Saturday, September 29, 2018

तयारी

आरश्यात बघून वैष्णवी निघण्याची तयारी करत होती. शेजारच्या सोफ्यावर बसून विनायक हसतहसत तिची लगबग पाहत होता. नुकताच तो टूरवरून परतला होता आणि आता वैष्णवीची पाळी होती.तयारी करता करता तिने ड्रॉवर उघडून दोन रिव्हॉल्व्हर असलेला पट्टा बाहेर काढून कंबरेला बांधला .मग कपाटातून जाळीदार चिलखत काढून अंगावर  घातले . हातात मावणारा एक छोटा स्प्रे पर्समध्ये टाकला .हे पाहुन हसणारा विनायक स्तब्ध झाला.
"अरे हे काय ......?? इतकी तयारी कसली ...? तू काय युद्धाला चाललीस का ...???  तो ओरडला .
"हल्ली तीच परिस्थिती आलीय बाबा ...... तुझे काय ..??.तू पुरुष ...... तुला कसली भीती .इथे आम्हा स्त्रियांनाच जास्त काळजी घ्यावी लागते . कोण कुठून हात घालेल सांगता येत नाही".ती कमरेवर हात ठेवून विनायकाला म्हणाली.
"खरे आहे तुझे ...... पण हल्ली इतकीही वाईट परिस्थिती नाही राहिलीय.प्रत्येकजण आपल्यापरीने शांततेत राहायला बघतो .पण कधी कधी सुटतो कंट्रोल ...."विनायक हसत म्हणाला."माझ्यासमोर तरी सगळे मुकाट रांगा लावून येत होते. सर्वच जण काहीतरी मागत होते . त्यांचे ऐकता ऐकता दिवस कधी सरायचा कळलेच नाही . तर काही ठिकाणी कोणीच नसायचे तेव्हा कार्यकर्त्यांचा पत्त्याचा खेळ बघता बघता रात्र निघून जायची . खरेच या देशाचे काही कळत नाही . इथे नवस बोलण्यासाठी रांग तर नवस फेडण्यासाठी रांग . तर काहीं फक्त रात्रभर पत्ते खेळतात.. मागत काहीच नाही . तरी बरे यावर्षी जाताना आवाजाचा गोंधळ नव्हता .त्या डीजे की काय त्यावर म्हणे बंदी घातलीय".
"काय म्हणतोस .....!! म्हणजे यंदा येताना शांततेत जयजयकार होत परत येणार तर मी ...." वैष्णवी हसत म्हणाली"अरे... तुझ्या मानाने मी सुखी आहे बघ....एकतर मोजक्याच ठिकाणी जाते . त्यातही बऱ्याच ठिकाणी हल्ली गरबा नावाचा एक नृत्य प्रकार चालत असतो . सर्व सजूनधजून येत असतात . लग्नाला करीत नाहीत इतका मेकअप आणि नवरा नवरीपेक्षा भारी कपडे दागिने घालून आलेले असतात . एक दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी जे काही प्रकार चालतात ते पाहून खूप करमणूक होते . रात्री जागरण होते पण दिवसभर कोण मंडपात फिरकत नाही . एक दिवस होम हवन करून गरिबांना जेवू घालतात ते पाहून बरे वाटते पण बरेच अन्न वाया जाते हे पाहून राग ही येतो खूप. रात्रीच्या गर्दीत लुटमारीचे प्रकार ही घडतात तर नको तेव्हडे अंग प्रदर्शन आणि स्पर्श हे प्रकार वाढले आहेत.लोकांची मानसिकता इतकी बदलली आहे की ते उद्या माझ्या अंगावरचे दागिनेही काढायला कमी करणार नाही . एकट्या स्त्रीला अजूनही सुरक्षितता वाटत नाही . लहान मुलीही सुटत नाहीत यांच्या तावडीतून . म्हणूनच ही सर्व तयारी करून जावे लागते बाबा ... कितीही झाले तरी मी स्त्री आहे विसरून चालणार नाही .
"ठीक आहे ..जातेस .....मग काळजी घे . पुढचे नऊ दिवस तुला आराम नाही . मी मात्र आता भरपूर आराम करणार आहे . ऑल द बेस्ट बाय.... असे बोलून विनायक निघून गेला.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment