Thursday, April 25, 2019

दत्ता

दत्ता
दत्तात्रय नार्वेकर उर्फ दत्ता ...काही माणसे फक्त लोकांच्या शिव्या आणि मार खायालाच जन्माला आली असावीत हे दत्ताकडे बघून पटते . कालपर्यंत तरी त्याने लोकांच्या शिव्या खाल्ल्या आहेत.. टपल्या खाल्ल्या आहेत.प्रसंगी मार ही खाल्ला आहे.पण हा माणूस काही त्यातून शिकला नाही आणि सुधारणार नाही .
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणे तसेच याची ती झलक गार्डनमध्येच दिसून आली.दहावीचा एक पेपर देऊन आम्ही संध्याकाळी गार्डनमध्ये अभ्यासाला जमलो. दुपारी सोडविलेल्या पेपरची चर्चा चालू होती तेव्हाच हा रमत गमत आला. आल्याआल्या त्याला मी विचारले" दत्ता... कसा गेला आजचा पेपर... ??? त्याने हळूच इथेतिथे पाहिले आणि माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला "भाऊ मी आज बोर्डाची जीरवली....." .मी कपाळावर आठ्या आणून "म्हटले कसे रे .."??" अरे... मी आज पेपरच दिला नाही .. .."असे बोलून तो माझ्याकडे पाहून हसला.आईशपथ माझ्याकडेही इतक्या वेगवेगळ्या शिव्यांचा संग्रह आहे हे इतरांनाही त्यादिवशीच कळले असेल.तेव्हापासून आम्ही दत्तापासून थोडे दूरच राहू लागलो.हा कोणाला कधी काय बोलेल आणि काय करेल याची कोणीच खात्री देऊ शकत नव्हता .
एके दिवशी सर्वजण गार्डनमध्ये बसून गप्पा मारत होतो . त्यावेळी बाहेरून एक अंत्ययात्रा जात होती. कोणतरी म्हातारा किंवा म्हातारीच असेल .कारण ती वाजतगाजत भजन म्हणत चालली होती . अचानक बाजूला कोण नाचतेय म्हणून मी पाहिले तर हा .... दत्ता.... एकदम तल्लीन होऊन नाचत होता. विक्रमने त्याच्या डोक्यावर जोरात टपली मारली "हे काय ..?? Xxx...."!! असे बोलून अंगावर धावून गेला . तेव्हा हा निरागसपणे म्हणतो "अरे ह्या म्युझिकवर कसे नाचता येईल ते ट्राय करतोय.कधीतरी गणेशोत्सवात नवीन काही करायच्या कामास येईल".नेमकी ती गोष्ट ह्याच्या शेजाऱ्याने पहिली होती . ती त्याने ह्याच्या बापाला सांगितली आणि घरी गेल्यावर बापाने दत्ताला धू धू धुतला.
अशीच वर्षे  निघून गेली.सर्व मोठे झाले पण दत्ता काही मोठा झाला नाही. तो तसाच राहिला.विक्रमचे लग्न झाले आणि बायकोला घेऊन देवळात चालला होता इतक्यात हा त्याच्यासमोर आला."आयला...!! विक्रम नवीन आयटम.मजा आहे बाबा तुझी ..असे बोलून हसला .काही न बोलता विक्रम निघून गेला आणि अर्ध्या तासाने येऊन दत्तावर चढ चढ चढला.पण खरी मजा तर सहा महिन्यांनी आली जेव्हा विक्रमच्या बायकोने नाक्यावर येऊन दत्ताच्या कानफटात मारली.मी तिला कारण विचारले तेव्हा म्हणाली "हा मला आयटम म्हणाला होता. त्याचा अर्थ आज मला कळला".आम्ही कसेबसे समजावून तिला घरी पाठवले.
कितीतरी वेळा त्याला समजावून सांगितले बाबा तोंड बंद ठेव पण हा ऐकतच नाही.14 ऑगस्टला रात्रीचा शो पाहून बाहेर पडलो आणि एकाला चायनीज खायची इच्छा झाली .एकाने बियर काढल्या आणि रस्त्यावरच कोपऱ्यात प्रोग्रॅम सुरू झाला . इतक्यात राऊंडची व्हॅन आली . त्यातील इन्स्पेक्टर आमच्याजवळ आला."काय चालू आहे तुमचे..."??  त्याने आवाज चढवत विचारले . मी सहजपणे" बियर पितोय .."असे सांगितले."लवकर आटपा.." असे बोलून तो जायला निघाला आणि कोपऱ्यातून  दत्ता "बियर काय दारू नाय हाय .."असे पचकला. झाले ...तो इन्स्पेक्टर वळला आणि सगळ्या बाटल्या फोडून टाकल्या .उलट काहीजणांना काठीचे फटके दिले ते वेगळेच.
परवा थोडा उशिरा कामावर निघालो तेव्हा पाहिले एक तरुण स्त्री त्याला बडबडत होती . पुन्हा मी मध्ये पडून त्याला बाजूला काढले . ती का बडबडली याचे कारण विचारले तेव्हा हा म्हणतो अरे रोज यावेळी समोरासमोर येतो आम्ही . आज तिने चष्म्या लावला म्हणून विचारले आज चष्म्या ...?? वय झाले का ...?? तर ती चिडली ."अरे बाबा ..ती चिडणारच "मी संतापून म्हणालो . हा मात्र माझ्याकडे निरागस चेहऱ्याने पाहत राहिला .
त्या दिवशी सकाळीच बोंबाबोंम झाली एल्फिन्स्टन रेल्वे ब्रिज कोसळला . आम्ही सर्व  हातातील कामे सोडून धावत निघालो . ब्रिज कोसळला नव्हता पण काहीतरी अफवा पसरवून चेंगराचेंगरी झाली . जखमींना मदत करायला सर्व पुढे झाले . दत्ता आणि विक्रमने काही जखमींना हॉस्पिटलमध्ये पोचवले .जखमींची अवस्था  पाहून सर्वच हळहळत होते . त्यांना पाहून दत्ता विक्रम जवळ आला" विकी ...अरे आपण दोन तीन बाटल्या रक्त देऊ शकतो का ?? विचार न डॉक्टरला ... मी तयार आहे रे .अरे सत्तर किलोचा देह आहे माझा  आतापर्यंत कितीजणांचा  मार खाऊन भरपूर रक्त वाया गेलंय . मग अश्या कामासाठी तीनचार बाटल्या घ्यायला सांग ना त्यांना . त्यांना गरज आहे रे रक्ताची . बघ ना किती गंभीर अवस्था आहे त्यांची . तू सांग डॉक्टरला माझे हवे तितके रक्त घ्यायला..."असे म्हणत रडत रडत विक्रमला मिठी मारली.यावेळी मात्र डोळ्यातील अश्रू पुसत विक्रमने त्याला कुशीत घेतले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment