Monday, January 23, 2023

प्रेम करावं पण जपून

#साहित्यसंपदा 
#मराठी_नाटक 
#प्रेम
#प्रेम_करावं_पण_जपून

प्रेम करावं पण  जपून 
मराठी नाटक 

प्रेम हा विषयच मोठा आहे .यात सर्व काही येते .
जवळीक,दुःख,आपलेपणा ,दुरावा ,गैरसमज .
प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि म्हणूनच या विषयावर अगणित कथा कादंबऱ्या चित्रपट नाटके लिहिली जातात .
काल साहित्यसंपदा समूहातर्फे श्री.वैभव धनावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत  मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात प्रेम करावं पण जपून या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी  प्रयोग पाहण्याचा योग आला .नवीन तरुण कलाकार ,दिग्दर्शक लेखक अशी सर्व तरुण टीम असूनही नाटकाचे पन्नास प्रयोग होणे ही कौतुकाची बाब म्हटली पाहिजे .सर्व टीमचे मनापासून अभिनंदन .
नाटकात नावाप्रमाणेच एका प्रेमाचीच कथा आहे .पहिला अंक संपेपर्यंत आपल्याला नक्की कथा पुढे कशी जाणार याची कल्पना येत नाही .पहिला अंक नायक नायिकेचे प्रेम कसे जुळते त्यांचा स्वभाव कसा आहे यातच पुढे जातो .पण खुसखुशीत संवाद ,सहज अभिनय ,कलाकारांचा रंगभूमीवरचा वावर आणि मुख्य म्हणजे कुठेही कोण अडखळत नाही यावरच प्रेक्षक नाटकाचा आनंद घेतात .
पण पहिला अंक संपताना नाटकात पुढे काय घडणार याची कल्पना येते आणि ते कसे घडेल या उत्सुकतेने प्रेक्षक दुसरा अंक  पाहायला सरसावून बसतो .
अपेक्षेप्रमाणे दुसरा अंकही मोठा आहे .दुसऱ्या अंकात लेखक प्रेमावर गंभीर झालाय .तरीही त्याने नाटकावरील पकड कमी पडू दिली नाही .मध्येमध्ये खुसखुशीत संवाद टाकून त्याने आपल्याला गंभीर बनविले नाही . शेवट अर्थात नेहमी प्रमाणे गोड .
नाटकात फक्त चार पात्रे आहे. दोन तरुण दोन तरुणी .चारही वेगवेगळ्या स्वभावाचे प्रतिनिधित्व करतात .
संतोष उर्फ संत्या कमी शिकलेला ,कोकणातून आलेला  .आपल्या भाषेवर आणि गावावर प्रेम आहे .ते त्याच्या भाषेतून आणि वागण्यातून स्पष्ट जाणवते.त्याचा लांबचा भाऊ आकाशकडे तो राहतोय .
आकाश नोकरी करणारा तरुण.तो प्रेमात पडलाय आणि आपली सुखदुःख संत्याकडे मोकळी करतोय.त्याच्या मते प्रेम जगले पाहिजे .आधी प्रेम करूया मगच ते स्वच्छंदी जगूया त्यासाठी आयुष्य पडलंय. 
त्याची प्रेयसी श्रावणी आताची तरुणी आहे .ती मुंबईत नोकरीसाठी आलीय.तिला स्वच्छंदी आयुष्य जगायचेय .तर तिची मैत्रीण सुरेखा तिच्या प्रियकरासोबत चार वर्षे फिरतेय .त्याला आपले सर्वस्व देऊन बसलीय पण आता त्याला तिचा कंटाळा येऊ लागलाय. दोन टोकाच्या स्वभावामुळे आकाश श्रावणीमध्ये दुरावा आलाय आणि तो कसा दूर होतो त्यासाठी हे नाटक बघायला हवे.
दिग्दर्शक विशाल असगणकर याने संत्याची भूमिका केलीय.कोकणी भाषेचा वापर ही नाटकाची प्रमुख बाजू आहे .कोकणी भाषेचा लहेजा वेगळाच आहे .नुसती हाक मारली तरी चेहऱ्यावर हासू उमटते .त्यांचा रंगमंचावरील वावर ही प्रभावी आहे .एक नवीन विनोदी कलाकार रंगमंचाला मिळालाय असे समजायला हरकत नाही.
लेखक संकेत शेटगे यांनी नायकाची आकाशची भूमिका केली आहे .आवाजातील चढउतार व्यवस्थित व्यक्त केले आहेत.
श्रावणीची भूमिकेत मृदुला कुलकर्णी आहेत.त्यांचा आवाज खूप छान आहे .भावनिक प्रसंग छान रंगविले आहे .
भक्ती तारलेकर हिने सुरेखाची छोटी पण आजच्या बिनधास्त तरुणीची भूमिका केली आहे .प्रेमात दुरावा आल्यानंतरही अस्वस्थता तिने प्रभावीपणे केली आहे.
आजच्या तरुणाईला आवडेल असे हलकेफुलके पण प्रेमाचा विशिष्ठ संदेश देणारे हे नाटक प्रत्येकाने एकदातरी पाहिले पाहिजे आणि या टीमचा उत्साह वाढविला पाहिजे.

© श्री.किरण कृष्णा बोरकर

२३/१/२०२३

No comments:

Post a Comment