Saturday, September 1, 2018

सुर्व्यांचा गणपती

दरवर्षीप्रमाणे यंदाही सुदाम सुर्वेच्या घरात नातेवाईकांची गर्दी होतीच.त्याचे चारही भाऊ आपल्या कुटुंबियांसमवेत हजर होते.भरलेले घर पाहून सुदाम खुश होता. शंकरने विन्याच्या लग्नाचा विषय काढला होता आणि  त्यानेही लग्नाला होकार दिला होता . तसेही आपण फार काळ चित्रपट सृष्टीत नायक म्हणून टिकू शकणार नाही हे ओळखले होते.पुढच्या वर्षी काकी येणार म्हणून बच्चे कंपनी खुश तर छोट्या  जाऊबाई येणार म्हणून बायका खुश होत्या.
संध्याकाळी सर्व गप्पा मारीत बसले असताना मंगेश पवार आत शिरला . मंग्या आणि शंकर एकाच वयाचे.मंगेशला लहानपणापासून कुस्तीची आवड त्यामुळे तो गावातच कुस्ती खेळत राहिला तर शंकर मुंबई स्थायिक झाला . मंगेश राज्य पातळीवर खेळला पण पुढे आर्थिक स्थितीमुळे खेळणे शक्य झाले नाही नाईलाजाने गावात रिक्षा चालवत राहिला . सर्व त्याला पाहून खुश झाले .
"काय चालू आहे मंग्या ......."??नामदेवने विचारले.
"बस ......चालू आहे ..."हसत मंगेश उद्गारला.पण त्यामागे वेदना होती.
"काय झाले ....." विनयने विचारले .
"मुलीची निवड झालीय ...महाराष्ट्राच्या कुस्ती संघात. पण ट्रेनिंगला पैसे नाहीत.आम्हीच कसेतरी जगतो त्यात हिचे कसे करणार ...???? मंग्या चिडून म्हणाला "च्यायला .....आमच्यावेळीही हीच परिस्थिती आणि आताही तेच ...... अजून आहे तिथेच आहोत आम्ही . टॅलेंट असून काय उपयोग ....??? आर्थिक पाठबळ नको. व्यायाम ...खाणे ...प्रॅक्टिस यांच्यावर किती खर्च होतो . कोण देणार आम्हाला ...?? मोठमोठ्या यशस्वी लोकांवर पुस्तके लिहितात ...लेख लिहितात  पण आमच्या सारख्या अयशस्वी लोकांवरही लिहा की ..... का आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही ..??  कुठे कमी पडलो आम्ही ....??  त्यावेळी पैश्याचे पाठबळ असते तर आज आंतराष्ट्रीय स्पर्धेत खेळलो असतो . पण घरात दमडी नाही . दुसऱ्यांच्या शेतात मजुरी केली तेव्हा कुठे चार पैसे मिळायचे .आज मुलीच्या बाबतीत ही तेच घडतेय.." डोळ्यातील पाणी पुशीत मंगेश बोलत होता.
सगळे शांत झाले. काय बोलावे काही सुचत नव्हते .
" तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव ...मी तिची मुंबईत राहायची सोय करू शकतो...माझ्याकडे राहील ती"अचानक शंकर म्हणाला.
"तसे असेल तर तिच्या पालन पोषणाची जबाबदारी माझी.तो खर्च मी देईन शंकरला..." विनय म्हणाला.
" मग तिच्या ट्रेनिंगची जबाबदारी माझी .... तिला ट्रेनिंगसाठी जे जे काही लागेल ते मी देईन.." नामदेवने आपली इच्छा सांगितली.
"अरे वा .....मग तिच्या प्रवासखर्चाची जबाबदारी माझी . जगात कुठेही गेली तरी तिच्या प्रवासाचा खर्च मी उचलेन.अरविंदने ही आपली तयारी दाखविली.
"छान .....असेच जर असेल तर यावेळी आपले गाव नक्कीच जगाच्या नकाशावर चमकेलं....". सुदाम खुश होऊन म्हणाला .
"ती जगाच्या नकाशावर चमको न चमको पण यावेळी आम्ही तिचा मंगेश पवार होऊ देणार नाही हे नक्की..." चारही सुर्वे एका सुरात ओरडले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment