्षभर आपल्या सईच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतेय. सई किती प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आहे हे तुला माहितीय. पण इंदूआतेला ही गोष्ट माहीत नाही. ती पडली धार्मिक आणि तिची सून विज्ञाननिष्ठ म्हणून या गोष्टी सर्वांच्या नकळत चालू होत्या. त्या दिवशी दुपारीच तिचा रिपोर्ट कळला तर इंदूआजी सिरीयस झाली. विचार केला आता जाणारच आहे तर ही बातमी सांगून टाकू तितक्याच सुखाने जाईल पण म्हातारी उठून उभी राहिली . याला म्हणतात जिद्द...."विक्रम डोळे पुसत म्हणाला 
"खरे आहे तुझे . अरे त्या बाईने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले आहे .किती प्रेम आहे तिला मुलांविषयी .आज तिच्या घरात पाळणा हलणार हे ऐकून तिने मृत्यूला ही पळवून लावले ..अशीच जिद्द सर्वांनी दाखवली तर या संकटातून आपण नक्कीच बाहेर पडू... मी विक्रमच्या पाठीवर थाप मारून म्हटले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Saturday, May 8, 2021

येणं....१

येणं.....१
तो आमच्या लोकल ग्रुपमधला एक .छोट्याश्या कंपनीत कामाला होता. माझ्या आधीच्या स्टेशनवर चढायचा आणि दोन जागा अडवून ठेवायचा.
 परिस्थिती बेताचीच असावी. कारण तो आमच्या इतकी कौटुंबिक चर्चा करीत नसे.पगाराच्या दोन तीन दिवस आधी ठराविक मित्रांकडे पैसे मागायचा.
"इतकीही कोणाची परिस्थिती वाईट नसते रे ..." मी कधी कधी दोनशे ची नोट त्याच्या हातात देत चिडून म्हणायचो.
"काय भाऊ तुम्ही पण ...पैसे ते पैसे ..मग ते वीस की दोनशे ते महत्वाचे नाहीत.पण खिसा पगार होईपर्यत बॅलन्स राहणे महत्वाचे...."असे म्हणून जोरात हसायचा. पण ते हसू त्याच्या डोळ्यापर्यंत कधीच पोचायचे नाही पण काही दिवसांनी समोर येऊन पैसे हातात टेकवायचा.
"अरे राहू दे रे .... मी कुठे मागितले तुझ्याकडे..".मी गमतीने म्हणायचो.
"भाऊ पण मला आता गरज नाही ना ...ज्यावेळी लागेल तेव्हाच मागेन मी ...."तोही  हसत हसत उत्तर द्यायचा .
त्याने पैसे दिले की आम्ही समजायचो याचा पगार झालाय . माझ्या आयुष्यात खूप कमी व्यक्ती मी पहिल्या होत्या की जे स्वतःहून उधार घेतलेले पैसे परत आणून देत होते. त्याच्या या सवयीमुळे  कोण नकार ही देत नव्हते .
त्या दिवशी तो नेहमीच्या ट्रेनला नव्हता .कधीही रजा न घेणारा आज दिसत नाही पाहून थोडी काळजी वाटली . नंतर फोन करू असे ठरवून सवयीनुसार विसरून गेलो .बरे ह्याला मेसेज करावा तर हा साधा फोन वापरणारा  त्यात व्हाट्स अँपही नाही .
संध्याकाळी फोन केला तर समोरून कोणी उचलला नाहीच . मी थोडा काळजीत पडलो . दुसऱ्या दिवशी ही तो नव्हता तेव्हा ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली.
" भाऊ शोधा त्याला.. माझे दोनशे आहेत त्याच्याकडे" एक हसून म्हणाला .
"मी शंभर दिलेत.... "दुसर्याने आवाज दिला.
"भाऊचे दोनशे असतीलच..." एक छद्मीपणे म्हणाला ... मी हसलो आणि शांत राहिलो .
"म्हणजे एकूण पाचशे बुडवून आपला मित्र गायब झाला ..."दोघे एका सुरात ओरडले .
दुपारी लंच टाईममध्ये माझ्या फोनची रिंग वाजली. अनोळखी नंबर पाहून मी फोन कट केला . पण थोड्या वेळाने पुन्हा त्याच नंबरची रिंग वाजली.
 नाईलाजाने मी उचलला ..."भाऊ काका ..मी निलेश बोलतोय . काल बाबांच्या फोनमध्ये तुमचा मिस कॉल पहिला.मी नावाने ओळखतो तुम्हाला ".
अच्छा म्हणजे हा त्याचा मुलगा होता तर ...?? मी ताबडतोब त्याची चौकशी केली तेव्हा तो ऍडमिट असल्याचे कळले. कोरोनाने त्यावर ही झडप घातली होती.
"बाबा ऑक्सिजनवर आहेत . कालच ऍडमिट केलंय. श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता...तुमचा फोन आला म्हणून तुम्हाला कळवले..." समोरून तो शांतपणे बोलत होता .
ते ऐकून मला धक्का बसला . एक तर हा असा कफल्लक ....त्यात हॉस्पिटल....??  कसे जमणार ....? 
"काळजी घे रे बाबांची .... आणि काही मदत लागली तर फोन कर . आम्ही आहोत तुमच्या मागे .."मी सवयीनुसार बोलून गेलो .
"हो नक्कीच .. बाबा तुमच्याविषयी नेहमी बोलतात ..."त्याने उत्तर दिले 
मी ही बातमी ग्रुपमध्ये दिली आणि काही मदत करायची का असे विचारले 
ताबडतोब साधारण दहा हजार जमा झाले .मी त्याच्या मुलाच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले .
मग काही दिवस त्याच्या तब्बेतीत चढ उतार होत राहिले . एक दिवस तर डॉक्टरने संपले.. अशीच खूण केली पण हा त्यातूनही तगला. हळू हळू महिन्याभरात नॉर्मल ला आला . आम्ही ही सुटकेचा श्वास सोडला .
आज पहिल्यांदा तो कामावर जाणार होता . मी डब्यात चढताच त्याने मला हाक दिली . त्याला पाहून मी खुश झालो .
"काय साहेब ....?? पहिला दिवस का ..?? तब्बेत कशी ..."?? मी पाठीवर थाप मारीत विचारले 
"मस्त...सगळी तुमची कृपा .."असे म्हणून खिशातून दोनशे रुपये काढून माझ्या हातात ठेवले 
"काय रे ... मी कुठे पळून जातोय का ...?? दे आरामात.." मी सहज म्हटले 
"पण मी गेलो होतो ना...." वर बोट करून तो म्हणाला ."भाऊ हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा सतत ही चिंता .. मित्रांचे पैसे द्यायचे आहेत . आपले काही झाले तर तो बोजा घरच्यांवर नको . तुम्हाला माहितीय मी कधीच कोणाला पैसे मागायला लावले नाही . पैसे मागणे माझी गरज असेल तर परत करणे हि माझीच जबाबदारी आहे . हेच मनात ठेवून मी या रोगाशी लढत होतो. हीच जबाबदारी मला जिवंत राहण्यासाठी ताकद देत होती.त्यात तुम्ही लोकांनी पुन्हा दहा हजार रुपये माझ्यासाठी गोळा केलेत . मग काय ..?? मला जिवंत राहण्यासाठी अजून एक कारण मिळाले आणि बळ ही .... ह्या फाटक्या माणसाच्या आयुष्यात ही तुमच्यासारखे मित्र आहेत हे पाहून जगण्याचे बाळ मिळाले आणि या आजारातून उठलो. आता आहेच मी नेहमीच्या लोकलला... जमतील तसे पैसे देईन ..." तो डोळ्यातील अश्रूला वाट करून देत मला सांगत होता .
आज एक विजेता योद्धा आमचा मित्र आहे हे पाहून माझे ही डोळे भरून आले 
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Friday, May 7, 2021

जाणं..४

जाणं....४
आशा कोळीण आज खुश होती.बरेच दिवसांनी भरपूर मासळी कमी भावात मिळाली होती. त्यामुळे आज  धंदा जोरात होणार होता.आल्याआल्या तिने एक हलवा.. चार पापलेट ..बाजूला काढून ठेवली.
मालतीताई आल्या तर हलवा मागणार हे नक्की होतेच.म्हातारी मासे खाण्यात वस्ताद होती पण आशाशिवाय कोणाकडूनही मासे घेत नव्हती. तिच्याशी पैश्याची घासाघीस करायला नेहमीच आवडायचे. आशाला चार शिव्या दिल्याशिवाय मासे घ्यायची नाही . नंतर हळूच प्लास्टिकचा डबा पुढे करायची त्यात लाडू पुरणपोळी किंवा काहीतरी मिठाई असायचीच.
"तुला नाही... माझ्या नातीला देतेय.खबरदार तू हात लावलास तर ...."असा प्रेमळ दमही द्यायची.
आज हलवा पाहून ती खुश होणार हे नक्की.स्वतःशी हसत तिने वाटे लावायला सुरवात केली.काही वेळाने तिने पाहिले तर आज वंदनाताई एकट्याच येत होत्या.
" अरे मालतीताई कुठे गेल्या ...?? वंदनाताई आणि मालतीताई एकत्रच बाजारात येत ... खरे तर मालतीताईमुळे वंदनाताईना बाजार स्वस्त मिळे.
" ताई .... मालतीताई कुठे गेल्या ...?? आज एकट्या कशा...?? काय सुनेने हाकलले का म्हातारीला ....?? आशाने हसत हसत विचारले. 
वंदनाताईचा चेहरा रडवेला झाला .
"परवा रात्रीच ताई गेल्या. अचानक श्वास घ्यायला त्रास झाला. म्हणून ऍडमिट केले तर चार तासात कारभार  आटपला. काल पहाटेच अंत्यसंस्कार झाले.या आजारात कोणाला कळवूही शकत नाही.मलाही काल सकाळी कळले...." वंदनाताई अश्रू टिपत म्हणाल्या.
हे ऐकताच आशा सुन्न झाली. एका क्षणात तिला मागचे दिवस आठवले. आपल्या नातीला काय सांगावे हा प्रश्न तिला पडला.पदराने डोळे पुसत तिने हलव्याच्या तुकडा कापला आणि पानावर ठेवून समोरच्या झाडाखाली कावळ्यासाठी ठेवला. आता पुढचे दहा दिवस ती रोज एक तुकडा त्या कावळ्यांसाठी ठेवणार होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Thursday, May 6, 2021

पांचालीचे महाभारत मयसभा

पांचालीचे महाभारत मयसभा... चित्रा बॅनर्जी दिवाकरूणी
अनुवाद...डॉ. प्रतिभा काटीकर
मंजुल पब्लिशिंग हाऊस
आपल्यासारख्या सर्वसामान्यांना माहीत असलेली महाभारत कथा.यातील प्रमुख महानायिका द्रौपदी आपले मनोगत इथे सांगतेय.
एका महायुद्धाला कारणीभूत ठरलेली स्त्री असे तिचे वर्णन केले जाते.तिच्या मनाचा ठाव आतापर्यंत खूप कमीजणांनी घेतला आहे.भले जग तिला सर्वश्रेष्ठ हुशार पतिव्रता स्त्री मानत असेल पण ती स्वतः ला एक साधी स्त्रीच समजते. जिला प्रेम करता येते मत्सरही करता येतो,सूड घेण्याची इच्छा होते सासूशी पटत नाही.
द्रुपद राजाने केलेल्या यज्ञात प्रकट झालेली ही कन्या खरे तर कोणाचीही आवडती नव्हती. राजाला त्या यज्ञातून पुत्र हवा होता जो त्याला मिळाला पण त्या मागोमाग मुलगीही आली.
द्रौपदीच्या मते ती कधीच वडिलांची आणि त्याच्या प्रिय राणीची आवडती नव्हती.पहिल्यापासून ती उतावीळ आणि चौकस बुद्धीची होती. चोरून ऐकणे तिला आवडत होते .आपल्या भावाशी तिचे चांगले पटायचे.कृष्ण तिचा लहानपणापासूनचा सखा मित्र होता .कदाचित दोघेही सावळ्या रंगाचे म्हणून पटत असेल असे तिचे मत.
स्वयंवरात अर्जुनाने तिला जिंकले पण तिच्या मनात शेवटपर्यंत  कर्णच भरून राहिला.आपण कुंतीच्या सांगण्यावरून पाच पांडवाची पत्नी बनलो हे तिच्यासाठी धक्कादायक होते आणि तेव्हापासून कुंतीविषयी तिच्या मनात अढी बसली ती कायमचीच.दोघीही आयुष्यभर एकमेकांच्या वरचढ बनायचे प्रयत्न करीत राहिल्या.आपण जिंकून आणलेली स्त्री आपल्या भावांचीही पत्नी बनली याला कारणीभूत द्रौपदीच आहे असा ग्रह अर्जुनाने शेवटपर्यंत करून घेतला.
एका राजकन्येला लग्न झाल्यापासून काही वर्षे जमिनीवर फाटक्या चटईवर झोपावे लागले ,पती आणि सासूसाठी विस्तवावर जेवण बनवावे लागले. खांडववनातील जळणारा धूर आणि उडणाऱ्या राखेची चव घ्यावी लागली.
पण शेवटी तिला पाहिजे तसा महाल बनविला गेला आणि तिच्या मर्जीनेच त्याला मयसभा नाव दिले गेले.हा जादुई महाल म्हणजे तिचे सर्वस्व होते.
 पण तुझ्या हसण्यावर ताबा ठेव हा महर्षी व्यासाचा आणि महालात परक्याना आणू नकोस हा मयाचा सल्ला ती विसरली आणि महायुद्धाला एक कारण मिळाले.
पांडवांच्या इतर बायकांचा तिने मत्सर केला त्यावरून ती नेहमी पतींशी भांडायची. दरबारात ती कर्णाला शोधायची . भीम तिचा लाडका होता हे तिने कबूल केले . जो पती स्वतः द्यूतात हरला तो आपल्या पत्नीला कसा पणाला लावू शकतो असा प्रश्न तिने भर दरबारात विचारला.
वस्त्रहरणानंतर चालू झाले एक भयानक सूडनाट्य आणि याची नायिका ही द्रौपदीच होती. कुरुक्षेत्रावरील युद्धात ती आपल्या पतीच्या सोबत होती.व्यासांनी तिलाही दिव्यदृष्टी दिली होती आणि त्यातूनच तिला कर्णाचे जन्म रहस्य कळले होते.
आपल्या मनोगतात तिने स्त्री स्वभावाच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. सासू सुनेचे शीतयुद्ध,सवती मत्सर, पतींची तुलना अश्या गोष्टी ज्याचा आपण विचार केला नाही .
पुस्तकातील भाषा अतिशय साधी सहज नेहमीच्या वापरातील आहे. कुठेही अलंकारिक भाषा नाही .पांचाली आपल्या पतींना अरे तुरेच करते. इथे पांचाली महाराणी नाही तर एक स्त्री म्हणून आपले मनोगत सांगतेय .
एक वेगळे पुस्तक म्हणून नक्की वाचावे

जाणं...३

जाणं....३
त्या इमारतीच्या गच्चीवरून तो समोरच्या खिडकीकडे एकटक बघत होता.दर दोन मिनिटाने कावकाव करत पंख फडकवायची त्याची सवय ही विसरून गेला होता तो. 
आता त्याची त्या खिडकीत जायची वेळ झाली होती. पण समोर वहिनी दिसत नव्हती. याचवेळी ती छोटूला घेऊन खिडकीत यायची .एक घास छोटूला तर दुसरा त्याला द्यायची. तोही खुशीत कावकाव करायचा तेव्हा छोटू आनंदाने टाळ्या वाजवायचा.
वहिनी आणि छोटूला पाहायला तो त्या खिडकीत बऱ्याच वेळा जायचा . कधीकधी त्याची काव काव ऐकून वहिनी चिडायची तर छोटुची झोपमोड व्हायची .पण हा कधीही काही न खाता त्या खिडकीतून परतला नाही. हल्ली हल्ली तर छोटू आणि वहिनी त्याच्या चोचीत खाऊ भरवू लागले होते. 
पण काल त्या खिडकीत खूप शांतता होती. तो नेहमीप्रमाणे काव काव करीत खिडकीत गेला तेव्हा छोटू बाबांच्या कडेवर शांतपणे बसला होता. घरात वहिनी कुठेच दिसत नव्हत्या. पण कोपऱ्यात एक स्त्री मोठमोठ्याने रडत होती. 
" बिचारी.. काल रात्री ताप आला म्हणून ऍडमिट केले तर वाटले नव्हते परत येणार नाही .आमच्या छोटूला पोरके करून गेली हो ....असे म्हणून ती अजून मोठमोठ्याने रडू लागली.ते ऐकून दुःखाने त्याने कावकाव केले.
 छोटुने त्याचे कावकाव ऐकले आणि त्याच्याकडे पाहून निरागासतेने हसला आणि त्याच्याकडे पाहून हात हलवला.इतक्यात ती स्त्री काठी घेऊन त्याच्यावर धावून आली ." मेला ....नको त्या वेळी कावकाव करीत येतो.."ती काठी फिरवत पुटपुटली. तो चपळाईने उडाला .आता पुन्हा या खिडकीत यायचे नाही असा निश्चय करूनच तो निघून गेला.
आज सकाळी पुन्हा तो खिडकीसमोरच्या इमारतीच्या टेरेसवर बसला होता. पण त्या खिडकीत जाण्याची इच्छा होत नव्हती .
इतक्यात कोणीतरी त्या खिडकीत पानातून वरणभात ठेवला ते पाहून त्याने सूर मारला आणि खिडकीत येऊन बसला . निरागस छोटू खिडकीत बसून त्याच्याकडे पाहून हसत होता आणि हातातील घास खायला त्याला बोलावत होता.छोटुसाठी का होईना त्याला खिडकीत यावेच लागणार होते .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Wednesday, May 5, 2021

जाणं....२

जाणं....२
"अरे गाढवा....!! ते केस किती वाढलेत बघ जरा ...?? कधी कापणार तू ...?? ती राहुलचे केस पकडून त्याला हलवत म्हणाली.
"कापेन ग आजी ..या लॉकडाऊनमुळे सर्व सलून बंद आहेत . आणि तसेही मला केस कापायला विशिष्ट सलून लागतात माहितीय ना तुला ...."राहुल चिडून म्हणाला.
"हो तर ....अगदी हिरोच आहेस तू ... तीन महिने झाले केस कापून.आता पुन्हा किती वाढले बघ.. नवीन स्टाईल करायची असेल म्हणून आता अजून महिनाभर कापणार नाहीस..."असे बोलून त्याच्या समोर हात जोडले.
आज स्मशानात राहुलही आला होता. त्याला ते सर्व आठवत होते.आजीच्या दशक्रिया विधीला मोजकीच माणसे होती. त्या दिवशी रात्री अचानक आजीला अस्वस्थ वाटू लागले म्हणून ऍडमिट केले आणि दोन तासात आजी गेली. प्रेत परस्पर हॉस्पिटलमधूनच स्मशानात नेले होते. राहुलला तर तिचे अंतिम दर्शनही  घेता आले नव्हते. म्हणून राहुल हट्टाने दहाव्याला आला होता.
भटाने दिलेले पाणी डोक्यावर शिंपडून बाबा केस द्यायला रांगेत उभे राहिले तेव्हा राहुल त्यांच्या मागे उभा राहिला .आजीसाठी आपले केस नक्कीच देऊ शकत होता तो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

Tuesday, May 4, 2021

जाणं....१

जाणं....१
नेहमीप्रमाणे हातात दोन दुधाच्या पिशव्या घेऊन रूम नंबर ३०४ ची बेल त्याने दाबली.दरवाजा उघडताच समोर समिरदादाला पाहून चमकला.
 "काल दादा गेले . दुपारी अस्वस्थ वाटू लागले म्हणून ऍडमिट केले. तासाभरात खेळ संपला.आजपासून दुधाची एकच पिशवी दे "दुःखी आवाजात समीर म्हणाला.
 त्याला काहीच सुचेना.काही न बोलता त्याने एक पिशवी त्याच्या हातात दिली आणि वळला.
असे कसे झाले...?? रोज दादाच दरवाजा उघडून दूध घेत होते आणि त्याच्याशी दोन शब्दतरी बोलल्याशिवाय दरवाजा बंद करत नव्हते. कधीकधी त्याच्या छोट्या भावासाठी खाऊ किंवा टी शर्ट देत. "दुधात पाणी टाकतोस..."अशी प्रेमळ तक्रार ही करीत.काही मदत लागली तर सांग रे ... असे आठवड्यातून एकदातरी म्हणत.
काल सकाळी ही दरवाजा नेहमीप्रमाणे त्यांनीच उघडला आणि आज हे अचानक ....?? दादांचे आयुष्यात नसणे ही कल्पनाच तो करू शकत नव्हता. किती आधार वाटायचा त्याला .
गेट बाहेर येऊन त्याने हळूच डोळे पुसले.हातातील दुधाची पिशवी त्याने कोपऱ्यात बसलेल्या भिकारणीला दिली.आता तो पुढचे दहा दिवस रोज एक पिशवी तिला देणार होता . दादांसाठी कमीतकमी हेच करू शकणार होता तो.
© श्री. किरण कृष्णा बोरकर