Tuesday, January 17, 2017

कावळा

",च्यायला ,!!"इथे रहाणे हीच मोठी शिक्षा आहे माझ्यासाठी ",पंख फडफडवत तो उद्गारला आणि परत नुकत्याच ठेवलेल्या पिंडावर सूर मारला . तेच तेच अन्न ,तेच दुर्मुखलेले चेहरे आणि चोच मारल्यावर सुटकेचे भाव पाहून तो कंटाळला होता . गेल्या वर्षभरापासून तो बदलीसाठी प्रयत्न करत होता पण आखिल भारतीय कावळे संघटना अध्यक्ष त्याची मागणी धुडकावून लावत होते . अरे त्याच्या जागेवर कोण यायलाच  तयार नव्हते तर कोण काय करणार??
. पहिल्यांदा त्याला खूप गंमत वाटत होती . काही काम न करता फक्त बसून राहायचे आणि पिंड ठेवला कि झडप मारायची . त्यावर लोक पाया पडायची ते वेगळेच . म्हणजे पिंडावर चोच मारून जणू आपण उपकारच केले असे वाटायचे त्याला . मग तो त्यांची गंमत करू लागला. काही काही पिंडाना मुद्दाम स्पर्श नाही करायचा ,आलेल्या सर्व नातेवाईकांची गम्मत पाहत तो लांब बसून राहायचा ,एक एक जण येऊन त्याची मनधरणी करायचे ,हाथ जोडायचे . कुठेतरी त्याला बरे वाटायचे ,खिडकीत बसलो कि हकालवून लावणारे आज त्याच्या पाया पडत होते .  कशी असतात हि माणसे ?? किती स्वार्थी ,जोपर्यंत मी चोच मारीत नाही तोपर्यंत हे इथून निघणार नाहीत या जाणिवेनेच तो सुखवायचा .
पण असे किती वर्षे चालणार . सारखे तेच तेच खाऊन दुसरे अन्न असते हे विसरूनच गेले होता तो .सकाळी 7 ते 9  हेच काम होते त्याचे  आणि त्यानंतर  प्रेताबरोबर आलेल्या  वस्तूवर जगावे लागत असे त्याला . हळू हळू त्याच्या लक्षात येऊ लागले कि का इथे कोण येत नाही? का ठेवलेल्या पिंडाला चोच मारायचे टाळतात ??. खूप वेळ त्याला ओरडून सांगावेसे वाटते ",आहो बदल करा काहीतरी ,कंटाळा आलाय आम्हाला तेच तेच खाऊन, पण फक्त काव काव उमटायचे . एकदिवस कंटाळून त्याने एका पिंडाला चोच मारलीच नाही ,बघुया काय होतेय ,बराच वेळ वाट पाहून ,पाया पडून ,विनवणी करून शेवटी सर्व घरी गेले ,कुतूहल म्हणून तोही उडत उडत त्यांच्या घरी गेला  तर पिंडाला चोच न लावण्याची त्याची कृती त्या बिचार्या बाईला भोगावी लागत होती . सर्व नातेवाईक तिला शिव्या देत होते ,मेल्यानंतर हि नवर्याला शांती नाही म्हंणत  सर्व खापर तिच्यावर फोडत होते. अरे बापरे माझ्या कृतीची शिक्षा तिला का ?? आहो तिची काही चुकी नाही असे ओरडून सांगावेसे वाटले त्याला पण काव काव शिवाय काही उमटले नाही . खरेच आपल्या कृतीचे इतके भयानक परिणाम होऊ शकतात हे पाहूनच तो हादरून  गेला . आपण गेल्यावर काय होईल मग ??  नको नको निदान या लोकांसाठी तरी थांबवे लागेल आपल्याला ,असा विचार करत त्यानेबदलीचा  अर्ज फाडून टाकला

श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment